नागरी सामाजिक संबंधः तीन दृष्टिकोन

आधुनिक औद्योगिक आणि नागरी क्रांतीमुळे समाजव्यवस्थेवर मोठे परिणाम होत असल्याचे जाणून अनेक अभ्यासकांचे लक्ष सामाजिक संबंधांकडे वळले. पाश्चात्त्य विद्यापीठांमध्ये गेल्या दीडशे वर्षांत सामाजिक-शास्त्रांमध्ये मोठे संशोधन झाले. या अभ्यासातून तीन प्रकारचे मतप्रवाह निर्माण झालेले दिसतात. या तीन मतप्रवाहांची निर्मिती एका पाठोपाठ झाली असली तरी तीनही मतप्रवाह मानणारे त्यांचा सखोल अभ्यास करणारे विचारवंत आजही आहेत. या तीन मतप्रवाहांचा परिणाम देशांच्या सरकारी धोरणांवरही पडलेला दिसतो. तसेच त्या अभ्यासकांवर प्रचलित तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या घटकांचाही प्रभाव दिसतो. समाजातील घटकांचे, लोकांचे संबंध कसे आहेत, कसे असावे यावरही या अभ्यासकांनी काही टिपणे केली आहेत. त्यांचा थोडक्यात आढावा खाली घेतला आहे.
१) सामाजिक संबंध अशक्त होऊन ‘व्यक्ती’ एकट्या होत आहेत आणि माणसांची सामाजिकता हरवते आहे असे मानणाऱ्या समाजशास्त्रज्ञांचा मोठा प्रभाव १८८७ ते १९७७ या काळात टिकून होता. या मतांचा क्रांतिकारी तसेच पुराणमतवादी घटकांवर मोठा परिणाम झाला. मनुष्यप्राणी मूलतः दुष्ट आहे म्हणून त्याच्यावर सामाजिक निर्बंध घालणे आवश्यक आहे ही भूमिका त्यामधून पुढे आली. जुने सामाजिक संबंध, पारंपरिक समाजरचना ढासळण्याची चिंताही अशा अभ्यासातून व्यक्त होत असे. तसेच गरीब आणि श्रीमंत माणसांचे गट मुख्य समाजाबाहेर पडून समाज विस्कळीत होत असल्याची भीतीही या मतप्रवाहातून व्यक्त होत असे.
या विस्कळीतपणावर मात करण्यासाठी सामाजिक, सार्वजनिक नियंत्रण सरकारी माध्यमातून करण्याचे प्रयत्न केले गेले. सरकारांनी त्यावर धोरणात्मक भर दिला गेला. पण हे प्रयत्न अयशस्वी ठरलेले दिसले. त्यानंतर अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बळावत गेली. नागरी गरिबांसाठी सरकारी, सार्वजनिक घरबांधणी करून त्यांना स्वास्थ्य मिळवून देण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. सध्याच्या काळात या मतप्रवाहाचे धोरणात्मक महत्त्व कमी झालेले दिसते आहे. तरीही सामाजिक-शास्त्रांच्या अभ्यासकांचे यासंबंधी संशोधनात्मक काम चालले आहे. त्यामध्ये सरकारी नोकरशाही व्यवस्थेचे परिणाम, सामाजिक उत्क्रांतीची प्रक्रिया, पारंपरिक समाजाची आधुनिक समाजव्यवस्थेशी तुलना, मानवी स्थलांतरांचा अभ्यास वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहे. या अभ्यासकांना सुरुवातीला कौटुंबिक नातेसंबंध नष्ट होण्याची वाटलेली चिंता मात्र आता तितकी तीव्र राहिलेली नाही. कौटुंबिक, प्राथमिक सामाजिक नाती आजच्या काळातही महत्त्वाची आहेत असे आता अभ्यासकांनी मान्य केले आहे.
