भारतात व बाहेरही हिंदूंची लग्ने मुख्यतः त्यांच्याच जातींमध्ये होतात. एखाददुसरे लग्न विजातीय झाले तरी त्यात अस्पृश्याचा समावेश क्वचितच असतो. अशा बेटी-व्यवहारामुळे जातिसंस्था व अस्पृश्यता जिवन्त आहे. असे विवाह सामाजिक समतेस पोषक नाहीत. भारतीय संविधानाने सामाजिक समतेचा पुरस्कार केला व अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली, त्यामुळे पूर्वी मोगलाईत, पेशवाईत व नंतर इंग्रजी राजवटीत स्पृश्य हिंदूना जे अस्पृश्य फुकट गुलाम म्हणून मिळत होते ते मिळण्याचे थांबले व जन्मानेच ब्राह्मण, क्षत्रियांना मिळालेला उच्च जातीचा मान व सामाजिक प्रतिष्ठा यांना धक्का बसला. हा तोटा भरून काढण्याकरिता देशाची राज्यघटनाच बदलवून चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था व मुख्यतः अस्पृश्यता परत कायद्याने आणण्याची हुक्की वरिष्ठ वर्गाच्या काही थोड्या लोकांना येते. हे स्वप्न जोपर्यंत साकार होत नाही तोपर्यंत आपली जात व गट वेगळा ठेवण्याची ते खबरदारी घेतात व त्या कामात आपले सारे बुद्धिसामर्थ्य खर्च करतात. आजचा सुधारक च्या ऑगस्ट २००५ च्या अंकातला श्रीयुत नी.र.व-हाडपांडे यांचा लेख याचेच उदाहरण आहे.
ते विचारतातः
“रोटीबेटी व्यवहार यासाठी काही गट वेगळे मानण्याने असे कोणते नुकसान होते? जातिभेदामुळे युद्धात पराभव झाले असे विनोबासारख्यांनी विधान केले आहे. हा आरोप क्षणभरही टिकणार नाही.” श्रीयुत व-हाडपांडेंनी भारताचा इतिहास वाचला नसेल किंवा ते मुद्दामच अशी धादांत चूक विधाने करीत आहेत. चिरतरुण जातिव्यवस्था व भारताची गुलामगिरी : शिकलेसवरले लोकच स्वजातीय विवाह करून हिंदूची जातिव्यवस्था कशी जिवंत ठेवतात याबद्दल व्ही.टी.राजशेखर, (संपादक दलित व्हॉईस) लिहितातः “इंग्रजी शिकलेल्या अशा लोकांना फक्त एकच प्रश्न विचाराः “तुमचे लग्न जातीतच झाले ना?” उत्तर ‘होय’ असेल व त्याला पुष्टी म्हणून, “आयुष्यात फक्त एकदाच मी लग्नाच्या वेळी जात पाळली होती’, असे गर्वाने ते सांगतील. परंतु ही एकच गोष्ट जातिव्यवस्थेला जिवंत ठेवत आहे, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल. ….. उच्चभ्रू वर्ग नेहमी वाचत असलेल्या वृत्तपत्रातील रकानेच्या रकाने भरलेल्या विवाहविषयक जाहिरातींची पाने चाळल्यास अमेरिकेत शिक्षण घेतलेले डॉक्टर्स, एम.बी.ए., संगणकतज्ज्ञ इत्यादी सर्वांना आपापल्या जातीतीलच बायको हवी असते हे लक्षात येईल. पण हाच वर्ग सार्वजनिक ठिकाणी जातिव्यवस्थेविरुद्ध आरडाओरड करत असतो पण खाजगीत मात्र जातीची सर्व बंधने पाळत असतो. भारतीय दांभिकतेचे एक जिवंत मासलेवाईक असे हे उदाहरण आहे.” (आसु डिसेंबर २००४ च्या मुखपृष्ठावरून)
जातिभेदामुळे भारत शेकडो वर्षे कसा पारतंत्र्यात पडला हे कितीतरी इतिहासकारांनी सांगितले आहे. नागपूरचे इतिहासतज्ज्ञ मा.म. देशमुख आपल्या प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथात म्हणतात, “जात, धर्म वगैरे भेदांमुळेच भारत अनेकदा परकीयांच्या पंजात सापडला आहे.” परकीय मुसलमानांपासून तो इंग्रजांपर्यंत, साऱ्यांनी, भारत काबीज केला तो अस्पृश्यांच्याच मदतीने. ब्रिटिशांच्या भारत काबीज करण्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या ऑक्टोबर १९५१ च्या लुधियाना येथील भाषणात (अ. इरलरीरहशल आलशवज्ञरी थीळींळपस । डशिशलहशी, तेश्र.१८, झी ३, .ि२५६) म्हणाले होते : “भारतापासून (इंग्रज) शेकडो मैल दूर राहत असले तरी भारतात त्यांचे राज्य स्थापण्यात ते यशस्वी झाले. भारतात त्यांचे स्वतःचे सैन्य नव्हते. तरी ते भारतातील सर्व राजामहाराजांना जिंकण्यास कसे समर्थ ठरले ? ज्यांना त्यांचेच देशवासी लोक अस्पृश्य म्हणून संबोधीत होते अशा लोकांच्या मदतीनेच ब्रिटिश लोक भारताचे राज्यकर्ते बनले. हे अस्पृश्य निरक्षर होते आणि सवर्ण हिंदूंनी त्यांना दिलेली वागणूक मानहानिकारक होती.
