दि. य. एक माणूस

दि.यं.च्याबद्दल काही लिहिणे म्हणजे तो एक शुद्ध औपचारिकपणाचा पाठ ठरेल की काय अशी भीती वाटते. ते मला जमणार नाही आणि दि.यं. ना (नानांना) रुचणार नाही याची जाणीव असूनही त्यांच्याबद्दल लिहिण्याचे हे धारिष्ट्य करीत आहे. काही वर्षांपूर्वी वहिनींनी (नातूबाई) नानांचे सर्व लिखाण संकलित करून प्रसिद्ध करावे व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा एक भाग संकलित करून तो भाग मी संपादित करावा अशी सूचना केली होती. नानांना याचा वास आला आणि त्यांनी तात्काळ आपली नाराजी दर्शविली. प्रसिद्धिविन्मुख अशा नानांना मी केलेले मूल्यमापनाचे कृत्य कितपत रुचेल याची दाट शंका आहे. मला ते एका शब्दानेही बोलणार नाहीत हेही तितकेच खरे! याचा फायदा घेऊन मी हे ‘कृत्य’ करीत आहे.
नाना मला प्रथम भेटले ते सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात १९४४ च्या जून अखेर. ते अल्डस् हक्सलेने लिहिलेला एक ग्रंथ शोधीत होते. प्रा. एच. बी. कुलकर्णी (अमेरिकेतील एका विद्यापीठात नंतर प्राध्यापक झालेले व प्रसिद्ध कन्नड साहित्यिक) यांनी माझी ओळख करून दिली. पांढरा शुभ्र सूट, निळा टाय, सोनेरी फ्रेमचा चष्मा, काळे चकचकीत बूट, हातात सिगरेटचा डबा एकूण सांगलीच्या वातावरणात एक ‘ध्यान’ आल्यासारखे वाटले. गृहस्थ थोडेसे अबोल व औपचारिक वाटले. हक्सलेचे ते पुस्तक मी त्यांना काढून दिले. विलिंग्डनचाच मी विद्यार्थी व पुढे फेलो/ट्यूटर असल्यामुळे मला ग्रंथालयाची माहिती होती. काही दिवसांनंतर नानांनी अल्डस् हक्सले व जूलियन हक्सले हे कोण होते, त्यांचे व व्हर्जिनिया वुल्फचे नाते काय, ते सर्व मॅथ्यू आर्नोल्डचे कसे संबंधित होते, हे विशद करून सांगितल्यावर मी चक्रावून गेलो. तर्कशास्त्र व तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाला साहित्यिकांच्याबद्दल इतकी माहिती असावी याचे आश्चर्य वाटले आणि माझ्या स्वतःच्या अज्ञानाची कीव आली.
मी इंग्रजीचा हंगामी अंशकालीन व्याख्याता म्हणून मुंबईच्या त्यावेळच्या (१९४३-४४) सेक्रेटरिएटमधली चांगली फलदायी नोकरी सोडून विलिंग्डन महाविद्यालयात जवळजवळ अर्ध्या पगारावर रुजू झालो होतो. माझ्यानंतर काही वर्षांनी प्रा. म.द. हातकणंगलेकरांनी माझाच कित्ता त्यांचे हस्ताक्षर अत्यंत सुबक असूनही गिरविला. मला सर्वांनीच मूर्खात काढले होते. नानांनी मात्र मला त्याबाबतीत तरी चुकूनसुद्धा मूर्खात काढले नाही. प्रथम मोठ्या वर्गात शिकवणे जड जात असे. तसे अनेकांना जड जातेच. (त्यावेळी तास वक्तशीरपणे घ्यावे लागत!) एकदा चार वाजता एक मोठा वर्ग संपवून मी नानांच्याकडे गेलो. ते महाविद्यालयाच्या समोरील गुडवुइलच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील एका प्रशस्त खोलीत राहत असत. खोलीत कॉट, त्यावर बिछाना, मच्छरदाणी, खुर्ची-टेबल, एका टेबलवर टाईपरायटर असे. नानांची राहणी व्यवस्थित व टापटिपीची असे. (ते मला कधी जमले नाही.) त्या दिवशी वर्गात मी जरा त्रस्त झालो होतो. म्हणून नानांच्याकडे अनाहूतपणे गेलो. नानांनी माझे स्वागत केले. चहा केला. माझ्याबद्दल थोडीशी चौकशी केली आणि आस्था दाखविली. दुसऱ्या दिवशी मी परत त्यांच्याकडे गेलो. त्यांनी चहा केला. पुढे आम्ही एकमेकांकडे इतके आकृष्ट झालो की नाना मी गेल्याशिवाय चहा घेत नसत. हळूहळू चहाबरोबर इतर खाणे होऊ लागले, थट्टामस्करी होऊ लागली. सांगलीला त्याकाळात ब्रेड, चीज, बटर, केक, अशा वस्तू दुर्मिळच; पण नाना कुठून तरी त्या मिळवत असत. मग त्यांचा रेडलेबल-कांगो, वगैरे बँडचा चहा तयार व्हावयाचा आणि चहाचे घुटके घेत, चीज-टोस्ट खात नाना म्हणायचे, “”His Highness and we two.” (राजेसाहेब आणि आपण दोघे (फक्त) असा चहा फराळ करतो.)
