आइनस्टाईन: उत्कट साहसवीर

‘ते आमचे प्राध्यापक आइनस्टाइन’ टॅक्सीचालकाने ममत्वपूर्ण अभिमानाने सांगितले. उर्मटपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टॅक्सीचालकांच्या जातीत हे दुर्मिळच होते. डिसेंबर १९४८ मधील एका मरगळलेल्या दुपारी प्रिन्स्टनमधील पदपथावरून उत्साहाने चालत असेल्या व्यक्तीकडे त्याचा रोख होता. आता पांढरी आणि विरळ झालेली ती सुप्रसिद्ध केसांची आयाळ त्या हवेतही हॅटखाली झाकलेली नव्हती. अंगावर शर्ट-आणि-टायऐवजी खलाशी वापरतात तशी विणलेली जर्सी होती, आणि बूट मोज्यांशिवायच घातलेले होते.

ज्याच्या सिद्धांतांनी चेष्टा आणि टिंगलटवाळीपासून ते परमोच्च स्तुतीपर्यंत सर्वप्रकारच्या प्रतिक्रिया ओढवून घेतल्या होत्या त्या माणसाचे कधीही न विसरण्याजोगे पहिले दर्शन हे असे होते. त्यांच्या पोशाखातील साधेपणा त्यांच्या वागण्या-बोलण्यातील साधेपणाशी जुळणाराच होता. अगदी वैज्ञानिक चर्चेच्या प्रसंगीही त्यात फरक पडत नसे. परंतु बाह्यस्वरूप इतके शांत, संयत असले तरी त्यांचे आयुष्य मात्र खडतरच होते. एका नव्या विश्वाचा हा पहिला नागरिक. परंतु आपले पृथ्वीवरचे नागरिकत्व मात्र अनेकदा बदलण्याची पाळी त्यांच्यावर आली. त्यांचा जन्म आणि शिक्षण जर्मनीत झाले. परंतु ते ज्यू असल्यामुळे जर्मनीने त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेला साजेल असा न्याय दिला नाही. ज्यूंवरील अन्याय दूर व्हावा म्हणून त्यांनी खडतर प्रयत्न केले. परंतु व्यापक दृष्टी नसलेल्या लोकांचा सल्ला त्यांनी स्वीकारल्याने झिओनिझमचाही फायदा झाला नाही. त्यांच्या प्रचंड दयाळूपणाचा फायदा उठवून कोणीही त्यांच्याकडून उत्कृष्ट शिफारसपत्र मिळवू शकत असे. परिणामी इतरांच्या वैज्ञानिक क्षमतेबद्दलचे त्यांचे वैयक्तिक मूल्यमापन बिनमोलाचे मानले जाऊ लागले.

जगातील सर्वश्रेष्ठ गणिती म्हणून जनमानसात त्यांची प्रतिमा होती. परंतु त्यांचेच समकालीन डेडेकिंड (Dedekind), पॉइंकारे (Poincaret), हिल्बर्ट (Hilbert), अशा खरोखरीच्या थोर गणितज्ञांशी त्यांची तुलना होऊ शकत नव्हती. ते अणुबॉम्बचे जनक होते असा ठपका त्यांच्या माथी मारला जायचा. त्यामुळे आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी एकदा कटवटपणे म्हटले होते ‘मला जर आयुष्य पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर वैज्ञानिकाऐवजी प्लंबर वा निव्वळ भटक्या होणे मी पसंत करेन.’ अणुविखंडनसंबंधित संशोधन तातडीने हाती घ्यावे अशी विनंती करणारे पत्र त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना लिहिले हे खरे, आणि त्यामुळे या प्रकल्पाला युद्धकाळात निधीही उपलब्ध झाला. परंतु मानवजातीला असेलल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून अणुबॉम्बची प्रत्यक्ष तांत्रिक निर्मिती करण्यात मात्र प्रिन्स्टन येथील त्यांच्या इतर सहकाऱ्यांनीच आपली बुद्धिमत्ता कामी लावली. असेही म्हटले जाते की ए = ल२ हे त्याचे समीकरण आपल्याला अपरिहार्यपणे अणुयुद्धाच्या भयावह खाईकडे घेऊन गेले. परंतु पर्वतावरील प्रवचन (सर्मन ऑन द माऊंट ) आपल्याला अपरिहार्यपणे ख्रिश्चनांच्या चौथ्या क्रूसेडच्यावेळी झालेल्या कॉन्स्टंटिनोपलच्या जाळपोळीकडे व लूटमारीकडे घेऊन गेले, असे म्हणणे जितके खरे ठरेल तितकेच वरील म्हणणे खरे आहे. भौतिक विश्वाकडे बघण्याची एक पूर्ण नवीन दृष्टी प्राप्त करून देणे ही आइनस्टाइन यांची सर्वांत मोठी कामगिरी आहे. कोणत्याही क्षणी अवकाशात असलेल्या पदार्थमात्रामुळे अवकाशाच्याच गुणधर्मांवर परिणाम होतो आणि कालमापनावरही, हे त्यांनी सिद्ध केले. विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांतील इतर आमूलाग्र नवीन वैज्ञानिक संकल्पनाही सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताभोवतीच झपाट्याने उदयास आल्या.

