सायकल आणि कार (पूर्वार्ध)

विल्यम वॅगस्टाफ ह्या ९१ वर्षीय माणसाचे नुकतेच लंडन येथे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने आपली वैशिष्ट्यपूर्ण सायकल लंडन येथील ट्रान्सपोर्ट म्युझियमला भेट दिली. ह्या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे वॅगस्टाफने ती ७५ वर्षे वापरली. वयाच्या २० व्यावर्षी बचत करून १९२९ साली ही सायकल त्याने विकत घेतली होती. केवळ शेवटची दोन वर्षे आजारी असल्यामुळे सायकलचा वापर त्याला करता आला नाही. वयाच्या नव्वदीनंतरही आठवड्यातून २ ते ३ वेळा तो सायकल चालवत असे. इंजिनिअर म्हणून टेलिफोन खात्यात काम करीत असताना त्याचे दररोज २० किमी सायकलिंग होत असे. आपल्या आयुष्यात वॅगस्टाफने सायकल घेतल्यापासून ७५ वर्षांत जवळपास ८०,००० किमी प्रवास ह्या सायकलीवरून केला.
अशीच एक गोष्ट दुसऱ्या एका सायकलप्रेमीची १९ व्या शतकातील आहे. त्यावेळी सायकलचा शोध लागून काही दशकेच झाली होती. त्याचे खरे नाव पॉल दी व्ही व्ही होते. परंतु पूर्वीच्या सायकलला व्हेलोसिपीड (Velocipede) म्हणत म्हणून त्याने टोपण नाव ‘व्हेलोसिओ’ घेतले व त्याच नावाने तो ओळखला जाऊ लागला. आजही त्याला वंदन करण्यासाठी दरवर्षी जलै महिन्यात फ्रान्समधील सायकलप्रेमी एकत्र येत असतात. सायकलमध्ये सतत सुधारणा करणे, सायकल चालवण्याच्या वेगवेगळ्या कला आत्मसात करणे व दूरवर सहलीला जाणे यामध्ये त्याने आपले आयुष्य खर्ची घातले. २८ वर्षाचा असताना १८८१ साली व्हेलोसिओने अत्यंत साधी परंतु बरीचशी जड डुगडुगणारी, बेअरींग नसलेली, फारसा ब्रेक न लागणारी अशी पहिली सायकल विकत घेतली. त्याकाळात अशी सायकल केवळ ताकदवान व धीट माणसेच चालवू शकत. कारण हाडे खिळखिळी करणारी (boneshaker) म्हणूनच सायकलची ख्याती होती. व्हेलोसिओने आपल्या नव्या सायकलच्या साहाय्याने आसपासचा परिसर पालथा घालायला सुरुवात केली. एका दिवशी तर पैजेवर त्याने ६ तासात १०० किमी अंतर पार केले. व्हेलोसिओचे सायकलचे प्रेम एवढे वाढले की त्याने आपला रेशीम विकायचा धंदा सोडून सायकलचे दुकान काढले. केवळ दुकान काढून तो थांबला नाही तर सायकलमध्ये सतत सुधारणा करणे व आसपासचा डोंगर-दऱ्यांनी वेढलेला प्रदेश पालथा घालणे हाच त्याचा उद्योग बनला. पुढे त्याला आपण लिहू शकतो याचा शोध लागला. त्याने खास सायकलवर एक मासिक सुरू केले व त्यात तो लिहू लागला. अनेक गिअरच्या सायकलच्या डिझाइनचे श्रेयही व्हेलोसिओकडे जाते. डिरेल्युअर (अनेक गिअरची सायकल, वशीरळ श्रश्रशीी) म्हणून आज ती सायकल प्रचलित आहे. डिरेल्युअर सायकलचा स्वीकार व्हावा म्हणून व्हेलोसिओला विरोधकांशी बराच झगडा करावा लागला. विरोधकांचे म्हणणे होते की फक्त फिक्स्ड गिअरमुळेच सुलभपणे पेडलींग करता येते; व डिरेल्युअर हे अशक्त व जास्त वयाच्या माणसांसाठी आहे. व्हेलोसिओने विरोधकाचे हे म्हणणे खोडून काढण्यासाठी आपल्या मासिकातून डझनावारी लेख लिहिले. गिअरच्या सायकलवरून वर्षाला सरासरी २०,००० किमीचा प्रवास केला. गिअर व विना-गिअरच्या सायकलींची स्पर्धा आखली. १२,००० फूट उंचीचा व २४० किमी लांबीचा पर्वतमय रस्ता गिअरच्या सायकलीने जिंकून दाखवला.
