अळीमिळी गुपचिळी

भारतात लोक कामव्यवहाराबद्दल बोलतच नाहीत. पाश्चात्त्य दृष्टिकोनात भारतीय उपखंड हे चित्रविचित्र इंद्रियानुभव घेणाऱ्यांचे आगर भासू शकते. त्या भागाच्या इतिहासात कामसूत्रही आहे, आणि आजचे पॉप स्टार्स ज्याचा उदोउदो करतात ते तांत्रिक व्यवहारही आहेत. भारतीयांना मात्र भारत हा पाश्चात्त्यांच्या लघळपणाविरुद्धच्या आणि चावट साहित्याविरुद्धच्या लढाईतील किल्ल्यासारखा वाटतो. हे बदलते आहे. चित्रपटातली चुंबने आणि कॉस्मॉपॉलिटन सारखी सचित्र मासिके आता भारतातही मान्य झाली आहेत. मध्ये दिल्लीत दोन समलिंगी स्त्रियांचा विवाहही झाला. पण पारंपरिक स्थितिवादी मूल्ये आजही जास्त प्रबळ आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच वर्षी समलिंगी व्यवहारांवरील बंदी अधोरेखित केली, आणि आजही भद्रकुटुंबातील भारतीय स्त्री मिनिस्कर्ट किंवा बिकिनी पेहरत नाही.

एड्सतज्ञांच्या मते भारतातल्या सामाजिक बंधनांमुळे आफ्रिकेसारखे एड्ससंसर्गाचे प्रमाण टाळले गेले आहे. पण फाजील मर्यादाशील शहामृगी वृत्तीचे काही तोटेही आहेत. दोन वर्षांपूर्वी भारताच्या आरोग्यमंत्रालयाने (सुषमा स्वराज) निरोधच्या जाहिराती बंद पाडल्या. एड्सच्या क्षेत्रातले कार्यकर्ते जुजबी मदत मिळवतातही, आणि लोकांच्या आणि पोलिसांच्या हल्ल्यांना बळीही पडतात. अर्धेमुर्धे भारतीय आपल्या मुलींची लग्ने अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच लावून देतात, पण या मुलींना लैंगिक व्यवहाराचे काहीही ज्ञान नसते. १९८६ साली चेन्नैमध्ये भारतातला पहिला एड्सचा रुग्ण आढळला. त्याचे निदान करून तपशील नोंदणाऱ्या डॉक्टर सुनीति सॉलोमन सांगतात की त्यांना आपल्या हृद्रोगतज्ञ पतीशीही मोकळेपणाने या विषयावर बोलता येत नाही. त्या जेव्हा लैंगिक शिक्षणाची व्याख्याने देतात तेव्हा पालक उठून ओरडतात, “का बिघडवताहात आमच्या देवासारख्या निरागस मुलांना ?” त्यांच्या मते या क्षेत्रात बरीच वाटचाल करावी लागणार आहे. भारतातील एड्सनिवारणाला दहा कोटी डॉलर्स (साडेचार अब्ज रुपये) मदत करणारा बिल गेट्स म्हणतो, “एड्सचा संबंध लैंगिकता, अंमली पदार्थ आणि समलिंगी व्यवहारांशी आहे आणि आधी प्रश्न आहे हे मान्य केल्याशिवाय प्रश्न सुटू लागणार नाही.’

गेट्सच्या संघटनेचे कार्यकर्ते भारतभरातील लैंगिक उद्योगाची आकडेवारी गोळा करत आहेत, त्यांना जाहीर भूमिकेपेक्षा बऱ्याच व्यापक आणि प्रकारच्या विविध लिंगव्यवहाराचे चित्र दिसत आहे. कोणत्याही आधीच्या पाहणीपेक्षा हे व्यवहार प्रमाणाने मोठे आहेत. भारतातील बहुतेक महानगरांमध्ये व मोठ्या शहरांत समलिंगी समूह, समलिंगी ‘वेश्या’ (स्त्री-पुरुष दोन्ही) आणि स्वतःचे लिंग ‘बदलून’ वागणारे समूह आहेत. लाखो लोक वेश्यांकडे जातात. दिल्लीत एकमेकांच्या बायका ‘बदलल्या जातात. दिवसा उच्च व्यवस्थापनात असलेल्या स्त्रिया रात्री धंदा करतात. मुंबईतील ‘आँटी’ तरुण पोरांना ‘बसायला’ बोलावतात. हे सारे एचायव्हीच्या अभ्यासात दिसते आहे. बंगलोरमधील समूह सुरक्षा या एड्सच्या क्षेत्रात गेट्स संघटनेसोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेचे संघमित्र अय्यंगार म्हणतात, “कोणाच्याही अपेक्षेपलिकडील लैंगिकतेचा भडक रंगपट नेहेमी दिसतो”. डीकेटी इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या अरुंधती चर म्हणतात की एड्सनिवारकांनी देशाला स्वतःच्या लैंगिकतेला सामोरे जायला लावले आहे. “आम्हाला तर आमच्या कार्यकर्त्यांसाठी इतिहासाचे वर्ग चालवून त्यांना कामसूत्र आपल्याच संस्कृतीचा भाग आहे, हे समजावून द्यावे लागले.”

