‘कोषबद्धते’ला थारा नाही!

अमेरिका एका कारमध्ये बसून लांबच्या प्रवासाला निघाली आहे. आतली माणसे एकमेकांच्या जिवावर उठत नाही आहेत कारण प्रत्येकाची खानपानाची व्यवस्था, बसायचे आसन आणि मनोरंजनाची व्यवस्था इतरांपासून सुटी केली गेली आहे. बाबा उपग्रह रेडिओ ऐकताहेत, आईच्या हातात मासिक आहे आणि मुलांसाठी डीव्हीडी, एम्पी-थ्री म्यूझिक सिस्टिम्स आणि व्हिडिओ गेम्स आहेत.
वस्तूंचे प्रेम, वस्तूंमध्ये आश्चर्यकारक विविधता उपलब्ध असणे, आणि यांच्या मिश्रणातून प्रत्येकाने स्वतःचे इतरांपासून सुटे असे ‘विश्व’ घडवणे, यामुळे अमेरिका शांत आहे. इथल्या उपभोक्ता संस्कृतीत लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असणे नुसतेच ‘हवेसे’ नाही, तर थेट आवश्यक आहे. केबल टीव्ही असो की अन्न असो की बूट-कपडे असोत प्रत्येकाची निवड इतरांपेक्षा वेगळी असणे हे बाजारपेठेने सक्तीचे केले आहे. एकाला चमचमीत इटालियन अन्न आवडले की दुसऱ्याला कमी मीठ घालून रास्बेरीचा मध मिसळून फेटलेली मोहरी आवडायलाच हवी. अन्न, छंद, माध्यमे, साऱ्यांमध्ये असे ‘कप्पे’ पाडून अमेरिकन आपापल्या ‘फॅशनचे’ कोनाडे घडवतात. ‘आय-पॉड’ (ळ झेव) (‘आय-पॉड’ प्रणाली प्रत्येकाला आपापल्या निवडीचे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणाऱ्या ‘कोषा’त नेऊन बसवते!) जाहिरातींमध्ये हे अमेरिकन दिसतात नुसत्या काळ्या छायाकृती, कानांना लावलेल्या हेडफोन्समधले संगीत ऐकत उन्मादाने नाचणारे आणि एकेकटे. एकमेकांना सांगतात “तू तुझी निवड कर, मी माझी करतो. तुझी निवड चुकते आहे, पण मला त्याची फिकीर कशाला?”
आता हेच उपभोक्ता तत्त्व राजकारण आणि राजकीय बातम्यांना लावले जात आहे, यात आश्चर्य ते काय ? पत्रपंडित, राजकीय विनोदमूर्ती, चर्चासत्रे, ‘ऑन लाईन’ वार्तापत्रे यांचे खास आपल्यासाठीचे, ‘कस्टमाईझ्ड’ मिश्रण घडवून अमेरिकन आपापली राजकीय विश्वे उभारतात. कुठे दोन पक्ष सोबतच पळत असतात. तर कुठे एखादा पक्ष दुसऱ्याला चारी मुंड्या चीत करत असतो. कुठे अर्थव्यवस्था उभारीत असते, तर कुठे मंदीच्या गर्तेत. फॉक्स न्यूजवर तुमचा एक पठ्ठा दुसऱ्या एका पठ्याचे हसे करत असतो. तुमच्या आवडत्या वाहिनीवर गेलात तर वाटते “किती माणसे माझ्यासारखी ‘योग्य’ विचार करतात नाही!” आणि हे तुम्हाला तपशीलवार तर्कपरंपरेने दाखवून दिले जाते. या इलेक्ट्रॉनिक्सने घडलेल्या विश्वांमुळे विचारही थेट काळे नाहीतर पांढरे व्हायला लागतात. मधले काही नसतेच. खरे तर शत्रू परवडला, पण मतभिन्नता असलेला साथीदार मात्र असह्य होतो. पण यातून एक सुखमय वर्णवादही उपजतो. ‘तुमची’ खात्री असते की ‘त्यांच्या’ विचारांमुळे अमेरिका रोमन साम्राज्यासारखी ढासळेल. ‘त्यांची’ खात्री असते ‘तुमच्या सारखे मूर्ख एका ‘डर्टी बाँब’ ने मरणार आहेत पण तुम्हा दोघांना एकमेकांशी रागावून बोलण्याचीही गरज नाही, दुर्लक्ष करायचे की झाले.
