नागरी प्रकल्पविकासाचे वास्तववादी धोरण

“नगरांमध्ये विविध सुधारणा कश्या करायच्या याबद्दल तज्ज्ञांमध्ये अजिबात एकमत दिसत नाही. काहींना ‘पैसे’ हे सर्व नागरी समस्यांवरचे उत्तर आहे असे वाटते. काहींना नागरी राजकारण महत्त्वाचे वाटते तर काहींना सामाजिक संघर्षात नागरी प्रश्नांना उत्तरे सापडतात असे वाटते. एकंदरीत नागरी नियोजनाबाबतचा भ्रमनिरास मात्र सार्वत्रिकपणे (अमेरिकेत) दिसतो.

‘असे असतानाही नागरी नियोजनांची काही उदाहरणे मात्र यशस्वी ठरलेली दिसतात. ज्या सार्वजनिक नागरी धोरणांना खाजगी बाजारव्यवस्थेकडून सातत्याचा, सकारात्मक, कृतिशील प्रतिसाद मिळतो अशीच धोरणे यशस्वी ठरतात.

“खाजगी बाजारातन मिळणाऱ्या प्रतिसादाचे अंदाज करणे नेहमीच अवघड असते. पण ज्या प्रकल्पांत असे अंदाज बरोबर ठरतात ते यशस्वी होतात.”

नागरी प्रकल्पांच्या यशासाठी खालील घटक महत्त्वाचे आहेत. १) खाजगी बाजाराचा प्रतिसाद २) प्रकल्पाचे भौतिक स्थान ३) प्रकल्पाचे डिझाइन ४) प्रकल्पाचे आर्थिक धोरण, पतपुरवठा ५) उद्यमशील प्रकल्प-नेतृत्व ६) प्रकल्प राबविण्याची ‘योग्य’ वेळ यांपैकी एक जरी घटक उपस्थित नसेल तर प्रकल्प फसतात.

१) खाजगी ‘बाजारा’चा प्रतिसादः म्हणजेच नागरी ग्राहकांचा प्रतिसाद. कोणत्याही नागरी प्रकल्पांचा उपभोग घेणारे, उपयोग करणारे पुरेसे ग्राहक असावे लागतात. आणि अशा ग्राहकांची त्या प्रकल्पातून मिळणाऱ्या सेवेसाठी पुरेसा मोबदला देण्याची क्षमता आणि मानसिकता असावी लागते. केवळ ‘गरज’ म्हणून केलेली प्रकल्प-सेवा यशस्वी ठरत नाही. त्या सेवेसाठी जेव्हा ग्राहक ‘पैसे’ देतात तेव्हाच ती खरी ‘मागणी’ असते. असे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालणारे नियोजन यशस्वी होते. प्रकल्पाचा भांडवली खर्च, त्यावरील व्याज आणि देखभाल, दुरुस्तीचा खर्च प्रकल्पाच्या ग्राहकांनी उचलणे हे टिकाऊ प्रकल्पाचे मुख्य लक्षण असते. मुंबईच्या झोपडपट्टी सुधारणा योजनेत ‘फुकट’ घरे देण्याचे धोरण आहे. घरांचे ग्राहक काहीही आर्थिक वाटा उचलत नसल्याने आर्थिकदृष्ट्या या धोरणाचा बोजवारा उडाला आहे. याउलट मुंबईमधील उड्डाणपुलांचा खर्च वाहनधारकांकडून ग्राहकांकडून वसूल केल्याने त्यासाठी वित्तपुरवठा होऊ शकला आहे. सार्वजनिक शौचालयांसाठी जेथे ग्राहक पैसे देतात तेथेच ते प्रकल्प यशस्वी ठरल्याचे दिसते. सं.

२) भौगोलिक स्थानः प्रकल्पाचे स्थान आणि त्या प्रकल्पाच्या आजूबाजूचा परिसर, त्याचा वापर यांनाही महत्त्व असते. मोठ्या रस्त्यांना ओलांडून जाण्यासाठी अनेकदा पादचारी पूल वा जमिनीखालून सब-वे बांधले जातात. काही ठिकाणी ते यशस्वी ठरतात तर काही ठिकाणी त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामागे भौगोलिक कारणे दिसतात.

पुण्यामध्ये बालेवाडीचे स्टेडियम गावापासून फार दूर असल्याने वापरले जात नसावे. मुंबईच्या पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावरचे उड्डाणपूल यशस्वी ठरतात, पण तसेच पूल लहान गावांमध्ये यशस्वी ठरतातच असे नाही. तसेच अरुंद रस्त्यांवरील पूलही त्रासदायक ठरताना दिसतात. सं.

३) डिझाइन: डिझाइनचा संबंध केवळ सौंदर्यनिर्मितीशी नसतो. एखाद्या ठिकाणी विशिष्ट प्रकल्प डिझाइन करणे म्हणजे त्या जागेचा वापर, उपभोग वाढविणे, लोकांना त्यापासून आनंद मिळणे, मूळच्या जागेचा अधिक चांगला उपयोग होणे, वापर अधिक सुकर, आरामदायी होणे आणि लोकांचा त्रास कमी होणे, हे सर्व अभिप्रेत असते. मोठ्या प्रकल्पांमधील छोटेछोटे भागही चांगले सुरचित असावे लागतात. तसेच चांगले सामान, वेळेची, पैशांची बचत करणारे तंत्रज्ञान या गोष्टीही ‘डिझाइन’च्या संकल्पनेत अंतर्भूत असाव्या लागतात. चांगल्या नागरी प्रकल्पांनी नगरांची ‘शानही’ वाढते. िया दृष्टीने मुंबईच्या मरीन ड्राइव्हचा विचार करता येईल. नवीन मुंबईमधील रेल्वे स्थानके या निकषांवर तपासता येतील. मुंबई-पुणे महामार्गाचा ‘डिझाइन’च्या तांत्रिक अंगाने विचार करता येईल. सं.

