सलाम व्हिएतनाम

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, ललित लेख, अनुभवकथन इतिहास यांपैकी कशातच न मोडणारे असे हे पुस्तक आहे. श्री. ज.रा आपटे यांनी व्हिएतनाममध्ये न जाता अमेरिकेतील प्रकाशित साहित्यावर, अप्रकाशित माहितीवर व अनेक व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा करून, संशोधनपर पुस्तक लिहिले. संशोधनपर लेख संबंधित व्यक्तीच वाचतात, कारण इतरांना त्या नीरस वाटतात, परंतु हे पुस्तक तसे वाटत नाही.
मुखपृष्ठापासून ते परिशिष्टांपर्यंत छपाईचे कार्य सुंदर व सुबक केले आहे. भाषा सोपी, प्रवाही, अर्थपूर्ण आणि लक्षवेधक आहे. परंतु पुस्तकातील संदर्भ, राजकीय नेतृत्व, भौगोलिक स्थिती, अमेरिकेतील साम्यवादी विरोधक, दुसऱ्या महायुद्धामुळे झालेली हानी गोंधळलेला आणि अतार्किक दृष्टिकोन, जनमताचा विशेषतः युवावर्गाचा आक्रोश, यासंबंधी फारशी माहिती नाही. त्यामुळे साधारणतः ५५ ते ६० वर्षे वयाचा वाचक वर्ग शब्दन् शब्द वाचेल, कारण एकेकाळी सदर गोष्टी वाचल्या आहेत. इतराना थोडे कठिण वाटेल. वाचतील त्यांना मजा येईल.
२६, २७, २८ एप्रिल १९७५ रोजी अमेरिकन लष्कर व त्याला मदत करणारे व्हिएतनामी फारच घाबरलेले होते. आणि म्हणूनच मुख्यालयातून हेलिकॉप्टरने त्यांना जहाजावर पोहचवून दिले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेचे मुख्यालय ज्या ठिकाणी होते, त्याच इमारतीमध्ये भुयारात व्हिएतकाँगचे मुख्यालय होते. (त्याचे नाव कु चि पॅसेज, ३-४ मीटर खोल व २०० कि.मी. लांब व हो चि मिन्ह शहराच्या उत्तरेस ३० कि.मी. अंतरावर) ह्या दोन गोष्टीचा उल्लेख मुद्दाम केला आहे. अशी घटना जगात कोठेही घडली नाही.
लेखकाचे मनोगत अर्थपूर्ण आहे. “व्हिएतनामचे युद्ध — आहेत.” ‘महिमा आशिया खंडाचा’ हे पहिले प्रकरण माहितीपूर्ण आहे. अत्यंत कमी शब्दांत परंपरा, संस्कृती, लोकजीवन, संग्राम, सत्तांतर हे विशद केले आहे. यामधील विवेचन पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करते. इतिहास व भूगोल या विषयांचे एकमेकाशी सख्य नसते असे म्हणतात. माध्यमिक शाळेतही १९५२ पूर्वी दोन पैकी एक विषय घ्यावा लागत असे. लेखकाने या दोन विषयांचा समन्वय छान साधला आहे.
व्हिएतनामी जनतेला जवळजवळ २००० वर्षे संघर्ष करावा लागला. ख्रिस्तपूर्व १०० ते इ.स. ९०० पर्यंत चीनची सत्ता, त्यानंतर इ.स. १८०० पर्यंत प्रदेश विस्तार, परंतु या काळातसुद्धा चीन, लाओस व कम्बोडिया यांचेशी मधूनमधून संघर्ष होत असे. ली, ट्रान, लान्हटोन, न्युवेन या कुटुंबांनी व्हिएतनामावर राज्य केले. १८०२-१९४५ पर्यंत ल्युबेन नाममात्र बादशाह होते. एकंदरीत अराजकता होती.
