लेखनाच्या अराजकासंबंधाने (३)

माझ्या शुद्धलेखनविषयक प्रतिपादनास विरोध करणारी ३-४ पत्रे आली आहेत आणि २ लेख अन्यत्र प्रकाशित झाले आहेत. त्यांचा येथे परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व पत्रलेखकांचा आणि माझा मतभेद मुख्यतः एकाच ठिकाणी आहे. त्यांना उच्चाराप्रमाणे लेखन पाहिजे आणि मला त्याची गरज वाटत नाही. लेखन हे कधीच उच्चाराप्रमाणे नसते. ते वाचकांना पूर्वपरिचित असलेल्या उच्चाराची आठवण करून देणारे असतें ही एक गोष्ट ; आणि लेखनापासून अर्थबोध होण्यासाठी त्याचा उच्चार मनांतदेखील करण्याची गरज नाही, तसा उच्चार करून पाहण्यांत वाचकाचा कालापव्यय होतो; आणि आपल्याला जरी तशा संवयी लागलेल्या असल्या तरी त्या संवयी प्रयत्नपूर्वक मोडायला हव्या ही दुसरी गोष्ट.

लेखनाने उच्चार व्यक्त करावा व कालांतराने उच्चार बदलत असतो, तो जसा बदलेल तसा लेखनांतही बदल घडवून आणावा असा सध्यांचा प्रचलित विचार आहे. लेखनामध्ये वारंवार बदल घडवून आणूं नयेत. मुख्यतः साधित शब्दांची रूपें कधींच बदलूं नयेत असें माझें मत आहे त्याचे कारण त्या लिखित आकृतींना अर्थ प्राप्त झालेला असतो हे आहे. ज्याप्रमाणे बोललेल्या शब्दांना पुन्हा पुन्हां एकाच संदर्भात वापरले गेल्यामुळे अर्थ प्राप्त झालेला असतो, त्याप्रमाणे एकाच प्रकारे लिहिल्यामुळे आणि एकाच संदर्भात वापरल्याने त्या शब्दाच्या दृष्टिगम्य प्रतिमांनाहि अर्थ प्राप्त होतो. कोणत्याहि आवाजाला किंवा शब्दांच्या दृष्टिगम्य आकृतीला अंगचा अर्थ मुळींच नसतो. ज्यांचा त्या आवाजाशी किंवा लिपीशी पूर्वपरिचय नाही त्यांना ते शब्द ऐकून किंवा ती अक्षरे पाहून कसलाच अर्थबोध होत नाही. भाषिक (बोललेल्या) संकेताना अथवा अक्षरांना स्वतःचा (अंगचा) अर्थ असता तर असे घडले नसते. पूर्वपरिचयाशिवाय लोकांना त्यापासून अर्थबोध झाला असता. बोलण्यांत आणि लिहिण्यांत सातत्य असल्याशिवाय त्या संकेतांना वा प्रतिमांना अर्थ चिकटत नाही. सारे महत्त्व सातत्याच्या ठिकाणी आहे. लेखन-विषयक नियम बदलून वा लिपि बदलवून हे सातत्यच नष्ट होते म्हणून त्याला माझा आक्षेप आहे.

