आटपाट नगर?

चेंबूर-ट्रॉबेच्या वस्त्यांमधून प्रौढसाक्षरता प्रसाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या कामामध्ये मी १९८९ पासून सहभागी आहे. ‘कोरो साक्षरता समिती’ हे आमच्या संघटनेचे नाव. ह्या कामात मी अधिकाधिक गुंतत चालले त्यावेळी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनी भेटून, फोनवर माझ्याबद्दल, कामाबद्दल चौकशी केली, अगदी आस्थेने चौकशी केली. “काम कसं चाललंय?”, “कसं वाटतं’ ?, “झोपडपट्टीतली लोक कामाला प्रतिसाद देतात का?” अशा उत्सुक प्रश्नांबरोबर “सुरक्षित आहेस ना? काळजी घे,’ “यांना हाकलून द्यायला पाहिजे. यांनी मुंबई बकाल केली. तू यांना जाऊन कशाला शिकवतेस?’, “कसे राहतात ग हे लोक?’, असेही प्रश्न होते. “मला कामाला एक चांगली विश्वासू बाई हवी आहे. आता तुझ्या खूप ओळखी झाल्या असतील ना?” अशी विचारणा करणारे फोन तर सतत यायचे. यांसारख्या अनेक प्रश्नांमधून एक गोष्ट स्पष्ट होत होती. वस्त्यांमधील लोकांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल एक कुतूहल बऱ्याच जणांच्या मनात होते. कधी कणवेपोटी, कधी घृणेतून आलेले, कधी स्वार्थापायी तर कधी गरजेसाठी. कधी माणुसकीच्या भाबड्या कल्पनेमुळेही. वस्तीबाहेरच्या सुस्थित माणसाला इतक्या विपन्न अवस्थेत लोक जगतात कसे?’ असा प्रश्न पडतो. त्यातही हसणारी, खेळणारी, उत्सव-सण साजरे करणारी, संसार करणारी, भांडणारी, शिकणारी वस्तीतली मंडळी दिसली की हा प्रश्न अधिकच गडद होतो. या लेखाच्या निमित्ताने वस्तीतले मी पाहिलेले/मला दिसलेले चित्र मांडावे असे मनात आहे. सुरुवात भौगोलिक रचनेपासून करते. एखाद्या बऱ्यापैकी/मोठ्या ‘अॅक्सेस’रोडला चिकटून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वस्त्या वसतात. रस्त्याला अगदी लागून असणारी घरे शोधायला सोपी असली तरी आतली घरे शोधायची म्हणजे ‘बालमित्र’ वगैरे मासिकात ‘मार्ग शोधा’ असा खेळ असतो तसा प्रकार. आत प्रवेश केल्यावर, स्वतःला तोलत, धडकत, अडथळाशर्यत पार करत, गटारे चुकवत इच्छित घरी जावे लागेल. पण सगळ्यांत सोपा मार्ग म्हणजे वस्तीच्या सुरुवातीलाच कोणाला तरी अगदी शेंबड्या मुलाला (मुलीला)ही विचारले “अमुक कुठं राहतात ?’ तर तो आनंदाने तिथपर्यंत पोहोचवतो. तो सराईतपणे रस्ता, अडथळे पार करतो त्यामुळे तुमच्या धांदलीत नजरेआडही होतो, पण स्वतःच परत येऊन तुम्हाला बेताने घेऊन जातो. तोपर्यंत तुम्ही आल्याची वर्दी तो त्या घरी पोहोचवूनही आलेला असतो.

वस्त्यांच्या आत पायवाटांचे उभे-आडवे जाळे असते. याच्या दोन्ही बाजूला छोटी-छोटी कच्ची/पक्की घरे एकमेकांना रेलून, खेटून उभी असतात. पायवाट’ मुद्दाम म्हटले, कारण दोन समोरासमोरच्या घरांच्या लाईनीमध्ये जेमतेम एखाद-दुसरा माणूस सरळ जाईल एवढाच रस्ता. त्याला लागून दोन्ही बाजूला गटारे. बहुधा (म्हणजे नेहमीच) ही तुंबलेली. दोन्ही बाजूच्या घरांची छपरेही एकमेकाला खेटूनच असल्यामुळे प्रकाश फारसा नाही. चहूबाजूंनी दाटीवाटीनी उभ्या असलेल्या या घरांमध्ये मोकळी हवा शिरू शकत नाही. घराला खिडक्या नाहीत. यातच नाना क्लृप्त्या लढवून काही लोकांनी माळे वगैरेही बांधून घेतलेले. यांपैकी काही घरांत आतून किंवा बाहेरून माळ्यावर जाण्यासाठी जिने असतात हे सांगितले तर कोणी विश्वास ठेवणार नाही. १३०-१५० चौ.फूट हा सरासरीचा घरांचा आकार. त्यातच स्वयंपाक, आंघोळी, राहणे, झोपणे, अभ्यास करणे, चैन करणे, मनोरंजन करणे . . . सगळे त्यातच. काही भाग्यवानांची घरे मोठी, ऐसपैस असतात. माझ्या बघण्यामधील ऐसपैस, पक्की, दुमजली घरे स्थानिक राजकारण्यांची (त्यांच्या नातेवाईकांची) आहेत, किंवा त्यांच्या ‘पंटर्स’ची आहेत किंवा या पंटर्सनी बाळगलेल्या ‘फौजेची आहेत. या वर्गात न बसणारी मोठी घरे मग वस्तीतल्या श्रीमंतांची आहेत. (दुकानदार. कंत्राटदार वगैरे). सामान्य माणसाला मात्र घरासमोर एक लादी टाकतानाही राजकारणी, पोलीस, महानगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांशी ‘मांडवली’ करावी लागते. आपल्याला वाटते, एवढ्या सागरासारख्या पसरलेल्या. वस्तीत कोणाच्या लक्षात ह्या बाबी येणार ? पण विटा, वाळू एखाद्या आत आतल्या घरातही आल्या तर त्याच्यामागेच ह्या अधिकाऱ्यांची जंत्री येतेच. ‘सॉलिड नेटवर्क’ असते.
आपले घर ठाक-ठीक करताना, वाढवताना असलेल्या गटारींचा वगैरे विचार केलेला नसतो. आपल्या घरात पाणी येऊ नये म्हणून ठिकठिकाणी लोकांनी आपल्या घरासमोर सिमेंटकाम करून डबऱ्याची श्रशीशश्र वाढवलेली असते. आधीच सगळी घाण गटारात टाकण्याची लागलेली सवय, त्यातले वाढवलेले कट्टे यांमुळे घरासमोरच्या पाउलवाटांवर घाणीची दलदल असते. यातून कित्येक आजार होतात. पण अजून सर्वांनी मिळून एकत्र सर्वांच्या फायद्याच्या गोष्टी ठरवण्याची पद्धत इथे रुजलेली नाही.

