पॉपरचे ‘विश्व-तीन’

विज्ञानाच्या ज्ञान कमावण्याच्या पद्धतीचे पारंपरिक वर्णन पॉपरने बदलले. निरीक्षणे व प्रयोग, त्यातून विगमनाने सामान्य सूत्र ठरवणे, तपासाला योग्य असे “उमेदवार’ तत्त्व मांडणे, ते प्रयोगांनी सिद्ध करायचा प्रयत्न करणे, त्यातून सिद्धता असिद्धता ठरवणे, या प्रक्रियेतून ज्ञान मिळते; अशी विज्ञानाबद्दलची पारंपरिक मांडणी होती. पॉपरने त्याऐवजी सुचवलेल्या शोधपद्धतीची रूपरेषा अशी १) उद्भवलेला प्रश्न २) नव्याने तत्त्वातून सुचवलेले उत्तर ३) नव्या तत्त्वातून निगामी पद्धतीने काढली गेलेली प्रयोगांमधून तपासता येतील अशी उत्तरे किंवा विधाने, ४) निरीक्षणे, प्रयोग वा इतर पद्धतींनी या विधानांचा खरेखोटेपणा तपासणे एका अर्थी हा नवे तत्त्व खोटे पाडायचाच प्रयत्न. ५) अखेर जुन्यानव्या तत्त्वांपैकी जास्त तर्कसंगत, प्रयोग-निरीक्षणांशी जुळणारे असे तत्त्व निवडणे.
आता पहिल्या टप्प्यावरचा प्रश्न कुठून आला, असे विचारले, तर पॉपर सांगतो की अशाच एखाद्या जुन्या तपासाच्या चौथ्या पाचव्या टप्प्यातून प्रश्न उद्भवतो. अशा जुन्या तपासांचा, जुन्या प्रक्रियांचा मागोवा घेत गेलो तर शेवटी आपण काही उपजत
अपेक्षांपर्यंत जाऊन पोचतो. अशा अपेक्षा माणसांतच नव्हे, तर प्राण्यांमध्येही असतात.
पॉपर म्हणतो, “उपजत कल्पना अशी मांडणी मला निरर्थक वाटते, पण प्रत्येक जीवाचे परिस्थितीला काही प्रतिसाद असतात. या प्रतिसादांना आपण ‘अपेक्षा’ म्हणू शकतो. असे प्रतिसाद जाणीवपूर्वक सुचणे आवश्यक नाही, जसे नवजात बालक आपल्याला कोणीतरी जेवू घालेल किंवा भूक भागवेल, अशी अपेक्षा बाळगते, असे म्हणता येईल. अपेक्षा आणि ज्ञान यांचा निकटचा संबंध पाहता ‘उपजत ज्ञाना’ बद्दल बोलणेही अविवेकी नाही. पण हे ज्ञान पूर्वदत्त रीतीने वैध (valid a priori) नसते. ते चुकीचेही असू शकते. बालकाला कोणी त्यागूही शकते किंवा त्याची उपासमारही होऊ शकते. पण या ज्ञानाची वैधता पूर्वदत्त नसली तरी ते कोणत्याही निरीक्षणाआधी, अनुभवाआधीच हजर असते म्हणजे मानसिकदृष्ट्या किंवा जेनेटिक अर्थाने पूर्वदत्त असते.” (कंजेक्चर्स अँड रिफ्युटेशन्स, रूटलेज् अँड केगन पॉल, १९६३/७२) [आपण उदाहरणार्थ एक ‘प्रश्न’ पाहू प्रकाश सरळ रेषेत जातो, तसाच आवाजही जातो का? पहिले ‘नवे तत्त्व’ असे की आवाज सरळ रेषेत जातो. यावरून निगामी पद्धतीने असे विधान करता येईल की मी जरी अन्न मिळवण्यासाठी रडलो तरी ती जी बाई मला दूध पाजते, ती येणार नाही, कारण ती अत्ता दिसत नाही आहे, म्हणजे तिच्यापासून माझ्यापर्यंत ना प्रकाश येतो आहे, ना आवाज येईल. हे तपासायला जर मी भोकाड पसरले, तर ती बाई धावत येते आणि माझे ‘नवे तत्त्व’ चूक ठरवते. आता मला प्रश्न पडतो, दृष्टीच्या टप्प्यात असणे आणि त्या टप्प्याबाहेर असणे यासाठी आवाज कमीजास्त करावा का, हा! माझी दुधाच्या/अन्नाच्या पुरवठ्याबाबतची अपेक्षा मला इतर ज्ञानाची वाट चालायला लावते, असे हे पॉपरचे म्हणणे आहे सं.]