वर्षानुवर्षे सतत सायकलचा दूरवरचा प्रवास, सायकलमध्ये सतत सुधारणा करणे, सायकलच्या प्रवासात काय खावे-काय टाळावे, सायकलच्या व्यायामाचे फायदे, सायकलप्रेमींनी लावायची स्वयंशिस्त अशा कितीतरी गोष्टीत व्हेलोसिओ स्वतः अनुभवलेले तत्त्वज्ञान सांगे. पैसा आणि प्रसिद्धीची हाव सोडून जगाकडे पूर्ण समतोल वृत्तीने तो पाहू लागला. श्रेष्ठ साहित्यकृती (classics) वाचून त्यातील आदर्श आपल्या जीवनात त्याने अंगीकारायला सुरुवात केली. वर्षानुवर्षाच्या ध्यासाने व्हेलोसिओ तत्त्वज्ञच बनला. अमेरिकेत धूम्रपानविरोधी चळवळ सुरू होण्याआधी व सिगरेट विरुद्धचा पुरावा विज्ञानाने सिद्ध करण्यापूर्वीच ६० वर्षे आधी व्हेलोसिओने आपल्या वाचकांना धूम्रपानविरोधी इशारा दिलेला होता. दारू पिण्याची सवय असणाऱ्या फ्रान्समध्ये त्याने सायकलप्रेमींना सावध राहायला सांगितले होते. खाण्यासाठी व कपडे बदलण्यासाठीची विश्रांती वगळता तो ३-४ दिवस-रात्र सलगपणे सायकल चालवत असे. वयाच्या ४७ व्या वर्षी ६५० किमीचा रस्ता व १३००० फूट उंचीचा पर्वतमय चढ त्याने ४८ तासात पार केला. वयाच्या ५० व्या वर्षी १००० किमी चा प्रवास ३० किलोच्या सामानासह चार दिवसात केला. वयाच्या ५९ व्या वर्षी ३५ वर्षाच्या तरुणाबरोबर ६५० किमीचा प्रवास ४६ तासात केला. ह्या प्रवासानंतर त्याने जाहीर केले की यापुढे मी फक्त ४० तासापर्यंतच प्रवास करणार. दोन रात्री व तीन दिवस माणून न थकता सायकल चालवू शकतो हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याने तरुणांवर सोपवली. दूरवरचा प्रवास आणि वेग ह्या गोष्टींनी तो संमोहित झाला होता. त्याच्याइतका सायकलप्रवास आजपर्यंतच्या इतिहासात कोणी केला असेल असे वाटत नाही. त्याच्याकडे छोट्या सायकलच्या दुकानाव्यतिरिक्त काहीही नव्हते. फारसे पैसेही नव्हते. एकाच पराक्रमावर तो कधीच संतुष्ट राहिला नाही. पराक्रमावर पराक्रम तो करत गेला. दर वर्षातून दोनदा तो सायकलची रॅली आखत असे. ही रॅली २५०-३०० किमीपेक्षा कमी नसे. ७७व्या वर्षी सायकल चालवत असता कारच्या धडकेने त्याचा अंत झाला.
सायकलप्रेमींनी ज्या सायकलवर प्रेम केले त्या सायकलच्या जन्माची कथाही आगळी-वेगळी आहे. ५ एप्रिल १८१५ रोजी इंडोनेशियातील टांबोरा पर्वतावर ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला. हा उद्रेक ४ महिने सतत सुरू होता. इतिहासात ज्वालामुखीचा एक जबरदस्त उद्रेक म्हणून याची नोंद आहे. ह्या उद्रेकात ९२००० लोक मरण पावले. वातावरणात प्रचंड प्रमाणात राख फेकली गेली. त्यामुळे जागतिक तापमान ३ डिग्री अंशाने खाली आले. उत्तर गोलार्धात१८१६ चा उन्हाळाच झाला नाही. इग्लंडमध्ये व युरोपमधील इतर देशांत पिकांचा नाश झाला. त्यावेळी ओट हे प्रमुख धान्य असे आणि घोडा हे प्रवासाचे मुख्य साधन असे.
