स्त्री-पुरुष भेद

स्त्री-पुरुष समतेसाठी काय-काय करावे लागेल याची यादी अनेक विचारवंत-तत्त्वज्ञांनी केली आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. स्त्री-पुरुष समतेसाठी मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांच्या आड स्त्री आणि पुरुष यांची भिन्न मानसिकता येते काय, याचे उत्तर होय असे आहे. ते एक मानसशास्त्रीय कटु सत्य आहे.
स्त्री आणि पुरुष यांची मानसिकता ही आपल्या पूर्वजांकडून उत्क्रांत होत आलेली एक साखळी आहे. जेव्हा ते जोडीदार शोधतात तेव्हा दोघांच्या आवडी-निवडीची मानसिकता कमालीची भिन्न आढळते. ज्या काही समान आवडी-निवडी आहेत; उदा. सहकार्य करण्याची वृत्ती, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा, ह्या दोघांनाही हव्या असतात; परस्परावलंबन आणि बुद्धिमत्ता दोघांत समान असते ; दोघांनाही ‘धोका दिला जाणे’ आवडत नाही. या आधारे त्यांच्यात मानसिक आणि जैविक भागीदारी चालू असते.
पण, ठळक आणि तुलनेने जास्त असलेले परस्परविरोधी किंवा पूर्णतः वेगळे असे घटक स्त्री-पुरुषांत आहेत. स्त्रीला ‘उपभोग्य वस्तू’ संबोधले गेले तर ते आवडत नाही. तारुण्य आणि सौंदर्य यांपलिकडे जाऊन स्त्रीचे मूल्यमापन न करण्याच्या वृत्तीचा स्त्रीस तिटकारा येतो. पुरुषास ‘यशस्वितेचा’ निकष लावून मूल्यमापन केलेले आवडत नाही. स्पर्धात्मक युगात त्याची मिळकत मोजणाऱ्यांपासून तो जरा ‘हटके’ असतो. अनेक स्त्रियांशी रत होण्याच्या पुरुषांच्या इच्छावृत्तीमुळे लैंगिक बेईमानी निर्माण होते आणि स्त्रिया दुःखी बनतात. त्याच वेळी भावनिक आधारासाठी परपुरुषाशी जवळीक निर्माण करणाऱ्या स्त्रीच्या इच्छावृत्तीने पुरुषाचे जीवन वेदनामय बनते. यांतूनच स्त्री-पुरुषांच्या इच्छांची पूर्ती होण्यात अडथळे निर्माण होतात.
उत्क्रांति-मानसविज्ञानाने (Evolutionary Psychology) या साऱ्या विसंगती समोर आणल्या आहेत. जोडीदार निवडीच्या व जोडीदार म्हणून राहण्याच्या स्त्री-पुरुषांच्या पसंत्या भिन्न असतात. संभोगाची उद्दिष्टे, जोडीदारास नात्यात गुंतवून ठेवणे,जोडीदार बदलणे. यांतही ही भिन्नता आढळते. स्त्रीवादी दृष्टिकोन उत्क्रांतीतून आज दिसत असलेली ही लिंगभिन्नता स्त्रीवादावर निश्चित परिणाम करते हे पॅट्रिशिया गोवाटी, जेन लँकास्टर आणि बार्बरा स्मटसारख्या स्त्रीमुक्तिवादी उत्क्रांतिशास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. स्त्रीवादी चळवळीतील आघाडीच्या स्त्रियांनी लिंगभेदभावाची कारणे ही पुरुषसत्ताकवादात असल्याचे म्हटले आहे. ढोबळ मानाने पुरुषसत्ताकवाद म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक पातळीवर स्त्रीस गौणत्व किंवा खालच्या पातळीवरील स्थान देणे होय. त्यातून स्त्रीवर जुलूम करणे व त्यांची दडपणूक करणे होय. स्त्रियांचे असे शोषण करण्यासाठी पुरुष आर्थिक सत्ता, साधनसंपत्ती आपल्या ताब्यात ठेवतो.
साधनसंपत्ती आपल्या ताब्यात ठेवण्याचा पुरुषांचा हेतू उघड आहे स्त्रीचे लैंगिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारी संतती यावर त्याचेच नियंत्रण राहावे, हा. स्त्रीवादी भूमिकेचा हा गाभा आहे. जगभरात ही पुरुषसत्ताक वृत्ती दिसून येतेच पण त्याही पलिकडे जाऊन पुरुष लैंगिक हिंसा आणि अत्याचार या मार्गानेदेखील स्त्रीस आपल्या वर्चस्वाखाली ठेवतो.
