संपादकीय विशेषांकासंबंधी

येत्या काही महिन्यांत काही विशेषांक काढायचा प्रयत्न सुरू आहे. पाणी-जमीन-माणूस यांच्यातले परस्परसंबंध, भारतातील आरोग्यसेवा, कुशिक्षण, स्वयंसेवी संस्था, विविधांगी विषमता, असे अनेक विषय सुचत आहेत. काहींसाठी अतिथी संपादकही योजले गेले आहेत.
ज्येष्ठ साहित्य-समीक्षक म.वा. धोंड आपल्या जाळ्यातील चंद्र या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लिहितात, “एखादे पुस्तक वाचताना मला काही प्रश्न पडतात, काही उणिवा जाणवतात, काही दोष खटकतात. त्या दोषांचे निराकरण कसे करता येईल उणिवा कश्या भरून काढता येतील आणि प्रश्नांचा उलगडा कसा करता येईल, यांचा मी विचार करू लागतो आणि त्यात मन गुंतते. हा गुंता सहजी सुटत नाही. कित्येक वेळा सोडवता सोडवता वाढतही जातो. यात कित्येक महिने वा वर्षेही जातात.”
पुस्तक वाचताना धोंडांचे जे होते तेच बहुतेकांचे जगताना होत असते. आपल्या भोवतालचे जग, समाजाचे व्यवहार, संबंधितांचे मनोव्यापार हे सारे आपण पुस्तके वाचल्यासारखे ‘वाचत’ असतो. सोबतच पुस्तके-नियतकालिकेही वाचत असतो. एक महत्त्वाची गोष्ट प्रथमच लक्षात येते की पुढ्यातील ‘पुस्तकात’ नियमितताही आहे आणि गुंतागुंतही आहे. एक प्रश्न, एक उणीव, एक दोष, असे सुटे करणे अवघड आहे. बरेचदा तर प्रश्न मांडणेही अवघड, जवळपास अशक्य वाटू लागते. वापरातली परिभाषा अपुरी वाटते. वर्गीकरणे शंकास्पद वाटतात. दृष्टिकोन मर्यादित वाटतात. उपलब्ध माहिती आपल्या निरीक्षणाशी जुळत नाही. जे काही नियमित, आकलनीय असे असते, ते वाढवायला आपण धडपडतो. अशा धडपडीत काही जागी सुलभीकरण करावे लागते. काही विशिष्ट अनुभवांवरून सामान्य, ‘जनरल’ निष्कर्ष काढावे लागतात. काही घटकांचे अमूर्तीकरण, अॅब्स्ट्रॅक्शन आवश्यक असते. आणि या प्रत्येक वैचारिक क्रियेभोवती वेगवेगळ्या मतांचा गोंगाट असतो. स्नेही-परिचितांशी चर्चा, वाचन, अशानेही गोंगाट कमी होत नाही.
यातून काही मजेदार भूमिका घडतात, ‘खास’ वृत्ती बळावतात. यांतल्या एका प्रकाराचे वर्णन केले जाते ते ‘जेव्हा हातात फक्त हातोडी हे एकच हत्यार असते, तेव्हा सर्व प्रश्न खिळ्यांसारखे दिसू लागतात’, या चुटकावजा वाक्याने. सर्व प्रश्नांवर एकच उत्तर सुचू लागणे, हा याचा गाभा ‘लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाएँ!
