विवेकवाद – भाग ३

(प्रथम प्रकाशन जून १९९० अंक १.३)

कर्मसिद्धान्त, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म
या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धान्त’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धान्तापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धान्तानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे. या युक्तिवादाचे आता परीक्षण करावयाचे आहे.

चार्वाकदर्शन सोडले तर सर्व भारतीय दर्शनांनी कर्मसिद्धान्त स्वीकारला आहे. त्याचे विवरणही थोड्याफार फरकाने सर्वांनी सारखेच केले आहे. कर्मसिद्धान्त हे भारतीय तत्त्वज्ञानाचे एक वैशिष्ट्य आहे. आपल्या या जन्मातील बऱ्यावाईट कर्मांची भलीबुरी फळे आपल्याला मरणोत्तर मिळतात हे मत अन्य धर्मांतही आढळते; पण ज्या यंत्रणेमार्फत हे घडते ती प्रत्येक धर्माची वेगळी आहे. भारतीयांची कर्मसिद्धान्ताची कल्पना अन्यत्र कोठेही आढळत नाही.

कर्मसिद्धान्त हा विश्वाचा एक नियम आहे असे येथे मानले आहे. आपल्या कर्मांना स्वभावतःच फळे येतात आणि ती कर्त्याला चाखावी लागतात अशा शब्दांत हा नियम सांगितला जातो. कर्मे चांगली किंवा वाईट असतात. चांगल्या कर्मांना मधुर फळे येतात (म्हणजे त्यामुळे कर्त्याला सुखकारक अनुभव मिळतो) आणि वाईट कर्मांना कटू फळे येतात (म्हणजे काला दुःखकारक अनुभवातून जावे लागते). कर्मांना फळे येतात हे कोणा ईश्वराचे किंवा अन्य शक्तीचे कार्य नव्हे. ते सृष्टीच्या नैसर्गिक क्रमाचा भाग आहे. कर्मांना फळे येणे हा कर्माचा स्वाभाविक धर्मच आहे. मनुष्यांच्या कर्मांचा हिशेब ठेवणारा कोणी चित्रगुप्त हे काम करीत नाही आणि त्यांच्या बरेवाईटपणानुसार त्यांचे योग्य फळ कोणी ईश्वर देत नाही. पाऊस पडला की जमीन भिजते किंवा आग लागली की तिच्यात सापडेल ते भस्मसात् होते, या गोष्टी जितक्या नैसर्गिकपणे, स्वाभाविकपणे घडतात, तितक्याच स्वाभाविकपणे कर्मांना फळे येतात, म्हणजे ती करणाऱ्याच्या वाट्याला सुखद, किंवा दुःखद अनुभव येतात.
कर्मांची फळे मधुर किंवा कटु असतात आणि मधुर फळे चांगल्या कर्मांना व कटु फळे वाईट कर्मांना येतात असे वर म्हटले आहे. कर्मांचे चांगली आणि वाईट हे विभाजन निसर्गसिद्ध आहे, मानवकृत नाही; म्हणजे जसे प्रकाश आणि अंधार, उष्णता आणि थंडी किंवा ओलेपणा आणि कोरडेपणा हे भेद नैसर्गिक आहेत, तसेच सत्कर्म आणि दुष्कर्म हा भेदही नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे आगीवर पाय पडला. (मग तो चकन का असेना). की तो भाजतो. त्याचप्रमाणे कोणतेही सत्कर्म केले की त्याला सुखरूप फळ येते आणि कोणतेही दुष्कर्म केले की त्याला दुःखरूप फळ येते. कोणा चेतन शक्तीला, नैतिक विवेक करू शकणाऱ्या शक्तीला, कर्माचे परीक्षण करून त्यांचा बरेवाईटपणा निश्चित करावा लागत नाही. आणि नीतीच्या नियमांप्रमाणे त्याची काय फळे द्यावीत हे ठरवावे लागत नाही. वाफेला थंडी लागली की पाऊस पडतो आणि ढगांमध्ये जर खूप वाफ असेल तर खूप पाऊस पडतो, पण हे कोणाला करावे लागत नाही, तसेच कर्मांच्या फळांचेही आहे. अचेतन वस्तू नीतिमान-अनीतिमान असू शकत नाहीत असे आपण मानतो; परंतु कर्मसिद्धान्तानुसार सबंध विश्व किंवा निसर्ग नीतिमान आहे असे म्हणावे लागेल. सत्कर्मांना चांगली फळे यावीत आणि दुष्कर्मांना वाईट फळे यावीत अशी नीतीची मागणी असते; परंतु कर्मसिद्धान्तानुसार हे निरपवादपणे, विश्वनियमांनी घडतच असते. सबंध विश्व नैतिक आहे; किंवा विश्वाचे नैतिक नियमन किंवा शासन होत असते असे हा नियम सांगतो.

