संपादकीय

एखाद्या साहित्यिकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण वाचक म्हणून काही प्रतिक्रिया व्यक्त करतो म्हणजे नेमके काय करतो? काळाच्या एका विशिष्ट बिंदूशी अथवा पटाशी त्या वाययीन व्यक्तिमत्त्वाचे जे नाते आहे ते समजावून तर घेत असतोच पण त्याहून महत्त्वाचे हे की आजच्या दर्शन तारतम्याने आपण त्या वाययीन व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करतो. आपल्या आजच्या विचारव्यूहाचा नवा अन्वयही लावण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. एकाप्रकारे आपल्या इतिहासाची निवड करीत असतो.
‘विभावरी शिरूरकर’ या नावाने लेखन करणाऱ्या बाळूताई खऱ्यांची जन्मशताब्दी साजरी करताना मालतीबाई बेडेकर हेही व्यक्तिमत्त्व अर्थातच आपल्यासमोर आहे. बाळूताई खरे ते मालतीबाई बेडेकर या प्रवासात लेखिकेने कथाकादंबऱ्यांच्या लेखनासाठी उमा (१९६६) या एका कादंबरीचा अपवाद वजा करता विभावरी शिरूरकर हे नाव वापरले आहे. नाटक, नाटिका, चित्रपटकथा यासाठी मालतीबाई बेडेकर हे नाव वापरले आहे. वैचारिक लेखनासाठीही मालतीबाई बेडेकर हेच नाव योजले आहे (१९३०-३१ मध्ये लिहिलेली अलंकारमंजूषा आणि हिंदूव्यवहारधर्मशास्त्र (का. न. केळकरांच्या सहकार्याने) ही पुस्तके अर्थात् अपवाद). भूतकाळातील एखाद्या साहित्यिकाचा विचार करणे आणि विभावरी शिरूरकरांचा विचार करणे यात अंतर आहे. विभावरी शिरूरकर या व्यक्तिमत्त्वाशी पहिल्या शिक्षित स्त्रीच्या उद्गाराचे महत्त्व जोडलेले आहे.
महाराष्ट्रात जोतिराव फुले यांच्यापासून गोपाळराव आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे असे अनेक पुरुष विचारवंत कार्यकर्ते झाले ज्यांनी स्त्रीविषयक सुधारणेचा विचार केला. साहित्यात हरिभाऊ आपटे, काशिबाई कानेटकर यांच्यापासून वामन मल्हार जोशी यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांनी भारतीय कुटुंबातील स्त्रीचा, समाजातील स्त्रीविषयक धारणेचा आविष्कार साहित्यकृतीत केला. या समाजात स्त्री आणि पुरुष यांच्या स्थितीची तुलना करणारा स्त्रीपुरुषतुलना हा ग्रंथ जोतिरावांच्या शिष्या ताराबाई शिंदे ह्यांनी लिहिला, ज्यात दुटप्पी नैतिक मूल्यांचा विचार होता, कादंबऱ्यांची स्त्रीवादी समीक्षाही होती. पण ताराबाई शिंदे काय किंवा ख्रिस्ती झालेल्या पंडिता रमाबाई काय वेगवेगळ्या कारणाने मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय सुधारणावादी विचाराच्या परिघावरच राहिल्या.
महर्षी कर्वे यांच्या महिला विद्यापीठात शिक्षण घेऊन हातात लेखणी घेणाऱ्या विभावरी शिरूरकर, बी.ए.’ यांनी मात्र नव्याने वाचक बनलेल्या समाजाचे लक्ष शिक्षित होऊन स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहणाऱ्या तरुणीकडे वेधले. निबंधकार सुधारकांनी स्त्रीशिक्षणावर, स्त्रीसुधारणेवर आजवर लिहिले होते पण ते पुरुषी उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून. म. फुले यांनी जो विचार मांडला आणि आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना आपल्या कार्यात सहकारी केले तो मूलभूत आणि म्हणून अपवादात्मक होता. पण मध्यमवर्गीय लेखकांनी त्याकडे तुच्छतेने पाहिले त्याकडे पाठ फिरविली. आगरकरांनासुद्धा रे. फुले असा उल्लेख करावासा वाटणे यात मुख्य प्रवाहाचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगण्यासाठी वरील उल्लेख केलेले नाहीत. विभावरी शिरूरकरांच्या वाययाचा विचार करताना त्यांच्यापूर्वी निर्माण झालेले, उपस्थित केलेले स्त्रीविषयक प्रश्न आणि त्यांनी ललित आविष्कारांत आणि वैचारिक लेखांत उपस्थित केलेले प्रश्न यांचा अन्वय महत्त्वाचा आहे.
