बदलते समाज, उर्फ सोशल डायनॅमिक्स

पृथ्वीवर विखुरलेल्या मानवी समाजांचा शास्त्रीय अभ्यास शक्य आहे या विश्वासातून समाजशास्त्र निर्माण झाले. अस्तित्वात असलेल्या समाजांचे तपशीलवार निरीक्षण व असित्वात नसलेल्या समाजांचा इतिहास, असा विषय उपलब्ध होऊ शकतो. इ.स. पूर्व ३००० ते इ.स. २००० असा सुमारे ५००० वर्षांचा काळ इतिहासाचा काळ समजता येईल, कारण त्याबाबतची वस्तुनिष्ठ दृष्टीने टिपून ठेवलेली वर्णने मिळू शकतात. त्या आधीच्या काळात झालेल्या घडामोडी भूस्तरशास्त्र (जिऑलाजी) व पुरामानववंशशास्त्र (पॅलिओअॅन्थ्रॉपॉलाजी) यांचा विषय होतात.
भौतिकशास्त्रात स्टॅटिक्स व डायनॅमिक्स असे दोन भाग आहेत, त्याचप्रमाणे समाजांची स्थिती व त्यांची गति अभ्यासणारे दोन भाग पडू शकतात. स्थितिशील, स्थिर, समाजांची रचना अभ्यासणे शक्य आहे. प्रस्तुत टिपण हे दुसऱ्या भागावर आहे. समाजांत बदल का घडावेत, घडणाऱ्या बदलांना काही क्रम असतो का, इत्यादि दृष्टींनी या भागाकडे पाहता येईल. मानव जर एक प्रकारचा पशु आहे तर पशूच्या कळपांत बदल का घडत नाहीत, व मानवच बदल का घडवतो; त्याची प्रगती व अधोगती का होते, याला जैविक (बायॉलॉजिकल) कारणे असू शकतात. मानव इतर पशुंहून निराळा आहे; तो हसू शकतो, भाषेचा वापर करतो, कल्पना व संकल्पना त्याला मांडता येतात, हे परिचित आहे. त्यामुळे त्याला इतिहास आहे व इतर पशुंना नाही. परंपरा व नवता या दोन्ही मानवाला आकर्षित करतात, त्यामुळे त्याची संस्कृति बनते. सामाजिक बदल हे एका दृष्टीने सांस्कृतिक बदल असतात.
समाजातील व्यक्ती काही ध्येये (मिशन) स्वीकारतात, काही वैचारिका (आयडिऑलजी) बौद्धिक चर्चेसाठी उपयोगात आणतात, हा बदल घडण्याचे हे एक कारण आहे. समाज हा जणू काही पुढून खेचला जातो. पिटिरिम सोरोकिन या प्राध्यापकांनी पाश्चात्त्य समाजाचा डेलळेीींशीरश्र उपराळली या पुस्तकात चार भागांत याचा ऊहापोह केला आहे. त्यांनी वैचारिकांचे तीन प्रकार केले आहेत. (१) वास्तववादी, कडवे, कर्तव्यांपासून न ढळणारे, असे ज्यू धर्मीय लोक (२) कल्पनारंजन करणारे, गूढ गोष्टीत रमणारे, व्यक्तिप्रधान, कलास्वादी, असे रोमॅन्टीक लॅटिन लोक (३) समतोलवादी (गोल्डन मीन), सत्यं-शिवं-सुंदरम् यांना श्रेयस्कर मानणारे ग्रीक लोक.
