संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (उत्तरार्ध)

[मागील अंकात या लेखाच्या पूर्वार्धात हर्मन व चोम्स्की ह्यांनी मांडलेल्या प्रचाराच्या प्रारूपातील पहिल्या चार चाळण्यांचे वर्णन केले होते. (१) आकार, मालकी आणि नफाकेन्द्री माध्यमे, (२) जाहिरात, (३) प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे स्रोत आणि (४) झोड आणि अंमलदार, अशा या चार चाळण्या. आता पुढे….]

कम्युनिझम-विरोध : एक नियंत्रक यंत्रणा
शेवटचे गाळणे आहे ते कम्युनिझमविरोधाच्या तत्त्वज्ञानाचे. संपत्तिवानांना कम्युनिझम हा निर्वाणीचा शत्रू वाटत राहिला आहे, कारण तो त्यांच्या वर्गीय स्थानाला व उच्च प्रतिष्ठेला धक्का देणारा असतो. सोविएत, क्यूबन व चिनी क्रांत्या पाश्चात्त्य अभिजनांना संकट ठरल्या आहेत. त्यात विद्यमान संघर्ष आणि कम्युनिस्ट देशांतील सरकारी छळ यांची भरपूर प्रसिद्धी केली जात असल्याने पाश्चात्त्य तत्त्वज्ञान व राजकारण यांच्या कम्युनिझमविरोधाला आद्यकर्तव्याची जागा मिळाली आहे. हे तत्त्वज्ञान एका शत्रूविरुद्ध जनतेला संघटित करते. मात्र ते अस्पष्ट असल्याने ते धनसंग्रहाला विरोध करणाऱ्यांना आणि कम्युनिस्ट देशांशी व कडव्या विचारांशी सहानुभूती असणाऱ्यांनादेखील लक्ष्य करीत असते. त्यामुळे ते डाव्या व कामगार चळवळीचे विघटन करू शकते व एक राजकीय नियंत्रण-यंत्रणा म्हणून कार्य करते. कम्युनिझमचा विजय केवळ असह्य कल्पना वाटत असताना त्याला फॅसिझम दुबळ्या शत्रूसारखा वाटतो. तसेच जे सामाजिक लोकशाहीवादी कम्युनिझमच्या बाबतीत सहानुभूती बाळगत असतात, त्यांच्यावर ते कम्युनिस्टांच्या हातांतील खेळणी असल्याचा आरोपही त्याला करता येतो.

