माहितीचा स्फोट, संपर्क साधनांचे जंजाळ आणि मानवी वस्त्या, समूह

१) माणसांना एकमेकांना धरून समूहाने राहायला आवडते. यात सुरक्षितता तर असतेच पण परस्परावलंबन, मानसिक धीर सापडतो. एकलेपण टाळले जाते. अगदी रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या वाड्यावस्त्या-पाडे ते आजच्या उत्तुंग इमारती असलेल्या महानगरातील माणसांचे असेच असते. शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिरावला. अतिरिक्त उत्पादनाला सुरुवात झाली. स्वास्थ्य आले आणि माणूस कायम वस्ती करून राहू लागला. ग्रामीण संस्कृती जन्माला आली. अनेक शतके अशीच गेली. थोड्याफार प्रमाणावर श्रमविभागणी आली. शारीरिक आणि बौद्धिक श्रमांचीही विभागणी झाली. गवंडी, सुतार, लोहार असे व्यवसाय उभे राहिले. पशुपालनाची आणि त्यांच्या श्रमशक्तीचीही जोड मिळाली. पण हे सर्व कृषीवलाभोवती फिरत राहिले. सर्व आर्थिक व्यवहार हा वस्तूंच्या देवाणघेवाणीवर आधारित होता.

सोळाव्या-सतराव्या शतकात युरोपमध्ये यंत्रयुगाचा जन्म झाला. निसर्गनियमांचा आधार घेत उत्पादनतंत्रज्ञानाच्या नवनव्या रीती पुढे आल्या. यथावकाश वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि माणसाच्या दिमतीला प्रचंड ऊर्जाशक्ती उभी राहिली. ‘इंटरनल कंबशन इंजिना’चा शोध लागला. रेल्वे आणि स्वयंचलित मोटारी यांचे युग सुरू झाले. त्याबरोबर मालाची नेआण, माणसांची वाहतूक प्रचंड प्रमाणावर वाढली. पंचक्रोशीच्या सीमा ओलांडून ती सातासमुद्रापार गेली. व्यापारउदीम इतका वाढला की देवाण-घेवाण पद्धतीवर वस्तुविनिमय अशक्य झाला. त्यासाठी अधिकृत चलन, हमीपत्र, हुंड्या यांचा वापर सुरू झाला.

या सर्वांचा मनुष्यवस्त्यांवर परिणाम झाला. बाजारपेठांची गावे, बंदरांची गावे उभी राहिली. औद्योगिकीकरणामुळे कारखानदारी आली. खाणकामे उभी राहिली आणि आणखी निराळ्या प्रकारच्या गावांची उभारणी झाली. ही सर्वच प्रकारची गावे शेतीपासून विलग झाली. त्यांचे आणि जमिनीचे नाते तुटले.

२) या सर्व उत्क्रांतीचा विचार करता काही सूत्रे स्पष्ट होऊ लागतात. जसजसे उत्पादन तंत्रज्ञान बदलत गेले तसतसे अतिरिक्त (surplus) उत्पादन वाढत गेले. उत्पादनात वैविध्यही खूप वाढले. आणि फलस्वरूप वस्तुविनिमय वाढला, अर्थव्यवहार बहुरंगी, बहुढंगी झाला. त्याच प्रमाणात मानवसमाजही बहुआयामी झाला, पूर्वीसारखा एकसुरी राहिला नाही. दोन त-हेची श्रमविभागणी झाली. एक श्रमविभागणी कौशल्ये, विशेषज्ञता यावर आधारित झाली. दुसरी उत्पादनप्रक्रियेत निरनिराळे टप्पे कल्पून आणि प्रमाणीकरण करून निर्माण झाली. एकच एक कुंभार माती मळण्यापासून ते भांडी तयार करण्यापर्यंत काम न करता. माती मळणे, भाड्यांचे घाटाचे डिझाईन करणे, त्यानुरूप साचे बनविणे, भट्टी लावणे असे अनेक टप्पे करून उत्पादनात प्रचंड वाढ झाली. दुसऱ्या बाजूला नट, बोल्ट, यंत्राचे सुटे भाग यांचे प्रमाणीकरण झाल्यामुळेही उत्पादन-प्रक्रियेत लवचीकता येऊन उत्पादनात वाढ झाली. याचबरोबर वाहतुकीची साधने उत्क्रांत झाली. पायी प्रवास, बैलगाडी, सायकल, रेल्वे, मोटारगाड्या, विमान अशा चढत्या क्रमांकाने तेवढ्याच वेळात लांबलांब अंतरे कापली जाऊ लागले. राहण्याच्या जागा आणि कामाच्या जागा एकाच ठिकाणी असण्याची गरज उरली नाही.