म्हणजे पॉपरची ज्ञान कमावण्याबाबतची मांडणी आणि उत्क्रांतीचे तत्त्व या दोन्ही प्रक्रिया एकाच निष्कर्षाला येऊन पोचतात. मूळ क्रिया आहे प्रश्न सोडवण्याची, आणि मूळ प्रश्न आहे टिकून राहण्याचा. माणसांखेरीज सर्व प्राण्यांमध्ये काय होते, पाहा. सर्व प्राण्यांमध्ये प्रश्न सोडवायचे प्रयत्न नवनव्या प्रतिसादांमधून, नवनव्या अपेक्षांमधून, नवनव्या वागणुकीतून व्यक्त होतात. जर हे नवे प्रतिसाद, ह्या नव्या अपेक्षा, ही नवी वागणूक, यामुळे तगून राहायचे प्रश्न सुटले आणि सुटत राहिले तर या नव्या बाबी नैसर्गिक निवडीतून त्या जीवाच्या शरीरचनेचा भाग बनतील. चुकीची उत्तरे जीवाला नष्ट करतील किंवा चुका टाळणाऱ्या यंत्रणेमुळे थोपवली जातील.
[काही हरणांमागे एक वाघ लागला आहे. ‘तगून राहणे’ याचा तात्कालिक अर्थ आहे, वाघापेक्षा जास्त वेगाने पळणे. प्रत्येक हरीण या प्रश्नाला ‘उपजत प्रतिसाद देते, वेगाने पळण्याचा. एका अर्थी ‘अमुक वेगाने पळालो तर मी वाचेन’ असे नवे तत्त्व प्रत्येक हरीण मांडत असते. जर वेग जीव वाचवण्याला पुरेसा ठरला, तर हा वेग त्या हरणाच्या प्रजेतही जाऊन पोचतो. जर वेग पुरेसा नसला, तर हरीण मरते. जर ‘वाघाची चाहूल आधी लागली तर मी वाचेन’, असे तत्त्व वापरून हरीण सतर्क राहिले, तर कमी वेगाची ‘चूक’ टाळली जाईल. उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे असेच वर्णन काही महिन्यांपूर्वी त्रोटक रूपात निखिल जोशींनी दिले होते. सं.
डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणेच पॉपरची मांडणीही जीव कसा उपजला यावर भाष्य करत नाही, तर केवळ पुढील घडामोडींबद्दलच विश्लेषण करते. खरे तर पॉपरच्या मते जीव, तत्त्वे, कलाकृती, हे कसे उद्भवते हे विचारांमधून स्पष्ट करता येतच नाही. त्याच्या मते भौतिक (निर्जीव) जगात नावीन्य उपजत नाही, पण सजीवांमध्ये अंगभूत नावीन्य (intrinsic novelty) उपजू शकते. त्याची कारणपरंपरा सांगता येत नाही, आणि तर्काने त्याचे स्पष्टीकरणही देता येत नाही. केवळ अंतःप्रेरणेने नावीन्याचे आकलन होऊ शकते. पॉपरला नावीन्याच्या प्रश्नाने पछाडलेले आहे, आणि एखादेवेळी त्याच्या हातून या प्रश्नावर काही महत्त्वाचे योगदान पुढे मिळेल.
[ पॉपर असे योगदान देऊ शकला नाही, पण स्वयंसंघटन आणि नावीन्याचा उद्भव यांवर बरेच ज्ञान आज प्राप्त झाले आहे. त्यात एक महत्त्वाचे अंग हे की ‘जीव’ हेही व्यामिश्र भौतिक क्रियांमधून उपजणाऱ्या गुणाचेच नाव आहे! सं.]