पूर्वजन्म आणि पुनर्जन्म कर्मसिद्धान्ताचे उपसिद्धान्त
कर्मसिद्धान्ताचे परिणाम फार दूरगामी आहेत. जीवांचे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे कर्मसिद्धान्ताचे उपसिद्धान्त आहेत. आणि केवळ एखादा पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म नव्हे, तर जन्माची अनादि आणि अनंत परंपरा कर्मसिद्धान्तातून निष्पन्न होते. पूर्वजन्म सिद्ध होतो, कारण तो न मानला तर ‘अकृतस्य अभ्यागमः’ ही आपत्ती उद्भवते. आपल्याला भोगावी लागणारी सुखदुःखे आपण स्वकर्मांनी अर्जित, कमावलेली किंवा ओढवून घेतलेली असतात असे कर्मसिद्धान्ताचे प्रतिपादन आहे. आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात, एवढेच नव्हे तर आपल्याला भोगावी लागणारी सर्व फळे आपल्याच कृतकर्मांची असतात. अनर्जित असे कोणतेही सुखदुःख कोणाच्याही वाट्याला येत नाही. पण असे असेल तर ती जन्मजात सुखदुःखे आपल्या वाट्याला येतात, म्हणजे कोणतीही कर्मे करता येण्याआधीच जी सुखदुःखे आपल्याला भोगावी लागतात त्यांची संगती कशी लावणार ? ती सुखदुःखे आपल्या कोणत्या कर्मांची फळे असतात? म्हणजे न केलेल्या कर्मांना फळे आली (अकृतस्य अभ्यागमः) असे म्हणण्याची आपत्ती येते. तिच्यातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे पूर्वजन्म मानणे आणि आपल्याला जन्मतःच येणारे सुखदुःखानुभव पूर्वजन्मीच्या कर्मांची फळे आहेत असे म्हणणे. दुसऱ्या एका आपत्तीने पुनर्जन्म सिद्ध होतो ‘कृतस्य हानम्’. ‘कृतस्य हानम्’ म्हणजे कृतकर्मांचा नाश होणे किंवा त्यांना फळे न येणे. मानवांना त्यांच्या कर्माची फळे या जन्मात मिळतातच असे दिसत नाही. सज्जनांना अनेकदा भयानक दुःखे भोगावी लागतात आणि अनेक दुर्जन सुखाने कालक्रमणा करताना दिसतात. पुनर्जन्म न मानला तर मानवांची कर्मे विफल होतात, म्हणजे त्यांना फळ येत नाहीत असे मानावे लागेल. परंतु कर्मसिद्धान्तानुसार हे अशक्य आहे. म्हणून या जन्मी केलेल्या कर्मांची फळे चाखण्याकरिता पुढील जन्म मिळतो असे मानावे लागते. याप्रमाणे पूर्वजन्मातील कर्मांची फळे पुढील जन्मात मिळतात. या अनुरोधाने कर्मांचे तीन वर्गांत विभाजन केले जाते: (१) संचित, (२) प्रारब्ध आणि (३) क्रियमाण. यांचे स्वरूप पुढील-प्रमाणे आहे.

आपण पूर्वजन्मांत केलेल्या कर्मांचा एक संचय असतो. त्यात आपण वर्तमान जन्मात करीत असलेल्या कर्मांची सतत भर पडत असते. ही क्रियमाण कर्मे, म्हणजे केली जात असलेली कर्मे. त्या संचयातून ज्या कर्मांची फळे आपण वर्तमान जन्मात भोगत आहोत ती कर्मे वजा होत असतात. अशा कर्मांना प्रारब्ध कर्मे, म्हणजे ज्या कर्मांची फळे येण्यास आरंभ झाला आहे आणि जी आपल्याला वर्तमान जन्मात भोगायची आहेत अशी कर्मे, म्हणतात.