पावसाळ्यात ह्या वस्त्यांच्या हालअपेष्टांना पारावार नसतो. ‘श्रावणमासी भीति मानसीं’ अशी परिस्थिती असते. वरच्या छपरांमधून मिळेल तिथून टपकणारा पाऊस, साचलेले सांडपाणी, तुंबलेले ड्रेनेज, त्यातून वळवळणारे घरात येणारे किडे, घरभर पसरलेले पाणी, कटआउट घेऊन घेतलेली वीज, उघडे वायरिंग, त्यावर पाणी पडून निर्माण झालेली धोक्याची स्थिती, इतस्ततः फिरणारे उंदीर, घुशी या सगळ्यांतून पावसाळ्याची एक धास्ती बसलेली असते. थोडा नियमित रोजगार असणारी मंडळी मे महिन्याच्या शेवटी प्लॅस्टिकचे निळे/पिवळे कागद आणून घरावर टाकून पावसाळ्याची सोय करतात. पण हातावर पोट असणारी बाई/पुरुष रोज स्वतःशीच ‘उद्या’चा वायदा करत प्रत्यक्ष पावसाची रणधुमाळी चालू झाल्यावरच तयारीला लागू शकतात. कोण राहतात या वस्त्यांमधून? भारतातल्या कानाकोपऱ्यातून उदरनिर्वाहासाठी आलेली ही मंडळी आहेत. आपापल्या गावी इथे राहतात त्यापेक्षा बदतर स्थितीत राहत असल्यामुळेच इथे येऊन वसलेले. काहींना आर्थिक हालअपेष्टा असह्य झाल्या तर काहींना सामाजिक दुस्वास. मुंबईत एक बरे आहे, मुद्दामहून (सहजासहजी) कोणी ‘जात कोणती’ हे विचारत नाही. बस लोकलमध्ये वस्तीतल्या या घरांप्रमाणेच खेटून सर्व जाती-धर्माचे लोक उभे असतात. आपली गावे सोडून येणाऱ्या या लोकांना हा एक मोठा दिलासा आहे, हे लक्षात आले. प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भाग, बिहार, भागातली मंडळी या वस्त्यांमध्ये आढळतात. सर्व हिंदी भाषिक ‘भय्या/भय्याणी आणि सर्व दक्षिणेकडील मंडळी ‘मद्रासी’ म्हणून संबोधली जातात. एका भागातून येणारी मंडळी, नातेवाईक जवळजवळ राहतात. बाहेरच्या जगात जाती-उपजाती विचारत नाहीत म्हणून निश्चिंत असलेली मंडळी वस्त्यांत बऱ्याचवेळा जाती, मूळ विभाग किंवा व्यवसाय-उद्योग यांच्या निकषावर एकगठ्ठा झालेली आहेत. ‘औरंगाबादकर चाळ’, ‘मांग-गल्ली’, ‘जरीवालों की चाल’ ही काही नामाभिधाने. आतल्या आत या सगळ्यांची नेटवर्कस् ऑपरेट होत असतात. जातीची, ओळखीची, गावाकडची, उदाहरणार्थ एखाद्याला एका कामावर ३-४ जणांच्या रोजगाराची शक्यता दिसली की तो आपल्या गावाकडची, ओळखीची, जातीची माणसे निवडणार. (आणि हे तर सर्रास सगळीकडे असेच असते. मग कॉर्पोरेट सेक्टर असो, छऋज असो वा संशोधनाचे काम असो.) पण वस्तीतल्या माणसांची नेटवर्क्स तुलनेने क्षीण, सत्ताहीन असल्यामुळे त्यांचा मर्यादित प्रभाव असतो. ‘मुंबईत कोणी भूखं मरत नाही’ हे माहिती असल्यामुळे विवंचनेत असलेला गावाकडचा माणूस, त्याच्याआधी आलेल्या माणसाचा आधार घेऊन इथे येतो. १० १२-१५ च्या खोलीत नवरा-बायको, त्यांच्या ४-५ मुलांबरोबरच ‘पाहुणा, ‘गावाकडचा’, ‘शेजारचा’, ‘भाचा’, ‘चुलता’ असे एक-दोन जण तरी बहुतेक असतातच. यांतली कित्येक मंडळी ३०-३५ वर्षांपासून इथे आहेत. त्यांच्या दुसऱ्या पिढीचा जन्मच इथला. ते मुंबईकरच. वस्तीबाहेरच्या लोकांना सरसकट सर्वांना ‘उपरे’, ‘बांडगूळ’ म्हणण्याची सवय लागली आहे : असे म्हणणाऱ्यांमध्ये अगदी अलिकडे मुंबईत येऊन स्थिर झालेल्यांची संख्याही मोठी आहे. ‘मुंबईकर’, ‘उपरे’ हा मुद्दा राजकीय सोई आणि गरजेनुसार वेळोवेळी एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष उकरून काढतात, हा भाग आहेच.