देशातल्या उदारमतवाद्यांवर ते कम्युनिस्ट मित्र असल्याचा अथवा पुरेसे कम्युनिस्टविरोधक नसल्याचा आरोप नेहमी होतो. कम्युनिझमविरोध त्यांना जवळपास एका धर्मासारख्या असलेल्या सांस्कृतिक वातावरणात कायम बचावात्मक पवित्र्यावर ढकलतो. त्यांच्याकडून ते सत्तेत असताना एखाद्या प्रांतात कम्युनिझम वा कम्युनिझमसदश विचारसणीला विजय मिळालाच तर त्याची फार मोठी राजकीय किंमत द्यावी लागते. म्हणून उदारमतवाद्यांनी हा धर्म आत्मसात करून घेतला असला तरी आपल्या कम्युनिस्ट विरोधाची प्रचीती त्यांना नेहमी आणून द्यावी लागते, त्यामुळे त्यांची अवस्था प्रतिक्रियावाद्यांसारखी होऊन जाते. उदारमतवाद्यांची एक अडचण नेहमी होते. त्यांचा सामाजिक लोकशाहीवाद्यांना असलेला पाठिंबा बऱ्याचदा गळन पडतो कारण ही मंडळी स्थानिक कडव्या डाव्यांवर नाहक कठोर टीका करीत असतात. गोरगरिबांना जे संघटित करीत असतात तेही यांच्या रोषाचे धनी होतात. डोमिनिकन रिपब्लिकमधील आपल्या थोडक्या सत्ताकालात युआन बॉश यांनी लष्कर व सरकार यांमधील भ्रष्टाचारावर हल्ले सुरू केले तसेच भूमिसुधार कार्यक्रम सुरू केले, सार्वत्रिक शिक्षणाचा प्रकल्प हाती घेतला, सरकार बऱ्यापैकी खुले केले आणि नागरी स्वातंत्र्याला भरपूर वाव दिला. त्यांची ही धोरणे ताकदवान प्रस्थापित गटांना धोक्याची वाटली. अमेरिकेनेही त्यांच्या स्वतंत्र कार्यक्रमाला हरकत घेतली. साम्यवाद्यांना व अन्य कडव्यांना दिली जाणारी नागरी स्वातंत्र्ये तिला रुचली नाहीत. लोकशाही व अनेकतावाद यांच्यावर हा ताण आहे असे तिला वाटले. केनेडी मग बॉश यांच्या कारभारावर ‘फार नाराज’ झाले. परराष्ट्र खात्यानेही ३० वर्षांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या डोमिनिकन रिपब्लिकवर आक्रमण करून बॉश पुन्हा सत्तेत येऊ नयेत याची खबरदारी घेतली. १९४७ ते १९५४ मध्ये ग्वाटेमालात अमेरिकेने घडवून आणलेली बंडखोरी आणि १९८१ ते १९८५ या काळात निकाराग्वावर लष्करी हल्ले करताना कम्युनिस्ट पाठिंबा व कम्युनिस्ट धोका यांचा कांगावा अमेरिकेने केला होता. त्यावेळी अनेक उदारमतवाद्यांना प्रतिक्रांतिकारी हस्तक्षेपाला पाठिंबा द्यावा लागला होता. बाकीचे अनेक गप्प बसून राहिले तर उरलेले राष्ट्रधर्माशी गद्दारी केल्याचा आरोप सहन करावा लागेल म्हणून चूप बसले.
एक बाब लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा कम्युनिस्टविरोधी भावना चेतवण्यात येत होती तेव्हा कम्युनिस्ट अत्याचारांबद्दलचे कसलेही प्रामाणिक पुरावे सादर केले जात नव्हते. उलट भुरटे लोक पुराव्यांचे स्रोत म्हणून उगवू लागले होते. देश सोडून पळालेले, खबऱ्या आणि संधीसाधू अशा काळात ‘तज्ज्ञ’ म्हणून झळकू लागतात. त्यांचे बिंग फुटले तरी ते त्याच जागी अढळ राहतात. फ्रान्समध्येही कम्युनिस्टविरोधी तत्त्वज्ञानाचे पाईक काहीही खपवू शकतात. कम्युनिस्टविरोधी नियंत्रण-यंत्रणा प्रस्थापित व्यवस्थेचा वापर करून प्रसारमाध्यमांपर्यंत जाऊन पोचते. शांततेच्या काळात अथवा ‘लाल धोक्या’च्या काळात सर्व प्रश्नांची मांडणी, कम्युनिस्ट व कम्युनिस्टविरोधी शक्तींनी दुभंगलेल्या जगात ‘द्विध्रुवी’ केली जाते. दोन्ही बाजूंना जयपराजय सोपवले जातात आणि ‘आपल्या बाजूला ठळक करण्याचे काम अगदी हक्कसदृश पद्धतीने केले जाते. हीच माध्यमे जो मॅकार्थी, अर्कादी शेवचेन्को आणि क्लेअर स्टर्लिंग, रॉबर्ट लीएकेन, किंवा अॅनी क्रिगेल, पीयरी दाई अशांना वेचून, निर्मून प्रसिद्धीच्या झोतात आणून ठेवत असतात. कम्युनिस्टविरोधाचे तत्त्वज्ञान व धर्म ही अत्यंत फलदायी चाळणी आहे.