३) माणसांना एकमेकांच्या नुसतेच संपर्कात राहायला, आपापसांत जाणेयेणे ठेवायला आवडते असे नाही. एकमेकांशी गप्पागोष्टी करायला, आपले विचार, भावना समोरच्यांपुढे व्यक्त करायलाही आवडते. हाही उत्क्रांतीचा इतिहास उद्बोधक आहे. प्रथम भाषेचा शोध लागला. जगभर निरनिराळ्या मानवी समूहांत निरनिराळ्या भाषांचा उद्गम झाला. स्वरयंत्र आणि प्रगत मेंदू यामुळेच हे शक्य झाले. पण अशा तोंडी व्यवहाराला अर्थातच अंतराचे बंधन पडले. जास्तीत-जास्त किती दूरवर अशा त-हेने विचारांची देवाण-घेवाण होऊ शकणार? शिवाय बोललेले हवेत विरून जाणार.

३.१) सर्वच काही घनपाठी असू शकत नाहीत. म्हणजे ज्ञान ही घनपाठींची मिरासदारी होणार. त्यातून भाषा लिपिबद्ध करण्याचा शोध लागला. भाषा लिपिबद्ध झाली आणि माणसाने काळाचे आणि अंकाचे बंधन तोडले. विचार, भावभावना या पिढीच्या पुढच्या पिढ्यांना, या ठिकाणच्या शेकडो कोस दूर असलेल्या ठिकाणी संक्रमित होऊ लागल्या. वाहतुकीची वेगवान साधने आणि छपाईच्या शोधाबरोबरच टपाल पाठविण्याच्या सोईही उपलब्ध झाल्या आणि दोन दूरस्थ व्यक्तींमधील संपर्काचा काळ आणिक आक्रसला.
३.२) इथे आणिक एका गोष्टीचा जाता-जाता उल्लेख करणे प्राप्त आहे. मानवी समूहांचा आकार जसजसा वाढत गेला, समोरासमोरचा प्रत्यक्ष संपर्क अवघड नव्हे अशक्यच झाला. अनेक मानवी उपक्रमांना संस्थालक स्वरूप देणे भाग पडले. संस्था निर्माण करणे आणि सुविहितपणे चालविणे हा ‘शोधही’ मानवाच्या प्रगतिपथावरील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज या बाबतीत पाश्चात्त्य समाज आपल्या फार पुढे आहे. असो.
३.३) टपाल पाठविण्याच्या प्रक्रियेतील पहिली मोठी झेप घेतली ती तार पाठविण्याच्या सोईमुळे. शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटांतच कापून संदेश पाठविणे शक्य झाले. हे घडले १८४७ साली. यानंतरची संपर्क-साधनांची वाटचाल चौफेर आहे. १८७७ साली दूरभाष, १९३० साली टेलेक्स, १९६० साली मोबाईल अशा चढत्या क्रमाने ही घोडदौड चालूच राहिली. दृक् आणि श्राव्य अशा दोनही अंगांनी ही प्रगती होत राहिली.तारांच्या जंजाळातून आणि बिनतारी अशा दोन्ही प्रकारे हे काम होत राहिले. अवकाश, अंतरे, काळ, वेळ या सर्वांवर माणसाने मात केली. शेकडो योजने दूर असूनही दृश्य आणि श्राव्य संपर्क शक्य झाला.