कर्मसिद्धान्ताविषयी एक बारकावा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्याला साहजिकच असे वाटेल की त्याचे क्षेत्र मानवी जीवनापुरते मर्यादित असते. पण असे मानणे चूक होईल, कारण केवळ मानवी जीवनच नव्हे, तर सबंध जग कर्माच्या नियमाने बांधले आहे आणि त्या नियमानुसार ते चालते. पण कोणाच्या कर्मांनी विश्व बांधले जाते? अर्थात् मानवांच्या. जगातील कोणतीही हालचाल कोणाच्या तरी कर्मावाचून होऊ शकत नाही. वारा वाहतो, पाऊस पडतो, सूर्यचंद्राचे उदयास्त होतात, हे सर्व कोणातरी काला (किंवा कर्त्यांना) त्यांनी केलेल्या कर्मांची फळे मिळावीत एवढ्याकरिताच घडते. चंद्र सुख देतो आणि सूर्य ताप देतो हे देखील आपल्या कर्मामुळेच. असे जर मानले नाही तर आपल्याला येणारे अनुभव, मिळणारी सुखदुःखे, अनर्जित आहेत असे मानावे लागेल.

कर्मसिद्धान्ताचे स्थूल स्वरूप कसे आहे ? त्याचे क्षेत्र किती व्यापक आहे ते आपण पाहिले. आता कर्मसिद्धान्त खरा आहे असे मानण्याकरिता काय पुरावा आहे तो पाहू. कर्मसिद्धान्त खरा कशावरून?

आपल्या कर्मांच्या ठिकाणी जन्मांतर घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे मानायला काय कारण आहे ? सबंध सृष्टी ही मानवांच्या त्यांच्या कर्मांची फळे देण्याकरिता निर्माण झाली आहे हे खरे कशावरून ? आपल्याला येणारा प्रत्येक अनुभव आपल्या स्वतःच्या कृतकर्माचे फळ असते, त्याचे कारण आपण स्वतः असतो या विधानाला पुरावा आहे काय ? सबंध विश्व नैतिक नियमांनी नियंत्रित आहे, विश्वाचे शासन नैतिक आहे या विधानाच्या समर्थनार्थ काही पुरावे देता येतील काय ? या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याच्या भानगडीत कोणी फारसे पडले नाही, आणि जे पडले त्यांनी दिलेली उत्तरे अगदी जुजबी, त्रोटक, अपुरी आणि असमाधानकारक आहेत. त्या उत्तरांचा आता क्रमाने विचार करू.

कर्मसिद्धान्ताचे साधक युक्तिवाद
कर्मसिद्धान्ताच्या समर्थनार्थ केला जाणारा सर्वसामान्य युक्तिवाद म्हणजे कारणाच्या नियमाचा हवाला. आपल्या सर्व कर्मांना फळे येतात हा नियम म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण असते असे प्रतिपादणारा प्रसिद्ध कारणाचा नियम असे म्हटले जाते. कारणाचा नियम हा सार्वत्रिक आणि निरपवाद असा नियम आहे असे आपण मानतो. तो स्वयंसिद्ध आहे असेही कोणी म्हणतील. कारणाशिवाय कार्य नाही आणि कार्यावाचून कारण नाही हा निसर्गातील घडामोडींचा नियम, आणि फळाशिवाय कर्म नाही आणि कर्माशिवाय फळ नाही हा कर्माचा नियम हे एकच आहेत. जर प्रत्येक गोष्टीला कारण असते हे आपल्याला मान्य असेल तर कर्मसिद्धान्तही मान्य करायला हवा असे म्हटले जाते.

