आधुनिक मननशीलता

माणसे विचार कोणत्या अवयवाने करतात? माणसांच्या भावना कुठे उद्भवतात? माणसांच्या विचारांमध्ये कधीकधी ‘तर्कापलिकडे’ असाव्या अशा ज्या अंतःप्रेरणा येतात, त्या कोणत्या जागेतून येतात ? तीन्ही प्रश्नांचे उत्तर मेंदू’ हे आहे.
एखादी व्यक्ती विचार करते आहे, तिच्यात काही भावना उपजल्या आहेत किंवा त्या व्यक्तीची अंतःप्रेरणा तिला काही सांगते आहे हे सारे आपण अखेर त्या व्यक्तीच्या वागणुकीच्या निरीक्षणांमधूनच ठरवतो. जर अशा निरीक्षणांमध्ये व्यक्तीची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसले तर आपण विचार/भावना अंतःप्रेरणा ओळखणार तरी कश्या ? स्थितीतले बदल उर्फ ‘वागणे’ यातूनच विचारासारख्या गोष्टींची चाहूल लागणार ना ? आणि वागणूक ही इंद्रियांनी केलेल्या निरीक्षणांमधूनच समजणार ना? अशी निरीक्षणे ज्ञानेंद्रियांकरवी मेंदूकडे जातात. मेंदूच्या रचनेत अशी पूर्वी केलेली निरीक्षणेही साठलेली असतात. नवीजुनी निरीक्षणे मिळून काही प्रक्रिया होते आणि अखेर आपण ‘त्याला जाणवले’, ‘त्याला वाटले’, ‘त्याला सुचले’ असे काहीतरी जाहीर करतो. जर आपण असे काही ‘जाहीर’ केलेच नाही तर आपल्या निरीक्षणांचे निष्कर्ष गुप्तच राहणार, आणि आपण काही निष्कर्ष काढले हे इतरांसाठीच नव्हे तर स्वतःसाठीही शंकास्पदच राहणार.
निरीक्षणे आणि मेंदूतील जुन्या निरीक्षणांचा साठा यांच्यातील प्रक्रियेसाठी काही अमूर्त, अनाकलनीय असा चेतनेसारखा घटक कार्यरत असतो का ? असा घटक तर्कशुद्ध वैज्ञानिक तपासाच्या कक्षेबाहेर असतो का ? विचार/भावना/अंतःप्रेरणा जिथे उपजतात त्या मेंदूच्या एका अभ्यासकाचे मत ऐका “मानवी जाणिवेच्या आविष्काराचे स्पष्टीकरण एखाद्या अतिशायी (transcendent) तत्त्वाला साकडे घातल्याशिवाय वैज्ञानिक पद्धतीने देता येणार नाही, असे मानायला कोणतेही कारण नाही.” (Mechanics of the Mind, कॉलिन ब्लेकमोअर, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, १९७७). सोबतच ब्लेकमोअर गिल्बर्ट राईल (उपलशी ष हिश चाळपव, हचिन्सन, १९६७) या तत्त्वज्ञाची मतेही नोंदतो. आपल्या मनांमध्ये एक अज्ञात, अमूर्त विश्व असते; एक स्वतंत्र, अदृश्य व्यक्तित्व असते आणि त्याच्या क्रिया अज्ञेय आणि अस्पर्शनीय असतात, हे राईलने खोडून काढले. त्याऐवजी माणसांच्या क्रियांच्या निरीक्षणांतूनच जाणिवेची संकल्पना त्याने मांडली. जर हे खरे असेल तर जाणिवेचा अभ्यास हा मेंदूच्या अभ्यासाच्या कक्षेत येतो. याचा अर्थ जाणिवेचे वेगळे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही किंवा स्पष्टीकरण द्यावेसे काही नाहीच, असे मात्र नाही. राईल फक्त असे म्हणतो की ‘यांत्रिक’ मेंदूत भासमान चैतन्य (a ghost in the machine) मानायची गरज नाही. एक अत्यंत व्यामिश्र (complex) यंत्रच जाणिवेसारखा ‘गुण’ दाखवण्यासाठी पुरे आहे.