आपले गाव मागे टाकून आलेली ही मंडळी इथे करतात काय? मिळेल ते काम करायला सुरुवात करतात आणि त्यात ‘तरक्की’ करण्याचे मनात मांडे खातात. मातीकाम, सफाई, हमाली, काँट्रॅक्टमधील असुरक्षित कामे मिळेल ते काम. काही नशीबवानांना टेलिफोन लाईनमेन, म.न.पा.मध्ये प्यून किंवा कायमस्वरूपी सफाई कामगार अशा नोकऱ्या मिळतात. आयुष्यभर इथले पुरुष ‘पर्मनंट नोकरी’चे स्वप्न पाहतात. पण केवळ स्वप्नच. ते पूर्ण होईल असे नेटवर्क नाही. कौशल्य व शिक्षणाचा प्रश्न गौण ठरतो कारण सफाईकामगाराची पर्मनंट नोकरी हीदेखील सर्वोत्तम ‘अचीव्हमेंट’ मानली जाते. ‘फंड-सर्व्हिस’ (प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी) हे आकर्षण.

वस्तीत शिक्षण फारसे नाही. जी मंडळी/मुले शिकली आहेत त्यांनाही आज नोकऱ्या मिळण्याचे वांधे आहेत. बी.ए., १२ वी पास मुलेही सफाईखात्यातल्या नोकरीची अभिलाषा धरून आहेत. सध्या अशी शिकलेली मंडळी ‘सिक्युरिटी’, ‘क्यूरियर’, व ‘प्रायव्हेट’मध्ये जुजबी कामे करताना दिसतात. वर सगळ्यांना (मुलांना, आईवडिलांना) शिकल्यावर उलट सफाईची कामे करायलाही लाज वाटते. मग या तरुणांची अवस्था ‘त्रिशंकू’ सारखी होते. शिक्षणाने इथल्या तरुणांना सामाजिक-आर्थिक वर चढण्याची संधी दिल्याची उदाहरणे अभावाने आढळतात. त्यामुळे मनापासून शिक्षणावर विश्वास वाटत नाही. याचे प्रत्यंतर वस्त्यांतल्या एकूण शैक्षणिक वातावरणाच्या अभावात दिसते. पण फारसे न शिकता लटपटी-खटपटी करून हाताशी पैसे बाळगणारी मंडळी लोकांना दिसतात. त्याचे आकर्षण वाटते. ही मंडळी मग रोल मॉडेल होतात.

साक्षरतेच्या कामामध्ये एका वस्तीमध्ये (११ वर्षापूर्वी) निरक्षरांना शिकविण्याचे काम करणारा एक चुणचुणीत मुलगा, चार महिन्यांपूर्वी भेटला तेव्हा ‘भाई’ झाल्याचे लक्षात आले. पोलीस स्टेशनात मारामारी केलेल्या मुलांना सोडवायला आला होता. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात एक प्रकारची गुर्मी, बेदरकारपणा जाणवत होता. माझ्याशी अगदी प्रेमाने बोलतानाही गेल्या दहा वर्षात कमावलेले ‘गुणविशेष’ जाणवत होते. वस्तीत गुंडगिरी करणाऱ्यांना मदत करणारी, अभय देणारी केंद्रे असतात. तेही सतत ‘संभाव्य भाई’च्या शोधात असतात. ही केंद्रे निरपवादपणे राजकारणी, काँट्रॅक्टर, रेशन दुकानदार अशा लोकांची आहेत. एखाद्या मुलात ‘गुण’ दिसले की त्याला पैसे देणे, देत राहणे, त्याच्या गरजा पूर्ण करणे व वस्तीत त्याचा ‘रोब’ वाढेल अशी परिस्थिती तयार करत राहणे, पोलीस स्टेशन वगैरे मामला निपटत राहणे अशी प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहते. या चक्रव्यूहामध्ये अडकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. समाधानाचे आयुष्य जगण्याचा विश्वासू. हमखास पर्याय दिसत नसल्यामुळे. बरीच तरुण मंडळी गुन्हेगारीकडे वळतात हे लक्षात घेतले पाहिजे. खरेच काय करतील ही मुले ? दिवस-दिवस वस्तीच्या कोपऱ्यात बसलेली असतात. पत्ते खेळायचे, भंकस करायची. काम-धाम नाही. काय करावे याबद्दल सांगणारे कोणी नाही. दिवस-दिवस नव्हे तर वर्षानुवर्षे असेच राहावे लागले तर वेड तरी लागेल किंवा आता वस्त्यात घडते आहे ते होत राहील.
वस्तीतल्या तरुण (१६-२४ वयोगट) मुलांच्या गप्पा, त्यांचा दिनक्रम, कार्यक्रम, मानसिकता, लैंगिकता याचा शोध घेण्याचा प्रयत्न एका संशोधनाद्वारे आम्ही नुकताच केला. वर चर्चा केलेली भकास पोकळी, अडचणीची किंवा शतखंडित कौटुंबिक पार्श्वभूमी, वयात येतानाची, आल्याची शारीरसंवेदना आणि पुरुषत्व सिद्ध करण्याचा सोपा मार्ग म्हणजे लैंगिकता व्यक्त करणे. या सगळ्यांचे मिश्रण होऊन असे काही वातावरण/व्यवहार तयार होतो की बाहेरून येणाऱ्याला वाटावे ‘इथे सेक्सशिवाय काही विचारच होत नाही, घडत नाही.’ ‘लैंगिकता’ हा शब्द मी वापरला असला तरी मुलाखत घेतलेल्या बहुतेक तरुण मुलांच्या लेखी लैंगिकता म्हणजे प्रत्यक्ष कामव्यवहार, ‘ठोकणे’ असाच अर्थ लागत होता. १० १२ च्या घरात एकत्र राहणाऱ्या/झोपणाऱ्या अनेक जणांनी पहिला लैंगिक व्यवहार आपल्या आईवडिलांचाच पाहिला होता. वस्तीमध्ये ६-७ वर्षांच्या मुलांपासून ६०-७० वर्षापर्यंतच्या पुरुषांपर्यंत एकत्र हॉलमध्ये बसून ‘ब्ल्यू फिल्म’ बघत असलेले आम्ही अनेक ठिकाणी पाहिले आहे. तरुणांच्या बोलायच्या विषयांचा मोठा भाग ‘सेक्स’ ने व्यापला आहे. ‘मर्दानगी’शी जोडलेल्या अधिकांश कल्पना या सेक्सशी, जबरदस्तीशी, अनेक मुलींशी संबंध ठेवण्याशी जोडलेल्या दिसल्या. या वयोगटातील मुलांच्या विचाराचा मोठा भाग सेक्स ने व्यापल्यामुळे त्यांची भाषाही अधिक ‘शारीर’ आहे ; रांगडी आहे. या तरुण मुलांबरोबर काम करताना एका चर्चेमध्ये आम्ही ‘प्रजनन’ यावर ‘फ्री लिस्टिंग’ करत होतो. ‘फ्री-लिस्टिंग’ याचा अर्थ तो शब्द उच्चारल्यावर तुमच्या मनात येतो तो शब्द सांगायचा. सर्वांच्या सोईसाठी प्रजनन म्हणजे ‘मूल होणे’ हे स्पष्ट केले होते. आलेले बहुतेक सगळे शब्द प्रजननाशी जोडलेल्या शारीरिक अवस्थांशी संबंधित होते. उदाहरणार्थ ‘कट्टा’ (बाईचे पोट वाढले की तिला कट्टा म्हणतात). त्यांत एक शब्द ‘उदास लवडा’ असा होता. याचा अर्थ बायको/पार्टनर गर्भार राहिली की लैंगिक अवयवाला काम उरत नाही, त्यामुळे तो ‘उदास’ असतो. वस्तीतल्या मुलांची ही सांस्कृतिक, सामाजिक, मानसिकता लक्षात घेऊन, आम्ही ‘लिंगभाव आणि लैंगिकता’ असा फोकस ठेवून मुलांच्या गटांबरोबर नुकतेच काम सुरू केले आहे. याचा परिणाम कसा होईल, किती काळ टिकेल हा आज आम्हा सर्वांचाच आस्थेचा आणि आशेचा विषय आहे या सगळ्या वातावरणात अजिबात शिव्या न देणारी, अभ्यास करून चांगले मार्क मिळवणारी, वेगळा विचार करणारी मुलेही भेटतात. संख्येने ती बरीच कमी आहेत, पण आहेत. वस्तीतल्या साऱ्यांच्या/बायकांच्या मते अशी मुले “पॉझिटिव्ह’ आदर्श आहेत तर समवयीन मुलांमध्ये ही वेगळ्या लाईनची मुले आहेत.