जगाच्या इतर भागांप्रमाणे रोमन कॅथॉलिक मिशनरी प्रथम दक्षिण व्हिएतनाममध्ये आले. त्यांना फारच कमी यश मिळाले. उत्तर व्हिएतनाममध्ये त्यांना काहीच करता आले नाही. दक्षिण व्हिएतनाममध्ये १० टक्के रोमन कॅथॉलिक आहेत. बहुसंख्य व्हिएतनामी बौद्ध आहेत. पगोडामध्ये बौद्ध मूर्ती आहेत. भारतामध्ये हिंदूधर्मीय पितृपक्षात पितरांची पूजा करतात. व्हिएतनाममध्ये दररोज प्रत्येक घरी ही पूजा केली जाते. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आचारांना शासन प्रोत्साहन देत नाही. समाजात एकजिनसीपणा व सुसंवाद आहे.
लेखकाने म्हटल्याप्रमाणे शिक्षण-प्रसारामध्ये लक्षणीय प्रगती झाली नाही हे बरोबर नाही. मी १९९३ व १९९४ साली तेथे होतो. त्यावेळी ६.५ कोटी लोकसंख्या होती. तेव्हा ९४ विद्यापीठे/महाविद्यालये, २८१ व्यावसायिक शाळा, २९६ गेल ढीरळपळपस डलहेश्री होत्या. याशिवाय अल्पमुदतीची व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे होती. (ही कायमस्वरूपी नाहीत, पशशवीळशपींशव वशपींळींळशव आहेत.) हो चि मिन्ह यांनी म्हटल्याप्रमाणे कोणतीही कृती करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. ९४ टक्के साक्षरता आहे. दुकानातील कामगार, रस्त्यावर बसलेले पंक्चर दुरुस्त करणारे, मेकॅनिक, फावल्या वेळात वाचन करताना दिसतात. डॉ. झाकिर हुसेन एकदा म्हणाले होते की वाचणारा समाज पाहिजे, तसा व्हिएतनामी समाज वाचणारा समाज आहे. २१७ वर्तमानपत्रे/मासिके, ४५ रेडिओ स्टेशन्स, ३ टी.व्ही. चॅनेल्स आणि स्थानिक चॅनेल्स आहेत. सिनेमाघरांची संख्या कमी आहे. लोकसंगीत, नाट्य, शास्त्रीय संगीत, पथनाट्य, ऑपेरा ही करमणुकीची साधने आहेत. व्हिएतनामी समाज हसतमुख, बोलका आहे. शहरांतील रस्त्यांची साफसफाई रात्री होते. विजेच्या टंचाईमुळे रहदारी सात नंतर कमी होते. मोटारींचा वापर फारच कमी. सायकली मुख्य साधन.
व्हिएतनाम खनिज संपत्तीत समृद्ध आहे. आज तांदुळाच्या निर्यातीत जगात दुसरा क्रमांक आहे. शेतकरी मेहनती आहेत. स्वाभिमानी, कर्तव्यदक्ष, भ्रष्टाचारविरोधी आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना, विश्वबँक, फ्रान्स, स्वीडन, मलेशिया, भारत, अमेरिका, रशिया यांची आर्थिक व तांत्रिक मदत मिळत आहे.
राष्ट्रपिता हो चि मिन्ह यांचे जीवनाचे. दर्शन ३, ४ व ५ या प्रकरणांत आहे. त्यांचे बाळपण, शिक्षण, वडिलांचे संस्कार, क्रांतिकारक घटना, लेनिनचा प्रभाव, फ्रान्स, रशिया, चीन, सयाममधील अनुभव, कार्य, या बाबतीत लेखकाने आढावा घेतला आहे. त्यांचा राजकीय प्रवास, प्रगती, अटक, सुटका यासंबंधीची माहिती थोडक्यात दिली आहे. पण त्यासाठी लेखकास अनेक संदर्भ पहावे लागते असतील. प्रस्तुत पुस्तकात दुसरे महायुद्ध, जपानचा पराजय, जिनेव्हा करार आणि व्हिएतनाम युद्धाची पार्श्वभूमी स्पष्टपणे दिली आहे. जिनेव्हा करारानुसार लाओस, कंबोडिया व व्हिएतनाम असे तीन सार्वभौम देश झाले. परंतु व्हिएतनामची उत्तर व्हिएतनाम व दक्षिण व्हिएतनाम अशी विभागणी झाली. आणि यातूनच पुढे युद्धाची ठिणगी पडली.