४) आर्थिक व्यवस्थापनः नागरी प्रकल्पांमध्ये आर्थिक पुरवठा पुरेसा आणि वेळेवर होणे महत्त्वाचे असते. सरकारकडून होणारा वित्तपुरवठा जेव्हा खात्रीशीर नसतो तेव्हा असे प्रकल्प कर्ज काढून पुरे करावे लागतात. कधीकधी वित्तपुरवठा करण्याची जबाबदारीही कंत्राटदारांवर टाकण्यात येते. अशा वेळी प्रकल्पाचा खर्च वाढतो. कर्जफेड होण्याची खात्री असेल तरच प्रकल्पांना वित्तसंस्था कर्ज देतात. यासाठी आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. जागतिक बँक वा खाजगी बँका जेव्हा नागरी प्रकल्पांना मदत करतात तेव्हा कर्जफेडीसाठी सरकारची हमी घेतात. जोखीम जास्त असेल तर व्याजाचे दरही जास्त असतात.

दाभोळच्या एन्रॉन प्रकल्पात अशी हमी भारत व महाराष्ट्र शासनाने दिली आहे. त्यामुळेच राज्यावर, मराविमंसारख्या संस्थांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले आहेत. पण मुंबईच्या उड्डाणपुलांच्या खर्चाची भरपाई ग्राहक करीत आहेत. सार्वजनिक खात्याचे अनेक पाटबंधारे प्रकल्प आर्थिक व्यवस्था, व्यवस्थापन नसल्याने अर्धवट राहतात ते यामुळेच, हे लक्षात घेतले पाहिजे. सं.

५) उद्यमी नेतृत्व : कोणताही प्रकल्प आपोआप पूर्ण वा यशस्वी होत नसतो. त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांतील उद्योजकता हा फार महत्त्वाचा घटक असतो. उद्यमी, द्रष्टे नेतृत्व नसेल तर चांगल्या प्रकल्पांचीसुद्धा वाट लागू शकते. चांगले उद्यमी नेतृत्व नाना अडचणींमधून सर्जनशीलपणे वाट काढते. प्रकल्पांना लोकांचा आणि प्रकल्प राबविणाऱ्या लोकांचा पाठिंबा आवश्यक ठरतो. त्यासाठी सहृदय, सच्चे, नि:स्पृह नेतृत्व आवश्यक असते. प्रकल्पांत नेहमीच अनपेक्षित अडथळे येत असतात. त्यासाठी नवे, वेगळे मार्ग शोधणे आवश्यक असते. धोका पत्करून धाडसी निर्णय घ्यावे लागतात. असंख्य सार्वजनिक प्रकल्प अशा नेतृत्वाअभावी रखडतात, अयशस्वी होतात. पण जेव्हा कुशल नेतृत्व असते तेव्हा अवघड प्रकल्पही यशस्वी होतात.

कोकण रेल्वेच्या उदाहरणावरून हे सिद्ध होते. पैसे, वेळ, लोकांची मानसिकता, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, कौशल्य, हिशोबी वृत्ती, धाडस, जोखीम पत्करण्याची मानसिकता, जबाबदारीची जाणीव, असे अनेक गुण नेतृत्वाजवळ असावे लागतात. कोकण रेल्वेचे श्रीधरन तसेच मुंबई-पुणे महामार्गासाठी, उड्डाणपुलांसाठी श्री बोंगिरवार यांचे प्रभावी नेतृत्व हा यशाचा महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात येते. सं.

६) काळवेळः प्रकल्प आखणीचा, राबवण्याचा योग्य काळ असतो. कोणत्याही प्रकल्पाचा दूरगामी उपयोग लक्षात घेऊन आखणी करावी लागते. ज्या प्रकल्पाचा वापर जास्त ग्राहकांकडून, वेळोवेळी केला जातो तोच प्रकल्प दूरगामी, यशस्वी ठरतो.

अनेक महानगरांनी मध्यंतरी मोठी ‘स्टेडियम्स’ बांधली. पण त्यांचा म्हणावा तेवढा वापरच होऊ शकत नाही. ठाण्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियम, पुण्याचे बालेवाडी स्टेडियम या सदरात मोडतात. ठाण्याची ‘तरंगती’ (आता बुडलेली) आर्ट गॅलरी हे तर सर्वच बाबतीत अंदाज चुकलेल्या प्रकल्पाचे उदाहरण ठरावे ! या उलट अनेक नगरांतील नाट्यगृहे, तरणतलाव, बगीचे यशस्वी ठरलेले दिसतात. मुंबईचे व्ही.टी. स्टेशन तर ‘काळाच्या’ बाबतीत मोठे, महत्त्वाचे उदाहरण ठरावे. शंभर वर्षांहूनही अधिक काळ यशस्वी वापर असणाऱ्या वास्तूचे ते एक महत्त्वाचे अपवादात्मक उदाहरण आहे. सं.

संदर्भ :
The American City: What Works, What doesn’t. by Alexander Gravin. B. Leinberger. (New York: McGraw-Hill 1996)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.