ओटच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे व घोड्यांना खायला नसल्यामुळे घोडे अन्नासाठी मारले जाऊ लागले. आजच्या कारला चालवल्यासच पेट्रोल-डिझेल लागते, तसे घोड्यांचे नव्हते. घोड्यांना घरी बसवून ठेवले तरी खायला द्यावेच लागते. घोड्याऐवजी प्रवासाला दुसरे कुठलेही साधन नव्हते. घोड्याच्या शक्तीऐवजी मानवी शक्तीचा वापर करून यंत्र बनविता येते का, याची चाचपणी (प्रयोग) कार्ल ड्रायस ह्या जर्मनीमधील ३२ वर्षाच्या माणसाने केली. आज जसे वाढलेल्या तेलाच्या किंमतीमुळे ऊर्जेचं संकट बहुतांश तेल न बनविणाऱ्या देशांपुढे उभे राहिलेले आहे, तसेच ऊर्जासंकट (अन्न-धान्याची कमतरता) १९ व्या शतकात युरोपमध्ये आले होते. कार्ल ड्रायसने प्रथम चार चाकी यंत्र बनविले. त्यात दोघे बसू शकत होते. पुढे मालक पाठीमागे तोंड करून बसत असे व पाठीमागे नोकर चाकांना पेडल मारून चालवत असे. बेअरींगचा शोध लागलेला नसल्यामुळे चाकांचे घर्षण फार होत असे व आजच्यासारखे डांबरी रस्तेही तेव्हा नव्हते. त्यामुळे हे चार-चाकी यंत्र फारसे प्रसिद्ध होऊ शकले नाही. कार्ल ड्रायसने नंतर घर्षण कमी करण्याकरिता चार चाकांऐवजी दोन चाके वापरायचा निर्णय घेतला. तोल सांभाळत सायकल चालवणे, हे तत्त्व आधुनिक सायकलचे आहे. सायकलवरून तोल सांभाळत जाणे हे आज एवढे अवघड व आश्चर्यकारक वाटत नाही. परंतु त्याकाळी केवळ घोडागाडीवर बसताना आणि घोड्यावरून रपेट मारताना पाय जमिनीवरून वर उचलले जात. बर्फावरून धावणाऱ्या स्केटिंग करणाऱ्यांचा तेवढा अपवाद होता. स्केटींग करणारे त्यांच्या ब्लेडवर पाय ठेवून तोल सांभाळत स्केटिंग करत. काही डच स्त्रिया बर्फाने गोठलेल्या कॅनॉलवरून डोक्यावर दुधाच्या हंडीचा तोल सांभाळत, कपडे विणत-विणत स्केटींग करत. हे कॉर्ल ड्रायसने पाहिलेले होते व स्वतः लहानपणी त्याने स्केटींग केलेले होते. त्यामुळे ‘तोल सांभाळणे’ हे तत्त्व त्याला नवीन नव्हते. त्याने दोन चाकी लाकडाची सायकल बनवली. १२ जून १८१७ रोजी आपल्या घरापासून साडेसात किमी अंतर कापले व पुन्हा परत मागे फिरला. १५ किमी अंतर कापायला त्याला एक तासाहून थोडाच अधिक वेळ लागला. एका महिन्यानंतर त्याने जाहीर केले की तो ५१ किमी अंतर आपल्या नव्या सायकलने पार करणार. त्याप्रमाणे पोलिसांच्या व लोकांच्या साक्षीने हे अंतर पार केले. ह्या सायकलला पेडल, चेन, ब्रेक, स्प्रॉकेट, बेअरिंग, असे काहीही नव्हते. पाय जमिनीवर ढकलून सायकल पुढे रेटावी लागायची.
