समाजवादी स्मृती

भाबडे अर्थशास्त्रः
१)मे २००५ चा आजचा सुधारक गिरणी विशेषांक म्हणून निघाला आहे. यातील काही भागाबद्दल “संघटित क्षेत्रातील १२-१५ टक्के श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ७ % दरम्यान विकासदर नोंदवून मुक्तपणे व लक्षणीय प्रमाणात जागतिक पातळीचे अब्जाधीश निर्माण करीत आहे. म्हणजे निर्माण होणारी सम्पत्ती कोणत्या दिशेने वाहत आहे हे स्पष्ट होते.” (पृष्ठ ६२)
२) “संघटित मजुरांना नुकसानभरपाई मिळाली” या वाक्याने असे सूचित केले आहे की सर्वच मजुरांनी संघटित होणे हा मजुरांची स्थिति सुधारण्याचा उपाय आहे. डब्यात शिरलेल्या प्रवाशांनी बाहेर राहिलेल्या प्रवाशांना डब्यात शिरू दिले नाही की साऱ्याच प्रवाशांना चांगली जागा मिळेल असा हा युक्तिवाद आहे. मजुरांची संघटना करणे जरूर पडते कारण कमी मजुरीवर काम करायला तयार असणारे मजूर विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. असे मजूर नसतीलच तर मजूरसंघटनांची जरूरच उरणार नाही. पृष्ठ ६१ वर ‘श्रमिक संघांच्या नेतृत्वाने थोड्या श्रमिकांचा रोजगार टिकविण्यासाठी बहुतेक श्रमिकांच्या रोजगाराचा बळी दिला’ असे म्हटले आहे. मजूरसंघांच्या कार्याचे हे यथार्थ मूल्यमापन आहे.
३) अब्जाधीशांची संख्या वाढली या विधानाने असे सूचित केले आहे की अब्जाधीश निर्माण झाल्यामुळे विकासदरातील वाढ गरीबी हटविण्याच्या दृष्टीने उपयोगी पडली नाही. साऱ्या समाजवादी विचाराच्या मुळाशी हीच समजूत आहे. अब्जाधीश नाहीसे झाल्याने गरिबी कमी होणार असेल तर गरिबी कमी करणे फारच सोपे आहे. अब्जाधीशांची सम्पत्ती हिसकून घेणे सरकारला सहज शक्य आहे व तसे प्रयोग झालेलेही आहेत. जमिनीच्या मालकीवर सीमा लादून उरलेली जमीन भूमिहीनात वाटल्यामुळे भूमिहीनांची गरिबी दूर होईल ही समजूत भूदान चळवळीची व जमिनीच्या मालकीवर सीमा लादणाऱ्या सरकारांचीदेखील आहे. त्याचप्रमाणे सम्पत्तिकरासारखे सम्पत्तीचा अपहार करणारे कायदे आहेतच. असे कायदे व भूदान यामुळे गरिबी कमी करण्यात कितपत सफलता मिळाली?
४) “काही लोकांची श्रीमंती ही काही लोकांच्या गरिबीचे कारण आहे “ही समजूत समाजवाद्यांनी तपासून पाहण्याची वेळ आलेली नाही काय ? अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे की १९४२ च्या दुष्काळात ३० लक्ष लोक मेले याचे कारण देशात पुरेसे अन्न नव्हते हे नाही तर अन्न विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा या लोकांजवळ नव्हता. गरीब वर्गाजवळ अन्नासाठीदेखील पैसा नव्हता याचे कारण त्यांना उपासमार सहज टाळता येईल एवढे उत्पन्न मिळवून देणारा रोजगार उपलब्ध नव्हता. तेव्हा गरिबी हटवायची असेल तर केवळ उत्पादन वाढविण्यावर भर देऊन चालणार नाही. बेकारी समूळ नाहीशी करण्याचे लक्ष्य ठेवणारे नियोजन पाहिजे. निरक्षरता पूर्णपणे नाहीशी करणे हे जसे शैक्षणिक योजनांचे ध्येय मान्य करण्यात आले आहे त्याचप्रमाणे बेकारी नाहीशी करणे हे आर्थिक योजनांचे ध्येय मान्य करण्यात आले पाहिजे. श्रीमंती हे गरिबीचे कारण आहे ही कल्पना मार्क्सवादातील “भांडवलदार मजुरांचे शोषण करतो” या कल्पनेतून उद्भवली आहे. पृष्ठ ९० वर “भांडवलशाही व्यवस्थेतील निहित शोषणाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी” असा शब्दप्रयोग आहे. क्षचे शोषण याचा अर्थ क्षजवळ असलेले काहीतरी हिसकून घेणे असा होतो. जळू माझे शोषण करते हे म्हणणे बरोबर आहे