उपयोगितावाद (१): जॉन स्टुअर्ट मिल्

[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]

प्रकरण १: सामान्य आलोचने
मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत सूचक गोष्ट म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्या निकषासंबंधीच्या वादाचा निर्णय करण्याच्या बाबतीत झालेली अत्यल्प प्रगती ही होय. जीवनाचे सर्वोच्च साध्य कोणते, किंवा नीतीचे मूलाधार काय आहेत हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीपासून तात्त्विक विचारांतील प्रमुख प्रश्न मानला गेला असून त्याला उत्तर देण्यात अतिशय बुद्धिमान लोक गढून गेले आहेत; एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्यात अनेक तट पडले असून त्यांचा परस्परांशी तीव्र संघर्ष चालू आहे. दोन हजार वर्षांनंतरही तेच वाद चालू आहेत, तत्त्वज्ञ अजून त्याच विरोधी निशाणांखाली व्यूहबद्ध आहेत, आणि विचारवंत तसेच सामान्य मानव ऐकमत्यापासून अतिशय दूर आहेत. जेव्हा तरुण सॉक्रेटिसाने वृद्ध प्रोटॅगोरसशी चर्चा केली आणि (प्लेटोने लिहिलेला संवाद जर सत्य स्थितीवर आधारलेला असेल तर) त्यातून व्यावसायिक तत्त्वाध्यापकाच्या (Sophist) लौकिक लोकसंमत नीतिविरुद्ध उपयोगितावादाचा पुरस्कार केला, तेव्हा जेवढी मतभिन्नता होती तेवढीच आजही आहे.

आता हे खरे आहे की तेवढाच विचारांचा गोंधळ आणि संदेहास्पदता, आद्य तत्त्वांबाबत तेवढाच विसंवाद, तेवढी अनिश्चितता सर्वच शास्त्रांत आढळते, आणि सर्वांत निश्चित मानल्या गेलेल्या गणितशास्त्राचाही त्याला अपवाद नाही. परंतु त्यामुळे त्या शास्त्रांच्या निष्कर्षांची विश्वसनीयता फारशी, खरे म्हणजे सामान्यपणे मुळीही, कमी होत नाही. हे सकृद्दर्शनी विपरीत दिसते, पण त्याचे स्पष्टीकरण हे आहे की कोणत्याही शास्त्राचे सिद्धान्त त्याच्या तथाकथित आद्य तत्त्वांपासून निष्पादिले जात नाहीत, किंवा त्यावर ते आपल्या पुराव्याकरिता अवलंबून असत नाहीत. असे नसते तर बीजगणित हे अतिशय अस्थिरपद असे शास्त्र झाले असते, आणि त्याचे निष्कर्ष हे सर्वथा अपुऱ्या सामग्रीवर आधारलेले आहेत असे म्हणावे लागले असते. परंतु बीजगणिताची निश्चितता विद्यार्थ्यांना त्याची मूलतत्त्वे म्हणून जी शिकविली जातात त्यापासून त्याला प्राप्त होत नाही, कारण बीजगणिताच्या नामवंत शिक्षकांनी नमूद केलेली मूलतत्त्वे जितका इंग्लिश कायदा कल्पितांनी भरलेला आहे, किंवा देवविद्या गूढांनी भरलेली असते, तितकेच कल्पितांनी भरलेले आहेत. कोणत्याही शास्त्रांत आदिसिद्धान्त म्हणून जी अंती स्वीकारली जातात ती सत्ये त्या शास्त्राच्या मूल कल्पनांच्या अतिभौतिकीय विश्लेषणातून प्राप्त झालेले परिणाम असतात, आणि त्यांचा त्या शास्त्राशी असलेला संबंध पाया आणि त्यावर उभी असणारी इमारत यांचा नसून, मुळे आणि वृक्ष यांचा असतो. ती मुळे खणून उघड न केली तरीही आपले काम समर्थपणे करीतच असतात. परंतु जरी शास्त्रांत सामान्य उपपत्तीच्या आधी विशिष्ट सत्ये हस्तगत व्हावी लागतात, तरी नीती, कायदा यांच्यासारख्या व्यावहारिक विद्यांत याच्या उलट प्रकार आढळावा अशी आपली अपेक्षा असणार. कोणतेही कर्म कोणत्यातरी साध्याकरिता घडते आणि म्हणून कर्मांचे विधी ज्या साध्यांची साधने असतात, त्यांनी त्या विधीचे स्वरूप निश्चित व्हावे अशी कल्पना करणे स्वाभाविक होईल. जेव्हा आपण एखाद्या उद्योगास लागतो तेव्हा आपल्याला काय हवे याची स्पष्ट आणि नेमकी कल्पना आपल्याला प्रथम असणे आवश्यक असते, उद्योगाच्या अंती स्पष्ट होणार असलेली कल्पना नव्हे. युक्त आणि अयुक्त यांचा निकष युक्त आणि अयुक्त काय आहे हे ठरविण्याचे साधन असणार, ते ठरविल्यानंतर प्राप्त होणारा परिणाम नव्हे.