स्त्रीवादी भूमिकेशी उत्क्रांतिविज्ञानाची भूमिका मिळतीजुळती आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उत्क्रांतिविज्ञानात पुरुषाच्या कृतींमागील कारणे जोडीदार-पसंती आणि समागम-निवडीचे डावपेच या आधारे शोधता येतात. पिढ्यानपिढ्या स्त्रिया पुरुषाची निवड कोणत्या हेतूने करीत आल्या आहेत, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न डेव्हिड बस या उत्क्रांतिमानसशास्त्रज्ञाने केला. ज्या पुरुषाकडे भरपूर साधनसंपत्ती आहे आणि ज्याला समाजात मानाचे स्थान आहे अशा पुरुषाची निवड स्त्रिया प्राधान्याने करतात, असे हजारो पिढ्यांचा अभ्यास करता आढळून आले आहे. ज्याच्याकडे हे नाही त्याचा ‘पत्ता त्या काटतात’.
अशा पुरुषांच्या निवडीसाठी आणि त्यांना मिळविण्यासाठी स्त्रियांचे आपापसातले डावपेच निर्माण होत गेले. तीच गोष्ट पुरुषांतही घडू लागली. साधनसंपत्ती आणि सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पुरुषांत आपापसांतले डावपेच निर्माण झाले. एक महत्त्वाचा पुरुषी डावपेच म्हणजे दुसऱ्या पुरुषांशी भागीदारी करणे, अनेक पुरुषांबरोबर भागीदारी करून दुसऱ्या टोळीतील पुरुषांवर वर्चस्व गाजविणे. प्राण्यांत हे डावपेच बबून्स, चिंपांझी आणि डॉल्फिन्स यात ठळकपणे आढळतात. हे डावपेच वापरून बॉटलनोज डॉल्फिनप्रकारच्या नरांकडून माद्यांचे कळप आकृष्ट केले जातात. मानवास अगदी जवळचे असणारे चिंपांझी इतर नरांबरोबर कळप करून दुसऱ्या कळपावर वर्चस्व मिळवून आपल्या कळपात श्रेष्ठत्व मिळवितात आणि अनेक माद्यांशी समागम करण्याची संधी साधतात. एकटा पडलेला नर कोणत्याही कळपाकडून कधीही मारला जातो. स्पर्धा कोणाशी?
मनुष्यप्राण्यातील नर हासुद्धा डावपेच, शक्ती यांच्या आधारे दुसऱ्या नरांची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या कामात गुंतलेला असतो. यातून तो स्त्रियांशी कामक्रियेची संधी मिळवीत राहतो. जगण्यासाठी आणि जुगण्यासाठी त्यावर सतत संघर्षाचा ताण असतो. उत्कृष्ट संतती आणि लैंगिक सुख यासाठी त्यास क्लृप्त्या लढवाव्या लागतात. प्राण्यांतही नरांचे असेच वर्तन आढळते. यातूनच जोडीदारनिवडीसाठी त्याच्यावर सतत प्रचंड दबाव राहतो. त्यातून त्याच्या टोळीची निर्मिती होते. स्त्रियांना शिकारीसाठी बाहेर राहावे लागत नव्हते किंवा इतर टोळ्यांशी युद्धे करावी लागत नव्हती. बळजबरीने पुरुषांना पळविण्याची गरज नव्हती. त्यामुळे जोडीदार निवडीसाठीचा दबाव पुरुषांएवढा स्त्रियांवर नव्हता. स्त्रियांतही भागीदारी होण्यामागील अनेक कारणे आहेत, मात्र ती पुरुषांमधील कारणांहून भिन्न आहेत. उदा. अपत्यांची काळजी, नातेवाईकांचा आधार इ. स्त्रीचे पुरुषाकडे जाणे म्हणजे ही भागीदारी कमकुवत होणे होय. त्यामुळे स्त्रियांचे सशक्त संघटन किंवा भागीदारी कठीण होई. यामुळेच पुरुषसत्ताक वृत्ती प्रबळ बनत गेली, असे बार्बरा स्मटने म्हटले आहे. पुरुषसत्ताक वृत्ती ही अशी निर्माण होणे उत्क्रांतिमानसशास्त्रज्ञांना असंभव वाटते. स्त्रियांच्या पुरुषनिवडीच्या निकषांत बसणे महणजे यशस्वी, महत्त्वाकांक्षी आणि सधन पुरुष बनणे होय. त्यासाठी पुरुषांनी जोखीम पत्करणे, जीव धोक्यात घालून सर्वोच्च स्थान पटकाविणे, स्पर्धकाचे हनन करणे, भागीदाऱ्या करणे, वैयक्तिक व्यूहरचना करणे, हे सारे आलेच. हे करीत राहिल्याने पुरुषांच्या हातांत साधनसंपत्तीची मालकी आली.
