चोम्स्कींचा भाषाविचार

आधुनिक भाषाशास्त्राच्या इतिहासात नोम चोम्स्कीचे स्थान अद्वितीय आहे. सन १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या पुस्तकापासून भाषा-विज्ञानात एका अफलातून क्रांतीची सुरुवात झाली. चोम्स्कीच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि संकल्पनांचा भाषा-विज्ञानावरच नव्हे तर इतरही अनेक ज्ञानशाखांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. चोम्स्कीप्रणीत या क्रांतीच्या पूर्वीही आणि नंतरही असंख्य प्रवाह भाषाशास्त्रात आहेत. परंतु आज भाषाशास्त्रातील विभिन्न प्रवाह चोम्स्कीच्या मांडणीच्या अनुषंगाने आपापली भूमिका मांडत असतात यातच त्याच्या सिद्धान्तांचे महत्त्व दडलले आहे. आपल्या भाषाविषयक संशोधनातून चोम्स्कीने मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, संगणकीय भाषाभ्यास ह्या क्षेत्रांमध्ये मूलभूत योगदान दिले आहेच, पण त्याचबरोबर असंख्य सोपे लेख लिहून, शेकडो भाषणे व चर्चासत्रे घडवून भाषाशास्त्र हा विषय रंजक व लोकप्रिय करण्यास मदत केली आहे. आज भाषाशास्त्राकडे वाढलेला कल ही बऱ्याच अंशी चोम्स्कीची देणगी आहे.
याचमुळे ज्यांना भाषाशास्त्रात खास रुची आहे त्यांनाच नव्हे, तर ज्यांना एक सर्वसामान्य जिज्ञासा आहे अशा सर्वांनाच जॉन ल्योन्स लिखित चोम्स्की हे पुस्तक अतिशय उपयुक्त वाटेल. हे पुस्तक चरित्रात्मक नसून यात केवळ चोम्स्कीच्या भाषाविषयक सिद्धान्ताचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोम्स्कीच्या भाषाशास्त्रीय विचारधनाची ही तोंडओळख असून चोम्स्कीचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या कोणत्याही अभ्यासकासाठी एक चांगली पूर्वतयारी हे पुस्तक करून देऊ शकते. हे काम करण्यासाठी जॉन ल्योन्स अगदी सुयोग्य व्यक्ती आहे. एडिंबरा विद्यापीठात चोम्स्कीच्या विचारांचा आणि विकासाचा प्रदीर्घ काळ जवळून अभ्यास करणाऱ्या ल्योन्सना चोम्स्कीच्या विचारांची सखोल जाण आहे. प्रस्तुत पुस्तकात काही प्रसंगी ल्योन्सनी वेगळी मतेही मांडली आहेत. तरीही ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक दस्तुरखुद्द चोम्स्कीनी तपासून पास केले आहे!
चोम्स्कीने संशोधन व लिखाण सुरू केले त्या काळात भाषाविज्ञान ही ‘वैज्ञानिक’ ज्ञानशाखा जवळपास प्रस्थापित झाली होती. युरोपात आणि अमेरिकेत भाषांच्या अभ्यासाची नवीन ‘वैज्ञानिक’ पद्धत विकसित झाली होती. चोम्स्कीच्या कार्यामागे किमान सत्तरऐंशी वर्षांचा भाषाविज्ञानाचा इतिहास आहे. भाषाशास्त्र किंवा भाषाभ्यास ही अनेक शतके जुनी परंपरा असली तरी औद्योगिक क्रांतीनंतरच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाखालील काळात इतर प्राकृतिक विज्ञानांच्या धर्तीवर भाषेचाही अभ्यास व्हायला हवा, त्यासाठी वैज्ञानिक प्रयोग व शोधनपद्धती निर्माण व्हायला हव्या, ह्या जाणिवेतून आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया रचला गेला. निरीक्षण करणे, प्रत्यक्ष सामुग्री/पुरावे गोळा करणे, ती पडताळून पाहणे, अशी इतर विज्ञानांमधील पद्धत भाषांच्या अभ्यासातही आली. याच काळात अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर स्थानिक (आदिवासी) भाषांचा अभ्यास करणे, त्या भाषांच्या नोंदी घेऊन विस्तृत वर्णन करणे, त्यांच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या संकल्पना, पद्धती, तंत्रे विकसित करणे यासारखे कार्य सुरू होते. या काळातील बहुतांश भाषाशास्त्रज्ञ हे मानववंशशास्त्रज्ञही होते ही केवळ योगायोगाची बाब नाही. विभिन्न आदिवासी समाजांचा व संस्कृतींचा अभ्यास करताना बरेच संशोधक अपरिहार्यपणे त्याच्या भाष्यांकडेही वळले. यातूनच पुढे अमेरिकन संरचनावादी भाषा विज्ञानाची ब्लूमफील्ड-प्रणीत परंपरा जन्माला आली.