याचे एक उदाहरण पाहू. स्वातंत्र्यानंतरची पहिली वीसतीस वर्षे भारत शेतमालाची आयात करत असे किंबहुना अशा आयातीवरच जगत असे. आणि शेतमालाचे उत्पादन वाढवण्याचा एकच मार्ग हातात होता सिंचन. महाराष्ट्र शासनाने १९७० च्या आसपास यासाठी एक ‘लाभक्षेत्र विकास प्राधिकरण’, Command Area Development Authority (CADA, कडा) नावाची यंत्रणा घडवली. एखाद्या सिंचन योजनेचा लाभ घेणारे सर्व क्षेत्र एकत्र करायचे, आणि शासनाच्या विविध खात्यांमधली माणसे जमवून या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी एक संच किंवा ‘चमू’ उभारायची. असा एक ‘कडा’ एका अभियंत्याच्या अखत्यारीत होता. त्याने शेतकऱ्यांना पाणी तर जास्त उपलब्ध करून दिलेच, शिवाय काही सरकारी जमिनी कसायचीही परवानगी दिली. धरणांखाली बुडेल अशी जमीन सरकार ‘भूसंपादित’ करते, पण तशी सर्वच जमीन वर्षभर बुडलेली नसते. तर ही जमीनही मूळ मालकांना ‘वापरायला’ दिली गेली. पावसानेही साथ दिली, आणि त्या वर्षी विक्रमी पीक आले. धान्यसाठवणीच्या सोई अपुऱ्या असल्याने ज्वारीची किंमत किलोमागे ऐंशी पैशांवरून पन्नास पैशांवर घसरली. ज्वारीच्या उपभोक्त्यांपेक्षा उत्पादक संख्येने बरेच जास्त असल्याने ही भाव-घट आपत्तीच ठरली. कडाप्रमुखांना आपल्याच क्षेत्रात निदर्शने व रोष व्यक्त करण्याचे इतर प्रकार भोगावे लागले. प्रश्न फक्त उत्पादनवाढीचा नव्हता, तर शेतकऱ्यांच्या नगद उत्पन्नवाढीचा होता!
हे आजही संपलेले नाही. आजही कोणी राजकारणी, कोणी समाजधुरीण “मी कापसाचे (किंवा साखरेचे) उत्पादन वाढवून दाखवीन, तेही दुपटीतिपटीने”, असे म्हणतच असतो. हाती आहे फक्त हातोडी. चार खिळे मारले, दोन उचकटले सुटलाच प्रश्न! या वृत्तीला अर्थातच विवेकी, विचारी मानता येत नाही. याच हातोडी-खिळे वृत्तीची एक जास्त व्यापक, जास्तच जहाल आवृत्तीही आहे. तिचीही चव एका चुटक्यातूनच देतो.
एक माणूस दिवेलागणीनंतर रस्त्यावरच्या दिव्याखाली जमिनीवर काहीतरी शोधत असतो. दुसरा एक जण त्याला विचारतो, “काय शोधतो
आहेस ?” पहिला माणूस सांगतो, “मघाशी शेतात काम करत असताना अंगठी हरवली. जाताना बोटात होती. परतताना वेशीजवळ पाहिलं, तर नव्हती.”
दुसरा माणूस म्हणतो, “अरे वेशीबाहेर शेतात अंगठी हरवली ना? मग इथे गावातल्या रस्त्यावर का शोधतो आहेस ?” “इथे उजेड आहे ना! शेतात अंधार आहे म्हणून शोधता येत नाही!” पहिला माणूस सांगतो. आपल्याला ज्या क्षेत्रात माहिती आहे त्यातच जगभरातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील, असा हा भाव आहे. आपल्या अभ्यासाच्या क्षेत्राबाहेर उत्तरे असणारे प्रश्न पुढ्यात आले, तर या भावामुळे ते ओळखताही येत नाहीत. नागरीकरणावरच्या विशेषांकानंतरच्या चर्चेत दोन भिन्न दिशांनी अशी ‘चर्चात्मक’ टीका दिसली. एकीकडे वास्तुरचना-नगरनियोजन आणि दुसरीकडे अर्थशास्त्र. नागरी प्रश्नांची उत्तरे या दोही क्षेत्रांना एकेकटी देता येणार नाहीत आणि एकत्रित विचारांतून उत्तरे शोधायच्या दिशा तरी सापडतील, याकडे दुर्लक्ष झाले.
