जागतिकीकरण आणि जागतिक नगरेः संकल्पना विश्लेषण

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे पडसाद संशोधनक्षेत्रावरही उमटले आहेत. अनेक विषयांचे संशोधक जागतिकीकरणाचा विचार आपापल्या अभ्यासविषयांसंबंधात करीत आहेत. किंबहुना अशा संशोधकांच्या अभ्यासांच्या पुस्तकांची एक मोठी लाटच आलेली दिसते.

जागतिकीकरण ही प्रक्रिया अनिवार्य आहे की नाही याबद्दल वाद असू शकतात. अजून तरी ही प्रक्रिया अस्पष्ट, धूसर आहे तशीच ती व्यामिश्रही आहे. ही प्रक्रिया अमूर्त, अतुलनीय आणि अनिवार्य आहे. हा मतप्रवाह मोठा आहे. गेल्या दोन दशकांतील जागतिक व्यापाराचे प्रमाण आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील व्यापाराचे प्रमाण यात फार मोठी वाढ झालेली दिसत नाही. आधीच्या काळापेक्षा आजच्या जागतिक व्यापारात काही मूलभूत बदल झालेला नाही. पण तरीही अलिकडच्या या जागतिकीकरणाचे परिणाम मात्र नाट्यमय दिसतात. परदेशी गुंतवणूक, जागतिक कंपन्यांचा वाढता पसारा आणि सेवा-क्षेत्राचा विस्तार सर्व जगभर होताना दिसतो. मात्र या प्रक्रियेचे परिणाम सर्वत्र सारखेच होताना दिसत नाहीत. जागतिकीकरण काही लोकांच्या आचारविचार-कृतींच्या माध्यमांतून व्यक्त होते. ही काही बाहेरून लादलेली नाही, तर एक सहज घडत जाणारी प्रक्रिया विश्वव्यापी प्रक्रिया दिसते.

‘नगर’ ही संकल्पना अनेक पाश्चात्त्य विचारवंतांनी मांडली. जागतिकीकरणाच्या वादविवादात न पडता, ती प्रक्रिया गृहीत धरून
जगामधल्या अनेक महानगरांवर होणारे परिणाम त्यांनी तपासले, त्याच्याच आधारे त्यांना काही महानगरांचे जागतिक स्वरूप लक्षात आले.
प्रत्यक्षात ‘जागतिक नगर’ असे काही वास्तवात आहे असे मला वाटत नाही. अजून तरी ती एक वैचारिक संकल्पनाच आहे. मात्र या संकल्पनेच्या आधारे राजकीय, वैचारिक समज वाढविण्याचे ते एक साधन झाले आहे हे मात्र खरे. जागतिकीकरणाचे पाश्चात्त्य विकसित देशातील नगरांवर होणारे परिणाम वैविध्यपूर्ण आहेतच पण गरीब, विकसनशील देशातील नगरांवर होणारे परिणाम त्यापेक्षाही वेगवेगळे आहेत. पाश्चात्त्य जागतिक नगर संकल्पनेचा विकसनशील देशातील नगरांच्या संदर्भात कसा काय उपयोग होऊ शकतो याचा विचार मी येथे करणार आहे.