२) सामाजिकता टिकून आहे, ती हरवत नाही असा मतप्रवाह समाजशास्त्रामध्ये मुख्यतः १९५५ नंतर निर्माण झाला आणि त्याचा प्रभाव १९८० पर्यंत टिकून राहिला. आजही हा मतप्रवाह मोठ्या प्रमाणावर टिकून आहे. मनुष्यप्राणी हा मूलतः चांगला आहे. दुष्ट नाही. तसेच तो स्वाभाविकपणे समाजसंघटन करणारा प्राणी आहे. विशेषतः गरिबीच्या अवस्थेतही मानवी समाज स्वतःच्या गटांचे नियंत्रण, नियमन, संघटन करून दारिद्रय, दडपशाही आणि नैसर्गिक संकटांशी सामना करायला सक्षम असतो. त्यासाठी मानवाजवळ अंगभूत गुण, कसब असते असे या गटातील अभ्यासकांचे मत आहे. समाजांमध्ये नातेसंबंध लोकांना जवळचे वाटतात, महत्त्वाचे वाटतात. अशा प्रकारच्या सामाजिक अभ्यासाच्या भूमिकेतून वस्ती, व्यवसाय पातळीवर समाजगट बांधणी करण्याचे प्रयत्न देशोदेशी होत आहेत. अशा गटांकडून सरकारी, दूरस्थ कोरड्या नोकरशाहीला, तसेच अवास्तव औद्योगिक शिस्तीला विरोध केला जातो. सरकारी नियंत्रणांना विरोध केला जातो. नागरी घरबांधणीमध्ये सरकारी हस्तक्षेपाएवजी सामूहिक घरबांधणीचे प्रयत्न यामधून केले गेले. सरकारी हस्तक्षेपाला विरोधही यशस्वीपणे केला गेला. अशा गटांना मिळणारा सामाजिक आणि लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मान्य करून सरकारी धोरणांमध्येही हस्तक्षेप कमी करण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते. समाजामध्ये माणसांच्या नात्यांना विविध प्रकारच्या वास्तविक सीमा असतात. नागरी वस्त्यांमध्ये लोकांना शेजारी-संबंधांचे महत्त्व मूलभूत वाटते, असेही या अभ्यासकांचे मत आहे. वस्तीपातळीवरील संघटन करण्याचे प्रयत्न त्यांना महत्त्वाचे वाटतात.
३) आधुनिक नागरीकरणाच्या प्रक्रियेमुळे समाज अधिक मोकळा, सहिष्णु आणि उदारमतवादी होत आहे असे अनेक नागरी समाजशास्त्रज्ञांना वाटायला लागले. १९६६ नंतर हा मतप्रवाह निर्माण झाला आणि आज तो वाढतो आहे. या दृष्टिकोनाचे अभ्यासक समाजसंबंधांबद्दल अतिशय सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे आहेत. माणसे ही स्वाभाविकपणे उद्यमशील, चलाख आणि सरजनशील असतात. उपलब्ध सामाजिक संबंध वापरून ती स्वतःला आवश्यक अशा गोष्टी मिळविण्यासाठी धडपडणारी असतात.
भौगोलिकदृष्ट्या एकत्र राहणाऱ्या लोकांमध्ये असलेले संबंध फारसे घट्ट नसले तरीही माणसांमध्ये सामाजिक संबंध, देवाणघेवाण आणि ‘नेटवर्क’ यांच्या मोठा सहभाग असतो. तसेच माणसे अनेक प्रकारच्या नात्यांनी इतरांशी जोडलेली असतात. अशा नात्यांच्या आधारामुळेच व्यक्तिस्वातंत्र्याचा अनुभव माणसे घेऊ शकतात असे या अभ्यासकांचे मत आहे. पारंपरिक सामाजिक दबाव आणि बंधनांमधून माणसे मुक्त होत असली तरी त्यांची नाती टिकून आहेत. भौगोलिक वस्त्यांमधील ‘शेजारी’ नात्यांच्या जोडीने दूरवरच्या संबंधितांशी नाते जोडणी करून, त्याद्वारे सामाजिक आधार, पाठिंबा मिळविण्याची प्रवृत्ती समाजात दिसते. सामाजिक ताण कमी करण्याचे स्वयंस्फूर्त प्रयत्न माणसे करीत असताना दिसतात. तसेच हे संबंध टिकण्यामध्ये नवीन संवाद माध्यमांचाही वापर प्रभावीपणे केला जातो. फोन, फॅक्स, इंटरनेट याद्वारे लोक दूर अंतरावरील सामाजिक संबंध टिकवतात, वाढवतात असे दिसते. या नव्या माध्यमांतून जुन्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक गटांची जुनी नातीही सांभाळताना लोक दिसतात. किंबहना त्यांची जपणूक करायला ही साधने महत्त्वाची ठरतात. या मतप्रवाहाशी निगडित अभ्यासक अनेक प्रकारच्या नातेसंबंधाचा अभ्यास करीत आहेत. समाज नव्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. येणाऱ्या काळात दूर अंतरावरील पण घट्ट, जवळचे नातेसंबंध टिकून तर राहतीलच, परंतु अधिक आशयघनही होतील असा अंदाज या समाजशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून व्यक्त होताना दिसतो आहे.
संदर्भः
1)Wellman, Barry and Barry Leighton, 1979. “Networks, Neighbourhoods, and Communities: Approaches to the Study of Community Question’
Urban Affairs Quarterly. 14(3): 363 – 390. 2)Suttes, Gerald D, 1972. The Social Construction of Communities.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.