भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग २)

क) पैशाचे साध्यमूल्य
साधारणतः पैशाचे साधनमूल्य म्हणून असलेले महत्त्व सर्वच जण स्वीकारतात. तथापि एकदा पैसा मिळविण्यास सुरुवात केली की, त्याचे एक विलक्षण असे आकर्षण निर्माण होते. आणि साधनमूल्य विसरून त्याला साध्याचे स्थान येते. पैसा हेच साध्य ठरल्यावर तो किती व कसा मिळवायचा याला मर्यादा राहत नाहीत. यामुळेच ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असे लोकही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा अवलंब करीत असताना दिसतात. म्हणून मंत्री, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या स्तरावर भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे आपणास दिसून येते. ड) आर्थिक आवश्यकता या उच्चवर्गाबरोबरच कनिष्ठ वर्गातही छोट्यामोठ्या स्वरूपात होणारा भ्रष्टाचार आपणास दिसून येतो. खरे तर सामान्य माणसाला हा भ्रष्टाचारच सतत दिसून येत असतो. उत्तरोत्तर महाग होत जाणारे शिक्षण, आरोग्य आणि एकूणच वाढत जाणारी महागाई ही कनिष्ठ वर्गाला मिळणाऱ्या वेतनाशी मुळीच सुसंगत नाही. महागाईमुळे वाढती आर्थिक गरज व मिळणारे वेतन यातील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न भ्रष्टाचाराच्या माध्यमातून होत असतो. धोरण निर्माते मात्र याकडे गांभीर्याने बघत नाहीत. कधीकधी तर असेही वाटते की, धोरण निर्मात्यांना ‘कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना आम्ही विशिष्ट वेतन देतो. बाकी आवश्यक असणारा पैसा त्यांनी कोणत्याही मार्गाने प्राप्त करावा. तो अशा प्रकरणात पकडला जाईपर्यंत आमची त्याला हरकत नाही’, हेच अभिप्रेत असावे.
अपुऱ्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांसाठी ‘भ्रष्टाचार’ ही एक आवश्यकता बनत चालली आहे. लाच देणे-घेणे यात दोन्हीही बाजूंना काहीही गैर वाटत नाही. वरिष्ठ पातळीवरच जर भ्रष्टाचार सामान्य बाब झाली असेल तर कनिष्ठ पातळीवर ती झिरपणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. खरे तर वरिष्ठ स्तरावरील लोकच भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्यामुळे त्यांना कनिष्ठ स्तरावरील लोकांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी नैतिक बळच उरलेले नाही. वरिष्ट व कनिष्ठ स्तरांवरील लोकसेवकांच्या अलिखित संगनमतामुळे भ्रष्टाचाराचे अस्तित्व व त्यातील वाढ अबाधितपणे चालू राहते. इ) सडलेली समाजव्यवस्था आजच्या समाजासाठी कुठलेही आदर्श अस्तित्वात नाहीत. कोणत्या प्रसंगात कसे वागावे याचे मार्गदर्शन करणारी व नैतिक शक्ती असणारी व्यक्तित्वे नाहीत. एकंदर मूल्यव्यवस्थेतच मोठी विकृती निर्माण झाल्याचे दिसून येते. सोयीची तत्त्वज्ञाने व तकलादू समर्थने पुढे येतात. नीतिमान माणसांना नीतीने वागण्याची प्रोत्साहने नाहीत. अशी माणसे आज एकाकी पडताना दिसत आहेत. कर्तृत्व, सामर्थ्य, साहस यांचे अर्थ विकृत बनलेले आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे, मग त्याने तो कसाही मिळविलेला असो, त्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. असा मनुष्यच गुणवान, कर्तृत्ववान व साहसी समजला जातो. तसे पाहिले तर पैशाला पूर्वीपासूनच महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच भर्तृहरीने ‘सर्वेगुणाः कांचनमाश्रयन्ते ।’ अर्थात सर्व गुण सोन्याच्या आधाराने राहतात, असे म्हटलेले आहे. धनाला व धनवानाला या प्रकारचे मोठेपण प्राप्त झाल्यामुळे धनवानांच्या भ्रष्टाचारी कृत्याकडे समाज डोळेझाक करतो. त्याला संधी आहे म्हणजे तो भ्रष्टाचार करणारच, अशी सामान्य माणसाची भूमिका आढळून येते. भ्रष्टाचार करून मिळविलेल्या पैशालाही महत्त्व मिळाल्यामुळे भ्रष्टाचारी व्यक्तीला भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहनच मिळते. ई) भ्रष्टाचारातील संगनमत भ्रष्टाचारी व्यक्तीला भ्रष्टाचारातून पैसा मिळतो म्हणून तो भ्रष्टाचार करतो. परंतु लाच देणाराचाही लाच देण्यात फायदाच होत असतो. कारण त्याला भ्रष्टाचारी व्यक्तींकडून आपली बेकायदेशीर कामे करून घ्यायची असतात. या प्रकारच्या भ्रष्टाचारात उभय बाजूंचा फायदा असल्याने तो शक्यतोवर बाहेरही येत नाही. जरी असा भ्रष्टाचार उघडकीस आला तरी फारसे भिण्याचे कारण नसते. कारण अशा भ्रष्टाचारातून मिळविलेल्या पैशातूनच अशी प्रकरणे मिटविता येतात. कारण वरच्या स्तरावरही याच लायकीची मंडळी बसलेली असतात. सामान्य माणसालाही याचा प्रत्यक्ष फटका बसत नसल्याने असा भ्रष्टाचार सुखेनैव चालू राहतो. फ) गुंतागुंतीची कार्यपद्धती लाच देणारा लाच देऊन आपली बेकायदेशीर कामे करून घेत असतो. परंतु सामान्य माणसाला त्याची कायदेशीर कामे करून घेण्यासाठीसुद्धा लाच द्यावी लागते. कारण कायदेशीर कामे गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे वेळखाऊ असतात किंवा तशी असल्याची भासवली जातात. विविध प्रकारचे क्लिष्ट फॉर्मे, विविध प्रकारची डॉक्युमेंट्स, कामाचे विविध टप्पे व प्रक्रिया आणि त्याविषयी असलेले अज्ञान यामुळे सामान्य माणूस वैतागून जातो. या वेगवान व व्यग्र युगात त्याला आपली कामे त्वरित करून हवी असतात. आणि त्यामुळे तो लाच द्यायला प्रवृत्त होतो. हा प्रकार सातत्याने घडू लागल्यावर लोकसेवकांना ‘लाच’ हा हक्क वाटतो. त्याचप्रमाणे लाच देणाऱ्याच्याही ते अंगवळणी पडते. आणि त्यातूनच ‘लाच देणे’ हे एक नियमित ‘सामाजिक वर्तन’ बिनबोभाट चालू राहते. भ्रष्टाचाराचे परिणाम
भ्रष्टाचाराच्या ह्या भयानक रोगाचे परिणाम विभिन्न स्वरूपात पुढे येतात.
अ) वैफल्यग्रस्तता व सामाजिक असंतोष
भ्रष्टाचाराचे परिणाम हे निर्धन, प्रामाणिक लोकांच्या बाबतीत प्रामुख्याने दिसून येतात. भ्रष्टाचारी लोकांना द्यायला पैसा नसल्यामुळे किंवा तो द्यायची तयारी नसल्याने निर्धन व प्रामाणिक लोकांची कायदेशीर कामेही वेळेवर होत नाहीत. अधिक गुणवत्ता असूनही सधन लोक लाच देऊन निर्धन व प्रामाणिक लोकांचे हक्क लाटतात. त्यातूनच निर्धन प्रामाणिक लोकांत वैफल्यग्रस्तता निर्माण होते व त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडून जातो. समाजावर होणारा याचा परिणाम अत्यंत घातक ठरू शकतो. पैसा फेकला की कोणतेही काम अडत नाही. मग ते कायद्यानुसार, नियमानुसार नसले तरी चालते, फक्त तुमच्याकडे पैसा फेकण्याची क्षमता किंवा तयारी पाहिजे. जो पैसा देऊ शकत नाही किंवा देऊ इच्छित नाही, त्याची कायदेशीर कामेही वेळेवर होत नाहीत हे आपण नित्य अनुभवत असतो. यामुळे प्रामाणिक माणसे निश्चितपणे वैफल्यग्रस्त होतात. प्रामाणिकतेने कशासाठी पश वागायचे, हा प्रश्न निर्माण होतो. प्रामाणिक व्यक्तीलाही अप्रामाणिकतेकडे झुकविण्याचा प्रयत्न सध्याची व्यवस्था करीत आहे. हे सर्व अत्यंत उद्वेगजनक आहे. वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे कायदा, नियम, संकेत, सर्वांना समान न्याय हे फक्त पुस्तकात लिहिण्यापुरते राहिलेले आहे. कायदे, नियम हे फक्त गरिबांसाठीच असतात, याचा भीषण अनुभव समाज घेत आहे. कायदे, नियम बनविणारेच जेव्हा ते मोडतात तेव्हा सामान्य माणसांनी विश्वास तरी कोणावर ठेवावा ? या प्रक्रियेतून अराजक निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. विचारवंत या स्थितीकडे गंभीरपणे पाहतात, असा प्रत्यय आज येत नाही. ही अराजकता व्यवस्थेचाही घात करील.
