आरसा

टीव्ही हे माध्यम आज पत्रकारितेच्या अर्थाची व्याख्या बदलत आहे. तटस्थ विश्लेषण, समतोल, सत्याबद्दल पावित्र्याची भावना, हे सारे मागे पडत आहे. बातम्या रंजक करून प्रेक्षकांना सतत उत्तेजित करणे, हा नवा गुरुमंत्र आहे. आज टीव्ही हे साठमारीचे रक्तरंजित मैदान झाले आहे मग ते झी-न्यूज ने गुडियाबद्दल सहानुभूती जागवणे असो की बिशन बेदीच्या स्टार न्यूज वरील कार्यक्रमाची आज किस की मौत आई है शैली असो. पत्रकारिता, वार्ताहरांचे काम आणि अभिव्यक्तीची इतर माध्यमे यांच्यातल्या सीमा पुसल्या जात आहेत. सत्य आणि कल्पित यांच्यात फरक उरलेला नाही मध्ये अमिताभ आणि अभिषेक यांनी त्यांच्या बंटी और बबली रूपात टीव्हीवर बातम्या दिल्या. वार्ता आणि वार्ताहर यांच्यात फरक उरलेला नाही ‘स्टोरी’ काय होती, कारगिल की कारगिलमध्ये बरखा दत्त ? मत आणि वृत्त, स्टोऱ्या आणि जाहिराती, सारे अपरिहार्य धूसर सीमांनी ‘एकवटते’ आहे. बातम्या धापा टाकत स्टोऱ्या, कथा सांगताहेत; आणि बातमी-वाहिन्या काही तथ्यांवर बेतलेल्या कथेकऱ्यांचे काम करताहेत. छपाई माध्यमांमध्ये वृत्तपत्रे ही गोंधळातून व्यवस्था शोधून मांडणारी उपकरणे असायला हवीत. रोज सकाळी ठराविक साच्यात वस्तुस्थिती त्यांच्या महत्त्वांच्या क्रमात विभागून मांडली जायला हवी. संपादक नावाचा एक अधिकारी हे करतो पण तुम्हाला उडी मारून व्यंगचित्रांकडे जाण्यास बंदी नसते.
टीव्हीच्या गरजा वेगळ्या असतात. ते काळाच्या एकरेघी प्रवाहात अडकलेले माध्यम आहे. सारे काही कालक्रमानेच पाहावे लागते. एखादा ‘तुकडा’ उडी मारून टाळता येत नाही वाहिनी बदलण्याचे स्वातंत्र्यच फक्त असते. वृत्तपत्र हे मागे जाऊन मनन करू देते, तर टीव्हीवर ‘ताबडतोबी’ या घटकाचा न टाळता येणारा दबाव असतो. वृत्तपत्रे तुम्हाला काळाला मागे दुमडून शांत कोनाडे घडवू देतात. टीव्ही मात्र वेगाने पुढेच जात राहतो. वातुळ वाहिन्या धडाधड ‘ताजी खबर’, ब्रेकिंग न्यूज देत असतात. गेल्या आठवड्यात एका वाहिनीने बिहारच्या राजभवनाचा रस्ता बंद केला गेल्याची बातमी ‘फोडली’. आणखी एका वाहिनीने बिहारच्या निवडणुकीसाठी उमा भारतींना अरुण जेटलींची सहाय्यक नेमल्याची बातमी फोडली. उथळपणासाठीची स्पर्धा कर्कश होऊ लागली आहे. ब्रेकिंग न्यूज, न्यूज फ्लॅश आणि जस्ट इन या त्रयीने सगळ्या जगाला अपार बिनमहत्त्वाच्या पण तरीही तातडीच्या बातम्यांनी भरून टाकले आहे. त्या तीन वर्गांमध्ये वरखाली ठरवणेही सोपे नाही कधी ब्रेकिंग न्यूज वर तर कधी न्यूज फ्लॅश. आणि पहिल्याने बातमी देण्याची इच्छा नेमकेपणा आणि सत्यावर मात करते नाहीतरी टीव्हीवर कोणालाही भूतकाळ आठवत नाहीच.
वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या आचारसंहितांमधले फरक गेल्या काही वर्षांत फार वाढले आहेत. सुरुवातीला टीव्हीनेही वृत्तपत्रांसारखी गोंधळातून व्यवस्था उभी करून दाखवण्याची भूमिका पार पाडायचा प्रयत्न केला. स्टूडिओ वृत्तपत्रांच्या पानांसारखे आखले जात. शब्दांकडे लक्ष देता यावे म्हणून हालचाल कमी केली जाई. वृत्तनिवेदक अभ्यासू तटस्थपणाने बोलत. क्रीडावृत्तासारख्या हलक्या बातम्यांआधी ‘जड’ बातम्या दिल्या जात. पण तरीही प्रेक्षकांचा टीव्ही वृत्तांना प्रतिसाद वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादापेक्षा वेगळा असे. मिनूचे केस आणि सलमा सुलतानच्या गालावरील खळ्या टाळता येत नसत.
