अलीगढ मुस्लिम विद्यापीठात स्त्रिया

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शिरताना माझ्या दृष्टीला एक महान आंतराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेची प्रतिमा दिसत होती. तिथे तरुणतरुणींना मूलभूत आचारविचारांशी ओळख करून दिली जात असेल, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणात अडकलेल्यांना ते बंध तोडण्याच्या वाटा दाखवल्या जात असतील, वगैरे वगैरे, पण माझ्या तिथल्या चार वर्षांच्या वास्तव्यात मला शिक्षण आणि प्रगती यांच्यातली भिंत अभेद्य का आहे, ते कळले. एक महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यापीठाचा लिंगभेदाबाबतचा बुरसटलेपणा.

विद्यापीठात एक महिना काढल्यानंतर मला कळले की बारावीपर्यंतचे आणि पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम मुलींना व मुलांना वेगळे ठेवत असत. हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे का ? मला वाटते, की तो तसा आहे.

अब्दुल्ला हॉल हे स्त्रियांसाठी राखीव असे वसतिगृह आहे. त्यात वर्ग, बाजारहाट, खेळ, सारेच आहे. स्त्रियांना रक्षणाची गरज आहे, या तथाकथित पारंपरिक इस्लामी दृष्टिकोनातून हे आजही सांभाळले जाते. आणि चौकीदारापासून प्रॉक्टरपर्यंत सारे आपण इस्लामी मूल्ये रुजवतो असे सांगत असल्याने स्त्रीशिक्षण या तथाकथित मूल्यांना अनुसरत असते.

यामुळे कलाकेंद्र, वादविवाद सभा, नाट्यमंडळ फार कशाला, रस्ते आणि खेळांची मैदाने ह्यांवरील माझा वावरही पुरुषांना जड गेला. नाट्यमंडळाने कधी स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांना दिल्याच नव्हत्या. रस्त्यांवर स्त्रियांनी रिक्षाने जाणे अपेक्षित होते, चालणे नव्हे. आणि ही बंधने मोडताना सतत तुमचे पावित्र्य आणि शुचिता निरखणाऱ्या अनेकानेक पुरुषी नजरा असत. कपडे, हातवारे, बोलणे, सारे सतत तपासले जात असे.

इथे सत्ता हा केवळ पुरुषी प्रकार आहे. सगळे नियम पुरुषांनी केलेले, पुरुषांच्या सोईचे आणि पुरुषच लागू करणार असे. याला आधार मात्र इस्लाम आणि स्त्रियांच्या रक्षणाच्या गरजेचा. शिक्षण हे विद्यार्थ्यांना स्वतःच्या संरक्षणाला सुसज्ज करते ना ? जर त्या व्यवस्थेनेच तुमच्यावर अपंगत्वाचा शिक्का मारला तर तुम्ही मुक्ती कशी मिळवणार ? या प्रश्नांमधून अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने जोपासलेली मूल्ये तपासायला सुरुवात व्हायला हवी.

विद्यार्थी सभांमध्ये इथे स्त्री-सदस्य कधी नसतातच. या विद्यापीठातर्फे आंतरविद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये कधी महिला संघ जातच नाहीत. राष्ट्रीय युवक समारोहांना मुलींनाही पाठवावे, हे साहित्य मंडळाने नियोजकांना पटवून दिले, ते २००० साली, मी विद्यापीठात दाखल झाले, त्या वर्षी. पण त्यावरही ‘गंभीर’ चर्चा होऊन “विचारांती’ तो निर्णय घेतला गेला.

इतिहासभर ह्या संस्थेतल्या मुलींना बारीक तपासणी आणि टीकेला तोंड द्यावे लागलेले आहे. अवर्णनीय प्रकार आहे तो. इथे विद्यार्थ्यांचा एक गट तपासणी करत नसतो, पुरुषांचा गट असतो तो. ते स्वतःचे विद्यार्थीपण विसरून स्वतःवर विद्यापीठातल्या स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी घेतात. हे आधुनिकता आणि उदारमतांपासूनचे ‘रक्षण’ असते. कोणाशी बोलता, कशा बोलता, हे सारे पाहून केव्हा जायचे, कसे बसायचे, केव्हा जेवायचे, सगळे ‘ते’ ठरवतात.

मी मुलगी आहे आणि माझा मुलांमधला वावर ‘असभ्य’ आहे याची मला सतत जाणीव होत असते, मग तो वावर शिक्षणासाठी का असेना. या सततच्या मूल्यमापनाने घाबरून मुली वसतिगृहांमध्ये स्वतःला कोंडून घेतात. सरासरी तीन वर्षे फक्त अभ्यास, वर्ग, लेक्चर्स, असे जगतात. माझ्या अनेक वर्गमैत्रिणी, हुषार, गुणवती, महत्त्वाकांक्षी आहेत. त्या फक्त वसतिगृहांमध्ये वावरत जगतात. त्यापलिकडे त्यांना आयुष्यच नाही. मुलगे मात्र मैदानांवर फुटबॉल, बास्केटबॉल खेळतात, तबला-सतार शिकतात, रात्ररात्र वाचनालयात घालवतात.

कोण लढेल आमच्यातर्फे ? की मुस्लिम मुलींना चांगले शिक्षण देण्याची त्यांची लायकीच नाही ? की त्या पुरुषांना दुय्यमच आहेत आणि पुरुषी छायेतच त्यांनी जगायचे आहे ? की अलीगढचे स्त्रियांसाठीचे शिक्षण फक्त चांगले ‘स्थळ’ म्हणून मुलींना घडवत असते ? जे काय असेल ते असेल मी ते मुकाट्याने मान्य करून ‘वेगवेगळे’ शिक्षण स्वीकारणार नाही. आमच्या अस्मिता, आमची व्यक्तित्त्वे, विद्यापीठाच्या भिंतींमध्ये चिणून टाकता येणार नाहीत. एखादेवेळी काळासोबत, अनुभवांसोबत विद्यार्थीच आपले हक्क मागायला उभे राहतील. विद्यापीठाने सामंती, हुकुमशाही वृत्ती सोडल्या नाहीत तर शिक्षण आणि विद्यार्थी या दोन्हींची गुणवत्ता ढासळेल. आम्हाला उच्चशिक्षणाची क्षमता विकसित करणारे प्राध्यापक हवे आहेत. आम्हाला १९५० ची मानसिकता नको आहे, तर त्याऐवजी बदलती परिस्थिती सामावून घेण्याची वृत्ती हवी आहे. आम्हाला विद्यापीठावर आमच्यासारखेच प्रेम करणारे आजीमाजी विद्यार्थी, शिक्षक, विचारवंत हवे आहेत. हे न केले, न झाले, तर आपल्यावर लादलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या ओझ्याने ही महान संस्था मरून जाईल. जनता, २७ जून २००४ मधून. ताहेरभाई पूनावालांचे हे छापण्याच्या सूचनेबद्दल आभार. दक्षिण आशियातील मानव विकास: २०००

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.