ध्रुवीकरण आणि प्रचाराच्या मोहिमा
वेगवेगळ्या द्वारांमधून जाणाऱ्या बातम्यांची व्याप्ती या पाच चाळण्या संकुचित करून टाकतात. तेवढेच नव्हे तर जी ‘बडी बातमी’ व्हायची शक्यता असते तीदेखील अरुंद करून ठेवतात. हे अर्थातच ज्या बातमीला प्रचारकी रूप द्यायचे आहे तिच्या बाबतीत घडते. प्राथमिक प्रस्थापित सूत्रांकडून आलेली बातमी एखादे तरी महत्त्वाचे गाळणे लावण्यायोग्य असते आणि ती ताबडतोब प्रसारमाध्यमांकडून स्वीकारलीही जाते. बंडखोर, दुर्बल घटक, असंघटित व्यक्ती व गट यांच्याकडून व यांच्या संदर्भात आलेले संदेश आपाततःच विश्वासार्हता व खर्च यांबद्दलचे प्रश्न घेऊन येतात. ते द्वारपालांच्या तत्त्वज्ञानाशी वा हितसंबंधांशी मेळ साधणारे असतीलच असे नसतात. उदाहरणार्थ, तुर्कीमधील राजबंद्यांच्या छळ आणि कामगार संघटनांवरील हल्ले यांसंदर्भात माध्यमांवर दबाव फक्त मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून आणला जाईल, किंवा असे गट त्यात असतील ज्यांचा अत्यंत थोडा राजकीय प्रभाव असेल. १९८० मध्ये स्थापन झाल्यापासून तुर्कीच्या मार्शल लॉ सरकारला अमेरिकन सरकारचा पाठिंबा असून अमेरिकेत उद्योगजगतही जी जी सरकारे कम्युनिस्टविरोधी असतील त्या सर्वांशी चांगले संबंध ठेवून आहे. खेरीज परदेशी गुंतवणुकीला उत्तेजन, कामगार चळवळीची दडपणूक आणि अमेरिकन परराष्ट्र धोरणाला पूर्ण पाठिंबा जे देतील त्या सर्वांशी उद्योजक प्रेमाने व्यवहार करतात. जर माध्यमांनी तुर्की सरकार स्वतःच्याच नागरिकांशी वाईट वागते, हे सांगायला सुरुवात केली तर त्यांना जाणकार स्रोत शोधण्यासाठी फार मारामार करावी लागेल. त्यांच्यावर सरकारी झोड उठेल ती वेगळीच. शिवाय उद्योगजगत आणि संघटित उजवे गट त्यांची झोडयंत्रे सुरू करतील. अशा विचित्र व धर्मयुद्धासमान उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल जाहिरातदारांसह भांडवलदार मंडळी ही त्या माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत राहतील. अशी माध्यमे चक्क एकाकी पडतील कारण त्यांनी अमेरिकन हितसंबंधांवर प्रतिकूल असणाऱ्यांचा कैवार घेतला.

याच्या अगदी उलट पोलंडमधील राजबंदी आणि कामगार संघटनाच्या हक्कांवर गदा आणण्याच्या विरोधातील निदर्शनांना रेगन प्रशासनाने व भांडवलदारांनी एक पवित्र कार्य ठरवून प्रसिद्धी दिली. राजकीय कुरघोडी करण्याचाही ह्यात हेतू होता हे ओघाने आलेच. असंख्य माध्यमांनी व सदर लेखकांनी हीच भावना प्रमाण मानली. अशा प्रकारे पोलंडमधील मानवी हक्कभंगाची माहिती व त्यावरील कठोर मते वॉशिंग्टनमधील अधिकृत सूत्रांकडून प्राप्त होत होती आणि पोलिश बंडखोरांचे उल्लेख झोड उठवण्यासाठी पात्र ठरत नव्हते. हे बंडखोर म्हणजे बळी होते व त्यांना गाळणेधारक सत्पात्र मानत असत. प्रसारमाध्यमांना आंद्रे सखारॉव सत्पात्र का आहे आणि उरुग्वेमधील योसे लुई मासेरा अपात्र का आहे याचा खुलासा करण्याची कधीही गरज वाटली नाही. हे निर्देश आणि या प्रकारचे ध्रुवीकरण गाळण्यांच्या कार्यामुळे जणू ‘नैसर्गिक’ असे वाटे आणि त्याचा निष्कर्ष कसा असे, तर एखाद्या हुकूमशहाने दिलेल्या आदेशाप्रमाणः ‘‘शत्रुपक्षाच्या बळींवर लक्ष्य एकवटा, मित्रांच्या बळींकडे दुर्लक्ष करा!”

सत्पात्र बळींच्या बातम्या गाळण्यांमधून पुढे गेल्या पाहिजेत एवढ्यावरच हे थांबत नसून त्यांचा वापर सातत्यपूर्ण प्रचार मोहिमा आखण्यासाठीही होत राहतो. एखादे सरकार, उद्योगजगत आणि माध्यमे यांना एखादी बातमी उपयुक्त, नाट्यपूर्ण वाटली तर ते तीवर सारी ताकद एकवटतात आणि जनजागृतीसाठी ती वापरतात. सप्टेंबर १९८३ मध्ये सोविएतने जे कोरिअन विमान केएएल००७ पाडले त्यावेळी हे अनुभवास आले. शत्रूची अवहेलना करण्याची आणि रेगन प्रशासनाच्या शस्त्रास्त्र योजनेची गरज प्रतिपादन करण्याची सरकारी संधी या निमित्ताने घेण्यात आली. अगदी याच्या उलट इस्राएलने एक लिबियन प्रवासी विमान फेब्रुवारी १९७३ मध्ये पाडले होते तेव्हा कसलाही जनप्रक्षोभ उमटला नाही की ‘थंड डोक्याने केलेला खून’ असे वर्णन केले गेले नाही. बहिष्काराची तर बातच नव्हती.