चोम्स्कीचा उदय होण्यापूर्वी अमेरिकन भाषाविज्ञानावर दोन प्रमुख नावांचा ठसा होता एडवर्ड सापीर आणि लेनर्ड ब्लूमफील्ड. या दोघांचेही विचार, भूमिका, अभ्यासाची व मांडणीची पद्धत, भाषेविषयीचे दृष्टिकोण यांत फार मोठा फरक होता. परंतु एकंदरीत ब्लूमफील्डच्या विचारांचा दबदबा अमेरिकन भाषाविज्ञानात जास्त राहिला. ज्या प्रकारे भाषाविज्ञानात एक ‘ब्लूमफील्डियन’ परंपरा निर्माण होऊन अनेक वर्षे अमेरिका व युरोपच्या काही भागात प्रभावी राहिली, तशी ‘सापीरीयन’ शाखा कधी तयार झाली नाही. कालांतराने चोम्स्कीने सापीरच्या अनेक विचारांचे व सिद्धान्तांचे पुनरुज्जीवन केले. पण तोपर्यंत अमेरिकन भाषाविज्ञान ब्लूमफील्डच्या एकछत्री प्रभावाखाली होते. चोम्स्कीच्या विचारांकडे येण्यापूर्वी ब्लूमफील्डचे विचार पाहणे महत्त्वाचे आहे कारण एकतर भाषा-विज्ञानाला वैज्ञानिक’ ज्ञानशाखेचे रूप देण्यात ब्लूमफील्डचा सिंहाचा वाटा आहे (जरी त्याची ‘वैज्ञानिकते’ची संकल्पना नंतर वादग्रस्त ठरली तरीही) आणि दुसरे म्हणजे चोम्स्कीचे विचार ब्लूमफील्डच्या विचारांना आव्हान म्हणून पुढे आले.
ब्लूमफील्डच्या भाषाविषयक विचारांचे तीनच ठळक पैलू आपण विचारात घेऊ. एकतर, त्याच्या मते प्रत्येक भाषा ही वेगळी, अनन्य, एकमेवाद्वितीय असते. त्यामुळे प्रत्येकच भाषेचा स्वतंत्र अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. भाषाभाषांचा तौलनिक अभ्यास, त्यांच्यातील फरक तपासणे हे भाषाशास्त्राच्या महत्त्वपूर्ण कार्यांपैकी आहे असे तो मानत असे. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे भाषेचा अभ्यास ‘वैज्ञानिक’ दृष्टीने करण्यासाठी अनुभवनिष्ठ पद्धतींचा आग्रह. पारंपरिक भाषाभ्यासाच्या पद्धती अवैज्ञानिक आहेत, त्यांत प्राकृतिक विज्ञानांच्या पद्धतींचा अवलंब केला जात नाही हा ब्लूमफील्डचा आक्षेप होता. प्रत्यक्ष घटिताचे निरीक्षण करून त्यावरून गृहीतके तयार करणे, ती पडताळून पाहण्यासाठी प्रयोग करणे, निरीक्षणांच्या आधारे सर्वसामान्य निष्कर्ष काढणे आणि हे निष्कर्ष अधिक निरीक्षणांनी पडताळून पाहणे, अशी विज्ञानांतील observation hypothesis experimentation generalisation confirmation ही साखळी ब्लूमफील्डवाद्यांनी भाषाभ्यासात आणली. याचे काही महत्त्वाचे फायदे भाषाविज्ञानाला झाले. एकतर निरीक्षणासाठी सामुग्रीचे (corpus) महत्त्व कळले व ती गोळा करण्याच्या पद्धती विकसित झाल्या. दुसरे, ह्या सामग्रीच्या विश्लेषणासाठी विभिन्न शोधनपद्धती (discovery procedures) विकसित करण्यात आल्या. भाषिक सामग्रीचे विश्लेषण करताना वेगवेगळ्या पातळीवरील मूलघटक निश्चित करण्यात आले व त्यातून एक वर्गीकरणात्मक जंत्री (taxonomy) हळूहळू निर्माण झाली. भाषाविज्ञानाची ध्वनिशास्त्र, शब्दरचना शास्त्र, वाक्यरचनाशास्त्र, लिपिशास्त्र यासारखी वेगवेगळी अंगे (त्यांच्या स्वतंत्र वैज्ञानिक प्रणालींसह) निर्माण होणे हे याच सर्व घडामोडींचे फलित होते. परंतु पुढे चोम्स्कीने अधोरेखित केल्याप्रमाणे ह्या पद्धतीत काही मूलभूत दोष होते. अनुभवनिष्ठ पद्धतीचा आग्रह धरल्यामुळे ब्लूमफील्डवादी भाषाविज्ञान हे केवळ निरीक्षणयोग्य सामग्रीवरच आधारित होते. ज्या गोष्टी प्रत्यक्ष निरीक्षणासाठी उपलब्ध नाहीत त्यांची दखल ह्या पद्धतीत घेण्यात आली नाही. खरेतर त्यांना दखलपात्र मानण्यातच आले नाही. तसेच ह्या संरचनावादी अभ्यासपद्धतीचा संपूर्ण रोख भाषेच्या रूपावरच/रचनेवर होता, त्यात अर्थाला स्थान नव्हते.
