व्यक्तिविशिष्ट रसायनांचा मेळ

अंशतः विश्लेषणः पद्मजाचा अनुभव दुर्मिळ आहे खरा, पण त्याला गूढ किंवा अमानवी मानायचे कारण नाही. उपलब्ध शास्त्रीय ज्ञान वापरून त्याचे स्पष्टीकरण इथे थोडक्यात देता येईल.
माणसासकट सर्व प्राण्यांना काही व्यक्तिविशिष्ट रसायने अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यांची तीव्र जाणीव होऊ शकते. याची अगदी ठळक आणि व्यवहारातली उदाहरणे म्हणजे केवळ वासावरून काही तासांपूर्वी पळालेल्या गुन्हेगाराचा, पुरून टाकलेल्या बळीचाही माग काढू शकणारे कुत्रे, मादीच्या वासाने दोन-तीन किलोमीटर्सपर्यंत तिला शोधत जाणारे भुंगे, औषधाच्या प्रत्येक गोळीत औषधाचे अगदी थोडेच रेणू असतील-नसतील तरी लागू पडणारी होमियोपॅथिक औषधे आणि एखाद्या विशिष्ट पदार्थाची (हिंग, लसूण, शेंगदाणे, अंडी, विशिष्ट प्रकारचे गवत, ऑईल पेन्ट, इ.) अॅलर्जी असलेली माणसे.
चिकूची अॅलर्जी असलेल्या एका परिचिताला रस्त्यात गप्पा मारता कोपऱ्यावरच्या ज्यूस बारमुळे अंगभर गांधी उठलेल्या मी पहिल्या आहेत. एकेकाळी भुताटकी-चेटकात जमा केल्या जाणाऱ्या अशा अतयं वाटणाऱ्या गोष्टी आता प्रयोगसिद्ध आहेत.
काही व्यक्तींच्या तासाभराच्या सहवासातच आपल्याला त्या नकोश्या वाटतात किंवा वरकरणी खास कारण नसताना भेटताक्षणीच आवडतात. एखाद्या चाळीतल्या बि-हाडातही आपल्याला उठून जाणे जिवावर येण्याइतके ‘बरे’ वाटते आणि एखाद्या तितकीच अगत्यशील माणसे असलेल्या प्रासादात ‘नको बुवा!’ वाटते.
या पार्श्वभूमीवर विचार केल्यास हे अगदी शक्य आहे. की एक किंवा एकाहून अधिक मरणोन्मुख रुग्ण त्या रुग्णालयात वेदनाग्रस्त, भीतिग्रस्त असतील आणि घामासारख्या त्यांच्या स्रावांतून निघालेले रेणू भोवतालच्या हवेत सूक्ष्म प्रमाणात का होईना, तात्पुरते विखरून-पसरून असतील. त्यांतल्या एखाद्या रुग्णाच्या उत्सर्गातल्या एखाद्या द्रव्याला त्यावेळी नजीक असलेली व्यक्ती संवेदनाक्षम असली तर त्यामुळे तिला अशा प्रकारचा भीतीचा अनुभव येणे अशक्य नाही.
अॅलर्जीप्रमाणेच असा संवेदना बऱ्याच प्रमाणात व्यक्तिविशिष्ट असतात. त्यामुळे त्याच ठिकाणी त्याच वेळेस तिच्याबरोबर दुसरी व्यक्ती असली तर तिलाही तो अनुभव येईल असे नाही. पद्मजालाही दुसऱ्या एखाद्या फेरीत आणि दुसऱ्या एखाद्या रुग्णामुळे असा अनुभव येणार नाही. अशा बोलाफुलाच्या गाठी किती वेळा पडणार ? तेव्हा असे अनुभव दुर्मिळ असतात यांतही आश्चर्य नाही. अशा अज्ञात विज्ञानाच्या आवाक्यात न आलेल्या अनुभवांमुळे लगेच विज्ञानाला मर्यादित, निरुपयोगी ठरवून त्याच्यावर फुली मारणे बरोबर नाही.
विज्ञान कधीच सर्वज्ञ असल्याचा आव आणत नाही. उलट, एखादी चूक सापडल्यास संपूर्ण शास्त्र पुन्हा तपासून पाहायची त्याची तयारी असते. संपूर्ण सत्य’ माणसाला कदाचित सापडणारही नाही, असं म्हणण्याइतकी नम्रता विज्ञानाकडे असते. तरी पाटा-वरवंट्यापासून मंगळावर स्वयंचलित यान पाठवण्यापर्यंत, अवयवांच्या रोपणांपर्यंत, क्लोनिंगपर्यंत वैज्ञानिक प्रगती केवळ पाचशे वर्षांत माणसाने साधली आहे. मानवजन्मापासूनच्या दोन लाख वर्षांत आता आतापर्यंत माणूस थोड्याफार फरकांनी प्राणिजीवनच जगत होता, हे पाहता आज अनाकलनीय वाटणाऱ्या अनुभवांचे काळजीपूर्वक संकलन करून त्यांच्या कारणमीमांसेचा शोध घेण्याचा उपक्रम माणसाने अखंड चालू ठेवायला हवा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.