युक्त काय आहे आणि अयुक्त काय आहे ह्याचे ज्ञान देणारी एक नैसर्गिक शक्ती, एक सहजप्रवृत्ति आहे ही लोकसंमत उपपत्ती स्वीकारूनही या अडचणीचा परिहार होत नाही. कारण अशा प्रकारचे नैसर्गिक नैतिक इंद्रिय आहे की नाही हीच मुळी एक विवाद्य गोष्ट आहे. हे सोडून दिले तरी त्याच्या पुरस्कर्त्यांपैकी ज्यांना तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अधिकार सांगता येईल त्यांना ज्याप्रमाणे आपली इंद्रिये उपस्थित असलेल्या दृश्य किंवा श्राव्य विषयांचे ग्रहण करतात त्याप्रमाणे आपल्या समोर उपस्थित असलेल्या प्रकरणांतील युक्त आणि अयुक्त यांचा प्रत्यक्ष निर्णय ते करू शकते ह्या कल्पनेचा त्याग करावा लागला आहे. आपल्या नैतिक शक्तीविषयी बोलण्याचा ज्यांचा अधिकार मान्य केला जातो त्यांच्या मतानुसार ती शक्ती नैतिक अवधारणांची सामान्य प्रतत्त्वेच फक्त आपल्याला पुरविते; ती आपल्या प्रज्ञेचे एक अंग आहे, विषयग्रहणक्षम शक्तीचे नव्हे, आणि तिच्याकडून नीतीच्या सामान्य तत्त्वांची अपेक्षा करावी, प्रत्यक्ष उपस्थित परिस्थितीच्या ज्ञानाची नव्हे असे ते प्रतिपादतात. नीतिशास्त्राच्या उद्गामी संप्रदायाइतकाच त्याचा साक्षात्कारवादी संप्रदायही सामान्य नियमांवर भर देतो : त्या दोहोंचेही मत असे आहे की एखाद्या कर्माचे युक्तायुक्तत्व ही साक्षात् दर्शनाने कळणारी गोष्ट नव्हे; तर ती सामान्य नियमाचा वापर एखाद्या विशिष्ट प्रकरणी करण्याने कळणारी आहे. ते दोघेही मोठ्या प्रमाणात समान नैतिक नियम मानतात; त्यांचा मतभेद असतो फक्त त्यांच्या पुराव्याविषयी, आणि त्यांना असलेल्या अधिकाराच्या उगमस्थानाविषयी. एका मतानुसार नीतीची तत्त्वे ही पूर्वतः आणि स्वयंसिद्ध आहेत; त्यांतील शब्दांचा अर्थ कळावा यापलीकडे ती मान्य होण्याकरिता आणखी काही लागत नाही, तर दुसऱ्या मतानुसार सत्य आणि असत्य, तसेच युक्त आणि अयुक्त हे निरीक्षण आणि अनुभव यांचे विषय होत. परंतु नीति ही नियमांपासून निष्पादिली पाहिजे, असेच दोघांचेही मत आहे, आणि नीतीचे शास्त्र आहे असा उद्गामी संप्रदायाइतकाच साक्षात्कार संप्रदायाचाही आग्रह आहे. मात्र शास्त्राच्या ज्या मूलप्रतिज्ञा होऊ शकतील, अशा पूर्वतः तत्त्वांची यादी ते क्वचितच देतात, आणि त्या तत्त्वांचे विलोपन समान कर्तव्याधार असलेल्या एकाच आद्य तत्त्वात तर त्याहूनही क्वचित् करतात. ते एकतर नीतीचे लौकिक दंडक पूर्वतः म्हणून गृहीत धरतात, किंवा त्या दंडकांचा समान मूलाधार म्हणून असा एखादा सामान्य नियम सांगतात की ज्याचा अधिकार त्या दंडकाहून उघडच कमी असतो, आणि त्याला लोकांत स्वीकृति कधीच लाभलेली नसते. परंतु त्यांचा दावा समर्थनीय होण्याकरिता एकतर एकच मूलभूत तत्त्व किंवा नियम असावा लागेल, किंवा जर अनेक तत्त्वे असतील, तर त्यांच्यामध्ये पौर्वापर्याचा निश्चित क्रम असावा लागेल; आणि ते एकमेव आधारभूत प्रतत्त्व, किंवा अनेक प्रतत्त्वांचे तारतम्य ठरविणारा नियम हे स्वयंसिद्ध असावे लागतील.