शब्दांच्या (अक्षरांना अर्थ नसतो. शब्दांना असतो.) दृष्टिगम्य आकृतींना जो अर्थ असतो, तो त्यांच्यापासून उच्चारबोध होतो, म्हणून नाहीं. उच्चार चुकीचे करून अथवा अजिबात न करतांसुद्धा त्या लेखनापासून अर्थबोध होऊ शकतो. किंबहुना तसाच तो झाला पाहिजे. शब्दांचे लिखित संकेत (लेखन) आपल्या चांगल्या परिचयाचे झाले की, ते पाहून आपल्याला त्यांचा अर्थच आठवतो, उच्चार आठवेनासा होतो. परीक्षेसाठी नेमलेले एखादें पाठ्यपुस्तक आपण ३-४ वेळेला वाचलेले असले की परीक्षेच्या अगोदर त्याची नुसती पाने उलटून आपली पूर्ण उजळणी होऊ शकते. त्यावेळी आपण फक्त त्या मजकुरावरून झरझर नजर फिरवत असतो. सगळे शब्द वाचत नसतोच. त्याचा उच्चार न करताही त्याचा अर्थ मनामध्ये झरतो. लिहिलेल्या शब्दांना अर्थ व्यक्त करण्याचे सामर्थ्य नसते तर जन्मबधिरांना कधीच वाचतां आलें नसते. पण ज्यांनी कधींहि आवाज ऐकला नाही अशी मंडळी सिनेमा पाहतात आणि पडद्यावर खालच्या बाजूला उमटविलेली वाक्ये वाचून ती सिनेमाचा पूर्ण आनंद उपभोगतात.

मुद्रित मजकुराचे वाचन हस्तलिखिताच्या वाचनापेक्षा अगदी वेगळे आहे. हाताने लिहिण्याचे आणि मुद्रणाचे प्रयोजन वेगवेगळे आहे. हाताने लिहिलेले सावकाश वाचण्यासाठी असते; तर छापलेले द्रुतगतीने वाचण्यासाठी असते. मुद्रणपूर्वकाळांतील हाताने लिहिलेल्या पोथ्या समोर बसलेल्या श्रोत्यांना मोठ्याने वाचून दाखविण्यासाठी असत, त्याकाळी वाचणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. आणि चुकीचे लिहिणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे त्या काळी अंन, जगनाथ (अन्न, जगन्नाथ) असे शब्द काही ठिकाणी लिहिलेले आढळतात. द्रुतवाचनासाठी मुद्रित भाषा वेगळी घडवावी लागते. पूर्ण शब्द वाचण्याची किंवा शब्दांचा उच्चार करण्याची गरज न पडतां सहज, आकलनसुलभ मुद्रित शब्द डोळ्यांना पटकन समजतात. वाचनाला गति प्राप्त होते. वाचनांतील गोडी कायम राखण्यास द्रुतवाचनाची मदत होते. हे सारे होण्यासाठी मुद्रणदोष नसलेला मजकूर आणि शब्दांची पूर्वपरिचित रूपें न बदललेली असली की वाचकाला कोणत्याहि काळांतल्या मजकुरांत विनायास शिरतां येते.

कोणताहि छापलेला मजकूर त्याचे अक्षर-न्-अक्षर वाचण्यासाठी छापला जात नाही, तर त्यांतले काही निवडक शब्दच पुढे वाचले जाणार असतात, आणि पुष्कळसा मजकूर वाचकांच्या डोळ्यांत न भरता त्यांच्या नजरेतून निसटणारच असतो. पण कोणता वाचक कोणते शब्द वाचेल आणि कोणते सोडून देईल ह्याविषयी कोणताहि नियम सांगता येत नाही. त्यामुळे मुद्रकानें तो पूर्ण मजकूर नीट काळजीपूर्वक छापावयाचा आणि वाचकांनी त्यावरून नुसती नजर फिरवायची असें घडणार असतें. डोळ्यांसमोरील कोणत्या शब्दावर वाचकाची नजर स्थिरावेल हे नक्की नसते म्हणून मुद्रकाला सगळे शब्द त्यांमधून जास्तीत जास्त अर्थ प्रकट होईल आणि संदर्भावर कमीत कमी अवलंबून राहावे लागेल अशा पद्धतीने छापले पाहिजेत/छापावे लागतील. वाचकाला संदर्भ समजून घेण्यासाठी नजर मागे फिरवावी लागली तर त्याचा कालापव्यय होतो, त्याच्या वाचनात अडथळा निर्माण होतो. वाचन वाचकांसाठी अरुचिकर होते.

