आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (३)

पाश्चात्त्य देशांनी इतरांचे शोषण करण्यासाठी विज्ञानाचा गैरवापर केला. ‘नेटिव्हां’ना कमी लेखणे विज्ञानाच्या मदतीने घडले. परकी परंपरांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी प्रबोधन-काळातल्यासारखा विज्ञानाचा वापर केला. हे सर्व नाकारता येत नाही. पण हे नोंदण्यामुळे, यावर टीका करण्यामुळे आधुनिकोत्तर विचारवंत धर्माधिष्ठित ‘उजव्या’ विचारवंतांचे सहकारी, दोस्त होत नाहीत. पण आधुनिकोत्तर विचारवंत विज्ञानाच्या राजकीय गैरवापरावरील टीका करून थांबत नाहीत. ते वस्तुनिष्ठ ज्ञानाची कल्पना हेच एक मिथक आहे, आणि हे मिथक सत्ताधारी पाश्चात्त्यांनी मतलबीपणे ‘सत्य’ म्हणून इतरांवर लादले आहे, असे म्हणतात. ते विज्ञानाचे पाश्चात्त्य साम्राज्यवादाशी असलेले संबंध दाखवून थांबत नाहीत. ते ‘वैश्विक’ असे काही आधुनिक विज्ञानात आहे, हेच नाकारतात.

एकदा का वस्तुनिष्ठता आणि वैश्विकता यांना नाकारले की ‘पर्यायी विज्ञानां’ना वाट मोकळी होते. निसर्गातल्या नियमितता समजून घेण्याचा, घटकांचे वर्गीकरण करण्याचा, निरीक्षणांना आधार पुरवण्याचा आधुनिक विज्ञान हा अनेक मार्गांपैकी एक मार्गच ठरतो. मग अशी मांडणी होते की पाश्चात्त्येतर संस्कृतींनी आपल्या मनांमधून वसाहतवाद काढून टाकला की त्यांना आपापल्या धर्मांप्रमाणे व परंपरांप्रमाणे आपापली विज्ञाने घडवायला मोकळीक आहे. यातून ब्रीदवाक्य घडते ‘वेगळी संस्कृती, वेगळे विज्ञान!’ एकदा का विज्ञानाला मिथक, रूपक, प्रतिमान (model) असा दर्जा दिला की एकाने एक मिथक, दुसऱ्याने दुसरे रूपक निवडणे वैध ठरते. यासाठीच ‘पॅराडाईम’ हा तांत्रिक शब्दही वापरला जातो.

हा युक्तिवाद इतक्यांदा मांडला गेला आहे, की वस्तुनिष्ठता वैश्विकता नाकारण्याला ‘सत्या’चा दर्जा लाभत आहे. विज्ञानाच्या स्वरूपाच्या चुकीच्या आकलनातून विज्ञानाच्या विवेकनिष्ठतेवर हे हल्ले केले जातात. वैज्ञानिक, विज्ञानाचे तत्त्वज्ञ, विज्ञानाचे इतिहासकार, या साऱ्यांनी हे वारंवार दाखवून दिले आहे की अशा टीकेमागचे विज्ञानाचे आकलन सदोष असते.