कारण जळू माझे रक्त शोषते. तिने ते शोषले नाही तर माझ्या शरीरात पुरेसे रक्त राहील, व मला रक्तक्षयाने होणारे रोग होणार नाहीत. भांडवलदार कामगारांचे शोषण करतो असा आरोप करायचा असेल तर कामगारांच्या मालकीचे तो काय हिरावून घेतो असा प्रश्न उपस्थित होतो. भांडवलदार जर मजुराला बळपूर्वक जास्त वेतन देत असलेल्या व्यवसायातून खेचून आणून कमी वेतनावर काम करायला भाग पाडत असेल तर तो मजुराचे शोषण करतो हा आरोप खरा ठरेल. पण असे काही होत नाही. भांडवलदार देत असलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन कुणी देत असेल तर भांडवलदार त्याला अडवीत नाही. भांडवलदार दिलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन कामगाराला इतरत्र मिळत असेल तर त्याला वेतनवाढीसाठी संघर्ष करावाच लागणार नाही. कोणत्याही अर्थशास्त्रीय युक्तिवादाने शोषणाच्या आरोपाचे समर्थन होऊ शकत नाही.
५) पृष्ठ ९ वर “वर्गीय भावनांनी गिरगाव पुष्ट होत गेले” या वाक्यात मार्क्सच्या वर्गयुद्धाच्या कल्पनेचा प्रभाव आहे. व्यक्तीचा वर्ग त्याच्या व्यवसायावरून ठरत असतो. तेव्हा वर्गयुद्ध या संकल्पनेचा अर्थ असा होतो की निरनिराळ्या पेशांच्या लोकांचे संबंध शत्रुत्वाचे असतात. ही कल्पना उघडपणेच हास्यास्पद नाही काय ? “श्रमजीवी, बुद्धिजीवी व भांडवलजीवी असे स्पष्ट वर्ग समाजात आहेत. या वर्गांचे संबंध संघर्षाचे असतात” हे वाक्य सांप्रदायिक अंधतेने न ग्रासलेल्या कोणत्याही माणसाला हास्यास्पद वाटेल. दोन दुकानदारात व दोन गिरणीमालकात संघर्ष असू शकतो कारण त्यांना एकमेकांशी स्पर्धा करावी लागते. पण दुकानदाराचा गिहाइकाशी, डॉक्टरचा व्याधिताशी, शिक्षकाचा शिष्याशी संघर्ष असतो, ही विधाने ऐकल्याबरोबरच झिडकारण्याच्या योग्यतेची आहेत. संघर्ष भांडवलदार व मजूर यात नसून एकाच क्षेत्रातले दोन मजूर व एकाच प्रकारचा माल निर्माण करणाऱ्या दोन भांडवलदारात असतो. मार्क्सवादाचे खालील दोन वाक्यात यथार्थ मूल्यमापन आहे : (1)Marx was muddle-headed and his thinking is almost entirely guided by hatred(Bertrand Russell). (2)Every adolescent in the nineteen twenties was a Marxist and whoever remained a Marxist in the nineteen thirties had not grown out of his adolescence-(Authorship unknown).
“विसाव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षात बहुतांश गिरण्या बंद पडल्या आणि याचा दोष ठामपणे मालकांवरच आहे. चांगल्या काळातील नफ्याच्या पुनर्गुन्तवणुकीतून तंत्रज्ञान सुधारले गेले नाही.’ (पृ.६९)
मालकांवर गिरण्या बंद होण्याची जबाबदारी टाकण्यापूर्वी सरकारी निर्बंधाखाली मालकांना कितपत स्वातंत्र्य उरले होते, पूर्वीच्या फायद्याचा त्यांनी विनियोग कसा केला, त्यामुळे गिरण्या बन्द पडल्या तरी इतर काही उद्योग त्यांच्यातून निर्माण झाले की नाही याचा तपशील दिलेला नाही. यंत्रमागामुळे गिरण्या चालविणे फायदेशीर राहिले नाही असे इतरत्र विधान आहे (पृष्ठ ७० – ७१). म्हणजे कापड तयार करणाऱ्या मजुरांपैकी काहींची सोय यंत्रमागात लागली. हे यंत्रमाग गिरणीमालकांनीच चालवायला पाहिजे होते असा आग्रह का ? गिरणीमालकांनी इतर उद्योगात भांडवल गुंतविले अशी अन्यत्र तक्रार आहे (पृष्ठ ७०). म्हणजे फक्त गिरणीमजुरांचेच हित जोपासले गेले पाहिजे, इतर क्षेत्रात मजुरी करणाऱ्यांचे हित जोपासण्याची जरूर नाही असे समजायचे काय ?