ब्लूमफील्डच्या भाषाविचारांचा तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची भाषेसंबंधीची वर्तनवादी भूमिका. त्या काळातील (१९३० च्या सुमारास) अत्यंत प्रभावशील असणाऱ्या वर्तनवादी मानसशास्त्राचा ब्लूमफील्डवर पगडा होता. माणसाच्या इतर शारीरिक वर्तनांप्रमाणे भाषा हे देखील एक वर्तन आहे वाचिक वर्तन आहे आणि इतर वर्तनांप्रमाणे भाषिक वर्तनाचेही स्पष्टीकरण चेतक व प्रतिसाद यांच्या साहाय्याने देता येईल अशी धारणा यामागे आहे. उदाहरणार्थ, लहान मूल भाषा शिकताना वेगवेगळ्या चेतकांना (पालकांचे बोलणे, आजूबाजूच्या घटना, त्याला स्वतः जाणवणारी भूक, इ.) आपल्या आवाजातून प्रतिसाद देते व त्यातून हळूहळू भाषा विकसित होते. अर्थात हे एक मूलतः गुंतागुंतीच्या सिद्धान्ताचे ढोबळ व सोपे रूप आहे. या वर्तनवादी भूमिकेचे काही महत्त्वपूर्ण परिणाम भाषाविचारावर झाले आहेत. भाषाभ्यासात मन, विचार, भावना यांना स्थान नाकारले गेले. भाषा शिकणे म्हणजे वाचिक वर्तनाच्या सवयी निर्माण करणे असा विचार रुजला. चेतकांच्या दिल्या गेलेल्या प्रतिसादांची पुनरावृत्ती करून त्यांना सवयींत परिवर्तित करणे हा भाषा शिकण्याचा राजमार्ग ठरू लागला. भाषा शिकवताना योग्य प्रतिसादांना सकारात्मक प्रतिक्रियांतून (उदा. ‘शाबास’ म्हणणे) दृढ करणे, अयोग्य प्रतिसादांना नकारात्मक प्रतिक्रियांतून (उदा. शिक्षा करणे) कमजोर करणे, योग्य प्रतिसादांना पुनरावृत्तीतून (उदा. एक उच्चार शंभर वेळा म्हणणे) स्वयंस्फूर्त सवयींत बदलवणे
अशा प्रकारची अध्ययनतत्त्वे वर्तनवादी विचारांतून निर्माण झाली. चोम्स्कीने ब्लूमफील्डवादी किंवा अमेरिकन संरचनावादी भाषाविज्ञानाच्या ह्या तीनही प्रमुख धारणांविरुद्ध मूलभूत आक्षेप घेतले आहेत. पहिला आक्षेप प्रत्येक भाषा अनन्य, एकमेवाद्वितीय असते ह्या तत्त्वावर होता. प्रत्येक भाषेची स्वतःची रचना, ओळख, वैशिष्ट्ये असली तरी एका अमूर्त रचनेच्या पातळीवर बहुतांश भाषांमध्ये साम्यस्थळे प्रकर्षाने आढळतात. या आधारावर चोम्स्कीने सर्व भाषांमध्ये सामाईक असणारी काही भाषिक वैश्विके (Language universals) शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, सर्व भाषांमधील प्रश्नार्थक वाक्य तयार करण्याच्या रीती तीन-चार मूलभूत प्रकारांतच आढळतात. लहान मूल भाषा शिकत असताना ज्या टप्प्यांतून जाते ते टप्पे बहुतांश भाषांसाठी सारखेच आहेत. आपल्या सभोवतालच्या विश्वातील वस्तूंचे व घटनांचे वर्गीकरण करण्याचे सजीव/निर्जीव, दूरस्थ/निकट, लिंग व वचन, इ. साचे बहुसंख्य भाषांमध्ये मिळतेजुळते आहेत. यांतून चोम्स्की असेही सुचवतो की भाषा प्रकट स्वरूपात वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसत असली तरी सर्व मानवांजवळ मूलतः एकाच प्रकारची ‘भाषिक क्षमता’ असते.