३.४) याच्याच जोडीला संगणकाची झपाट्याने प्रगती होत राहिली. त्या माध्यमातून ई-मेलद्वारे जगाच्या कानाकोपऱ्याशी संबंध प्रस्थापित झाला. प्रचंड प्रमाणावर माहितीची चुटकीसरशी एकडून तिकडे वाहतूक शक्य झाली. संगणक म्हणजे प्रतिमेंदूच (artificial intelligence) धरला जाऊ लागला. इतकेच काय गणनेच्या बाबतीत त्याचा वेग आणि उरक माणसाच्या मेंदूपेक्षाही सक्षम आहे. अनेक प्रकारची माहिती, आकडे यांची साठवण या संगणकात करता येते आणि पूर्वनिश्चित आज्ञावलींच्या आधारे तिच्यावर संस्कारही करता येतात. हे सर्व घरच्या व्यक्तिगत संगणकावरून मुख्य ठिकाणच्या संगणकाद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात आरसपरस करता येते.

४) या सर्वांचा आवाका इतका मोठा झाला आहे की तो एकट्यादुकट्या माणसाच्या आकलनापलीकडे गेला आहे. तथापि त्याची उपयुक्तता आणि सर्वसामान्यांपर्यंत झालेली पोच निर्विवाद आहे. तसेच याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम निर्विवाद आणि दूरगामी आहेत.
४.१) एका अर्थाने माणसाच्या खाजगी जीवनाचा हा शेवट आहे. त्याच्याविषयीची बारीकसारीक आकडेवारी, त्याच्या आवडीनिवडी धर्म, जात, लिंग, वय राहण्याचे ठिकाण, नोकरीचे ठिकाण, शिक्षण . . . जी जी माहिती कल्पिता येईल ती सर्व माहिती सरकारकडे, मोठमोठ्या कंपन्यांकडे असणार आहे. त्या माहितीची देवघेव होणार आहे. माणसे वस्तूंसारखी हाताळली जाऊ शकतात, व्यक्तिगत माहितीच्या आधारे ती कह्यात ठेवली जाऊ शकतात, त्यांचा राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या बुद्धिभेदही केला जाऊ शकतो. थोडक्यात म्हणजे माणसे ही वापरण्याची वस्तू बनू पाहत आहेत.
दुसरीकडे दृक्श्राव्य माध्यमांमुळे मनोरंजनाच्या कल्पनांत कमालीचे बदल घडत आहे. केवळ मोजक्याच उच्चभ्रू लोकांसाठी असलेले अनेक सांस्कृतिक प्रकार आता सर्वसामान्यांच्याही घरात पोहोचले आहेत. याही बाबतीत राष्ट्रीय सरहद्दी पुसट झाल्या आहेत. किंबहुना जगभरच्या विभिन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक जीवनाचे एकसुरी, कंटाळवाण्या, सरमिसळ संस्कृतीत रूपांतर तर होणार नाही ना, अशी भीती वाटायला लागली आहे. शिवाय आजपर्यंत रिकामा, फावला वेळ माणसे शिळोप्याच्या गप्पांत, एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात, काही सर्जनशील कृती करण्यात, मुले मैदानावर खेळण्यात हुंदडण्यात घालवत असत. सण-उत्सव साजरे होत असत, जत्रा भरत असत. एकंदरीतच हा सर्व सांस्कृतिक पट मनोहारी तर होताच पण माणसांच्या सामूहिक भावना जागत्या ठेवणारा होत्या. आज दिवाणखान्यात आपापले ताट हातात घेऊन निःशब्दपणे दूरदर्शनवरचा कार्यक्रम पाहणारे कुटंब पाहिले की सामूहिक भावना तर दूरच पण कौटुंबिक भावनांनाही आपण पारखे होत आहोत की काय असे वाट लागले.