‘शिक्षण’ आर्थिक/सामाजिक स्थैर्य देईलच ही शाश्वती नाही, पण ‘राजकीय पक्षात’ ती स्थिरता मिळते असा भ्रम बऱ्याच तरुणांमध्ये दिसतो. त्यामुळे बहुसंख्य तरुण मंडळी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षात, त्याच्या गटातटात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतातच. काही टिकतात, काही सोडतात. ज्याला जिथे काही फायदा मिळतो तिथे तो टिकतो, हे सूत्र आहे. निष्ठा, विचार हे मुद्दे कोठेच उरले नाहीत मग इथे कसे असणार ? ‘राजकीय कार्यकर्ता’ याचा आजतरी इथे अर्थ ‘दलाल’ असाच लागतो.

वैयक्तिक स्वार्थाच्या पलिकडे त्याला कोणतेही परिणाम नाही. संख्येने किरकोळ असला तरी आणखीही एक मुद्दा आहे. शिकलेल्या काही तरुणांना आज छऋज मध्ये काम करायची संधी मिळते. ‘कम्युनिटी-बेस्ड अॅप्रोच’ हे सर्व विकासाच्या कामांचे आज ब्रीदवाक्य आहे. पण यात या तरुणांची त्यांच्या वस्त्यांच्या विकासात काही मदत होईल. अशा पद्धतीने वाढ करण्यापेक्षा, दिखाऊ, शो-केस म्हणून त्यांचा जास्त उपयोग केला जात असल्याने, क्षमता असूनही ही तरुण मुले आपल्या समष्टीच्या जीवनावर काही परिणाम करू शकतील असे आता तरी अजिबात वाटत नाही.

अशाही वातावरणात काही (मोजकीच) मंडळी शिकतात. आपला, आपल्या वस्तीचा खऱ्या अर्थाने विकासाचा विचार करतात, त्यासाठी प्रयत्न करतात. हे लोक असुरक्षित/करप्ट होणार नाहीत हे पाहण्याचे काम करणे महत्त्वाचे ठरते; ते अवघडही आहे.

जिथे पुरुष, जो ‘कुटुंबाचा कर्ता’ समजला जातो, त्याच्या नोकरीची, उपजीविकेची साधनाची ही अवस्था, मग बाईचे काय विचारावे! बायकांचे आयुष्य खरोखरीच घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे, तिथेच फिरते आहे गोल-गोल. कालच्यानंतर आजचा दिवस. काही बदल नाही. पुरुषांची बेरोजगारी, दारू आणि अन्य व्यसने यामुळे बाईच खरे तर अनेक घरात ‘कर्ता पुरुष’ असते, असे माझे स्वतःचे मत आहे असे लिंगभावाचे निकष बाजूला ठेवून म्हणावेसे वाटते. घरकाम आणि अर्थार्जन याच्या दुहेरी ओझ्याखाली अनेक बायका दबलेल्या असतात. (दारूच्या सार्वत्रिक व्यसनामुळे पुरुषांचे सरासरी आयुष्य कमी आहे.) ज्यांचे नवरे काहीतरी काम, मग थोडा आराम, मग गप्पाटप्पा करतात. ज्या बायका सकाळी उठून कामाला जातात आणि दुपारी/संध्याकाळी परत येतात त्यांची छोटीछोटी मुले त्या शेजारपाजाऱ्यांवर सोपवून जातात. म्हणजे सांगून-सवरून नव्हे; पण आई घरी नसलेल्या छोट्या मुलांची विचारपूस, खाणे-पिणे याकडे शेजारपाजारच्या बायका लक्ष देतात. छोटी-छोटी मुले असणारी आणि खूप वेळ कामावर जाणारी बाई, गल्लीतल्या कोणत्यातरी बाईबद्दल ‘तिला खूप ममता आहे’ असे म्हणताना दिसते.