चोम्स्कीचा ब्लूमफील्डवादाविरुद्ध दुसरा आक्षेप त्यांच्या तथाकथित ‘वैज्ञानिक’ पद्धतीवर आहे. ही पद्धत केवळ गोळा केलेल्या, निरीक्षणयोग्य सामग्रीपुरतीच मर्यादित आहे, तीदेखील केवळ जंत्रीवजा वर्णन देणारी आहे, भाषेच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या परंतु निरीक्षणास सरळ-सरळ उपलब्ध नसलेल्या अनेक घटकांना ही पद्धत डावलते, असे चोम्स्कीचे म्हणणे आहे. परंतु या ठिकाणी हेही लक्षात घ्यायला हवे की चोम्स्की आणि ब्लूमफील्ड यांच्यातील मतभेदाचे मूळ त्यांच्या ‘भाषा’ या संकल्पनेच्या भिन्न मांडणीत आहे. ब्लूमफील्डसाठी भाषा हे एक प्रकारचे (वाचिक) वर्तन आहे. त्यामुळे या वर्तनाचे निरीक्षण करून, निरीक्षणास उपलब्ध नसलेल्या बाबी वगळून, या वर्तनाचे शक्य तितके सुस्पष्ट वर्णन करणे हा त्याच्या भाषाविज्ञानाचा हेतू होता. चोम्स्कीच्या मते भाषा म्हणजे वर्तन नव्हे तर भाषिक ज्ञान किंवा क्षमता, जी दृश्य स्वरूपात कधीच आढळणार नाही, परंतु तिचा वापर करून होणारे वाचिक वर्तन आपणास दिसते. एखादी भाषा वापरणाऱ्या समस्त व्यक्तींच्या मेंदूत त्या भाषेची एक अमूर्त रचना किंवा व्यवस्था साठवलेली असते. ह्या व्यवस्थेचा वापर करून ती भाषा बोलणारे हजारो वाक्यांची निर्मिती करत असतात. अशी लाखो-करोडो लिहिलेली/बोललेली वाक्ये एकत्र केली तरी सरतेशेवटी ती भाषा नव्हे, तर ‘भाषा’ नामक मेंदूत साठवलेल्या व्यवस्थेची उत्पादने असतात. ह्या बाह्य उत्पादनांनाच वाचिक वर्तन मानून त्यांचा अभ्यास ब्लूमफील्डवादी करत असत, तर ह्या बाह्य प्रकट भाषावापराचा अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून अदृश्य, अमूर्त अशा व्यवस्थेपर्यंत पोहोचणे, तिचे वर्णन करणे हा चोम्स्कीच्या भाषाविज्ञानाचा हेतू आहे. एकंदरीत चोम्स्कीच्या मते भाषाशास्त्राचा अभ्यास म्हणजे (एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत साठवलेली असते तशी) त्या भाषेच्या अमूर्त व्यवस्थेचा अभ्यास! अशा अभ्यासाची ‘वैज्ञानिक’ पद्धत केवळ निरीक्षणयोग्य सामग्रीने वर्णन/विश्लेषण करून थांबत नाही, तर त्यापुढे जाऊन त्या सामग्रीच्या आड दडलेल्या, निरीक्षणास उपलब्ध नसलेल्या इतर महत्त्वपूर्ण बाबींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
यातच चोम्स्कीचा ब्लूमफील्डवादी विचारांच्या तिसऱ्या पैलूवरील आक्षेपही येतो. चोम्स्कीने ब्लूमफील्डच्या भाषेविषयीच्या वर्तनवादी भूमिकेचे जोरदार खंडन केले आहे. ज्याला ब्लूमफील्ड वाचिक वर्तन मानतो व भाषेच्या समकक्ष दर्जा देतो, ते केवळ भाषेचे बाह्य प्रकटीकरण आहे, आणि त्या प्रकटीकरणाची व्यक्तीनुरूप करोडो रूपे असणार ! या सर्वांच्या मागे एक सामाईक, सर्व ती भाषा वापरणाऱ्यांसाठी समान अशी अमूर्त व्यवस्था असते. ती म्हणजे भाषा, असा चोम्स्कीचा सिद्धान्त आहे. आपण गणितामध्ये कितीतरी प्रकारची आकडेमोड करतो. पण आपण सर्व बेरजा-वजाबाक्या किंवा गुणाकार-भागाकार आपल्या डोक्यात साठवून ठेवत नसतो, तर ही आकडेमोड करण्याची तंत्रे/तत्त्वे आपल्या मेंदूत असतात, तसेच भाषेचे आहे. जशी गणिताची सूत्रे सुस्पष्टपणे सांगून आपण बेरजा-वजाबाक्या-गुणाकार-भागाकार कसे होतात हे कितीही लहानमोठ्या संख्या घेऊन आणि नेहमीच अचूकपणे दाखवू शकतो, तसेच भाषेच्या वाक्यनिर्मितीची सूत्रे अचूकपणे मांडता आली पाहिजे, जेणेकरून कोणतीही आणि कशीही वाक्ये कशी निर्माण होतात याचे सुस्पष्ट व अचूक वर्णन देता आले पाहिजे. असे वर्णन जे व्याकरण देऊ शकते ते सर्वांत प्रभावी व्याकरण असे चोम्स्की मांडतो. आणि स्वतः चोम्स्कीचे प्रमुख क्रांतिकारी योगदान अशा प्रकारचे अक्षरशः गणितीय संकल्पना व सूत्रांवर आधारित व्याकरण निर्देशात्म रचनांतरणवादी (transformational generative) व्याकरण हे आहे. पण ह्या व्याकरणाकडे वळण्यापूर्वी चोम्स्कीच्या भाषाविचाराचे आणखी एकदोन महत्त्वाचे मुद्दे पाहणे आवश्यक आहे.
