विचारदर्शन आणि त्याचं जागतिकीभवन

जगभरचं होणं आणि जगभरचं करणं
‘विश्व’ म्हणजे सगळं काही. ‘जगत्’ म्हणजे माणसाचं विश्व, माणसाच्या हालचालींना, जगण्याला संदर्भ देणारं सगळं काही. ‘जागतिक’ म्हणजे जगभरचं. ‘जागतिकीभवन’ म्हणजे जागतिक होऊन जाणं, केवळ स्थानिक न राहणं. हे आपोआप जागतिक होणं असेल किंवा कुणी हेतुतः जागतिक केलेलं असेल. मानवजातीच्या इतिहासात अगोदरपासून संथपणे चालू असलेल्या ‘जागतिकीभवना’ ची अलीकडची मुद्दाम गतिमान केलेली अवस्था म्हणजे ‘जागतिकीकरण’.(जाता जाता सांगायचं म्हणजे ‘ग्लोबलायझेशन’साठी योजलेला हिंदी भाषेतील ‘वैश्विकीकरण’ शब्द तेवढा योग्य नाही. ‘भूमंडलीकरण’ त्यापेक्षा थोडा बरा एवढंच.)
जागतिकीभवन या अधिक दीर्घकालीन आणि अधिक व्यापक घडामोडीचा विचार करताना व्यापार आणि उद्योग यांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या जगण्याच्या सगळ्याच बाजूंचा विचार करायला लागतो. कंदमुळं-पानफुलं गोळा करणं आणि किडे-मासे पकडणं (फॉरेज), पशु-पक्षी-मासे मारणं, दगडालाकडाची हत्यारं आणि इतर उपकरणं बनवून वापरणं, पशुपक्षी पाळणं आणि बागायत आणि शेती करणं, धातूंची उपकरणं बनवणं, कुटुंब-टोळ्या-वाडीवस्त्या-गावं-शहरं अशा सामाजिक रचना करीत भटक्या जीवनाकडून स्थायिक होणं, थोर आणि पोर, बाईमाणूस आणि बापईमाणूस, काळीवरची आणि पांढरीवरची माणसं, थलकरी आणि उपरी माणसं अशा प्रकारच्या श्रमाच्या, प्रतिष्ठेच्या आणि सत्तेच्या विभागण्या अशा प्रकारे माणसांची जीवनपद्धती विकसित’ झाली. काही समाजांत तर शब्दप्रबंधांचं पठन-पारायण आणि/किंवा लेखन-वाचन उपस्थित झालं आणि परंपरा-संक्रमण आणि प्रभाव-संक्रमण केवळ अनुकरणावर अवलंबून न राहता अनुसरणाचा आधार घेऊ लागली. परंपरा आणि प्रभाव यांच्या परिणामांतून जमात-निहाय आणि प्रदेश-निहाय विशिष्ट जीवनपद्धती उपजल्या आणि कमी-अधिक विकसित झाल्या. मर्यादित कक्षेतील जीवनपद्धतींमधून कुठेकुठे अनुकूल परिस्थिती उत्पन्न झाली तिथेतिथे मानवी इतिहासातील महासंस्कृती (सिव्हिलिझेशन्ज) अस्तित्वात आल्या आणि प्रतिकूल परिस्थिती उत्पन्न झाली तिथे विलयाला गेल्या किंवा विलीन झाल्या. भारतीय उपखंड (दक्षिण एशिया), पूर्व एशिया (चीन-कोरिया जपान), दक्षिण-पश्चिम एशिया (इराणपासून अरबस्तानपर्यंत), भूमध्य-सामुद्रिक प्रदेश आणि यूरोप, कोलंबस-पूर्व अमेरिका (इंका, माया, आझतेक) असे प्रमुख भूखंड आणि त्यांच्या महासंस्कृती इतिहासात झाल्या. त्याखेरीज दक्षिण आणि पूर्व एशियांमधील महासंस्कृतींचा प्रभाव दक्षिण-पूर्व एशिया आणि मध्य एशिया या भूखंडातून वेळोवेळी पडला आणि भूमध्य-सामुद्रिक प्रदेशातील संस्कृतींचा प्रभाव (प्राचीन ईजिप्शियन आणि इस्लामी उत्तर आफ्रिकन) आफ्रिका खंडातील ईथिओपिया ते घाना या पट्ट्यात वेळोवेळी पडला. गेल्या दोनअडीच हजार वर्षांत क्रमाक्रमाने माणसाचं जग एकत्र जोडलं गेलं-कधी माणसांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरातून, कधी स्वाऱ्या आणि साम्राज्यविस्तारातून (ईजिप्शियन, पर्शियन, अलेक्झंडर, सीझर पितापुत्र, चिंगिझखान, क्रूसेड इत्यादी), कधी व्यापारातून (घोडे, मसाले, रेशीम इत्यादी), तर कधी धर्मप्रसारातून (उदाहरणार्थ ख्रिस्ती आणि बौद्ध मिशनऱ्यांची गाठ येशूनंतरच्या पॅलेस्टाइनमध्ये पडली). हे झाले संथपणे दीर्घकालीन होणारे जागतिकीभवन : या ऐतिहासिक क्रियेला कधीकधी व्यापक सर्वस्पर्शी प्रभावाचं स्वरूप आलं. रोमन साम्राज्याला ग्रीस जोडला गेला (इ.स.पू. दुसरं शतक) आणि मोंगोल साम्राज्याला चीन जोडला गेला (इ.स. तेरावं शतक) ह्या दोन्ही उदाहरणांत जितांनी जेत्यांना अधिक सुसंस्कृत केले. मात्र कधी जेत्यांनी जितांची संस्कृती भुईसपाट केली अरब साम्राज्याचा ईजिप्तपासून इराणपर्यंत विस्तार (काही अंशी पर्शियन लोकांनी अरबांना प्रभावित केलं), मोंगोल आणि तुर्की साम्राज्याचा विस्तार (चीनचा अपवाद, उत्तर-कालीन ऑटोमन साम्राज्याचा अपवाद), स्पॅनिश साम्राज्याचा मध्य आणि दक्षिण अमेरिकेतला विस्तार. कधी जेत्यांनी जितांना ‘विकसित’ करण्याचं अंगावर घेतलं उत्तर आणि मध्य एशियातला रशियन साम्राज्याचा विस्तार. इस्लामी विजेते आणि यूरोपीय विजेते यांनी भारताला ‘सुधारण्याचे प्रयत्न केले, पण भारत पूर्णपणे मुस्लिम/ख्रिस्ती झाला तर नाहीच, उलट जेत्यांनाच भारतीयांनी चार गोष्टी शिकवल्या. भारताच्या या धृष्टपणाबद्दल इस्लामने आणि यूरोपने भारताला मनापासून कधीच ‘क्षमा’ केलेली नाही याच्या खुणा आजपर्यंत मिळत राहिलेल्या आहेत. (चीनच्या बाबतीत या दोन्ही महासंस्कृतींची आकांक्षा मर्यादित राहिली, त्यामुळे चीनला क्षमा करण्याचा प्रश्न उद्भवला नाही.)
ह्या संथ, दीर्घकालीन, आणि व्यापक जागतिकीभवनांची परिणती तीव्र आणि द्रुत जागतिकीकरणात कशी झाली ? ही परिणती मुख्यतः उद्योग आणि व्यापार क्षेत्रांत केंद्रित झालेली आहे. उद्योजकाने माल बनवायचा, देशातल्या देशात तो खपेलच, उरेल तो स्वदेशी किंवा परदेशी व्यापाऱ्यांनी परदेशात नेऊन विकायचा ही कल्पना जुन्या काळात एकोणिसाव्या शतकापर्यंत रूढ होती.