भ्रष्टाचारातून प्राप्त झालेला पैसा भ्रष्टाचारी व्यक्तीची वित्तेषणा (धनेच्छा) अधिकच भडकावितो आणि ती अधिकच भ्रष्टाचार करू लागते. भ्रष्टाचारातून मिळविलेला पैसा अधिक पैसा मिळविण्यासाठी खर्च होतो. भ्रष्टाचारी अधिकच श्रीमंत होत जातो व गरीब तिथल्या तिथेच राहतो. याला समाजातील भ्रष्टाचाराची प्रवृत्ती हेही एक महत्त्वाचे कारण आहे. अशी दरी निर्माण होणे, हे निरोगी समाजव्यवस्थेचे लक्षण नाही, हे सर्वांना मान्य होईलच. हे नाहीरे व आहेरे वर्गांतील संघर्षाला कारणीभूत ठरू शकते. ब) शासकीय योजनांचे अपयश गरिबांसाठी, मजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबविते. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, फळबाग योजना, पाणी अडवा-पाणी जिरवा योजना, गरीब-मागासवर्गीयांसाठी वसतिगृहे चालविणे, सार्वजनिक बांधकामे करणे इ. या योजना प्रामाणिकपणे, कार्यक्षमरीत्या व परिणामकारकतेने राबविल्यास त्यांचा समाजावर चांगला परिणाम होईल. त्यात मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते. या पैशांच्या आकर्षणाने भ्रष्टाचाराला सुरुवात होते. शासकीय पैशांचा फार मोठा हिस्सा योजना राबविणाऱ्यांच्या खिशात जातो. त्यामुळे त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. भ्रष्टाचारामुळे शासकीय योजना अपयशी होतात, हे धोरण निर्मात्यांना माहीत असते. परंतु योजनांच्या उद्दिष्टांशी कोणाला देणे घेणे नसते.
शासकीय योजनांतील किंवा कामांतील कंत्राटदार व नोकरशहा यांचे संगनमत आपल्या परिचयाचे झालेले आहे. कंत्राटांसाठी नेमून दिलेल्या पैशातील फार मोठा हिस्सा हा नोकरशहा व कंत्राटदार यांच्या खिशात जात असल्याने कंत्राटावरील प्रत्यक्ष खर्च होत नाही. कंत्राटाची गुणवत्ता व परिणामकारकता लक्षणीय प्रमाणात घटते. अशा कंत्राटांद्वारे केलेली विविध कामे नियत कालावधीच्या आत कोसळतात. एखादी इमारत किंवा पूल नियत वयोमानाच्या आत कोसळणे, ही समाजावरील एक आपत्तीच ठरते. एखादी इमारत कोसळून बळी जाणे, याचा काहीही परिणाम या संवेदनशून्य लोकांवर होत नाही. कंत्राटे बांधकामांची असोत नाही तर गरीब-मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील अन्नपुरवठ्याची असोत, सर्वत्र हाच अनुभव येताना दिसतो. भ्रष्टाचाराचे हे स्वरूप हानिकारक ठरत असते. क) सामाजिक आपत्ती पैशाच्या अतीव आकर्षणामुळे भ्रष्टाचारी व्यक्तींच्या संवेदना बोथट झाल्याचे अनुभव सर्वत्र येतात. भ्रष्टाचाऱ्यांच्या दृष्टीने स्वतःच्या फायद्यापुढे मानवी जीवनाचे मोल उरत नाही. जसे खते-रसायने इ. उद्योगांत उपयुक्त असलेला नाफ्ता हा पेट्रोल-डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी वापरला जातो. स्वतःचा पुरेपूर फायदा करून घेऊन नोकरशहा या प्रकारांकडे डोळेझाक करतात. पेट्रोल-डिझेलमधील या भेसळीमुळे होणारे प्रदूषण मानवी आरोग्याला अत्यंत घातक आहे, हे सर्वजण जाणतातच. याचे परिणाम त्वरित जाणवत नसले तरी ते आरोग्याला अत्यंत हानिकारक आहेत.
दुसरे उदाहरण औषधातील भेसळीचे व बोगस ओषधांचे देता येईल. मानवी आजार बरा करण्याऐवजी मानवी जीवनाला मारक असा हा प्रकार अतिशय उद्वेगजनक आहे. स्वतःवर किंवा आपल्या जवळच्या माणसांवर याचा प्रत्यक्ष परिणाम होईपर्यंत हे आपल्या लक्षात येणार नाही
काय?