ललित साहित्याच्या संदर्भात विचार करताना एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. हरिभाऊंना पण लक्षात कोण घेतो या कादंबरीत वा तुळजापूरकरांना माझे रामायण मध्ये बाईच्या आवाजात कादंबरी सांगावी असे वाटणे आणि प्रत्यक्ष बाईने लिहायला लागणे यातील अंतर जाणवले तरी बाईच्या मूक जगण्याला वाचा फुटणे हा मुद्दा महत्त्वाचा!
कळ्यांचे निःश्वास (१९३३) या पहिल्या कथासंग्रहातील कथांचे स्वगताला जवळ जाणारे रूप, त्यातील आवश्यक शीर्षके पाहताना हे लक्षात येते की हे लेखन स्त्रीला केवळ बळी (ळिलींळा) मानणारे नाही, स्वातंत्र्यासाठी विनवणी करणारे नाही तर स्वतंत्र व्यक्तीच्या समाजातील मोकळ्या वावरातून निर्माण होणारे प्रश्न, संक्रमण अवस्थेतील कुटुंब आणि समाज यांच्या संदर्भात बाईला उभी करून पाहणारे चित्रण आहे. नव्या स्वातंत्र्यात होणाऱ्या चुकांचाही अंदाज घेणारे हे लेखन आहे. या कथा आणि नंतर आलेली हिंदोळ्यावर (१९३४) ही कादंबरी एका बाजूला तर विभावरीचे टीकाकार हे पुस्तक दुसऱ्या बाजूला ठेवले तर समाजमनाचे स्पंदन जाणवते. त्याच्याशेजारी गीता साने, प्रेमा कंटक या गांधीवादी लेखिकांचे लेखन ठेवले तर एक अर्थपूर्ण अन्वय निर्माण होतो. पण या साऱ्याचा विचार मी या लेखात करणार नाही. विद्युत भागवत त्यांच्या लेखात या काळाचा आजच्या संदर्भात विचार करीत आहेत. या लेखात मी शिरूरकरांच्या अखेरच्या साहित्यकृतीचा प्रामुख्याने विचार करणार आहे. खरे मास्तर ही कादंबरी (१९९५) म्हणजे लेखिकेने भूतकाळात केलेला प्रवास आहे. एका रीतीने आत्मचरित्रात्मक आहे, पण जाणीवपूर्वक कादंबरीच्या रूपात लिहिलेली आहे. आयुष्याच्या अखेरीस हे सारे पुन्हा संघटित करताना लेखिकेने स्वतःच्या आयुष्याकडे आपल्या पालकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा यत्न केला आहे. वर्तमानातून भूतकाळाकडे डोकावण्याचा यत्न केला आहे. आत्मचरित्र लिहावे का ? या विचारातून कादंबरीकडे वळणे ही प्रक्रिया काही आपल्याला अपरिचित नाही. पण लेखिकेने वडिलांवर लिहावे असे मनात आणून नंतर कादंबरी लिहिणे त्या लेखनाचा प्रारंभ वडिलांनी लिहन ठेवलेल्या त्रोटक आठवणींनी करून नंतर तृतीयपुरुषी निवेदनाकडे वळणे ही प्रक्रिया मला मराठी कादंबरीच्या इतिहासातील आणखी एका प्रकरणाचे स्मरण करून देते. हरिभाऊ आपट्यांना एका विशिष्ट कालपटाच्या संदर्भात बाईचा अनुभव मांडावासा वाटला तेव्हा त्यांनी पण लक्षात कोण घेतो या कादंबरीच्या प्रारंभी एका आसन्नमरण विधवा स्त्रीने