शेकडो योजने दूर असणाऱ्या, पिढ्यांमधील अंतरही बाजूस सारणाऱ्या या संपर्कसाधनांनी जवळजवळ बसणाऱ्या माणसांची बेटे करावीत हे किती विचित्र आहे.
४.२) आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत होऊ घातलेले बदलही असेच काहीसे असणार आहेत. अर्थव्यवहाराची तीन अंगे आहेत उत्पादन, वितरण आणि या दोघांना जोडणारा सांधा. आज जागतिकीकरण हा परवलीचा शब्द झाला आहे. या तीन गोष्टींच्या संदर्भात त्याचा नेमका काय अर्थ होतो?
आज सिलिकॉन व्हॅलीत घरबसल्या उत्तम काटकसरीचे डिझाईन करून घेणे सहज शक्य झाले आहे. त्या डिझाईनबरहुकूम सिंगापूर किंवा आयर्लंडमध्ये उत्पादन करून घेऊन तेथूनच परभारे जगाच्या पाठीवर कुठेही शेकडो किलोमीटर ते उत्पादन पाठविण्याचीही सोय करता येते. जशी कारखानदारीला राष्ट्रीय मर्यादा उरली नाही तशी कष्टकऱ्यांचीही आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होऊ घातली आहे. आणि हे फक्त अकुशल कामगारांपुरते मर्यादित नाही. भारतीय संगणक तज्ज्ञ अमेरिकन संगणकतज्ज्ञांशी चढाओढ करतात. कोरियन आणि भारतीय कुशल तंत्रज्ञ कामगार मध्यपूर्वेतील आखाती देशांत रोजगारीसाठी झगडत असतात, त्यांचे मालक युरोपियन-अमेरिकन कंपन्या असू शकतात. मेक्सिकन, थाई, रशियन शेतमजूरही इतर देशात जात असतात. आपल्याकडे बांगलादेशी, बिहारी, केरळी अशा त-हेने तराईपासून मुंबईपर्यंत कुठेही आढळू शकतात. अशा वेळी राष्ट्रीय सरकारांना बरीच कसरत करावी लागते.
संपर्क साधनांच्या विद्युत्वेगामुळे रोखीचे भांडवल तर अतिचंचल झाले आहे. ते कमीतकमी खर्च आणि जास्तीतजास्त नफा यांच्या सतत शोधात राहू शकते. आर्थिक सुरक्षितता, नोकरीची सुरक्षितता, social security या सर्व संकल्पना इतिहासजमा तर होणार नाहीत ना, असे वाटू लागते! कंत्राटी पद्धतीने कामे देणे, घरच्या घरी फावल्या वेळात स्वस्त दरात स्त्रिया व मुले यांचेकडून काम करून घेणे, e-commerce, back-office, call-centers हे सर्व आता सर्रास होऊ पहात आहे. Laissez-faire अनिर्बंध आर्थिक व्यवहाराच्या तत्त्वाचा हा टोकाचा अर्थ असावा. अशा वेळी राज्यसंस्था, समन्याय, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, भौगोलिक आणि आर्थिक असमतोल यांचा पुनर्विचार करणे भाग पडणार आहे.
४.३) याचे राजकीय आयामही खूप आहेत. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, तार-टपाल-दूरभाष अशा मूलभूत सेवा या आजपर्यंत सार्वजनिक क्षेत्रात व एकछत्री सरकारच्या सेवा होत्या. त्यासाठीचे केबल, तारा, मनोरे इ.इ. हे सरकारी मालकीच्या जमिनींवर अथवा मुद्दाम खाजगी जमिनी ताब्यात घेऊन उभारण्यात आले आहेत. एका अर्थाने ही राष्ट्रीय संपत्ती सार्वजनिक मालकीची आहे. पण प्रथम जेव्हा अशा सेवा स्वायत्त कॉर्पोरेशन व नंतर सरळसरळ खाजगी क्षेत्रात सुरू झाल्या तेव्हा प्रश्न उपस्थित होतात.