मानवप्राण्याच्या भाषा शिकण्याच्या वैशिष्ट्याबद्दल चोम्स्कीने एक अभिनव आणि क्रांतिकारक कल्पना मांडली आहे. त्याच्या मते एकूण एक मानवांच्या मेंदूत जन्मतःच एक भाषा संपादन यंत्रणा’ (Language Acquisition Device) असते. जन्मतः सुप्तावस्थेत असणारी ही यंत्रणा जेव्हा बालकाच्या कानावर कोणत्याही भाषेचे बोल पडू लागतात तेव्हा कार्यान्वित होते. सर्वच मानवांमध्ये ही एकसमान यंत्रणा असते आणि कोणत्याही मानवी भाषेच्या संपर्कात ती कार्यान्वित होते (आणि त्या भाषेला आत्मसात करण्याची प्रक्रिया सुरू करते.) म्हणून कोणतेही मूल ते ज्या भाषेच्या (किंवा भाषांच्या) संपर्कात येते त्या भाषा शिकते. त्या भाषा त्या मुलाच्या आईवडिलांच्या भाषा असतीलच असे नाही.
मानवी भाषांच्या गुणधर्मांपैकी एका गुणधर्माचा चोम्स्की कटाक्षाने व सविस्तर विचार करतो. कोणत्याही भाषेचा शब्दसमूह (कितीही मोठा असला तरीही) मर्यादित असतो आणि शब्दांपासून वाक्य तयार करण्याचे नियमही मर्यादित असतात. परंतु कोणतीही मानवी भाषा मर्यादित शब्दसंग्रह व मर्यादित नियमावली वापरून अमर्याद वाक्ये निर्माण करू शकते किंवा समजून घेऊ शकते. भाषेच्या या गुणधर्माला निर्मितिक्षमता किंवा सर्जनशीलता असे म्हटले जाते. मानवी भाषेचा हा सर्वांत महत्त्वाचा खरे तर खास व्यवच्छेदक गुणधर्म आहे, परंतु भाषाविज्ञानाची पूर्वीची सर्व प्रारूपे ह्या गुणधर्माचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत हा चोम्स्कीचा आक्षेप आहे.
चोम्स्कीचा भाषाविचार अशा व्याकरणाकडे येतो. जर भाषाविज्ञानाचा हेतू ‘भाषा’ नामक अमूर्त, सर्व भाषिक समूहांतील व्यक्तींच्या मेंदूत असलेल्या व्यवस्थेचे वर्णन करणे आहे, तर हे वर्णन म्हणजेच भाषेचे व्याकरण होईल. दुसऱ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, भाषेच्या त्या व्यवस्थेत कोणकोणती सूत्रे व नियम आहेत आणि त्यांतून कोणत्याही प्रकारची ग्राह्य वाक्ये कशी निर्माण होतात हे स्पष्ट करणे हे व्याकरणाचे काम आहे. पूर्वापार काळापासून व्याकरण वाक्यनिर्मितीचे जास्तीतजास्त अचूक वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु प्रत्येक प्रयत्नात काही उणिवा आहेत. ह्या उणिवा दूर करणारे नावीन्यपूर्ण व्याकरण रचण्याचा प्रयत्न चोम्स्कीने केला आहे. चोम्स्की भाषांच्या व्याकरणांची तीन प्रारूपे मांडतो एक, सीमित अवस्थात्मक व्याकरण (Finite State Grammar) दुसरे, पदबंधात्मक रचनाधिष्ठित व्याकरण आणि तिसरे, रचनांतरणवादी निर्देशात्म व्याकरण (Transformational Generative Grammar) पहिल्या दोन प्रारूपाच्या मर्यादा, उणिवा दूर करणारे तिसरे प्रारूप चोम्स्कीने मांडले आहे.
