विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांच्या लेखनाचे आकलनः सामाजिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून

१९०५ साली जन्मलेल्या बाळूताई खरे या लेखिकेने १९३३ साली कळ्यांचे निःश्वास नावाचा ग्रंथ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या प्रकाशनपूर्व अवलोकनासह प्रसिद्ध केला. मराठी समाजामध्ये या लघुकथासंग्रहाने वादळ उठविले. त्या काळातील शिक्षित तसेच अविवाहित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्य आणि आकांक्षांबद्दल या लघुकथांमधून काही मांडले आहे. विशेष म्हणजे अशा स्त्रिया ज्या दडपणुकीच्या बळी ठरतात त्याबद्दल स्पष्टपणे बोट दाखवीत या कथा लैंगिकतेची चर्चाही करतात. स्त्रियांची लैंगिकता आणि स्वत्व ही दोन्ही पुरुषाच्या अहंकारामुळे छिन्नभिन्न कशी केली जातात याचे चित्रण या कथांमधून येते. भारतीय समाजातील दुहेरी नीतिमूल्ये आणि संकुचित, कठोर आणि कर्मठ आदर्श या सर्वांची चिकित्सा अप्रत्यक्षपणे करून स्वतंत्र देश म्हणून भारताची घडण घडवायची तर स्त्रीप्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या लेखनातून पुढे येताना दिसते.
या पुस्तकातील अकरा कथांमधून वयात आलेल्या परंतु प्रौढत्व नाकारलेल्या भारतातील मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्रण येते. अविवाहित स्त्रीला स्वतःचे घर असण्याचा अधिकार नाही का ? किंवा अर्थार्जन करणाऱ्या बाईला निर्णयाचे स्वातंत्र्य का नसावे? किंवा शिकलेल्या, मिळवत्या कुमारिकेने त्याग करूनच समाजात श्रेय का मिळवावे? असे अनेक प्रश्न या कथांमधून विचारले गेले. त्या काळात उदयाला आलेल्या मुलीला दाखविण्याच्या प्रथेतील विकृती आणि मुलींच्या आत्मभानाच्या चिंधड्या आणि या त-हेच्या प्रथेला मिळणारी सामाजिक मान्यता याविषयी या कथा पोटतिडिकीने बोलतात.
केतकरांनी या कथासंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना महत्त्वाची आहे. त्यामध्ये त्यांनी विभावरी शिरूरकर या टोपणनावाखाली लिहिणाऱ्या सारस्वत जातीत जन्मलेल्या अज्ञात पदवीधर तरुणीच्या लेखनाकडे ‘स्त्रियांची दृष्टी’ विशिष्ट असते किंवा पुरुषांपेक्षा अत्यंत भिन्न असते अशा भूमिकेतून लिहिले आहे. केतकरांनी विभावरीचे केवळ स्त्रीलेखिका म्हणून कौतुक करण्याचे नाकारले. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होत नसल्याने त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी अनभिज्ञता असते असे मांडून केतकरांनी तत्कालीन नव्या पिढीमध्ये ‘भिन्न-लिंग-मनोजिज्ञासा’ अधिक आहे असे मांडले. १९३३ साली केतकरांनी स्त्रीपुरुष यांच्यामध्ये ‘जातितः’ भेद असतो म्हणून स्त्रियांचे मन समजून घेण्यास स्त्रियाच पुढे आल्या पाहिजेत असे भरीव आणि जोरकसपणे मांडले आहे. केतकरांनी सुधारकी चौकटीतून शिक्षित स्त्रियांचा केलेला दुहेरी नीतिमूल्यात्मक साचाही स्पष्टपणे मांडला आहे. सुधारक म्हणविणाऱ्या वर्गाने सुशिक्षित स्त्री नावाची एक नवी ‘मान्यदेवता’ कशी निर्माण केली आहे आणि तिला चुका करण्याचे स्वातंत्र्य कसे नाकारले आहे हे केतकर स्पष्टपणे मांडतात. अगदी प्राकृत सप्तशतीपासून स्त्रिया लेखन करत होत्या याकडे लक्ष वेधून संतस्त्रिया, तमाशा-लावणीतील स्त्रिया आणि समकालीन स्त्रीलेखक यांचा आढावा घेऊन विभावरी शिरूरकरांनी केलेल्या लेखनातून भिन्न स्त्रियांचे मनोवर्णन कसे येते हे अधोरेखित केले आहे. बदलत्या सामाजिक राजकीय, आर्थिक परिस्थितीनुसार कुटुंबसंस्था ही बदलणार आणि त्यातील सत्तासंबंधही बदलणार याकडे लक्ष वेधणाऱ्या या कथा अधोरेखित करतानाही केतकरांच्या मते विभावरीबाईंनी प्रेम नावाच्या संकल्पनेमागील अनेक पायऱ्या सूक्ष्म निरीक्षणाने दाखविल्या आहेत, त्याला महत्त्व दिले आहे. लेखिकेने वाकडे पाऊल पडणाऱ्या स्त्रिया मूलतः वाईट प्रवृत्तीच्या असतात किंवा आडमार्गाने नेणारे पुरुष मूलतः दुष्ट असतात अशा साच्यातून सोडवून आपले लेखन केले आहे हेही केतकरांनी नमूद केले आहे. विभावरीबाईंचे थेट भाषेत लिहिणे केतकरांना महत्त्वाचे वाटते.
४५ वर्षांपूर्वीच्या आपल्या कथासंग्रहाचे पुनर्मुद्रण १९७६ साली करताना मालतीबाई बेडेकर या नावाने कळ्यांचे निःश्वास लिहिताना आणि लिहिल्यानंतर काय झाले त्याची साद्यंत हकीकत बेडेकर यांनी लिहिली आहे. १९३४ साली हिंदोळ्यावर ही कादंबरी विभावरी शिरूरकर या नावाने कोणत्याही प्रस्तावनेशिवाय प्रसिद्ध झाली. या कादंबरीत विवाहित पण संसार बिघडलेल्या प्रौढ, शिक्षित, नोकरी करणाऱ्या अचलाचे संस्कारांच्या वाऱ्यावादळातून झगडणे मांडले आहे. या कादंबरीत औरस-अनौरस, आणि गरती व वेश्या या संकल्पनांमागील संकुचितता, कर्मठपणा स्पष्टपणे मांडून विचार आणि कृती करणाऱ्या स्त्रीची कथा सांगितली आहे. स्त्रीची लैंगिकता आणि मातृत्वाची ओढ यामधील गुंतागुंत दाखवून देणारी ही कादंबरी देहकोशात मुरलेल्या पिढ्यानुपिढ्यांच्या गुदमरून टाकणाऱ्या संस्कारांविषयी मोठी प्रश्नचिह्ने उभी करते. हिंदोळ्यावर ही कादंबरी त्या काळात गलिच्छ व अश्लील ठरली. ते समाजविघातक कृत्यही ठरले. १९७६ सालच्या आपल्या प्रस्तावनेत मालतीबाई आपल्याला सांगतात की जर त्यांनी खऱ्या नावाने ही पुस्तके लिहिली असती तर लोकांनी खरोखरच त्यांना जगणे कठीण केले असते.