औद्योगिक क्रांतीमुळे यूरोपीय देशांत मालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं, आणि यूरोपीय देशांना कच्चा माल पुरवणारे, पक्का माल घेणारे, आणि कधीकधी स्वस्तात श्रम पुरवणारे अंकित देश आणि अंकित स्थलांतरित श्रमिक उपलब्ध झाले. यामुळे जागतिक व्यापार आणि उद्योग यांचं बाह्य स्वरूप पालटलं पण आंतरिक स्वभाव पालटला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धात दुबळे झालेले यूरोप आणि जपान साधारणतः १९८० पर्यंत सावरले आणि आपल्या मालाला परदेशांत बाजारपेठ शोधू लागले. जगाची विभागणी विकसित आणि अविकसित (फार तर विकसनशील) देशांत झालेली होतीच. दळणवळणाची साधनं आणखी वाढली. यात दोन नव्या व्यवस्थांची भर पडली. एक म्हणजे परदेशांची स्थानिक गरज आगाऊ लक्षात घेऊन तसतसा माल उद्योजकाने बनवायचा. या नव्या दृष्टीला जपान्यांनी ‘दोचाकुका’ (म्हणजे ग्लोबल-लोकल, जागतिक-स्थानिक) असं नाव दिलं आणि आपल्या हिशोबी आणि निरलस व्यवस्थापन-कौशल्याने व्यापारात आघाडी मारली. यूरोप-अमेरिका खडबडून जागे झाले. अधिक चतुर आणि निष्ठुर व्यवस्थापन-तंत्र शिकवण्याच्या शाळा काढल्या. बहुराष्ट्रीय कंपन्यांचं प्रमाण वाढलं आणि उत्पादनाइतकंच त्या व्यापारात लक्ष घालू लागल्या. या सर्वाला नाव मिळालं ग्लोबलायझेशन या ठिकाणी जागतिकीकरण. (अरब प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेऊन काढलेले काही बॉलिवुड चित्रपट हे ‘दोचाकुका’चं एक गमतीशीर भारतीय उदाहरण!) या जोडीला दुसरी व्यवस्था म्हणजे स्वस्तात काम करणारे श्रमिक परदेशातून आयात करायचे (पश्चिम आफ्रिकेतून अमेरिकेत गुलाम, भारतातून ठिकठिकाणी गेलेलं ‘इन्हेंचर्ड लेबर’, दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोपात आलेले तुर्की श्रमिक इत्यादी). असं न करता परदेशातल्या परदेशात काही किंवा सर्व काम करून घ्यायचं, याला नाव मिळालं ‘आउटसोर्सिंग’. जागतिकीकरणाचा हा आणखी एक आविष्कार. जागतिकीकरणाचा तिसरा एक आविष्कार दिसतो. त्याला ‘व्यवस्था म्हणणे योग्य ठरणार नाही, पण हा परिणाम मात्र दिसतो खरा. परदेशी गरजा हेरून उत्पादकाने त्यानुसार उत्पादन करणं समजू शकतं. पण याच्या उलट बाजारात येणाऱ्या परदेशी मालाला अनुसरून स्थानिक ग्राहकांनी आपल्या गरजा आणि मागण्या बदलून घेणं याला काय म्हणावं ? (हॉलिवुड चित्रपटांमुळे यूरोप, जपान धरून इतर जगातील स्थानिक चित्रपट एक तर मार खाऊ लागले किंवा हॉलिवुड चित्रपटांची नक्कल करू लागले.) गोष्टी या थराला आल्यावर जागतिकीकरणाचा विचार केवळ व्यापार, उद्योग, फार फार तर प्रसारमाध्यमं आणि शिक्षण यांच्यापुरता मर्यादित ठेवून कसं चालेल ? आर्थिक, तांत्रिक, ज्ञानप्रसार यांच्याबरोबर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील जागतिकीकरणाचा विचार करावा लागेल जसा तो आपण ऐतिहासिक जागतिकीभवनाच्या संबंधात केला आहे. जागतिकीकरणाचा विचार समग्र मानवी जीवनाच्या संदर्भात आणि मानवी जगाच्या इतिहासाच्या संदर्भात करायला लागेल. तसा तो केला तर, उदाहरणार्थ, दक्षिण एशियाच्या क्रमाक्रमाने सामाजिक-सांस्कृतिक एकीकरणाला, भारतीय महासंस्कृतीच्या निर्मितीला आपण जागतिकीकरणाची रंगीत तालीम म्हणू शकतो. चैतन्यसंप्रदायी वैष्णवांच्या मणिपुरातील मेइथेई संस्कृतीवरील आक्रमणावर नवा प्रकाश पडतो; ‘मिशनरी’ वृत्तीचा हाही एक आविष्कार! किंवा, आनर्त, लाढ, सौराष्ट्र एक होऊन गुर्जरराष्ट्र बनणं याच्याकडे त्या मोठ्या एकीकरणाचा भाग म्हणन पाहता येईल. भारतीय एकीकरण या व्यापक ऐतिहासिक प्रक्रियेचा भाग म्हणन इतरही घटितांकडे बोट दाखवता येईल : जमातींच्या (ट्राइब्ज) जाती (कास्ट्स्) बनणं, लहान राज्यं मोठ्या राज्यांची मांडलिक बनणं, गावोगावचे आठवडेबाजार शहरातल्या मध्यवर्ती बाजारपेठेला जोडले जाणं, स्थानिक गुरुकुलांतून मोठी विद्यापीठं निघणं, स्थानिक मिथकं, उपासना, अभिचार आणि उपचार व्यापक मिथकं, अभिचार, उपचार आणि व्यापक धारणाव्यूहांशी जोडली जाणं.
विचारदर्शन आणि त्याचा मानवी संदर्भः
माणूस इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. प्राण्याला परिसरातील सृष्टीला प्रतिसाद द्यावा लागतो, हा प्रतिसाद परिसराला अनुकूल असावा लागतो, क्वचित् कधी परिसर स्वतःला अनुकूल करून घ्यावा लागतो (उदाहरणार्थ, घरटं बांधून). प्राण्याला स्वतः टिकून राहण्यासाठी आणि त्या प्राणिजातीला टिकून राहण्यासाठी हे परस्पर-अनुकूलन आवश्यक आहे. माणसालाही इतर प्राण्यांप्रमाणे एक जीवनपद्धती असते. या जीवनपद्धतीला परिसर कधी अनुकूल ठरतो, कधी प्रतिकूल ठरतो, तर कधी उदासीन राहतो. परंतु माणूस पूर्णपणे इतर प्राण्यांसारखा नाही, तो एक वेगळा प्राणीही आहे. तो केवळ परिसरातील सृष्टीला प्रतिसाद देत नाही, तो परिसरातील सृष्टीला साद घालत असतो. आपला साद आणि प्रतिसाद यांतून माणसं विश्वाच्या पसाऱ्यात आपलं एक जग वसवतात. माणसं केवळ परिसरातील सृष्टीचीच नव्हे, केवळ माणसांच्या जगाचीच नव्हे, तर एकूण विश्वाची दखल घेतात.
परिणामी, माणसाची जीवनपद्धती इतर प्राण्यांच्या जीवनपद्धतींपेक्षा वेगळी असते. तिच्यात एक विशिष्ट जीवनशैली असते. विशिष्ट म्हणजे व्यक्तिपरत्वे, समाजपरत्वे, आणि संस्कृतिपरत्वे विशिष्ट. एखाद्या व्यक्तीची जीवनशैली म्हणजे लकबी, सवयी, कल, आदर्श इत्यादी आणि या त्या व्यक्तीच्या गरजा आणि मागण्या, क्षमता आणि कौशल्ये, अभिवृत्ती म्हणजे अॅटिट्यूडूज् आणि पूर्वग्रह त्यांना धरून राहतील. या व्यक्तिगत जीवनशैलीवरून कोण कशात कितपत सफल होईल किंवा कशापोटी असं असं वागेल हे लक्षात येतं. समाजाची जीवनशैली ही त्या समाजाच्या सदस्यांचे एकमेकाशी भलेबुरे संबंध किंवा गटागटांचे परस्परांशी संबंध किंवा लहानमोठा गट आणि गटसदस्य यांमधले संबंध यांतून लक्षात येते; त्या समाजातील स्व-पर-भाव, कमीअधिक जवळीक आणि उच्च-नीच भाव, कमीअधिक प्रतिष्ठा यांवरून ठरते; आणि त्या समाजात सत्ताधारी कोण सत्ताधीन कोण, लाभांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटेकरी कोण हे त्या समाजगत शैलीवरून स्पष्ट होतं. कोण कोणत्या भूमिकेतून आणि कुणासाठी असंअसं वागतो हे तिच्यावरून कळतं. संस्कृति विशिष्ट जीवनशैली ही माणसं सक्रिय होताना किंवा गरज वा मागणी साधताना कोणते प्रघात किंवा कोणते कार्यविधी म्हणजे प्रोसीजर्स अनुसरतात यांवरून लक्षात येते, मग ही सक्रियता किंवा साध्यसाधना परिसराशी जुळवून घेण्यासाठी असेल किंवा परिसराला माणसाला अनुकूल करून घेण्यासाठी असेल. तसेच ‘स्वान्तःसुखाय’ क्रीडा असेल किंवा ‘स्वहिताचा धंदा’ असेल. एखाद्या समुदायाची संस्कृती कळली म्हणजे कोण असंअसं कशाखातर वागेल किंवा कोण कशाला वा कुणाला कसं लेखेल हे कळणं सुलभ होतं. माणसाच्या एकंदर जीवनशैलीचं अवलोकन केलं म्हणजे तो केवळ परिसराला प्रतिसाद देत नाही तर तो वेगळा प्राणी असल्यामुळे परिसराला साद घालत राहतो. याची जाणीव होईल.
माणसाचं वेगळेपण आणखी एका प्रकारे स्पष्ट होतं. माणसाच्या जीवनपद्धतीत त्याच्या विविध जीवनशैलींचा जसा समावेश होतो तसा त्याच्या समग्र विश्वदर्शनाचाही समावेश होतो. इतर प्राण्यांना ते परिसराला साद घालत नसल्यामुळे प्रश्न पडत नाहीत, मनुष्यप्राण्याला मात्र अगदी लहानपणापासून अनेक प्रश्न पडतात’. त्याला त्या प्रश्नांची आपापल्या परीने ‘उत्तरंही सापडतात’. पण इथेच तो थांबत नाही. ही उत्तरं केवळ इतरांनाच नाही तर स्वतःला पटवण्याची त्याला आस असते, यासाठी तो ही उत्तरं पडताळून बघतो. कुतूहलाला दिशा मिळणं, कुतूहलपूर्ती, आणि पडताळणी यांची साखळी चालूच राहते, कारण हाती आलेल्या उत्तरांतून नवनवीन प्रश्न उपस्थित होत राहतात. काही अंशी माणसाचं विश्वदर्शन त्याच्या जीवनशैलीपासून अलग पडतं. माणसाला पडणारे प्रश्न आणि त्यांची सापडणारी आणि नंतर पटणारी उत्तरं ही केवळ व्यक्तिविशिष्ट किंवा समाजविशिष्ट किंवा संस्कृतिविशिष्ट राहात नाहीत; या सगळ्यांच्या पलीकडे जातात, मनुष्यविशिष्ट ठरतात, किंबहुना वैश्विक ठरू पाहतात. वैश्विक ठरू पाहात असली तरी ही विश्वदर्शनानं हाती येणारी प्रश्नोत्तरं अखेर मनुष्यविशिष्ट तरी ठरतातच, पण मनुष्यविशिष्ट ठरतानाही वेगवेगळ्या पद्धतीने ती तशी ठरतात. विश्वदर्शनाचे मुख्य दोन प्रकार दिसतात : विचारदर्शन आणि कल्पनादर्शन; त्यांपैकी विचारदर्शनाचे दोन उपप्रकार दिसतात : एक ज्ञानव्यूह म्हणजे नॉलेज-सिस्टिम्स आणि दुसरा धारणाव्यूह म्हणजे बिलीफ-सिस्टिम्स. आपल्याला या त्रिविध विश्वदर्शनांची तुलना करायची आहः ज्ञानव्यूह, धारणाव्यूह, आणि कल्पनादर्शनं म्हणजे फँटसीज.