राईलच्या पुस्तकाआधीही ‘यांत्रिक’ व्यवहारातून जाणिवेसारखे व्यवहार कसे उद्भवतात याकडे लक्ष वेधणारी काही संशोधने झाली होती. एक म्हणजे गणिती प्रमेयांची सिद्धता यांत्रिक पद्धतीने तपासता येते का, यावरचे अॅलन ट्युरिंगचे संशोधन (१९३५). प्रमेये सिद्ध-असिद्ध ठरवणारी निर्णयप्रक्रिया करणारे एक काल्पनिक यंत्र ट्युरिंगने घडवले. अशा यंत्रात काही नियमावली साठवता येते, व ती यंत्राला दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करून एखादे प्रमेय सिद्ध की असिद्ध ते ठरू शकते. मिळणाऱ्या माहितीनुसार नियमावली बदलू शकते. पुरेशी किचकट नियमावली तर यंत्रातही बदल करू शकेल. आज संगणकांमुळे प्रसार पावलेली input, programme, output, learning programmes ची सारी परिभाषा या ट्युरिंगच्या कल्पनेतील ‘वैश्विक-सांत-स्थिति-यंत्रा’वर, Universal Finite State Machine वर बेतलेली आहे. काही निरीक्षणांत असत्य न ठरलेल्या प्रमेयांसाठी हे यंत्र पुरत नाही म्हणजे ‘सत्य’ नेहेमीच “सिद्ध’ होत नाही हेही इथे नोंदायला हवे.
मॅक्कुलक आणि पिट्स या अमेरिकन मज्जाशास्त्रज्ञांनी (neuroscientists) १९४३ साली मेंदूतील क्रिया या ट्युरिंग यंत्राशी समरूप असतात असे दाखवून दिले. म्हणजे मेंदूतील सर्व घडामोडी या अखेर गणिती निर्णयप्रक्रियेसारख्या असतात. त्यांचे उत्तर मात्र ‘म्हणून हे सिद्ध झाले’ अशा रूपात दिसत नाही. ते मेंदूधारक व्यक्तीच्या वागणुकीतूनच व्यक्त होते.
जर वागणूक मेंदूतील क्रियांमुळे ठरते, मेंदूत गणिती/तार्किक अशाच क्रिया होतात आणि क्रियांचे (वागणूक) निरीक्षण जाणिवेचे स्पष्टीकरण देण्यास पुरेसे आहे तर चैतन्यासारखा अतिशायी घटक मानण्याची गरज नाही. ‘साध्या’, ‘यांत्रिक’ अशा क्रियांमधूनच जाणिवेची संकल्पना घडवता येते.
आपण असे समजतो की तर्कशुद्ध विचारांपेक्षा भावना वेगळ्या असतात आणि तर्कापलिकडली काहीतरी अंतःप्रेरणा नावाची बाबही असते. हे मानणेही आवश्यक नाही. एक लक्षात घ्यावे की माणसाचा मेंदू ही एक अत्यंत व्यामिश्र, अत्यंत जटिल रचना आहे. मेंदूत सुमारे वीस अब्ज (दोन गुणिले दहा घात दहा) मज्जापेशी असतात. प्रत्येक पेशी इतर हजार ते दहा हजार पेशींशी जोडलेली असते. अशा मेंदूत एखादी क्रिया नेमकी कशामुळे घडेल, कोणकोणत्या टप्प्यांनी घडेल, हे सांगणे अर्थातच अत्यंत अवघड कधीकधी तर अशक्यही असते.
पण मेंदूची ही रचना नैसर्गिक निवडीतून उत्क्रांत झालेली आहे. म्हणजे ती रचना, तिची कार्यपद्धती, ह्या निसर्गाच्या रामरगाड्यात जगण्यासाठी, तगण्यासाठी अनुरूप झालेल्या आहेत. जगणे-तगणे जमण्यास लायक अंगे मनुष्यजातीभर पसरलेली आहेत, तर नालायक अंगे तुलनात्मक छाटणीतून बाद होत आहेत. उत्क्रांती ही न संपणारी क्रिया असते, त्यामुळे आज काही परिस्थितीशी जुळती अंगे सर्वांमध्ये का नाहीत किंवा काही परिस्थितीशी फटकून राहणारी अंगे कशी टिकलेली आहेत, असले प्रश्न गैरलागू आहेत.
जे आहे ते व्यक्तीबाहेरील जगाशी जुळते होत जाणारे आहे, हे मात्र निर्विवाद. आणि हे बहुतांश माणसांसाठी खरे आहे.
आपण जन्माआधी घडतो ते आपल्यासारख्याच दोन व्यक्तींच्या गुण-कणांच्या, Genes च्या मिश्रणातून. एकदा का या जेनेटिक वारशापासून आजूबाजूची अन्नद्रव्ये घेत आपण घडू लागलो की आपल्याला अनुभव येऊ लागतात. हे अनुभव म्हणजे त्या त्या वेळच्या परिस्थितीला प्रतिसाद असतात जे प्रतिसाद मेंदूच्या रचनेतही बदल करत असतात. अशा या जीनदत्त, अनुभवसिद्ध यंत्रणेला आपली ज्ञानेंद्रिये नव्या परिस्थितीची चित्रे देत असतात. आधी झंकारणाऱ्या अनेक तारांच्या ‘वाद्या’ला नव्याने ‘टिचक्या’ मारल्या जात असतात. या सर्व ‘झंकारण्या’चे कर्मेंद्रियांमधून दिसणारे परिणाम मात्र मेंदूधारक व्यक्तीला जगायला मदत करणारेच असतात.