आपण १९३३ साली जे लेखन केले ते त्यापूर्वीच्या १५/१६ वर्षांआधीच्या खेड्यातील वास्तवाशी निगडित आहे असे बेडेकर म्हणतात. मालतीबाईंच्या या प्रस्तावनेत सुधारणा आणि परंपरा हे शब्द कोणत्याही चिकित्सेशिवाय सरळसोट अर्थाने येतात. म्हणजे खेडे म्हटले तर ते मागास, सुधारणेचा स्पर्शही नसलेले, जातींच्या उतरंडीने युक्त, शिक्षणाचा स्पर्श नसलेले, बालविवाह प्रथा अनुसरणारे, धर्माचा जबरदस्त पगडा असलेले! खेड्याकडे अशा एकसाची पद्धतीने पाहणाऱ्या मालतीबाईंना आपल्याभोवतीच्या शहरी समाजातील विवाहसंस्थेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या स्त्रीपुरुषांबद्दल मात्र आतून घृणा असावी असे वाटते. लेखिका म्हणून समाजातील हे आंतरविरोध आणि त्यांचे अर्थ मालतीबाई लावत होत्या. त्यांच्या मते, “विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नीतिनियमने आणि पापपुण्ये याबद्दल कितीही कडक कल्पना असल्या आणि धर्माचा कितीही जबरदस्त पगडा असला, तरी खेड्यातही काही स्त्रीपुरुष आपल्या मातीच्या गुणधर्मावर नियंत्रण ठेवू शकत नव्हते.’ (बेडेकर – पृष्ठ ७, १९८६) येथे लक्षात येते की आधुनिक जगामध्ये खेडे मागास, शहर प्रगत, आधुनिक शिक्षण पुरोगामी अथवा योग्य तर शिक्षणाचा अभाव म्हणजे सर्व अनुचित अशा थांबेठोक चौकटीत मालतीबाईसुद्धा त्यांच्या काळाला अनुरूप असाच विचार करत होत्या. पुण्यातल्या हिंगणे शिक्षण संस्थेत ज्ञानमय वातावरणात मालतीबाईंना अनेक जातींमधील ‘प्रौढ, विधवा, कुमारिका’ दिसल्या. वसतिगृहातील मोकळीक आणि शिक्षण यामुळे प्रेम आणि प्रेमपत्र तसेच प्लॅटॉनिक प्रेम, अनैतिक चौकटीतील शारीरिक आकर्षण, बोर्डिंगातील स्त्रियांचे समलिंगी संबंध हे सर्व पाहून कळ्यांचे निःश्वास आणि हिंदोळ्यावर ही कथानके लिहिली गेली. मालतीबाईंना उमगलेली स्त्री एकीकडे जरी देह असलेली, चुका करणारी असली तरी त्यांची सहानुभूती वा मनातील मूल्यव्यवस्था मात्र काटेकोर नियमपालनाची, पवित्र, शुद्ध, आदर्श स्त्रीची असावी असे वाटते. १९२० ते १९३० या दशकाबद्दल आपले निरीक्षण नोंदविताना मुलींच्या शिक्षणातून फारसे काही संरचनात्मक बदल झाले नव्हते असे त्या मांडतात. सोशिकपणा, गृहकृत्यदक्षता, व्रतेवैकल्ये, कर्मकांड आणि पतिपरायणता असा मुलींच्या जीवनाचा साचा होता. मॅट्रिकपर्यंत ज्या ३/४ मुली पोहोचत त्या बहुतांशी प्रौढ, विधवा असत असेही त्यांनी नोंदविले आहे. १९३३ च्या आसपास मात्र परिस्थितीत बराच फरक पडला आणि व्यक्तिमत्त्व अंकुरलेल्या मुली दिसू लागल्या. प्रेम, प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, विवाहित पुरुषांवर प्रेम हे सारे ‘परंपरेत रुतलेल्या आपल्या समाजात जी वादळे घडवीत होते त्याबद्दल उलटसुलट ज्या चर्चा चालत त्या चर्चाविश्वाचा भाग लेखिका होती. मालतीबाईंनी अनेक त-हेच्या प्रेमांचे प्रकार पाहिले आणि त्यात पडणाऱ्या माणसांना पापाचरणी किंवा बदफैली न ठरविण्याचा समतोलही साधला. परंतु त्यांच्या काळातील समाजामध्ये मुलीला प्रेम करण्याची संधीच देऊ नये असे वाटणे त्यांना गैर वाटत नाही. या प्रस्तावनेत मालतीबाई पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांचे दुय्यम स्थान कसे घडते याविषयी आर्थिक सामाजिक क्षेत्रातील बदलांचे संदर्भ घेऊन अत्यंत सूक्ष्म तपशिलात मांडतात, परंतु या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे नाते घर आणि कुटुंबाबाहेरील जगाशी कसे जोडलेले आहे हे मात्र पुन्हा सुधारणावादाच्या चौकटीतूनच पाहतात. हिंदोळ्यावर या कादंबरीतील अचला घटस्फोट घेऊ शकत नाही, पुनर्विवाह करू शकत नाही हे दाखविताना तिची लैंगिकता मातृत्वाच्या ओढीसाठी आहे. तत्त्वज्ञानी, सर्व समाजाकडे एक ब्रह्मस्वरूपी चौकटीतून पाहणारा विराग हा मूलतः अचलेपेक्षा श्रेष्ठ आहे.
एकीकडे मालतीबाईंना दलित जाती आणि स्त्रिया नावाची जात या दोहोंनाही आपल्या समाजाने जात्यात घालून भरडून काढले आहे याची स्पष्टता आहे. दलितांना आंबेडकरांसारखे नेतृत्व मिळाले तर स्त्रियांना इंग्रज व मिशनऱ्यांसारखा कैवारी वर्ग मिळाला, आणि ह्यातून परिवर्तनाची सुरुवात झाली असे ऐतिहासिक सत्य त्या नोंदवितात. अत्यंत श्रीमंत घरांतील स्त्रियासुद्धा गुलामाप्रमाणे राबत असतात आणि चार भिंतीत राहून विवाहित स्त्रियांचे आपल्या सासरच्या माणसांशी नाते ऋणकोचे सावकाराशी आणि कुळाचे जमीनदाराशी असणाऱ्या नात्यासारखे असते हेही मांडतात. म्हणजे स्त्रीवादी राजकीय जाणिवेतून स्त्रीपुरुषांच्या सत्तासंबंधाची वीण कशी घडते याचे चांगले भान मालतीबाईंना होते.
स्त्रीशिक्षणाने नेमके काय बदल झाले याविषयी या प्रस्तावनेमध्ये अत्यंत मार्मिक विवेचन येते. लहान वयात लग्ने झालेल्या स्त्रिया मेलेल्या मनाने जगत असत. परंतु स्त्रीशिक्षणाने स्त्रीमन नव्याने आकारू लागले हे मालतीबाई पुन्हापुन्हा अधोरेखित करतात. स्त्रिया विधवा, परित्यक्ता अशा चौकटीत येतात तेव्हा शारीरिक सुखे आपल्यासाठी नाहीत याचे आंतरिकीकरण कसे करतात हे मांडताना मालतीबाई म्हणतात, ‘पुरुषप्रधान समाजाने स्त्रीला माणूस म्हणून न ओळखता तिला अल्पस्वल्प रास्त सुखांनाही वंचित केले आणि आपण काही अन्याय करतो आहोत ही जाणीवही अंतःकरणातून नष्ट केली.’ मालतीबाई सुधारक लेखकांच्या वतीने स्त्रीला माणूस म्हणून समाजाने ओळखावे यासाठी धडपड करीत होत्या. त्यांच्या मते कळ्यांचे निःश्वास व हिंदोळ्यावर ही बोधवाद व वास्तववाद यांच्या सीमेवर लिहिलेली पुस्तके, माणसातील गलिच्छ भावनांचा बडिवार माजविण्यासाठी लिहिली नव्हती. स्त्रीच्या नैसर्गिक निकोप भावनांना गुदमरून टाकू नये असे सांगताना मलातीबाई संयमाचे महत्त्व अधोरेखित करतात. कोणत्याही मानवी समाजाचा सामाजिक इतिहास हा माणसाच्या षड्विकारांवरील नियंणत्राचा इतिहास आहे अशी लेखिकेची धारणा आहे.स्त्रीची आणि पुरुषाची माती सर्व गुणधर्मांसह सारखीच असते म्हणून मुक्ततेची धडपड करताना स्त्रिया अनिर्बंधतेकडे गेल्या तर त्यातील धोकेही मालतीबाईंना जाणवतात. त्यांच्या मते त्यांची सुरुवातीची दोन्ही पुस्तके अमानुष निर्बंधांकडून निबंधमुक्तीच्या सीमारेषेवर लिहिली गेली. म्हणून साहित्यातील एका बदलत्या प्रवृत्तीच्या इतिहासातील ही पुस्तके केवळ एक अंश आहेत असेही त्या मान्य करतात.