चेन्नैच्या रेल्वेसेवेत हिजडे माणशी वीसपंचवीस रुपयांसाठी धंदा करतात. रेशन कार्डे आणि मतदान हे हक्कही नाकारले गेलेला हा गट आज एड्सनिवारणाचे काम करणाऱ्यांना ‘दिसतो’ आहे. याच शहरात तमिळनाडु एड्स इनिशिएटिव्ह च्या डॉ. लक्ष्मीबाई पुरुष ‘वेश्यां’ बाबत माहिती गोळा करत आहेत. त्यांना हिजडे तर दिसलेच, पण सामान्य वेषातले धंदेवाईक पुरुष संख्येने जास्त असल्याचेही आढळले. त्या म्हणतात, “मला वाटले होते की हा अल्पसंख्य प्रकार असेल, कारण भारतात समलिंगी लोकही समलिंगी व्यवहार करणाऱ्यांना नाकारतात.” याचा परिणाम असा की भारतात एड्स हा ‘विरुद्धलिंगी प्लेग’ (Straight Plague) मानला जातो. [युरोप-अमेरिकेत एड्सला ‘समलिंगी प्लेग’ ऋरू झथरीश म्हटले जाई. सं.]

हा भ्रम फक्त समलिंगी लोकांमध्येच नाही. मुंबईतील आर्थिक उलाढालींमधून लक्षावधी धनाढ्य तरुण घडले आहेत, आणि डान्सबार्समधील ऐंशी हजार मुली त्यांचे धन घेण्यास उत्सुक आहेत. काही डान्सबार्स हे बार असलेले कुंटणखानेच फक्त आहेत, पण ‘उच्च’ दर्जाच्या बार्समध्ये लैंगिक व्यापार होतो हे झाकायचा प्रयत्न केला जातो. तीसेक नाचणाऱ्या मुली आणि पुढ्यात सोफासेटांवर बसलेले आजचे राजेरजवाडे, असे चित्र उभारले जाते. स्पर्शसुखही नाकारले जाते, पण दौलतजादा भरपूर असतो. एका डान्सबारचा (करिश्मा ) मालक मनजीतसिंग सांगतो की बारबाहेर संभोग होतही असणार, पण ते ‘त्यांच्या क्षेत्रात’ ! तो सारे ‘डीसेंट’ ठेवतो.

[ डान्सबार्स शेजारची तासांच्या हिशोबात खोल्या देणारी लॉज-हॉटेलेही बारमालकांची असतात, असेही सांगितले जाते. सं. ] अरुंधती चर (डीकेटी) सांगतात की या सोज्वळपणाच्या देखाव्यात मुलीही सामील असतात. “अनेक मुली विवाहित असतात, पण त्या (आपल्या कामाबद्दल) नवरे, नातलग, शेजारी वगैरेंनाही सांगत नाहीत स्वतःला त्या ‘लैंगिक कामगार’ समजत नाहीत.”
चरना वाटते की मुंबईच्या कुंटणखान्यांपेक्षा डान्सबार बरे. डान्सबार्समध्ये लैंगिक गुलामगिरी नसते आणि मनजीतसिंगसारखे सुरक्षित संभोगाचे पुरस्कर्ते रोगांचे, एड्सचे प्रमाण दहा टक्क्यांइतके कमी[?] ठेवू शकलेले आहेत कुंटणखान्यांत हे प्रमाण पन्नास टक्के आहे. पण मनजीतसिंगसारखे डान्सबार मालक अपवादात्मक आहेत, हेही चर नोंदतात. त्यांचे समव्यवसायी जे आपण लैंगिक व्यापारातच नाही, असा आव आणतात, त्यातून “घडू घातलेली साथ” येणे शक्य आहे, असे चर सांगतात. आर.आर. पाटलांनी डान्सबार्स बंद करताना म्हटले, की डान्सबार्समुळे तरुणांची नीतिमत्ता आणि संस्कृती ढासळते आहे. पण पाटलांनी जास्त रोगट कुंटणखान्यांचा उल्लेखही केला नाही. आणि डान्सबार्स बंद पडले तर त्यात काम करणाऱ्या हजारो मुली थेट कुंटणखान्यात लोटल्या जातील.