कोणताहि वाचक वाचन करतो तेव्हा त्याच्या नजरेला शब्दांची जी रूपें पूर्वीपासून परिचित असतात त्यांची ओळख साहजिकच लवकर पटते. ती रूपें बदलली म्हणजे (उदा द्वंद्व (द्वंद्व), उदयान, उद्यान (उद्यान) नजर अडखळते. असें अनेक वेळां झालें की वाचन कंटाळवाणे होते. मानवसंस्कृतीचा दीर्घ इतिहास पाहिला तर लेखन-वाचन अगदी अलीकडे सुरू झाले आहे. आपल्या देशांत निरक्षरांची संख्या अजूनहि फार मोठी आहे. प्रौढांना साक्षर करण्याचे प्रयत्न विफल होत आहेत. या साऱ्याचे कारण वाचनाची क्रियाच अवघड आहे हे आहे. दृष्टिगम्य संकेतांतून अर्थग्रहण करणे अत्यंत कठिण असल्यामुळेच त्या संकेतांशी खेळतां येत नाही. लिपि-सुधारणेचे वेळोवेळी केलेले प्रयत्न असफल झाले आहेत आणि ते असफल होणेच इष्ट आहे. लिपीमध्ये घडवून आणलेले बदल आणि नव्या लिपीचा वापर ह्यांत फार फरक नाही. जुन्या लिपीत फरक करावयाचा झाल्यास तो पुष्कळ पुढचा विचार करून अत्यंत सावधानपणे करावा लागेल. ज्यामुळे वाचकांची नजर अडखळणार नाही असेंच लेखन आणि अर्थात् मुद्रण आपल्याला केले पाहिजे. त्यासाठी जोडाक्षरांची आणि ह्रस्वदीर्घ अनुस्वार ह्याबाबतींतील लेखनपद्धति बदलून चालणार नाहीं.

आपलें मुद्रण द्रुतवाचनासाठी योग्य असे आपल्याला मुद्दाम घडवावे लागेल. शब्दांच्या दृष्टिगम्य रूपांत सतत बदल होत गेल्यास वाचनांत तर अडथळे निर्माण होतातच शिवाय त्यांमुळे वाचनाबद्दल अनास्थाहि मुलांच्या मनात निर्माण होते आणि द्रुतवाचन तर फारच दूर राहते. जास्तीतजास्त वाचकांना द्रुतवाचन सुलभतेने करता यावे येवढ्याचसाठी माझ्या सूचना आहेत. त्या जगातल्या सगळ्या भाषांना लागू होतात. मराठी अपवाद नाही. येथे फक्त मराठीचे उदारण घेतले आहे. त्या पुन्हां खालीं मांडतो. नियमांचे अनेक पर्याय एकाचवेळी वापरल्याशिवाय तूर्तास आपला निभाव लागणार नाही. (१) जुनें १९३१ पूर्वीचे ‘रूढ’ नियम वापरून केलेले मुद्रण. (२) गोवें साहित्य संमेलनामध्ये मान्य केलेल्या नियमानुसार केलेले मुद्रण (३) सद्यःकालीन महामंडळाने केलेल्या नियमानुसार केलेले मुद्रण (४) व-हाडी, मालवणी, अहिराणी वगैरे बोलींप्रमाणे केलेले मुद्रण (५) निरनिराळ्या बोली बोलणाऱ्यांनी एकत्र येऊन (संस्कृत-भाषेच्या आणि शब्दांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त) एक सर्वसंमत अशी प्रमाणभाषा पुढच्या एकदीड वर्षांत घडवून तदनुसार केलेले मुद्रण. फक्त ह्या नियमांची सरमिसळ करूं नये आणि ग्रंथारंभी कोणत्या नियमानुसार मुद्रण केले आहे त्याचा उल्लेख करावा.