१९७६ सालची मालतीबाईंची प्रस्तावना एका अर्थी आपल्याला विभावरी शिरूरकर नावाने लिहिलेल्या तीन पुस्तकांसंबंधी विचार करण्याची दिशा दाखवितात. यात खटकते ते असे की आधुनिकता, औद्योगिकीकरण, शहरीकरण येते तेव्हा मानवी जीवनाचे सार्वजनिक आणि खाजगी अशा कप्प्यांमध्ये विभेदन होते आणि त्यातून स्त्रीच्या आयुष्याचे सर्व श्रेय खाजगी कप्प्यातील घर, कुटुंब, गोतावळा आणि जात या चौकटींशी निगडित केले जाते याविषयीची जाणीव चिकित्सक स्वरूपात दिसत नाही. आधुनिकता आली पण सार्वजनिक जीवनात त्यामुळे येणाऱ्या घुसळणीला बांध घालायचे काम घराघरांत कुटुंबांत झालेच पाहिजे. त्यासाठी स्त्री पावित्र्य, मातृत्व, त्याग ही चौकट स्वीकारलीच पाहिजे या अपेक्षांमधील दुहेरीपण मालतीबाईंनाही खटकत नाही. विरलेले स्वपक् मधील विराग जगाचे आघात सोसणारा, निरपवादपणे मोठेपणा असणारा, तीव्र बुद्धीचा, खोल भावनांचा, समाजाला न भिणारा असा आहे, तर अचलाची माती मात्र सजीव सृष्टीचा भाग असल्याने स्वतःला पापी मानत स्त्रीत्वाच्या पूर्ण विकासासाठी अनौरस मातृत्वाचा ध्यास घेते आणि मग वाऱ्यावादळात कोलमडून पडते.
विरलेले स्वप्न मधील काही मनोगते प्रकाशकांनी कापून टाकली. त्या काळात झेरॉक्सचे तंत्र नसल्याने लेखिकेकडे त्याची प्रतही शिल्लक नसल्याने ज्वलंत मनोगते काळाच्या उदरात गडप झाली. वैशाख नावाच्या तरुणाच्या समाजसत्तावादी तत्वज्ञानासंदर्भात झपाटलेल्या विचारांचा आलेख या कादंबरीत येतो. वैशाखची दैनंदिनी कातरली गेली याचे दुःख विभावरी शिरूरकरांनी या कादंबरीच्या सुरुवातीला व्यक्त केले आहे. हातपाय जखडलेल्या समाजाविषयी, कुचंबणेविषयी पोटतिडिकीने विभावरीबाईंनी लिहिले आहे, स्त्रियांना पूजनीय मानून खोटे स्त्रीदाक्षिण्य दाखविणे कसे चुकीचे आहे हे सांगणारा वैशाख गरीब वर्गाची बाजू घेऊन जातीच्या जोरावर परीक्षेत पुढे जाणाऱ्या मुलाविषयी राग व्यक्त करतो. परदेशी जाण्याबद्दलही वैशाखला आकर्षण नाही. सांपत्तिक विषमतेमुळे होणारे विजोड विवाह किंवा सामाजिक दर्जा, पैसा यांतील समतोल पाहून केलेले विवाह यांविषयीही वैशाखला घृणा आहे. वैशाख आणि रोहिणी यांची मनोगते वाचताना कितीही प्रयत्न केला तरी त्यांतील मूलतः स्त्रीला परावलंबी, दुय्यम मानण्याचा सूर बाजूला सारता येत नाही. वैशाखला अप्राप्याचा ध्यास आहे तर वैशाखचे आकर्षण ही रोहिणीची श्रद्धा आहे. ध्येयवादीपणाच्याही पलिकडचे चिरंतन असे शोधू पाहणारा वैशाख आपल्या भोवतीच्या सर्व ध्येयवादी किंवा निर्मितिक्षम लेखकांना आरपार पाहतो, तर रोहिणीला वैशाखकडे साऱ्या जगाने आदराने पाहावे अशी अपेक्षा आहे. तिला ‘केवळ पोटासाठी ६-६ तास खपून उरल्यासुरल्या वेळी बायकापोरांत नि मित्रमंडळात विलीन होऊन राहणारा, आंधळ्या जीवनाचा वैशाख नको आहे.’ या एका वाक्यातूनच औद्योगिकीकरणाच्या उदयामधून हजारो माणसे यंत्रवत आयुष्य जगू लागली ती आंधळी होती म्हणून नाही तर त्यांना निवडीचे स्वातंत्र्यनव्हते, म्हणून याची जाण मध्यमवर्गीय शिक्षित रोमँटिक रोहिणीला नाही. रोहिणीचे सततचे असमाधान, तिच्या आकांक्षा वैशाखला ‘हीरो’ बनवू पाहतात. त्यासाठी कष्ट सोसण्याची तिची तयारी आहे. श्रीमंत वैशाख चौसोपी घरात वाडवडिलांच्या उद्योगांवर वाढला आहे आणि श्रीमंती एक रोग आहे असे चिंतन करीत आहे. त्याला मोठमोठ्या सभा, त्यांतील रोमांचक भाषणे अशा सार्वजनिक जीवनाची ओढ आहे. त्याला सत्य, ध्यास, सामर्थ्य ह्यांसाठी लढायचे आहे. तिला मिळवून आणणारा, बायकापोरांना खायला घालणारा जबाबदार पुरुष हवा आहे. वैशाखसाठी मात्र ती रानोमाळ धावत सुटण्याचाही विचार करते. परंतु शेवटी आपले अंतःकरण संकुचित आहे आणि मोठे होण्याच्या कल्पनाही संकुचित आहेत असेही मान्य करते. शेवटी वैशाखच्या दृष्टीला दृष्टी देण्याचेही सामर्थ्य आपल्यात नाही हे जाणवून असामान्य तडजोड नाकारणाऱ्या वैशाखच्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय रोहिणी घेऊ पाहते.
विरलेले स्वपक् शेवटची काही पाने परिशिष्ट रूपात संपादक महाशयांनी विचारलेल्या काही प्रश्नांना पत्ररूपाने उत्तरे लिहिली आहेत. या कादंबरीलेखनाबद्दल लेखिकेला संपादकांनी ‘बुरखामंडळीतील सदस्य’ असे म्हणून टीका केली असावी. लेखिकेने उत्तरादाखल आपली उदासीनता, थकलेपणा आणि मर्यादा हे सारेच मान्य केले आहे. पांढरपेशांच्या घरातील वरवरच्या सारखेपणाखाली असणाऱ्या मुक्या विविधतेला वाचा फोडण्याचे आपले काम वैचित्र्याने जळणारे जीवन सांगण्याचे आहे असे लेखिकेने म्हटले आहे. मनातली बरीवाईट आंदोलने आपण वर्णनपद्धतीने मांडली त्यांत निसर्गाच्या अकृत्रिम वैचित्र्यनिर्मितीप्रमाणे आपली निर्मिती आहे आणि ती निःपक्षपाती आहे असा लेखिकेने दावा केला आहे.