आजच्या युगातही सधन पुरुषाची निवड हा जोडीदारनिवडीचा प्रमुख घटक बनला आहे. जगभरातील संशोधने हेच सांगताहेत की आपल्यापेक्षा जास्त कमावत्या बाईस पुरुष निवडीत नाहीत. ज्या स्त्रिया नवऱ्यापेक्षा जास्त कमावतात अशांचा नवऱ्याशी काडीमोड कमी कमावणाऱ्या स्त्रियांपेक्षा दुप्पट प्रमाणात होतो. सर्वोच्च स्थान प्राप्त करून स्त्री मिळविण्यासाठी पुरुषांस पुरुषांशी स्पर्धा करावी लागते. स्त्रियांची पसंती आणि पुरुषांच्या स्पर्धेचे डावपेच यातून स्त्री-पुरुषांत साधनसंपत्तीची असमान वाटणी होते. स्त्रीवादी आणि उत्क्रांतिवादी कारणे अशा त-हेने पुरुषसत्ताकतेच्या मुळाशी जातात. जे पुरुष स्त्रियांना आकृष्ट करू शकले नाहीत, जे स्त्रीस दुसऱ्या पुरुषाकडे जाण्यापासून रोखू शकले नाहीत, अशा पुरुषांकडून संततिनिर्मिती फारशी घडली नाही. आपण अशा वाडवडिलांमुळे अस्तित्वात आलो ज्यांनी लैंगिक अप्रामाणिकपणा केला नाही, ज्यांनी स्त्रिया मिळविल्या आणि त्यांना बंधनांत ठेवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती पुरविली. आपण अशा मातांमुळे अस्तित्वात आलो जी तिची काळजी घेणाऱ्याबरोबर आणि पुरेशी साधनसंपत्ती देणाऱ्याबरोबर जुगली. पुरुषजात एक होऊन स्त्रियांची दडपणूक करते हे उत्क्रांतिमानसविज्ञानास मान्य नाही. दुसऱ्या पुरुषांची गळचेपी करून, अवहेलना करून, प्रसंगी मारामाऱ्या-खून करून पुरुष वर्चस्व कमावतो. मगच त्याला हवा तो स्त्रीजोडीदार प्राप्त होतो. जगभरातील ७०% खून हे एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाचे केलेले आहेत.
हीच कथा स्त्रियांची. स्त्रियांतही सर्वोत्तम पुरुष मिळविण्यासाठी स्पर्धा असते. प्रसंगी त्या दुसरीच्या पतीबरोबर रत होतात आणि काही वेळा दुसरा पुरुष पळवितात. आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या स्त्रीचे चारित्र्यहनन करतात, निंदा करतात. खास करून ज्या कमी काळ लैंगिक संबंधाचे डावपेच खेळतात त्या स्त्रियांची स्पर्धक स्त्रिया तीव्रतेने मानहानी करतात. खरेतर, स्त्री आणि पुरुष हे त्यांच्या स्वतःच्याच लैंगिक डावपेचाचे बळी ठरतात. यात पुरुष एक होतात असे आढळत नाही.
स्त्री-पुरुषांचे जोडीदारनिवडीचे डावपेच हे त्यांच्याच लिंगजातीस फायद्याचे ठरण्याऐवजी विरुद्धलिंगीयांस फायद्याचे ठरतात. पुरुष त्यांची संपत्ती एखाद्या स्त्रीवर उधळतात, मग ती पत्नी असो, बहीण असो, मुलगी असो वा रखेली. स्त्रीच्या सधन आणि सत्ताधारी पुरुषाच्या निवडीमुळे तिच्या मुलांचे, वडिलांचे, भावांचे फायदेच मिळतात.
स्त्री-पुरुष दोघांना जगण्यासाठी साधनसंपत्ती गरजेची आहे. जुगण्यासाठी तर पुरुषाला साधनसंपत्ती अत्यावश्यक ठरते. स्त्रियांच्या उत्क्रांत होत गेलेल्या जोडीदार- निवडीच्या इच्छा त्यास कारण ठरतात. याचा अर्थ स्त्रीवादावर टीका असा घेऊ नये. कारण जर स्त्री आणि पुरुष यांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेऊन स्त्री-पुरुष समतेच्या कार्याची बांधणी केली तर ते जास्त अर्थपूर्ण आणि चिरकालाचे ठरेल. पुरुषसत्ताकतेचा पारंपारिक अर्थ व कारणे, आणि उत्क्रांतिमानसविज्ञानाने सांगितलेला अर्थ व कारणे यात मानसविज्ञानास वैज्ञानिक चाचण्यांचा पाया आहे, जो जास्त विश्वासार्ह आहे. एकमेकांच्या आधारे जगत असताना ही वैज्ञानिकता स्त्री-पुरुषांना सजग बनवेल. त्यातून निर्माण होणारी नाती जास्त वास्तववादी आणि घट्ट बनणार नाहीत का ?
चार्वाक, ६५६४, जुना कुपवाड रोड, सांगली ४१६ ४१६.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.