ह्या न्यूनाचे दुष्परिणाम प्रत्यक्ष व्यवहारात कितपत कमी करता आले, किंवा मानव-समाजाच्या नैतिक समजुती एखाद्या अंतिम प्रमाणाच्या सुस्पष्ट स्वीकाराच्या अभावी कितपत दूषित किंवा अस्थिर झाल्या आहेत ह्याचा शोध करायचा तर भूत आणि वर्तमानकालीन नैतिक विचाराचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल आणि त्याचे परीक्षण करावे लागेल. परंतु नैतिक समजुतींना जे काही स्थैर्य किंवा जी सुसंगतता लाभली असेल ती स्पष्टपणे अध्याहृत न स्वीकारलेल्या एका प्रमाणाच्या व्यंजित प्रभावाने लाभली आहे हे दाखविणे सोपे आहे. जरी स्वीकृत आद्य तत्त्वाच्या अभावी नीतिविचार हा मार्गदर्शक न होता मनुष्यांच्या प्रत्यक्ष भावनांचे प्रतिष्ठापन ठरला आहे, तरी परिस्थितीचा आपल्या सुखावर काय परिणाम होतो याविषयीच्या मनुष्यांच्या समजुतीमुळे ज्या अर्थी मनुष्याच्या अनुकूल किंवा प्रतिकूल भावनांवर मोठा प्रभाव पडतो त्यामुळे उपयोगितेचे तत्त्व, किंवा ज्याला बेंटनने अलिकडे महत्तम संतोषाचे तत्त्व असे नाव दिले त्याचा अधिकार जे तिरस्कारपूर्वक नाकारतात त्यांच्याही नैतिक तत्त्वांच्या विकासात मोठा वाटा आहे. तसेच कर्माचा संतोषावर होणारा प्रभाव हा नीतीच्या अनेक तपशिलांत एक महत्त्वाचा, नव्हे प्रधान विचार आहे ही गोष्ट अमान्य करणारा एकही विचारसंप्रदाय नाही, जरी ते नीतीचे मूलभूत तत्त्व असून नैतिक कर्तव्यांचे उगमस्थान आहे ही गोष्ट मान्य करण्यास ते कितीही नाखूष असले तरीही नाही. मी याच्याही पुढे जाऊन असे म्हणेन की ज्यांना युक्तिवादांचा उपयोग अवश्य आहे हे मान्य आहे अशा कोणाही पूर्वतः नीतिमीमांसकाचे उपयोगितावादी युक्तिवादांवाचून चालणार नाही. त्या विचारवंतांवर टीका करणे हा माझा वर्तमान हेतू नाही; परंतु उदाहरणादाखल त्यांच्यापैकी सर्वांत विख्यात असलेल्या कांटच्या नीतीची अतिभौतिकी नामक ग्रंथाचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. ज्याची विचारधारा तत्त्वज्ञानात्मक विचारांतील एक प्रधान पराक्रम गणली जाईल, त्या ह्या लोकोत्तर पुरुषाने नैतिक कर्तव्यांचा आधार आणि उगमस्थान म्हणून पुढील सार्विक आणि प्रथम तत्त्व म्हणून घालून दिले आहे : ‘असे कर्म करा की तुमच्या कर्माचा नियम यच्चयावत् विवेकी जीवांना निरपवाद नियम म्हणून स्वीकारता येईल.’ पण तो जेव्हा या नियमांपासून नीतीच्या साक्षात् दंडकांचे निष्पादन करू लागला तेव्हा अतिशय अनैतिक आचारनियमांचा सार्विक स्वीकार केल्यानेही एखादा व्याघात, एखादी तार्किकीय अशक्यता उद्भवेल हे दाखविण्यात त्याला विलक्षण अपयश आले. तो फक्त एवढेच दाखवू शकला की त्या नियमांचा सार्विक स्वीकार करण्याची इच्छा कोणीही करणार नाही.