ज्ञानव्यूहात परिणत होणारे प्रश्न सामान्यतः अशा प्रकारचे असतात : असं असं आहे किंवा घडतंय असं दिसतंय खरं, ते कसं काय ? किंवा : अमुक असं असावं किंवा घडावं असं वाटतंय खरं, तसं व्हावं कसं? प्रश्न विचारताना किंवा उत्तरं सापडताना तर्काच्या मर्यादेत कल्पना करून पाहायची असते. पडताळणी करताना संदेहात सुरुवात करून प्रत्यक्ष आणि तर्क या निकषांवर त्या उत्तरांची वस्तुतंत्रता जोखायची. पटली तर अनुक्रमे विज्ञान (दिसतंय ते खरं कसं काय ?) किंवा तंत्रज्ञान (वाटतंय तसं खरं होईल कसं) या रूपाने ज्ञानव्यूह-रूप विश्वदर्शनात जमा होणार. (प्रायोगिक निकषाचा वेगळा उल्लेख केलेला नाही, कारण तो प्रत्यक्षाचाच उपप्रकार आहे.)
धारणाव्यूहात परिणत होणारे प्रश्न सामान्यतः अशा प्रकारचे असतातः
जे आहे किंवा घडतंय असं दिसलं तर ते कशा प्रकारे घडलेलं असणार ? किंवा : ते कशा प्रकारे घडावं, घडत राहावं असं करणार ? उत्तरं सापडताना कल्पनेच्या मर्यादेत तर्क करून पाहायचा असतो. पडताळणी करताना मंडळींना पटतंय खरं अशा विश्वासात सुरुवात करून वस्तु-प्रतीती आणि तर्क या निकषांवर त्यांची मनुष्यतंत्रता जोखायची. ती तशी पटली तर अनुक्रमे आदर्शक्रम म्हणजे आयडिऑलजी किंवा कार्यक्रम म्हणजे प्रोग्रॅम सिद्ध होणार. विश्वासाची परिणती कधीकधी श्रद्धेत होऊ शकते. श्रद्धा म्हणजे मनःपूर्वकता, निष्ठा, आणि भरवसा यांनी दृढ झालेली धारणा. (आपल्या ‘विश्वास’ शब्दाला बिलीफ आणि ट्रस्ट असे दोन्ही अर्थ आहेत हे लक्षात घेतलं म्हणजे गोंधळ होणार नाही.) राहता राहिलं कल्पनादर्शन म्हणजे फँटसी. (फँटसी ही इथे पारिभाषिक संज्ञा असून शेरेबाजीदाखल केलेलं वर्णन नाही हे मात्र विसरू नये.) कल्पनादर्शनात परिणत होणारे प्रश्न हे एक तर अध्यात्मविषयक असतात, किंवा विचारदर्शनात उपस्थित करता यावे असेच प्रश्न असतात (मात्र त्यांमध्ये विशिष्ट अध्यात्म गृहीत धरलेलं असतं). अध्यात्मविषयक प्रश्न म्हणजे आपलं विश्वाशी नातं काय, आपलं इतर माणसांशी किंवा इतर व्यक्तींशी नातं काय, आणि स्वतःशी नातं काय यांबद्दलचे प्रश्न. हे किंवा विचारदर्शनाची आठवण करून देणारे इतर प्रश्न हे स्व-प्रतीती आणि कल्पना आणि त्यांची संगती यांच्या मर्यादेत. उत्तरं सापडतात. पडताळणी मनुष्यतंत्र असते. कल्पनारूप ज्ञान आणि धारणा यांची परिणती बहुधा श्रद्धेत होते. कल्पनादर्शनात एक तर अध्यात्म तयार होतं किंवा विश्वरचना आणि विश्वकथानक किंवा त्यांचा अंश उलगडणारं मिथक म्हणजे मिथ तयार होतं किंवा उपासनारूप विधी म्हणजे रिचुअल तयार होतं किंवा अभिचाररूप विधी म्हणजे मॅजिक तयार होतं किंवा उपचार विधी म्हणजे सेरिमोनियल तयार होतं. (उपासना किंवा अभिचार यांमध्ये निश्चित आचार आणि उच्चार यांना महत्त्व असतं.)
मानवी जीवनपद्धती जीवनशैली विश्वदर्शन – – – – – – – – – – – –
तिचे त्रिविध आविष्कार विचारदर्शन कल्पनादर्शन व्यक्तिगत समाजगत संस्कृतिगत ज्ञानव्यूह धारणाव्यूह अध्यात्म
मिथक विज्ञान आदर्शक्रम उपासना तंत्रज्ञान कार्यक्रम अभिचार उपचार आतापर्यंत आपण धर्मचिंतन, धर्मविधी, आणि धर्मकारण यांचा वेगळा उल्लेख केलेला नाही. धारणाव्यूह, अध्यात्म, मिथक, उपासना आणि अभिचार ह्या क्षेत्रांत या ना त्या धर्मसंप्रदायाची हजेरी लागते. अध्यात्म वा आध्यात्मिक भूमिका ह्याला यूरोपीय परंपरेत स्पिरिच्युअल स्टान्स आणि यूरोपीय आधुनिकतेमध्ये एग्झिस्टॅन्शल स्टान्स म्हणतात. आध्यात्मिक भूमिका ईश्वर किंवा परा प्राकृतिक (सूपरनॅचरल) यांना स्वीकारणारी असेलच असं नाही. आपल्याला इथे अधिक खोलात जाण्याची गरज नाही, कारण आपल्याला मुख्यतः विचारदर्शनाकडेच लक्ष पुरवायचं आहे विचारदर्शनाकडे म्हणजे ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह यांच्याकडे.
ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह यांना मनुष्यजातीच्या इतिहासाचा संदर्भ देताना आपण मुख्यतः भारतीय आणि यूरोपीय महासंस्कृतींवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि तसं करताना भारतीय म्हणजे ‘स्पिरिच्यूअॅलिटी’मध्ये गुरफटलेले आणि यूरोपीय म्हणजे विज्ञानतंत्रज्ञानात गुरफटलेले अशा सोप्या समीकरणांत आपल्याला गुरफटायचं नाही हे निश्चित. ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह जरी जीवनशैलीपासून वेगळे काढता येतात तरी त्यांची निर्मिती आणि प्रसार या क्रिया व्यक्तिगत, समाजगत, आणि संस्कृतिगत जीवनशैलीत गुंतलेल्या आहेत. (त्या तशा गुंतल्या नाहीत, उपऱ्या राहिल्या तर काय होतं याची चित्रं हल्ली अविकसित किंवा अर्धविकसित समाजात दिसतात विज्ञान हा जणू मिथकाचा आणि तंत्रज्ञान हा जणू अभिचाराचा वा जादूटोण्याचा भाग ठरतो!)