इथल्या आयुष्याच्या स्वरूपामुळे असेल, किंवा गावाकडून येऊन नाते-जात-गाव यांनी बांधलेल्या पुंजक्यांमध्ये स्थिरावल्यामुळे असेल किंवा इथल्या असुरक्षिततेमुळेही असेल, पण इथे विशेषतः बायकांमध्ये एक प्रकारचा बंध जाणवतो (याचा त्या प्रसंगी झिंज्या ओढून किंवा शिव्या देऊन भांडत नाहीत असे नाही). दवाखाना, जन्म, मृत्यू अशा प्रसंगात हा बंध स्पष्ट दिसतो. गल्लीतल्या कोणाला दवाखान्यात भरती केले की बायका कामाच्या ठिकाणी सुट्या टाकून बघायला जातील. त्यांच्या घरादाराची काळजी घेतील. गल्लीत मयत झाली तर सर्व घरांमध्ये शोकाचे वातावरण, खाणे नाही. काम नाही, फक्त सगळे ओढलेले चेहरे. बारसे-वाढदिवसालाही लोक जातीने हजर राहणार, आपल्या परीने आनंदात सहभागी होणारच.

मुलींची शाळा लौकर सुटते (drop out). घरकाम सुरू होते. T.V., Cable त्यातून पाहिलेले नटणे-मुरडणे यात जीव रमतो. थोडी मोठी झाली की लग्न (म्हणजे १५-१६ वर्षाची). मग तिला लगोलग मुलं, संसार, मारहाण, दारू, काम, घरकाम असे हे एक बायकांचे चक्र अव्याहत चालू असते. हे मी त्यांच्या नित्यक्रमाबद्दल सांगते. अत्याचार, हिंसाचार हा सामाजिक विषय म्हणून त्याची चर्चा नंतर करता येईल.
आत्मसन्मानाच्या बाबतीत स्त्री आणि पुरुषांचीही एकूणच गोचीच आहे. कुठेही, कोणीही त्यांना सन्मानाने वागवत नाहीत. जिथे काम करतात तिथे ‘अरे काय तुझं नाव . . .’ ‘बाई. . .’ अशी संबोधने वापरली जातात. ज्यांना त्यांच्या नावानेही क्वचित संबोधले जाते त्यांना अन्य वागणूक कशी मिळत असेल त्याचा अंदाज करू शकतो. आमच्या साक्षरतेच्या कामामध्ये सहभागी झालेल्या अनेक तरुणांनी आपल्या मोटिव्हेशनबद्दल (प्रेरणांबद्दल) बोलताना, “आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी आम्हाला नावाने, मानाने हाक मारत होते” असे सांगितले होते. आधीच करण्याच्या कामाचे स्वरूप मार्जिनल (फुटकळ) त्यात (आणि त्यामुळेही) माणूस म्हणून किंमत नाही, अशा परिस्थितीत माणसाची मानसिक घडण कशी होईल ? त्यात स्त्रियांना तर बाहेरच्या पाणउताऱ्याबरोबर घरी मारहाणीचा अहेर असतो. ह्या आत्मसन्मानाच्या आसेमुळेच बहुतेक बऱ्यापैकी शिकलेली मुले मुली स्वतःला वस्तीपासून, आपल्या लोकांपासून वेगळे’ दाखवण्याची धडपड करत असतात.

‘माणूस’ म्हणून जगण्याला बांध घालणारा वस्तीतला परिसरही आहे. संडास नाहीत, पाणी नाही, रस्ते नाहीत, चांगल्या आरोग्यसुविधा नाहीत. शुद्ध हवा नाही, खुला प्रकाश नाही. आपण फक्त कल्पना करू या की अनेक स्त्री-पुरुषांची ये-जा चालू असलेल्या ठिकाणी, किंवा दारे नसलेल्या, घाणीने बरबटलेल्या संडासात आपल्याला संडासला जावे लागले. कसे वाटते ? या सगळ्या गोष्टी कळत-नकळत माणसाची मानसिकता घडवत असतात. बरे, ‘सुखाच्या आयुष्याची’ त्यांना कल्पनाच नाही असे नाही. ही मंडळी जिथे काम करतात त्यांची घरे/कार्यालये, शिवाय टीव्हीसारखी माध्यमे याच्यामुळे दुरून का होईना या ‘सुखेनैव’ आयुष्याचे दर्शन घडलेले असते. संधी मिळाली तर क्षणिक का होईना, पण या आयुष्याचा उपभोग परिणामांची चिंता न करता घेण्याची वृत्ती तयार होते, ती ही आयुष्ये आपल्या नशिबात नाहीत हे ठाम माहीत असल्यामुळेच. वस्त्यांमधील कुटुंबातील आर्थिक चणचणीची भेदकता सांगण्याची फारशी गरज नाही. ढोबळपद्धतीने का होईना हे माहीत असते. पण अनेकांना प्रश्न असतो तो एवढ्या हलाखीत कुटुंबाचे भरणपोषण कसे होते ? किडूक-मिडूक काम करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न एका बाजूला सुरू असतो. दुसरीकडे कर्ज, सगळ्यांकडून कर्ज, कामाच्या ठिकाणी, मित्र-मैत्रिणींकडून, सावकारांकडून, भिशीतून, पतपेढ्यांतून आणि मिळेल तिथून. त्या क्षणीची गरज महत्त्वाची असल्याने व्याजदराचा विचार कर्ज घेताना होत नाही. अनेकांची निम्मी-पाऊण मिळकत व्याजात जाते. घेतलेले कर्ज फेडायला नवे कर्ज, हेही चक्र अव्याहत चालू असते. यावर काही जणांची पोटे भरतात. म्हणजे ‘कर्ज घेऊन देणारे’ असतात. त्यांची परतफेडीची ऐपत असते. ते स्वतःचे कमिशन लावून गरजू स्त्री-पुरुषाला कर्ज आणून देतात. वस्तीत बरीच देवाणघेवाण उधारीवर चालते. डॉक्टर, किराणावाला भय्या, रेशनवाला (हाही बऱ्याचदा भय्याच) ही उधारी असते. मिळेल तेव्हा, मिळतील तसे यांचे पैसे द्यायचे. रोख माल न घेणाऱ्या लोकांना हे भैय्ये भरपूर फसवतात. भाव वाढवून, व्याज लावून, वाईट माल देऊन. पण ही एकमेकांवर अवलंबून असलेली व्यवस्था आहे. वस्तीतल्या लोकांमध्ये खरेच रोख पैसे देऊन माल घेण्याची क्षमता तयार झाली, तर हे दुकानदार घाबरतील. एका वस्तीमध्ये तयार केलेल्या बचतगटाला ‘वाशीच्या होलसेल मार्केटमधून माल आणून वाटून घ्यायचा’ अशी कल्पना सांगितली. सुरुवातीचे थोडे पैसे आमच्या संस्थेने बीजभांडवल म्हणून टाकावे असेही ठरले.