पण वास्तव अशा प्रकारच्या विभक्त सुलभीकरणाला न जुमानणाऱ्या गुंतागुंतीचे असते, व्यामिश्र, लोश्रिशु असते. व्यामिश्रतेतही ‘थर’ असतात. काही भाग काही तंत्रांनी समजून घेता येतो, तर काही भागात उपयोगी अशी तंत्रेच सापडलेली नाहीत. नागरीकरणाच्या अंकातला जेन जेकब्सचा लेख प्रश्नांचे एक वर्गीकरण देतो. सरळ-सोपे प्रश्न, अव्यवस्थित व्यामिश्रतेचे प्रश्न आणि सुव्यवस्थित (किंवा विरचित) व्यामिश्रतेचे प्रश्न. हे वर्गीकरणच सुचवते की नागरी समस्या विरचित, organized व्यामिश्रतेच्या आहेत आणि अशा प्रश्नांना सरळसोट उत्तरे नसतात. त्याला लागतात नमुना-तपासण्या, case studies. एकाच पातळीवरचे नमुना-अभ्यासही पुरत नाहीत, तर वेगवेगळ्या पातळ्यांवर ते प्रश्न कसेकसे दिसतात ते तपासावे लागते.
जेन जेकब्सचा लेख सहजपणे आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरल्या विशेषांकात जाऊन बसला असता, आणि माधव गाडगिळांचा त्या अंकातला लेख सहज नागरीकरण विशेषांकात घालता आला असता! असे ‘बहुस्तरीय’ तपास आवश्यक असतात, हे शास्त्रांच्या नावांमधूनही स्पष्ट झालेले आहे जैवरसायनशास्त्र, पुराजीवशास्त्र, पोलिटिकल इकॉनॉमी . . . . . . समाजापुढचे बहुतेक प्रश्न विरचित व्यामिश्रतेचे असतात. अशा प्रश्नांच्या सोडवणुकीचे मार्ग नमुना-अभ्यासांपासून सुरू होतात. असे अभ्यास पथदर्शक, हीीीींळल असतात. ते उत्तरे ‘देत’ नाहीत, फक्त उत्तरे कोणत्या दिशेने अभ्यास केला तर सुचतील, ते सांगतात, ते सुचवतात.
गिरण्या बंद पडण्याच्या परिणामांवरचे ब्रेमन-शहा यांचे पुस्तक असा एक नमुना-अभ्यास दाखवते. ते पुस्तक उत्तरे देत नाही, उत्तरांचे क्षेत्र सुचवते. पण आपल्याला होते अंतिम उत्तरे, ठाम उत्तरे सुचण्याची घाई. मग ‘इथे हातोडी नाही’ किंवा ‘दिव्याखाली का पाहत नाही ?’, अशा प्रतिक्रिया येतात. का घडत असेल असे?
याला अनुदार उत्तर आहे ते असे आजकाल ‘की’ आणि ‘गाईडां’वरून अभ्यास करतात, म्हणून रेडिमेड उत्तरे हवीशी वाटतात. तिरसटच उत्तर, हे. दुसरे जास्त खरे असेलसे उत्तर म्हणजे आपण विरचित व्यामिश्रतेला सरावलेलो नाही, म्हणून आपल्याला वाट शोधत, टप्प्याटप्प्याने पुढे जाणे सुचत नाही. जेव्हा व्यामिश्रतेचा तपशीलवार अभ्यास सुरू होत होता तेव्हा नोंदले जाई की अमुक दोन घटकांमधला संबंध (सवयीचा) लीनियर नसून (अनोळखी असा) नॉनलीनियर आहे. कारणांमध्ये थोडासाच फरक झाल्यास परिणामांमध्ये थोडासाच फरक, हे सवयीचे होते, पण परिणामांमध्ये प्रचंड फरक हे अनोळखी होते. खरे तर कारणांशी विपर्यस्त, प्रमाणहीन परिणाम दैनंदिन जीवनात अनोळखी नाहीत अभ्यासांत मात्र ते अनोळखी होते. काही मिलिग्रॅम विषाने पाऊणेक क्विंटलचा देह ‘मरतो’, घोड्याच्या नालेचा खिळा हरवल्याने एखादे साम्राज्य बुडू शकते, हे अनोळखी नाहीच. पण अशा घटनांपासून उपयुक्त ज्ञान कमावण्याची आपल्याला सवय