“इंग्रजांच्या बाजूने रक्त सांडून पेशवाईचा अंत आम्ही केला आहे. १८१८ साली खडकीच्या निर्णायक लढाईत इंग्रजांना विजय मिळाला तो केवळ महार वीरांच्या साह्यामुळेच होय. याची साक्ष (आजदेखील) कोरेगांवचा विजयस्तंभ देऊ शकेल.” (पेशवाईत महारांना रस्त्यावरून चालताना ‘गळ्यात मडके व कमरेस झाडू’ घालण्यासारखे आदेश न देता समान वागणूक दिली असती तर आज इतिहास वेगळाच झाला असता.) याअगोदर शंभर वर्षे दक्षिणेत अस्पृश्यांना जी क्रूर वागणूक मिळत होती त्याबद्दल डॉ. दिनकर खाबडे, त्यांच्या Dr. Ambedkar and Western Thinkers या पुस्तकात लिहितातः “त्रावणकोर प्रांतात अस्पृश्य (पांचमा) साक्षीदारांस कोर्टाच्या आत येऊच देत नसत. त्यांना कोर्टाबाहेर उभे करीत व त्यांच्यात व कोर्टाच्या वकिलांत बरेच चपराशी रांगेने उभे ठेवीत. हे चपराशी कोर्टाचे प्रश्न अस्पृश्यांपर्यंत पोचवून त्यांची उत्तरे कोर्टामध्ये पाठवीत.”
चातुर्वर्ण्य बळकट करण्यात भगवद्गीते चे कार्य:
हिंदूच्या मनांवर चातुर्वर्ण्यनिर्मित जातिसंस्थेचा ज्या धर्मग्रंथानी प्रभाव पाडला त्यात भगवद्गीते चा समावेश आहे. गीते ने चातुर्वर्णाचे समर्थन कसे केले, याचे विश्लेषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या Revolution and Counter Revolution in Ancient India, (Dr.Babasaheb Ambedkar Writing & Speeches, Vol.3), या पुस्तकात केले आहे. त्याचा आधार देत आपल्या आंबेडकर या पुस्तकात नलिनी पंडित म्हणतात, ‘चातुर्वर्ण्याचे तात्त्विक समर्थन करून प्रत्यक्ष व्यवहारात त्यातील तत्त्वांचे पालन होईल हे निश्चित करण्यासाठी गीते चा जन्म झाला. साहजिकच चातुर्वर्ण्य गुणकर्मावर आधारित आहे एवढे सांगून श्रीकृष्ण थांबले नाहीत. तर समाजाची विशिष्ट घडण कायम राहावी या हेतूने त्यांनी काही निर्बंध घातले. त्यातील पहिला निबंध गीते च्या तिसऱ्या अध्यायातील सव्वीसाव्या श्लोकात सांगितलेला आहे. तिथे श्रीकृष्ण म्हणतात की, कर्मकांडावर विश्वास ठेवणाऱ्या म्हणजेच चातुर्वर्ण्याचे निमूटपणे पालन करणाऱ्या अज्ञजनांचा शहाण्या माणसाने बुद्धिभेद करू नये. याचाच अर्थ हा की चातुर्वर्ण्याविरुद्ध बंड करण्यासाठी त्यांनी लोकांना प्रवृत्त करू नये. किंवा त्याविरुद्ध एखादी चळवळ उभी करू नये. गीते च्या अठराव्या अध्यायातील ४१ ते ४८ या श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी दुसरा नियम घालून दिलेला आहे. प्रत्येकाने वर्णव्यवस्थेप्रमाणे प्राप्त झालेले विहितकार्य पार पाडलेच पाहिजे असे श्रीकृष्णांनी याठिकाणी आग्रहाने सांगितले आहे. भक्त कितीही मोठा असला तरी केवळ भक्तियोगाने त्याला मोक्षप्राप्ती होणार नाही. यासाठी भक्तीलाही विहित कर्माची जोड असली पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर एखादा शूद्र भक्त म्हणून कितीही श्रेष्ठ असला तरी शूद्र