जागतिक नगर: संकल्पनेचा उदय
१९१५ साली पॅट्रिक गिडीस? यांनी सर्वप्रथम जागतिक नगरे हा शब्दप्रयोग वापरला होता. त्या काळात वेगाने वाढणाऱ्या अनेक नगरांच्या अनुभवावरून त्यांना ही कल्पना सुचली असावी. त्यानंतर १९६६ साली पीटर हॉल२ यांनी अनेक नगरांची तुलना करून जागतिक नगरांची काही वैशिष्ट्ये नोंदली. नगरांचे देशातील राजकीय सत्तास्थान, आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये, देशांतर्गत व्यापार, बँका, आणि चलनाचे/पैशांचे केंद्रीकरण असणारी महानगरे ही ‘जागतिक नगरे’ आहेत असे त्यांनी मांडले. त्यातही अशा नगरांच्या अर्थव्यवस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षाही देशी व्यापाराचे प्रमाण त्यांना जास्त आढळले. परंतु नंतरच्या काळात मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जागतिक आघाडी घेणाऱ्या शहरांनाच ‘जागतिक नगरे’ संबोधले जाऊ लागले. जागतिकीकरणाच्या ‘भौतिक’ प्रक्रियेत भाग घेणारी नगरे म्हणजे ‘जागतिक नगरे’ असे फ्रिडमन/वॉल्फ३ यांनी १९८२ साली मांडले. एखादे नगर कोणत्या पद्धतीने आणि किती प्रमाणात जगातील अर्थव्यवहारात भाग घेते यावरून त्या नगराचे जागतिक महत्त्व ठरते असे त्यांनी मांडले. संकल्पनेतील विविधता जागतिकीकरणाप्रमाणेच ‘जागतिक नगर’ ही संकल्पनाही धूसरच आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक उलाढालींमध्ये एखाद्या नगराचा असणारा सहभाग अभ्यासून त्या नगराचे ‘जागतिक स्थान’ ठरविण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केला. जागतिक अर्थव्यवहारात भाग घेणाऱ्या नगरांच्या परिसरात अनेक रचनात्मक, आर्थिक आणि भौगोलिक बदल होतात. कामांच्या आणि कामगारांच्या स्वरूपात बदल होतात, उत्पादनांचे स्वरूप बदलते, तसेच नगरांचे भौतिक रूपही पालटते. अशी नगरे जागतिक भांडवलाला आकर्षित करण्यासाठी धडपडत असतात. त्याचबरोबर लोकांच्या स्थलांतराला वेग येतो. नगरांमधील सामाजिक ध्रुवीकरण तीव्र होऊ लागते. नागरीकरणाची सामाजिक किंमत वाढते. अशा अनेक गोष्टी जागतिक नगरांच्या संदर्भात लक्षात यावयाला लागल्या.

‘जागतिक नगरे’ ही काही विशिष्ट प्रकारच्या औद्योगिक सेवा पुरवणाऱ्या उद्योगांची केंद्रे बनत आहेत असे सासकिया सेसन ४ (१९९१, १९९५) यांना आढळले. जागतिक बाजारपेठेच्या विकासात, तसेच अशा बाजारपेठांचे नियोजन, नियंत्रण करण्याच्या कामात ही नगरे आघाडीवर असतात असे त्यांनी मांडले. मोठ्या प्रमाणावरील पैशांचे, परकीय चलनांचे व्यवहार तेथून होतात, बहुराष्ट्रीय कंपन्या अशा नगरांमध्ये आपली सेवा केंद्रे उघडून उत्पादनांचे स्थानिक नियंत्रण करतात. हे सर्व जरी खरे असले तरी शहरांच्या सर्व भौतिक बदलांचा संबंध केवळ जागतिकीकरणाशी असतो असे म्हणणे योग्य नाही, असे मला वाटते. प्रत्येक नगराचे वैयक्तिकदृष्ट्या विश्लेषण करूनच असे निष्कर्ष काढायला हवेत. अपुरी माहिती आणि सर्वसाधारण जागतिक नगर संकल्पनेच्या आधाराने केलेली नगरांबाबतची भाकिते चुकण्याचीच शक्यता मला वाटते.