काही ‘झंकारां’ची उत्पत्ती कशी कशी झाली ते स्पष्टपणे सांगता येते. अशा तार्किक मुळे उघड असलेल्या क्रियांना आपण विचार म्हणतो. जिथे आपल्या वागणुकीची मुळे तर्काच्या अपार व्यामिश्रतेमुळे उघडी करता येत नाहीत, तिथे ती वागणूक विचारांऐवजी भावनांवर बेतलेली आहे, असे आपण म्हणतो. दोन्हीकडचे झंकारणे मात्र एका यंत्रवत् रचनेवर होणाऱ्या आघातांच्या नियमबद्ध, नियत अशा परिणामांमधूनच घडते. विचारांमागची तर्कपरंपरा आपण तपासू शकतो, तर भावनांमागील ‘गुंता’ सोडवता येत नाही पण दोन्हींमध्ये तर्कशुद्धतेच्या दृष्टीने कोणताही फरक नाही.
अंतःप्रेरणेनेच सर्जन होते, विचाराने नवनिर्मिती होत नाही या वाक्याबाबतही असेच सांगता येईल. जिथे तर्कपरंपरा ओळखता येते, इतरांना दाखवता येते, तिथल्या ‘नवनिर्मितीला विचार म्हणतात. जिथे तर्कपरंपरा ‘उघड’ नसते तिथे सर्जनशीलतेचे श्रेय अंतःप्रेरणेला दिले जाते. ‘अंतःप्रेरणा’ ही केवळ व्यामिश्रतेने दडवलेल्या विचारांसाठी वापरली जाणारी ‘शॉर्टहँड’ संज्ञा आहे येवढेच. आहार-निद्रा-मैथुन-भय यांचा परिणाम प्राण्यांवरच होताना दिसतो, आणि मानवात मात्र या ‘प्राथमिक’ बाबींशिवाय वेगळेही काही असते या मताबाबतही हाच युक्तिवाद वापरता येईल.
विजा कडकडताना आपण आडोसा शोधतो, कारण आपला पूर्वीचा अनुभव सांगतो की विजांना सामोरे जाणे आत्मघातकी आहे. ‘भय’ आपल्याला विजा टाळायला ‘शिकवते’.
मुलगी ‘सांगून जाते’ आणि मुलगा ‘मागणी घालतो’, ही असंमिती (assymmetry) उत्क्रांतीच्या तत्त्वाशी जुळती आहे, हे दाखवता आले आहे.
बुद्धीचा ‘जाहीर’ वापर मैथुनाच्या आणि त्यातून वंशसातत्याच्या शक्यता वाढवतो, हेही दाखवता आले आहे.
मी आज आपला हक्क नसलेली वस्तू चोरण्याला शिक्षा देणारी समाजरचना मान्य करावी कारण कधीतरी मी एकटा माझ्या हक्कांच्या वस्तूंचे रक्षण करू शकणार नाही या जाणिवेला (विचाराला, भावनेला, अंतःप्रेरणेने समजलेल्या बाबीला) नीती म्हणावे, असाही प्रघात आहे.
माणसांमध्ये या आहार-निद्रा-मैथुन-भयाबाबत आत्मरक्षण करणाऱ्या कल्पना आहेत तशाच त्या प्राण्यांमध्येही आहेत. माणसांनी व्यामिश्र सामाजिकतेतून या भावना, ही मूल्ये रोजमर्रा व्यवहारापासून दूर नेऊन त्यांना ‘संस्थां’चे रूप दिले आहे, येवढाच काय तो फरक. सौंदर्याच्या कल्पनांबाबतही अशीच मांडणी करता येते.
ही सगळी विचारधारा चैतन्य नाकारणारी, ठामपणे इहवादी, जडवादी अशी आहे.