नाही. हे लीनियर-नॉनलीनियर विभाजन फारदा उगाळले गेल्यावर एक शास्त्रज्ञ तडकला. तो म्हणाला, “आवर्जून एखाद्या क्रियेचे नॉनलीनियर असणे नोंदणे, हे एखादा नवा प्राणी हत्ती नाही हे आवर्जून नोंदण्यासारखे आहे !” विरचित व्यामिश्रता ‘सोप्या’ उत्तरांच्या स्थितीपेक्षा कैक पट जास्त प्रमाणात भेटते. पण सवयी सहज बदलत नाहीत. ‘मला ठाम उत्तर माहीत नाही, पण या दिशेला उत्तर सुचेल असे वाटते.’ हे म्हणणारा फारसा पाठिंबा मिळवू शकत नाही ‘सार्वमत’ तर सोडा, बहुमतही मिळवू शकत नाही. ब्रेमन-शहांनी ‘आता गिरण्यांमध्ये काम करत नाही आम्ही’ येवढ्याच भूमिकेतून नमुना-अभ्यास प्रकाशित केला- पुढे ‘तर आता आपण असे करू…’ पर्यंत ते गेले नाहीत. त्यांनी शासनाच्या, समाजाच्या नियंत्रणाअभावी बाजारपेठ ‘क्रूर’ ठरू शकते हे नोंदले. व्यापक सामाजिक सुरक्षायंत्रणेशिवाय हे क्रौर्य’ आटोक्यात येणार नाही, हे नोंदले. आता पुढचे पाऊल कोणी घ्यायचे ? त्यात काय अडचणी येऊ शकतील? असल्या प्रश्नांवर स्मिता गुप्तांनी लिहिले.
हे सारे विशेषांकातून खांदेवाल्यांनी विरचित स्वरूपात मांडले. प्रश्न सुटल्याचा दावा ना ब्रेमन-शहांनी केला, ना खांदेवाले आजचा सुधारक यांनी. पथदर्शन (मार्गदर्शन नव्हे त्या शब्दाला ‘चालविसी हाती, धरोनीया’ चा वास आहे !) तर झाले. आता पुढे काय ? आणि ते कोणी करायचे ? कसे ? मुळात वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके, ग्रंथ, हे फक्त पथदर्शनच करू शकतात. त्यालाही मर्यादा असतात. खांदेवाल्यांना जेव्हा ब्रेमन-शहांचे पुस्तक उपलब्ध झाले तेव्हा तो चांगला नमुना-अभ्यास आहे, हेच जाणवले. त्यातही छायाचित्रांचा परिणाम मोठा होता आणि मजकुरातले वर्णन-विश्लेषण हलके होते. पण शहांपेक्षा (छायाचित्रांपेक्षा) जास्त जाणीवपूर्वकपणे ओमन (मजकूर लिहिणारे) सामान्य माणसापुढे आपला अभ्यास मांडत होते तज्ज्ञांपुढे नव्हे. या एका गुणामुळे मजकुराचे मराठीकरण आसु च्या वाचकांपुढे मांडायचे सुचले. एक आठदहा तज्ज्ञांची यादीही घडवली, जे या मजकुराच्या निमित्ताने मते मांडतील अशी अपेक्षा होती. त्या यादीत अर्थशास्त्री, कामगार-संघटनांशी संबद्ध लोक, कामगारक्षेत्राचे अभ्यासक, वस्त्रोद्योगाचे अभ्यासक, स्त्रीवादी अभ्यासक, विधिज्ञ, असे अनेक जण होते. पण या यादीतील अनेकजण वेगवेगळ्या कारणांमुळे ‘लिहिते’ झाले नाहीत. जे हाती आले ते दर्जेदार आहे पण विविध अंगे तपासण्याच्या दृष्टीने मर्यादित आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही विचारी माणसाला समजेलसे आहे. हे मुद्दाम ठसवण्याचे कारण एवढेच की हातोडी-खिळा वृत्ती, शेतात हरवलेली अंगठी दिव्याखाली शोधायची वृत्ती, या बाबी तज्ज्ञांमध्ये, नोकरशहांमध्ये, तंत्रशहांमध्ये ‘अधिकाऱ्यांमध्ये ज्या प्रमाणात दिसतात, त्या प्रमाणात सामान्य पण विवेकी लोकांमध्ये दिसत नाहीत!