हा सुखी एकटेपणा कधीतरी संपुष्टात येईलच. पंचाईत ही की अमेरिकन राजकारण अमेरिकन उपभोक्ता मॉडेलचे नाही. आय-पॉड अमेरिका भलेही प्रत्येकाला त्याचे खास अन्न आणि बूट देत असेल, पण अजूनही प्रत्येकाला त्याच्या आवडीचा राष्ट्राध्यक्ष मिळत नाही. प्रत्येकाला ‘हवा तो’ सरन्यायाधीश किंवा हत्यारे बाळगण्याचा कायदाही मिळत नाही. एखादा ‘अमेरिकन राष्ट्रप्रेमी कायदा’ तुम्हाला आवडत नसला तरी तो ‘डिलीट’ करता येत नाही.
उपभोक्ता अमेरिका आपले अन्न आणि करमणूक यांच्याबद्दल आपल्या आवडीनिवडींचे बारक्यातले बारीक फरक मागू शकते. असे ‘मागणे’ स्वार्थी नसते तसे मागणे हे कर्तव्य असते. ‘बर्गर किंग’ तुम्हाला “हॅव इट युअर ओन वे’ असे आमंत्रण देत नसतो हुकूम असतो, तो. पण राजकीय यंत्रणा या ‘स्वातंत्र्या’आधी रचली गेली. ती अामुर्ध्या नागरिकांना आवडणारेच पर्याय देते. आणि हे अमेरिकन आत्म्यांना ‘दुखावते’. त्यांना ‘समाधान’ मिळायलाच हवे. त्यांचा तो हक्क आहे, तसे होत नसल्याने पराजितांना पराजय फारच दुखतो, आणि जेते फारशी दिलदारी दाखवत नाहीत. जसे डेमोक्रॅट्सना नेमका कशामुळे बुशचा राग येतो? त्याने मध्यममार्गी असल्याचे सांगत ‘उजवेपणा’ गाठला म्हणून?
लोकसंख्येचे मत विरोधात असतानाही ‘भरघोस’ विजय मिळाल्यासारखेच राज्य केले म्हणून ? का करू नये त्याने तसे राज्य ? आय-पॉड अमेरिकेत प्रत्येकालाच ‘भरघोस’ विजय मिळतो आपापल्या इलेक्ट्रॉनिक / कागदी माध्यमातून नाही, राजकीय अमेरिकेच्या ‘वाहनात’ आपापले ‘चॅनेल’, व्हिडिओ गेम्स आणि पेयांच्या बाटल्या एका ठिकाणी ‘जमा’ करून एकच चॅनेल ऐकावा लागतो, एकच जेवण जेवावे लागते. आणि हे शांतपणे करण्याची, एकमेकांचे खून न पाडता करण्याची, अमेरिकनांची सवय गेली आहे.
बाबा म्हणतायत, “मी गाडी चालवतो आहे, आणि मी अलाणा गायकच रेडिओवर ऐकणार!” मागे काका ‘फलाण्या’ गायकाचे गाणे गुणगुणून निषेध नोंदवताहेत. अर्धी पोरे अलाण्यासोबत गाताहेत तर उरलेली अर्धी फलाण्यासोबत गाताना आवाज उंचावून अलाण्याला हरवू पाहताहेत. खिडक्यांमधून सुंदर वनराई दिसते आहे, प्रचंड शेते धावताना दिसताहेत, दूर काळे ढग वादळाची चाहूल देताहेत कोणाचेच, कुठेच लक्ष नाही. कठिण जाणार आहे, हा प्रवास. टाईम (२७ सप्टें. २००४) मधील हा लेख भारतीयांनाही ‘कोषा’तून बाहेर काढण्यास उपयोगी ठरावा. सं.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.