पाठ्यपुस्तक मंडळाने मात्र त्यांची मराठीची जोडाक्षरपद्धति ताबडतोब बदलावी. तें मंडळ सध्यां संस्कृतहिंदीसाठी एका प्रकारची आणि मराठीसाठींच वेगळ्या प्रकारची जोडाक्षरपद्धति वापरतें. ते अगदीं गैर आहे. आलेल्या पत्रांपैकी एकाच पत्रांच्या परामर्श येथे घेतो. बाकीच्यांना व्यक्तिशः उत्तरें परस्पर देईन.

भ. पां. पाटणकरांचे पत्र. भ.पां.पा.: बोली हे भाषेचे पहिले स्वरूप. लेखन हे उच्चारांचे सहीसही असावे अशी अपेक्षा योग्यच आहे. मोहनीः बोलीभाषेतील शब्द हे बहुधा सिद्ध शब्द (आपोआप घडलेले) म्हणून ओळखले जातात. ‘भाषा जसजशी वाढत जाते जाते तसतशी तिच्यांतल्या सिद्ध शब्दांची संख्या वाढत नाही. फक्त साधित (मुद्दाम घडविलेले) शब्दांची संख्या वाढते.’ उदाहरणादाखल आपण वरचेच वाक्य घेऊ या. त्या वाक्यांतील संस्कृत शब्द वेगळे करूं या : १) भाषा, २) सिद्ध, ३) शब्द, ४) संख्या, ५) साधित

(१) भाषा – भाष + अ (२) सिद्ध – सिध् + क्त (३) शब्द – शब्द + घत्र (४) संख्या –
(६) साधित – साध् + क्त हे सगळे संस्कृत शब्द हे मूळ धातूला कोणता ना कोणता प्रत्यय लागल्यामुळे घडलेले आहेत. त्या कारणाने ते कृत्रिम आहेत. त्यांचा उच्चार बोलींत आधीं झालेलाच नाही. त्यांचा उच्चार आधी झालेलाच नाही त्यामुळे त्यांचे लेखन उच्चारानुरूप होऊ शकत नाही, असें माझें मत आहे. कोणत्याहि शब्दाच्या लिखित रूपानें तो कसा घडला हे दाखवणाऱ्या खुणा, लक्षणे, चिढ़े नेहमीं धारण करावी. तसे केल्यानेच त्या शब्दाचे व्याकरण करता येते आणि त्याचे अर्थनिश्चयन करण्याला मदत होते. अन्न, भिन्न, खिन्न, छिन्न, प्रच्छन्न हे अंन, भिंन असे लिहिल्याने त्यांचे अर्थनिश्चयन होऊ शकत नाही. कोणतीहि प्रमाणीकृत भाषा शिकतांना तिचे व्याकरण शिकल्याने (तिच्या घडणीचे नियम शिकल्याने) फायदाच होतो. शब्दसिद्धि करण्याविषयीचे नियम पूर्वी प्रत्येकाला शिकवले जात असत त्यामुळे कोणत्याहि नव्या शब्दाचा अर्थ समजणे वाचकाला सहज जमत असे. आज व्याकरण शिकण्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे अशा साधित शब्दांचा अर्थ वाचकाला कोशांत पाहावा लागतो. म्हणून कोशामध्ये जें रूप दिले असेल असें रूप छापण्यांत असावें.

