नागरी समाजाची व्यवच्छेदक लक्षणे

व्ही. गॉर्डन चाइल्ड (१८९२-१९५७) हे विसाव्या शतकातले एक महत्त्वाचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. मानवाने उभारलेल्या पहिल्या नगरांचे त्यांचे संशोधन मूलभूत होते. मानवसमाजाच्या विकासाच्या टप्प्यांसंबंधी त्यांनी महत्त्वाची सैद्धान्तिक मांडणी केली. अश्मयुग, ताम्र (ब्राँझ) युग, लोहयुग यांच्याऐवजी त्यांनी चार विकासटप्प्यांची योजना केली. अश्मयुग (पॅलिऑलिथिक) निओलिथिक, नागरी आणि औद्योगिक क्रांतीच्या विकासाची रचना त्यांनी मांडली. ते एक मार्क्सवादी विचारवंत होते. भौतिक बाबींवर अवास्तव भर दिल्याची आणि सांस्कृतिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. असे जरी असले तरी त्यांनी नागरी विकासाचा मोठा कालपट उभा केला याबद्दल दुमत नाही. चाईल्ड यांनीच सर्वप्रथम ‘नागरी’ समाजाची व्यवच्छेदक दहा लक्षणे मांडली. ही दहा लक्षणे पुढीलप्रमाणे:
१) दाटीवाटीने वसलेला, मोठ्या लोकसंख्येचा समाज.
२) शेती हा प्रमुख व्यवसाय, पण गरजेपेक्षा अधिक उत्पादन, त्यामुळे सामाजिक स्तरांची रचना आणि वर्गांची उपस्थिती.
३) देव ह्या काल्पनिक नियंत्रकाला कर वा भेट स्वरूपात मुख्यतः धान्याचे आणि वस्तूंचे दान.
४) मोठ्या आकारांची बांधकामे. उदा. देवळे, थडगी, संरक्षक भिंती, दगड-विटांचे उंच मनोरे, धान्याची कोठारे, रस्ते, कारागिरांच्या कार्यशाळा.
५) पुजारी, लढवय्ये आणि शासनकर्ते या वर्गांची सुरुवात.
६) संवादमाध्यमाची वाढलेली गरज आणि त्यामधून लिपीचा, लिखित भाषेचा उदय.
७) लिहिण्याच्या पद्धतीमधून आकडेमोड, गणित, भूमिती, ग्रह-ताऱ्यांचे नकाशे आणि ज्योतिषशास्त्राची सुरुवात. कालगणनेसाठी
कॅलेंडरची सुरुवात.
८) सौंदर्यपूर्ण कलावस्तूंची निर्मिती, कलाविष्कारातून संवाद. प्राणी, माणसे यांचे पुतळे,कोरीवकाम, आभूषणे, वस्तूंचे रेखाटन.
९) व्यापाराची सुरुवात, देवाण-घेवाण, दूरचा व्यापार.
१०)नागरी अस्मितेचा उगम. समाज, कुटुंब या जोडीनेच वसतिस्थानाला महत्त्व.
संदर्भ: V. Gardon Child: The Urban Revolution, Town Planning Review (1950) from The City Reader (1996) R. T. Legates & F. Stout (Ed.) Routledge, London & NewYork

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.