जागतिक नगरः संकल्पनेच्या मर्यादा
पाश्चात्य अभ्यासक ‘जागतिक नगर’ संकल्पनेत विशिष्ट नगरांचा इतिहास, तेथील स्थानिक समाज, संस्कृती आणि नगरांची भौगोलिक वैशिष्ट्ये ह्यांना फारसे महत्त्व देत नाहीत. त्यामुळे त्यांचे अभ्यास हे अपुरे वाटतात. खरे तर अभ्यासक आपल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक चष्म्यांमधून नगरांकडे बघत विश्लेषण करीत असतात. परंतु समाज आणि संस्कृती यांना अर्थव्यवस्थेच्या रचनेतून वेगळे काढता येत नाही. जगण्यासाठी माणसांची चाललेली धडपड ही आणि आर्थिक ताणतणाव हे महत्त्वाचे असतात. या प्रवाहांची टक्कर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेशी होते. स्थानिक आणि जागतिक प्रवाहांची सरमिसळ अशा नगरांमध्ये, नागरी व्यवहारांमध्ये होते. त्यांना वेगळे करून बघणेही अशक्य असते. स्थानिक’ प्रवाहांना जागतिकीकरणाच्या प्रवाहांचा वेढा पडला तरी स्थानिक लोकांच्या सहभागाशिवाय, मदतीशिवाय जागतिकीकरणाचा प्रवाह नगरात मिसळू शकत नाही. दोन्ही प्रवाहांना एकमेकांची आवश्यकता असते.
या दुहेरी प्रक्रियेचा विचार करून नगरांचा विचार आणि विश्लेषण करायला पाहिजे. कोणतेही नगर किती प्रमाणात स्थानिक व्यवहारांवर आणि किती प्रमाणात जागतिकीकरणाच्या व्यवहारांवर अवलंबून असावे याचे निर्णय सत्ताकेंद्री असणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनामधून घेतले जातात. आम्ही ‘जागतिक नगर’ आहोत असा डांगोरा पिटण्याचे धोरण अनेक नगरांच्या व्यवस्थापनांनी हल्ली अवलंबिलेले दिसते. तेव्हा त्यांच्यावर ‘जागतिक नगर’ संकल्पनेचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो.

जागतिक नगर: संकल्पनेचे राजकारण
‘जागतिक नगर’ म्हणून आपल्या शहराला दर्जा मिळवून देण्याची एक राजकीय चढाओढ सध्या जगभर सुरू आहे. अनेकदा त्यामागे काही लोकांच्या अवास्तव स्वार्थाचा जोर असतो.विकसनशील देशांतील नगरांचे व्यवस्थापन आणि त्याबाबतची स्थानिक राजकीय पुढारी आणि अभिजन वर्गाची नगरांकडे बघण्याची दृष्टी ही गेल्या काही वर्षांत बदललेली आहे. युनायटेड नेशन्सच्या २००१ च्या अहवालातही आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या नगरांच्या स्पर्धेची नोंद घेतली गेली आहे. आर्थिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपापल्या नगरांचे विकास धोरण बदल्याचे प्रयत्न नगरांकडून सुरू झाले आहेत. नगरे ही एक बाजारमूल्य असणारी वस्तू समजून त्यांची जाहिरात केली जात आहे. ‘जागतिक उलाढाली’त वाटा वाढविण्यासाठी जागतिक भांडवलाचा फायदा उठवू शकणारे उद्योजक आणि अभिजन यांचा धोरणात्मक दबाव वाढला आहे. लोकशाही व्यवहारांवरही त्यांचा दबाव वाढतो आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने महानगरे ही आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांचा देशांच्या अर्थव्यवस्थेमधला वाटा वाढता असतो. त्याचप्रमाणे देशांना पुरोगामी दिशा देण्याची शहरांची क्षमता महत्त्वाची असते. बहुराष्ट्रीय कंपन्या भांडवलाच्या बळावर देशांच्या अर्थ-धोरणांवर दबाव टाकतात हे खरे आहे. पण त्यातही महानगरांच्या आर्थिक धोरणांवर त्यांचे जास्त लक्ष असते. त्यामुळेच नगरांना आकार देण्यात राष्ट्रीय धोरणांपेक्षाही ‘जागतिक भांडवला’चा प्रभाव जास्त पडत आहे. शहरांमधील बांधकामे, पायाभूत सेवा, पर्यावरण, इमारतींच्या रचना यांच्यावर जागतिक बाजारपेठांचा प्रभाव पडतो आहे. असा जागतिक दबाव काही महानगरांच्या बाबतीत वाढत जाऊन राष्ट्रीय सरकारांची त्यांच्यावरील पकड सैल होत होत कदाचित संपेल, असेही अनेकांना वाटते. वास्तवात असा नगरांवरील अधिकार राष्ट्रीय सरकारे गमावून बसतील असे सध्या तरी दिसत नाही.

