दुर्बोध!

तसेंच लोकस्थिति सुधारावयाची असेल तर ती आंतून सुधारली पाहिजे. लोकांमधील परस्पर-संबंध काय आहेत, त्यांनी स्थापिलेल्या संस्थांचे हेतु काय असतात, राजाचा अधिकार किती असावा आणि प्रजेचे हक्क कोणते आहेत, ते इतकेच कां असावेत आणि जास्त का नाहीत; धर्म, नीती, जाती इत्यादि बंधनें अस्तित्वांत कां आलीं व कशी आली हे व असलेच आणिक प्रश्न जे लाखों आहेत, त्यांवर समाजाची इमारत रचलेली आहे. तेव्हां या विषयांचे विवेचन ज्या ग्रंथांत येणार त्यांचे परिशीलनाने लोकस्थितींत अंतर पडेल यांत नवल ते कोणते ? उदात्त विचार, दूरदृष्टि, बुद्धीची कुशाग्रता, स्वातंत्र्याची प्रीति, आणि गुलामगिरीचा तिरस्कार, डामडौलाचा आळस, आणि साधेपणाची आवड, आपल्या देशाचा, भाषेचा आणि लोकांचा अभिमान, सत्याची चाड आणि सत्तेविषयी निर्भयपणा, मानसिक धैर्य, आणि सांग्रामिक शौर्य, निःस्पृहपणा आणि लांगूलचालनाचा द्वेष इत्यादि असंख्य सद्गुणांची स्फूर्ति अंतःकरणांत उत्पन्न होण्याला उत्तम ग्रंथाचे अध्ययनासारखा दुसरा मार्ग नाहीं.

ही भाषांतरें कोणाकरितां आहेत या प्रश्नाचे उत्तर भाषांतर शब्दानेंच काही अंशी दिले जाते. विशेषकरून ज्यांना केवळ स्वभाषेचेंच ज्ञान आहे, ज्यांना अन्य भाषेतील रसास्वाद घेण्याची इच्छा असून तशी साधने नाहीत, त्यांच्याकरितां ही साधने आम्ही तयार करीत आहोत. तसेंच अन्य भाषा जाणणाऱ्यांनाहि स्वभाषेची गोडी लागावी व इंग्रजी वाचावयाचे नाही आणि मराठींत कांहीं वाचावयासारखें नाहीं अशा सबबीवर त्यांना उडवाउडवी न करता यावी एतदर्थ हा व्यवसाय आम्ही आरंभिलेला आहे. भाषांतर करतांना कित्येक ठिकाणी दुर्बोधपणा येईल तो दूर करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करूं. परंतु, तरीसुद्धां जी दुर्बोध स्थळे राहतील आणि जे नवीन आणि अपरिचित शब्द येतील त्या सर्वांसंबंधी येथे एवढेच कळविले पाहिजे की, हा आमचा दोष नाहीं आणि हा जर कोणाचा दोष असेल तर तो केवळ वाचकाच्या अपरिचितत्वाचा आहे असे समजले पाहिजे. आम्ही घेतलेले विषय बहुतेक शास्त्रीय असल्यामुळे ते कादंबऱ्यांसारखे किंवा वर्तमानपत्रांतील लेखांसारखे एकदां वाचून समजणे अशक्य आहे. त्यांवर विचार केला पाहिजे. तत्त्वज्ञानाचा अभ्यास म्हणजे चढणीचा मार्ग आहे. अशा मार्गाने धांवत जातां येणार नाही. जो दमादमाने जाईल तोच या टेकडीच्या शिखराला पोहोचेल. भाषांतर मासिकाच्या उपोद्घातातून.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.