उत्तर व्हिएतनामला मदत देण्यात रशिया, चीन व इतर युरोपमधील देश अग्रेसर होते. तर दक्षिणेत अमेरिका भरपूर साहाय्य देत राहिली. तेथे कम्युनिस्ट राजवट न राहावी हा उद्देश. लेखकाने सुंदर शब्दांत तेथील परिस्थिती वर्णन केली आहे. जनरल आयसेन हॉवरपासून जेरी फोर्डपर्यंत अमेरिकेने केलेला एकांगी विचार, कम्युनिस्ट विचारांची भीती व व्हिएतनामी व अमेरिकन जनतेचा केलेला अव्हेर वाचनीय आहे. १ मे १९७५ नंतर झालेली प्रगती द्रुतगतीने झाली. परंतु १९९० नंतर धोरणात्मक बदलांमुळे प्रगतीचा वेग वाढला. लेखकाने हा परिचय करून दिला आहे. लेखकाने प्रकाशित साहित्यावर भर दिल्यामुळे काही माहिती अपूर्ण वाटते. अमेरिकेतील प्रकाशित साहित्य पूर्वग्रहदूषित वाटते. राजधानीत पोलीस दिसतच नाहीत. सुरक्षा फारच चांगली आहे. शांत वातावरण असते. तेथील वातावरण वेगळे आहे. चीन-रशिया यांच्यातील वैचारिक मतभेदाच्या वेळी व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्ष स्वतःची प्रतिष्ठा सांभाळून होता. आजही जाहीररीत्या मतभेदावर चर्चा होत नाही. सर्वांचे लक्ष प्रगतीच्या वेगावर आहे. परिशिष्ट ६ हे याचे उदाहरण आहे.
परिशिष्ट १ ते ५ महत्त्वाची आहेत. त्यांबद्दल लेखकाचे अभिनंदन, हो चि मिन्ह यांचे मार्च १, १९४७ चे पत्र अत्यंत प्रभावी आहे. संघटनेमधील दोष काढून टाकले पाहिजेत. त्यांमध्ये स्थानिक वाद, गटवाद, नोकरशाही, संकुचित वृत्ती, कर्मकांड, कागदी घोडे, बेशिस्त स्वार्थ, ऐषआराम, चारित्र्यहीनता, सत्तेचा दुरुपयोग, संघर्ष, मत्सर हे विषय येतात. काहीही प्राप्त करण्यासाठी कायदा हा उपाय नव्हे. स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रचार, प्रबोधन आणि शिक्षणाची गरज आहे. या बरोबरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिस्त, विवेक, संयम, पाळला पाहिजे.
समाजकार्यात सहभाग असलेल्या आणि संस्थांमध्ये पदाधिकारी असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचावे. लेखकाने अनेक पैलू यात विशद केले. अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले. आणि हे सर्व करताना स्वतःचे मत व्यक्त न करता एक त्रयस्थ संशोधक म्हणून पुस्तक लिहिले आहे. १४८ पृष्ठांसाठी किती मेहनत घेतली असेल यांचा विचार करणे सोपे नाही. यासाठी लेखकाचे मनापासून अभिनंदन! परिशिष्ट: व्हिएतनामबाबत माहिती दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९४५ साली व्हिएतनामने स्वातंत्र्य घोषित केले. त्यावेळी जवळजवळ ९५% निरक्षर होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे व्हिएतनामी भाषेला लिपी नव्हती. १९३८-३९ साली स्थानिक व फ्रान्समधील शिक्षणतज्ज्ञांनी
तयार केली. ती रोमनसारखीच परंतु उच्चारण पद्धतीत किरकोळ बदल असलेली होती. सप्टेंबर १९४५ साली हो चि मिन्ह यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात तीन गोष्टींवर भर दिला. परकीय आक्रमण, दुष्काळ व अज्ञान यांविरुद्ध लढा!