प्रचाराच्या मोहिमा सामान्यतः अभिजनांच्या हितानुकूल आखल्या जातात. १९१९-२० च्या लाल धोक्याच्या मोहिमा कामगारांच्या संघटना हाणून पाडण्यासाठी होत्या. पहिल्या महायुद्धानंतर पोलादाच्या व अन्य उद्योगांत तेव्हा कामगार संघटित होऊ पाहत होते. ट्रमन-मॅकार्थी यांच्या मोहिमेने शीतयुद्धाचा जन्म झाला आणि एका कायमच्या युद्धकेन्द्री अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली. ‘न्यू डील’ च्या वर्षांतील पुरोगामी आघाडी दुबळी करून टाकण्यासही ती फायदेशीर ठरली. सोविएत बंडखोरांच्या दुर्दशेवर करकचून टाकलेला प्रकाश, कंबोडियातील शबूंचा नायनाट आणि बल्गेरियन संबंधांची फोड यामुळे व्हिएतनाम नामुष्कीचा दंश सौम्य व्हायला मदतच झाली. अवाढव्य शस्त्रास्त्र-सामग्रीची गरजही ठासून सांगता आली. आक्रमक परराष्ट्र धोरणाची आवश्यकता पटवता आली. रेगन यांच्या देशी आर्थिक योजनेमुळे समाजाच्या वरच्या स्तरात एकवटणाऱ्या संपत्तीकडून अन्यत्र लक्ष वेधणे शक्य झाले. निकाराग्वातील परिस्थितीसंदर्भात अलीकडे जे प्रचारकी व असत्यप्रसाराचे प्रयत्न झाले त्यांमुळे एल साल्वादोरमधील युद्धाची अमानुषता लपवता आली, व मध्य अमेरिकेतील प्रतिक्रांतिकारकांना होणाऱ्या अमेरिकन वाढीव मदतीचे समर्थनही करता आले.

अत्याचारांचा प्रकार प्रचंड, सातत्यपूर्ण आणि नाट्यपूर्ण असला तरी तो जोवर अभिजनांच्या उपयुक्ततावादी हितसंबंधांच्या कसोटीवर टिकत नाही तोवर प्रचार-मोहीम संघटित केली जाणार नाही. म्हणजे कंबोडियात पोल पॉट यांचा सत्ताकाल (व त्यानंतरही) अत्यंत उपयुक्त होता कारण कंबोडिया कम्युनिस्टांच्या हातात पडला होता आणि त्याच्या बळींकडे लक्ष वेधून महत्त्वाचे धडे देता आले असते. पण अमेरिकन बाँबवर्षावात कम्युनिस्टपूर्वकाळात जी कत्तल झाली, तिचा अमेरिकन अभिजनपत्रांना पार विसर पडला होता. अखेर व्हिएतनामींनी पोल पॉटची उचलबांगडी केली तेव्हा अमेरिकेने, अत्यंत चलाखीने ‘हिटलरपेक्षा दुष्ट’ खलनायकाला पाठिंबा देऊ केला, याची दखल वृत्तपत्रांनी घेतली नाही कारण सर्वांनी राष्ट्रीय राजकीय कार्यक्रमापुढे मान तुकवली होती. १९६५-६६ मधील इंडोनेशियन हत्याकांडे अथवा १९७५ नंतर इंडोनेशियाने ईस्ट टिमोरमध्ये केलेली घुसखोरी आणि हत्याकांडे याकडे लक्ष पुरवणेही उपयुक्त नव्हते कारण इंडोनेशिया अमेरिकेचे मित्रराष्ट्र असून अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी दार मोकळे ठेवणारे एक गि-हाईकही आहे. ईस्ट टिमोरमधील कत्तलींच्या बाबतीत तर अमेरिकेवर पुष्कळच जबाबदारी येते. चिली व ग्वाटेमालामधील सरकारपुरस्कृत दहशतीला असाच पाठिंबा लाभला. हे दोन्हीही देश अमेरिकन हस्तक असून त्यांच्या दहशतीच्या यंत्रणेसकट मूलभूत संस्थात्मक ढाचा अमेरिकन देखरेखीखाली व साह्याने उभा होता. त्यामुळे तेथील अत्याचारित लोकांसाठी प्रचारमोहीम चालवली असती तर ती सरकार-उद्योजक-लष्करी हितसंबंध यांच्या विरोधात गेली असती. आमच्या प्रारूपाप्रमाणे ती गाळण्यांच्या यंत्रणेतून पुढे जाऊही शकली नसती.

