इतिहासाचे विज्ञान

इतिहास ही ज्ञानशाखा सामान्यपणे विज्ञानात न धरता मानव्यशास्त्रांजवळची मानली जाते फारतर सामाजिक शास्त्रांपैकी एक, पण त्यांतही सर्वांत अवैज्ञानिक. शासनव्यवहाराचे ते ‘राज्यशास्त्र’, अर्थव्यवहाराबाबतचे नोबेल पारितोषिक ‘अर्थ-विज्ञान’चे, पण इतिहास विभाग मात्र स्वतःला ‘इतिहास-विज्ञानाचे विभाग’ म्हणत नाहीत. इतिहासाला तपशिलांची जंत्री मानण्याकडे कल दिसतो, जसे “शोभादर्शकात (घरश्रशळवीलेशि) दिसणाऱ्या आकृत्यांमागे जसा नियम नसतो तसाच इतिहासामागेही नसतो.”
ग्रहांच्या हलचालींमध्ये जी नियमितता असते ती इतिहासात आढळत नाही, हे नाकारता येत नाही. पण मला यातील अडचणी इतिहासाला मारक वाटत नाहीत. खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, परिसरशास्त्र, उत्क्रांतिजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, पुराजीवशास्त्र वगैरे निसर्गविज्ञानाच्या ऐतिहासिक शाखांमध्येही इतपत अडचणी आहेत. दुर्दैवाने लोकांच्या विज्ञानाबद्दलच्या कल्पना भौतिकी आणि भौतिकीसारख्या पद्धती वापरणाऱ्या विज्ञानशाखांवर बेतलेल्या असतात. या विज्ञानशाखांमधील लोक बरेचदा अडाणीपणे त्यांच्या पद्धती जिथे लागू पडत नाहीत अशा विज्ञानशाखांबाबत तुच्छतेने वागतात. या विज्ञानशाखा इतर पद्धती वापरतात उदाहरणार्थ माझे परिसरशास्त्र आणि उत्क्रांति-जीवशास्त्र, यामुळे मला इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी नीटपणे समजू शकतात.
मी वर दिलेल्या ऐतिहासिक विज्ञानशाखा भौतिकीसारख्या शाखांपेक्षा चार मुख्य बाबतीत वेगळ्या असतात पद्धती, कार्यकारणभावाबद्दलच्या धारणा, भाकिते वर्तवण्याच्या क्षमता आणि व्यामिश्रता.
भौतिकीत एखाद्या घटकाचा परिणाम तपासायला प्रयोग केले जातात. तसेच समांतर नियंत्रक प्रयोग इतरत्रही केले जातात. कुठे एक घटक ‘स्थिर ठेवला जातो, तर कुठे इतर घटक. आणि यांतून मिळणाऱ्या अंकबद्ध, संख्यारूप माहितीतून ज्ञान मिळवले जाते. हे धोरण रसायनशास्त्र, रेणु-जीवशास्त्र, वगैरे क्षेत्रांतही उपयोगी ठरते, इतके की लोकांच्या मनांत ही पद्धत, हे धोरण हाच विज्ञानाचा गाभा आहे असा भाव उपजतो. पण असले प्रयोग ऐतिहासिक विज्ञानशाखांमध्ये शक्यच नसतात. तारामंडळे, वादळे, हिमयुगे, ही थांबवता येत नाहीत. राष्ट्रीय उद्यानांमधली अस्वले (प्रयोगाच्या सोईसाठी) नष्ट करता येत नाहीत. डायनोसॉरांच्या उत्क्रांतीला ‘पुनःप्रक्षेपित’ करता येत नाही. त्याऐवजी निरीक्षणे, तुलना आणि ‘नैसर्गिक प्रयोगां’वर भर द्यावा लागतो. नैसर्गिक प्रयोग म्हणजे काय ते पुढे पाहू.
ऐतिहासिक विज्ञानशाखांमध्ये कारणपरंपरेत नजीकची (proximate) कारणे आणि अंतिम (ultimate) कारणे, अशा साखळ्यांचा विचार होतो. भौतिक आणि रसायनशास्त्रात अंतिम कारणे, हेतू (purpose), कार्य (function) या संकल्पना बहुतेक वेळी निरुपयोगी असतात. सजीवांच्या व माणसांच्या रचनांमध्ये मात्र त्या आकलनासाठी अपरिहार्य असतात. जसे आर्क्टिक ससे उन्हाळ्यात तपकिरी असतात, तर हिवाळ्यात पांढरे शुभ्र. जवळचे कारण केसांमधील रंगद्रव्ये व ते घडवणाऱ्या जैवरसायनिक क्रियांमध्ये सापडते. पण जास्त महत्त्वाचे कारण शिकारी जनावरांपासून संरक्षण पुरवणाऱ्या रंगसंगतीत, तिच्या कार्यात असते. याचप्रमाणे १८१५ व १९१८ च्या युरोपात व्यापक युद्धानंतर शांतता प्रस्थापित झाली, येवढ्यावर इतिहासकार थांबू शकत नाहीत. या दोन युद्ध-शांतता साखळ्यांमधल्या फरकांच्या अभ्यासातून काही दशकांमध्ये नवे युद्ध (१९३९) कसे उद्भवले, हे सुचवावे लागते. वायूचे दोन रेणू का एकमेकांवर आपटतात, असा अंतिम कारणाबाबतचा प्रश्न रसायनशास्त्रात पडत नाही.