भारतीय महासंस्कृतीच्या प्राचीन अभिजात युगात (ढोबळ मानाने इ.स.पू. सहाव्या शतकापासून इ.स. सहाव्या शतकापर्यंत) भारत बाहेरच्या जगाशी व्यापारी आयातनिर्यातीच्या बरोबरीने सामाजिक, सांस्कृतिक, किंवा वैचारिक निर्यात (बौद्धधर्म, आयुर्वेद, नक्षत्रचक्र इत्यादी) आणि आयात (राशिचक्र, मूर्तिकलेतली गांधारशैली इत्यादी) करायला उत्सुक होता. नंतरच्या काळात निर्यात चालू राहिली (रामायणमहाभारतकथा, मंत्रिमंडळामार्फत शासन-प्रशासन, मार्शल आर्ट्स इत्यादी) पण आयात मंदावत जाऊन बंद पडली. विचारदर्शनात ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह सुरुवातीला आपलं वेगळेपण आणि महत्त्व राखून होते. नंतरच्या काळात हळूहळू ज्ञानव्यूह माघार घेऊन धारणाव्यूहात विलीन होऊ लागला, संदेहाची जागा विश्वासाने, किंबहुना श्रद्धेने घेतली. परंपरेतून आपलं परिपोषण साधण्याऐवजी परंपरेचं दास्य पत्करण्याची वृत्ती वाढली. ‘पुराणमित्येव न साधु सर्वम्’ याचा जोतिर्विद्येत, आयुर्वेदात, गायनवादननर्तनकलांत विसर पडत गेला. ज्ञानभाषेचा म्हणजे संस्कृतचा नित्याच्या जीवनव्यवहाराशी संबंध तुटला; शब्दांची जणू झिजवट नाणी झाली. काव्यभाषेवरही सांकेतिकतेचं प्राबल्य वाढलं. विविध मानवी आणि भौतिक कारणांमुळे आधीची निकोप स्थिती राहिली नाही. भारतीय जीवनातला आनंदीपणा हरपला असं लक्ष्मणशास्त्री जोशींचं निरीक्षण आहे. आनंदीपणाबरोबर खेळकर विनोदही हरपला. (अरबी-फार्सीमधून मराठीने हौस, मौज, खुषी, मजा यांसारखे शब्द घेतले त्यांच्याऐवजी दुसरे ‘स्वदेशी’ शब्द सापडणं का सोपं नाही? हल्ली सार्वजनिक आनंदीपणा दाखवेगिरी’च्या पातळीवर घसरला आहे ‘दाखवेगिरी’ हा पु. शि. रेग्यांचा एग्झिबिशनिझमसाठी प्रतिशब्द. भारतीयांना ध्वनिप्रदूषण, कमालीची बटबटीत सजावट अशा गोष्टींची कास धरल्याशिवाय आनंद दाखवता येत नाही इतका तो कृत्रिम असतो. खेळकर विनोदाची गोष्ट पाहावी तर अभिजात संस्कृतमधील हास्यरस ढोबळ विदूषकीवरच आधारलेला, एरवी समृद्ध समजल्या जाणाऱ्या बंगाली वाययात विनोदाची उणीव दिसते. अर्वाचीन भारतीय साहित्यात उपहास आहे, विनोद नाही. सामान्य जीवनशैलीत खेळकर विनोदाला जागा कमीच, “भावना दुखावल्या जाणं’ याला जागा भरपूर.) एका कर्मदरिद्री भीतीने जणू भारताला ग्रासलं. परकीय, परदेश, परविद्या, परधर्म, परभाषा यांना चार हात दूर ठेवून स्वतःला परंपरेत कोंडून घेण्याची वृत्ती बळावली. धोपटमार्ग सोडून नव्या वाटा शोधणाऱ्या विचारवंतांची उपेक्षा झाली. (वैयाकरण भर्तृहरि, वाययविद् अभिनवगुप्त, राजनीतिविद् कौटिल्य यांची हस्तलिखितं खूप कमी मिळतात आणि ती सुद्धा अडाणी लेखनप्रमादांनी भरलेली.) भारतीयेतर ग्रीक, अरबी, फार्सी, चिनी ग्रंथांचे भारतीय भाषांत अनुवाद झाले नाहीत. (भारतीय ग्रंथांचे परकी भाषांतून अनुवाद होत राहिले.) भारतानं जरी स्वतःला कोंडून घेतलं तरी भारतावर अरबी, अफगाणी, तुर्की, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आक्रमणांच्या रूपानं बाहरेचं जग नंतरच्या शतकांत येऊन आदळलं, आणि भारत त्याला अगतिकतेने, नाखुषीने, ‘गरजवंताला अक्कल नसते’ या ब्रीदाने सामोरा गेला. भारतीयांचा हा मध्ययुगीन आणि अर्वाचीनयुगीन इतिहास हा विद्याधर नायपॉल यांच्या शब्दांत सांगायचं तर एका ‘घायाळ महासंस्कृती’चा (वूडेड सिव्हिलिझेशन) इतिहास आहे. ज्ञानप्रसार म्हणजे साचलेलं ज्ञान घोटून घेणं (अभ्यास, आवृत्ती, पारायण). पाठांतरावर नको इतका भर राहू लागला. परकीयांच्या आक्रमणामुळे लादल्या गेलेल्या अरबी, फार्सी, लॅटिन, इंग्रजी भाषांतील ज्ञानाचा आणि धारणांचा प्रसारही याच पद्धतीने झाला. एवढी दुरवस्था पुरेशी नव्हती म्हणून की काय विचारदर्शनाचा प्रसार थोड्यांपुरता मर्यादित राहिला; उच्चवर्णीय हिंदू आणि ख्रिस्ती, अश्राफ मुस्लिम (सय्यद, शेख, पठाण, खान उपपदं लावणारे, परकी मुस्लिमांशी नातं सांगणारे) यांच्यापुरता राहिला. स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र (म्हणजे दलित), आटविक (म्हणजे आदिवासी), अश्फाकी मुस्लिम (‘अनुकंपा झालेले’ बिचारे बाटगे) यांच्या नशिबी हे पढीक विचारधनही मिळणं नव्हतं.
या विचारदर्शनाच्या बाबतीत झालेल्या सामाजिक फाळणीचे निरनिराळे परिणाम झाले. प्रफुल्लचंद्र राय भारतीयांच्या रसायनशास्त्राचा इतिहास लिहिताना धातुकामासारखं तंत्र अशिक्षित कारागिरांवर सोडून देण्यात आल्यामुळं हळूहळू नष्ट कसं झालं हे सांगतात. नीहाररंजन राय लिहितात की आयुर्विद् आणि ज्योतिर्विद् मंडळींबद्दल पढीक ज्ञानवंताची दृष्टी कायम गढूळ राहिली ते बरेचसे ब्राह्मण असले तरी. (शवविच्छेदन थांबवलं; आर्यभट्टाला त्याचं नवं ज्ञान प्रसृत करण्याची चोरी झाली.) धारणाव्यूहांच्या बाबतीत तमिळ शैव-वैष्णव भक्त, सूफी भक्त, बौद्ध सिद्धांपासून प्रेरणा घेणारे नाथपंथीय आणि उत्तरकालीन विविध भक्तिमार्गी यांनी विचारदर्शनापासून वंचित राहिलेल्या सर्वांसाठी धारणाव्यूहापुरती निराळी भावस्फुरणाची वाट शोधून काढली. वीरशैव, असमिया वैष्णव शंकरदेव, आणि कबीरदास यांनी तर जातिभेदावरच कमीअधिक सफल आघात केले.
विचारदर्शनाचा भारतीयांमधला मानवी संदर्भ पाहिल्यानंतर यूरोपीयांमधल्या विचारदर्शनाच्या मानवी संदर्भाकडे वळू. प्राचीन ग्रीकांनी लक्षणीय विचारनिर्मिती आणि विचारप्रसार केला मात्र तो ‘नागरिकां’पुरता. गुलामांना त्यात स्थान नव्हतं, सॉक्रेटीजसारख्या गुलाम नसलेल्या पाथरवटाला असलं तरी; स्त्रियांनाही त्यात स्थान नव्हतं, अॅस्पेझियासारख्या ‘मुक्त’ गणिकेला असलं तरी सॉक्रेटीजच्या ग्झांथिपी या धर्मपत्नीला त्यात स्थान नव्हतं. पण एकंदरीने ग्रीकांमध्ये विवेचकबुद्धी (लोगॉस, रीझन) आणि नवनिर्मितिक्षम प्रतिभा यांची बूज होती. ग्रीकांनी पडताळणीला महत्त्व दिलं, माझा गुरु प्लेटो थोर असला तरी सत्य त्याहून थोर आहे म्हणण्याचा धीटपणा अॅरिस्टॉटलने दाखवला, पण ज्ञानव्यूहाची पडताळणी आणि धारणाव्यूहाची पडताळणी कश्या वेगळ्या आहेत हे त्यांच्या पुरतं ध्यानात आलं नाही. रोमनांनी ग्रीकांच्या विचारधनाचा त्यांना झेपला तेवढा फायदा घेतला. मध्ययुगाच्या पहिल्या खंडात या विचारधनाचा विसर पडला, नंतरच्या काळात अरबी-फार्सी अनुवादांवरून आणि भाष्यांवरून ग्रीक-लॅटिन ग्रंथ पुनःप्राप्त झाले आणि नंतरच्या रनेसांस कालखंडात प्राचीन ग्रीकलॅटिन विचारधनाचा अधिक जोमाने आणि सजगपणे प्रसार झाला. ग्रीक-लॅटिन संस्कृतीत जो वैचारिक खुलेपणा होता त्याला मात्र ख्रिस्ती धर्म या सेमिटिक धर्माचं विरजण पडलं आणि ते बराच काळपर्यंत दूर झालं नाही. नवं तंत्रज्ञान आणि नवं विज्ञान यांच्या निर्मितीकडे आणि प्रसाराकडे यूरोपीय समाज कसा वळला? ख्रिस्ती संन्यस्त धर्मोपदेशकांचे दोन वर्ग होते फिरते भिक्षू (फ्रायर) आणि स्थायिक मठवासी (मोनॅस्टरीमध्ये मंक, कॉन्व्हेंटमध्ये नन). मठवासी भिक्षा न मागता मठाच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त कामं करीत : शेती करणं, लोकर पैदा करून कापड विणणं, रुग्णशुश्रूषा करणं, शिक्षणप्रसार करणं, हस्तलिखितं लिहिणं आणि सचित्र करणं अशी कामं ते करीत. मठवासींमध्ये सुशिक्षितांचा भरणा जास्त असल्यामुळे त्यांनी या सर्व कामांत विचारपूर्वक सुधारणा केल्या. बैलाऐवजी घोड्यांचे नांगर वापरल्यामुळे नांगरट खोल झाली आणि उत्पादन वाढलं. प्रोटीनयुक्त कडधान्याचं पीक काढल्यामुळे पोषण सुधारलं. उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ही नवी सोय काढली. (युनिव्हर्सिटी म्हणजे आचार्य आणि शिष्य एकत्र राहायची सोय, या शब्दाला विद्यापीठ हा