म्हणून वरिष्ठ वर्गाच्या सेवेसाठी जगण्याचे, मरण्याचे त्याचे जे कर्तव्य आहे ते त्याने पार पाडले नाही तर त्याला मोक्षप्राप्ती होणार नाही.” भगवद्गीते ने चातुर्वर्ण्याचे असे तात्त्विक समर्थन करून जन्मसिद्ध विषमतेवर आधारलेली जातिव्यवस्था दृढमूल करण्यास मोठा हातभार लावला आहे. भगवद्गीता हा नीतीची शिकवण देणारा ग्रंथ आहे अशी बहुसंख्य हिंदूंची समजूत आहे व म्हणून जातिव्यवस्था चातुर्वर्ण्य हिंदूंना ईश्वरनिर्मित व नीतियुक्त वाटते व ते सोडायला ते तयार नाहीत. इथे अमेरिकेत कोणत्याही हिंदूला विचाराल तर भगवद्गगीता हा बायबलच्या तोडीचाच ग्रंथ आहे असे ते सांगतात. मग जातिव्यवस्था ते कशी सोडणार ? चातुर्वर्णाबाहेर अस्पृश्यांचा पाचवा वर्णः अस्पृश्यांचा पाचवा वर्ण केव्हा व कसा निर्माण झाला याची शहानिशा आंबेडकरांनी १९४७ साली अस्पृश्य कोण होते? हा शोधग्रंथ (The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables, Dr. Babasaheb Ambedkar Writing & Speeches, Vol.7,) लिहून केली ती अशी : अगोदर पशुपालन करीत हिंडणाऱ्या आर्य व इतर जमातींना शेतीचे तंत्र अवगत झाल्यावर त्या एकेका प्रदेशात स्थिर झाल्या. भटक्या जमाती त्यांच्यावर स्वाऱ्या करून लूटमार करीत, अशा लोकांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्थिर झालेल्या शेतकऱ्यांना, जे रक्षण करू शकतील अशा माणसांची गरज होती. दुसरीकडे लढाईत पराभूत झालेल्या भटक्या जमातींची वाताहत होत होती. टोळीतून फुटलेल्या (डीज्ञशप-शिप) या गटांनी शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचे काम पत्करले. हे लोक संरक्षणाच्या कामानिमित्त गावाच्या वेशीबाहेर राहू लागले. यावेळेस गावातले शेतकरी व गावाबाहेरील Broken-men सारेच गोमांस खात होते. फरक एवढाच की गावात राहणारे श्रीमंत लोक जिवंत गाईला मारून तिचे मांस खायचे तर गावाबाहेरील लोक गरिबीमुळे मेलेल्या गाईचे मांस खायचे. गोमांस खाणे त्यावेळेस किती प्रचलित व मान्य होते यावर प्राचीन भारत में गोहत्या एवं गोमांसाहार या (हिंदी) लेखात सुरेंद्रकुमार शर्मा ‘अज्ञात’ हे सरिता मासिकाच्या १९८१ डिसेंबर अंकात प्रकाश टाकतातः
“प्राचीन संस्कृत साहित्य में ऐसे बहुत से प्रमाण विद्यमान हैं जिन से स्पष्ट होता है कि गौ न सिर्फ यज्ञों में बलि के लिए काटी जाती थी, बल्कि विशिष्ट मेहमानों, विद्वानों आदि के स्वागत के लिए भी गोमांस जुटाया जाता था. शायद इसी लिए आधुनिक युग के प्रसिद्ध हिंदू धर्मप्रचारक स्वामी विवेकानंद ने कहा था, “आप को यह जान कर हैरानी होगी कि प्राचीन कर्मकांड के मुताबिक वह अच्छा हिंदू नहीं जो गोमांस नहीं खाता, उसे कुछ निश्चित अवसरों पर बैल की बलि देकर मांस अवश्य खाना चाहिए।” (देखें दि कंप्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद, जिल्द तीन, पृ.५३६)७.
