भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग १)

प्रास्ताविक
आजच्या समाजव्यवस्थेला लागलेला सर्वांत भयंकर रोग म्हणजे ‘भ्रष्टाचार’ होय. भ्रष्टाचारावर सर्वचजण बोलत-लिहीत असतात. परंतु भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती आहेत व त्यांचा बीमोड करता येईल काय, त्यासाठी कोणता ठोस कार्यक्रम हाती घेता येईल, याचे फारसे विश्लेषण सामान्य माणूसही करीत नाही. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाविषयी स्वप्नाळू व आदर्शवादी कल्पनांना कठोर वास्तवाचा आधार नसल्याने त्यांचा भ्रष्टाचार-निर्मूलनाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. मी भ्रष्टाचाराचे स्वरूप, कारणे, परिणाम व त्याच्या निर्मूलनाचे उपाय यावर चर्चा करणार आहे. या चर्चेत वाचकांनीही सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा व अपेक्षा आहे. त्यातून चर्चेत परिपक्वता येऊ शकेल. चर्चेतून भ्रष्टाचारविरोधी जाणिवेने एखादे ठोस स्वरूप धारण केले तर प्रस्तुत लेखाचा उद्देश सफल होईल. अशा चर्चा करायची इच्छा जरी झाली तरी उद्देशाच्या दिशेने एक पाऊल पडले, असे मी समजेन.