नगरे ही बहुद्देशी असतात. या उद्देशांमध्येही स्पर्धा असते. आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जपण्याची धडपड नगरे करीत असतात. नगरांच्या बहु-आयामी व्यक्तिमत्वाची मुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विकासप्रक्रियेत घट्ट रुजलेली असतात. नगरांमध्ये वास्तवात असलेल्या अशा नाना वैविध्यांना नजरेआड करून संबंध नगर जणू एकजिनसी आहे हे दाखविण्याचा आटापिटा नगरे करीत आहेत, कारण त्यांना बाजारपेठेमध्ये स्पर्धेत उतरायचे आहे. जागतिकीकरणाच्या या काळात युरोपमधील मोठ्या नगरांपुढे यामुळे पेच निर्माण झाला आहे. सांस्कृतिक, ऐतिहासिक भेद, विविधता झाकून ठेवत युरोपियन युनियन म्हणून जागतिक बाजारपेठेमध्ये त्यांना उतरावे लागले आहे. विकसनशील देशात नगरांना राष्ट्रीय भान सांभाळत जागतिकीकरणात भाग घेण्याचे धोरण आखावे लागते आहे ते आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांनंतरच. ‘जागतिक नगर’ बनण्याची ही खटपट गैर नसली तरी ती अस्पष्ट आणि चुकीच्या गृहीतकांवर आधारलेली नसावी, अन्यथा त्या नगरांसाठी ती घातकही ठरू शकते. परदेशी भांडवल आकर्षित करताना त्याआधीच्या काळात अफाट वाढलेल्या लोकसंख्येचे ओझे गरीब देशातील अनेक महानगरांच्या खांद्यावर आहेच. आधीचेच न सुटलेले प्रश्न आणि जागतिक नगर म्हणून भिडणारे प्रश्न या दोन्हींचे परिणाम महानगरांवर होताना दिसत आहेत. नव्या धोरणांमुळे नगरांच्या नगारिकांवर काय काय परिणाम होतात याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. नगरांतील विविध भागांवर या धोरणांचे परिणाम वेगवेगळे होणार आहेत. म्हणूनच विकसनशील देशांतील नगरांनी आपल्या क्षेत्रांतील परिणाम डोळसपणे अभ्यासावयाला हवेत. नगरे नेहमीच अनिश्चितपणे, अनपेक्षित मार्गांनी शोधण्यासाठी काही सामाईक गुणधर्म आणि अनुभवांची मदत निश्चितपणे होऊ शकेल. शेवटी शहरांची बदलणारी स्वरूपे ठरविण्यात राजकारणी, भांडवलदार, संस्कृती आणि नगराचे विशिष्ट स्वरूप महत्त्वाचे ठरेल. तसेच कशा प्रकारचे भांडवल आकृष्ट होते आणि कोणत्या क्षमता आणि कौशल्ये असणारी माणसे त्या नगरात येतात; आणि कशा प्रकारची बाजारव्यवस्था तिथे निर्माण होते यावरूनच नगरांचे स्वरूप ठरते.

जागतिक नगर : संकल्पनेचे हस्तांतरण
जागतिकीकरणाच्या विकसनशील देशांवर होणाऱ्या परिणामांकडे आता अभ्यासकांचे लक्ष मोठ्या प्रमाणावर वेधले गेले आहे. या देशांकडे भांडवलशाही पाश्चात्त्य देश बाजारपेठ म्हणून आणि उत्पादनासाठी योग्य ठिकाणे म्हणून बघत असतात. साम्राज्यशाहीच्या काळात वसाहतींच्या नगरांनी राज्यकर्त्या देशांना कच्चा माल आणि इतर अनेक उत्पादने पुरवून त्यांच्या अर्थव्यवस्था बळकट केल्या होत्या, आणि या प्रक्रियेमुळे वसाहतीचे देश गरीब झाले होते याचा विचार जागतिकीकरणाच्या पाश्चात्त्य चर्चेत क्वचितच डोकावतो. जागतिकीकरणाशी भिडणाऱ्या विकसनशील देशांमधील परिस्थिती विकसित देशांमधल्या परिस्थितीपेक्षा खूपच वेगळी आहे. विकसित पाश्चात्त्य महानगरे आणि गरीब देशांतील महानगरे यांना स्पर्श करणारी जागतिक प्रक्रिया जरी एकच असली तरी तिचा हेतू आणि भूमिका यामध्ये दोन्ही ठिकाणी फरक आहे. पाश्चात्त्य नगरे विकेंद्रीकरण आणि औद्योगिक ओहोटीच्या अनुभवातून जात आहेत या उलट विकसनशील देशांतली नगरे औद्योगिकीकरण आणि नागरी स्थलांतराच्या लाटेखाली येत आहेत. लोकहिताचे रक्षण करण्याचे शासनाचे प्रयत्न अशा नगरांत अपुरे पडत आहेत. हे ताण विकसित देशांमधील नगरांवरील ताणांपेक्षा खूपच वेगळ्या प्रकारचे आहेत. ‘जागतिक नगर’ संकल्पना पाश्चात्त्य देशांत औद्योगिक कारखानदारी संपुष्टात येत असताना विकसित झालेली संकल्पना आहे. त्यामुळे विकसनशील देशांत या संकल्पनेचा विचार हा स्थानिक संदर्भातच केला जाणे आवश्यक आहे.