उत्तर कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात मात्र देखावे आणि भ्रम टिकवून ठेवणे आता शक्य नाही. ट्रक ड्रायव्हर्स आणि बेघर कामगारांमुळे कोप्पलमध्ये आलेल्या एड्सला ‘मुंबई रोग’ म्हटले जाते. बारा वर्षांपूर्वी कोप्पलमध्ये फोफावलेला रोग आज तेथील दहा लक्षांवरच्या लोकसंख्येच्या पाच ते आठ टक्के प्रजेत [पन्नास ते ऐंशी हजार रुग्ण ] पसरला आहे. समूह संरक्षाचे डॉक्टर भुतय्या किस्तिगीया या खेड्यात दर आठवड्यातून एकदा निदान-शिबिर भरवतात. एका खोपटात दोन ‘वॉर्ड’ आहेत. एक स्त्रियांसाठी, एक पुरुषांसाठी मरू घातलेल्या लोकांसाठी. भुतय्यांकडे येणारे तीनशे रोगी दाखवतात की भटक्ये आणि ट्रकचालक यांच्याकडून आज रोग वेश्या, आज्या, बालविवाहिता आणि बालकांपर्यंत पोचला आहे. समूह संरक्षाचे संचालक अय्यंगार म्हणतात की आज रोग फिरस्त्यांपुरता सीमित नाही. बहुतेक विवाहित पुरुषांचा एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध असतो, आणि अनेक स्त्रिया नवरे जवळ नसतानासाठी ठराविक साथीदार सांभाळून असतात.

लैंगिक व्यवहार नाकारण्याचे धोके कोप्पलमध्ये स्पष्ट होतात. “एड्स भारतात महत्त्वाचा नाही, उपरा आहे. निरोधाच्या वापराने फक्त स्वैराचार वाढतो, असल्या सरकारी भूमिकांनी रोगाचे ‘स्वागत’ झाले आज प्रत्येक खेड्यात एड्स महत्त्वाचा आहे. कोणीही रोगाच्या टप्प्याबाहेर नाही, कारण कामव्यवहार आणि लैंगिक निष्ठांबाबतच्या ‘उद्घोषित’ कल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत.” अय्यंगारना कोप्पलची स्थिती भारतभर केव्हा पसरेल असे विचारले असता ते म्हणाले, “पाच वर्षांत.”

टाईम साप्ताहिकाच्या ६ जून २००५ चा अंक बियाँड डिनायलः इंडियाज वॉर ऑन एड्स या नावाचा लेख आहे. स्वतःला फसवणे किती धोकादायक ठरते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. अर्थातच एड्स हा एकच ‘मोठा’ रोग नाही, त्याला कुपोषण चालना देते, एड्स-निवारणाच्या काही स्वयंसेवी संस्था अत्यंत वाह्यात आर्थिक गैरव्यवहाराने लडबडलेल्या आहेत, हे सारे कमी जास्त प्रमाणात मान्य करावे लागतेच. पण त्याने आजची एड्सची समस्या सोडविण्यास मदत होत नाही. त्यासाठी भारतीयांच्या लैंगिकतेच्या ‘भडक रंगपटा’ला सामोरे जावेच लागेल.

टाईम च्या ‘स्टोरी’चा हा थोडासा भाग आहे. इतरही बरेच मुद्दे महत्त्वाचे आहेत. जिज्ञासूंनी letters @ time.com शी संपर्क साधावा.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.