लिहिलेल्या संहितेचा वाययीन प्रयुक्ती (वर्शीळलश) म्हणून वापर केला आणि मग आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखन केले, तर १९९५ सालच्या मालतीबाई बेडेकरांना आपल्या वडिलांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात पाच मुलींना शिकवले, समाजसुधारणेला आवश्यक असे आर्थिक बळ नसताना शिकवले या ऋणाचे स्मरण करावेसे वाटले. आणि विभावरी शिरूरकरांना कादंबरीरूपात तो अनुभव मांडताना संक्रमणकाळाचा आलेख तर मांडावासा वाटला, पण मुलींना आणि मुलांना शिक्षण दिल्यावर त्यांची राहणी वेगळी झाल्यावर निर्माण होणारा दुरावा सहन करणाऱ्या खरे मास्तरांचे चित्रही त्यांनी आपल्या कादंबरीत रंगवले आहे. वेगवेगळ्या पिढ्यांमधील अंतराय हा गेल्या काही वर्षांतील साहित्याच्या कुतूहलाचा विषय आहे. खरे मास्तर स्वतः एक साधे चित्रकला शिक्षक मुली डॉक्टर, प्राध्यापक, मुलगा विलायतेला जाऊन तंत्रज्ञ झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलणार या भावनेने घरासमोरच्या सराफाच्या ओटीवर बसून दूरस्थपणे मुलामुलींची प्रगती पाहतात. मुले येताजाता आईला मात्र सारखी प्रेमाची साद घालतात असे चित्रपटातले वाटावे असे हृदयद्रावक चित्र या कादंबरीत उभे राहते. कौटुंबिक नात्यातील हा पेच, बदलत्या समाजाला सामोरे जाणाऱ्या मुलींच्या आयुष्यातील पेच आणि पार्श्वभूमीला असणारे स्वातंत्र्यलढ्यातील प्रश्न यामुळे ही कादंबरी म्हणजे महाराष्ट्राचे छेदात्मक दर्शन घडविणारा एक दस्तावेजच झाली आहे.
कळ्यांचे निःश्वास लिहिणाऱ्या विभावरी शिरूरकरांनी केवळ स्त्रियांच्या दुःस्थितीविषयी न लिहिता स्वतंत्र झालेल्या बाईला स्वतःशी आणि समाजाशी कसे लढावे लागेल याविषयी लिहिले. स्त्रीच्या शारीर-मानसिक गरजांविषयी लिहिले. त्यासमोर ही कादंबरी ठेवली तर विभावरी शिरूरकर आपल्या वडील पिढीकडेही विचक्षण नजरेने पाहताना दिसतात. खरे मास्तर या कादंबरीच्या प्रारंभी विधवा आईच्या मुलाने शिक्षणाच्या ध्यासाने मुंबईला पळून जाणे, गरिबीत लहानपणी लग्नाला कबूल झाल्यास आपण त्याच चक्रात अडकू या भयाने पळून जाणे, गरिबीतही आश्वासक असणारे कोकणातील गावाचे भावविश्व आणि मुंबईतील नागरी जीवनातील ओढगस्त अशी परिणामकारक विरोधी चित्रे आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळातील केसरीचा आगरकरांचा-संस्कार, बालमनाला असणारे क्रांतिकारकांचे आकर्षण, श्रीमंत सुधारकांचे साहेबाच्या मर्जीबाहेर न जाणे असे संमिश्र संस्कार घेत हा छोटा मुलगा मोठा होतो.