जागतिकीकरणामुळे असमानता वाढते, समाजांमधील घटकांतील भौगोलिक अंतरही वाढते असा सर्वसाधारण समज आहे. निर्बंध सैल झाल्यामुळे विकसनशील देश जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहेत. अशा वेळी तेथील प्रमुख महानगरांमध्ये मोठे
रचनात्मक बदल होताना दिसत आहेत. जागतिक प्रक्रिया नागरीकरणाला वळण देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच अशा शहरांना जागतिक नगर बनण्याची दृष्टी मिळाली आहे. त्याचबरोबर ऊर्जाही मिळाली आहे. पाश्चात्त्य देशांत गेल्या काही वर्षांत सामाजिक ध्रुवीकरण वेगाने झाले आहे. अमेरिकेत सधन वर्गाने नगरांच्या प्रश्नांमधून स्वतःला वेगळे केले आहे. आणि स्वतःच्या स्वतंत्र, स्वायत्त वस्त्या मुख्य नगरांपासून दूर अंतरावर स्थापन केल्या आहेत, असे सासकिया सेसन यांना वाटते. पण अशा ध्रुवीकरणाचे एकच एक कारण कधीही असत नाही. परंपरा आणि सरकारची भूमिकाही त्यामागे असतेच. युरोपमधील देशांतही ध्रुवीकरण होताना दिसत असले तरी ते आर्थिक नसून त्यात व्यवसायांच्या ध्रुवीकरणाचा भाग जास्त दिसतो. नगरांमधील सामाजिक, सांस्कृतिक बांधीलपणा, एकसंधता नष्ट होण्यात वांशिक, जातीय भेदांमुळे हातभार लागतो आहे. आर्थिक विभागणी आणि वांशिक विभागणी जोडीनेच होते असे काही अभ्यासकांना वाटते.
जागतिकीकरणामुळे गरीब देशांमधील महानगरांत अगोदरच तीव्र असणारी विभागीय विषमता कशी बदलेल हे सांगता येत नाही.

उदारमतवादी धोरणांच्या सामाजिक आणि आर्थिक अंगांकडे नेहमी जास्त लक्ष दिले जाते. पारंपरिक मूल्यव्यवस्थांच्या जागी जागतिक स्पर्धेची मूल्यव्यवस्था येते आहे. त्याचे सामाजिक-सांस्कृतिक परिणाम विविध समाजगटांवर वेगवेगळे होत आहेत. सामाजिक संस्थांवर त्यांचा दबाव वाढता आहे. व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व येते आहे. पूर्वीच्या जाचक सामाजिक-सांस्कृतिक दबावांना दूर सारून अनेक लोक स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षांना मोकळेपणाने व्यक्त करू लागले आहेत. जागतिकीकरणाबरोबरच पाश्चात्त्य उदारमतवादाचा प्रभाव वाढत असलेला जाणवतो आहे. नागरी जमिनींचे वापर, विभागणीही बदलत आहे. बाह्यात्कारी प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींमुळे लोकांच्या वर्गजाणीवाही बदलत आहेत.

