दहशतवादाची कथा: एक मूल्यांकन (लेखिका – ललिता गंडभीर, ग्रंथाली, मुंबई-२. प्रथमावृत्ती २००३ मूल्य रु.२५०/-)

अमेरिकेत स्थायिक झालेल्या, पॅथॉलॉजिस्ट असलेल्या, ललिता गंडभीर यांच्या चिंतनातून आणि इतिहासाच्या कालचक्रात निर्माण होणाऱ्या मानवाच्या प्रतिशोधात्मक प्रवृत्तीच्या अन्वेषणातून उत्क्रांत झालेली दहशतवादाची कथा ही कादंबरी, तीन वेगवेगळ्या दहशतवादी घटनांतील कथावस्तूच्या घट्ट विणीतून निर्माण झालेली, एका शांतपणे जळणाऱ्या ज्योतीने शेवटी विझून जावे तशी शोकांतिका आहे. कादंबरीचा कालखंड चाळीस वर्षांचा असून कादंबरीचे लेखन पूर्ण होण्यासाठी पंधरा वर्षांचा दीर्घ कालावधी लागला आहे याचे मुख्य कारण लक्षात येते. ठरवून, जुळवून केलेल्या कथानकाच्या आकृतिबंधाला नियोजित पात्रांच्या शाब्दिक अभिव्यक्तीने सजवून केलेल्या लेखन-प्रयत्नातून ही कादंबरी निर्माण झालेली नाही. ‘दहशतवादाची कथा’ ही कादंबरी उत्क्रांत झालेली आहे. कादंबरीला लेखिकेने जी प्रस्तावना दिलेली आहे ती अभ्यासपूर्ण आहे व त्यांतील मनोगतातून कादंबरी लेखनामागे असलेली प्रेरणा स्पष्ट झालेली आहे. ‘दहशतवादी अखेरीस नाश पावतात. नवे दहशतवादी का निर्माण होतात ? इतिहासापासून कुणी धडे का घेत नाहीत ?’ गंडभीरांसाठी हा प्रश्न अनुत्तरित आहे. कादंबरीतून या प्रश्नाचे उत्तर सापडते. मानवाच्या आकांक्षा, स्वार्थ, प्रतिशोधात्मक हिंसक वृत्ती यांवर त्याच्या भावनांचे अधिराज्य असते. अशा वेळी मानवी प्रवृत्ती पाशवी आचारातून प्रदर्शित होते. कारण मानव हा मूलतः पशू आहे. इतिहासाच्या अभ्यासाने अपेक्षित असणारी विवेक-जागृती
अशा प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्यास दुबळी ठरते. कादंबरीतील पात्रे या विचाराला सिद्ध करणारी जिवंत प्रमाणे आहेत.
दहशतवाद हे हिंसेचे तत्त्वज्ञान आहे. प्रस्थापित राजकीय सामाजिक चौकट उद्ध्वस्त करणे हे दहशतवादाचे ध्येय असते. पण त्यातून नवनिर्मितीचा विचार नसतो. दहशतवादाचा बिमोड हिंसेनेच होतो. प्रत्येक दहशतवाद एक शोकांतिका ठरतो. दहशतवादाची कथा ही कादंबरीसुद्धा शोकांतिका आहे. भारताच्या फाळणीचे वातावरण तयार झाले होते. पाकिस्तानच्या मर्यादेत येणारे धनिक शीख परिवार मुसलमान दहशतवादाचे शिकार होणार होते. गोविंदसिंग हा एक सुखवस्तू शीख दहशतवादाचा बळी ठरतो. कादंबरीचा प्रारंभ या घटनेपासून होतो. कत्तली, जाळपोळ, अत्याचार यांत सर्वस्व गमावलेल्या शीख परिवाराला त्यांच्या मातृभूमीतून निर्वासित व्हावे लागते. गोविंदसिंहाचा नातू रणवीर याच्या मनात सूडाची भावना भडकते. पण तोही जखमी-असहाय-पराभूत होऊन खचून जातो. गोविंदसिंहाचा परिवार दिल्लीला स्थायिक होतो. निर्वासित जीवनात अडचणीचे जीवन जगताजगता परिवाराला आर्थिक स्थैर्य लाभते. रणवीरचा पुत्र, दरशन हे संपूर्ण कादंबरीला व्यापणारे काल्पनिक पात्र आहे. कादंबरीचा पहिला अंक संपतो. आणि लेखिकेची लेखन-ऊर्मी येथे संपली असावी असे जाणवते. दहशतवादाच्या वादळात उद्ध्वस्त झालेल्या शीख परिवाराला जीवनाचा मार्ग सापडतो. कोणती घटना यानंतर गुंफायाची? दहशतवादाला अनेक पदर आहेत असे लेखिकेला जाणवते. गांधी हत्याप्रकरणी मराठी माणसांनी मराठी ब्राह्मणपरिवारांवर अत्याचार केले, लूटमार केली, काही ब्राह्मण परिवारांत हिंसा घडली. कादंबरीचा दुसरा अंक या घटनेने सुरू होतो. कारण हा सुद्धा दहशतवादच होता. या दहशतवादाचा बळी गोपाळ, स्वतःच्या घरून निर्वासित होतो आणि अनेक अवमानांचे शल्य सहन करून शेवटी नियती अनुकूल झाल्यामुळे दिल्लीला स्थिरावतो. महाविद्यालयीन जीवनात गोपाळ आणि दरशन यांची मैत्री होते. दहशतवादातील कथेतील दोन धागे अनायासे जुळतात.