सामाजिक-सांस्कृतिक फरक असूनही वस्तुनिष्ठता शक्य आहे, आणि आधुनिक विज्ञान हाच प्रयत्न करत असते. याबाबतचे गैरसमज कशा बकवासा’ ला जन्म देतात ते दाखवणे शक्य आहे पण तशा प्रयत्नांसाठी वेगळे लेख लागतील. भारतीय आधुनिकोत्तरांचे तीन वेगवेगवेगळे युक्तिवाद कसे हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादांजवळ जातात, हे आता तपासू. तिन्हींमधून वैदिक विज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचे समर्थन होते. सोईसाठी ‘स्वातंत्र्य.’ (खरे तर वसाहतवादापासून स्वातंत्र्य), अद्वैत आणि संमिती (symmetry) अशी नावे या युक्तिवादांसाठी योजू. ‘स्वातंत्र्य’ (decolonisation of Science):
हिंदुत्ववादी विचारवंत स्वतःला वसाहतवादाच्या अंतानंतरच्या स्थितीचे अभ्यासक मानतात. हिंदू मनांमधून वसाहतवादाची हकालपट्टी करण्यासाठी हिंदू दृष्टीतून विज्ञान समजून घ्यायला हवे, असे यांचे म्हणणे. वसाहतवादाने ज्ञानशास्त्रीय मोडतोड केली, असे प्रतिपादन करणाऱ्यांमध्ये मुरली मनोहर जोशी, कॉन्राड एल्स, गिरिलाल जैन, डेव्हिड फ्रॉली, एन.एस. राजाराम व इतर आहेत. त्यांना वेदांमधील दावे प्रत्यक्षदर्शी (empirical) पद्धतीने तपासणे हीच पाश्चात्त्य साम्राज्यवादी वृत्तीमुळे मनांमध्ये वसाहती घडलेल्यांची खूण वाटते. ह्यांपैकी अनेक जण आपल्या समर्थनासाठी एड्वर्ड सैद, रोलंड इंडेन, आशिष नंदी, क्लॉड अल्वारेस, गायत्री स्पिव्हाक व सबाल्टर्न इतिहासकारांची वचने उद्धृत करतात. प्रत्येक संस्कृतीचे एक विशिष्ट ‘सार’ (essence) असते, एक वृत्ती (temper) असते, आणि या गाभ्यामुळे गणित आणि भौतिकीपासून कला आणि काव्यापर्यंत संस्कृतीच्या वैशिष्ट्याची ‘छाप’ जाणवते असे मत ऑस्वल्ड स्पेंग्लरने डिक्लाईन ऑफ द वेस्ट या ग्रंथात मांडले. ते जसेच्या तसे उसने घेऊन हिंदू उजवे विचारवंत अशी गाभ्याची छाप दिसणे, हे अस्सलपणाचे एकुलते एक लक्षण मानावे असे सांगतात. दीनदयाल उपाध्यायांच्या ‘स्वभाव’ आणि ‘चित्ती’ या संज्ञा अशी छाप नोंदतात. त्यांचा ‘एकात्म मानवतावाद’ ही भारतीय जनता पक्षाची तात्त्विक बैठक मानली जाते. म्हणूनच भाजपचा जाहीरनामा एखादे शास्त्र जोपासले जाईल का, व कसे, हे फक्त ‘स्वभावा’ने हिंदू असण्यावर ठरवले जाईल असे स्पष्ट करतो. चैतन्यवाद (vitalism) हे आधुनिक जीवशास्त्राने नाकारलेले तत्त्व असे सांगते की सजीव गोष्टींमध्ये ‘प्राण’ किंवा ‘शक्ती’ म्हणून काही चैतन्य पुरवणारा घटक असतो केवळ अणुरेणूच नसतात. जगदीशचंद्र बसूंनी प्रथम आधुनिक काळात ‘प्राण’ सापडल्याचा दावा केला. वनस्पतींमध्येही जाणीव सापडल्याच्या रूपात हा दावा होता. हा दावा बसूंच्याच आयुष्यात खोटा ठरून नाकारला गेला. पण हिंदुत्ववादी विचारांमध्ये आजही ‘भारताचे विज्ञानातील योगदान’ म्हणून बसूंचे कार्य उल्लेखले जाते.

याचप्रमाणे पुंजभौतिकीतील विरोधाभासांची वेदान्ताच्या साहाय्याने गूढवादी ‘स्पष्टीकरणे’ देणे, हेही या ‘स्वतंत्र’ मानसिकतेच्या निकषावर मान्य होते. अशा गूढवादाशिवाय, वास्तविकतेच्या आधाराने पुंजभौतिकीचा व्यवहार चालतो पण ते नाकारून वेदान्ताच्या मदतीने निसर्गात ‘मन’ आहे, असे सांगितले जाते.