बौद्ध धर्माचा भारतात सर्वत्र प्रसार झाल्यावर यज्ञातील हिंसेविरुद्ध प्रतिक्रिया येऊन, अहिंसेला मान्यता मिळाली. तेव्हा ब्राह्मणांनी प्रतिष्ठा राखण्यासाठी मांसाहाराचा त्याग करून शाकाहार स्वीकारला. बौद्ध भिक्षूपेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याच्या हेतूने त्यांनी गोहत्येवर बंदी घातली. ब्राह्मणांचे अनुकरण करून ब्राह्मणेतरांनीही गाय पवित्र मानून तिचे मांस खाणे सोडून दिले. पण वेशीवर राहणाऱ्या डीज्ञशप-शप लोकांनी मृतमांस खाण्याचे सोडले नाही. बौद्धधर्माप्रमाणे ते गोमांस खाण्यास बौद्धधर्माची अडचण नव्हती. त्यामुळे हे लोक अशुद्ध किंवा अस्पृश्य मानण्यात आले.
पण आजचे अस्पृश्य मानले गेलेले लोक हे काही मूळचे असंस्कृत, जंगली (aboriginals) नव्हते. अस्पृश्य मानल्या गेलेल्या महार जातीचे उदाहरण घ्या. महारांची कुळे व गोत्रे व महाराष्ट्रातील मराठा जातीची कुळे व गोत्रे एकच आहेत. राजपुतांमध्ये असलेल्या कुळांशी महार जातीतील सोमवंशीय या पोटजातीचे कूळ व गोत्र जमते. राजपूत जसे क्षत्रिय आहेत तसेच हेही क्षत्रिय आहेत. दलित राजवंशी (क्षत्रिय) होते याचा दाखला कालच विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष सिंघल यांनी दिला. (दै. सकाळ २९ ऑक्टोबर, २००५) श्री सिंघल म्हणाले, “या देशात दलित कधी अस्पृश्य नव्हते. मुस्लिम राजवटीच्या काळात ते राजवंशी होते. मुस्लिमांविरुद्ध ते लढत होते. संघर्ष करणारे हे लोक त्यावेळेचे स्वातंत्र्यसेनानी होते. धर्मांतरासाठी त्यांना अगतिक केले गेले व त्यांना बहिष्कृत करण्यासाठी त्यांची संपत्ती हडप केली गेली.”