नानांच्या सहवासाची मला इतकी चटक लागली की मी पुढे पुढे सर्व संध्याकाळी त्यांच्याकडे घालवू लागलो. वर्ग संपल्यावर त्यांच्याकडे चहा-फराळ, नंतर टेनिस खेळणे आणि मग एखाद्यावेळी प्रा. टी.एम. जोशींच्याकडे चहा आणि नंतर सायकलीवरून उशिरा सांगलीला जाणे. काही दिवसांनी नाना मला पोचवायला माझ्याच सायकलीवरून (डबलसीट, बिनदिवा वगैरे) आमच्या घरी येऊ लागले. मग माझ्याकडेच जेवायचे आणि मी त्यांना पोचवायला परत विश्रामबागला जावयाचो. अर्थात डबलसीट आणि नाना सायकल चालवणारे मी पुढील लोखंडी बारवर आरूढ. मग मी त्यांच्याकडे राहत असे.
शुभ्र चांदणे असेल त्यावेळी नाना मध्येच सायकलवरून उतरायचे, सिगरेट पेटवायचे (मी सिगरेट ओढीत नसे) आणि त्या चंद्रम्याकडे पाहून त्याला (तिला) उद्देशून कवी कीट्सच्या पंक्ती मोठ्यांदा म्हणावयाचे Happy the Queen moon is on her throne Cluster’d around by her starry fays.
मग मी शेलीची, That orbed maiden. With white fire laden. Whom mortals call the moon म्हणे.
त्याला प्रतिसाद म्हणून नाना परत कीट्सची, Bright star would I were steadfast as thou art…. म्हणत असत.
विश्रामबाग स्टेशनजवळ चांदण्यारात्री, बाजूला सायकल पडलेली, नाना आणि मी हातवारे करीत म्हटलेल्या त्या पंक्ती अजून आठवतात. त्यावेळी आजूबाजूचा प्रदेश निर्जन होता म्हणून ठीक, नाहीतर कदाचित हे दोन दारुडे आहेत असा संस्थानी (कार्यक्षम) पोलिसांचा ग्रह झाला असता आणि आम्हा दोघांना तुरुंगात डांबले असते आणि नशीब सिकंदर असते तर कदाचित स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलोसुद्धा असतो आणि आता पहिल्या वर्गातून प्रवास केला असता.
कीट्स श्रेष्ठ की टेनिसन् असा आमचा वाद अशा रात्री होत असे. कीट्स हा टेनिसन्पेक्षा श्रेष्ठ असे मला वाटायचे. त्याचे श्रेष्ठत्व त्याच्या जीवनाधारित तत्वज्ञानावर आहे. वेदनांचा अर्थ जितका त्याला समजला, तितका टेनिसन्ला नाही असे मला वाटते. टेनिसन्मध्ये कलाकुसरीचा भाग अधिक असे मला वाटायचे. नानांना दोघेही सारखेच श्रेष्ठ वाटावयाचे. मग नाना टेनिसन्च्या कवितेतील काही भाग म्हणावयाचे. पुढे नानांचे पण मत बदलले असे वाटले. त्यांनाही वेदनांचा उत्कट अनुभव आलाच होता येणार होता. जेथे अनुभव उत्कट तेथे कलाकुसर कमी असणार हे उघडच आहे.
नाना सगळ्याच बाबतीत अत्यंत चोखंदळ. त्यांचे मित्र मोजकेच असावयाचे. मी मात्र कळपात वावरणारा (gregarious) प्राणी. नानांना माझे वागणे रुचत नसे. ते माझ्यावर रुष्ट होत असत. मधून-मधून मी दडी मारीत असे, दोन दोन दिवस भेटत नसे, मग ते माझ्याशी अबोला धरीत असत. परत मी त्यांच्या खोलीवर जात असे. थट्टामस्करी सुरू व्हावयाची. परत तो चहा-फराळ, टेनिस, आमच्या घरी रात्रीचे जेवण, सायकलीवरून डबलसीट् वगैरे. अधूनमधून प्रा. टी.एम. जोशी, प्रा. देवदत्त दाभोलकर, प्रा. एच. बी. कुलकर्णी व प्रा. बी.बी. कुलकर्णी डोकावयाचे. मी मात्र एखाद्या कुटुंबीयांसारखा, नाही, धाकट्या भावासारखा राहिलो. प्रा. टी. एम. जोशींची पण माझ्याकडे पाहण्याची तीच भावना होती.