प्रतिशब्द, विश्वविद्यालय नव्हे. भारतातली विद्यापीठं नालंदा, तक्षशिला, नागार्जुन, वलभी, नवद्वीप पुष्कळच अगोदर निघाली आणि कर्मदरिद्री मध्ययुगात हळूहळू बंद पडत गेली.) अर्वाचीन शिक्षणशास्त्राचा पाया येशूसंघी म्हणजे जेझुइट मंडळींनी घातला. या सगळ्यामुळे आधुनिक तत्त्वज्ञान, विज्ञान, आणि तंत्रज्ञान यांना चालना मिळाली. तत्त्वज्ञान ख्रिस्ती धर्मचिंतनापासून वेगळं होऊ लागलं. प्राकृतिक, जैविक, आणि आकारिक ज्ञानशाखांची वाढ झाली (आकारिक विज्ञानव्यूह म्हणजे गणित आणि तर्कशास्त्र). कारागिरी आणि वैदूगिरी यांचं रूपांतर अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र या तंत्रज्ञानशास्त्रांमध्ये झालं. मानवीय ज्ञानशाखा थोड्या मागाहून (अठरावं-एकोणिसावं शतक) पटावर आल्या. यूरोपीय ज्ञानजीवनात धर्माचा पगडा याप्रमाणे कमी कमी होत गेला हे खरं. पण यहुदी, ख्रिस्ती, आणि इस्लामी या सेमिटिक धर्मांची आपलं तेच खरं इतरांचं सर्वथा त्याज्य असं म्हणण्याची आग्रही वृत्ती धर्मनिरपेक्ष बौद्धिक जीवनातही झिरपली. टॉमस कून यानं ‘द स्ट्रक्चर ऑव्ह सायंटिफिक रेव्हल्यूशन्स’ या पुस्तकात यूरोपीय विज्ञानातल्या ह्या युयुत्सू स्पर्धेचं मोठं रेखीव वर्णन केलं आहे. जर यूरोपीयांच्या आपसातल्या मतभेदांचं हे उग्र स्वरूप राहिलेलं तर मकॉलीने नेटिवांच्या ज्ञानजीवनाची हेटाळणी करावी यात आश्चर्य ते कुठलं? यूरोपीय समाजाची वसती, राजकीय सत्ता, आणि आर्थिक सत्ता जगभर पसरली त्यामुळे या बौद्धिक उद्धटपणाला बळ मिळालं. याचा एक शाहजोग आविष्कार म्हणजे जगातल्या इतर मागास जनसमूहांचा उद्धार करण्याचा भार आपल्यावर पडला आहे (द व्हाइट मॅन्ज बर्डन) अशी यूरोपीयांनी आपली गोड समजूत करून घेणं! अगोदरच्या काळात यूरोपीय बाहेरचं ज्ञान घ्यायला एकंदरीनं उत्सुक होते. धर्मपीठाकडून कधी अडथळा होत असे. (उदाहरणार्थ, अरबांच्या मार्फत आलेली हिंदूंची दशमानपद्धती आणि शून्याचा वापर व्हेनिसच्या व्यापाऱ्यांना रोमन आकड्यांपेक्षा सोयीस्कर वाटला आणि त्यांनी तो धर्मपीठाच्या खळखळीकडे दुर्लक्ष करून स्वीकारला.) पण अर्वाचीन युगात ही स्वागतशीलता राहिली नाही. धर्मातून आलेल्या वैचारिक सवयींचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह यांमधलं अंतर यूरोपीयांच्या ध्यानात यायला खूपच वेळ लागला. धारणाव्यूहांच्या बाबतीत दिसुन येणारी एक गंमत म्हणजे आपला धर्म किंवा आपला आदर्शक्रम व कार्यक्रम याबद्दलचा कमालीचा आग्रह आणि त्यातून उपजलेली असहिष्णुता. ख्रिस्तीधर्मी काय किंवा (उदाहरणार्थ) मार्क्सवादी काय जेवढे इतरांच्या धारणाव्यूहाबद्दल असहिष्णू असतील तेवढेच, कदाचित् काकणभर जास्तच, अंतर्गत मतभेदांच्या बाबतीत असहिष्णू असतात. हीच गोष्ट इतर सेमिटिक धर्म किंवा यूरोपीयांमधले धारणाव्यूह यांच्या बाबतीतही दिसते.
यूरोपीय महासंस्कृतीचा उद्धटपणा आणि भारतीय महासंस्कृतीचा घायाळपणा यांचा विचारदर्शनाच्या क्षेत्रांमधील संगम फारसा सुखद आणि फलदायी ठरणं अवघडच होतं. यूरोपीय बौद्धिक जीवनावर सेमेटिक धर्माच्या आग्रही वृत्तीची छाया पडली होती, तर यांच्या बरोबर उलट भारतीय जीवनामध्ये ‘जगा आणि जगू द्या’ या वृत्तीला महत्त्वाचं स्थान होतं. भारतीय महासंस्कृती परंपराप्रिय खरी, पण तिची वाढ एकाहून अधिक परंपरांचं सहजीवन मान्य करणारी होती, काही परंपरा तर अनाग्रहीच होत्या. उदाहरणार्थ, जैन परंपरेत अहिंसेचा आदर्श बौद्धिक जीवनातही मानला गेला. वास्तव ‘अनेकान्त’ म्हणजे अनेक निष्कर्षांना वाव देणारं आहे, त्याबद्दलचं कोणतंही विधान एका ‘नया’तून म्हणजे दृष्टीतून केलेलं असणार, तर अशा त्या विधानाबद्दल फार तर ‘स्यात्’ (असेल, असू शकेल) असाच प्रतिसाद देणं युक्त ठरेल. तुलना करायची तर : इस्लाममध्ये कुरआन, हदीस (पैगंबराचं परंपरागत वचन), आणि फ़तवा (अधिकारी गुरूंनी केलेलं निर्वचन) या तीन आधारांनी निश्चित केलेल्या शरीअत (हमरस्ता)पासून चळणे म्हणजे कुफ्रच (ईश्वराशी कृतघ्नताच). यूरोपीय प्रबोधन (इन्लायटन्मेंट) आपल्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीविषयी टॉलरन्स (सहनशीलता) दाखवण्याचा सल्ला देतं. मार्क्सवादी एखाद्याचं बोलणं आयडियॉलॉजिकली करेक्ट (धारणाव्यूहाला धरून) असल्याचं शिफारसपत्र देतील आणि मार्क्सवाद ज्याला समजला आहे असं वाटत होतं त्याच्याशी मतभेद दर्शवताना बॅड फेथ (प्रतारणा)चा आरोप करतील. येशू म्हणतो, ‘मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे; माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी पित्याकडे येत नाही’ (योहानचं शुभवर्तमान १४:६), येशू असंही म्हणतो, ‘जो माझ्या बाजूचा नाही तो माझ्या विरुद्ध आहे’ (मत्तयचं शुभवर्तमान १२:३०, लूकचं शुभवर्तमान ११:२३). यूरोपीय ‘स्कोलॅस्टिक’ विचारवंतांनी केलेल्या एका वैचारिक गोंधळाचाही इथे उल्लेख करायला हरकत नाही, तो म्हणजे श्रद्धा आणि विवेक (फेथ आणि रीझन) यांचा विरोध मानणं, आणि त्यामुळे डोळस म्हणजे विवेकी श्रद्धा असू शकते हे मानायलाच तयार नसणं. वास्तविक श्रद्धा म्हणजे मनःपूर्वकता, निष्ठा, आणि भरवसा यांनी दृढ झालेली धारणा. श्रद्धा आणि संदेह (किंवा संशय) यांचा विरोध अवश्य असू शकतो. विवेक म्हणजे तर्काला महत्त्व देणारी विवेचक बुद्धी. विवेक आणि कल्पना यांचा विरोध असू शकतो. श्रद्धा आणि विवेक यांचा विरोध असण्याचे कारण नाही. भारतीय महासंस्कृतीने स्वतःला कोंडून घेतल्यावर जेव्हा यूरोपीय आक्रमणाचा सामना तिने केला तो अगतिकतेने, नाखुषीने, ‘गरजवंताला अक्कल नसते’ या ब्रीदाने केला. त्यामुळे बाहेरून आलेल्या विचारदर्शनाच्या म्हणजे ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह यांच्या संबंधात भारतीय काय करणार? ते एक तर त्याचा उघड किंवा छुपा तिरस्कार करतात, किंवा विवेचक-बद्धी गंडाळन ठेवून त्याचा निर्बद्ध स्वीकार करतात किंवा फार तर त्याचं चलाख अनुकरण करतात. पर्याय कोणताही असो. त्यात दिसते ती भारतीयांची लाचारीच.
यूरोपीयांचा बौद्धिक उद्धटपणा आणि भारतीयांची बौद्धिक लाचारी याला काही सन्माननीय अपवाद नाहीतच का ? यूरोपीयांपैकी काही जर्मन विचारवंतांमध्ये भारतीय विचारदर्शनांबद्दल एक निकोप स्वागतशीलता आढळते. ग्योटेने कालिदासाच्या ‘शाकुंतल’ नाटकाला आणि शोपेनहाउअरने उपनिषदांना केलेला दिलखुलास सलाम तर प्रसिद्धच आहे. रशियातील सेंट पीटर्जबर्ग विद्यापीठातील संस्कृतचा जर्मनभाषक प्राध्यापक ऑटो ब्योटलिंक याने पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाचा जर्मन अनुवाद करून यूरोपीयांना त्याची ओळख करून तर दिलीच; वर तत्कालीन रशियन सरकारने त्याला सायबीरियातील याकुत भाषेचं व्याकरण लिहायचं काम दिल्यावर त्याने चक्क पाणिनीच्या पद्धतीने ते लिहिलं आणि आधुनिक भाषाविश्लेषणाची मुहूर्तमेढ रोवली. (व्हिटनी या अमेरिकन संस्कृतज्ञाने ‘हिंदू’ वैयाकरणांची हेटाळणी केली होती ती दुर्लक्षित राहिली.) भारतीयांपैकी राजा राममोहन राय यांनी सुरुवात तर चांगली केली. यूरोपीय ज्ञानाचा त्यांनी भारतीयांना परिचय करून दिला आणि त्याच तत्परतेने भारतीय ज्ञानाचा यूरोपीयांना परिचय करून दिला. इतिहासाचार्य राजवाडे आणि बंगाली तत्त्वज्ञ कृष्णचंद्र भट्टाचार्य यांनी यूरोपीय आणि भारतीय विचारवंतांना एकाच मापाने मोजण्याची आणि त्यांचा खुलेपणाने विचार करण्याची तयारी दाखवलेली दिसते. पण दुर्दैवाने असले अपवाद थोडेच राहिले. यूरोपीय फार तर मोठेपणा दाखवून भारतीयांच्या विचारधनाचं कौतुक करणार आणि त्यांची कौतुकाची थाप पडली म्हणून भारतीय खूष होणार!