न्यूटन आणि नंतरच्या वैज्ञानिकांनी उभारलेल्या सुबक आणि सुंदर यांत्रिकी रचनेत लहानलहान परंतु शंकेला जागा राहणार नाही असे दोष एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्पष्टपणे दिसू लागले होते. बुधग्रह घड्याळाच्या अचूकतेने भ्रमण करत नव्हता. गुरुत्वाकर्षणाप्रमाणेच विद्युत आणि चुंबकत्व न्यूटनचा ‘व्यस्त वर्ग’ (इन्व्हर्स स्क्वेअर) नियम पाळत होते. परंतु त्यांच्यात कोणता संबंध होता? पदार्थमात्राचे अंतिम कण विद्युच्चुंबकीय भार बाळगत होते. ते विद्युच्चुंबकीय लहरी म्हणजे प्रकाश बाहेर टाकतात, पण गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत असे होत नाही. याचे कारण काय ? आणि पृथ्वी अवकाशातून वेगाने जात असतानाही प्रकाशाचा वेग तिळमात्रही बदलत का नाही ? वस्तुमान आणि ऊर्जा अविनाशी आहेत. तर मग क्यूरी (जीळश) दाम्पत्याने नव्याने शोधलेल्या रेडियम या मूलद्रव्यातून सातत्याने पदार्थकण आणि यंटगनने (Rontgen) शोधलेले क्ष-किरण कसे बाहेर पडत असतात ? पदार्थमात्राविषयीच्या जुनाट संकल्पनांमुळे नव्या ऊर्जास्रोतांच्या शोधात अडथळे येत होते.

वरील प्रश्नांपैकी अनेकांच्या सोडवणुकीत आइनस्टाइन यांनी योगदान दिले. परंतु त्यांच्या मुख्य संशोधनाचा उगम झाला तो पुढील प्रश्नातून:
प्रकाशाचा वेग त्याच्या स्रोताच्या वेगावर अवलंबून का नसतो ? त्यांनी हा प्रश्न उलटा फिरवला आणि म्हटले की प्रकाशाचा वेग अचल, स्थिर असणे हा अवकाशाचा मूलभूत गुणधर्म आहे. एकमेकांपासून दूर उभे असलेले दोन निरीक्षक एकमेकांची घड्याळे आणि मोजपट्ट्या यांची तुलना (म्हणजे काल आणि अंतर यांचे मापन) फक्त प्रकाशझोत इकडून तिकडे पाठवूनच करू शकतात; आणि ते कसेही कोणत्याही वेगाने फिरत असले तरी दोघांच्याही दृष्टीतून प्रकाशाचा वेग एकच असतो. यातून मोजमाप आणि एककालीनता (simultaneity) याबद्दलच्या नव्या संकल्पना आल्या. वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यातील संबंधही स्पष्ट झाला; एकमेकांत रूपांतरित होऊ शकणाऱ्या, एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू निघाल्या. तत्त्वज्ञ आणि धर्मशास्त्रपंडित यांनी बायबल, कार्ल मार्क्स, आत्म्याचे अमरत्व आणि परमेश्वराचे गणिती ज्ञान अशा अस्त्रांचा वापर आइनस्टाइन यांच्यावर हल्ला करण्यासाठी केला. आणि या हल्ल्यातील द्वेष आणि विखार आजही विसरणे शक्य नाही. केवळ आइनस्टाइनच निव्वळ शाब्दिक वादाच्या पलीकडे पाहत होते. काळाच्या आणि अवकाशाच्या विश्लेषणासाठी एखादे नवीन, समर्थ साधन हवे होते; केवळ आतापर्यंतची सर्व ज्ञात तथ्ये व निरीक्षणे विशद करून चालणारे नव्हते; अजूनही निरीक्षणास न आलेल्या घटनांचे भाकीत वर्तवणे आवश्यक होते. रिच्ची आणि लेवि-चिलिता या दोन इतालियन गणितज्ञांच्या संशोधनात त्यांना हे साधन सापडले (टेन्सॉर्ससंबंधी गणितशाखा). ह्या साधनाचा योग्य वापर करण्यासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी त्यावर प्रभुत्व संपादन केले, आणि त्यानंतर त्यांचे ‘अज्ञातातील उत्कट साहस’ सुरू झाले. अवकाश, काल आणि पदार्थमात्र यांच्या एकात्मतेची अचूक गणिती मांडणी त्यांनी केली (व्यापक सापेक्षतावाद सिद्धान्त). आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्षे म्हणून ते नंतर त्या काळाचा उल्लेख करीत. अशा शोधामुळे प्राप्त होणारी अत्युत्कट, उदात्त आनंदभावना प्रत्यक्ष अनुभवलीच पाहिजे. मादक द्रव्ये वा कठीण पर्वतारोहण ह्यांमध्ये ती शोधणाऱ्यांना ती समजावून सांगता येणार नाही. आपल्या कामात निष्णात गणितज्ञांचे सहकार्य त्यांनी काळजीपूर्वक मिळविले. परंतु त्या सिद्धान्तातील भौतिकी समज व जाण मात्र त्यांची एकट्याचीच होती. कितीतरी जणांनी सुंदर आणि गुंतागुंतीची सूत्रे मांडली, परंतु त्यांचे काय करावे हेच त्यांना समजले नाही. आइनस्टाइन मात्र सावकाश विचारपूर्वक निसर्गाच्या गुपितांपर्यंत पोहोचले.