लेखन आणि मुद्रण यांत एक मूलभूत फरक आहे. लेखन स्वतःसाठी किंवा मोजक्या वाचकांसाठी असते. त्यामुळे ते थोडे शिथिल असले तरी चालते. कारण हस्तलिखित वाचणारे परस्परांशी पुष्कळदा परिचित असतात आणि त्यांना त्या लेखनाचे पूर्वसंदर्भ बहुदा ज्ञात असतात. मुद्रणामध्ये तशी परिस्थिति असेलच असे नाही. त्यामुळे तेथे काटेकोरपणाची गरज असते. सिद्ध शब्दांचे लेखन नेहमी उच्चारांप्रमाणेच सहीसही असते. त्यांच्याविषयी तुमचे आमचे एकमत आहे. भपांपाः (२) उच्चार स्थलकालानुसार बदलत असतात.लेखनाला जरा जास्त एकसारखेपणा हवा हे खरे. पण नाटक-कादंबऱ्यांत जी संभाषणे दाखवली जातात ती तात्कालिक बोलीप्रमाणे लिहिण्यास हरकत नसावी. मोहनीः नाटकांचे लेखन अथवा मुद्रण उच्चार दाखवण्यासाठीच असते. नाटके लिहिली जातात ती डोळ्यांनी वाचण्यासाठी क्वचित् तर त्यांतील संवाद ऐकण्यासाठी आणि प्रसंग डोळ्याने पाहण्यासाठी लिहिलेले असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनांत उच्चार जास्तीतजास्त चांगला दाखवावा; इतकेच नव्हे तर उच्चाराच्या काही व्यक्तिगत लकबी असल्या तर त्याहि दाखवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मुद्दाम वेगळी चिहें निर्माण करावयास हरकत नाही, कादंबऱ्यांमध्ये मात्र अर्थ सांगावयाचा असतो. तरीसुद्धां तेथें संभाषणे तात्कालिक बोलींप्रमाणे लिहिण्यास हरकत नाही. ती पर्यायी पद्धति मला मान्य आहे. भपांपाः (३) “गंभीर लिखाणांतला एकसारखेपणा शास्त्रपूत असावा हे प्रतिपादन बरोबर नाही.” मोहनी: मान्य. शास्त्रपत शब्द मागे घेतला. भपांपाः (४) “अनुच्चारित अनुस्वार काढून टाकल्याने अर्थ समजण्यांत कांहीं अडथळा निर्माण होत नाही.” मोहनीः कवितांचा अर्थ समजण्यांत अनुस्वारांच्या अभावी अडथळा निर्माण होतो. गद्यांत तो तितकासा होत नाही हे मान्य. प्राचीन काव्य वाचतांना तर ते आवश्यकच आहेत. पण लेखनाचे नियम काव्यासाठी आणि गद्यासाठी वेगवेगळे असावे हे कितपत सयुक्तिक आहे?