आज मी, इतर उपपत्तींचा अधिक विचार न करता, उपयोगितावादी किंवा संतोषवादी उपपत्तीचे आकलन आणि गुणग्रहण ह्यांना साह्यभूत होण्याचा, आणि त्याची ज्या प्रकारची सिद्धी शक्य आहे ती देण्याचा प्रयत्न करणार आहे. ती सिद्धी या शब्दाच्या सामान्य आणि लौकिक अर्थी सिद्धी असू शकत नाही ही गोष्ट उघड आहे. अंतिम साध्यविषयक गोष्टींची सरळ सिद्धी शक्य नसते; जे जे साधु म्हणून सिद्ध केले जाऊ शकते ते जे सिद्धीविना साधु मानले जाते त्याचे साधन आहे हे दाखवूनच. वैद्यककला आरोग्यावह आहे हे दाखविल्याने ती साधु (चांगली) आहे हे सिद्ध होते; पण आरोग्य साधु आहे हे कसे सिद्ध करणार ? संगीतकला साधु आहे कारण तिच्याने (अन्य गोष्टींबरोबर) सुख निर्माण होते; परंतु सुख साधु आहे याची कोणती सिद्धी शक्य आहे ? म्हणून जर कोणी म्हणाले की सर्व स्वयमेव साधु गोष्टींचा समावेश असलेले एक व्यापक सूत्र आहे, आणि त्याखेरीज अन्य काहीही साध्य म्हणून नसून ते साधन म्हणून साधु आहे, तर ते सूत्र आपण स्वीकारू किंवा नाकारू शकतो, परंतु ते ज्याचा आपण सामान्यपणे सिद्धी म्हणतो त्याचा विषय नव्हे. तरीही त्याचा स्वीकार किंवा त्याग अंध आवेग स्वैर निवडीचा विषय आहे असा निष्कर्ष आपल्याला काढता येणार नाही. ‘सिद्धी’ या शब्दाला एक व्यापक अर्थ आहे आणि त्या अर्थी ह्या प्रश्नाचा विचार तत्त्वज्ञानातील कोणत्याही विवाद्य प्रश्नाप्रमाणे शक्य आहे. हा विषय विवेकशक्तीच्या प्रांतात येणारा आहे, आणि ती शक्ती फक्त साक्षात्कारात्मक व्यापार करणारी आहे असेही नाही. बुद्धी ज्यामुळे आपली मान्यता त्या मताला देईल किंवा देणार नाही असे विचार किंवा युक्तिवाद सादर करणे शक्य आहे ; आणि तसे करणे म्हणजे सिद्धी देणेच होय.

हे युक्तिवाद कोणत्या प्रकारचे आहेत, ते प्रकृत विषयाला कितपत लागू आहेत, आणि उपयोगितावादी सूत्राचा स्वीकार किंवा त्याग करण्यास कोणते सयुक्तिक आधार देणे शक्य आहे, इत्यादींचा विचार आपण लवकरच करू. परंतु त्या सूत्राचा स्वीकार किंवा त्याग सयुक्तिक होण्याकरिता त्या सूत्राचे सम्यक् आकलन होणे ही प्राथमिक अट आहे. माझी अशी समजूत आहे की त्या सूत्राच्या अर्थाची सामान्यपणे गृहीत धरली जाणारी अतिशय अपुरी कल्पना त्याच्या स्वीकाराच्या मार्गातील प्रधान अडचण आहे, आणि त्या गैरसमजुतींपैकी अतिशय ढोबळ असलेल्या समजुती जरी दूर झाल्या, तरी आपली समस्या बरीच सोपी होईल. आणि तिच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होतील. म्हणून उपयोगितावादी निकषाला मान्यता प्राप्त होण्याकरिता अवश्य असलेले तात्त्वज्ञानिक आधारांचे निरूपण करण्याआधी त्या सिद्धान्ताचे स्वरूप काय आहे आणि काय नाही हे दाखविण्याकरिता मी त्याची काही उदाहरणे सादर करीन, आणि त्याच्या चुकीच्या विवरणातून उद्भवणाऱ्या किंवा त्याशी संबद्ध असणाऱ्या आक्षेपांचे निरसन करीन. याप्रमाणे भूमी तयार झाल्यावर मग त्या प्रश्नावर तात्त्वज्ञानिक उपपत्ती म्हणून प्रकाश टाकण्याचा यथाशक्ति प्रयत्न करीन.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.