कागदावर सर्व योजना तयार आहे पण गेल्या वर्षभराच्या प्रयत्नानंतरही ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. याचे कारण मला वाटते एक म्हणजे कागदावर वाटते तेवढी ही योजना सहज नाही असे बायकांना वाटते. दुसरे महिन्या-पंधरा दिवसाचा माल एकरकमी घेण्याची सवय नाही, व त्या शक्यतेबाबतही विश्वास नाही. तिसरे, हे करताना स्थानिक दुकानदाराची खपामर्जी होईल. आणि नंतर गरज पडली तर तो आपल्याला वाऱ्यावर सोडेल असे वाटते. यात काम करणाऱ्या संस्था-संघटनांबद्दल पुरेशा विश्वास वाटत नाही हेही स्पष्ट होते. सगळे बदलाचे प्रयत्नाचे इथे साशंकता, भीती, अविश्वास, असुरक्षितता, अनास्था, क्षणभंगुरता, असहाय्यता यांच्या कटाच्यात अडकले आहेत. गंमत म्हणजे इथली किराणामालाची, रेशन दुकानदारांची दुकाने गेल्या पंधरा वर्षांत तसूभरही बदललेली मी पाहिली नाहीत. अक्षरशः एक फळीसुद्धा बदललेली नाही. आतला माल गरजेनुसार कमीजास्त होतो. इथे त्यांना स्पर्धाच नाही. अख्खी वस्ती-त्यांच्या दुकानावर आणि ते त्या वस्तीतल्या उधार-रोखीच्या देवघेवीवर अवलंबून आहेत. इथे दुकान टाकलेला कोणताही माणूस सोडून गेलेलाही मी पाहिला नाही. तोच मालक, तेच दुकान, तोच माल, तीच देवघेव, तीच फसवणूक, तीच लाचारी. . . हेही एक अव्याहत चाललेले चक्र आहे.

चहूबाजूंनी अशा बंदिस्त वातावरणात राहणाऱ्यांची मानसिकता असेल तशीच मानसिकता इथल्या स्त्री-पुरुषांची आहे. आला दिवस साजरा करायचा. मिळेल त्या छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद साजरा करायचा. स्वतःला रिझवण्याचे, मनोरंजनाचे नवे-नवे प्रकार शोधायचे, मिळेल ती भाजीभाकरी गोड समजायची. उद्याचा विचार करायचा नाही. संसाराच्या प्रवाहात पडायचे फारसे हातपाय मारायचे नाहीत. जाऊ तिथे जाऊ. पडू तिथे पडू.

हे एकदा समजले तर वस्तीतल्या लोकांच्या वागण्याचे अनेक अर्थ लागू शकतात. ऋण काढून सण कशाला करता! असा नेहमी त्यांना प्रश्न केला जातो. सुरुवातीला मी वस्त्यांमधून जायची तेव्हा नागपंचमी वगैरे सणाला बायका बिनपगारी सुट्टी घेऊन वस्त्यात नाचताना-खेळताना पाहिले की मला आश्चर्य वाटायचे. चीडही यायची. मोठ्या-मोठ्या बायका फुगड्या, गाणी खेळताना पाहायची. कोणी ‘संस्कृतीरक्षक’ ते पाहून भारावल्याचे नाटक करून लोक कशी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताहेत अशी टीव्हीला मुलाखत देईल. पण संस्कृती-जतन वगैरे पुसटपणेही या बायकांच्या मनात नाही हे जाणवते. गंमत, मनोरंजन हा मोठा भाग आहे. हीच गोष्ट नवरात्र, गणपती वगैरे सणांची आहे. ते दिवस ‘धमाली’चे, ‘गमती’चे, ‘बदली’,चे आहेत. म्हणून सगळी वस्ती स्वतःची सुखदुःखे विसरून अशा सणा-समारंभात सामील होते. दलित वस्त्यांमधील आंबेडकर जयंतीला आता तेच स्वरूप येत आहे. महिनाभर चाललेले सिनेमा, कव्वाल्या याची साक्ष आहेत.