समाजवाद = हिन्दुत्वाचा द्वेष ?
६) “शहरातील खालच्या जातीतून मिळणारे कामगार लवकरच संपले व शहराजवळच्या क्षेत्रातून मुस्लिम, दलित असे लोक शहरी गिरण्यामध्ये येऊ लागले” (पृष्ठ ६५) गिरणीमजूर हा मुख्यतः दलित वा “अल्पसंख्य” असतो वा होता हे विधान कोणत्या शिरगणतीवर आधारले आहे हे कळत नाही. याच अंकात अन्यत्र शिवसेनेत शिरलेले लोक मुख्यतः गिरणीमजूर होते असे विधान आहे (पृष्ठ १००) शिवसेना ही दलितांची संघटना नाही. उलट समाजवाद्यांच्या भाषेत ती “कम्यूनल” आहे.
७) “भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हिंसाचाऱ्यांना मुक्तहस्त व उत्तेजनही दिले. अंबिकानगरच्या हिन्दू वस्तीची राखरांगोळी झालेली (लेखकाने) पाहिली तशीच मरियम बीबी की मस्जिद या मुस्लिम वस्तीचीही पाहिली”.. “बळींमध्ये मुस्लिम जास्त होते.’ (पृष्ठ ८६) भाजपा सरकारच्या मदतीने जर हा दंगा झाला तर हिन्दू वस्तीची त्या दंग्याने राखरांगोळी कशी केली? की हिन्दू वस्तीत काँग्रेस सरकारचे हस्तक दंगा करीत होते? तौलीन सिंग यांनी म्हटले आहे की “भाजपा सरकारने पोलिसांना आवरले नाही” एवढे म्हणता येईल. पण मीरतच्या दंग्यात काँग्रेस सरकारनेच पोलिसांना दंग्याची प्रेरणा दिली होती. काँग्रेसवर असाच आरोप शिखांच्या शिरकाणाबद्दलदेखील आहे. त्याची चौकशी अजून संपलेली नाही. “संघपरिवारातील संघटनांनी तरुणांना खून जाळपोळ अशा कृत्यांना उद्युक्त केले.” (पृष्ठ८६). याला पुरावा काय ? लेखकाजवळ पुरावा असेल तर त्याने त्याच्या आधारे पोलिसाकडे रीतसर तक्रार केली होती काय ?
८) बळीमध्ये मुस्लिम जास्त होते याचे कारणही स्पष्ट आहे. दंगा सुरू करताना दंगेखोरांचे लक्ष दुकानांची लुटालूट करण्याकडे असते, हत्या करण्याकडे नसते व दुकाने बहुधा हिन्दूंची असतात. दंग्याची वर्दी पोचताच पोलीस येतात व त्यांच्या माराने हे लुटारू जाया वा मृत होतात. यात बहुसंख्या मुस्लिमांची असते. पोलिसांचा मार खाल्ला त्याअर्थी तुम्ही दंगलीत होता.” म्हणून मार खाणाऱ्यावर दंगा सुरू करण्याचा आरोप न ठेवता सरकार त्यांना नुकसानभरपाई देते. त्यामुळे दंग्यांना उत्तेजन मिळते. याप्रमाणे मुसलमानांचे बळी जास्त जाण्याचे कारण सरकारचे ‘‘सेक्युलर” धोरण हे आहे. ब्रिटिश काळात वर्षाला २६ हिन्दू मुस्लिम दंगे होत होते. नेहरूकाळात ही संख्या ९० च्या वर गेली आता देखील भाजपाशासित प्रदेशात काँग्रेसशासित प्रदेशापेक्षा दंगे कमी होतात. यावरून दंग्यांचे दायित्व “कम्युनॅलिस्टां’वर नसून ‘सेक्युलॅरिस्टा’वर आहे हे स्पष्ट होते.