वैचारिक खुलेपणाचे अपवाद थोडे.
प्रश्न तसा साधा आहे. या अपवादांचा नियम कधी आणि कसा होणार ? या प्रश्नाचं व्यावहारिक नयातून मिळणारं उत्तर उघड आहे जेव्हा यूरोपीयांचा अहंभाव आणि भारतीयांचा न्यूनभाव (किंवा अहंभावाच्या मुखवट्याआड दडलेला न्यूनभाव) दूर होईल तेव्हा, आणि हे अहंभाव-न्यूनभाव केव्हा दूर होतील? जेव्हा त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, आणि राजकीय आधार हटतील तेव्हा. पण एवढ्यानं भागत नाही. या प्रश्नाला अखेर सैद्धान्तिक नयातून उत्तर शोधावं लागेल. वैचारिक खुलेपणाचं वातावरण जगभरचं होणं ही विचारदर्शनाच्या जागतिकीभवनाची निव्वळ पूर्वतयारी ठरेल. विचारदर्शनाचं जागतिकीभवन होण्याचा प्रश्न जागतिकीकरणाच्या झपाट्यामुळे आता अगदी ऐरणीवर आला आहे. या बाबतीत तत्त्वज्ञांवर मोठीच जबाबदारी येऊन पडते आहे.
विचारदर्शन जगभरचं होणं आणि जगभरचं करणं
आपण पूर्वी एकदा एका गोष्टीची दखल घेतलेली आहे विश्वदर्शनात हाती येणारी प्रश्नोत्तरं केवळ व्यक्तिविशिष्ट, समाजविशिष्ट, किंवा संस्कृतिविशिष्ट राहात नाहीत, तर ती मनुष्यजातीचं विचारधन ठरतात, त्यांना एक वैश्विकतेची कूस असते. माणसाच्या जीवनशैलीची गोष्ट निराळी आहे ती संस्कृतिविशिष्ट, समाजविशिष्ट, फार काय व्यक्तिविशिष्ट राहणार, नव्हे विविधता हे सगळ्याच जीवनाचं एक शाश्वत मल्य आहे. बायोडायव्हर्सिटी ही केवळ उपयक्ततेची बाब नाही गव्हाच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या जमिनींत आणि हवामानांत तगतील. कुत्र्याच्या वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या परिस्थितींत टिकाव धरतात आणि वेगवेगळ्या कामाला येतात. तसंच जैविक विविधता केवळ जीवनाची लज्जत आणि रसवत्ता साधण्याची बाब नाही. तर तिच्यात जीवनाची सार्थकता आहे. माणसाच्या जगात विविध जीवनशैलींची शंभर फुलं फुलू द्यात. जागतिकीकरणाच्या झपाट्यात सर्व मनुष्यजीवन एकसारखं, परिसराच्या विविधतेला आणि काळाच्या ओघात येणाऱ्या बदलांना तोंड देऊ न शकणारं कमजोर, एकसुरी आणि कंटाळवाणं तर होणार नाही ना अशी भीती कुणीकुणी व्यक्त करतात ती वाजवी आहे. यूरोपीय महासंस्कृतीत असा एकसुरीपणा आलेला आहे आणि त्याला कंटाळलेले पर्यटक भारतीय महासंस्कृतीमधील विविधतेला किती असोशीने पिऊन घेतात ते तुम्ही कधी पाहिलं आहे का ? भारतीय चित्रपटसृष्टी बॉलिवुडच्या झपाट्यात कशी एकसारखी होऊ लागली आहे हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का ? आणि या जाणिवेनं भयभीत व्हायला होत नाही का ? पण ही झाली जीवनशैलीची कथा. विश्वदर्शनाची आणि त्यातल्या त्यात कल्पनादर्शनाची इतकी नव्हे तर विचारदर्शनाची कथा निराळी आहे. त्यात दिसणारी विविधता सगळ्या माणसांना उपलब्ध झाली तर हवी आहे.
योगदर्शन हा एक भारतीय धारणाव्यूह आहे, ज्यात एक आदर्शक्रम आहे चित्तवृत्तिनिरोधापासून समाधिरूप भेदविलोपनात परिणत होणारा आदर्शक्रम, आणि ज्यात एक कार्यक्रमही आहे शरीराचं आणि चित्ताचं आणि या दोन्हींना जोडू पाहणाऱ्या प्राणाचं निरनिराळ्या प्रकारे संचालन करण्याचा कार्यक्रम. समाजवाद, अधिक नेमकेपणानं सांगायचं तर लोकशाही समाजवाद, हा एक यूरोपीय धारणाव्यूह आहे, ज्यात एक आदर्शक्रम आहे प्रत्येकाकडून त्याच्या कुवतीनुसार समाजाच्या संपत्तीत भर आणि प्रत्येकाकडे त्याच्या गरजेनुसार समाजाच्या संपत्तीचा वाटा, आणि एक कार्यक्रमही आहे डेव्हिड ह्यूम या अठराव्या शतकातल्या स्कॉटिश तत्त्वज्ञाच्या आणि इतिहासकाराच्या एकदा सहज लक्षात आलं की काही लोकांनी आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त वाटा घेण्याचं थांबवलं तर कुणालाही गरजेपेक्षा कितीतरी कमी वाट्यावर भागवण्याची वेळ येणार नाही. त्याचबरोबर हेही लक्षात यायला हरकत नाही की काही लोकांनी आपल्या कुवतीपेक्षा कितीतरी कमी काम करायचं थांबवलं तर कुणालाही कुवतीच्या पलीकडे काम ओढून काढायची वेळ येणार नाही. तर या साध्या गोष्टी समाजातल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचा आणि आदर्शक्रमाच्या जवळ जाण्याचा कार्यक्रम. जागतिकीभवनाच्या संथ चालीत या दोन धारणाव्यहांचं काय झालं? ते व्यह त्यात्या संस्कृतिविशिष्टतेच्या पलीकडे गेले. बौद्धांच्या मार्फत योगदर्शनातले महत्त्वाचे अश पूर्व एशियाभर पोचले आणि भारतीय योगशिक्षकांच्या मार्फत त्यातल्या कार्यक्रमाचे काही अंश यूरोपीय महासंस्कृतीभर फैलावले. औद्योगिक क्रांतीनंतर आणि मर्यादित जबाबदारीचं तत्त्व ब्रिटिशांनी शोधून काढल्यानंतर उद्भवलेल्या भांडवलदारी कारखानदारीनंतर ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या कामगारसंघ चळवळीमध्ये लोकशाही समाजवादाच्या कार्यक्रमाचे आणि नंतर आदर्शक्रमाचे काही अंश जगाच्या काही इतर भागांतही पोचले. भारतीय महासंस्कृतीत काहींनी गांधीवादी समाजवाद आणि हिंदू समाजवाद हे संकर जन्माला घातले, पण ते कार्यक्रमाच्या अभावी कागदावरच राहिले.