परंतु येथे विचारांचा, कल्पनांचा एक प्रचंड गोंधळ आहे. विज्ञानातील कारणाचा नियम आणि कर्माचा नियम यांत कसलाही संबंध नाही हे बारकाईने विचार केल्यास आपल्या सहज लक्षात येऊ शकते.
१. पहिली गोष्ट म्हणजे कारणाचा नियम ‘प्रत्येक गोष्टीला कारण असते’ असा प्रतिपादला जात नसून तो ‘प्रत्येक घटनेला किंवा बदलाला (शीशपीं, लहरपसश) कारण असते’ असा प्रतिपादला जातो. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घटना यांत अतिशय महत्त्वाचा भेद आहे. घटना ही केव्हातरी, कोणत्यातरी क्षणी घडणारी गोष्ट असते, पण गोष्टींत घटनांप्रमाणेच वस्तूंचाही अंतर्भाव होतो.
२. दुसरे असे की कारणाच्या नियमात अभिप्रेत असलेली कार्येच तेवढी घटना असतात असे नव्हे, तर त्या घटनांची कारणेही घटनाच असतात. म्हणजे कोणतेही कार्य ही घटना असते आणि त्याचे कारण हीही एक घटनाच असते.
३. कारणे आणि कार्ये ही घटना असतात, तशीच कर्मेही घटनाच असतात कारण तीही विशिष्ट क्षणी घडतात. त्यामुळे कर्मांना फळे येतात या कर्मसिद्धान्ताच्या प्रतिपादनाला वरील गोष्ट बाधक नाही असे म्हटले जाईल. परंतु कारण-कार्यसंबंध आणि कर्म-फल-संबंध यांत फार मोठा भेद आहे. विज्ञानात अभिप्रेत असलेला कारणकार्यसंबंध हा एक ननैतिक संबंध आहे, परंतु कर्मे आणि त्यांची फळे यांतील कर्मसिद्धान्तात अभिप्रेत असलेला संबंध नैतिक आहे. कारणे किंवा कार्ये ही चांगली किंवा वाईट आहेत असे आपण म्हणत नाही; परंतु कर्मे मात्र चांगली किंवा वाईट असतात असे आपण समजतो. तसेच कर्मांच्या फळांत मधुर आणि कटु असा भेद कर्मसिद्धान्त करतो आणि चांगल्या कर्मांना मधुर फळे येतात आणि वाईट कर्मांना कटु फळे येतात असे तो मानतो आणि हे नैतिक दृष्ट्या योग्य आहे असेही मानतो. उलट वाफेला थंडी लागली की तिचे पाणी होते यात नैतिक इष्टानिष्टता आहे असे आपण मानत नाही. कारणाचा नियम हा पूर्णपणे ननैतिक आहे. परंतु कर्मसिद्धान्त हा पूर्णतः नैतिक आहे हे निर्विवाद आहे, आणि म्हणून कर्मसिद्धान्तात अभिप्रेत असलेला नियम आणि कारणाचा नियम हे एकच आहेत, किंवा एक दुसऱ्याचा उपसिद्धान्त आहे असे म्हणणे अतिशय ढोबळ चूक करणे होय. नीतीचे, नैतिक भेदांचे आकलन होण्याकरिता चेतना हवी आणि केवळ चेतनाच नव्हे तर प्रगल्भ बुद्धीही हवी. पशुंना चेतना असते, पण नीतीचे ज्ञान नसते, कारण त्याकरिता अवश्य असलेली बौद्धिक पातळी त्यांनी गाठलेली नसते. मानवाहून निम्न कोटीच्या कोणालाही नीतिकल्पनांचे आकलन नसते. भलेबुरे, चांगलेवाईट, युक्तायुक्त व कर्तव्यनिषिद्ध हे भेद जीवसृष्टीत फक्त मानवच करू शकतो. जीवेतर निसर्ग अचेतन असल्यामुळे तो ननैतिक आहे हे मान्य करावे लागते.

निसर्ग नैतिक नियमानुसार चालतो असे मानायचे झाले तर त्याकरिता बुद्धिमान आणि नीतिमान अशा एका किंवा अनेक पदार्थांची त्याच्यावर सत्ता चालते असे मानल्यावाचून ते करता येणार नाही. अशा पदार्थांच्या म्हणजे अर्थात् ईश्वराच्या मध्यस्थीशिवाय कर्मे स्वभावतःच फलभोग घडवितात आणि त्याकरिता पुनर्जन्म घडवून आणतात असे कर्मसिद्धान्ताचे विवरण करताना वर म्हटले होते. पण हे अशक्य दिसते. कारण कर्मसिद्धान्त जर निसर्गाचा नियम असेल तर निसर्गाची रचना आणि त्याची वाटचाल या दोन्ही गोष्टी नीतिमान ईश्वराच्या अधीन असल्यावाचून ते शक्य नाही. म्हणजे ईश्वर आहे, तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि नीतिमान आहे या गोष्टी खऱ्या असतील तरच तो निसर्गावर नैतिक नियमन ठेवू शकेल. म्हणून कर्मसिद्धान्त खरा हे सिद्ध करण्याकरिता ईश्वराचे अस्तित्व आणि त्याचे सर्वशक्तिमत्त्व, सर्वज्ञत्व आणि नीतिमत्त्व या गोष्टी अगोदर सिद्ध कराव्या लागतील. कारणाच्या नियमात हे काहीही अभिप्रेत नाही.