विभावरी शिरूरकरांच्या सुरुवातीच्या तीन पुस्तकांचा आढावा घेतल्यानंतर आपण स्त्रीअभ्यासाच्या दृष्टीने या लेखनाचा विचार करू. स्त्रीअभ्यास नावाची आंतरशास्त्रीय स्वरूपाची ज्ञानशाखा १९७५ नंतर नव्याने उदयाला येऊ पाहत आहे. विज्ञान, समाजविज्ञान, कला, मानव्य या सर्व शाखांमधून स्वतःसाठी बळ मिळविण्याचा प्रयत्न स्त्रीअभ्यासाला करावा लागतो. मानवी इतिहासामध्ये स्त्रीप्रश्न कसा घडला हे स्त्रीअभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. म्हणून साहित्य या ज्ञानशाखेकडे सामाजिक इतिहासाचा स्रोत या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यातच स्त्रियांचे साहित्य साहजिकच अधिक महत्त्वाचे ठरते. पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे इतिहासात अदृश्य केली गेलेली स्त्रीलेखनाची परंरा शोधणे, कोणत्या टप्प्यावर कोणत्या प्रकारचे साहित्य स्त्रिया लिहीत होत्या हे पाहणे आणि असे करताना लेखक म्हणून स्त्रियांनी काय मिळविले आणि त्यांच्या हातून काय निसटले याचा अभ्यास करणेही महत्त्वाचे ठरते.
१९९२-९३ या काळात भारतातील स्त्रीलेखनाची परंपरा शोधणारे दोन खंड इंग्रजीत प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असे सुचविले आहे की ब्रिटिश साम्राज्य आणि भारत नावाचे नव्याने उदयाला येणारे राष्ट्र यांचे एकमेकांशी नाते नेहमी विरोधाचे होते का, या प्रश्नाचा गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे. विशेषतः स्त्रियांचे लेखन कधी आणि कसे अश्लील ठरविले जाते, वर्ग, लिंगभाव, साम्राज्य यासंबंधी कोणती विचारप्रणाली प्रभावी ठरते, कोणती रणनीती वापरली जाते हे सारे नीट तपासून घेतले पाहिजे. सदर प्रस्तावनेचा काही भाग सारांशरूपाने मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
इंग्रजी भाषेचे जागतिक भाषा म्हणून असणारे वर्चस्व आणि ज्या राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये छपाई आणि पुस्तकांचा प्रसार होतो ते लक्षात घेतले तर भारतामध्ये स्त्रीवादी समीक्षा परंपरेच्या प्रमुख शाखांचा आपल्याला होणारा परिचय हा अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांतील आहे. जुलिया ख्रिस्तेवासारख्या फ्रान्समधील सिद्धांकन करणाऱ्यांचे इंग्रजीतून झालेले अनुवाद तसेच हेलन सिसू, ल्यूस एरिगेरी यांचे लेखन इंग्रजीत उपलब्ध आहे. हे सर्व मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत अजून उपलब्ध नाही. मुळात इंग्रजीतील अमेरिका ब्रिटनमधील लेखनही केवळ पाश्चात्त्य म्हणून धिक्कारण्याची प्रवृत्ती मराठी चर्चाविश्वात दिसतेच. परंतु त्यातही केनिया, लॅटिन अमेरिका किंवा रशिया या देशांमधील स्त्रीवादी समीक्षा तर भारतात इंग्रजीतही फारशी उपलब्ध नाही.
व्हर्जिनिया वुल्फ किंवा रेबेका वेस्ट अशा काही स्त्रीलेखिकांचा अपवाद वगळता स्त्री लेखिकांच्या साहित्याची हरवलेली परंपरा जतन करावी या विषयाची जाणीव गेल्या २५-३० वर्षांतीलच आहे आणि ही जाणीव अमेरिकेतच जन्माला आलेली दिसते.
१९६९ साली लैंगिकतेचे राजकारण (डीरश्र झेश्रळींळली) या नावाने केट मिलेटचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकात प्रमुख प्रवाही साहित्यात स्त्रियांच्या प्रतिमा किती साचेबंद पद्धतीने निर्माण केल्या जातात आणि असे साहित्य वैश्विक मूल्ये निर्माण करते असे मानले जाते, यावर केट मिलेटने झगझगीत प्रकाश टाकला. त्यानंतर स्त्रीवादी समीक्षकांनी आपले लक्ष स्त्री लेखिकांनी निर्माण केलेल्या स्त्रियांच्या पर्यायी प्रतिमांच्याकडे वळविले. अभ्यासक स्त्रियांना लक्षात आले की ज्या साहित्याला कालातीत महान साहित्य असे मानले गेले, जो आपला अभिजात ग्रंथांचा वारसा आहे, त्यातच एक चिरंतन नीतिमूल्य म्हणून पुरुषी पूर्वग्रह गुंफला गेला आहे. काही समीक्षकांनी अशा साहित्याच्या मानदंडाकडे त्यातील कमतरता दुरुस्त करण्याच्या दृष्टीने पाहिले. स्त्रिया फार पूर्वीपासून लिहीत होत्या हे खरे असले तरी त्यांच्या लेखनाचा अभ्यास स्त्रियांचे लेखन नावाच्या अभ्यासक्षेत्रात करणे आणि त्यांतील धागेदोरे दाखवून एक परंपरा खणून, खोदून, कोरीव काम करून सिद्ध करणे हे फक्त स्त्रीवादी भानामुळेच झाले. स्त्रीवादी साहित्याचा शोध घेणे म्हणजे एक सांस्कृतिक, राजकीय लढा आहे हे लक्षात घेऊन, अगदी १४ व्या शतकापासून आजवर जे स्त्री-लेखन दुर्लक्षित होते ते मुक्त केले गेले. ह्या प्रयत्नातून चार्लोटी पार्किन्स गिलमनची आता गाजलेली कथा पिवळे भित्तिपत्रक (ढहश धशश्रद्वे थरश्रश्ररिशिी) जशी वाचकांसमोर आली त्याचप्रमाणे कष्टकरी स्त्रियांचे, काळ्या स्त्रियांचे दबलेले आविष्कारही लेखनस्वरूपात वर आले.