आयुर्वेद हा एक भारतीय ज्ञानव्यूह आहे. त्यात एक विज्ञानाचा अंश आहे आणि एक आहारविहारउपचारयोजनेचं तंत्रज्ञानही आहे. अधिक खोलात न जाता दोनतीन वैशिष्ट्यं लक्षात आणून देता येतील एक म्हणजे शरीर-मन-आत्मा वेगवेगळे न मानता एकाच मनुष्यत्वाचे पैलू मानले आहेत, शरीराचे व्यापार तीन तत्त्वांनुसार घडतात किंवा बिघडतात : पित्त म्हणजे अन्नापासून उष्णता आणि कार्यशक्ती मिळवणं, कफ म्हणजे शरीरातल्या निरनिराळ्या द्रव्यांचं संचलन, आणि वात म्हणजे शरीराचे वेगवेगळे भाग जोडणारे आणि नियंत्रित करणारे संदेश पाठवत राहणं; दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचं साध्य मुख्यतः रोगनिवारण नसून स्वास्थ्य पुनः जाग्यावर आणणं ; आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञान केवळ स्थानिक, तात्कालिक, कठोर न ठेवण्याकडे कल. डार्विनोत्तर जैविकी हा एक यूरोपीय ज्ञानव्यूह आहे. त्यात एक विज्ञानाचा अंश आहे आणि एक तंत्रज्ञानाचा अंश आहे. अधिक खोलात न जाता काही ठळक वैशिष्ट्यं लक्षात आणून देता येतील एक म्हणजे प्राणिजाती, वनस्पतिजाती, आणि या दोन्हींत स्पष्टपणे न मोडणाऱ्या सूक्ष्मजीव-जाती एकाच सूत्राप्रमाणे जगतात, उपजतात, आणि मरतात आणि तेच प्राणिव्यक्ती, वनस्पतिव्यक्ती, आणि सूक्ष्मजीवव्यक्ती यांनाही लागू आहे ; दुसरं वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तींमधील आनुवंशिक साम्यं आणि भेद, त्यांचं अंशतः परिसराच्या प्रभावानुसार कमीअधिक प्रमाणात पुढच्या पिढीपर्यंत संक्रमण होणं, आणि त्यामुळे जाती कमी-अधिक प्रमाणात टिकणं हे सर्व मिळून जो जैविक विकासक्रम असतो तो गृहीत धरूनच इतर गोष्टींचा उलगडा होतो; आणि तिसरं वैशिष्ट्ये म्हणजे प्राणिव्यक्ती, वनस्पतिव्यक्ती, आणि सूक्ष्मजीवव्यक्ती यांचा जीवनव्यापार आनुवंशिकता आणि परिसरप्रभाव या दोन्हींचा शोध घेतल्याखेरीज पुरता उलगडत नाही. अगोदर जो गव्हाच्या आणि कुत्र्याच्या जाती आणि त्यांची परिसर-अनुरूपता आणि मनुष्य-कार्य-अनुकूलता यांचा उल्लेख त्यात या व्यूहातलं तंत्रज्ञान गर्भित आहे. या जैविकीचं एक जाताजाता सांगण्यासाखं उपप्रमेय म्हणजे मनुष्य हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे आणि मनुष्यजाती इतर प्राणिजाती जश्या एकमेकींपासून वेगळ्या असतात तशीच वेगळी आहे. जागतिकीभवनाच्या संथ चालीत या दोन ज्ञानव्यूहांचं काय झालं? आयुर्वेदाविषयी भारताच्या पश्चिमेकडील शेजाऱ्यांनी जेवढी जिज्ञासा दाखवली तेवढी पूर्वेकडील शेजाऱ्यांनी दाखवलेली दिसत नाही. चिनी वैद्यक आयुर्वेदापेक्षा खूपच निराळं आहे तर प्राचीन ग्रीक वैद्यकाचं आयुर्वेदाशी लक्षणीय साम्य आहे. अरबांच्या वैद्यकाचं ह्या दोन्ही शेजाऱ्यांच्या वैद्यकाशी साम्य आहे. आणि दोन्हीकडले ग्रंथही त्यांना अनुवादरूपाने उपलब्ध होते. यूरोपीयांनी आयुर्वेदाला ‘इंडॉलजी’मधून ‘ऑल्टर्नेटिव्ह मेडिसन’ मध्ये ढकलण्याला काही व्यावहारिक कारणंही घडली (जसं, लागत आणि स्वास्थ्यरक्षण यांच्यामध्ये यूरोपीय वैद्यकात पडणारी प्रचंड तफावत). आयुर्वेद आणि चिनी वैद्यक यांच्यामध्ये प्रतिस्पर्धा चालू होण्याची लक्षणं आहेत. जागतिकीकरणाच्या झपाट्यात या सगळ्याच घडामोडींवर व्यापारी छाया पडणार हे उघड आहे. (योगदर्शनही त्यातून सुटलेलं नाही!) डार्विनोत्तर जैविकीचं यूरोपीय विचारदर्शनातलं अंतर्गत आक्रमण लक्षणीय आहे, मानवीय विज्ञानाच्या जवळजवळ सर्व शाखांना ते जाणवलं आहे, कलामीमांसाही त्यातून सुटलेली नाही. ही जैविकी जेव्हा भारतातल्या उच्च शिक्षणात आली तेव्हा वनस्पतिव्यक्तींमध्ये प्राणिसदृश संवेदना शोधण्याची आणि मोजण्याची बुद्धी जगदीशचंद्र बसु या भारतीयाला झाली आणि तो त्यात अधिक रमल्यामुळे रेडिओलहरींचा संपर्कासाठी उपयोग या शोधाचा व्यावहारिक पाठपुरावा त्याने केला नाही (जो पुढे मार्कोनीने केला). विचारदर्शनाचा मानवी संदर्भ लक्षणीय ठरतो तो असा.
या चारही प्रकरणांत (योगदर्शन, लोकशाही समाजवाद, आयुर्वेद, डार्विनोत्तर जैविकी) ते ते धारणाव्यूह आणि ज्ञानव्यूह जगभरचे होण्यात ज्या ज्या व्यापारी शक्यता आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित व्हावं आणि ज्या ज्या वैचारिक शक्यता आहेत त्या त्या दुर्लक्षित राहाव्या ही मनुष्यजातीला शोभणारी गोष्ट नाही. ही दुरवस्था दूर करायची तर सैद्धान्तिक नयावरून काही तपासणी व्हायला पाहिजे आणि त्या त्या धारणाव्यूहाच्या आणि ज्ञानव्यूहाच्या अध्येत्यांकडून (‘अभ्यासकांकडून’ असं मला म्हणवत नाही!) ही तपासणी आत्मसात् व्हायला पाहिजे. अधिक खोलात जाण्याचं काम तत्त्वज्ञांवर सोपवून अशा तपासणीची काही ठळक फलितं याप्रमाणे नमूद करता येतीलः १) विश्वदर्शनात, विशेषतः विचारदर्शनात, निर्मिति-प्रक्रिया तीन चरणांतून होतेः प्रश्न पडणं, उत्तर सापडणं, सापडलेलं उत्तर पडताळणं. २) प्रश्न, उत्तर, पडताळणी यांचं स्वरूप लक्षात घेता धारणाव्यूह आणि ज्ञानव्यूह, आदर्शक्रम आणि कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे भेद पडतात आणि महत्त्वाचे ठरतात. ३) दोन ज्ञानव्यूह तुल्य असतात, दोन धारणाव्यूह तुल्य असतात, एक ज्ञानव्यूह आणि एक धारणाव्यूह यांची तुलना व्यर्थ नसली तरी फार लाभदायक नसते. तुल्य ज्ञानव्यूह प्रतिपूरक तरी असतात (उदाहरणार्थ, भौतिकी आणि रसायन, समाजविज्ञान आणि संस्कृतिविज्ञान, मनोविज्ञान आणि शिक्षणशास्त्र) किंवा प्रतिस्पर्धक तरी असतात (उदाहरणार्थ, डार्विन-व्यूह आणि लामार्क-व्यूह, लोकशाही समाजवाद आणि लोकशाही स्पर्धावाद). ४) कोणत्याही ज्ञानव्यूहाला किंवा धारणाव्यूहाला एक वैचारिक संदर्भ-चौकट असते. त्यांची तुलना करताना ही संदर्भ-चौकट लक्षात घ्यावी लागते. योगदर्शनाची संदर्भ-चौकट सांख्यदर्शनात मिळते असे त्या धारणाव्यूहांत नातं आहे. ५)प्रतिपूरकता वेगवेगळ्या प्रकारची असते. एका व्यूहातली उत्तरं गृहीत धरून दुसऱ्यातले प्रश्न विचारलेले असतात (उदाहरणार्थ, आदर्शक्रम-कार्यक्रम, विज्ञान-तंत्रज्ञान). दोन व्यूहांतले प्रश्न वेगळे असतात, पण त्यांना एक समान संदर्भ-चौकट असते. (उदाहरणार्थ, भौतिकी, रसायन, रसायन-भौतिकीची चौकट ; प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान, जैविकीची चौकट). ६) प्रतिस्पर्धक व्यूहांचा विचार करताना तीन वेगवेगळ्या भूमिका घेता येतातः अत्याग्रही भूमिका (याला काही जण सत्याग्रही भूमिकाही म्हणतील), अनाग्रही भूमिका (जैनांची अनेकान्त-नय-स्यात् ही साखळी आठवावी), मिताग्रही भूमिका (ही स्वीकारायला सोपी असते पण निभावायला अवघड असते). ७) एक ज्ञानव्यूह आणि एक धारणाव्यूह यांची तुलना सार्थ आणि लाभदायक ठरली तर त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारची प्रतिपूरकता असू शकते.
दुर्दैवाने आज अशा परिपक्व भूमिकेतून वैचारिक तुलना होण्यासाठी एक तर तत्त्वज्ञांची मदत घ्यायला विशेषज्ञांची तयारी असत नाही आणि दुसरं म्हणजे अशी मदत करण्याइतकी तत्त्वज्ञांची तयारी असत नाही. ‘तयारी’ या शब्दामध्ये पूर्वज्ञान आणि अशी मदत कशी उपयुक्त होईल याबद्दल पूर्वधारणा समाविष्ट. (विशेषज्ञ आणि तत्त्वज्ञ हे दोन्ही पक्ष उद्धटपणा, कचखाऊपणा, आळशीपणा यांसारख्या अवांतर दुर्गुणांपासून मुक्त आहेत असं गृहीत धरणं आवश्यक आहे, पण पुष्कळदा असं गृहीत धरवत नाही.)
आतापर्यंतच्या चर्चेतून मुख्य मुद्दा स्पष्ट होईल की भारतीयांना स्वतःला वाचवायचं आहे ते जागतिकीकरणापासून वाचवायचं नाही, तर जागतिकीकरणाचा मानवी चेहरा हरवून जाण्यापासून, जागतिकीकरणाच्या मिषाने आपलं आर्थिक-राजकीय-वैचारिक साम्राज्य प्रस्थापित करू पाहणाऱ्या सत्तांपासून भारताला वाचवायचं आहे. जागतिकीकरणात आपण घेवाण करणार आहोत तशी देवाणही करणार आहोत. केवळ घेवाणच आपल्याकडून होत राहिली तर ते जागतिकीकरण ठरणार नाही, तर पाश्चात्त्यीकरण, किंबहुना अमेरिकीकरणच ठरेल, ‘जागतिकीकरण’ हे केवळ त्याला दिलेलं गोंडस नावच ठरेल. जागतिकीकरण खरोखरीच गोंडस व्हायचं असेल तर त्यात विविधतेला वाव मिळायला हवा. हळदीच्या पेटंटपासून सुरू झालेला झगडा चालूच ठेवावा लागणार आहे. मुक्त व्यापार म्हणायचं पण तो फक्त विकसित देशांना मुक्त बाजारपेठ मिळावी पण अविकसित वा विकसनशील देशांना ती मिळू द्यायची नाही अशा पक्षपाती धोरणाची योजना आखायची. पण भारताला अशा प्रकारे झगडायचं आहे ते नव्याने स्वदेशीचं व्रत अंगीकारून नव्हे, तर आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक स्वराज्य टिकवून धरून. सध्या आपल्याला विचारदर्शनाच्या स्वराज्याचा म्हणजे बौद्धिक स्वराज्याचा आणि त्यासाठी करायच्या काही सकारात्मक तरतुदींचा विचार करायचा आहे.
