शिडी

प्रत्येक व्यक्तीची क्षमता मर्यादित असते. ती शक्य तितकी टोकापर्यंत ताणणे, आपली दृष्टी जास्तीतजास्त विस्तारणे हे त्यांचे संशोधनाचे ध्येय होते. या दृष्टिकोनाचे प्रतीक असे एक छायाचित्र त्यांच्या खोलीच्या भिंतीवर टांगलेले होते. पिएरो बोरेलो या चित्रकाराच्या ‘एका व्यक्तीचे स्वतःचे दर्शन (शिडीवरील माणूस)’ या चित्राची ती प्रत होती.
यात एक मोठी भिंत असून तिला टेकविलेल्या शिडीवर एक माणूस चढत आहे; तो शिडीच्या अर्ध्यावर पोहोचलेला आहे. भिंतीवर छत नाही, त्यामुळे त्यापलीकडे आकाशाचा तुकडा आणि बाहेरील जगाचे थोडेफार दर्शन होत आहे. माणसाची भिंतीवर पडलेली सावली त्याच्यापेक्षा खालच्या अंगाला आहे. एक एक पायरी चढत तो माणूस वर जाणार तसतसे भिंतीपलीकडील जगाचे अधिकाधिक दर्शन त्याला होत जाणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिडीचे वरचे टोक भिंतीवर कडेच्या खाली विसावलेले आहे. त्यामुळे शिडीच्या शेवटच्या पायरीवर पोहोचला तरी त्या माणसास भिंत ओलांडून जगाचे सर्व दर्शन होणे शक्य नाही.
सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या त्याच नावाच्या चिंतामणी देशमुखांनी लिहिलेल्या चरित्रातून. (लोकवायय गृह, २००४)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.