घटकवादी विरुद्ध साकल्यवादी विज्ञानः
या युक्तिवादाचा गाभा असा आधुनिक विज्ञानातला सर्व खोटा व घातक भाग हा सेमिटिक (ज्यू, ख्रिस्ती, इस्लामी) एकेश्वरवादाच्या द्वैती घटकवादातून आलेला आहे. या विचारांमुळे वस्तू व व्यक्ती यांच्यात, निसर्ग आणि जाणीव यांच्यात, ज्ञान व ज्ञाता यांच्यात भेद केला जातो. याउलट आधुनिक विज्ञानातली सर्व काही वैश्विक व सत्य अंगे हिंदू साकल्यवादातून येतात. यात निसर्गातील वस्तू व मानव यांना एकाच वैश्विक जाणिवेचे वेगवेगळे आविष्कार मानले जाते. ज्ञानकेंद्री वृत्ती नसलेल्या हिंदुधर्मात वास्तव वस्तुनिष्ठ नसून ‘सकलनिष्ठ’ (omnijective) असते, वस्तू व मन यांच्या एकत्रित रचनेतून घडलेले असते. पाश्चात्त्य विचार निसर्गाला मृत व जड मानतो, तर हिंदुधर्मात निसर्ग हे पवित्र देवालय मानले जाते. यामुळे हिंदुत्ववादी विचारवंत योग, ध्यान, आयुर्वेद यांना भविष्यात महत्त्व येऊ घातलेली विज्ञाने मानतात; कारण ती सर्वव्यापी वैश्विक ऊर्जेशी जडपदार्थांची सुसंगती घडवतात. पर्यावरणवाद्यांना हे आवडते कारण ह्यात निसर्गदोहन मागे पडून पावित्र्यभावनेने निसर्गाकडे पाहिले जाते. या युक्तिवादामागे हिंदु-सांप्रदायिकांचा आणि डाव्या विज्ञानविरोधकांचा एक विचित्र आणि चुकीचा समज आहे, की विज्ञानाची मूलभूत पद्धत ही घटकवादी आहे. हा समज नुसता चुकीचाच नाही तर राजकीयदृष्ट्या दमनकारीही आहे. विज्ञानात ‘घटकवादा’चा अर्थ एवढाच की व्यामिश्र नैसर्गिक क्रिया-प्रक्रिया समजून घेण्यासाठी मुख्य क्रियेत भाग घेणाऱ्या घटकांचे खालच्या पातळीवरील परस्परसंबंध तपासणे. हे आवश्यक तितक्या ‘खाली’ नेऊन नियंत्रित प्रयोगांनी केले जाते. या घटकवादात ‘जाणीव’, ‘चैतन्य’ अशा विशेष बलांची, ऊर्जेची, घटकांची कल्पना न करता स्पष्टीकरणे शोधण्याचा प्रयत्न असतो. शिवाय खालच्या पातळीवरच्या घटकांचे संबंध तपासायला सोपेही असतात. यात ना काही अडाणीपण असते, ना मतलबीपण टीकाकार मात्र अशा गुणांचे विज्ञानाच्या पद्धतीवर आरोप करतच राहतात. आज डीएनेपासून परिसरशास्त्रापर्यंतची वाढीव समज या घटकवादातूनच आलेली आहे. साध्या सोप्या घटकांच्या परस्परसंबंधांच्या तपासातून. पण विज्ञानाच्या या पद्धतीबाबतचे अज्ञान आणि खूपसा तुच्छतावाद यातून स्त्रीवादी, पर्यावरणवादी, साम्राज्यशाहीविरोधी अशा सगळ्या डाव्या गटांमध्ये ‘घटकवादा’बद्दल नकाराची भूमिका घेणे, घटकवादाला तुच्छ लेखणे, ही एक प्रतिक्षिप्त (reflex) क्रिया झाली आहे. घटकवाद वाईट, घटकवाद साम्राज्यशाहीच्या दमनाचा एक भाग. बस्स. कॅरलिन मर्चेट, सँड्रा हार्डिंग आणि डॉना हॅरावेसारख्या नामवंत स्त्रीवाद्यांना घटकवाद म्हणजे वस्तू आणि व्यक्तींमधील सांधा तोडण्याची पुरुषी पद्धत वाटते. वंदना शिव आणि तिच्यासारख्या पर्यावरण-स्त्रीवाद्यांना पावित्र्याचा भंग करून अनिर्बंध निसर्गदोहन करण्याचे घटकवाद हे एक साधन वाटते. ईको-रोमँटिकांना विरोधी पुरावे देणारी उदाहरणे दिसतच नाहीत. ‘देवराई’ या नावाखाली, निसर्गाच्या पावित्र्याच्या नावाखाली गावखेड्यांची समाईक जमीन, समाईक नद्यांबाबतचे हक्क ‘लाटले’ जाताना दिसतच नाहीत. वसाहतकालोत्तरांना अर्थातच घटकवाद ही एक पाश्चात्त्य आणि भांडवलशाही मानसिक सवय वाटते ‘आपण’ आणि ‘ते’ यांना विभागणारी.