कार्ल ड्रायसने अनेक शोध लावले. टाईपरायटर, स्टोव्ह यामध्ये सुधारणा केल्या. सतत काहीतरी नवीन करण्याची त्याची धडपड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला नोकरीतून कायमची रजा मॅनेज केली होती. त्याने त्याच्या शहरापुरते सायकलच्या शोधाबद्दलचे पेटंट घेतले होते, परंतु इग्लंड व अमेरिकेतील चोरट्या संशोधकांनी ड्रायसची ही कल्पना चोरून इग्लंड व अमेरिकेत स्वतंत्र पेटंट घेतले. ड्रायसला सरकारतर्फे पेन्शन मिळत असे, परंतु ते १८४८ साली काही सबबीखाली काढून घेतले. ड्रायस १८५३ मध्ये मरण पावला तेव्हा तो कंगालच होता.
राजविमल टेरेस, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे ४११ ०२१.
* युरोपमध्ये वर्षाला ११ लाख सायकली व १४ लाख कार्स विकल्या जातात. ‘शरीर स्वास्थ्यासाठी सायकलींग लाभदायक असते,’ असा वैद्यकीय सल्ला १९५० मध्ये मिळाल्यापासून सायकलच्या विक्रीत अमेरिकेत प्रचंड वाढ झाली. १९३२ मध्ये २ लाख विक्री असलेली सायकलची संख्या १९८० मध्ये एक कोटीपर्यंत गेली. आज ५ कोटी अमेरिकन लोक सायकल चालवतात.
* चीनमधील बीजिंग शहरात ८० लाख सायकली आहेत. डेनमार्क देशाच्या शहरातील २० ते ३० टक्के लोक सायकलचा वापर करतात. आफ्रिका, श्रीलंका व आशियातील अनेक देशात १५-२० किमी पर्यंतच्या वाहतुकीसाठी सायकल हेच मुख्य साधन आहे.
* सध्याच्या जेट युगात जगातील ५० टक्कयाहून अधिक घरात आजही वाहतुकीसाठी सायकल वापरली जाते भारतात केलेल्या सर्व्हेमध्ये आढळले की ग्रामीण व शहरी भागातील ४८ टक्के घरात सायकल वापरली जाते.
* विलबर व ऑरव्हिल् राईट ह्या बंधूंनी सायकलच्या धंद्यात मिळालेला नफा विमान संशोधनासाठी वापरून १९०३ साली पहिले विमानोड्डाण केले.
* इकॉनॉमिस्टच्या एका लेखानुसार चीन व भारत यांनी अचानकपणे वाढवलेल्या तेलाच्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या असे एक कारण सांगितले आहे. एकाच वर्षात तेलाच्या मागणीत चीनने १६ टक्के तर भारताने ११ टक्के तेलाच्या मागणीत वाढ केली. भारताचे तेलाचे बिल २० अब्ज डॉलर इतके होते.
* तेलाच्या वापरात भारताचा ४ था नंबर लागतो. अमेरिका, चीन, रशिया व भारत असा हा क्रम आहे. वाढत्या जागतिक तापमानास आळा घालण्यासाठी क्योटो प्रोटोकॉलने भारत व चीन ह्या दोन्ही देशांना वगळले असले तरी प्रदूषण करण्यात त्यांचा ३ रा व ४ था नंबर लागतो.
* १९७० च्या दरम्यान जेव्हा तेलाच्या किमती आजच्यासारख्या भरमसाठ वाढल्या व ऑटोमोबाईलमुळे पर्यावरणाची हानी होण्याची जाणीव व्हायला लागली तेव्हापासून सायकल वापरात अमेरिकेत व युरोपमध्ये वाढ झाली.
* टूर-दी-फ्रान्स ही प्रतिष्ठेची मानली गेलेली – २१ दिवस चालणारी व सरळ व उचं-सखल भागातून ४००० किमीचे अंतर कापणारी सायकल स्पर्धा जेव्हा सलगपणे पाच वेळा कॅन्सर झालेल्या लान्स आर्मस्ट्राँगने जिंकली तेव्हा सायकलिंगमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो काय यावरचे संशोधन सुरू झाले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.