जे घडले ते ब्रेमन-शहांना हवे होते, असेही मानता येईल. आधी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला अशा मराठीकरणाची परवानगी मागितली. ‘तुमच्या नियतकालिकेचे अंक पाठवा’, ‘प्रतिक्रिया कोणकोण देणार?’ अशा पत्रापत्रीत चक्क आठ महिने घालवून ऑयुप्रे ने अखेर ‘परवानगी ब्रेमन-शहाच देऊ शकतील’ असे कळवले! याउलट एका संध्याकाळी पाच वाजता केलेल्या ई-मेलला दुसऱ्या पहाटे पाचच्या आत ब्रेमन यांनी उत्तर दिले स्वतःतर्फे व शहांतर्फे परवानगी देणारे!
एकूणच नमुना अभ्यासांचा आसु त आदर केला जातो. सिंहस्थ-कुंभमेळ्याचा अभ्यास, भ्रष्टाचाराचे अनुभवजन्य विश्लेषण, मृदसंधारणाच्या कामांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी घातलेले घोळ, कृषिउत्पन्न बाजार समित्यांना दिसणारे जागतिकीकरण, यावरची पत्रे व यावरचे लेख जसेच्या तसे (जुजबी काटकसरीनंतर) छापले जातात. पाककृतींवरच्या सर्वोत्कृष्ट ग्रंथांपेक्षा वाईट पाकनिष्पतीचे जेवण जास्त महत्त्वाचे!
१९६१-६२ मध्ये नागपूर विद्यापीठाने दोन भारतीय व दोन अमेरिकन विद्यार्थ्यांचा एक परिसंवाद घडवला. विषय होता, ‘यूनोने खड़े सैन्य ठेवावे का ?’ भारतीयांची भाषणे सार्वभौमत्व, हस्तक्षेप अशा तात्त्विक मुद्द्यांभोवती रचलेली होती. अमेरिकन विद्यार्थ्यांनी परिणामकारक आकार आणि क्षमतेचे खडे सैन्य ठेवायचा खर्च यूनोला झेपणारच नाही, असे दाखवून दिले. वादच मिटला!
एका वेगळ्या संदर्भातले स्टुअर्ट कॉफमन या व्यामिश्रतेच्या अभ्यासकाचे याबाबतचे मत लक्षणीय आहे. कॉफमन म्हणतो, “अशा काट्यावरच्या जगात आपण दूरवरच्या भविष्यकथनाची नाटके सोडून द्यायला हवीत. आपल्याला आपल्या सर्वोत्तम क्रियांचे खरे परिणाम समजू शकत नाहीत. आपण सर्व ‘खेळाडू’ स्थानिक शहाणपण दाखवू शकतो, वैश्विक शहाणपण नाही. आपण एवढेच करू शकतो, सगळे जण एवढेच करू शकतात, की पँट आवरायची, बूट चढवायचे आणि उत्तमात उत्तम जे करू शकतो ते करत राहायचे.’ (In such a poised world, we must give up the pretense of long term prediction. We cannot learn the true consequences of our best actions. All we players can do is be locally wise not globally wise. All we can do, all anyone can do, is to hitch up our pants, put on our galoshes, and get on with it the best we can) (ॲट होम इन द युनिव्हर्स : द सर्च फॉर लॉज ऑफ सेल्फ-ऑर्गनायझेशन अँड काँप्लक्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९५) ।
तर आम्ही ब्रेमन-शहांसोबत पँट सावरायची पद्धत सुचवतो आहोत. पुढील विशेषांकांमध्येही एवढेच करू. हा अल्पसंतोष नसून विवेक आहे, असे मला वाटते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.