जगाची माणसाने केलेली सुरुवातीची वर्णने जडप्राणवादी (animistic), अंधश्रद्ध आणि यातुधार्मिक (magical) होती. [म्हणजे ‘अचेतन’ डोंगरदऱ्या, नद्या इत्यादींना सजीव मानणारी होती. सं.] या वर्णनांवर जमातीचा एकसंधपणा अवलंबून असे. हे वर्णन प्रश्नांकित करणाऱ्या, आक्षेप घेणाऱ्या किंवा एकसंधतेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही वागणुकीला देहान्ताची शिक्षा असे. यामुळे आदिम समाजांमध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्ती अनेक अमूर्त बाबींच्या पगड्याखालीच जन्माला येत. नातेसंबंध, सामाजिक संबंध, शासनव्यवस्था, कायदे, रूढी, परंपरा, मैत्री आणि शत्रुत्व, कर्मकांडे, धर्म, मिथके, अंधश्रद्धा, भाषा अशा या अमूर्त बाबी असत. त्या मानवनिर्मित असत, पण नव्याने जन्मणाऱ्या व्यक्तीने निर्मिलेल्या नसत. त्याला ना या अमूर्त बाबींमध्ये बदल करता येत, ना त्यांच्याविषयी शंका उपस्थित करता येत. नव्या व्यक्तींपुढे या बाबींचे वास्तव उभे ठाकत असे. त्या व्यक्तीला हे वास्तव घडवत असे. हे वास्तव मानणाऱ्यांनाच माणूस मानले जात असे. त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या हरेक अंगावर या वास्तवाचा परिणाम होत असे. हे वास्तव असे मानवनिर्मितच, पण ते स्वयंभू असल्यासारखे (quasi-autonomous) भासत असे.
ह्या वास्तवाच्या घटक रचना नियोजित नसायच्या, किंवा त्यांच्यामागे काही हेतू, काही उद्देश, असेही नसायचे. पॉपर सांगतो, “प्राण्यांच्या जंगलातल्या पायवाटा कशा घडतात ? कोणतातरी प्राणी पाणसाठ्यापर्यंत पोचायला झाडोऱ्यातून वाट ‘फोडतो’. मग इतर प्राण्यांनाही तीच वाट वापरणे सोईस्कर ठरते. अशा वारंवारच्या वापराने ती वाट रुंद व उपयुक्त होते. ती नियोजित नसली तरी वापराला उपयुक्त असते. वाटा अशाच रुळतात. माणसांच्या भाषा आणि इतर संस्थाही अशाच उद्भवू शकतात. त्यांच्या अस्तित्वामागे, विकासामागे, फक्त सोय असते हेतू किंवा नियोजन नसते. त्या घडण्यापूर्वी त्यांची गरजही एखादेवेळी नसते, पण एकदा का त्या घडल्या की त्या नव्या गरजांना, नव्या उद्दिष्टांना जन्म देतात. ही उद्दिष्टे ‘घडतात’ ‘दिली’ जात नाहीत. आधीच्या उद्दिष्टांमधून, त्यांच्या परिणामांमधून ती घडत जातात. कधीकधी तर असे परिणामही अपेक्षित नसतात. अशा त-हेने शक्यता-संभाव्यतांचे, क्षमतांचे एक नवे विश्व उद्भवते.” (ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, अॅन इव्होल्यूशनरी अप्रोच, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस १९७२-७५)
जीवसृष्टीची उत्क्रांती, माणसाचा उद्भव, संस्कृतींचा विकास, या सर्वांच्या वर्णनात पॉपर तीन विश्वांची संकल्पना वापरतो. जड पदार्थांचे, ते “विश्व-एक’, माणसाच्या मनांचे ते “विश्व-दोन’, आणि माणसांच्या किंवा इतर प्राण्यांच्या व्यवहारांमधून हेतूंविना घडलेले, स्वयंभू झालेले, ते ‘विश्व-तीन’.