पहिल्या सीमित अवस्थात्मक प्रारूपाच्या मते वाक्यनिर्मिती ही आपण डावीकडून उजवीकडे क्रमाने करत असणाऱ्या निवडीतून तयार होतात. उदाहरणार्थ, ‘माझ्या गावात चांगली शाळा नाही’ या वाक्यात सर्वप्रथम आपण पहिल्या स्थानी येऊ शकणाऱ्या ‘माझ्यासारख्या असंख्य शब्दांमधून ‘माझ्या’ हा शब्द निवडला. मग दुसऱ्या स्थानी येऊ शकणाऱ्या असंख्य शब्दांमधून ‘गावात’ हे रूप निवडले. अशा प्रकारे निवड करीत व शब्दांची सांगड घालीत वाक्य तयार झाले. प्रत्येक पुढची निवड ही आधी निवडलेल्या शब्दाने प्रभावित असते. ही प्रक्रिया वेगवेगळ्या सीमित अवस्थांमधून जात सरतेशेवटी संपूर्ण वाक्यापर्यंत पोहोचणाऱ्या व्याकरणाला दर्शवते. पुढील आकृतीत दाखवल्यापासून प्रारंभानंतर वेगवेगळ्या अवस्थातून ही प्रक्रिया अंतापर्यंत म्हणजे वाक्यनिर्मितीपाशी पोहोचते.
माझ्या प्रारंभ – तुझ्या आमच्या गावात घरी शाळा -दुकान – शेजारी चांगली -वाईट मोठी प्रसिद्ध आहे -आहे -अंत होती असेल घर देशात इमारत
ह्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करून मोठी वाक्येही तयार होऊ शकतात. परंतु चोम्स्कीने दाखवून दिल्याप्रमाणे हे प्रारूप भाषेतील वाक्यनिर्मितीचे नीटसे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. पहिली अडचण म्हणजे प्रत्यक्षात शब्दांचा सरळसोट क्रमवार (आणि तोही डावीकडून उजवीकडेच) असाच संबंध असेल असे नाही. जसे आधीचे शब्द पुढच्या निवडीवर बंधने आणतात तसेच पुढील शब्दांची बंधनेही मागील शब्दांवर येत असतात (उदा. ‘शाळा’ शब्द निवडल्यावर आधीचा शब्द स्त्रीलिंगी असणे आवश्यक ठरते). दुसरी अडचण म्हणजे बरेचदा एकमेकांच्या शेजारी नसणाऱ्या शब्दांमध्येही परस्परावलंबित्व असू शकते. उदाहरणार्थ, तो माझ्या गावात चांगली शाळा नाही असे म्हणाला, ह्या वाक्यात ‘तो’ आणि ‘म्हणाला’ यांचा निकटचा संबंध असूनही वरील प्रारूपातून तो स्पष्ट करता येत नाही. याशिवाय इतरही अनेक मर्यादा या प्रारूपात आहेत.
व्याकरणाचे दुसरे प्रारूप पदबंधात्मक रचनाधिष्ठित व्याकरण, हे तुलनेने बरेच जास्त प्रभावी व व्यापक आहे. या प्रारूपाचे मूलतत्त्व वेगळे आहे. यात शब्दांची एकापाठोपाठ एक क्रमवार मांडणी नाही. अतिशय निकट संबंध असणारे शब्द एकत्र येऊन त्यांची पदे होतात व या पदांची आणखी मोठी पदे व सरतेशेवटी वाक्ये बनतात. विरुद्ध दिशेने सुरुवात केली तर प्रत्येक तयार वाक्याचे (सहसा दोन) प्रमुख पदांमध्ये, प्रत्येक पदांचे पुन्हा काही(सहसा दोन) पदांमध्ये आणखी सरतेशेवटी संपूर्ण वाक्याचे शब्दपातळीपर्यंत विश्लेषण करता येते (ही मुळात प्रथमोपाधित घटक (Immediate constitueut) विश्लेषणाची कल्पना असून ह्याला चोम्स्की पदबंधात्मक रचनेचे नाव देतो.) उदाहरणार्थ, ‘माझ्या गावात चांगली शाळा नाही’ हे वाक्य आधी ‘माझ्या गावात’ आणि ‘चांगली शाळा नाही’ या पदांमध्ये विभागता येईल. प्रत्येक पदाचे पुढे दोन-दोन पदांमध्ये विश्लेषण करत शेवटी शब्दपातळीपर्यंत पोहोचता येईल. या रचनेत सर्व शब्दांमधील व घटकांमधील अंतःसंबंधांना वेगवेगळ्या पातळ्यांवर स्थान मिळाल्यामुळे वाक्यरचनेची बरीचशी गुंतागुंत स्पष्ट करता येते.