वरील उदाहरणावरून भ्रष्टाचार ही एक सामाजिक आपत्ती असून तिचे नियंत्रण आता आवश्यक झालेले आहे. ड) समांतर अर्थव्यवस्था
भ्रष्टाचाराची व्याप्ती आज प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे. भ्रष्टाचाराने आपली एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण केलेली आहे. देशातील फार मोठा पैसा या अर्थव्यवस्थेत अडकून पडलेला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रयत्नांना या पैशाचे योगदान लाभत नाही. सरकार हा पैसा बाहेर काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न करते, परंतु त्या प्रयत्नांना हवे तसे यश मिळत नाही. या पैशाचा देशाच्या आर्थिक विकासाला लाभ झाला तर देशाचे आर्थिक चित्र वेगळे दिसेल. या समांतर अर्थव्यवस्थेमुळे देशाच्या पंचवार्षिक योजना व अंदाजपत्रकीय कार्यक्रम यावर विपरीत परिणाम होतो. इ) शासकीय संघटनेतील अव्यवस्था बदल्या व बढत्यांच्या क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराने आता उग्र स्वरूप धारण केलेले आहे. विशिष्ट ठिकाणी बदली व्हावी यासाठी अधिकारी-कर्मचारी साम, दाम, दंड व भेद या सर्वांचा वापर करीत आहेत. त्यातही दामाचा प्रभाव अतिशय मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. उमेदवार जास्त व मोक्याच्या जागा कमी यामुळे स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे दामाची ही उलाढाल उत्तरोत्तर वाढत असल्याचे दिसते. या स्पर्धेतून संघर्ष वाढत असून त्याला आवर घालण्याऐवजी वरिष्ठ स्तरावरील लोक या प्रवृत्तींना प्रोत्साहनच देत आहेत. कारण यातूनच त्यांचा स्वतःचा फायदा वाढविणे शक्य होते. या स्थितीत भ्रष्टाचारी लोक आपल्या पैशाचा वापर करून आपल्याला पाहिजे त्या पदावर बदली करून घेतात व आपल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला अधिक वाव देतात. जे लोक असा पैसा खर्च करू शकत नाहीत किंवा करू इच्छित नाहीत, त्या लोकांना अडगळीत टाकले जाते. यामुळे शासकीय संघटनेत अस्वस्थता, असंतोष, वैफल्यग्रस्तता, अविश्वास इ. घातक भावना निर्माण होतात. बदल्या-बढत्यांतील भ्रष्टाचाराचे शासकीय संघटनेवर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे सांगता येतील. १) भ्रष्ट व्यक्ती मोक्याची पदे मिळवितात व त्या पदांचा दुरुपयोग करतात. २) चांगली व कर्तृत्ववान् माणसे चांगल्या व योग्य पदांना मुकतात व त्यांच्या कर्तृत्वाचा फायदा समाजाला मिळत नाही. ३) प्रामाणिक व कर्तृत्ववान माणसांचा व्यवस्थेवरील विश्वास नष्ट होतो. ४) नैतिकतेत काठावर असणारी माणसे भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त होतात. ५) मोक्याच्या पदासाठी पैसे खर्च केल्यामुळे तो खर्च भरून काढण्यासाठी अधिकच भ्रष्टाचार होतो. ६) जनतेच्या पैशांचा योग्य वापर न होता, तो भ्रष्टाचारी व्यक्तींच्या खिशात जातो. ई) भावी पिढीवर होणारे दुष्परिणाम श्रम न करता मिळालेल्या पैशाला मोल राहत नाही. तो कशासाठीही व कसाही वापरला जातो. पैशाचा असा अपव्यय घरातील मुले पाहत असतात. यामुळे भावी पिढी वास्तवापासून फार दूर जाते. त्यांचे सभोवतालच्या परिस्थितिविषयक आकलन एकांगी बनते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण व समतोल विकास होत नाही. व्यक्तिमत्त्व विकासासाठी मुलांच्या मानसिक, बौद्धिक व सामाजिक अशा सर्व अंगांकडे लक्ष द्यावे लागते. पैसा माणसांचे सर्व प्रश्न सोडवू शकत नाही, हे भ्रष्टाचारी कुटुंबातील कोणालाच पटत नाही. भ्रष्टाचारी व्यक्तींचा भ्रष्टाचार व त्यातून मिळविलेला पैसा त्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात विकृती आणतो.
भ्रष्टाचार-निर्मूलनासंबंधी सारंगांच्या सूचना पुढील लेखांत. ११०१, बी-१/रेखा, कोरस टॉवर्स, वर्तकनगर, ठाणे (प.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.