व्यापक सापेक्षतावादाविषयीचे त्यांचे सुरुवातीचे संशोधन प्रसिद्ध झाले तो पहिल्या महायुद्धाचा आरंभीचा काळ होता, व यावेळी रणांगणावर अकारण कत्तल चालली होती. या नव्या सिद्धान्ताने केवळ न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियमच विशद केला नाही तर बुधाची अनाकलनीय वेगळी चालही समजुतीच्या कक्षेत आणली आणि एक प्रेक्षणीय भाकीतही केलेः सूर्याच्या खूप जवळून जाणारा प्रकाशकिरण थोडासा वक्रीभूत होईल, आपल्या सरळ मार्गापासून किंचित विचलित होईल. न्यूटनच्या सिद्धान्ताप्रमाणे हे समजणारे नव्हते कारण प्रकाशाला वस्तुमान नसते. प्रकाशाला वजन आहे असे जरी मानले तरी न्यूटनच्या नियमाप्रमाणे होणारे वक्रीभवन आइनस्टाइननी केलेल्या भाकिताच्या निम्मेच येत होते. सूर्यग्रहणाच्या वेळी केलेल्या खास निरीक्षणांनी आइनस्टाइनना खरे ठरविले. त्यानंतर हा सिद्धान्त मानवजातीच्या सामायिक ज्ञानकोषात सामावला गेला.
सापेक्षतावादाचा प्रभाव अत्यावश्यक ठरला तो व्यापक पातळीवरील खगोलशास्त्रात नव्हे तर त्याच्या विरुद्ध पातळीवर. अणूंच्या अंतरंगातील घडामोडींबद्दल अधिक चांगले स्पष्टीकरण मिळाले. १९२९ ते १९४९ या काळात आइनस्टाइन यांनी एकामागोमाग एक ‘एकात्म क्षेत्रीय सिद्धान्त’ मांडून गुरुत्वाकर्षण आणि विद्युचुंबकीय क्षेत्रांचे मिलन घडवून आणण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या अंतिम समीकरणांना जवळजवळ काहीच उत्तरे सापडत नाहीत असे दिसून आले तेव्हा वीस वर्षांची खडतर मेहनत पाण्यात जाण्याच्या शक्यतेलाही त्यांनी धैर्याने तोंड दिले. ही उत्तरे नंतर लवाटी (Hlavaty) यांनी शोधली. परंतु शेवटी अखेरचा शब्द हा निसर्गाचाच असणार! परमाणुभौतिकीतील प्रयोगांतून पदार्थमात्राचे जे असंख्य नवीन गुणधर्म आपल्यासमोर उलगडताहेत त्यांनी सर्व प्रचलित सिद्धान्तांना पार मागे टाकले आहे.

मला असे वाटते की सध्या आपण एका नव्या जीवनाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. प्राचीन अश्मयुगापेक्षा एकोणिसाव्या शतकातील जग जितके वेगळे होते तितकेच हे नवीन जीवन अणुपूर्व काळातील आदर्शापेक्षा वेगळे घडणार आहे. युद्धबंदी आणली आणि वैयक्तिक फायद्याची लालसा काबूत ठेवली तरच हा उंबरठा ओलांडून आपण खरोखरी नव्या युगात प्रवेश करू. त्यावेळीच आपले वंशज हा पृथ्वीचा छोटा तुकडा सोडून अनंत अवकाशात खरोखरीच्या ‘शूर नव्या जगां’कडे (Brave New Worlds) झेपावतील. खरा इतिहास घडविण्यात व्यग्र असल्यामुळे त्यांना आपल्या पूर्वेतिहासाची जाणीव कदाचित नसेल. परंतु या उंबरठ्याजवळ आपणास आणणाऱ्या व्यक्तीपैकी एक होते उत्कट साहसवीर आइनस्टाइन (The Passionate Adventurer).

मूळ लेखक : दामोदर धर्मानंद कोसंबी
प्रथम प्रकाशन टाइम्स ऑफ इंडिया, १५ मार्च १९५९. नंतर ॲकॅडमी ऑफ पोलिटिकल अँड सोशल स्टडीजच्या सायन्स, सोसायटी अँड पीस मध्ये संकलित.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.