कुठलीही वैचारिका प्रबळ झाली की ती त्या समाजाच्या सर्व क्षेत्रांत प्रभाव पाडू लागते. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत, ललित वायय इत्यादि क्षेत्रे वैचारिकेशी सुसंगतपणे साधली जाण्यास अर्थातच खूप काळ जावा लागतो. अशा रीतीने युरोपातील विविध समाजांचा इतिहास त्यांनी उलगडून दाखविला आहे. घड्याळाचा लंबक फिरावा तसा समाज क्र. १ व २ यांच्याकडे झुकत जातो व मध्यावर, क्र. ३ कडे कधी कधी स्थिरावतो. पण अशा फेऱ्या का माराव्या लागतात याचे कारण त्यांनी दाखविलेले नाही. त्यांचा कल क्र. ३ च्या वैचारिकतेकडे असला तरी त्या तिघींमध्ये तर-तम भाव सांगण्याचा अट्टाहास त्यांनी केला नाही. समाजाला खेचणारी आणखी एक कारणमालिका प्रा. टॉइनबी यांनी वर्णन केली आहे. याला आव्हान (चॅलेंज) व प्रत्युत्तर (रिस्पॉन्स) असे संबोधन त्यांनी वापरले आहे. आव्हाने अनेक प्रकारची असू शकतात, त्यात परिसरातील बदलांचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. खोल नांगरट केल्यामुळे शेतजमिनीचा सुपीक असा वरचा स्तर नष्ट होतो. किंवा प्लेग, काळा आजार, यासारखे रोग अचानक फैलावतात व लक्षावधी लोक मरतात. ख्रिश्चन व इस्लामी धर्म एकमेकांशी प्राणपणे लढाई करतात. अशा संकटांशी झगडू न शकणारा समाज (संस्कृती) नेस्तनाबूद होतो. पण अशा बदलांना काही क्रम असतो असे ते म्हणत नाहीत. समाज कायम एका स्थितीत राहू शकेल की नाही, यांच्याशी ते ठाम नाहीत. सर्व जग जर एक संस्कृती झाली, आणि तिच्यात एक थोर नीतिमत्ता रुळली, तर कदाचित मोठे बदल टळू शकतील असे त्यांना वाटते. समाजाला पुढून खेचणारे बदल घडवतात, त्याप्रमाणे पाठीमागून धक्के देणारे, ढकलणारेसुद्धा असतात. अशी मीमांसा प्रामुख्याने अर्थशास्त्री मांडतात. मालकी हक्कांची विषम वाटणी ही समाजात क्रांती करणारी ठरते. अशी मालकी शेतजमिनींवर असेल, गिरण्या-कारखाने अशा यंत्रांवर असू शकेल, वाहतूक व दळणवळणांच्या साधनांवर असेल, किंवा पैसा, उपक्रमांचे व्यवस्थापन, अशा अमूर्त रूपांवर असू शकेल. जेथपर्यंत मालकी नसणारे पुष्कळ लोक आहेत तेथपर्यंत राजकीय बदल होणे अटळ आहे, पण सर्वांची समाईक मालकी कधी काळी स्थापन झाल्यास बदल होणे थांबेल, अशा त-हेचा सिद्धान्त मार्क्सने मांडला. मालकी हक्कांतील बदल पायाभूत असतात, आणि समाजातील/संस्कृतीतील बदल आनुषंगिक असतात, असे त्याचे मत होते. समाजात वार्षिक ढोबळ उत्पन्न पुष्कळ वा अल्प असेल, पण त्यातील किती हिस्सा भविष्यकाळासाठी वाचवला जातो, बचतीचे भांडवलात कसे रूपांतर केले जाते, आणि उत्पन्नाची वाढ किती त्वरेने होते, यावर बदलांचा आकार ठरतो, असे प्रतिपादन अनेक अर्थशास्त्रज्ञ करू लागले होते. संचय, उत्पादनात वाढ, आणि त्यामुळे सर्व घटकांना थोडीफार वाढलेली प्राप्ती, यावर सामाजिक बदलांची आवश्यकता ठरते. सॅस्टोव या प्राध्यापकाने, भांडवलाचा ढोबळ उत्पन्नातील हिस्सा ३० टक्के वा अधिक झाला तर समाजाची गति-प्रगती स्वाधीन असते; उलट, हिस्सा अल्प असला तर बदल कुंठित होतात वा पराधीन होतात, असा सिद्धान्त मांडला.
वेर्नर सोम्बार्ट या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने भांडवलदारी संस्कृतीचा इतिहास विस्ताराने अभ्यासला. इ.स. १२, १३, १४ ही शतके प्राथमिक भांडवलदारी पद्धतीची. इ.स १५, १६, १७ ही शतके मध्यम भांडवलदारी उत्क्रांतीची; इ.स. १८, १९, २० ही शतके पक्व भांडवलदारीची होत. भांडवलदार नफ्याच्या आशेवर जगतो, आणि त्याची हाव अपरिमित असते असे त्याने प्रतिपादन केले. याच वेळी शुम्पेटर या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञाने भांडवलदारीतील नफा नावीन्यातून, नवसर्जनातून मिळवला जातो असे प्रतिपादन केले. या आर्थिक बदलांमुळे समाज सेंद्रिय कच्च्या मालाऐवजी असेंद्रिय माल वापरू लागला. परिसराची हानी करू लागला, ऊर्जा मिळवण्याचे स्रोत झपाट्याने संपवू लागला, इत्यादी अनेक तपशील सोम्बार्टने मांडले. नफेदारी पुढून खेचते व पाठीमागून धक्का देते, असे त्यांनी सांगितले व एका बदलातून दुसरे बदल येणे अपरिहार्य झाले हे दाखवले. खेचणारा जोर व ढकलणारा जोर यांच्यात समाज एखाद्या निर्जीव गोळ्यासारखा सापडलेला असतो, असा या विद्वानाचा रोख दिसतो. पदार्थविज्ञानाची समाजविज्ञानात अनुकृती झाल्यामुळे असे घडते. (न्यूटनचा दबदबा, दुसरे काय!) पण मानवी समूह हे एक स्वतंत्र वास्तव आहे असा खंबीर आग्रह धरला गेला नाही. त्याचप्रमाणे शरीर-मन-धारी व्यक्तींचा समुदाय असा बेरीज करणारा आग्रह पण उपयोगी नाही. वास्तवाला धरून नाही. समाज (समूह, समुदाय)चा अणुरेणू, जीवाणु (ऋशपश) एवढाच रूपवेध, आकृतिबंध, समजून चर्चा होऊ शकत नाही. समाजाची वास्तविकताही मान्य केली पाहिजे, म्हणजे त्यातील बदलांची अंतर्गत कारणे पाहता येतील.