भ्रष्टाचाराचे स्वरूप:
अनेक उदाहरणांतून आपण भ्रष्टाचाराच्या स्वरूपाचे आकलन करून घेऊ शकतो.
‘भ्रष्टाचार’ ही संज्ञा सामान्यतः लाचखाऊ प्रवृत्तीशी जोडली जाते. Corruption या इंग्रजी शब्दाचा मराठी अनुवाद म्हणजे ‘भ्रष्टाचार’. Corruption या शब्दाला अत्यंत व्यापक अर्थ असून त्याद्वारे moral deterioration (नैतिक हास), use of corrupt practices, especially bribery or fraud, (भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणे), irregular alteration of text, language etc. from its original state (मजकूर, भाषा इ.मधील अनियमित फेरफार), rot (कुजणे) वशलरू (क्षय), यासारखे व्यापक अर्थ दर्शविले जातात. मराठीतही ‘भ्रष्टाचार’ या शब्दाद्वारे व्यक्ती व संघटना यांची एकंदर आचारभ्रष्टता सूचित होते.
Prevention of Corruption Act, १९८८ या कायद्यात corruption या शब्दाची व्याख्या आढळत नाही. त्यामध्ये corruption चा संबंध लाचखाऊपणाशीच जोडल्याचे दिसून येते. परंतु त्यामधील लाच किंवा बक्षिशी ही केवळ पैशाच्याच स्वरूपातील नसून त्यात इतर कोणत्याही स्वरूपाच्या बक्षिशीचा (सीरीळषळलरींळेप) समावेश होतो. या कायद्याची कलमे भ्रष्टाचाराचे एकंदर रूप स्पष्ट करायचा प्रयत्न करतात. दैनंदिन प्रशासकीय व्यवहारात भ्रष्टाचार खालील स्वरूपात व्यक्त होताना दिसतो. कायदेशीर मोबदल्याशिवाय लाच किंवा बक्षिसी स्वीकारून किंवा मिळवून किंवा घेण्याचे मान्य करून किंवा पैसे हवे असल्याचे सूचित करून कामे केली जातात किंवा करण्याचे मान्य केले जाते किंवा त्या दिशेने प्रयत्न केला जातो.
क) लाचेच्या आशेने, विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तींना खूष करण्याच्या उद्देशाने तिची किंवा त्यांची १) कायदेशीर परंतु गुंतागुंतीची कामे, इतरांची कामे बाजूला ठेवून, प्राधान्याने व त्वरित पूर्ण करणे २) बेकायदेशीर कामे करणे; जसे बोगस डॉक्युमेंट्स तयार करून देणे, अनधिकृत कामांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना मान्यता देणे. ३) कराची चोरी दुर्लक्षित करणे किंवा चुकीच्या निर्धारणा करून करचुकवेगिरीला मदत करणे. ४) समान न्यायाचे तत्त्व न पाळता नोकऱ्या देणे. ५) ठराविक व्यक्तीला किंवा व्यक्तींना हव्या त्या पदावर व हव्या तेव्हा बदल्या किंवा बढत्या देणे. ख) कागदपत्रांत हवा तसा फेरफार करून किंवा बोगस डॉक्युमेंट्स तयार करून सार्वजनिक कामांसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचा अपहार करणे. ग) पदाची ओळख दाखवून स्वतःची कामे करून घेणे. उदा. कर अधिकाऱ्याने कमी पैसे देऊन किंवा मुळीच न देता व्यापाऱ्याकडून वस्तू मिळविणे. घ) ज्यांच्याशी कार्यालयीन कामाच्या निमित्ताने संबंध येण्याची शक्यता आहे किंवा आलेला आहे, त्यांच्याकडून भेटी किंवा कोणत्याही मूल्यवान वस्तू स्वीकारणे. च) सरकारी साधनसाहित्याचा गैरवापर करणे. छ) कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केलेली असणे. ज) कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय पैशाचा अपहार करणे. झ) लाच न देणाऱ्यांची कायदेशीर कामेही न करणे किंवा विलंबाने करणे किंवा योग्यप्रकारे न करणे.
वरील सर्व प्रकार पैसे मिळविण्याच्या आशेने होतात. परंतु शासकीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ न देणे, अनधिकृतपणे गैरहजर राहणे, कार्यालयात उशीरा येणे किंवा लवकर जाणे, कार्यालयात कार्यालयीन कामांऐवजी दुसरीच कामे करणे, या प्रकारांचाही समावेश व्यापक अर्थाने भ्रष्टाचारात होण्याची आवश्यकता आहे. कारण यामुळे कामे होत नाहीत किंवा विलंबाने होतात किंवा योग्य प्रकारे होत नाहीत, परंतु कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वेतनावर व प्रशासनावर खर्च होत राहतो. भ्रष्टाचाराचा हा प्रकारही अतिशय घातक असून तो गंभीरपणे घ्यायला हवा.
भ्रष्टाचाराचा एक विशेष लक्षात घ्यायला हवा. एखाद्याला शासनातून काही बेकायदेशीर गोष्टी करून घ्यायच्या असतील तर ‘लाच देणे’ हे देणाऱ्याच्या फायद्याचे ठरते. अशा प्रकरणी लाच देणारा व ती घेणारा यांच्यामध्ये संगनमत असते. त्यामुळे अशा भ्रष्टाचाराचा बोभाटा होत नाही. कर-विभागातील भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर या स्वरूपाचा आढळतो.
कार्यपद्धती गुंतागुंतीच्या असल्याने किंवा त्यांच्याविषयी अज्ञान असल्याने कायदेशीर कामेही वेळेत होत नाहीत किंवा केली जात नाहीत. त्यामुळे सामान्य माणूस लाच द्यायला प्रवृत्त होतो. या प्रकारात नियमितता आली की, हे सर्व सामान्य माणसाच्या व लाच घेणाऱ्याच्या अंगवळणी पडते, व कामे त्याच ‘पद्धतीने’ होतात. वरील वास्तव लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल.