गद्यांतसुद्धां अनुच्चारित बिंदुचिहें वापरल्याने अर्थनिश्चयनास साहाय्य होते. त्याचे कारण मुद्रित मजकुराचे वाचन करीत असतांना आपण प्रत्येक अक्षर वाचणार नसतो. काही शब्द मधूनमधून डोळ्यांनी उचलून पूर्ण वाक्यांचा अर्थ समजून घेणार असतो. आपली नजर ज्या शब्दांवर स्थिरावेल त्या शब्दाने जास्तीत जास्त संदर्भ व्यक्त करावा अशी गरज असते. तें कार्य सर्व अनुच्चारित बिंदुचिह्नांचे उच्चाटन केल्यामुळे घडत नाही. आजवर अशा बिंदु-चिह्नांनी काय काय सांगितले आहे यांची यादीच येथे उद्धृत करतो. लिंग, वचन विभक्ति, कर्ता कोणत्या पुरुषांत आहे तें, अव्ययें, क्रियापदें कोणती, नामें कोणती आणि क्वचित् व्युत्पत्तीच्या योगाने अर्थभेद सांगण्याचे तें (बिंदुचिह्न) साधन आहे. मागच्या लेखांत एक वाक्य छापतांना चूक झाली आहे. ‘मला खाऊ दे’ हे वाक्य दोन वेळां लिहिले गेले. त्यावर एका ठिकाणी बिंदू देणे राहून गेले. एकदां खाऊ हे नाम आहे. तर दुसऱ्यांदा खाऊ हे क्रियापद आहे. काठी, काठी (काठी । यष्टि, कांठी (कांठ असलेले) कांठी : तिरावर जरीकांठी, इंद्रायणीकांठीं) म्हणून अनुच्चारित अनुस्वार ठेवल्याने अर्थबोध होण्यास मदत होते हेंहि खरेच आहे. नजरेखालच्या शब्दाने आपल्याला पूर्ण अर्थ समजला तर आपल्याला संदर्भावर अवलंबून राहावे लागत नाहीं. बाकीचा अर्थ अध्याहृत धरून काम भागतें. भपांपाः (५) मराठीतला शेवटचा ‘अ’ साधारणतः उच्चारला जात नाहीं तो उच्चारायचा असेल तर त्याकरता वेगळ्या चिह्नाची गरज आहे. मोहनीः वरील परिच्छेद क्रमांक २ (दोन) पाहावा (नाटकासंबंधींचा).
भपांपाः (६) गरीब हा मुळांत परदेशी शब्द – तो “तत्सम हि नाहीं ‘तद्भव’ हि नाही आणि देशीहि नाही पण तो मराठीत आल्यावर, मराठीच्या नियमाप्रमाणे, त्याचे गरिबाला असें रूप होते. “नागपूर” किंवा ‘गती’ असे मराठीरूप शब्द मानले तर त्यांची “नागपुरांत’ आणि ‘गतिमान’ अशी रूपें होतात. हे समजायला आणि समजावून द्यायला अडचण पडूं नये. मोहनीः आपले पहिले वाक्य मान्य. मराठीमध्ये तो अतिपरिचयामुळे तद्भव मानला गेला. असे कांहीं शब्द भाषेमध्ये येणारच. टेबलावर हा शब्ददेखील तसाच आहे. पुढे आपण ‘नागपूर’ आणि ‘गती’ या विषयी जे म्हटले आहे त्यांत ‘नागपुरांत’ ह्यामध्ये आपण विभक्तिप्रत्यय लावलेला आहे. ‘गति’ला विभक्तिप्रत्यय लागतांना सामान्यरूप आणि अन्य प्रत्यय लागतांना त्या संस्कृत शब्दाचें प्रथमाविभक्तीचे अथवा प्रातिपादिक रूप येते त्यामुळे ‘गतिमान’ झाले आहे. त्यामुळे ‘गती’ तें ‘गति’ होत नाही. गति हा शब्दसुद्धां साधित असून तो गम्+क्तिन् असा घडविला आहे. मुळांत गती लिहिणेच चूक आहे (शानच् प्रत्यय ‘मान’) सगळ्या शब्दांचे मराठीकरण करणे हेच मला मान्य नाही. शब्दांच्या लिखित रूपांनी मूळ धातु डोळ्यांना दाखवले पाहिजेत हे माझें मत मी अजून बदललेले नाही. कारण आपल्या उच्चाराप्रमाणे लिहिलेले शब्द संस्कृतच्या कोशांत सापडत नाहीत. बंगाल्यांनी आपापल्या उच्चारांचे उदा. सकल ऐवजी शकल, सकृत् ऐवजी शकृत् असे शब्द शोधल्यास ते भलताच अर्थ दाखवतील आणि “नीती, गती” हे शब्द कोशांत सांपडायचेच नाहीत. भपांपाः (७) कुठल्याहि शब्दाचे जे रूप असते त्यामागे त्या शब्दाचा इतिहास असतो, परंपरा असते, संस्कृति असते. निरनिराळे वाक्प्रचार त्यांतूनच निर्माण होतात. त्यांचे ज्ञान असणारा व त्यांतली गोडी जाणणारा माणूस जुन्या लेखनपद्धतीला चिकटून राहील. तें ज्याला माहीत नसेल तो माणूस त्याच्या कानांवर जे पडेल तें कागदावर उतरवेल. त्याला दोष देतां येत नाही. मोहनीः माझा आग्रह मुद्रण कसे असावे ह्याविषयी आहे, लेखनाविषयीं नाहीं. छापलेलें वाचणाऱ्यांपैकी, लाखांतला एखादा गोडी जाणणाराहि असेल हे लक्षात घेऊन छापणारानें गोडी कायम ठेवावी. भपांपाः (८) ‘शुद्ध’ लेखनाच्या महत्त्वापेक्षा कमी पण तरीसुद्धां बऱ्याच महत्त्वाचे प्रश्न आहेत, सुवाच्य लिहिण्याचे आणि चांगल्या उच्चारांचे. जोडाक्षरें सुलभतेने वाचतां यावीत म्हणून ती वेगळ्या प्रकारे लिहिण्याचे ठरवले तर कांही बिघडत नाही. त्याने कागदाची नासाडी होईल हे मोहनींचे म्हणणे मला पटले नाही. उच्चारांत आपण काही शास्त्रगीता चालवून घेतों. ‘ज्ञ’ चा खरा उच्चार ‘ज्ञ’ असा असायला पाहिजे, तसा आपण करत नाही. मला खटकला तो “विद्यामाने” या शब्दाचा “विद्यमानं” असा उच्चार. कारण त्या उच्चाराने मूळ शब्दाच्या ‘सति सप्तमी’ या विभक्तीची गंमत निघून जाते. मोहनीः दिवसेंदिवस कम्प्यूटरच्या उपलब्धतेमुळे हाताने लिहिलेले लेख दुर्लभ होत जाणार! लेखकांकडून प्रकाशकांकडे किंवा संपादकांकडे जाणारा मजकूर ए-रळश्र (ई-मेल) में अथवा floppy (फ्लॉपी) CD (सीडी) ने जाणार. इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे हाताने लिहिलेले वाचण्याचे प्रसंग पुढच्या पिढीला क्वचित् येणार अशीच शक्यता आहे. जग झपाट्याने बदलते आहे. शिवाय मी मुख्यतः मुद्रणाविषयींच लिहिले आहे. हस्ताक्षर हा माझा येथे विषय नाही. जोडाक्षरांचे काही नमुनेः पुढे देत आहे त्यांची तुलना केल्यास कागद कसा जास्त लागतो हे लक्षात येईल.