नीतीच्या संकल्पनेवर थांबावे की वागणुकीच्या नियमांना धर्माच्या पातळीवर न्यावे, या प्रश्नावर ह्या विचारधारेनुसार धर्म अनावश्यक ठरतो. जशी धर्माची परंपरा जगात सगळीकडे आणि सर्वकाळ भेटत आलेली आहे, तशीच धर्माला अनावश्यक मानणारी परंपराही माणसांपुरती नेहेमीची, सर्वत्र आढळणारी आहे. या धर्म नाकारणाऱ्या परंपरेला ‘आधुनिकता’ ही संज्ञा वापरणे मात्र तसे ‘ताजे’ आहे. लोकसत्ते च्या ५ फेब्रुवारी २००५ च्या अंकातील आव्हान : आधुनिकतेचे आणि परंपरेचे या लेखात कुमार केतकर नोंदतात, “वस्तुतः या (आधुनिकतेच्या) संकल्पनेचा उदयच मुळी रेनेसाँनंतर युरोपात जी वैचारिक-वैज्ञानिक क्रांती झाली, तेव्हा झाला. त्या संकल्पनेत ऐहिक समृद्धी नव्हे, तर मानसिक प्रगल्भता अभिप्रेत होती. धर्मवाद नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन अभिप्रेत होता . एकाच विचाराचा दुराग्रह नव्हे, तर उदारमतवाद अभिप्रेत होता. सरंजामशाही, हुकूमशाही, धर्मसत्ता अभिप्रेत नव्हती, तर लोकशाही अभिप्रेत होती. म्हणजेच आधुनिकता याचा अर्थ सहिष्णुता, उदारमतवाद, लोकशाही, मानवी हक्क, कलाविष्कार, सर्जनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, विषमता निर्मूलन, कल्याणकारी सरकार असा होता. याचा अर्थ असा नव्हे की सर्व परंपरा टाकाऊ आहेत. कारण मानवी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्जनशीलतेने, वैज्ञानिकतेने, लोकशाही कल्याणकारी विचाराने झेप घेतली होती. त्याचप्रमाणे त्या प्रगत विचाराला त्यात्यावेळेस विरोधही झाला होता. म्हणजे परंपरा दोन्ही होत्या वा आहेत.”
आता या भूमिकेतून टॉयन्बी-इकेडा संभाषणाचा (विवेक आणि अंतःप्रेरणा, अंक १५-१०, जाने. २००५) विचार केला तर त्या ‘मान्यवरां’चे विचार मला अपुरे वाटतात. त्यांची परिभाषा उदारमतापेक्षा धर्मवादाकडे झुकलेली वाटते. ते विशिष्ट धर्माची भलामण करत नाहीत, हे खरे, पण अप्रत्यक्ष विवेकविरोधही तिथे आहे. सौम्य, समन्वयवादी मांडणीच्या आडोशाला वाढत्या भौतिक ज्ञानाची दखल न घेणेही आहे. मनाची प्रगल्भता अपुरी पडत आहे. याच संदर्भात भ.पां. पाटणकरांच्या एका जुन्या पत्रातील (अंक १५.१, एप्रिल २००४) वाक्य आठवते “मननाधारित विश्लेषण आणि मूल्ये व हेतू यांच्या चर्चेत नैसर्गिक विज्ञानाने भर टाकलेली नाही, आणि (असे विश्लेषण व चर्चा) एखाद्या समाजाच्या ज्ञानोदित (enlightened) राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक विकासाची आवश्यक पूर्व-अट आहे” मूळ वाक्य F. Brent च्या २००१ मधील लेखनातून इंग्रजीत मांडले होते.
इथे नैसर्गिक विज्ञानाच्या उपलब्धींचे, मननशीलतेचे, आपल्या ज्ञानक्षेत्रापासून (अंतःप्रेरणेशिवायच) इतर शास्त्रांमध्ये मनःसर्जनाच्या वाटा सुचवण्याच्या क्षमतेचे अपुरे आकलन आहे असे ‘जाणवते’ “.
आज ‘आहार-निद्रा-मैथुन-भय’ या चौकडीतून भावना कशा घडतात, वर्तणूक कशी घडते, स्वार्थातूनच स्वार्थत्यागी सहकार्य कसे उभे राहते, यांवर नैसर्गिक विज्ञानाने बराच प्रकाश पाडला आहे. सर्जकतेला काय मारक ठरते, काय पूरक ठरते, यावरही सूचक बाबी सापडत आहेत. पण विज्ञानाच्या शिस्तीने मननाच्या नावाखाली कल्पनेचे घोडे नाचवण्यास मात्र आळा बसलेला नाही, त्यामुळे Brent सारख्यांचे ‘व्यक्तिगत अज्ञानाधारित युक्तिवाद’ (arguments from personal ignorance) सुरूच असतात. टॉयन्बी-इकेडांना लागू पडेल असे श्री.म. माट्यांचे एक निरीक्षण नोंदतो, पु.ल.देशपांडे यांनी उद्धृत केलेले ‘‘शंकराचार्य, रामानुजाचार्य, यांच्यासारखे जे प्रखर बुद्धिमान लोक आहेत, ते मला केवळ तालीमबाजांसारखे वाटतात. . . आतून माझे मन सांगत असते की, गड्या, ही कसरत आहे, हे काही खरे नव्हे. खरे नव्हे म्हणजे केवळ अनुमानाचे आहे. वास्तवाशी ओळख आहे व ती दाखवलेली आहे, असे नव्हे.” तर निर्णय आपलाच आहे. विज्ञानाधिष्ठित विवेकाचे ‘हेल्मेट’ घालायचे की ‘अहाहा! अंतःप्रेरणा!’ म्हणत ‘मनना’च्या नावाखाली अविवेकाची कास धरायची?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.