याप्रमाणे कारणाच्या नियमाचा कर्मसिद्धान्ताशी कसलाही दूरचादेखील संबंध नाही. तो सिद्धान्त खरा कशावरून? या प्रश्नाचे उत्तर अजून शोधायचे आहे.

एक उत्तर असे असू शकेल. मनुष्यांना त्यांच्या कर्मांचे योग्य किंवा न्याय्य फळ मिळाले पाहिजे अशी आपली अतिशय रास्त मागणी असते. मानवसमाजात आपण कायदे केले असून त्यांचा उपयोग दुष्कर्मे करणाऱ्यांना शासन करण्याकरिता आपण करतो. तसेच आपण सत्कर्मांबद्दल ती करणाऱ्यांची प्रशंसा करतो, आणि त्यांना पारितोषिकेही देतो. ही गोष्ट नैसर्गिकपणेच घडत असती तर किती बरे झाले असते असे आपल्याला साहजिकच वाटते आणि म्हणून तसे घडत असले पाहिजे असा निष्कर्ष काढण्याची आपली प्रवृत्ती असते. परंतु न्याय ही गोष्ट नैसर्गिक नाही. तो अतिशय दीर्घ काळानंतर समाजात प्रस्थापित झाला आहे, आणि अजूनही तो फारच थोड्या प्रमाणात प्रस्थापित झाला आहे. न्याय ही मानवाची निर्मिती आहे, आणि ती काही (म्हणजे ३-४) हजार वर्षांपूर्वीच फक्त निर्माण झाली आहे. त्याच्यापूर्वी न्याय-अन्याय हा भेदच अस्तित्वात नव्हता.