परंतु याही प्रारूपाच्या काही मर्यादा चोम्स्की दाखवून देतो. एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे रचनात्मक संदिग्धता या व्याकरणात स्पष्ट करता येत नाही. चोम्स्कीने दिलेले उदाहरण घेऊ या. ‘वृद्ध पुरुष व स्त्रिया’ याचे विश्लेषण (वृद्ध पुरुष) व (स्त्रिया) असे किंवा ‘वृद्ध (पुरुष व स्त्रिया)’ असे दोन प्रकारे करता येते. पण ही संदिग्धता या प्रारूपात स्पष्ट होत नाही. दुसरे म्हणजे निजभाषिकांच्या अंतःप्रेरणांचे प्रतिबिंब यात पुरेसे दिसत नाही. चोम्स्कीच्या मते निजभाषिकांचे स्वतःचे भाषाविषयक अंतःप्रेरणांचे भांडार असते आणि त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न प्रभावी व्याकरणाने करायला हवा. उदाहरणार्थ, ‘कोणीतरी कुठेतरी फटाके फोडत आहे’ आणि ‘कुठेतरी फटाके फुटत आहेत’ ह्या वाक्यरचना वेगळ्या असल्या तरी मराठी भाषकाला ही वाक्ये समानार्थी (किमान निकटअर्थी) वाटतील. ही समानता/निकटता या प्रारूपात येत नाही. तरीही पदबंधात्मक प्रारूपाचे सामर्थ्य चोम्स्कीने ओळखले होते. म्हणूनच त्याचे रचनांतरणवादी निर्देशात्म व्याकरण हे पदबंधात्मक व्याकरणाला सामावूनच पुढे आले आहे. पदबंधात्मक व्याकरणसूत्रांचा मूळ गाभा कायम ठेवून त्याला रचनांतरणाच्या सूत्रांची जोड देऊन हे व्याकरण चोम्स्कीने तयार केले आहे. या प्रारूपाला समजून घेण्यापूर्वी चोम्स्कीच्या काही इतर महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. ढोबळमानाने चोम्स्की असे मांडतो की प्रत्यक्षात प्रकटस्वरूपात वाचायला/ऐकायला मिळणारी वाक्ये ही त्यांची पृष्ठस्तरीय रचना (surface structure) असते. परंतु ही वाक्ये मूलतः सखोल मनातील अंतःस्तरीय रचनांपासून (Deep structure) निर्माण होतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, प्रत्यक्ष प्रकट वाक्ये ही व्याकरणबद्ध (grammatical) रचना असतात, ज्यांच्यामागे एक तार्किक (logical) रचना असते. चोम्स्कीच्या ह्या वाक्यनिर्मितीच्या प्रक्रियेत सुरुवातीला (मानवी मनाच्या खोलीत दडलेली, सुप्त) बीजवाक्ये (Kernel sentences) असतात. ही अमूर्त, अप्राप्य असतात. यांच्यावर (विभिन्न रचनांतरण प्रक्रिया होऊन शेवटी प्रकटस्वरूपातील वाक्य तयार होते. पदबंधात्मक व्याकरण बीजवाक्यांचे स्पष्टीकरण देते, तर रचनांतरणाची सूत्रे रचनांतरण कसे होते ते स्पष्ट व्हावे. उदाहरणार्थ, “मी तुला मदत करणार नाही काय?’ हे वाक्य ‘मी तुला मदत करणार’ या बीजवाक्यावर नकारार्थक व प्रश्नार्थक रचनांतरणाची प्रक्रिया होऊन तयार झाले आहे, असे चोम्स्कीला अभिप्रेत आहे.