काही वर्षांपूर्वी मुंबईत नळाद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरविणाऱ्या जाळ्यात दोष उत्पन्न होऊन स्फोट झाले. सुरक्षिततेचे नियम, महानगर पालिकेच्या रस्त्यांखालून जाणाऱ्या या नळांवर गुणवत्तेसंबंधीची देखरेख कोणाची, अग्निसुरक्षा विम्याचे काय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले व त्यावर थातुरमातुर उत्तरेच मिळाली. केबल टी.व्ही.वाले आपल्या तारा कशाही, कुठच्याही इमारतींवरून नेत असतात. इमारतवालेही गप्प बसतात कारण बऱ्याचवेळा त्यांना धाकधपटशाची भीती वाटते. आता तर रिलायन्ससारख्या कंपन्याही या क्षेत्रात उतरल्या आहेत. सार्वजनिक कल्याणकारक कामांसाठी खाजगी जमिनी सरकारने ताब्यात घ्यायच्या आणि त्यावर स्वतः काही न करता खाजगी क्षेत्राला सुपूर्द करायच्या हे कितपत न्याय्य आहे?
संपर्कसाधनांच्या या जाळ्यांचा फायबर ऑप्टिक केबल्स, मनोरे इ. . . . खर्च अमाप असतो. त्याची वसुली केवळ धनवंताकडूनच शक्य होते. त्यामुळे त्यांचे जाळेही शहरातील धनवंत वस्त्यांमध्येच केंद्रित होण्याची किंवा अशी जाळी मुंबई पुण्यासारख्या श्रीमंत शहरातच निर्माण होण्याची शक्यता आहे. माहितीच्या बाबतीत पुढारलेला आणि मागास पडलेला असे विभागीकरण त्यातून निर्माण होऊ शकते. अगोदरच पूर्वापार शहरांतून श्रीमंत, उच्चभ्रू वस्त्या आढळून येतात. त्यांच्या सार्वजनिक सुविधांचा दर्जा उजवा असतो. त्याला आता माहितीतंत्रज्ञानाच्या सुविधांची जोड मिळेल.
या तारांमधून अनेकविध, अनेक त-हेची माहिती सतत फिरत असणार. या सर्व माहितीवर अधिकार कुणाचा, तिचा उपयोग कसा केला जातो, हेही गुलदस्त्यातच राहणार. आजच जेलमधील अट्टल गुन्हेगार सर्रास सेलफोनचा वापर करून आपल्या कारवाया चालवत आहेत. नुकतीच अशी एक बातमी येऊन गेली की आर्थर रोडवरील जेलच्या सेलफोनमध्ये खरखर उत्पन्न करणारी यंत्रणा बसविण्याच्या विचारात सरकार आहे. याचाच अर्थ सेलफोनचा वापर अट्टल गुन्हेगारांना जेलमध्ये करू न देण्यात अपयश आले, असा आहे. गुन्हेगार आणि माफिया हे उघड शत्रू. पण देशहित, समाजहित असे काहीही न मानणाऱ्या चछठी, ढछठी किंवा देशांतर्गतच असणारे बडे उद्योग यांच्यावर तरी नियंत्रण कसे ठेवणार ? त्यातून काय त-हेचे आर्थिक गुन्हे, वाटमाऱ्या निर्माण होतील हे कसे कळणार ? इलेक्ट्रॉनिक्सचे हे जग आपल्या अवतीभवतीच्या भौगोलिक जगांसारखे अचल, निष्क्रिय, निर्विवाद नसते. ते माहिती, कृती, क्रिया-प्रतिक्रिया, अर्थ, हेतू यांनी भरलेले असते. आणि त्यामुळे त्याच्या स्वामित्वामधून मोठी सत्ताकेंद्रे निर्माण होऊ शकतात.