स्त्रियांच्या प्रतिमांच्या अभ्यासाऐवजी लेखनपरंपरेचा इतिहास निर्माण करण्याचे जे प्रयत्न झाले त्यातून एक ‘स्त्रीकेंद्री’ साहित्यप्रवाह निर्माण जाला. ह्याचे श्रेय पुढील तीन पुस्तकांना दिले पाहिजे. (१) एलेन मोअर्सचे साहित्यिक स्त्रिया (Literary Women), १९७६, (२) एलेन शोवॉल्टरचे त्यांचे स्वतःचे साहित्य (A Literature of Their Own), १९७७ आणि (३) सँड्रा गिल्बर्ट आणि सुझान गुबार ह्यांचे पोटमाळ्यावरील वेडी (ढहश चरवारप ळप हिश ींळल) १९८९. स्त्रीसाहित्याची परंपरा मांडताना फ्रान्झ फॅनन ह्यांच्या सैद्धान्तिक मांडणीतील विचारांचा धागा पकडून स्त्रियांची स्वतःची उपसंस्कृती असते असे ठामपणे मांडले गेले. स्त्रियांचे लेखन सुरुवातीला अनुकरण (प्रस्थापित सामाजिक मूल्य पूर्णपणे आत्मसात करणे), नंतर प्रचार वा बंड (जाहिरनामा स्वरूपातील लेखन) आणि शेवटी आत्मशोध (आपल्या आत शिरून अस्मितेचा, ‘स्व’चा, शोध) अशा टप्प्यांमधून जाते. स्त्रीवादी लेखन परंपरा निर्माण करून स्त्रियांमध्ये ‘भगिनीभाव’ निर्माण करून पुरुषप्रधान संरचनेला हादरवून टाकण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे. थोडक्यात, स्त्रीवादी साहित्याच्या विशिष्ट सामाजिक चौकटीतील खासगी अनुभवांचे प्रभावी चित्रण’ ह्या व्याख्येपासून सुरुवात होऊन हळूहळू पुरुषप्रधान चिह्नव्यवस्था नाकारून आपली स्वतंत्र चिह्नव्यवथा निर्माण करण्याचे प्रयत्न येथपर्यंत मजल मारलेली दिसते. ज्युलिया ख्रिस्तेवा (फ्रेंच स्त्रीवादी) ह्यांच्या मते तर बाई किंवा स्त्री ह्या शब्दाची रूढ व्याख्या स्वीकारणे आणि आपण बाई किंवा पुरुष आहोत हे मान्य करणे ह्यातच एकप्रकारची अर्थहीनता (र जीवळीं) आहे. स्त्रियांचे स्थान परिघावर असते अशी मांडणी पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेच्या आधारेच केली जाते. म्हणून ही मूल्यव्यवस्था उलथवून टाकण्याचे प्रयत्न करणारे साहित्यच स्त्रीवादी साहित्य ठरले पाहिजे असा आग्रह धरला पाहिजे. ‘अस्मिता’ आणि ‘अस्मितेचे राजकारण’ ह्याबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या ख्रिस्तेवाच्या मते मूलतः बाईपणा आणि त्यातून लिहिले गेलेले साहित्य असे काही नसतेच. उलट, आजची गि-हाईक संस्कृती ज्या खोलातल्या तथाकथित ‘खऱ्या’ स्त्रीत्वाचा उदोउदो करून शोध घेते त्याला खतपाणी घालणारे साहित्य स्त्रीवादी असू शकत नाही.
पाश्चात्त्य देशांत स्त्रीवादी म्हणून गणले गेलेले साहित्य १९ व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यावर प्रभावी स्वरूपात दिसते. एकीकडे औद्योगिक क्रांती, त्यातून जन्मलेली साम्राज्यवाद आणि सुधारणावादाची लाट. ईश्वर या संकल्पनेचा अस्त या पार्श्वभूमीवर दुसरीकडे घर नावाचे मंदिर आणि त्यातली त्यागी, देवदूताप्रमाणे असणारी स्त्री ह्यांचा गौरव चालला होता. तेव्हा एलिझाबेथ गॅस्केल, चार्लोटी व एमिली ब्राँटे आदींनी आपल्या लेखनातून विचार आणि कृती करू पाहणाऱ्या स्त्रीचे एकटे अस्तित्व आग्रहाने मांडले. चार्लोटी गिलमनची १९९२ सालची पिवळे भित्तिपत्रक (The Yellow Wallpaper) ही कथा आणि व्हर्जिनिया वुल्फची १९२९ साली प्रसिद्ध झालेली आपला स्वतःचा अवकाश (ARoom of One’s Own) ही कादंबरी म्हणजे स्त्रीवादी साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. स्त्री वा पुरुष असण्यातली निरर्थकता दाखवून एकरस, एकसत्त्व व्यक्तिमत्त्वाची संकल्पना नाकारून मानवतावादापलिकडे हे लेखन जाते आज पाश्चात्त्य देशातील स्त्रिया कलावंत म्हणून आपल्या बाईपणातून वेगळे शहाणपण, आत्मशक्ती गवसल्याचा दावा करीत आहेत. त्यात काळ्या स्त्रियांच्या लेखनाने फार मोलाची भर घातली आहे.
स्त्रीवादी समीक्षेच्या अंतर्गत स्त्रियांच्या अनुभवाला एक कळीचा स्रोत म्हणून मानले गेले असे जोरकसपणे मानण्यामागे जाणीवजागृतीचे गट १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत निर्माण झाले, ते आहेत. चिनी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात कडवटपणाचा आविष्कार केला गेला त्याचे राजकारणही जाणीवजागृतीच्या राजकारणासारखेच होते. या जाणीवजागृतीच्या प्रयत्नात प्रस्थापित विचारप्रणालींमधून स्त्रियांचे जे व्यक्तिचित्रण साचेबंद पद्धतीने होते त्याला शह देण्याचा प्रयत्न दिसतो. यातून सामाजिक, आर्थिक, मानसिकदृष्ट्या स्त्रियांवर वर्चस्व कसे गाजविले जाते हे दाखविण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नांमधून एका अर्थी स्त्रिया नावाच्या गटाचे गठबंधन तयार झाले. स्त्रियांच्या चळवळीतून संस्कृतीची चिकित्सा एक राजकीय कार्यक्रम म्हणून पुढे आली. दुर्दैवाने सुरुवातीच्या अनुभवांवर आधारित लेखनाचा वापर बाजारपेठेने ‘गि-हाईकी’ पद्धतीने केला. स्त्रीवादी राजकीय भान निसटू लागले आणि शैलीबाज स्त्रीवाद विकाऊ झाला. चिकित्सक पद्धतीत शास्त्र म्हणून स्त्रीवादी साहित्य महत्त्वाचे आहे, परंतु स्त्रियांच्या स्वभावाचे सोहाळे करण्याची रीत मात्र घातक आहे.