भ्रष्टाचाराची कारणे
भ्रष्टाचार हा मानवी समाजात प्राचीन काळापासूनअसल्याचे सिद्ध झालेले आहे. आधुनिक काळात त्याने अधिकच उग्र स्वरूप धारण केले आहे. आजच्या समाजाचे जटिल स्वरूप त्याला कारणीभूत आहे. कारणपरंपरा क्लिष्ट स्वरूपाची असल्याने कोणते कारण किती प्रमाणात भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरते, हे सांगणे सोपे नाही. स्थूलमानानेच चर्चा करावी लागते.
अ) औद्योगिकीकरण
औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या अर्थव्यवस्थेत मूलगामी परिवर्तन घडून आलेले आहे. जुन्या मूल्यांची जागा आधुनिक मूल्यांनी घेतलेली आहे. स्वातंत्र्याच्या कल्पना बदलल्या आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याचा विकास व त्याचे महत्त्व वाढले आहे. जुनी संयुक्त कुटुंबव्यवस्था जाऊन विभक्त कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. परस्परावलंबित्वात असलेली भावनिकता जाऊन त्या जागी व्यावहारिकता आलेली आहे. अनौपचारिकतेची जागा कोरड्या औपचारिकतेने घेतलेली आहे.
औद्योगिकीकरणाचा एक मोठा परिणाम संयुक्त कुटुंबव्यवस्थेच्या विघटनाच्या रूपाने समोर आला. रोजगाराच्या उद्देशाने लोक मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतरित झाले. त्यामुळे संयुक्त कुटुंबाचे विघटन झाले. विकास व आर्थिक स्वावलंबन या बाबीही कुटुंबविघटनासाठी साहाय्यक ठरल्या. विभक्त कुटुंबामुळे व्यक्तीला स्वातंत्र्याचा अनुभव आला, व त्याचबरोबर असुरक्षिततेची भावनाही निर्माण झाली. या असुरक्षिततेच्या भावनेतूनच व्यक्तीमध्ये कुटंबासाठी व वारसांसाठी संपत्ती जमविण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. अशी संपत्ती वैध मार्गाने जमविता येत नसेल तर ती अवैध मार्गानेही जमविण्याचा प्रयत्न होत गेला. यासाठी एक मार्ग म्हणून भ्रष्टाचाराचा अवलंब करण्यात आला.
औद्योगिकीकरणामुळे व विज्ञान-तंत्रज्ञानातील क्रांतिकारक प्रगतीमुळे मानवाला कष्ट कमी करून सुख-समाधानासाठी उपयुक्त ठरणारी विविध साधने निर्माण झाली. ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे, त्यांनाच ही साधने उपलब्ध होऊ शकतात. ती साधने मिळविण्याची माणसांना अनिवार इच्छा होते. या इच्छापूर्तीसाठी पैसा मिळविणे अपरिहार्य ठरते. पैसा कुठूनही व कोणत्याही मार्गाने मिळविलेला असला तरी त्याच्या साहाय्याने सर्व सुख-साधने मिळविता येतात, हे एकदा स्पष्ट झाले की पैसा मिळविण्याच्या मार्गाची शुचिता दुय्यम ठरते आणि त्यातूनच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते. ब) नवउच्चवर्गीय भावना भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप स्पष्ट करताना सांस्कृतिकीकरण पाश्चात्त्यीकरण व आधुनिकीकरण या संकल्पना वापरल्या जातात.
भारतातील ब्राह्मण हा उच्चवर्ग किंवा गट हा इतर वर्गांसाठी आदर्श गट ठरत असे. त्यामुळे त्याची भाषा, वेशभूषा, बोलण्याच्या पद्धती इ. बाबींचे इतर गट अनुकरण करीत असत. आणि त्यातूनच काही प्रमाणात सामाजिक परिवर्तन घडून येत असे. यालाच सांस्कृतिकीकरण असे म्हटले जाते. इंग्रज लोकांचा भारतात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च गटाचे स्थान प्राप्त केले व हा गट अनुकरणीय असा संदर्भगट (Reference Group) ठरला. यासाठी पाश्चात्त्यीकरण ही संकल्पना वापरली जाते. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जुनी मूल्यव्यवस्था जाऊन नवीन मूल्यव्यवस्था अस्तित्वात आली. या नवीन मूल्यव्यवस्थेच्या स्वीकारामुळे लक्षणीय सामाजिक परिवर्तन घडून आले. सदर परिवर्तन ‘आधुनिकीकरण’ या संज्ञेने स्पष्ट केले जाते.
आज भारतीय समाजात झटकन श्रीमंत झालेला एक नवीन उच्चवर्ग (New Upper Class) अस्तित्वात आलेला आहे. भारी गाड्या उडविणे, नियमितपणे क्लबला जाणे, ओल्या पाटा झोडणे, नियमितपणे फार्महाउसवर जाणे, वर्षातून एकदा तरी परदेशवारी करणे, बारमध्ये जाणे, पार्थ्यांतून पत्नीसह मद्यसेवन करणे, या बाबी या उच्चवर्गाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी पुरेशा आहेत. ज्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे, अशा मध्यमवर्गीयांना या उच्चवर्गाचे आकर्षण निर्माण झालेले आहे. हा गट या मध्यमवर्गीयांचा आदर्श गट ठरत आहे. या आदर्श गटाचे अनुकरण करून मध्यमवर्गीयांना स्वतःही या उच्च वर्गात समाविष्ट होण्याची उत्कट इच्छा आहे. आणि त्यासाठी ते तसा प्रयत्नही करायला लागत आहेत. यातूनच या मध्यमवर्गीयांच्यामध्ये एक विलक्षण परिवर्तन घडून येत आहे. संपूर्ण मध्यम वर्ग याचा बळी होत नसला तरी त्याचा विशिष्ट भाग या गोष्टीला बळी पडतो. या प्रकारच्या परिवर्तनाला आपण ‘उच्च वर्गीभवन’ या संज्ञेने संबोधायला हरकत नाही. पण ह्यासाठी ‘मुबलक’ पैसा हवा आहे, व तो कमी कष्टात मिळाला पाहिजे. तो कोणत्याही मार्गाने मिळाला तरी चालण्यासारखे आहे. भ्रष्टाचार हा कमी वेळात व मुबलक पैसा मिळविण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. केवळ पैशालाच महत्त्व असल्याने, तो कोणत्या मार्गाने मिळाला हे महत्त्वाचे ठरत नाही. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची संधी मिळते ते लोक स्वतःचे ‘उच्च वर्गीभवन’ घडवून आणतात.
(क्रमशः पुढील अंकात)