समाजशास्त्रज्ञ घुर्ये म्हणतात, “पश्चिम महाराष्ट्रातील देशस्थ ब्राह्मण, मराठे आणि महार यांची नैसर्गिक देहयष्टी (नाकाचे, डोक्याचे माप वगैरे) सारखीच आहे. यावरून हे आर्य व द्रविड यांच्याहून वेगळ्या वंशाचे नव्हते तर ब्राह्मण, क्षत्रिय व अस्पृश्य यांचा वंश एकच होता! मद्रासचा ब्राह्मण व मद्रासचा अस्पृश्य यांचा वंश एकच : द्रविड, तर पंजाबचा ब्राह्मण व पंजाबचा अस्पृश्य यांचा वंश एकचः आर्य. बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म यांच्या संघर्षातून गोमांसभक्षणावरून एकाच वंशाच्या काही लोकांवर अस्पृश्यता लादली गेली. अस्पृश्यांच्या धर्मान्तराने स्पृश्य-अस्पृश्य सलोखा : हिंदूच्या जाती नष्ट करण्याचा उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह होय, असे मत १९३६ साली पंजाबातील “जातपात तोडक मंडळाच्या” अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरांनी आपल्या लिखित भाषणात दिले होते. ह्या मंडळास ज्या अधिक सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, त्यांत मुख्य म्हणजे वेद, शास्त्र, पुराणे अशा हिंदुधर्माला आज आधारभूत व प्रमाण मानल्या जाणाऱ्या ग्रंथांचे प्रामाण्य कायद्याने नाकारले जावे, आणि या ग्रंथांत कथन केलेल्या सिद्धान्तांचा प्रचार करणे हा दखलपात्र गन्हा समजण्यात यावा. ह्या होत. ह्या सूचना क्रान्तिकारक व हिंदंना मळीच मान्य न होणाऱ्या होत्या. हिंदू आपल्या धर्मग्रंथात बदल करण्यास तयार नाहीत हे पाहन त्यांनी धर्मान्तराची घोषणा केली. धर्मान्तराच्या फायद्यांबद्दल बोलताना, अस्पृश्यांच्या एका सभेत ते म्हणालेः “हिंदुधर्मात राहाल तोपर्यंत त्यांच्याशी तुम्हाला पाण्याकरता, रोटीकरता, बेटीकरता भांडण करावे लागेल व जोपर्यंत हे भांडण चालू राहील तोपर्यंत तुमच्यात व त्यांच्यात बखेडा माजेल. तुम्ही एकमेकांचे वैरी म्हणून राहाल. धर्मांतर केले तर भांडणाचे मूळच नाहीसे होईल. आज मुसलमान व ख्रिस्ती समाजाची व हिंदू समाजाची परस्पर स्थिती काय आहे, हे पाहा. तुमच्याप्रमाणे त्यांच्याशी ते रोटीव्यवहार करत नाहीत, बेटीव्यवहार करत नाहीत. असे असताना त्यांच्यात आणि हिंदूंमध्ये जो सलोखा आहे तो तुमच्यात व हिंदूंत नाही हा फरक आहे. याचे मुख्य कारण हेच की तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाशी सामाजिक व धार्मिक हक्कांकरिता तुम्हाला भांडावे लागेल. परंतु हिंदू धर्मातून बाहेर गेल्याने भांडण्याचे कारणच राहणार नाही…… व मुसलमान, ख्रिस्ती लोकाप्रमाणे बेटी-व्यवहार होत नसला तरी ते तुम्हास असमानतेने वागवणार नाहीत.”
हिंदुधर्म सोडून बौद्धधर्मात गेल्यामुळे आंबेडकरांचा हा उपदेश आता प्रत्यक्षात खरा उतरलेला दिसतो. धर्मान्तराचे सिंहावलोकन केल्यास दिसून येते की धर्मान्तरामुळे बौद्धांना एक नवी अस्मिता प्राप्त झाली, शिक्षणात त्यांनी प्रगती केली. अगोदर हिंदू धर्मात करावी लागणारी घाणेरडी कामे-गुरे ओढणे वगैरे त्यांनी सोडून दिली आणि हिंदूंच्या मंदिरात प्रवेश करण्याकरता पूर्वी भांडण करण्याची जी गरज होती ती आता त्यांना राहिली नाही. ह्या साऱ्या गोष्टींमुळे हिंदू व बौद्ध जनतेत आता भांडणाऐवजी सलोखा निर्माण होत आहे.
आज हिंदूंच्या आंतरजातीय विवाहाला भारतात खेड्यापाड्यांत जेवढा कडवा विरोध आहे तेवढा शहरांत मात्र दिसत नाही. देश शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती करीत आहे व त्यामुळे तरुण मुले-मुली घराबाहेर कामास जात आहेत व ऑफिसात, क्लबमध्ये व इतर कार्यक्रमांत निरनिराळ्या जातींचे लोक एकत्र येत आहेत. व यामुळे काही आंतरजातीय विवाह व्हायला लागले आहेत. पण अशा विवाहांची संख्या वाढून भविष्यात भारताचे सारेच लोक एकाच जात्यात भरडून-अमेरिकेत ज्याला शिश्रींळपसी म्हणतात तसे एकसंध होतील ह्याकरता आंतरजातीय-आंतरधर्मीय रोटी-बेटी व्यवहारास प्रोत्साहन द्यायला पाहिजे.
16802, Shipshaw River Dr., Leander, Texas, U.S.A.