पक्ष्यांची घरटी, मुंग्यांची वारुळे, मधमाश्यांची पोळी, कोळ्यांची जाळी साऱ्या वेगवेगळ्या जीवांनी त्यांचे त्यांचे प्रश्न सोडवायला घडवलेल्या रचना आहेत. पण एकदा का या रचना घडल्या, की त्या मूळ जीवाच्या परिसराचा सर्वांत महत्त्वाचा भाग बनतात. मूळ जीवांच्या वागणुकीवर या रचनांचाच प्रभाव सर्वांत महत्त्वाचा ठरतो. या मूर्त, भौतिक रचनांप्रमाणेच सामाजिक रचना, संदेश देण्याघेण्याच्या पद्धती, अशा अमूर्त रचनाही प्राण्यांमध्ये दिसतता. पण अशा जगण्याच्या सोईसाठी घडवलेल्या रचनांनी सर्वांत नाट्यमय बदल केले आहेत, ते माणसांच्याबाबतीत. माणसाचा ‘हात’ हा अवयव नेमकेपणाने किडे-फळे पकडण्याच्या प्रश्नाला उत्तरे देतदेत घडला. भाषा, नीतिविचार, कायदा, धर्म, तत्त्वज्ञान, शास्त्रे, कला, संस्था, अशा अमूर्त रचनांमधून माणसाच्या भौतिक परिस्थितीत प्रचंड बदल झाले आहेत. या रचनांना माणसांच्या परिसरात केंद्रस्थान मिळाले आहे. कोणी, कोणाला, कशासाठी घडवले, हे उकलणेही अवघड व्हावे, इतके महत्त्व या रचनांना आले आहे.
या मुळात मानवनिर्मित रचनांना माणसाच्या संदर्भात वास्तवाचे, वस्तुनिष्ठ अस्तित्वाचे रूप आले आहे. त्यामुळे आता माणूस एखादी वस्तू तपासावी तशा या रचना तपासू शकतो. त्यांचे मूल्यमापन करू शकतो. त्यांच्यातील शक्यता, त्यांच्या क्षमता शोधून वाढवू शकतो, बदलू शकतो, त्यांच्यात क्रांतीसुद्धा करू शकतो आणि त्यांच्यातील अनपेक्षित बाबीही माणसाला सापडू शकतात.
हे अमूर्तातल्या अमूर्त रचनांमध्येही घडते. जसे, नैसर्गिक आकड्यांची सरणी माणसानेच घडवली. पण आज ती स्वयंभू होऊन माणसांपुढे प्रश्न उभे करू शकते, आणि ते शोधण्यात माणसे धडपडून शेवटी असफलही ठरू शकतात. आज आपले या आपल्याच निर्मितींवर नियंत्रण नाही. त्यांच्या वास्तवाबद्दलची सत्ये आपण शोधू शकूच, अशी स्थिती नाही.
विश्व-तीन हे असे कल्पना, कला, शास्त्रे, भाषा, नीतिविचार, सामाजिक संस्था वगैरेंचे विश्व आहे आपल्या माणूस म्हणूनच्या सर्व संचित वारशाचे विश्व आहे. पण ते मेंदू, ग्रंथ, यंत्रे, ध्वनि व चित्रफिती, संगणक, चित्रे व मूर्ती, अशा वस्तूंमध्ये सांकेतिक रूपांत नोंदलेलेही आहे आणि या सर्व वस्तू विश्व-एकचा, भौतिक वस्तूंच्या विश्वाचा भाग आहेत. माणसांच्या मनांमधले (विश्व-दोन मधले) ज्ञान आणि त-हेत-हेच्या ग्रंथालयांमधले (विश्व-एकमधले) ज्ञान यांच्यातला कळीचा फरक हा आहे. की ते नोंदले गेलेले आहे. यामुळेच ग्रंथांमधले ज्ञान मनांमधल्या ज्ञानापेक्षा बरेच महत्त्वाचे आहे.
इतरही मुद्दे आहेत. सर जॉन एकल्स फेसिंग रिअॅलिटी मध्ये म्हणतात, “माणसांपाशीच ज्यांत माणसे विधान करू शकतील अशा भाषा आहेत, आणि अशा भाषा संकल्पनात्मक विचार करणारेच वापरू शकतात. असा (संकल्पनात्मक) विचार मुळात विश्व तीनच्या घटकांशीच संबद्ध असतो. तो विचार जाणिवेतल्या वर्तमानाला ओलांडतो. प्राण्यांचे वर्तन मात्र केवळ जाणिवेतले वर्तमान आणि प्राण्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर झालेले संस्कार एवढ्यातूनच घडते. त्यांची जाळी-पोळी, सामाजिक रचना, इत्यादी माणसांच्या विश्व-तीनशी संबंधित नसतात. माणसे आणि प्राणी यांना मूलभूत वर्गीकरणात वेगवेगळे मानता येते, ते या एकाच बाबतीत.”