विज्ञानाच्या पद्धतींना दिली जाणारी ही सारी आव्हाने अज्ञान आणि राजकीय हेतूंमधून येतात आणि त्यांच्या मदतीने हिंदुत्ववादी अशी मांडणी करतात की हिंदुत्ववादी विज्ञान जास्त परिपूर्ण, जास्त स्त्रीवादी, जास्त पर्यावरणवादी अशी साकल्यवादी उत्तरे पुरवते.

हा साकल्यवाद ‘साध्या’ विज्ञानापेक्षा श्रेष्ठ उत्तरे देण्याच्या दाव्याला कोणताही आधार नाही. तपशिलात असे सर्व दावे फक्त ‘छद्म विज्ञाना’ला, सूडोसायन्सला, आधार देतात असे विज्ञान, ज्यात शरीरहीन ‘आत्मा’ (spirit) काही गूढ यंत्रणांनी भूतमात्रावर परिणाम घडवतो. निसर्गाबाबतच्या पावित्र्यभावनेतून कोणतेही स्त्रीवादी-पर्यावरणवादी उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. उलट नद्या, झाडे वगैरेंमध्ये दैवी शक्ती आहे असे मानले, की त्यांची काळजी हे न घेण्याच्या वाटा मोकळ्या होतात एवीतेवी त्या नद्या, ती झाडे देवच तारतो आहे!

घटकवादाच्या फुगवलेल्या आणि अडाणी भीतीमुळे आकादमीय लोक खोट्या हिंदू (व ‘पौर्वात्य’) साकल्यवादाच्या दाव्यांची वाट सुकर करतात.

संमितीः
सर्व ‘विज्ञाने’ सारखीच विवेकी, सुसंगत आणि वास्तवाचे अर्थ लावायला उपयुक्त असतात असे मानणे, हा झाला संमितीवर आधारित युक्तिवाद. आधुनिक विज्ञानाला इतर सर्व ज्ञान कमावण्याच्या पद्धतींइतकेच मूल्य देणे, म्हणजे संमिती साधणे. सामाजिक रचनावाद आणि आधुनिकोत्तरवाद ह्यांचा हा गाभा आहे. याच भूमिकेतून ते आधुनिक विज्ञानावर टीका करतात.