हीच गोष्ट वस्तीत होणाऱ्या भांडणांची. एक फुसके भांडण झाले की अख्खी वस्ती जमा होते, मत देते, बाजू घेते, मारामारी करते. बायकाही आघाडीवर असतात. किंबहुना फुसक्या भांडणात बायकाच आघाडीवर असतात. मायबहिणीवरून शिव्यांचे बाण दोन्हीकडून फटाफट सुटतात. नंतर २-३ दिवस ते भांडण त्या गल्लीभर रेंगाळत राहते. हळूहळू विरते. मग वस्ती नवीन घटनेच्या शोधात दबा धरून बसते.
पैसे मिळवले तरी जपून वापरावे, बचत करावी, हा विचार म्हणूनच इथे रुजत नाही. म्हणजे बचत करण्याएवढे पैसे उरतही नाहीत, तरीही माझ्या वस्तीतल्या एका मैत्रिणीच्या नवऱ्याला कित्येक महिन्यानंतर ८ दिवस बिगारीचे काम मिळाले. पैसे मिळाल्यावर त्यांनी बायकोला एकदम महागडी चोळी आणली. जवळपास निम्मे पैसे खर्च करून. कोणाला तो बेजबाबदार. मर्ख. उधळ्या वाटेल पण त्याच्या दृष्टीने त्याचे समाधान, बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू, महत्त्वाचे असावे. त्याने असाही विचार केला असेल, ‘काय माहिती, एवढे काम तरी परत मिळेल न मिळेल!’ तो साजरा करायचा क्षण महत्त्वाचा. यातूनच मिळेल तेथे ओरबाडून मिळवण्याची वृत्तीही तयार होते. शक्यता निर्माण झाली की आपल्या दैन्याचे गाहाणे सांगून किंवा आपली ताकत, गुर्मी दाखवून किंवा लाचारी दाखवून मिळेल ते ओरबाडण्याचा प्रयत्न सर्रास चालतो. असहायता आणि असहायतेतून तयार झालेला ‘कल्ट’, ह्याचा तो परिपाक आहे.

बरे वस्तीतल्या लोकांच्या असहाय्यतेवर, अज्ञानावर पोसणारी बांडगुळे राजकारणी, अधिकारी, पोलीस यांच्या रूपात वावरत असल्यामुळे हरत-हेने ते वस्तीतला कोणताही सकारात्मक बदल हाणून पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. त्यांची सर्व ताकद त्यासाठीच वापरली जाते. एका वस्तीमध्ये रेशन दुकानदारांच्या गैरप्रकाराबद्दल १६९ लोकांनी सह्या करून एक गुप्त निवेदन रेशनिंगच्या अधिकाऱ्यांना दिले होते. अगदी अलिकडची गोष्ट आहे. तर दुसऱ्या दिवशी रॉकेलची गाडी आल्यावर तो रेशन दुकानदार ती श्रळीीं हातात घेऊनच, म्हणजे आम्ही दिलेल्या गुप्त निवेदनाची झेरॉक्स प्रत घेऊनच ठेल्यावर बसला होता व प्रत्येक सही केलेल्याला दम भरत होता. ‘बघून घेईन, हात तोडीन, पाय तोडीन’ वगैरे भाषा वापरत होता. एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिवशी तक्रार केलेल्यांची रेशनकार्ड रद्द करायला अधिकारी येणार आहेत असे त्यांनी सर्वांना कळवले आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेला अधिकारी वस्तीत हजर झालेही. पुढे आम्ही भांडण वगैरे केले, ती गोष्ट वेगळी. पण कोणताही लोकांचा पुढाकार मारण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचे हे उदाहरण आहे.

गरीब, उपेक्षित लोकांसाठी तयार झालेल्या सर्व यंत्रणा संवेदनाशून्यता आणि भ्रष्टाचार यांनी ग्रासलेल्या आहेत. विश्वास ठेवावा अशी कोणतीही बाब (यंत्रणा, आश्वासन, अधिकारी) अस्तित्वात नाही. ‘खऱ्याला न्याय नाही मिळणार किंवा दमाने मिळेल (त्याची जिंदगी संपल्यावर) पण खोट्याला क्षणोक्षणी न्याय आहे’, असे माझी एक मैत्रीण म्हणाली. ही खात्री आणि याला जोडून येणारी भीती जोपर्यंत लोकांच्या मनात आहे तोपर्यंत काही चांगला उठाव होऊ शकत नाही.

म्हणनच वस्तीपातळीवरच्या बदलाचे काम झटपट रंगारी पद्धतीने होणारे नाही. ही निराशा नाही, हा आकलनाचा भाग आहे. वस्त्या निरंकुश वाढताना राजकारणी, नियोजन करणारे, स्वार्थ (व्होट बँक, पैसे, सत्ता) नजरेसमोर ठेवून वरच्या बेशिस्तपणे वाढण्यास मदतच केली आहे. सर्व छोट्या-मोठ्या वस्त्यांचे, सोई-सुविधांच्या दृष्टीने वस्तीवार नियोजन करून राबवण्याची गरज आहे. वस्तीतल्या जास्तीत-जास्त लोकांना त्यांच्याशी संबंधित योजना, कायदे यांची वारंवार माहिती देण्याची गरज आहे. लोकांसाठी तयार झालेल्या यंत्रणा सर्वसामान्यांसाठी काम करणार नसतील तर त्यांना शासन झाले पाहिजे, यात मात्र राजकीय इच्छाशक्ती दिसली पाहिजे.

एकमेकांचे हितसंबंध जपण्याच्या कसरतीत राजकारणी, नोकरशाही आणि पोलीस यंत्रणा यांनी लोकांची जिगिषा पूर्णपणे संपवायचा प्रयत्न केला तरी अजून थोडी धुगधुगी दिसते. तिथून नवीन स्रोत निर्माण करायचा प्रयत्न आपल्या सर्वांना करायला हवा. न्यायसंस्थेचा वस्तीपातळीवरील सामान्यांना काही उपयोग होत नाही. न्यायालयीन कामकाजपद्धतीबद्दल अनभिज्ञता, या प्रक्रियेतली दिरंगाई, त्यासाठी लागणारे पैशाचे बळ आणि त्यातूनही पुढे रेट्रन न्याय मिळालाच तर तो प्रत्यक्ष अमलात आणण्याबद्दलची अशक्यता/असहायता या बाबींमुळे न्यायालयाच्या वाटेला जाण्याचे धाडस इथला सर्वसामान्य माणूस करीत नाही. पोलीसांकडे जाऊन ‘साहेब, साहेब’ करून, किंवा स्थानिक राजकारणी मंडळींकडे जाऊन त्यांची मनधरणी करून, किंवा स्थानिक गुंडांकडे जाऊन त्यांची ताकत आपल्यामागे उभी करायचा प्रयत्न करून आपापले प्रश्न सोडवायचा प्रयत्न लोक करतात; आणि ही सगळी मंडळी (राजकारणी, गुंड, पोलीस) फक्त पैशांसाठीच आपले काम करू शकतात, हेही लोकांना माहीत आहे.