पॉपरची विश्व-तीनची संकल्पना नवनव्या तत्त्वविचाराला वाट मोकळी करून देते. पॉपरचे एक अप्रकाशित पुस्तक मन आणि शरीर यांचा संबंध तपासायला विश्व-तीन संकल्पनेचा वापर करते. आपले व्यक्ती म्हणून स्थान घडते ते आपण आणि विश्व-तीन यांतील व्यवहारातून, अशी ही मांडणी आहे. ही एकच कल्पना अनेक वाटांनी विचार करण्यास वाव देते.
नैतिक, सौंदर्यशास्त्रीय आणि इतर क्षेत्रांमधील प्रमाणे (standards) व्यक्तिनिष्ठ आहेत की वस्तुनिष्ठ, हा तत्त्वज्ञानातील जुना प्रश्न आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद बिनतोड का वाटतात, याच्या विश्लेषणातही मानवनिर्मित पण स्वयंभू विश्व-तीनची संकल्पना उपयोगी आहे.
सामाजिक बदलांचा प्रश्नही पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात केंद्रस्थानी आहे. विश्व-तीनच्या मदतीने ‘मी आणि ते’ या विभागणीतून घडणारे व्यापार-व्यवहार नव्याने तपासता येतात. विश्व-तीनचे घटक, भाषा, तत्त्वज्ञान, शास्त्रे, कला इत्यादी यांना इतिहास असतो. त्यांच्यात प्रगतीच होत असते असे नाही, पण ते बदलू शकतात, आणि सतत बदलत असतात. यातील प्रत्येक घटकाच्या उत्क्रांतीचे विवेकी, चिकित्सक स्पष्टीकरण विश्व-तीन संकल्पनेच्या आधारे देता येते. असे स्पष्टीकरण देण्यासाठी मार्क्सने मानली तशी योजना किंवा तसा ‘कट’ मानायची गरज नाही, हे विश्व-तीनच्या वापराने दाखवून देता येते. हेगेल आदींच्या ‘आतून’ काम करणाऱ्या चेतनतत्त्वाची गरजही विश्व-तीनने नाहीशी होते. अर्स्ट गाँब्रिखने कलेचा इतिहास व समीक्षा यांच्या विश्लेषणासाठी ही संकल्पना ‘अ टच ऑफ जीनियस’ म्हणून नावाजले जावे इतक्या कल्पकतेने वापरली आहे.
पॉपर प्लेटोपासून मार्क्सपर्यंतच्या राजकीय तत्त्वज्ञांच्या विश्लेषणासाठी ही संकल्पना वापरतो. प्राचीन काळापासून हेगेलनंतरच्या तत्त्वज्ञांपर्यंतच्या बौद्धिक आणि कलात्मकतेबाबतच्या विचारांमधील बदलाच्या चिकित्सेसाठीही पॉपर ही संकल्पना वापरतो. विश्व-तीनचा इतिहास पाहता भाषेच्या उद्भवानंतरचे सर्वांत महत्त्वाचे स्थान पॉपर समीक्षेच्या, चिकित्सेच्या विकासाला देतो. सर्वच समाज भोवतालच्या जगाचे स्पष्टीकरण देण्यासाठी काही मिथके किंवा काही धार्मिक संकल्पना मांडतात. आदिम, अविकसित स्थितीतल्या समाजांमध्ये या मिथकांबाबत किंवा धर्मसंकल्पनांबाबत शंका उपस्थित करण्याला देहान्तासारख्या शिक्षा असतात. पिढी दर पिढी होत जाणाऱ्या बदलापासून ‘सत्या’ला वाचवून पवित्र ठेवणे अत्यावश्यक मानले जाते. ही ‘राखण’ करण्यासाठी आधी गुप्त पुरोहित संस्था वापरल्या जात. मग उघड पुरोहितसंस्था आणि पंथ वापरले जातात. पंथांमध्ये नव्या कल्पनांना प्रवेश नसतो. अशा कल्पना पाखंडी आहेत, लोकांचा बुद्धिभेद करून त्या पंथात फूट पाडतात, असे मानले जाते. पण नव्या कल्पना मांडणारे स्वतःला ‘खऱ्या’ पंथाचे पाईक मानतात. आपण पंथसंस्थापकांचेच मत मांडत आहोत, हे आवर्जून सांगतात. विकृतींचा नायनाट करण्यासाठी हे केले जात आहे, असे नव्या कल्पना मांडणाऱ्यांचे आग्रही म्हणणे असते.