वैदिक भौतिकी, वैदिक उत्पत्तिवाद यांचे समर्थन असे दिले जाते की ऋग्वेदांतील ऋचा सांकेतिक रूपात आजच्या ‘थिअऱ्या’च मांडतात. अमेरिकास्थित एंजिनीयर सुभाष (काक ?) यांनी यावर लिहिले आहे. मायकेल क्रेमो व इतर ‘हरे कृष्ण’वाद्यांनी डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा वैदिक पर्यायही नोंदला आहे. अशा दाव्यांना आधार असतो तो वैदिक-हिंदू आधिभौतिक धारणांना विवेकी आणि आधुनिक विज्ञानाइतकेच ग्राह्य मानण्याचा. एकदा का हे मानले की वैदिक विज्ञानालाही वैश्विक वस्तुनिष्ठता बहाल करता येते तितपतच, जितपत आधुनिक विज्ञानात असते.

१९९५ मधील इन सर्च ऑफ द क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन या पुस्तकात सुभाष काक यांनी आपल्याच आधीच्या ढीगभर पुस्तकांचा व लेखांचा संक्षेप केला आहे. यानुसार यज्ञवेदींची मापे आधुनिक खगोलशास्त्राची निरीक्षणेच सांकेतिक रूपात नोंदतात आणि या मापांमध्ये नेमकेपणा तर आहेच, पण यज्ञवेदीतील विटा आणि खड्यांच्या संख्या ऋचांमधील अक्षरांच्या संख्येइतक्याच आहेत.
वेदांमधील सर्वात जुना जो ऋग्वेद, त्यात प्रगत आधुनिक वैज्ञानिक तत्त्वे शोधणे हे हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ऋग्वेद इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास लिहिला गेला असे आजवर मानले जात होते. तो इ.स. पूर्व ३००० मधील आहे, असे दाखवण्याचे एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. आर्यांचे मूळ भारतातच होते, असे दाखवण्याचेही प्रयत्न आहेत. एकदा का वैदिक ऋचांमध्ये आधुनिक विज्ञान सापडले, की ‘क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन’ भारतात येऊन ग्रीक व इतर प्राचीन संस्कृतींचे मूळही सापडेल. पण असे दावे करणाऱ्यांना वैदिक काळातील लोकांना हे ज्ञान कोणत्या पद्धतीने मिळाले याचे उत्तर द्यावे लागेल व त्यांचे सहलेखक डेव्हिड फ्रॉली व जॉर्ज फ्यूअरस्टाईन सांगतात, की हे ज्ञान गहन चिंतना-मननातून आले! योगिक ध्यानधारणेने प्रज्ञाचक्षू उघडले आणि वैश्विक, आत्मिक, भौतिक, अशा साऱ्या क्षेत्रांमधील समरूपता व समानता ऋषींच्या दृष्टीस पडली. जरी पाश्चात्त्य विज्ञानाला हे ‘जादुई’ वाटले तरी भारतीय अधिभौतिकीच्या अद्वैती तत्त्वांनुसार ते अपेक्षितच आहे. जड आणि चेतन, शारीरिक आणि मानसिक असे भेद न केले तर सर्वांना सांधण्याऱ्या वैश्विक ऊर्जेने ते शक्य होते. या विचारानुसार योगसाधना हीसुद्धा वैज्ञानिक संशोधनाची ग्राह्य पद्धत आहे. इथे पॅराडाईम निवडला जात आहे ककादि लेखक वारंवार कून, फेयराबेंड यांची वचने उद्धृत करतात. त्यांच्या आधुनिकोत्तर धारणाही नीट समजून न घेताच हे घडते. पण यात ककादींचाच दोष नाही, तर अनेकांनी कून, फेयराबेंडना समजून घेण्यात चुका केल्या आहेत. अखेर काय, तर वैदिक धारणांच्या पॅराडाईमनुसार वैदिक विज्ञान वैधच आहे.

महर्षी महेश योगींचे “एकत्रित विज्ञान’ वैदिक फलज्योतिष, गतजन्माच्या आठवणी, शरीरबाह्य अनुभव, सारे काही पॅराडाईम निवडीने ग्राह्य ठरवता येते.