९) “समाजसुधारणेचा आग्रह धरणाऱ्या महाजनांनी जातिभेदावर कधी हल्ला केला नाही. गांधीवाद जातिव्यवस्था मान्य करतो, जातिनिहाय कामाची विभागणी, जातिनिहाय घरबांधणी, श्रेणीबद्धता यातील कशालाही हटविण्याचा कधीच प्रयत्न केला गेला नाही.” पृष्ठ ६७. हे हटविण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा ? सम्बन्धित सर्व व्यक्तींना जर हे मान्य होते व त्यामुळे कोणत्याही कटकटी उद्भवल्या नव्हत्या तर चाललेली व्यवस्था मोडून अशान्तता कशाला निर्माण करायची?
१०) अस्पृश्यता ही गोष्ट जातिव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. समाजातील कोट्यवधी लोक ज्यांच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ होईल इतके हीन आहेत असे मानणे सर्वसाधारण मानवतेच्याच विरुद्ध आहे. पण रोटीबेटीव्यवहार व व्यवसाय यासाठी काही गट वेगळे मानण्याने समाजाचे असे कोणते नुकसान होते? शिवाय रोटीबेटीव्यवहार व व्यवसाय याबाबतीत समाजाचे नियम नेहमीच बरेच सैल राहिलेले आहेत. छात्रावास, खाणावळी, हॉटेले इत्यादिकात जातिनिहाय जागा असत असे मी पाहिले नाही. तसेच विवाहाच्या बाबतीत जातीचे बंधन शेकडो संकर जाति निर्माण होण्याइतके सैल होते. या संकर जातींची यादी लक्षात न राहण्याइतकी मोठी आहे. व्यवसायाच्याबाबतीतही अशीच शिथिलता सदैव राहिलेली आहे. आपले जातिदत्त पुरोहिताचे काम करणारे ब्राह्मण किती असतात ? जातिभेदामुळे युद्धात पराभव झाले असे विनोबासारख्यांनी विधान केले आहे. हा आरोप क्षणभरही टिकण्यासारखा नाही. त्यावर मराठेशाहीपुरते उत्तर न. चिं. केळकर यांनी आपल्या “मराठे व इंग्रज’ या ग्रंथात दिले आहे.
११)भारताचे भूतपूर्व गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी म्हणत असत. “It is not caste but the political exploitation of caste that is harmful-” जातींचा असा राजकीय कलहासाठी उपयोग ब्रिटिशपूर्व काळात कधीच झाला नाही. ”आम्ही जातींच्या विरुद्ध बंड करतो.” असे म्हणणारेच असा उपयोग जास्त करीत असतात. नुकताच शिवधर्म नावाचा नवा धर्म स्थापन करू इच्छिणाऱ्या जातिविरोधकांचा प्रचण्ड मेळावा भरला होता. त्यात ब्राह्मणांना नष्ट करणे हा आपला उद्देश असल्याचे प्रवर्तकांनी स्पष्टच सांगितले होते. ब्राह्मणांना या नव्या धर्माची दीक्षा देण्यात येणार नाही असे या धर्माचे एक “जातिनिरपेक्ष” तत्त्व सांगण्यात आले आहे.
रोगोपचारासाठी शरीरावर शस्त्रक्रिया करतात. पण ती करण्यापूर्वी रोगाच्या परिणामापेक्षा शस्त्रक्रियेचे परिणाम जास्त वाईट होणार नाहीत अशी काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे जातिभेदाने काही नुकसान होण्यासारखे असले तरी जाती मोडण्याच्या प्रयत्नाने समाजात कलहाची बीजेच जास्त पेरली गेली आहेत हे जातभेदविरोधकांना कबूल करावेच लागेल. महात्मा गांधींच्या ध्येयवादापेक्षाही त्यांची व्यवहारकुशलता अधिक जागृत होती व त्यामुळे त्यांनी समाजसुधारणेच्या बाबतीत अत्यंत सावधगिरीने पावले उचलली.
३८, हिन्दुस्तान कॉलनी, अमरावती रोड, नागपूर-४४० ०३३.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.