येथे आपण वास्तव नावाच्या संकल्पनेचा स्त्रियांच्या “खऱ्या अनुभवांच्या संदर्भात अधिक खोलात विचार केला पाहिजे. जेव्हा स्त्रिया आपले लेखन पुरुष लेखकांपेक्षा वेगळे’ व ‘खरे” आहे असा दावा करतात तेव्हा हा खरेपणा कृतक जाणीवांची आवरणे फेकून देऊन धारण केला आहे असे मानले जाते. परंतु पाश्चात्त्य देशातील स्त्रीवादी चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मध्यमवर्गीय स्त्रीवाद्यांना उदारमतवादामध्ये स्वातंत्र्य आणि समतेची शक्यता दिसली आणि त्याचवेळी सामाजिक मानसिक चौकटी आणि निकषांमुळे स्त्रियांना हे हक्क घेता येत नव्हते असेही अनुभवास आले. ह्या चळवळीने पुरुषसत्ताक व्यवस्थेची अत्यंत जबरदस्त प्रभावी, नवी चिकित्सा शब्दबद्ध केली. परंतु ह्यातून केवळ आणि मुख्यतः स्त्रिया म्हणून सामाजिक संरचनांचा येणारा अनुभव मांडण्याचाच प्रयत्न अधिक झाला. पुरुषसत्ताक व्यवस्था ही इतिहासात वर्गीय विषमता, अथवा वसाहतवाद, अथवा जातिव्यवस्था ह्यातून घडविली जात असल्याने कष्टकरी स्तरावर जगणाऱ्या स्त्रीचा दुय्यमपणा भिंन्न रीतीने घडतो. त्यातून तिच्या स्वत्वाच्या व्यक्ती असण्याच्या कल्पनाही घडतात. हे प्रश्न अशा चिकित्सेत आलेच नाहीत. इतकेच नाही तर ज्याला आपण “लिंग भावात्मक’ दुय्यमपणा असे संबोधू त्याकडे सर्वसामान्य नीतीमत्तेच्या निकषांमधून पाहिले गेल्याने ‘लालसा/इच्छा,’ ‘सत्ता’ ह्यांचे अर्थ घडविण्याऱ्या इतिहासांकडे दुर्लक्ष झाले. परिणामतः स्त्रियांचे जग आणि बाईपणातून घडणारी ‘मी’पणाची जाणीव ह्यांतील सोयीनुसार बदलणारे परस्परसंबंधही बघितले गेले नाहीत. आणखी असे की, गोरी मध्यमवर्गीय स्त्री वर्चस्वात्मक संरचनांशी जी हातमिळवणी करते त्याचीही चिकित्सा वा परीक्षा कधी झाली नाही. दैनंदिन जीवनात असंख्य समस्यांना तोंड देत मध्यमवर्गीय स्त्रिया जे जगत होत्या ते अपरिहार्यपणे कथा कादंबऱ्यांमध्ये विणले गेले किंवा वास्तव जगामध्ये पूर्ण नागरिकत्व मिळण्यापासून स्त्रिया वगळल्या गेल्या होत्या त्यामध्ये सामावून जाण्याचे जे प्रयत्न चालले होते. त्याचे दर्शन साहित्यातून घडविले गेले. “स्त्रियांचे” जिव्हाळ्याचे विषय ह्या चौकटीतून वर्गीय शोषण, साम्राज्यवादी दडपणूक, वांशिक विषमता हे विषय हद्दपार झाले आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेचे आकलन मर्यादित केले गेले. त्यामळे स्त्री लेखक आणि स्त्री वाचक ह्यांना अशा कथनांमधून ‘बाई” म्हणून घडविले गेले, एकसंधपणे रचले गेले ह्यांतूनच ह्या कथनांनी नियम वा रीत म्हणून बाईपणाची एकच एक व्याख्या केली. अर्थात वास्तववादी कादंबऱ्यांनी शंभर वर्षांपूर्वी ह्याच पद्धतीने बुर्जा हीरोच्या दृष्टीने ‘घर’ नावाच्या संरचनेचे संघटन केले होते. अशा वास्तववादी कादंबऱ्यांनी गोऱ्या मध्यमवर्गीय पुरुषांना प्रत्यक्षात मध्यमवर्गीय घरांची चौकट उभारणे सोपे केले. ‘घर’ ‘त्या’च्या परिप्रेक्ष्यातून, “त्या’च्या प्रतिमेत, “त्या”च्या हितसंबंधातून घडले. वास्तववाद “त्या’च्या जीवनदृष्टीतून परिणामतः निर्माण झाला. त्याच्या स्थानापासूनच आठवणी, प्रत्यक्षता आणि भाषा ह्यांचा आदर्श समन्वय शक्य आहे असे ठरले आणि त्यातून वास्तवाचा प्रभावही ठरला. ज्या स्त्रीवाद्यांनी ह्या चौकटीतच स्त्रीवाद स्वीकारला त्यांना मर्यादित यश मिळाले असले तरी त्यांनी स्त्रीवादी राजकीय जाणीवही मर्यादित केली.
मध्यवर्गीय गोऱ्या स्त्रियांनी स्त्रीप्रश्न मांडताना, वर्णने करताना, विश्लेषण करताना किंवा सोडविताना एक ‘बाईपणाचे वास्तव’ म्हणून जे स्वीकारले ते म्हणजे त्यांच्या समाजात मान्यता पावलेले सर्वसामान्यांनी स्वीकारलेले शहाणपण ह्या स्वरूपाचे होते ह्यामुळे आपल्या समाजातील वास्तव किंवा शक्यता ह्याविषयीची सहमती कशी घडते ह्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. स्त्रियांना स्त्रिया म्हणून जो दुय्यमपणा स्वीकारावा लागतो त्या विचारप्रणालीला प्रश्न विचारताना वर्ग, वंश, साम्राज्यवाद ह्यांतून घडणाऱ्या राजकारणाला मात्र प्रश्न विचारले गेले नाहीत. कुटुंब, शिक्षण, कामाचे ठिकाण, कायदा, वैद्यकीय व्यवहार, मानसशास्त्र ह्या चौकटीत स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या भेदभावाचा विचार केला गेला परंतु खरे आणि नैसर्गिक स्त्रीत्व/बाईपणा ह्यांचेही मानदंड पक्के केले गेले. असा स्त्रीवाद उदारमतवादी भांडवलशाहीशी समझोता करून आपली वाट काढतो.
विभाग दोनमधील प्रस्तावनेतील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले तर विभावरी शिरूरकरांच्या लेखनामध्येही आपल्या बाईपणाचे वास्तव म्हणून जे स्वीकारले गेले आहे त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. परंतु उच्चजातीय, उच्चवर्गीय पुरुषांच्या दृष्टिकोनाचा या लेखनावरील प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसतो. या काळात इंदिराबाई सहस्रबुद्धे या लेखिकेने जात-वर्गाच्या चौकटीत सक्तीने केले गेलेले विवाह स्त्रीच्या दृष्टीने किती बलात्कारी ठरतात याचे चित्रण केले होते. र.धों कर्वे या काळात समाजस्वास्थ या मासिकातून स्त्रियांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत होते. समाजस्वास्थ्या त संततिनियमन, विवाहसंस्था, स्वैरसंभोग, स्त्रियांसाठी राखीव जागा आदि विषयांवर र.धों. कर्वे निर्भिडपणे लेखन करत होते. र. धों. कर्त्यांची मांडणी सुखवादी भांडवलशाहीवादी ठरविली गेली असली तरी स्त्रीपुरुषांकडे व्यक्ती म्हणून पाहण्याचा त्यांचा जो आग्रह होता तो लक्षात घेतला तर त्या काळामध्ये समाजाच्या ढोंगीपणावर, खोटेपणावर प्रहार करून समागम-स्वातंत्र्याबद्दल, लैंगिकतेबद्दल स्पष्टपणे लिहिणारा हा लेखक होता. थोडक्यात विभावरी शिरूरकरांच्या काळात उदारमतवादी व्यक्तिवादी चौकटीतही धीट, बंडखोर आणि धारदार विचार मांडले जात होते. येथे आपण या काळात आपल्या देशात विशेषतः उत्तरेकडे लेखनाच्या क्षेत्रात काय चालले होते याचा थोडक्यात आढावा घेऊ.
प्रियंवदा गोपाल ह्यांनी ङळींशीरी ठरवळलरश्रळीी ळप खपवळर ऋलापवशी छरींळेप रपव ढहश ढीरपीळींळेप ढे खपवशशिपवशपलश (२००५) ह्या ग्रंथात घेतलेल्या आढाव्यानुसार. १९३५ ते १९५५ या दोन दशकांचा विचार करताना लक्षात येते, की भारत नावाच्या देशात साहित्य आणि परिवर्तनावादी विचार आणि बंडखोर राजकारणाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत कळीचा होता. या काळात अत्यंत प्रभावी, जहाल अशी सांस्कृतिक चळवळ भारतातील सर्व प्रांतांमध्ये व भाषांमध्ये उदयाला आली असे दिसते. आज ज्या प्रदेशाला आपण पाकिस्तान म्हणतो त्याही प्रांतांचा त्यात अंतर्भाव होता. १९३६ सालच्या ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन (झथअ) तसेच १९४२ सालच्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या दोहोंचा विचार केला तर वसाहतवादातून बाहेर येणे म्हणजे काय आणि वसाहतवादोत्तर स्वतंत्र देश म्हणून आपण कसे घडणार याविषयीच्या वादविवादांशी त्यांचे घट्ट नाते होते. या सांस्कृतिक चळवळीला असा आत्मविश्वास होता की कला, साहित्य आणि चित्रपट यांच्या मदतीने सुप्तावस्थेतील राष्ट्रराज्य एक प्रागतिक दिशा घेईल. यामुळे या काळात अगदी नृत्य आणि चित्रपट तसेच विविध माध्यमे यांच्या सहाय्याने अनेक वाद सांस्कृतिक क्षेत्रात उभे राहिले होते. लेखकांना या काळात भाषेच्या आणि समाजाच्या संदर्भात एक निष्ठावान आवाज म्हणून उभे राहावे लागत होते आणि प्रबोधन आणि स्वातंत्र्य या दोहोंचा मेळ त्यांच्या लेखनातून घातला जावा अशीही अपेक्षा होती. या काळात स्वतंत्र भारतात किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातही इंग्रजी भाषेतील संहितांना उर्दू किंवा प्रादेशिक भाषांचा पर्याय देणे एवढीच धडपड यामध्ये नव्हती
तर नवे प्रश्न उभारण्याची धडपड होती. इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो कितीतरी लेखक एकाच वेळी आपल्या चिकित्सक जाणिवेचे नाते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चौकटींशी तपासून पाहत होते. या लेखकांच्या लेखनातून दोन भिन्न धार्मिक समूहांमधील स्त्रीपुरुषांच्या नात्यांसंदर्भात स्त्रियांच्या लैंगिकतेपासून पौरुष कसे घडते येथपर्यंत तसेच कोणत्याही समूहातील नैतिकता आणि वर्गीय पातळीवर असणारे प्रवाही स्वरूप या साऱ्या प्रश्नांना हात घालताना या लेखकांनी राष्ट्र नावाची एक कल्पनेतील शक्यता पाहून त्या भूमीवरच आपल्या कल्पनेतील दावे केले.