नानांचा संसार नव्हता आणि माझे लग्न झालेले नव्हते. नाना २८ वर्षांचे आणि मी ऐन गद्धेपंचविशीतला. आमचे छान जमले होते. नाना विधुर होते हे मला अनेक दिवसांनी समजले. स्वतःचे दुःख नानांनी कधीही मोकळेपणाने सांगितले नाही. पण मधून मधून मी थट्टा करू लागलो की ते विमनस्क व्हावयाचे. एकदा मी सहज त्यांना त्यांच्या विवाहाबद्दल प्रश्न विचारला. ते उत्तर न देता स्तब्ध झाले. त्यांचे डोळे पाणावले. मला अपराध्यासारखे वाटले. ते दुखावले जातील याची मला पुसटशी जरी कल्पना असतील तरी मी अशा प्रकारचे स्वातंत्र्य घेतले नसते. पण त्यांनीच काही वेळाने आपल्या पत्नी विवाहानंतर कोणत्या परिस्थितीत, एकाच वर्षात, निवर्तल्या हे सांगितले. त्यांचा फोटो पण त्यांच्याकडे होता. कधीतरी तो मला ते दाखविणार होते. तसा संदर्भ मी मात्र त्या प्रसंगानंतर कटाक्षाने टाळू लागलो.
नानांची पहिली पत्नी प्रा. मनोहर पाध्ये यांच्या भगिनी होत. पुढे प्रा. पाध्ये यांची व माझी पण मैत्री जमली. नानांचे पाध्ये कुटुंबाशी प्रेमाचे संबध अजून टिकून आहेत. नाना प्रा. मनोहर पाध्ये यांना अजून ‘मन्या’ असेच म्हणतात. एकमेकांना भेटतात व स्नेहऋणानुबंध टिकवून ठेवतात. नाना हाडाचे शिक्षक. त्यांनी कधी तास चुकविला नाही किंवा आधी सोडला नाही. विलिंग्डन्मध्ये (१९४४) त्यांची एक उत्तम व्याख्याता म्हणून जी ख्याती होती तीच एलफिन्स्टन्मध्ये (१९६६). या दोन्ही ठिकाणचे साक्षीदार माझ्या माहितीचे आहेत. सांगली, नागपूर, अमरावती, मुंबई कोठेही असोत नाना तन्मयतेने शिकवीत. परीक्षक होऊन दोन पैसे अधिक मिळवावेत, विद्यापीठात लुडबूड करून एखादी महत्त्वाची जागा मिळवावी, गाइडस् किंवा नोटस् लिहून पैसा मिळवावा, हे कधी त्यांच्या स्वपकीपण आले नाही. अगदी सहामाहीचे पेपर्ससुद्धा ते काळजीपूर्वक तपासत. विलिंग्डन्मधला एक प्रसंग आठवतो. सहामाहीचे पेपर तपासून नानांनी ते विद्यार्थ्यांना परत केले. एका विद्यार्थ्याला वाटले की नानांनी आपल्याला कमी गुण दिले. त्याने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातील तर्कशास्त्राचे ख्यातनाम प्राध्यापक ना. सी. फडके यांना आपला पेपर दाखवून त्याचे पुनर्मूल्यन करून घेतले. प्रा. फडक्यांनी फक्त एकच मार्क वाढविला. त्या विद्यार्थ्याची आणि प्रा. फडक्यांची तशी ओळख होती. नानांना त्याचे वाईट वाटले. इंटर आर्टस् वर्गाचा निरोप घ्यावयाच्या दिवशी नाना सद्गदित होऊन म्हणाले, “तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलेत याबद्दल मी ऋणी आहे. एका विद्यार्थ्याने मात्र माझ्यावर अन्याय केला. मी तपासलेला पेपर परत एकदा मला न विचारता प्रा. फडक्यांना दाखविला.” विद्यार्थी खूप हळहळले. नाना औचित्याला खूप जपायचे. त्या विद्यार्थ्याने औचित्यभंग केला याचे त्यांना दुःख झाले होते.