पोल पॉटच्या अत्याचारांना प्रसिद्धी देण्याचे अथवा केजीबीचा पोपची हत्या करण्याचा कट असल्याचे आधी रीडर्स डायजेस्ट ने छापले. त्याला एनबीसी टीव्हीची मोठी साथ होती. न्यूयॉर्क टाइम्स व अन्य बड्या माध्यम कंपन्याही त्यात उतरल्या होत्या. काही प्रचार कार्ये सरकार व माध्यमे संयुक्तपणे घडवून आणतात. माध्यमांच्या प्रचारी राजकारणाच्या एकदिशात्मतेचे गुपित वर उल्लेखिलेली बहुपदरी गाळणी रचना आहे. समाजाच्या मोठ्या हिताला बाधक अशा बातम्या यदाकदाचित आल्याच तर त्या ताबडतोब नजरेआड कशा होतील हे पाहण्याचे कार्य माध्यमे करीत असतात.
ज्या वार्ता उपयुक्त असू शकतात त्या मात्र स्वतःहून फोडायच्या अथवा पत्रकार परिषदांतून, श्वेतपत्रिकेमधून सांगायच्या असतात किंवा एकदोन लोकांतून त्याची चर्चा सुरू करून द्यायची. एकदा का तिच्यात रस उत्पन्न झाला की जो तो आपापल्या पद्धतीने तिची दखल घेत राहतो. लेखाची शैली विश्वासपात्र व खात्रीशीर असली आणि लेखाला अन्य कोणी आक्षेप घेतला नाही अथवा त्याची दुसरी बाजू जोवर मांडली जात नाही तोवर प्रचाराचा आशय ताबडतोब सत्यतेचे रूप घेऊन बसतो. मग त्यासाठी खऱ्या पुराव्याची गरज पडो वा न पडो. या अशा व्यवस्थेत विरोधी मतांना दारे बंद होतात कारण जरी ती मांडली गेली तरी ती प्रस्थापित मतांच्या आडवी जातात. अशा परिस्थितीत एकच बाजू आणखी भडकपणे मांडायची संधी मिळते. सरकारी मतांचा प्रतिवाद करणारी बेदरकार विधाने मोठी झोड वेधून घेतील आणि मग सरकार व बाजार यांना या वादात उडी घेण्याची संधीच मिळेल. समोर शत्रू उभा असताना कोणी विपरीत मतप्रदर्शन करू लागल्यास माध्यमांवर झोड तीव्र करण्याचा दबाव वाढीस लागतो. अशा वेळी माध्यमे आपला टीकाविवेक स्थगित करतात, शोधकवृत्ती बाजूला ठेवतात आणि नवस्थापित सत्य आपल्याला कसे भावले आहे ते हरतहेने सांगू लागतात. जे मुद्दे व वास्तव आताच्या सुस्थापित वास्तवाच्या प्रतिकूल असेल ते एक तर दडपले जाते वा दुर्लक्षिले जाते. आमचे गृहीतक असे आहे की जे प्रसिद्धीयोग्य पीडित आहेत त्यांना अत्यंत ठळक व नाट्यमय प्रसिद्धी मिळेल, त्यांचे मानवी रूप सतत सादर केले जाईल, त्यांचे पीडित, अत्याचारित रूप तपशीलवार व ससंदर्भ मांडले जाईल. त्यामुळे वाचकांत रसोत्पत्ती होईल व सहानुभूतीही निर्माण होईल. या उलट जे प्रसिद्धियोग्य अत्याचारग्रस्त नाहीत त्यांचे वर्णन अतिशय त्रोटक, तुटपुंज्या मानवी रूपांसह व वाचकाला मुळीच चेतवणार नाही अशा संदर्भासह छापले जाईल.
थोडक्यात वार्तांकनाचा प्रचारकी मार्ग पद्धतशीर व पूर्ण राजकीय ध्रुवीकरण झालेला असून तो स्थानिक सत्तास्थानांच्या हितासाठीच काम करतो. दोन भिन्न टोके एकत्र आणणाऱ्या वार्तांमध्ये व त्यांच्या प्रमाणामध्ये तसेच गुणवत्तेमध्ये तो सहज दिसून येतो.

[ मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट (पॅथियन, १९८८) या नोम चोम्स्कीच्या पुस्तकाच्या गाभ्याचे हे संक्षिप्त भाषांतर. माध्यमांच्या संबंधात भारतातील स्थितीचे विश्लेषण करणारा लेखही जयदेव डोळे लवकरच लिहिणार आहेत.

मूळ लेखक : एडवर्ड एस्. हर्मन व नोम चोम्स्की

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.