या काळातील प्रागतिक लेखकांच्या या संघटनांचा इतिहास संघर्ष आणि कोड्यांनी भरलेला आहे. त्याचप्रमाणे भारतातील साहित्य आणि त्यातील पुरोगामी आशय यांचा विचार करताना कामगारवर्गीय साहित्याचा अभ्यास किंवा समाजवादी वास्तववाद एवढेच संदर्भ पुरेस नाहीत. ही लेखक मंडळी मध्यम आणि उच्चवर्गीय कुटुंबातून आलेली होती. वसाहतवादी काळात नागरिकत्वाचे मूलभूत हक्क नाकारलेला समाज कोणत्या प्रक्रियांमधून घडविला जातो आणि त्याचे स्वतःचे स्वत्व आणि कर्तेपण मिळविण्यासाठी कोणत्या गुंतागुंतीच्या घटनांचा विचार केला पाहिजे या प्रश्नांनी पछाडली होती. मंटो, रशीद जहान किंवा चुगताई या लेखकांनी आपला राजकीय विचार आणि सामाजिक अस्तित्व या दोन्ही गोष्टींचा विचार करून आपल्या लेखनाला जन्म दिला. सुधारकी काळात स्त्रीप्रश्न हा शिक्षण, घरगुतीपणा आणि कौटुंबिक सत्तासंबंध यांच्याशी जोडला होता. परंतु या संक्रमणकाळातील लेखकांनी हे प्रश्न नागरिकत्व, राजकीय जबाबदारी, श्रम, लैंगिकता, वर्ग, जात, धर्म आणि नैतिकता या सर्व मूल्यांशी जोडून त्यातील गुंतागुंत मांडली. प्रतिकार व्यक्त करणारे लेखक:
या काळातील लेखक स्वतःच्या समूहात किंवा स्वतःच्या देशात असणाऱ्या प्रस्थापिताचे भाग नव्हते परंतु ते परके व उपरेही निश्चितच नव्हते. या मंडळींनी सतत आपल्या लेखणीने राष्ट्रीय प्रकल्पांची चिकित्सा केली असली तरी आपण या देशातच जन्मलेले अस्वस्थ आणि निर्मितिक्षम जीव आहोत, या देशाच्या भौगोलिक भूमीवरच झगडणार आहोत असा त्यांचा दावा होता. दैनंदिन जीवनात आपल्या देशातील जगण्याचा अनुभव घेताना मंटोसारखे लेखक फाळणीचा अनुभव घेऊन विस्थापित होतात. परंतु या विस्थापिताचे सोहाळे गाणे अथवा या विस्थापनालाच संपूर्ण सत्य मानणे हे त्यांनी स्वीकारले नव्हते. एकीकडे परिघाबाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया प्रभावीपणे मांडतानाच देशातील ज्या शक्ती अशा प्रक्रियांमागे आहेत त्यांना शरण न जाण्याचे धैर्यही या लेखकांकडे होते. या काळातील लेखकांनी एकीकडे वसाहतवादविरोधी राष्ट्रवाद आपला मानतानाच एक व्यापक आंतरराष्ट्रीय वाद मांडण्याचा प्रयत्न केला. धार्मिक किंवा सांस्कृतिक अस्मितांमधील बहुविधता मांडताना मूल्यपातळीवर या गटांमधील देवाणघेवाण अधोरेखित केली. इतकेच नाही तर आधुनिकतेशी आपली निष्ठा व्यक्त करताना आधुनिकतेमधील अतिरेकीपणा आणि त्यामधून वगळल्या जाणाऱ्या गटांचे भानही ठेवले. मंटो किंवा चुगताई हे एकीकडे उत्तर भारतीय मुसलमान समाजातील उर्दू बोलीचा वापर करणारे मध्यम किंवा उच्चवर्गीय कुटुंबातून आलेले होते. इंग्रजी माध्यमातून शिकलेले, दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे, वसाहतवादाविरुद्ध झगडणाऱ्या बुद्धिमान सामाजिक गटांमधून आले होते. साहित्य नावाच्या कलात्मक आविष्कारांशी त्यांची निष्ठा सामाजिक, राजकीय परिवर्तनाशी जोडलेली होती. त्याचवेळी आपण मुसलमान समाजात जन्मलो आहोत तर इस्लाममधील संकुचित विचारांविरुद्ध आपण उभे राहिलेच पाहिजे अशीही त्यांची भूमिका होती. आणि हे सर्व अशा काळात घडत होते की जेव्हा हिंदूंचा बहुसंख्यवाद भारतीय राष्ट्राच्या घडणीतून मुसलमान समाजाला वगळूनच टाकण्याचा प्रयत्न करत होता.
वसाहतवाद संपुष्टात आल्यावर आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत नावाचा देश उभारला जाण्याची शक्यता वास्तव म्हणून समोर आल्यावर त्यामधील लेखकांची वा बुद्धिवाद्यांची जबाबदारी व भूमिका वेगळी होते. विशेषतः वसाहतवादाविरुद्ध झगडताना देश नावाची संकल्पना ही महत्त्वाची ठरते. परंतु त्यानंतरच्या काळात जर सहजपणाने हीच संकल्पना दडपशाहीच्या स्वरूपात अध:पतित होताना दिसली तर पुन्हा एकदा राष्ट्रवाद निर्माण करणारी प्रभावी आणि अस्सल चळवळ आवश्यक ठरते. कारण राष्ट्रबांधणीच्या उत्साहात अनेकदा संपत्तीचे पुनर्वाटप, नवे सामाजिक संबंध आणि सर्वसामान्य जनांचे भरीव उन्नयन हे मुद्दे मागे पडण्याची शक्यता असते. निर्मितिक्षम लेखकांना आपल्या लेखनातून एकारलेले नेतृत्व देण्याऐवजी परिस्थितीची गुंतागुंत मांडून शिकवणूक देण्याचे काम करावे लागते. एका अर्थी आधुनिकतेतील बळ घेऊन आधुनिकतेच्या विरुद्ध विचार करण्याची कठीण कामगिरी लेखकांना करावी लागते. संक्रमणकाळातील या लेखकांनी अनेकदा अत्यंत विषम प्रकारच्या विषम पातळीवरील संहिता लिहिल्या. असे लेखन वाचताना एका व्यापक सांस्कृतिक प्रकल्पाचा एक भाग म्हणून, अनेक प्रयोगांमधील एक साहित्यिक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे. या संक्रमणकाळातील लेखक एकाच वेळेला आपल्या देशातील सामाजिक गटांकडे देशाच्या घडणीसंदर्भात गट म्हणून पाहात असतात. त्याच वेळी माणसांच्या आत्मभानाविषयीही विचार करीत असतात. व्यक्तिवादाविषयी चिकित्सा करतानाही हे लेखक भिन्न व्यक्ती कशा घडतात याकडे लक्ष देत असतात.