चोम्स्कीच्या ह्या व्याकरणाचे महत्त्व ह्यात आहे की काही पदबंधात्मक सूत्रांच्या व काही रचनांतरणाच्या सूत्रांच्या साहाय्याने (इंग्रजी) भाषेच्या सविस्तर व सुस्पष्ट वर्णन करण्याच्या उद्देशात ते यशस्वी झाले आहे. इंग्रजी भाषेतील कोणतेही व्याकरणग्राह्य वाक्य कसे निर्माण होते आणि व्याकरणदृष्ट्या ग्राह्य नसलेली वाक्ये ग्राह्य का नाहीत याचे तार्किक व परिपूर्ण स्पष्टीकरण हे व्याकरण देते. हे प्रारूप गणितीय संकल्पना व सूत्रांचा आधार घेऊन तयार झाले असल्यामुळे त्याचा गणितीय तर्कशास्त्र, संगणकीय भाषाभ्यास यांसारख्या क्षेत्रांना फार मोठा फायदा झाला आहे. हे प्रारूप चोम्स्कीने १९५७ सालच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या ग्रंथात मांडले. नंतर १९६५ साली यात आणखी सुधारणा करून दुसरे प्रारूप मांडले. या विकसित प्रारूपातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजे यात वाक्याची अर्थनिष्पत्ती कशी होते याचाही मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकाच्या शेवटच्या दोन प्रकरणांत जॉन ल्योन्सने चोम्स्कीच्या भाषाविचारांचा मानसशास्त्रीय व तत्त्वज्ञानातील संकल्पना व संशोधन ह्यांवर काय परिणाम झाला याचे विवेचन केले आहे. चोम्स्कीची भाषाविषयक धारणा, भाषा वापरण्याच्या भाषिकांच्या पद्धती, बीजवाक्यांपासून प्रत्यक्ष(प्रकट) वाक्यांची निर्मिती यासारख्या संकल्पनांतून अनेक मानसशास्त्रीय प्रयोग करण्यात आले. मानवी मनोव्यापाराचा व भाषेचा जवळचा संबंध असल्यामुळे भाषेविषयीच्या ह्या वेगळ्या दृष्टिकोनाचा प्रभाव मानसाविषयीच्या वेगळ्या दृष्टिकोनाच्या निर्मितीत दिसून येतो. शिवाय चोम्स्कीच्या वर्तनवादावरील प्रखर व तर्कशुद्ध टीकेमुळे मानसशास्त्रातील वर्तनवादाचा पगडा कमी होण्यास मदत झाली. चोम्स्कीच्या नंतरच्या भाषाविचारामध्ये अंतःप्रेरणांवर बराच भर दिसून येतो. हासुद्धा भाषाविज्ञान व मानसशास्त्राच्या परस्परमिलनाचा एक पैलू आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात चोम्स्कीच्या काही संकल्पनांचे तीव्र पडसाद उमटले. चोम्स्कीची ‘भाषा’ हा एक सामाईक वैश्विक गुणधर्म आहे आणि मूलतः सर्व भाषांमध्ये समानता आहे ह्या तत्त्वाने तत्त्वज्ञानात नवीन वाद सुरू झाले. चोम्स्कीची वैश्विक व्याकरण (universal grammar) ची संकल्पना, त्याची ‘मना’ (mind) ची संकल्पना, मन/शरीर युगलातील भेदाची वेगळी मांडणी यामुळे प्लेटो किंवा देकार्तच्या परंपरांतून पुढे आलेला ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ आणि चोम्स्कीचा ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ काहीसा संघर्ष होत असल्यासारखा दिसतो. ल्योन्सने या सर्व घडामोडींचे संक्षिप्त विवरण दिले आहे.
पुस्तकाच्या उपसंहारात ल्योन्स चोम्स्कीच्या संकल्पनांना व विचारांना मिळालेली काही आह्वाने, त्याच्यासोबतच काही मतभेदांचीही चर्चा करतो. विशेषतः जगातल्या सर्व भाषांमध्ये मूलतः समानता असणे हा त्यांचा अपरिहार्य व उपजत गुणधर्म आहे, आणि ह्या समान रचनांचे पालन न करणारी कोणतीही मानवी भाषा असू शकत नाही, असलीच तर कोणतेही मानवी अपत्य ती सहजगत्या आत्मसात करू शकणार नाही, ह्या चोम्स्कीच्या गृहीतकावर अनेकांचा आक्षेप आहे. सर्व मानवी भाषांमध्ये समानता आढळण्याचे कारण ऐतिहासिकदृष्ट्या सर्व भाषांची कोणत्यातरी एका मूळ आदिभाषेपासून उत्पत्ती होणे हेदेखील असू शकते.
चोम्स्कीच्या मूलतः तांत्रिक, गुंतागुंतीच्या विचारांची सोपी मांडणी ल्योन्सनी ह्या पुस्तकात केली आहे. तिचा ह्या लेखात, इंग्रजी उदाहरणांचा/दाखल्यांचा आधार न घेता समाधानकारक परामर्श घेणे कठीण आहे. सरतेशेवटी एवढेच म्हणता येईल की चोम्स्कीच्या क्रांतिकारक भाषाविचाराकडे वळू इच्छिणाऱ्या कोणत्याही अभ्यासकाला हे पुस्तक एक चांगले प्रायमर वाटेल.
( ‘चोम्स्की’ : मूळ लेखक – जॉन ल्योन्स, फंटाना मॉडर्न मास्टर्स मालिका फंटाना, १९७० )
[चोम्स्कीच्या विचारांच्या तात्त्विक अंगांसंबंधी अमोल पदवाड लवकरच लिहिणार आहेत. ]

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.