जनसंख्या हा समाजाचा प्रमुख अंतर्गत घटक आहे.त्यात घट किंवा वाढ झाली मग ती एका व्यक्तीची का असो म्हणजे बदल घडणे अटळ होते. तीन मित्रांच्यात चौथा आला, दहा माणसांचा कुटुंबातील एक म्हातारा मरण पावला, एक शहर दहा लाखांचे न राहता पंधरा लाखांचे झाले, की जुने जाऊन नवे होणे आले. ३० कोटींचा देश शंभर कोटींचा झाला की नाव फक्त जुने राहते, बाकी सगळे बदलते. हे बदलणे अपरिहार्य आहे. असे बदल निरनिराळ्या वेगाने घडले की आपण त्यांना निरनिराळी नामे देतो. झपाट्याने बदल झाली की ती क्रांति होते. नेमस्तपणे झाला की ते परिवर्तन ठरते. जैसे थे यासाठी धडपड केली तर ते पुनरुज्जीवन बनते. बदल संख्येत झाला की संस्थांमध्ये होऊ लागतो. बदल सुरळीतपणे, सुविहित, होण्यासाठी राजकारणी कृती आवश्यक बनते. त्याकरिता प्रातिनिधिक लोकशाहीची कास धरावी लागते. बाळंतपणात सुईणीची मदत लागते, तशी बदलण्यास लोकान्वर्ती सरकारची गरज भासते. लोकसंख्या स्थिर राहिली तर सामाजिक बदलांचे एक मुख्य कारण नाहीसे होईल. आतापर्यंतच्या इतिहासात अशी नोंद नसली तरी दैवतकथामध्ये (मायथॉलजी)मध्ये वर्णने झालेली आहेत. निरोध उपलब्ध झाल्यामुळे युरप व जपान हे स्थिर संख्येचे देश होतील असा संभव आहे. धार्मिक पंथही अनुयायी लोकांवर कठोर निबंध घालतात.
बदल होण्याचे दुसरे अंतर्गत कारण म्हणजे भूत व भविष्य जाणण्याची इच्छा. भूतकाळातील घटना जाणून घेण्यास सर्वांत महत्त्वाचा शोध लिपी हा आहे. सामान्यतः जुने समाज भूत-भविष्य श्रद्धेवर विश्वासून घेताना आढळतात. भविष्याचे अंदाज पडताळून पाहण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे ही प्रगतीची खूण आहे. संभाव्य काय आणि असंभाव्य काय, निश्चित काय व अनिश्चित काय, हे ठरवण्यासाठी मानवी समूह धडपड करतात. याचा एक परिणाम म्हणजे शास्त्रीय ज्ञानाचा कोश तयार होतो. शब्दकोश, ज्ञानकोश यांतून संचित ज्ञान लिपिबद्ध होते, आणि त्यामुळे बदल होणे स्वाभाविक बनते. फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गम ज्ञानकोशकारांच्या प्रयत्नांतून झाला हे बहुमान्य आहे. आर्थिक क्षेत्रातही उद्योजक संशोधनावर खर्च करतात, व नावीन्य आणण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करतात. तेव्हा लाहनमोठ्या सर्व मानवी समुदायांत जिज्ञासा समान असली तरी उत्तरे समान निघत नाहीत. अशी उत्तरे प्रा. पॉपर यांनी सुचविलेल्या अग्निपरीक्षेतून, तावूनसुलाखून घ्यावी लागतात. नंतर त्याकारणे होणारे बदल सुरळितपणे, सुविहित होतात. ८००, भांडारकर रोड, पुणे ४११ ००४

पायवा
आजचा सुधारकच्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.
आजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.