याप्रमाणे कर्मसिद्धान्ताच्या बाजूने वापरले जाणारे युक्तिवाद, दिली जाणारी प्रमाणे पाहिली. ती सर्व अतिशय दुर्बल, गैरलागू आहेत हे आपण पाहिले. म्हणज हा तथाकथित सिद्धान्त पूर्णपणे निराधार, केवळ कल्पित अशी गोष्ट आहे. त्याला बाधक काही गोष्टी आहेत काय ? या प्रश्नाला उत्तर आहे. ‘आहेत.’ त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:
१. कर्मसिद्धान्त अतिशय अन्यायकारक आहे. सत्कर्मांबद्दल बक्षीस आणि दुष्कर्मांबद्दल शिक्षा या कायद्यामुळे मिळते असे म्हटले जाते. पण कोणत्या सत्कर्माचे किंवा दुष्कर्माचे अमुक अनुभव फळ आहे हे पूर्णपणे अज्ञात असते. आपल्याला येणारे सुखकर अनुभव सत्कर्मांची फळे आहेत आणि दुःखकर अनुभव दुष्कर्माची फळे आहेत एवढेच आपल्याला सांगण्यात येते; परंतु ती सत्कर्मे कोणती आणि दुष्कर्मे कोणती हे आपल्याला कधीच कळत नाही. पण ही गोष्ट न्यायाच्या तत्त्वाच्या पूर्ण विरुद्ध आहे. अपराध्याला शिक्षा कोणत्या कर्माबद्दल दिली गेली आहे हे जर त्याला कळले नाही, तर ती कर्मे करणे तो कसे टाळणार ? आणि बक्षिसही कोणत्या सत्कृत्याबद्दल दिले गेले आहे हे कळले नाही तर तसे बक्षीस फिरून मिळावे म्हणून आपण काय करावे हे त्याला कसे कळणार ? आपले न्यायाधीश जर असा निवाडा करू लागले तर त्याला आपण न्याय म्हणणार नाही, अन्याय म्हणू. पशूलाही शिक्षा करताना त्याच्या हातून चूक झाल्याबरोबर त्याला शिक्षा दिली जाते; म्हणजे आपल्याला कशाबद्दल शिक्षा केली जात आहे हे त्याला कळते आणि त्या प्रकारची कर्मे तो नंतर टाळू शकतो. गेल्या आठवड्यात केलेल्या अपराधाबद्दल एखाद्या कुत्र्याला आज झोडपणे जितके असमंजस, अन्याय्य, अर्थहीन होईल तितका असमंजस, अन्याय्य आणि अर्थहीन कर्मसिद्धान्त आहे असे म्हणावे लागते. म्हणजे निसर्गाच्या ज्या नैतिक शासनाची आपण शेखी मिरवितो ते सर्वथा अन्याय्य आणि व्यर्थ आहे. भारतीयांच्या उत्कट नैतिकतेचा दाखला म्हणून आपण तिचा उदोउदो करतो याचा अर्थ आपल्या बुद्धीचे दिवाळे निघाले आहे हेच आपण सिद्ध करतो.
२. कर्मसिद्धान्तावर एक अतिशय गंभीर आक्षेप पुढील आहे. या सिद्धान्तानुसार मनुष्यांना त्यांच्या कर्मांची नैतिकदृष्ट्या योग्य किंवा उचित फळे मिळतात असे म्हटले जाते. परंतु नीतिकल्पना आणि नैतिक नियम स्थलकालसापेक्ष आहेत आणि त्यामुळे अनेक कर्मांच्या बाबतीत ती चांगली आहेत की वाईट याचा निर्णय करणे अशक्य असते. भिन्न नीतिसंहितानुसार एकच कर्म चांगले, वाईट किंवा क्षम्य, किंवा विहित, निषिद्ध किंवा अनुज्ञेय आहे असे निर्णय निघू शकतात. कर्मसिद्धान्ताचा व्यवहार ज्या नीतिसंहितेनुसार होतो ती कोणती हे सांगता येत नाही. त्यामुळे जरी मनुष्याने सदाचाराने वागावे असे ठरविले तरी सदाचार म्हणजे कोणता आचार ते माहीत नसल्याने त्याला तसे करता येणार नाही.
शिवाय हा कर्मसिद्धान्त अनादि काळापासून (निदान सृष्टी निर्माण झाल्यापासून) चालत आला आहे असे म्हणावे लागेल. अशा अनादि सिद्धान्ताला कोठली तरी नित्य, सनातन अशीच नीती अभिप्रेत असली पाहिजे. परंतु मानवाचा जेव्हा नुकताच जन्म झाला म्हणजे माकडाचा जेव्हा माणूस झाला, तेव्हा आणि त्यानंतर हजारो वर्षे त्याच्या ठिकाणी नैतिक विवेक-शक्ती निर्माण
झाली नव्हती. ती जेव्हा झाली तेव्हा ती अतिशय हळूहळू झाली आणि तिला पुरेसे प्रगल्भ स्वरूप येण्याकरिता हजारो वर्षे लागली. अजूनही माणसातील पशू मोठ्या प्रमाणात कायम आहे आणि त्याचे वर्तन पाशवी स्तरावरच घडते. या सगळ्या गोष्टींचा कर्मसिद्धान्ताशी मेळ कसा घालता येणार?
३. कर्मसिद्धान्ताचा एक मोठा दोष असा आहे की त्याच्यामुळे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेली प्रत्येक सामाजिक अवस्था योग्य आहे, उचित आहे असे म्हणता येते आणि जीवनातील अशिव नाहीसे करण्याची प्रेरणाच नाहीशी होते. आपल्याला भोगावे लागणारे सर्व अनुभव स्वार्जित आहेत हे एकदा मान्य केले की त्यांच्याबद्दल तक्रार करता येत नाही. ते न्याय्यच आहेत असे म्हणावे लागते. ज्याला आपण अन्याय म्हणतो तोही व्यापक अर्थाने न्यायच आहे असे म्हणता येते. त्यामुळे जीवनात जे अशिव आढळते, उदा. भयानक दुःख, दारिद्र्य, दुष्टाचार, भ्रष्टाचार इत्यादि, त्याला कशालाच नाव ठेवायला जागा राहात नाही. एकतर ही अशिवे ज्यांच्या वाट्याला येतात त्यांना ती आपल्या पूर्वकर्मांची योग्य फळे आहेत असे पटल्यामुळे ती गैर मानता येत नाहीत; आणि जे अन्याय करणारे आहेत त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांचे फळ पुढील जन्मात मिळणार आहेच, त्यामुळे त्यांना दंड देण्याचे काम आपले नाही असे म्हणावे लागते. या तत्त्वज्ञानातून खरे तर मानवाच्या हातून उपक्रमशीलता हिरावून घेतली जाते आणि तिची जागा केवळ उदासीन निष्क्रियता घेते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.