१) विकसित देशातून इंडॉलजीसारख्या ओरिएंटल स्टडीजचं रूपांतर कालदृष्ट्या अधिक आजतागायतपणा आणणाऱ्या साउथ एशिया स्टडीज, ईस्ट एशिया स्टडीज, आफ्रिका स्टडीजसारख्या सुविधांमध्ये करण्यात येत आहे. भारतीयांनी यूरोपीय स्टडीज, ईस्ट एशिया स्टडीज, आफ्रिकन स्टडीजसारख्या सुविधा उत्पन्न करायला पाहिजे आणि त्या चरायला नवी कुरणं म्हणून नव्हे तर दर्जेदार ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार सुलभ करण्यासाठी. आणि ते कार्य भारतीय नयातून करण्यासाठी. यासाठी उत्तम ग्रंथालयं, अनुवादगृहं, श्रव्यदृश्य-साधन-गृहं यांची जोड तर हवीच. जोझेफ नीडहमच्या ‘सायन्स अँड सिव्हिलिझेशन इन चायना’सारखे संदर्भग्रंथ निर्माण व्हायला पाहिजेत. भारतीयांनी तटस्थ भूमिकेतून यूरोपीयन स्टडीज मनावर घेतल्या तर यूरोपीय देशांना दचकायला होईल यात मात्र शंका नाही.
२) पण मग ‘सायन्स, टेक्नॉलजी, अँड बिलीफ-सिस्टिम्स इन साउथ एशिया’ या सुविधेचं काय? आणि त्याच्या जोडीला ‘सोर्सबुक अँड सिलेक्शन’चे काय ? भारतीय महासंस्कृतीचा विचार करताना भारतातील अर्धविकसित आणि अविकसित पोटसंस्कृतींच्यामधल्या विचारधनांचा विसर पडायला नको. जॉन हॉफमनच्या ‘इनसायक्लोपीडिया मुंडारिका’ या झारखंडमधल्या आदिवासींबद्दलच्या ग्रंथासारखे इतर ग्रंथ निघायला पाहिजेत.
३) या सर्व प्रयत्नांना पूरक म्हणून एक ‘सेंटर फॉर इंटर-कल्चरल स्टडीज’ निघायला पाहिजे. अरुण कोलटकरने व्यक्तिगत संस्कृतीचा एक भाग म्हणून असं आलोडन केलं त्यातून ‘भिजकी वही’ सारखा अमोल काव्यग्रंथ बाहेर पडला. (त्याचा अमोल व्यक्तिगत ग्रंथसंग्रह भांडारकर प्राच्यविद्यामंदिराकडे सुपुर्द करण्यात आला आहे.) त्याच्या जोडीला ‘सेंटर फॉर इंटर-रिलिजस स्टडीज’ निघू शकतं. ‘सेंटर फॉर कंपॅरिटिव्ह मेडिसिनल सिस्टिम्ज’ ही तर एक काळाची गरज आहे.
४) अशा प्रकारच्या सुविधा देशभर विखुरल्या गेल्या पाहिजेत. दिल्ली-स्थित चराऊ कुरणांचं स्वरूप त्यांना येता कामा नये हे तर खरंच, अशा क्षेत्रात काम करणारी तरुण भारतीय मंडळी घाऊकपणे परदेश-जमा होऊ नयेत हेही खरं. पण मुख्य म्हणजे या सर्व प्रयत्नांचा झिरपा होऊन भारतीय समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञान ही केवळ आर्थिक हत्यारं आणि आदर्शक्रम कार्यक्रम प्रस्तावित करणारे धारणाव्यूह ही केवळ राजकीय हत्यारं ठरू नयेत. ही सगळी हत्यारं म्हणून वापरता येणार, ते टाळता येणार नाही. सत्ताधीश किंवा जेते मंडळी सत्ताधीन किंवा जितांच्या गळी आपला ज्ञानव्यूह आणि धारणाव्यूह स्वहितार्थ उतरवू पाहणार हे ग्राम्शीचं निरीक्षण मार्मिक आहे यात शंका नाही.) भारतीय समाजाचं प्रबोधन जसं अंधश्रद्धानिर्मूलनाच्या मार्गे होऊ शकेल; नववधूला जाळणं, आपल्या मनाविरुद्ध लग्न करू पाहणाऱ्या मुलींना ऑनर किलिंगच्या नावाने ठार मारणं, दलितांची वा आदिवासींची हत्या करणं यांसारख्या अंधधारणामूलक कार्यक्रमाच्या निर्मूलनाच्या मार्गेही होऊ शकेलच. पण अधिक सकारात्मक रीतीने विज्ञान तंत्रज्ञान हा हत्यारबाजीचा किंवा जादूटोण्याचा प्रांत न ठरता आपल्या व्यक्तिगत संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा व्हायला पाहिजे. अरबी समुद्रावरचे वारे मोसमानुसार नैर्ऋत्येकडून वा ईशान्येकडून वाहतात हा शोध एका ग्रीक खलाशाला इ.स. पहिल्या शतकात लागतो काय, अरब व्यापारी आणि नंतर पोर्तुगीज इत्यादी यूरोपीय दर्यावर्दी या शोधाचा फायदा घेतात काय, वॉकर नावाचा इंग्रज या मोसमी वाऱ्याचा छडा लावण्यासाठी पॅसिफिक आणि हिंदी महासागर विंचरून काढून एक उपपत्ती सुचवतो काय सगळंच अद्भुत ! पण या सगळ्यांहून अद्भुत म्हणजे भारतीयांची या विषयाबद्दलची बौद्धिक अनास्था शतकानुशतकं चालू राहते ही. (नाही म्हणायला भारतीय कवींनी या विषयाची अप्रतिम कल्पनादर्शनं घेतली आहेत तमिळ संघम् कविता, कालिदासाचं ‘मेघदूत’ इत्यादी उदाहरणं पाहावीत.) भारतीयांचं वैज्ञानिक कुतूहल निद्रिस्त होऊन शतकं लोटली आहेत. त्यासाठी आपल्याला भूपाळी आळवायला पाहिजे. खेरीज त्यांना आक्रमक जागतिकीकरणाचा चटका बसायला पाहिजे.
तर असा हा चार-कलमी कार्यक्रम विचारदर्शनाचं मानवी चेहरा न हरवलेलं जोरदार जागतिकीकरण स्थिरपद करण्याचा.
समारोप
वाचक मित्रहो, हा धावतपळत गिळायचा लेख नसून विचार करून क्रमशः रवंथ करून पचवायचा लेख आहे हे एव्हाना आपल्या लक्षात यावं. असं होण्याचं कारण आता माझ्या लक्षात येतंय. ज्ञानव्यूह, धारणाव्यूह आणि जागतिकीकरण यांचे परस्परसंबंध खोलवर जाऊन शोधण्याच्या मूळ नादात मी दोन मोठ्या कामांना हात घातला आणि त्यांची प्रारंभिक रूपरेखा काढण्याचा प्रयत्न केला: समग्र मानवी जीवनपद्धतीचा वेध घेण्याचा प्रयत्न आणि भारतीय आणि यूरोपीय महासंस्कृतींच्या नियतीचा तौलनिक वेध घेण्याचा प्रयत्न. या तीनही प्रयत्नांच्या संबंधात मला वाचकांकडून प्रतिपोषण (फीडबॅक) मिळण्याची नितांत गरज आहे. ‘जागतिकीकरण मुर्दाबाद!’ अशा घोषणा देत राहणं म्हणजे अनेकदा साप समजून भुई थोपटण्याचा प्रकार होऊ शकतो, स्वदेशीची प्रतिज्ञा करण्यापेक्षा बौद्धिक स्वराज्याची प्रतिज्ञा करणं अधिक अवघड, कमी रोमांचकारी. “आपल्या घराच्या चहूबाजूंनी भिंती उभाराव्या, आणि खिडक्या पक्क्या बंद कराव्या, असे मला वाटत नाही. सगळ्या देशांच्या संस्कृती आपल्या घरामध्ये अगदी मोकळेपणाने खेळवाव्या असं मला वाटतं. मात्र माझे पाय माझ्या भूमीवर रोवलेले राहतील. इतर लोकांनी बांधलेल्या घरांमध्ये आगंतुक चोरट्यागत, भिकारी किंवा गुलाम असल्यागत राहायचं, याला माझा ठाम नकार आहे.”
आठवतात का हे यंग इंडिया च्या १ जून १९२१ च्या अंकातले हे शब्द ?
इतिकथन
फेब्रुअरी २००१ मध्ये भोपाळला इंटरोगेटिंग नॉलेज ग्लोबलायझेशन (ज्ञानाच्या जागतिकीकरणाची उलटतपासणी) नावाचा निबंध मी एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात वाचला. तो संस्कारित रूपात इंडियन फिलसॉफिकल क्वार्टी (एप्रिल-जूलाय जोडअंक २००२) मध्ये प्रकाशित झाला. तो प्रा. ग.प्र. प्रधानांनी वाचला आणि ह्यातला महत्त्वाचा विचार मराठीत उपलब्ध व्हावा अशी इच्छा प्रकट केली. तिचं हे फलित. मात्र प्रस्तुत लेख इंग्रजी लेखाचा अनुवाद नसून आमूलाग्र पुनर्लेखन आहे हे लक्षात घ्यावं. मुळातला बराच भाग त्यात जसा गाळला आहे तसा बराच भाग पूर्णपणे नवा आहे. मराठीत संक्षेपाने मांडलेल्या काही मुद्दयांचा विस्तार इंग्रजी लेखात मिळू शकेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.