विभावरी शिरूरकरांचे लेखन महाराष्ट्रातील पुरोगामी विचार करणाऱ्या गटातील लेखन होते हे निःसंशय, त्याची सुरुवातीची तीनही पुस्तके स्त्रीप्रश्नाचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. परंतु त्यांच्या काळातील शिक्षित मध्यमवर्गीय समाजाची काळ्यापांढऱ्या रंगांत प्रश्नाकडे पाहण्याची जी दिशाभूल झाली होती त्याचाच त्या भाग आहेत. त्यामुळे जीवनाशी खऱ्या अर्थाने भिडणाऱ्या परंपरेमध्ये आधुनिकतेच्या शक्यता व स्रोत असतात आणि आधुनिकतेच्या शिक्षणासारख्या प्रयत्नाच्या कवचाखाली अनेकदा स्त्रियांचे वा दलितांचे पुनर्साचीकरण होते याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे स्त्रीशिक्षण, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती या कल्पना फोडून त्यांची विरचना करून त्यातील गुंतागुंत मांडण्याचे काम त्यांच्या लेखनातून जितक्या सकसपणे व्हायला हवे होते तसे झाले नाही असे वाटते. त्यांच्या लेखनातून त्यामुळेच आंबेडकर हे फक्त दलित जातींचे नेतृत्व म्हणून येतात तर ब्रिटिश आणि मिशनरी ह्यांच्यामुळे भारतातील स्त्रीप्रश्नाला वाचा फुटली एवढे नमूद केले जाते. वसाहतवादातून आलेला छापखाना किंवा लेखनसंस्कृती किंवा स्त्रीशिक्षण याची चिकित्सक दृष्टीने तड लावली तर असे दिसते की बालसंगोपन, घरकाम, गृहसजावट यालाच एक नवे आधुनिक रूप देऊन त्याचे शास्त्रही स्त्रीशिक्षणाच्या नावाने केले गेले. सुधारणा म्हणून सतीबंदी किंवा बालविवाहविरोधी आणि पुनर्विवाहाच्या बाजूने कायदे आले. तरी स्वेच्छासती किंवा अक्षतयोनि विधवा किंवा प्रौढ पुनर्विवाहात मृत पतीची संपत्ती आणि आधीची मुले अशी उपकलमे घालून स्त्रीप्रश्नाचे पुनर्साचीकरण झाले होते. भारतातील लिंगभाव व्यवस्था जात-वर्ग व्यवस्थेशी अतूटपणे बांधली गेली आहे याचे भान त्या काळातील पुरोगामी विचारवंतांपाशी अभावानेच आढळते. त्यामुळे स्त्रियांची धुसमट, स्त्रियांची दुःखे आणि बळी जाणे हे सारे अनेकदा फक्त मानसिकतेच्या चौकटीतूनच पाहिले जाते. विभावरीबाईंच्या कथांमध्ये स्त्रियांची मने आणि मनातील आंदोलने ह्यावर मुख्यतः भर दिसतो. परंतु आधुनिक भारतात मिळवत्या का स्त्रियांच्या बदललेल्या भूमिकेनुसार बदलणारे कुटुंब विशेषतः अगदी समान पातळीवरील भिन्न जातीतील सर्व कष्टांना सामोरा जाणारा असा जोडीदार असे चित्रण येत नाही. तसेच कर्ज करणारा, फसवणारा, मध्यमवर्गीय सवर्ण शिक्षित तरुण नव्या समाजामध्ये नेमक्या कोणत्या संरचनांशी झगडतो आहे, कशातून वाटा काढत तो आपल्या पुरुषपणाचा फायदा घेतो वा भांडवलशाहीत जुगारीपणा करण्याचे स्वातंत्र्य तो कसे मिळवतो यावरही फारसा प्रकाश पडत नाही.
विभावरी शिरूरकरांच्या सुरुवातीच्या तीन संहितांचा विचार त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक बदलाच्या संदर्भातच केला पाहिजे. महाराष्ट्रातील स्त्रीप्रश्नाच्या इतिहासाच्या दृष्टीने हे लेखन मोलाचे आहे. खरे, शिरूरकर, बेडेकर असा प्रवास करणारी ही व्यक्ती बाईमाणूस होण्याची जी धडपड करीत होती ती संवेदनशीलतेने समजून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु त्याचबरोबर अपरिहार्यपणे ज्या कुटुंबात, ज्या वर्गात, ज्या धर्मात विभावरी वा बाळूताई वा मालतीबाई घडल्या, वाढल्या; त्यातून त्यांची जी मूल्यव्यवस्था घडली त्याबद्दलची चिकित्सक जाणही आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. भारतातील स्त्रीलेखनाचा त्या काळातील आढावा घेतला तर दक्षिणेकडे मल्यालम भाषेत ललिताम्बिका अंतरजनम (१९०९ ते १९८७) ही लेखिका लिहीत होती, तर बंगालीत आशापूर्णा देवी (१९०९) आणि हिंदीत महादेवी वर्मा (१९०७ ते १९८७) लिहीत होत्या. भारतभरातील अशा समकालीन लेखिकांच्या लेखनाचा तुलनात्मक अभ्यास झाला तर कदाचित भिन्न प्रांतांतील स्त्रीप्रश्नांची जडणघडण याविषयीचे आपले आकलन अधिक सघन होईल. तसेच राष्ट्र-राज्य, आधुनिकता आणि लिंगभेदाची रचना ह्यांच्या परस्पर नात्याविषयी अधिक जाण, समज प्राप्त होईल. स्त्रीअभ्यास आणि साहित्याचा अभ्यास ह्या दोन्ही ज्ञानशाखांच्या साहाय्याने हे पुढचे पाऊल ठरेल.
सूची: शिरूरकर, विभावरी
१. कळ्यांचे निःश्वास, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९८६ (१९३३)
२. हिंदोळ्यावर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९८६ (१९३४)
३. विरलेले स्वपक, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९९२ (१९३५) Tharu Susie and K. Lalita (Rd.s) Women Writing in India (600 B.C. To the Present) Vol. 1 OUP : New Delhi; 1997 (1991) Gopal, Priyanvada Literary Radicalism in India
डॉ. विद्युत भागवत विभागप्रमुख क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्रीअभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ..
मराठी साहित्य, समाजशास्त्र, भाषाशास्त्र यांविषयीचे औपचारिक अध्ययन. विविध अभ्यासप्रकल्पांमध्ये कार्यशील अभ्यास, लेखन आणि चळवळ या सर्व पद्धतीने स्त्रीअभ्यासाचा ध्यास. साहित्य आणि समाजाचे अनुबंध तपासणारे लेखन. स्त्रीप्रश्नाची वाटचाल (प्रतिमा) Feminist Social Thought (Rawat) हे इंग्रजी पुस्तक. या ग्रंथलेखनासाठी २००४ चा ‘समाजविज्ञानकोश न्यासा’चा पुरस्कार. देशातील आणि परदेशातील चर्चासत्रांमध्ये लक्षणीय निबंध वाचन. पाश्चात्त्य विद्यापीठात स्त्री अभ्यासाचे अध्यापन.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.