मग व्यापारीकरण आले. प्रेक्षकांची संख्या, हा वाहिन्यांच्या कामाचा केंद्रबिंदू झाला. दृश्य गोष्टींचे महत्त्व वाढत गेले. आज टीव्ही वृत्तवाहिन्यांमधील प्रेक्षकवर्गासाठीची स्पर्धा ही टीव्हीवाहिन्यांमधली सर्वाधिक अवजड बाजारपेठ बनली आहे. आणि ही बाजारपेठही बह्वशी टीव्हीनेच उभारलेली आहे. ‘सेलेब्रिटीज’ला आलेले महत्त्व आज आश्चर्यकारक वाटत नाही. आपल्या वाहिनीवर प्रेक्षकांचे डोळे खिळवून ठेवायला ‘लोकचुंबके’ लागतातच. आज टीव्हीवर अनोळखी चेहेरे दिसतच नाहीत. आधी कोणाला तरी सेलेब्रिटी ‘करायचे’, आणि मग ती ओळख वापरायला लागायचे. टी.व्ही.वृत्ते बातम्या निवडत नाहीत, तर त्यांना वाढवतात. त्यात टीकाटिप्पणी नसते, ऊर धपापायला लावणारे ‘पाहणे’ असते. आज काही अर्थी टीव्ही बातम्या आणि प्रेक्षक ह्यांमध्ये मध्यस्थाचे काम करत नाही, तर आवर्जून स्वतःला दूर करून ‘अ-माध्यम’ व्हायचा प्रयत्न असतो. आज पाहणारे बातम्या घडवतात. विश्लेषणापेक्षा जनमतसंग्रहांना महत्त्व दिले जाते आणि सर्व ‘तज्ज्ञां’च्या मतांना आह्वाने दिली जातात. प्रत्येकच कार्यक्रम प्रेक्षकांना सहभागी करून घेत ‘इंटरॅक्टिव्ह’ बनतो. जे आहे ते ‘इथे आणि आता’ असे तात्कालिक आहे. वादविवादांत लोक नेत्यांना आह्वाने देतात पण आज नेते काय म्हणतात याला महत्त्वच उरलेले नाही. टीव्हीवर कोण काय म्हणाले, हे आठवते कोणाला ? अपवाद फक्त चटपटीत ‘साऊंड बाइट्स’चा. हा तीस सेकंदांचा ‘बाईट’ खरे तर वृत्तवाहिनींची जाहिरात असते. क्षणिक प्रतिमांच्या काटकसरीची ध्वनिरूप आवृत्ती अर्थ भलेही असो नसो.
पारंपरिक शब्दार्थही बदलत आहेत. आज मुलाखती ज्ञानासाठी उत्खनन न करता सुखासाठी माती चिवडतात. या माध्यमाची घातक शक्ती सर्वांत स्पष्ट केली ती मंदिरा बेदीच्या पोलक्याच्या शेवयांसारख्या ‘बाह्यां’नी आणि नवजोतसिंग सिद्धूच्या ऊटपटांग उपमांनी. ‘जेंटलमन्स गेम’ क्रिकेट एकाएकी ठळक तांबडा झाला. आणि हे घडवणाऱ्या आचारपद्धती आता वृत्तपत्रांवरही परिणाम करू लागल्या आहेत. पेज थ्री प्रकरण हे वृत्तपत्रांचे टीव्हीकरणच आहे.
इकॉनॉमिक टाईम्स हे भारतातील सर्वांत आदरणीय समजले जाणारे अर्थवृत्तपत्र. आज त्याचे मुखपृष्ठ दूरदर्शन पडद्यासारखे असते. रंग आणि भांग (दिडकीत कल्पनांचे भांडार खुले करणारी!) यांचा नुकताच शोध लागल्यासारखे. माध्यम भांडवलशाहीने मुक्ती दिलेली ‘लोकशाही’ हा टीव्ही वृत्तांचा गाभा बनला आहे. इथे लोकशाही आहे प्रेक्षकांच्या इच्छाआकांक्षांची, हावेची. माध्यमे या हावेच्या हातातली बाहुली बनली आहेत. बातम्या म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्याच फक्त. इतर साऱ्या लोकशाही संस्थांप्रमाणे इथेही गबाळेपणा आणि दुर्गंध आहे. पण टीव्ही खोटे बोलत नाही त्याची गरजच नसते. पण टीव्ही ज्या बातम्या देतो, त्या ज्या जगाबाबत असतात असे सांगितले जाते, त्याबद्दल नसतात. त्या असतात आपण काय आहोत आणि काय होऊ इच्छितो, याबद्दल. टीव्ही आरसा दाखवतो, पण फक्त बाह्य जगालाच नव्हे.
[तहेलका (११ जून २००५) मधील बंटी और बबली ब्रेक द न्यूज, या संतोष देसाईंच्या लेखाचा हा अंश ]
पायवा
[आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.
आजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.