नगरांवर पडणाऱ्या जागतिक दबावांमुळे ‘जागतिक नगरांमध्ये काही नव्या प्रकारचे उद्योग निर्माण होतात. पैशांच्या जागतिक प्रवाहातील एक टप्पा म्हणून काही सेवा निर्माण होतात. बहुराष्ट्रीय बँकांची व्यवहार केंद्रे तेथे उघडली जातात. बहुराष्ट्रीय कंपन्यांची विभागीय कार्यालये येतात. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बँक-ऑफिसेसची कामे तेथे केली जाऊ लागतात. कधी कॉल सेंटर म्हणून, तर कधी जागतिक उत्पादनाचे केंद्र म्हणूनही काही नगरे ‘जागतिक आर्थिक कामे’ निर्माण करतात. औद्योगिक उत्पादनांपेक्षाही सेवाक्षेत्राचे महत्त्व अशा शहरांमध्ये अधिक असते. या सर्व प्रक्रियांमुळे शहरांतील रोजगारांचे स्वरूप बदलते आहे. सेवाक्षेत्राबरोबर एका नवीन श्रीमंत वर्गाची, जागतिक दृष्टी असणाऱ्या अभिजन वर्गाची निर्मितीसुद्धा या नगरांमध्ये होताना दिसते. लोकांचे जीवनमान, उपभोग घेण्याची वृत्ती आणि त्याचबरोबर त्यांचे आर्थिक आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञानही बदलते. असे परिणाम जागतिक नगरांतील समाजावरच नाही तर आजूबाजूच्या सर्व लहान-मोठ्या नगरांवर होताना दिसतात.

जागतिक नगर संकल्पनेचा विकसनशील देशातील नगरांच्या संदर्भात विचार करताना खालील प्रश्न उपस्थित होतात.
* विकसित आणि विकसनशील देशांमधील नगरांमध्ये किती आणि कोणती साम्यस्थळे आहेत?
* विकसित ‘जागतिक नगरांचे’ कोणते निकष किती प्रमाणात विकसनशील ‘जागतिक नगरांना’ लागू पडतात?
* जागतिक नगरांमध्ये होणारे आर्थिक बदल किती प्रमाणात जागतिकीकरणामुळे आहेत आणि किती प्रमाणात ऐतिहासिक प्रक्रियेमुळे आहेत?

तसे पाहता जागतिक नगर संकल्पनेचा विकसनशील देशांच्या दृष्टीने अभ्यासच झालेला नाही. काही गरीब देशातील थोडी महानगरे ‘जागतिक नगर’ म्हणून घेण्यास पात्र आहेत पण त्यांचे हे स्थान त्यांच्या साम्राज्यशाहीकालीन इतिहासात आहे हे लक्षात येते.

अँन्थनी किंग५ (१९८९) यांना तर जागतिक नगर संकल्पनेचा उगम साम्राज्यशाहीकाळात नावारूपाला आलेल्या नगरांमध्ये आहे असे वाटते. साम्राज्यवाद ही ऐतिहासकिदृष्ट्या अतिशय महत्त्वाची प्रक्रिया होती. साम्राज्यवादाकडे मुख्यतः पाश्चात्त्य, विशेषतः युरोपियन संस्कृतीची वर्चस्ववादी प्रक्रिया म्हणूनच पाहिले गेले आहे. पण साम्राज्यवाद ही भांडवली व्यवस्था जगभर प्रसारित करण्याची आर्थिक प्रक्रिया होती याकडे अभ्यासकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच प्रचलित जागतिकीकरण प्रक्रिया ही वसाहतवादाचा एक नवा अवतार आहे असा अनेकांचा समज झाला आहे. वसाहतकालीन व्यापाऱ्यांची जागा आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेतली आहे असा निष्कर्षही त्यामुळे काढला जातो. भारतामधील साम्राज्यकालीन नगरांचे विश्लेषणात्मक अभ्यास पुष्कळ झाले आहेत. पण त्यांच्यामध्ये एकसूत्रता दिसत नाही. (उदा. मुंबईबद्दल असे अनेक अभ्यास होत आहेत.) सध्या या नगरांमध्ये होत असलेल्या बदलांची दखलही अनेकांनी घेतली आहे. परंतु त्यांचा ‘जागतिक नगर’ संकल्पनेच्या संदर्भात मात्र विचार अजूनही केला जाताना दिसत नाही. खरे तर ते एक मोठे आव्हान आहे.