तडाखा द्यायला पाहिजे तो इथे. पण तेवढी लोकांची क्षमता तयार करणे हेच महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कोणी काही फारसे प्रयत्न केले नाहीत तरी तडाखे बसणारच आहेत, मोठी पडझड होणारच आहे, असे आत्तातरी वाटते. मात्र ही पडझड, हे तडाखे अंदाधुंद पद्धतीचे असतील. आज वस्तीतल्या सर्वच लोकांमध्ये (फक्त तरुण नव्हे) असमाधान, अस्वस्थता, असंतोष भरून उरले आहेत. शिगेला पोहोचत आहेत. छोट्याछोट्या गोष्टीतल्या आपण ‘कुचलले’ जात आहोत ही भाषा आहे. अगदी पाणी, वीज या सुविधांचा प्रश्न घेतला तरी वस्तीतल्या ज्या दांडगटांकडे (राजाश्रय, ‘भाई आश्रय असलेल्या) या सुविधांचे नियमन आहे, ते लोकांचे रक्त पिऊन गब्बर होताना डोळ्यांसमोर, असहाय्यपणे बघावे लागते. बदलाची नव्हे उलथून टाकण्याची, मोडतोड करण्याची समर्थने लोक आपापल्या पातळीवर, आपापल्या पद्धतीने शोधत आहेत. म्हणजे असा प्रयत्न फार विचारपूर्वक, सामूहिकपणे चालला आहे असे नव्हे, तर प्रतिक्रियेचा (वैयक्तिकसुद्धा) भाग म्हणून सुरू असणार. त्याचे दाखले मात्र वेळोवेळी मिळत राहतात. माझी एक मैत्रीण मला म्हणाली. “आमची मुलं तुमच्यासारख्यांची घरं बघतात, मजा बघतात. आमच्या मुलांना काय हवस (हौस) नाही ? मग ती चोरी करतात, तर तुम्ही त्यांना पोलीसात देणार. हा कसला न्याय ?” किंवा तरुणांच्या मानसिकतेचा शोध घेणाऱ्या संशोधनाचे काम करताना अनेक तरुण असे भेटले. ज्यांना आम्ही ‘काम देणारे दलाल’ आहोत असे वाटले. “आम्ही काहीही काम करू. दोन नंबरचं कोणतंही काम द्या” असे सांगत होते. अशी कामे कोणती हे विचारले तेव्हा कळले ‘चोरी, खून, मालाची ने-आण वगैरे’. आम्ही त्यांतले नाही हे परोपरीने सांगूनही त्यांना पटले नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच वस्त्यांमधून रात्रीच्या वेळी अशी मुले शोधणारी मंडळी येत असतात. व भरपूर पैसे देऊन ‘दोन नंबरचे’ काम करून घेतात. आमच्या कामाचे, संघटनेचे स्वरूप सांगूनही ह्या मुलांचा विश्वास बसला नाही. “हमारा ध्यान रखो भाई, कुछ भी करेगा” असे फोन कित्येक दिवस येतच राहिले. शेवटी एकदा, आमची संघटना निम-पेशेवरांसाठीचा अभ्यासक्रम चालवते त्याच्या एका सत्राला त्यांना बोलावले आणि “ऐसा काम करना है क्या” असे विचारले. त्या दिवशी ते हिरमुसले होऊन गेले ते परत फिरकले नाहीत.

अशा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपले गुन्हेगारी चित्रपट आहेत. “आज चिल्लर में खेल रहा है, कल करोडों में खेलेगा” हा आशावाद. “माँगनेसे नहीं मिलता तो छीन लेना पड़ता है” किंवा “तू मेरी नहीं तो फिर किसी की भी नहीं हो सकती’ या प्रकारची समर्थने.

या सगळ्यातून कोणाचाही अंकुश नसलेल्या परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. परिस्थिती खरोखरीच कोणाच्याच आवाक्यात नाही, असे आत्ता वाटते आहे. बेसुमार आणि बेशिस्त पद्धतीने वाढलेल्या ह्या वस्त्यांचे नियोजन/प्रशासन करणे कोणाच्या आवाक्यात उरले आहे? अजिबात नाही! राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेली गुंड-पुंड मंडळी कोणाच्या आवाक्यात आहेत? तेही नाही. मागेल त्याला (खरे म्हणजे न मागताही) रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता सरकारमध्ये आहे? तेही नाही. गुणवत्तेच्या शैक्षणिक, आरोग्याच्या सोई सर्वांना पुरवण्याची शक्यता नजीकच्या काळात दिसते? तेही नाही. उलट गेल्या १-२ वर्षांमध्ये खर्च परवडत नाही म्हणून घरच्याघरी बाळंतपणे केल्याच्या बऱ्याच घटना कानावर आल्या. यापूर्वी १०-१२ वर्षांत असे ऐकिवात जवळपास आलेच नव्हते. वस्त्यांमधील आयुष्यमानात एक प्रकारचा ऱ्हास दिसत आहे, स्पष्ट दिसत आहे. या विभागातील अनेक उद्योगधंदे बंद पडल्यामुळे, कामगार कपात केल्यामुळे अनेक कंत्राटी कामात काम करणारी मंडळी बेरोजगार झाली आहेत. हा सगळा असंतोष दीर्घकाळपर्यंत तर दबून राहणे शक्य नाही. त्याचा उद्रेक होईलच; रस्त्यावर येऊन संघर्ष करण्यातून होईल. अशा यादवीला डोळे, मन, डोके नसते हे अनुभवाने आपल्याला माहिती आहे. आपण प्रतीक्षा करत आहोत. कशाची? यादवी थोपवू शकणाऱ्या पुढाकारांची की असा संघर्ष घडण्याची?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.