घोडनदी शिरूरमधील खरे मास्तरांचे शिक्षकी आयुष्य आणि छोटा संसार उभा करताना, खरे मास्तरांचे आपल्या पत्नीशी असलेले नाते मुली झाल्या तरी खंत न मानता त्यांना शिक्षण देण्याचे स्वपक् पाहणारे खरे मास्तर, भंवतालच्या समाजातील जातीपातीचे सोवळे त्यांना पटत नाही आपल्या पत्नीनेही ते पाळू नये हा आग्रह, त्यातून पत्नीची द्विधा अवस्था अशी चित्रे कादंबरीत येतात. ख्रिस्ती पाद्री, त्यांचे गरीब, दलित वस्तीतील लोकांशी मिसळून वागणे पण सवर्ण लोकांनी जातीच्या अहंकारामुळे, आपल्या कोशात राहणे अशी समाजचित्रे या कादंबरीत येतात. समोर धर्मांतराचे भय दिसत असताही हिंदू समाजाविषयी काळजी करणारी माणसे जातिभेद विसरायला तयार नाहीत हे खरे मास्तरना जाणवते पण आपणही काही करू शकत नाही याने त्यांना हतबल वाटते. एक गोष्ट कादंबरीच्या परंपरेच्या संदर्भात लक्षात येते की खरे मास्तरना रूढार्थाने नायक करायचा प्रयत्न नाही. मध्यमवर्गीय माणूस एखाद्या ध्येयासाठी सर्व सांसारिक जबाबदाऱ्या सोडून देऊ शकत नाही याची जाणीव निवेदकाला आहे आणि खरे मास्तर या पात्रालाही आहे. त्यामुळे मुलींना शिक्षण देणे (आणि मुलांनाही) या एका सामाजिक ध्येयापाशी खरे मास्तरांचे एकाग्र झालेले भान राजकीय संदर्भात तडजोड करते वा पाय मागे घेते. एका परीने मागच्या पिढीतील सामाजिक संघर्ष की राजकीय या वादातले एक उत्तर समोर येते. पण खरे मास्तरांना आपल्या निर्णयाविषयी खंत आहे. आपल्या मुलालाही आपण त्याच्या स्वातंत्र्याच्या ऊर्मीपासून दूर केले याचाही विषाद आहे. कळ्यांचे निःश्वास प्रमाणे याही कादंबरीत प्रौढ कुमारिकांचे प्रश्न लेखिकेने मांडलेले आहेत. तसेच ख्रिस्ती धर्मांतराचे भयही दाखवले आहे.
या लेखिकेला बाह्य परिस्थिती आणि नैतिक मूल्ये यांतला अन्वय जाणवतो आहे. १९६२ जसा तो शबरी या कादंबरीतही आहे. महायुद्ध आणि नागरीकरण यांमुळे माणसांच्या मूल्यव्यवस्थेत पडणारे अंतर दिसते. अभिरामच्या रूपात आजच्या चंगळवादाचे चित्रही दिसते.
पण मालतीबाई बेडेकर यांची समाजशास्त्राच्या अभ्यासाची पार्श्वभूमी लक्षात घेता, हे प्रश्न मांडताना ते कोणा एका व्यक्तीचे मानसिक प्रश्न म्हणून मांडले जातात तेव्हा आश्चर्य वाटते. वायय हे विशिष्टाविषयी बोलते हे मान्य करूनही असे वाटते की स्त्रीप्रश्नाला असलेली जातप्रश्नाची भूमी या लेखिकेला का दिसत नाही ? खेडे आणि शहर यातील अंतर दाखवतांनाही ‘खेडे’ नावाची पूर्वकल्पनाच मनात आहे. त्या खेड्याची माती जाणवत नाही. खरे मास्तर एखादा अपवाद वजा करता मित्रांविना एकाकी आहेत, शबरीलाही आपल्या वेदना सांगायला मैत्रीण नाही. तिला अचानक हरिद्वारला जावेसे वाटते, यात नायिकेकडे पाहण्याचा एक कृतकनिर्भरशील दृष्टिकोन जाणवतो. शबरी या कादंबरीत आणि त्यांच्या इतरही लेखनात शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण देण्याला लेखिकेचा विरोध दिसतो. कर्वे यांच्या विद्यापीठात शिकूनही, त्या काळातील र. धों. कर्वे यांचा समाजस्वास्थ्याविषयीचा विचार लेखिकेपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. खरे मास्तर आपल्या पत्नीवर येणाऱ्या बाळंतपणाच्या संकटाचा विचार करतात, प्रसंगी खजील होतात पण त्यांच्याही मनात र. धों. कर्वे यांचे स्मरण येत नाही. ‘समकालीन’ या कल्पनेच्या मर्यादा स्पष्ट होतात. हिंगणे विद्यापीठातून शिकून नंतर ज्यांनी लेखन केले त्यातल्या अनेकांच्या लेखनात स्त्री-पुरुष संबंधाविषयी संकोच दिसतो. विभावरी शिरूरकर तर ‘धीट’ लेखिका, श्रीधर व्यंकटेश केतकरांनीही कळ्यांचे निःश्वास च्या प्रस्तावनेत त्यांच्या थेट भाषेत लिहिण्याला आणि विविध पातळीवरील प्रेमाच्या स्वीकाराला मान्यता दर्शविली आहे. पण त्यांच्या विवाहोत्तर लेखनातही ललित आणि ‘मनस्विनीचं चिंतन’ या वैचारिक लेखनातही (१९६९) स्वपावित्र्याचा भाव आहे. कळतनकळत, समाजाने निर्माण केलेल्या ‘असल्या-तसल्या स्त्रिया हा भेद मान्य केल्यासारखे हे लेखन आहे.
आधुनिक वा नवविचाराचा मानलेला साहित्यिक आपल्या उत्तरायणात आधुनिकतेविषयीच्या मिथकांवर आक्षेप घेतो तेव्हा आश्चर्य वाटते. विभावरी शिरूरकरांचे असेही झाले आहे. म्हणून की काय १९७० नंतरच्या स्त्रीवादी चळवळीशी वा चर्चेशी त्यांचा फारसा अन्वय राहिला नाही. आपण सर्वांनी त्यांच्याशी योग्य संवाद साधला नाही अशी खंत नेहमी मला वाटते पण खरे मास्तर च्या प्रास्ताविकात “यजमानाचं भरपूर ऋण घ्यायचं आणि त्यांच्या जिवावर आईवडिलांचे पांग फेडायचे, हे सध्याच्या स्त्रीमुक्तीच्या विचारसरणीला धरूनच आहे.” (पृ.१) हे वाक्य आठवले, की संवादातील-समजुतीतील दरी जाणवते. त्यांच्या पिढीतील गीता साने, प्रेमा कंटक, भारतीय भाषातील इतर समकालीन लेखिकांच्या शेजारी त्यांचे साहित्य मांडून पाहिले पाहिजे अशी जाणीव होते.
आजचा सुधारक च्या या अंकाच्या निमित्ताने डॉ. विद्युत भागवत, डॉ. रेखा साने-इनामदार आणि मी तीन दृष्टिकोनांतून विभावरी शिरूरकरांना पुन्हा पाहण्याचा यत्न केला आहे. महाराष्ट्रातील स्त्रीवादी विचाराला साहित्याला चळवळीला मोठी परंपरा आहे. ही परंपरा जरा तपासून पहायचीसुद्धा परंपरा आहे हे किती चांगले! जाताजाता एका बंगाली स्त्रीवादी कार्यकर्तीने खरे मास्तरा चे इंग्रजी भाषांतर वाचले आणि ती म्हणाली “कशाला आपण त्या इंग्रजी कादंबऱ्या वाचतो’ अशीही एक प्रतिक्रिया!
आजचा सुधारक ने हा अंक काढला आणि आम्हा तिघींना काही म्हणण्याची संधी दिली, याबद्दल मनःपूर्वक आभार!
पुष्पा भावे
[पुष्पा भावे, निवृत्त प्राध्यापक : मराठी स्त्रीअभ्यास आणि नाटकाचे सौंदर्यशास्त्र यावर विविध विद्यापीठांत अध्यापन. विविध चर्चासत्रांत निबंधवाचन ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.