“सुलभता कोणासाठी हवी?’ या प्रश्नाचे माझें उत्तर ‘मतिमंदांसाठी’ असे आहे. साधारण बुद्धीच्या विद्यार्थ्याला आजच्या लिपीमध्ये कांहींहि अवघड नाही. म्हणून त्याबाबतींतले आपले म्हणणे मला आजतरी मान्य होत नाही. उच्चार कसे असावेत ह्याविषयी मला कांहींहि म्हणायचे नाही. माझा विषय लेखन कसे असावे एवढाच आहे. उच्चारण कसे असावे हा नाहीं. भपांपा : (९) शेवटी शास्त्रपूतापेक्षा शिष्टसंमत काय हे महत्त्वाचे. त्यांत थोडा शिष्टपणा असतोच. ‘म्या केले’ असा भावे प्रयोग जास्त शास्त्रपूत आहे. पण ‘मी केले’ असा धेडगुजरी प्रयोग शिष्टसंमत आहे. त्याला काय करणार? मोहनी: ‘शास्त्रपूत’ हा शब्द मी पूर्वी एका विशिष्ट संदर्भाने वापरला आहे. त्याविषयी पुन्हां लिहीत नाही. ‘म्यां केलें” आणि “मीं केलें’ हे दोन्ही प्रयोग शास्त्रसंमत होते. फक्त त्यावर तृतीया विभक्तिदर्शक अनुस्वार लेखनांत आवश्यक होता. “शिष्ट’ कोण याच्या व्याख्येत मी पडत नाही. मी सगळ्यांचीच गणना शिष्टांत करतो.

[ हा विषय सध्या येथे थांबविण्यात येत आहे. सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.