जिथे राष्ट्रीय रेषांच्या मर्यादा या सर्व घडामोडींना पायबंद घालू शकत नाहीत तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांचा काय पाड लागणार ? एकवेळ युरोपात उळीं डीरींशी होती आणि त्यांचा फार दबदबा होता तथाकथित सायबरसिटीज ही अशा त-हेची प्रचंड माहितीच्या आधारे सत्तेची केंद्रे होतील का? कुठचीही सार्वजनिक जबाबदारी नसलेली ही केंद्रे असतील? त्यांचे उत्तरदायित्व काय असेल? एक फार मोठी अंगभूत ताकद असलेले तंत्रज्ञान आज आपल्या हाती लागलेले आहे. आणि त्याचे सर्वांगीण परिणाम आपल्या भविष्यावर होणार आहेत.

५) इथे थोडे विषयांतर करून मग या सर्वांचा परिणाम नगररचनांवर होईल का याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू. तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन यांचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतात?
पहिला विचार हा टेक्नॉलॉजिकल नियतवादाचा आहे. या विचारानुसार तंत्रज्ञानच रेटा देऊन समाजात सतत बदल घडवून आणत असते. चाकाचा शोध लागला आणि केवढे बदल झाले. हे शोध अपघाती असतात का ? काही व्यक्ती हौस म्हणून, छंद म्हणून शोध घेत जातात. समाजावर त्याचे परिणाम होत जातात, सामाजिक बदल डोळ्यांसमोर ठेवून कोणी शोध लावायला बसत नाही.
तंत्रज्ञानाचे इंजिन समाजाला खेचून नेत असते हे सूत्र कायम ठेवून काही स्वप्नरंजन करणारी माणसे सामाजिक, आर्थिक, राजकीय बदलांना चालना देऊ पाहतात. भविष्याचा वेध घेऊन (उदा. आकाशमार्गाने प्रवास) ही एकप्रकारे शोध घेणाऱ्या व्यक्तींना डिवचतात, प्रेरित करतात. आधुनिक संपर्क-साधनांकडे या दृष्टीने पाहता येईल.
दुसरीकडे काय खपते याची नस ज्यांना सापडली आहे असे उद्योजक अशा तांत्रिक धक्क्यांची वाट पाहत बसत नाहीत. आहे त्या तंत्रज्ञानाला हाताशी धरून त्याचे आर्थिक फायदे ते करून घेऊ लागतात. तांत्रिक बदल नव्हे तर आर्थिक बदलच समाजात परिवर्तन घडवत असतात, असे हे मत आहे. यात एक थोडासा भेद करून व्यक्तींच्या माध्यमातून नव्हे तर प्रथम जेव्हा तंत्रज्ञानाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त होते मग ते कारखानदारीच्या स्वरूपात प्रचंड उत्पादन असो किंवा सामाजिक राजकीय विचारसरणीतून लसीकरणासारखे प्रकल्प असोत तेव्हाच खरे सामाजिक परिवर्तन होते असा म्हणणारा गट आहे. या दोन्ही गटांच्या विचारात तंत्रज्ञान हे एका अर्थी उदासीन (socio-politically neutral) मानलेले आहे.
५.१) या सर्व मतामतांच्या गलबल्याच्या खोलात जाण्याचे इथे कारण नाही. त्याचे इथे औचित्य इतकेच आहे की शहरे, नागरी वस्त्या या नियोजनपूर्वक उभारता येतात का ? आखलेल्या आखीवरेखीव रेषांवर माणसे वस्त्या करून राहतात का ? जिवंत जागत्या वस्त्या आणि पूर्वनियोजित शहरे/गावे यात काय फरक दिसतो. ज्या वस्त्या आपसूकच उभ्या राहिल्या, तिथे मानवी समूहभावना (community feeling) दृढ असतात. तिथे त्यांच्यातील चैतन्य, उत्साह, आनंदी वातावरण सहजच जाणवते. The Place Smells different. याउलट भूकंपग्रस्त, पुनर्वसित गावांतून फेरफटका मारून पाहा. इतकेच कशाला बिल्डरने बांधलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थातील आणि लोकांना एकत्र आणून उभ्या केल्या गेलेल्या प्रवर्तकांच्या गृहनिर्माण संस्थातील वातावरणातील फरक पाहा. बिल्डरने उभ्या केलेल्या सोसायट्या चालतात कशा हा मला प्रश्न पडतो. लोक इतके उदासीन, मानसिकरीत्या एकमेकांपासून तुटक असतात की भांडतसुद्धा नाहीत! सार्वजनिक सभासमारंभ, उत्सव दूरच राहिले. कोणीतरी नाइलाजाने वीज, पाणी, नगरपालिकेचे कर, दिवाबत्तीची सोय बघते म्हणून हे चालू राहते.