पॉपरच्या मते प्राचीन ग्रीसमधील सॉक्रेटीसपूर्व पंथ मात्र चिकित्सा, टीका, समीक्षा यांचे स्वागत करत. ही परंपरा थेलीजपासून अॅनाक्झिमँडर, आणि पुढे अॅनाक्झिमेनीजपर्यंत येते. या संबंधात पॉपर झेनॉफैनीजचा एक उतारा उद्धृत करतो.
“देवांनी सुरुवातीपासूनच आपल्याला सर्व काही दाखवलेले नाही. पण आपण काळासोबत शोध करत जास्त चांगले ज्ञान कमावू शकतो. पण खात्रीलायक सत्य म्हणाल तर कोणाही माणसाला ते ना सापडले आहे, ना सापडेल. आणि यात देवाबाबतचे आणि इतरही सारे ज्ञान येते. जर चुकूनमाकून कोणी अंतिम सत्य उच्चारलेही, तरी त्याला स्वतःलाही आपण तसे केल्याचे कळणार नाही, कारण त्याचे उच्चारणे हे अंदाजांच्या जंजाळाचाच एक भाग असेल.’
तर या चिकित्सक, समीक्षक परंपरेने पवित्र ज्ञानाच्या रूढीबद्ध परंपरेला संपवले. कल्पना सुचणे, युक्तिवाद लढवले जाणे, त्यांची चिकित्सक समीक्षा केली जाणे, अशी नवी, विवेकी परंपरा घडली. ही वैज्ञानिक पद्धतीची सुरुवात होती. चूक शोधणे, चुका सापडणे, ह्या बाबींना आपत्ती न मानता कमाईचे स्थान मिळाले.
रूढिप्रिय माणूस प्राण्यांसारखाच आपल्या तत्त्वांसोबत तगत असे किंवा नष्ट होत असे. पॉपर म्हणतो, “विज्ञानपूर्व पातळीवर आपले तत्त्व चुकीचे ठरले तर आपण बादच होतो. वैज्ञानिक पातळी मात्र आपण पद्धतशीरपणे आपल्या तत्त्वांची खोटी अंगे बाद करतो. स्वतःऐवजी आपल्या तत्त्वांचा बळी देतो.” (मॉडर्न ब्रिटिश फिलॉसफी या ब्रायन मॅगीने संपादित केलेल्या पुस्तकातून) तत्त्वांसोबत तत्त्वधारकाला मरावे लागत नाही हे ठरल्यावर माणसे बौद्धिक दृष्टीने साहसी झाली. त्याआधी सर्व बौद्धिक परंपरा बचावात्मक असायच्या. स्थिती जैसे थे राहावी यासाठी प्रयत्नशील असायच्या. आता त्या चौकस, चिकित्सक, बदलांचे स्वागत करणाऱ्या झाल्या. सॉक्रेटिसपूर्व तत्त्वज्ञांचे प्रश्न प्रामुख्याने निसर्गाबद्दल असत. सॉक्रेटिसने तोच चिकित्सक विवेक माणसे, सामाजिक संस्था यांच्या वागणुकीच्या तपासासाठी वापरला. यातून झालेल्या स्फोटक ज्ञानवृद्धीने प्राचीन ग्रीक आणि त्यांचे वारस इतर सर्व मानवी समाजांपेक्षा अत्यंत वेगळ्या त-हेने विकसित झाले.
[ब्रायन मॅगीच्या पॉपर (फाँटाना मॉडर्न मास्टर्स, १९७३-७९) या पुस्तकातून. पंथांचा नावीन्याला प्रतिसाद, यासंबंधीचे वर्णन अडवाणींच्या ताज्या (जिन्ना !) पाकिस्तानभेटीला लावून पाहावे! सं. ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.