१९७५ पर्यंत दक्षिण व्हिएतनामशी (अमेरिकेशी) तसे युद्ध चालूच राहिले. परंतु साक्षरताप्रसार मुक्त झालेल्या प्रदेशावर व युद्धाचे ठिकाणी चालूच राहिला. १९७५ ते १९८० पर्यंत हा वेग कायम राहिला व आज साक्षरता ९४ टक्के आहे. व्यावसायिक शिक्षणावर भर आहे, कारण जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत शिक्षण कुचकामी, दुसरे म्हणजे व्हिएतनामी लोक टीकेत वेळ घालवत नाहीत. म्हणूनच फ्रान्स, व इतर देशांनी खूप मदत दिली. संयुक्त राष्ट्राच्या प्रादेशिक कार्यालयात (बँकॉक येथे) country support teams स्थापन केल्या व मी याच टीमचा सदस्य (International consultant) होतो.
भारतामध्ये जशी विषयवार (disciplinewise) विद्यापीठे आहेत, म्हणजे नुकतीच स्थापन झालेली शेती, आरोग्य, तंत्रविज्ञान, आयुर्वेद वगैरे तेथे खूप आधीपासूनच, १९४५ नंतर आहेत. ट्रेड युनियन विद्यापीठ, भाषा, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी.
वरिष्ठ कनिष्ठ भेद नाही. वाहक व विभागाचा सचिव बुफेमध्ये एकत्र जेवतात. पेट्रोलवर खर्च कमी म्हणून सायकली व ट्राम. १९९० नंतर मोपेड आहेत. पोलीस फोर्स अल्प, राजधानीत फक्त वाहतूक पोलीस दिसतात. गुन्हेगारी जवळजवळ नाही. संगीत, वादन, नृत्य, नाट्य हे प्रिय. सिनेमाघरे फार कमी. सिनेमाची निर्मिती नाही. परंतु माहितीपट (documentaries) तयार करतात. सरकारी रुग्णालये कार्यक्षम. सर्व व्यापार स्त्रियांच्या हातात. जवळजवळ १००० वर्षे लहानमोठी युद्धे चालू होती. मनुष्यहानी खूप झाली. वाचन करणारा समाज आहे. प्रत्येकजण वाचत असतो, विकत घेऊन प्रामाणिकपणा सर्वत्र दिसतो. प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी. परंतु वस्तू स्वस्त. एक डॉलर = १००० डाँग. आता वेगळा रेट. १५० डाँग मध्ये ब्रेड (१२ पीसेसचा पुडा) मिळत असे. २००० ते ३००० डाँगमध्ये चांगला शर्ट. देशातील चलनाच्या लहान भागात जेव्हा वस्तू मिळतात तेव्हा ते चलन प्रभावी ! प्रतिव्यक्ती किंवा राष्ट्रीय उत्पन्न ह्या संकल्पनेमधून खरी गोष्ट समजत नाही. व्हिएतनाम प्रगतिपथावर आहे. एकपक्षीय राज्य आहे. परंतु हो चि मिन्ह यांची शिकवण, राष्ट्रनिष्ठा First & Foremost अशी असल्यामुळे अधिक प्रगती होईलच.
(सलाम व्हिएतनाम, लेखक ज.शं. आपटे, अक्षर प्रकाशन ७-८, पांडुरंग बिल्डिंग, १७८ लेडी जमशेदजी रोड, माहीम, मुंबई – ४०० ०१६. मूल्य रु.१२५)
सृष्टी संकुल, व्ही.आय.पी. रोड, धरमपेठ, नागपूर-१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.