आजच्या मुंबई शहराकडे पाहिले की मला या अशा बिल्डरनिर्मित सोसायट्यांची आठवण येते. ही शहरे एकजिनसी नाहीत. अनेक वस्त्यांची जी बनली आहेत. पोटापाण्याचा एकमेव दुवा त्यांना एकत्र ठेवत असतो. इथे एक वस्ती कार्यालयात काम करणारी असते तर तिच्याच शेजारची दुसरी वस्ती तिला हरत-हेच्या सेवा पुरविणारी असते.
चंडीगढ, गांधीनगर, वाशी-नवी मुंबई अशी पूर्वनियोजित शहरे गरजेपोटी उभी राहिली. पण त्यांचे स्वरूप लष्करी छावण्यांचेच राहिले. अनेक वर्षांनंतर हळूहळू त्यांना मानवी चेहरा प्राप्त होत आहे.
शहरे म्हणजे एखाद्या भूप्रदेशाचे तेथील उंच-सखल भाग, तेथील ओढे-नाले, तेथील समुद्रकिनारे, झाडे-झुडपे यांचे पूर्वनिश्चित नियोजन, ही केवळ सुरम्य कल्पना आहे. निसर्गावर मात’ या कल्पनेसारखी. मानवी वस्त्या, गावे, नगरे या एखाद्या सजीवासारख्या जन्म घेतात आणि वाढतात. आणि म्हणूनच कुठच्याही एकाच जातीच्या दोन सजीवांमध्येदेखील जसे साम्य नसते तसे दोन शहरांतही नसते. खुर्द आणि बुद्रुकमध्येही फरक असतो. पुणेकर, नागपूरकर, मुंबईकर एक नसतात. पुण्याचा, सदाशिवपेठेचा, गिरगावाचा ‘क्लोन’ तयार करता येईल का? देश, काल, परिस्थिती यांच्या मागण्या सतत बदलत असतात आणि ह्यामुळे स्थिर आराखड्याला धरून शहरांचे नियोजन करता येत नाही. नव्या शहरांच्या नियोजनापेक्षा (New City Planning पेक्षा) अस्तित्वात असलेल्या शहरांचे विकास आराखडेच (Development PlansM) जास्त प्रमाणात होत असतात आणि ह्यात अविरतपणे दुरुस्ता कराव्या लागतात. आत्तापर्यंत कितीवेळा मुंबईतील बेकायदा बांधकामे, झोपडपट्ट्या, अतिक्रमणे खास परवानगी देऊन कायदेशीर करून घ्यावी लागली ? याला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, भ्रष्टाचार अशी सर्वसामान्यांना आवडतील अशी कारणे असली तरी त्यामागचे वास्तवही भयावह आहे आणि मुख्य म्हणजे नियोजनकारांच्या नियंत्रणाच्या मर्यादा स्पष्ट करणारे आहे.
५.२) याचा अर्थ आधुनिक संपर्कसाधने निरुपयोगी, चंगळवादाची प्रतीके मानायची असा आहे का? नगररचनाकारांना आपले आराखडे तयार करतानाच त्यांचा उपयोग करून घेता येईल का? आजच्या सर्वसाधारण शहराची खास वैशिष्ट्ये काय सांगता येतील?
अ) कायमस्वरूपी भौतिक सांगाडा आणि मूलभूत सेवासुविधांची तरतूद. यात रस्ते, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाच्या नळयोजना, वीजपुरवठा, दूरभाष सोई, असल्यास रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या सोई.