‘हरे कृष्ण’ चळवळीच्या भक्तिवेदान्त इन्स्टिट्यूटमध्ये अशाच त-हेने भक्तियोगाने साकल्यवादी ज्ञान मिळण्याची सोय आहे. तेथील मायफेल क्रेमो यांच्या ‘ह्यूमन डिव्होल्यूशन’ (मानवी अवक्रांती) या पुस्तकात एका (परब्रह्मापासून ?) एकत्रित चैतन्यापासून माणसे अवक्रांत झाली, असा दावा केलेला आहे. क्रेमोंनी या वैदिक (साकल्यावादी) विश्वोत्पत्तिशास्त्राच्या समर्थनार्थ जीवाश्मांवर संशोधन करायचा प्रयत्नही केला. (पण) खरे पुरावे मात्र जगभरातल्या परासामान्य (paranormal) घटनांवरील संशोधनातून घेतले आहेत.

पाश्चात्त्य चाळणीतूनच आधुनिक विज्ञान घडते, कारण वैदिक विज्ञानांचा पुरावा ही चाळणी दूर ठेवते. अशा रीतीने आधुनिक विज्ञान पाश्चात्त्य धार्मिक-सांस्कृतिक दुराग्रहांच्या कैचीत अडकलेले आहे. एकदा का हा पाश्चात्त्य प्रभाव हटवला की आपली मने ‘शुद्ध’ केलेल्या लोकांना चिंतनमननाने समजू व पटू शकेल असे वैदिक विज्ञान घडते. ही ‘थेट जाणीव’ (direct realisation) पाश्चात्त्य वैज्ञानिकांना परासामान्य वाटते.

ह्या सर्व धारणांना कोणताही प्रत्यक्षदर्शी आधार नाही. तरीही ते सारे छद्म-विज्ञान वैदिक असण्याच्या नावाखाली ‘गंभीर संशोधन’ मानले जात आहे कारण विवेकी काय, वैज्ञानिक काय, याबद्दल वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळी मते असतात सारी सारखीच ग्राह्य वा अग्राह्य.

आधुनिकोत्तरांचा आधुनिक जगाबाबत भ्रमनिरास झाला. त्यातून त्यांनी आधुनिक विज्ञानाला मूलतःच बाद ठरवले. त्यातील वैश्विकतेचे, वस्तुनिष्ठेचे दावे हे पाश्चात्त्य, साम्राज्यवादी, पितृसत्ताक, ख्रिस्ती द्वैतवादी मानले गेले. भारतातील अनेक डाव्या चळवळींना अनुकूल अशा विचारवंतांनी आधुनिकोत्तरवादाचा ह्या सर्व विज्ञानविरोधासकट स्वीकार केला. भारताच्या परंपरागत समाजाच्या सांस्कृतिक आवडीनिवडींमध्ये त्या आधाराने पर्यायी विज्ञानांची संकल्पना रुजवली.

आता त्यांच्यापुढील प्रश्न असा आहे की या वैदिक विज्ञानाबाबत कोणती भूमिका घ्यायची ? फलज्योतिषाला शास्त्र मानायचे का ? विज्ञानाला सांस्कृतिक संरचना मानून वेदांचे विज्ञानीकरण मानायचे का?

विज्ञान आणि मिथके यांतील सीमारेषा, पुराव्यावर आधारित विवेकी आणि जाहीर ज्ञान आणि योगसाधकांनाच मिळू शकणारे आध्यात्मिक ज्ञान यांच्यातील सीमारेषा, टिकवायच्या की नाही ? जर रेखा पुसटल्या, पुसल्या, तर गूढवादच विज्ञानाच्या वेषात सामोरा येतो. स्वतःला सेक्युलर आणि डाव्या वृत्तीचे मानणाऱ्यांनी आता त्यांचा अविवेकवाद आणि रोमँटिसिझमशी सुरू असलेला ‘रोमान्स’ थांबवायला हवा.

विज्ञान आणि मिथके, डाव्या आणि उजव्या भूमिका, यांच्यातील सीमारेषा स्पष्ट आखायला हव्या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.