विकसनशील देशांतील जी महानगरे ‘जागतिक नगर’ बनण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा दीर्घ प्रवास हा साम्राज्यपूर्व, साम्राज्यकालीन आणि स्वातंत्र्योत्तर काळाच्या तीन टप्प्यांमधून झाला आहे. साम्राज्यकाळातच त्यांचा प्रवास ‘जागतिक नगर’ होण्याकडे सुरू झाला होता हे लक्षात येते. अर्थात त्या काळातील जागतिक आर्थिक शक्ती वेगळ्या होत्या. आज भारतामध्ये अनेक महानगरे ‘जागतिक नगर’ स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. (मुंबई, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद) भारताची आर्थिक राजधानी असणारी मुंबई महानगरी ‘जागतिक नगर’ होण्याच्या स्पर्धेत आघाडी मिळविण्याचे ध्येय बाळगून आहे.

निष्कर्ष
साम्राज्यकाळात वसाहतींच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईला महत्त्वाचे स्थान मिळाले होते. उत्पादन आणि निर्यात या दोन गोष्टी मुंबईचे महत्त्व वाढविणाऱ्या होत्या. वसाहतवादाच्या राजकारणाचे मुंबई एक महत्त्वाचे केंद्र होते. साम्राज्याचा दिमाख या महानगरातील वास्तुरचनांनी सांभाळला होता. वसाहतीच्या व्यापारी अर्थव्यवहारांच्या जोरावर तर हे महानगर उभारले गेले. त्या काळातील वांशिक आणि सामाजिक भेदभाव या महानगराच्या जडणघडणीवर कोरले गेलेले आहेत. वसाहतीच्या काळात या नगराची दृष्टी नेहमीच ‘विश्वाभिमुख’ होती. स्वातंत्र्यानंतर ही दृष्टी ‘भारताभिमुख’ झाली. आजही भारताचे आणि महाराष्ट्राचे ते सर्वांत महत्त्वाचे नगर आहे. पण गेल्या दशकात नव्या आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर या नगराची नजर पुन्हा एकदा “विश्वाभिमुख’ होते आहे. जागतिक आर्थिक प्रक्रियेत आणि प्रवाहात स्थान मिळवण्यासाठी मुंबईचा प्रयत्न सुरू झाला आहे. बाह्य जागतिक घटक तसेच जगाचा वेध घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक धनिकांचा, अभिजनांचा हा आग्रह शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कतिक संदर्भात समजन घ्यायला हवा.

भारतामधील लाखो गरीब स्थलांतरितांना सामावणारे महानगर ही मुंबईची ओळख स्वातंत्र्यानंतरची आहे. येणाऱ्या काळात, उदारीकरणाच्या कालखंडात मुंबईचा ‘जागतिक नगर’ होण्याचा प्रयत्न हा एक महत्त्वाचा संशोधन आणि अभ्यासाचा विषय असणार आहे.

संदर्भः
1) Geddes, P. (1915), Cities in Evolution: An introduction to the townplanning movement and to the study of civics, Williams and Northgate, London.
2) Hall P.(1966) The World Cities, Weidenfeld & Nicholson, London.
3) Friedman J and Wolf G. (1982), World City Formation: An agenda for
 research; International Journal of Urban and Regional Research, 6, 309344
4) Sassen S. (1995) On Concentration and Centrality of Global City in Knox, P and Taylor, P.J. (eds). World Cities in a world System, Cambridge: Cambridge Univ. Press.
5) King A.D. (1976), Colonial Urban Development ; culture, social power
 and environment, London. Routledge and Kegan Paul. King A.D. (1989 b) Urbanism, colonialism and the world economy: culture and spatial foundations of the world urban system, London. Routledge.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.