११०१, बी-१/रेखा, कोरस टॉवर्स, वर्तकनगर, ठाणे (प.)

अभिप्राय 6

  • thanku so much khup chhan information dili. Tumch YouTube channel ahe ka.

  • Thanku so much khup chhan mahit ddili.Tumch you tube chhanel ahe ka

  • मान्य आहे की भ्रष्टाचार बंदी आहे मग गैरमामार्गाने जे लोकं सध्या पदावर कार्यरत आहेत त्यांना बरखास्त करून पूर्ण भारतातुन भ्रष्टाचार बंदी करा केली पाहिजे

  • मला असं वाटतं की भ्रष्टाचार हा नैतिक मूल्यांच्या अभावामुळे होतो. कुठेतरी नैतिक मूल्ये कमी पडल्याने किंवा त्याचा अर्थ न समजल्यामुळे भ्रष्टाचार होतो.

    • आपण आगामी अंकात नैतिक मूल्यांविषयी बोलणार आहोत. आपल्या home page वरील आवाहन बघा. आणि जमणार असेल तर काही लिहून पाठवा. भ्रष्टाचाराविषयी आपण जे लिहिले ते १०० टक्के सत्य आहे.

  • नैतिक मूल्यांच्या कमतरतेमुळे भ्रष्टचार यांसारख्या गोष्टी बघायला मिळत आहेत . भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोठी शिक्षा व्हायला हवी, त्यामुळे शिक्षेला घाबरून तरी भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल आणि भारत भ्रष्टाचार मुक्त होईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.