कादंबरीचा तिसरा अंक पुन्हा दहशतवादाच्या घटनेने आरंभ होतो. खलिस्थान या स्वतंत्र प्रदेशाची शीखांची मागणी जोर पकडते. खलिस्थानवादी शीख आणि पंजाबी एकाच मातेची अपत्ये असून वैरी होतात. शीखांचा दहशतवाद हिंदू पंजाबी आणि शीख समाजातील सौहार्दपूर्ण वातावरण ध्वस्त करतो. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शीखांच्या दहशतवादी विचारसरणीमुळे खलिस्थानवाद्यांची तीच गत होते जी गांधीहत्येनंतर मराठी ब्राह्मण समाजाची झाली होती. कादंबरीतील निरनिराळ्या घटनांची वीण घट्ट होत जाते. परस्परांशी संबंधित नसणाऱ्या घटनांना आणि पात्रांना कथानकाच्या मूळ सूत्रात बांधून ती एकसंध वीण शब्दकळेतून प्रगट करण्यात लेखिका यशस्वी होते. आरंभी काहीशी पसरट, विस्कळीत आणि घटनांच्या गुंतावळीत अडकल्यासारखी, कादंबरी हळूहळू मनाला वेधक ठरते. उत्कंठावर्धक होते. कादंबरी संपूर्ण वाचण्याची गरज निर्माण होते. असहाय, अबोल, एक हात गमावलेला, बदल्याच्या आगीत करपून गेलेला रणवीरसिंग खलिस्थानचा आग्रही पुरस्कार करतो. बापाविषयी किंचितही आदर वा प्रेम नसलेला रणवीरसिंगचा पुत्र दरशन त्याच मार्गाने जातो. माया नावाच्या हिंदू पंजाबी तरुणीशी त्याने प्रेमविवाह करून संसार थाटला असतो. तोही हिंदू आणि शीख वैरात उद्ध्वस्त होतो. रणवीर आणि दरशन यांचा शेवट हिंसेत होतो आणि कादंबरी संपते. दहशतवादाच्या कटु अनुभवातून चार पिढ्यांतील अनुभवी व्यक्तींची मानसिकता आणि चाळीस वर्षांचा कालखंड या चौकटीत कादंबरीचे लेखन झाले आहे. या कालखंडातील कादंबरीतील पात्रांची मानसिक स्पंदने अत्यंत संयमित, प्रासादिक, ओघवत्या, अर्थवाही लेखनशैलीतून गंडभीरांनी उकलून दाखविली आहेत. कादंबरीतील कित्येक घटना स्फोटक असूनही अतिरंजित स्वरूपाच्या लेखनशैलीच्या प्रलोभनात लेखिकेने कुठेही अडकवून घेतले नाही. कादंबरी घटनाप्रधान नसून ती मानसिक हिंदोळ्याचे हेलकावे शब्दकळेद्वारे प्रगट करते. एखाद्या प्रदीर्घ अशा धाराप्रवाहाचा शब्दचित्रपट कादंबरीद्वारा प्रगट होतो. खरे म्हणजे दूरदर्शनच्या माध्यमातून प्रदर्शनासाठी एक प्रभावी धारावाही कथावस्तू कादंबरीतून प्रदर्शित झालेली आहे.
कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, नेणिवेत दडलेला शीख परिवारातील दहशतवाद प्रत्येक पिढीतून पुढच्या पिढीत अंकुरित होऊ नये यासाठी दरशन आणि मायाचे अपत्य मोहन याला कॅनडात पाठविले जाते. दहशतवादाची कथा येथे संपलेली दिसते.
या कादंबरीतील स्त्रीपात्रे फारच वेधक आहेत. लेखिका स्त्री असल्यामुळे या स्त्रियांची व्यक्तिमत्त्वाची रंगरेखा शब्दांकित न करता, त्या स्त्रियांची जीवनमूल्ये लेखिकेने समर्थपणे उजागर केली आहेत. ही पात्रे पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रभावी झालेली आहेत. प्रत्येक स्त्री धीरगंभीर, उदात्त विचारसरणीची, सहानुभूत वृत्तीची, स्वतःच्या हक्कांसाठी झगडणारी, संयमित, अन्यायाविरुद्ध आकांत न करणारी, उदात्त मूल्ये जपणारी आहे. त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाच्या तुलनेत पुरुष पात्रे दुय्यम वाटतात. कादंबरीतून जाणवणारा हा स्त्रीगौरव, लेखिकेने जाणीवपूर्वक केला असावा. बीजीबाई, भजनमाँ, माया, राजकुमारी याचे अत्यंत सजीव शाब्दिक रेखाटन डॉ. गंडभीर यांच्या समृद्ध अनुभवांतून प्रगट होते याची जाणीव कादंबरी वाचनातून होते. मानवी जीवनातील निरोगी जीवनमूल्ये मंडित करण्याच्या लेखिकेच्या वृत्तीतून निर्माण झालेली ही ललित ऐतिहासिक साहित्यकृती अतिरंजित, हिंसात्मक घटनांच्या आवर्तापासून मुक्त, शब्दांच्या कलात्मक कुसरीच्या वळणामुळे दुर्बोध नसलेली, एक सौम्य, शांत, मूल्याधिष्ठित अनुभव देणारी, काल्पनिक पात्रांद्वारे वास्तवाचे दर्शन घडविणारी, अस्वस्थ करणारी मनोवेधक कादंबरी आहे.
गुजर वाड्यामागे, महाल, नागपूर – ४४० ००२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.