पुढचा प्रश्न आहे भाकितांचा. भौतिकीसारख्या शास्त्रांमध्ये भाकिते खरी ठरणे ही तत्त्वांची ‘सत्त्वपरीक्षा’ असते. अशी भाकिते उत्क्रांतिजीवशास्त्र, इतिहास, वगैरेंमध्ये शक्य नसतात, म्हणून भौतिकशास्त्रज्ञ या शास्त्रांना कमी लेखतात. ऐतिहासिक शास्त्रे उत्तरप्राप्त (a posteriori) स्पष्टीकरणे तर देतात, पण पूर्वप्राप्त (a priori) भाकिते करू शकत नाहीत. जसे एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याने डायनोसॉर्सचा अंत झाला, हे सांगता येते, पण नेमक्या कोणत्या जीवजाती एखाद्या नव्या टकरीने मरतील, हे सांगता येत नाही. असे असूनही ऐतिहासिक शास्त्रांतील वैज्ञानिक भविष्यात मिळणाऱ्या कोणत्या माहितीने भूतकाळातील घटनांवर काय प्रकाश पडेल, हे सांगत असतातच.
ऐतिहासिक संरचनांबाबत भाकिते वर्तवणे कठीण का असते, हे वेगवेगळ्या प्रकारांनी सांगता येते. माणसे आणि डायनोसॉर्स अनेक परस्परावलंबी घटकांवर अत्यंत व्यामिश्रतेने अवलंबून असतात. यामुळे मूळ स्थितीत जरी नगण्य फरक असले तरी वरच्या पातळ्यांवर मोठाले परिणाम उद्भवू शकतात. १९३० साली एका ट्रक ड्रायव्हरने नीट ब्रेक मारला नसता तर हिटलर मेला असता आणि दुसऱ्या महायुद्धातील लक्षावधी मृत्यू टळले असते. अशा बाबींमुळे जीवशास्त्रज्ञांची धारणा अशी होते हो, सर्व सजीव व्यवस्था संपूर्णपणे भौतिक गुणधर्मांना अनुसरून वागतात, आणि हे गुणधर्म अगदी पुंजयांत्रिकीपर्यंतच्या भौतिकीय ज्ञात नियमांप्रमाणे ठरतात. पण व्यवस्थेतील व्यामिश्रतेमुळे नियत कार्यकारणभावातून भाकिते वर्तवण्याची शक्यता मात्र उद्भवत नाही. पुंजयांत्रिकीतून पहिले महायुद्ध मित्र राष्ट्रे का जिंकली आणि दोस्त राष्ट्रे का जिंकली नाहीत ते सांगता येत नाही.
प्रत्येक हिमनद, तारामंडळ, चक्रीवादळ आणि मानवी समाज हे एकमेवाद्वितीय असतात. एखाद्या इस्पितळात जन्माला येणाऱ्या हजार बाळांपैकी ४८० ते ५२० मुलगे असतील, हे मी बऱ्यापैकी खात्रीने सांगू शकेन पण माझीच दोन मुले मुलगे असतील, हे मी सांगू शकणार नाही. याचप्रमाणे पुरेशा दाट आणि गरजेपेक्षा जास्त अन्न कमावणाऱ्या समाजांमध्ये समाजरचनेतून ‘म्होरक्ये, (राजे!)’ उपजतील ही शक्यता सांगतानाच आपण न्यू गिनी व ग्वादलकनालमध्ये म्होक्यांची संस्था का उपजली नाही ते सांगू शकत नाही. आणखीही एका त-हेने व्यामिश्रता आणि भाकिते न सांगता येणे यांचे वर्णन करता येईल. कारणे आणि परिणाम यांच्यातील साखळ्या फार लांबलचक असतात. प्रत्येक कडी नियत आणि नियमित असूनही मूळ कारण ते अंतिम परिणाम यांच्यात खंड पडतात. काही कारणे वेगळ्याच विज्ञानशाखेतही असू शकतात. अशा अंतरामुळे अभिजात भौतिकीचे नियम पाळत लघुग्रह पृथ्वीवर आपटण्यापासून डायनोसॉर्सच्या अंताचे भाकित करता येत नाही. तर अशा कारणांमुळे इतिहासकारांच्या अडचणी खगोलशास्त्री, हवामानशास्त्री, परिसरशास्त्री, उत्क्रांतिजीवशास्त्री, भूगर्भशास्त्री, पुराजीवशास्त्री यांच्या अडचणींसारख्याच असतात.
जसे अमेरिकन (स्थानिक, रेड इंडियन) आणि युरोपीय समाजांचा संबंध आल्यावर काय घडेल हे मी ढोबळमानाने सांगू शकतो पण १९६० च्या निवडणुकीत निक्सन जिंकेल की केनेडी, हे मी त्यांच्या दूरदर्शन वादविवादांवरून सांगू शकलो नसतो.
[जेरेड डायमंडच्या गन्स, जर्स अँड स्टीलः अ शॉर्ट हिस्टरी ऑफ एव्हरीबडी फॉर द लास्ट १३००० इयर्स (व्हिंटेज, १९९२) या पुस्तकातील शेवटचे प्रकरण आहे. द फ्यूचर ऑफ ह्यूमन हिस्टरी अॅज अ सायन्स. त्यातील काही भागाचे हे रूपांतर. जेरेड डायमंड हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियाच्या वैद्यक विद्यालयात क्रियाविज्ञानाचे, हिीळेश्रेसूचे प्राध्यापक आहेत. सोबतच परिसरशास्त्र आणि उत्क्रांतिजीवशास्त्रातही त्यांनी लक्षणीय संशोधन केले आहे. त्यांच्या व्हाय सेक्स इज फन ? या पुस्तकाच्या काही भागाची ओळख संजीवनी केळकरांनी मागे आसु च्या वाचकांना करून दिली आहे.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.