ब) जीवनावश्यक सेवा विभाग वाणी, धोबी, शिंपी, कपड्यांची दुकाने, उपाहारगृहे, विजेचे, नळकाम करणारे असे अनेकानेक व्यावसायिक, व्यापारउदीमवाले.
क) सरकारी कचेऱ्या, व्यापारी संकुले आणि कार्यालये, शैक्षणिक संस्था, कारखाने.
ड) राहती घरे, उद्याने, क्रीडापटांगणे, दवाखाने इ. असे दिसते आहे की वरील सर्व प्रकारच्या सुविधांचे अवकाशीय (रीरीिळरश्र) नियोजन संपर्कसाधनांवर आधारित नाही. मात्र त्यांच्या कार्यप्रणालीवर, होत असलेल्या कामाच्या दर्जावर, देखरेखीवर, नियंत्रणावर-थोडक्यात त्यांची कार्यक्षमता आणि पोहोच वाढविण्यावर नक्कीच आधुनिक संपर्कसाधनांचा (ढशश्रशारींळली) उपयोग होऊ शकतो. किंबहुना या सर्व गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या होऊन बसल्या होत्या की प्रचंड मनुष्यबळ कचेऱ्यात बसवूनही वस्तुस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. आज बँका, व्यापारी कार्यालये, सरकारी कचेऱ्या संगणक आणि
दूरभाष, मोबाईल, फॅक्स, टेलेक्स, इत्यादींच्या सहाय्यामुळेच रास्त सेवा देऊ शकत आहेत. किंबहुना अ, ब, क, ड. मध्ये आता या नवीन जंजाळाचाही अपरिहार्यपणे अंतर्भाव करणे करायला हवा, इतकाच बोध यातून होतो. या जंजाळाचा फायदा घेऊन नगररचनांच्या मूलभूत तत्त्वांवर अथवा आराखड्यांवर परिणाम घडवून आणता येतील असे वाटत नाही.
५.३) आपण सुरुवात अशी केली की माणसांनी एकमेकांच्या संपर्कात, साथसंगतीने, एकमेकांना धरून राहायला आवडते. मनुष्य हा कळप करून राहणारा प्राणी आहे. एकमेकांवर प्रेम करणारा प्राणी आहे. आणि त्यातूनच त्याचे सामूहिक सांस्कृतिक जीवन बहरते.
आजची मुंबई-न्यूयॉर्कसारखी शहरे पाहिली, अत्याधुनिक संपर्कसाधनांचा तेथील सढळ वापर पाहिला तर असे दिसते की माणसांच्या झुंडीचे, गर्दीचे आकारमान वाढते आहे; निसर्गापासून जमिनीपासून दूरदूर, अलग होत माणसे शहर नावाच्या केंद्राकडे खेचली जात आहेत. पण तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे या समूहाची कुटुंबे होत नाही आहेत. उलट पूर्वीची मोकळीढाकळी कुटुंबेच आता आक्रसत ‘न्यूक्लियर फॅमिलीज्’ होताहेत. अवघ्या एक बोटाच्या अंतरावरील दोन डोळ्यांची नजरभेट काही होत नाही. कारण माणसांच्या आपापसातल्या, समोरासमोरील संपर्काची जागा माध्यमे घेत आहेत. ही माध्यमे आणि मलभत सुविधांच्या यंत्रणा कोलमडून पडणार नाहीत, इतकीच माफक अपेक्षा नगरनियोजनकार, त्या सुविधा कार्यान्वित टेवणारी नोकरशाही आणि त्यांचे कर्तेकरविते राजकारणी ठेवून आहेत.

आधार – वरील मांडणीला मुख्यतः पुढील पुस्तकांची मदत झाली आहे.
1. Telecommunications and the City – Electronic spaces – Urban Spaces by Stephen Graham & Simon Mervin
2. Economics by Henry Clay
3. The Different Drum – The Creation of True Community: First Step to World Peace. by M. S. Cott Peck]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.