सांगलीहून नाना नागपूरला मॉरिस् कॉलेजमध्ये गेले. मी एका वर्षानंतर मुंबईच्या राम नारायण रुइयामध्ये गेलो. प्रा. टी.एम. जोशी अमेरिकेला वाटुमल स्कॉलरशिप मिळवून गेले. नानांची व प्रा. टी. एम. जोशींची पत्रे येत असत. नाना मजेशीर अशी पत्रे लिहीत. पी.जी. वोडहाउसची शैली, विलक्षण आत्मीयता व सहज-सुंदर अशा विनोदांनी नटलेली अशी ती पत्रे असत. अलीकडे कित्येक वर्षांत नानांनी मला तशा प्रकारचे पत्र लिहिलेले नाही. याचा अर्थ नाना मला विसरले असे मात्र नाही. कारण प्रत्यक्ष भेटलो की मला पूर्वीचेच नाना दिसतात. आम्हा दोघांना काही काळ काय बोलावे हे सुचत नाही. मग नाना किंचित हसतात थोडेसे शुष्कपणे, पूर्वीसारखे खळखळून नाही. पूर्वीच्या नकला, चेष्टा, थट्टामस्करी यांचा केव्हाच लोप झालेला आहे असे वाटते.
सांगलीला नानांची भाषणे व्हावयाची ती समाजवाद, स्त्रीस्वातंत्र्य, कुटुंबसंस्था, या विषयांवरची. ते Friends of the Soviet Union च्या सांगली शाखेचे एक पदाधिकारी पण होते. रशियन क्रांती व रशियाने केलेल्या प्रगतीबद्दल त्यांना कौतुक वाटायचे. पण ते कधी कम्युनिस्ट झाले नाहीत. पुढे १९६२ साली मी रशियाला जाऊन आलो व त्यांना म्हणालो, की, मला जे दिसले त्यावरून रशियाने स्थूल मानाने भाकरीचा प्रश्न सोडविलाय असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. तेथे हॉटेलमधून साधी ब्रेड अतिशय स्वस्त, म्हणजे दोन-चार कोपेकला विपुल मिळते. व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न कदाचित क्रुशेव्ह हळूहळू सोडवतील असा एक भोंगळ आशावाद पण मी प्रकट केला. मी तेथे असताना क्रुशेव्हनी बाहेरच्या विचारवंतांना भेटीचे आमंत्रण दिले होते. नाना कोणत्याही राजकीय तत्त्वप्रणालीच्या आहारी पूर्णपणे गेले नाहीत. गेल्या ५० वर्षांत राजकारणात व समाजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली. पण नानांचे १९४४ साली जे विचार होते त्यात फारसा बदल झालेला नाही. त्यांना वाईट वाटते ते समाजवादाचा एक प्रयोग फसल्याचे. १९४४ साली नानांनी रशियाचा प्रयोग फसला तर ती एक दुर्दैवी घटना ठरेल असे म्हटले होते. त्यावेळी आम्ही तरुण मंडळी सिड्ने आणि बियाट्रिस् वेब् यांच्या कम्युनिझम् अ न्यू सिव्हिलिझेशन या ग्रंथाने मंत्रमुग्ध झालो होतो. द गॉड पँट फेल्ड हा ग्रंथ प्रसिद्ध व्हावयाचा होता. १९४० मध्ये आम्ही कॉमेड म्हणून घेत होतो. नानांना असला मोह झाला नव्हता. त्यामुळे ते अविचल राहिले. त्यांच्या मतांत फारसा फरक झाला नाही.
१९४६ साली नानांच्या Women, Family and Socialism आणि Truth about God अशा दोन पुस्तिका प्रसिद्ध झाल्या त्यावेळी मी मुंबईत होतो. नाना प्रकाशकाकडे आणि माझ्याकडे वरचेवर येत असत. त्यावेळचा एक मजेशीर प्रसंग आठवतो. दादरच्या हिंदू कॉलनीत महामहोपाध्याय काणे यांच्या ‘प्रभासदन’ नावाच्या इमारतीत मी एका खोलीत पोटभाडेकरू म्हणून राहत असे. माझ्याच खोलीत ‘अनंताकडे झेप’ या ग्रंथाचे भावी लेखक स्व. अ.ल. भागवत राहत असत. श्री. भागवत हे एक सच्चे, निःस्वार्थी, पारमार्थिक पुरुष. नाना एका अर्थी इहलोकवादी. नानांची Truth About God ही पुस्तिका श्री भागवतांनी पाहिली व ते हसले. नानांची आणि भागवतांची भेट झाली. पण ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल चर्चा झाली नाही. चर्चा कुणाबरोबर व कोणत्या पातळीवर करावयाची याबद्दल नाना तसे विचारशीलच म्हणावयाचे. माझ्याशी त्यांनी तत्त्वज्ञानविषयक चर्चा कधीच केली नाही. एकदा मात्र चुकून The concept of time वर थोडीशी चर्चा केली आणि आपला ‘टाइम’ व्यर्थ गेला म्हणून तो नाद त्यांनी सोडला. मात्र स्त्रीस्वातंत्र्य, समाजवाद, साहित्य इत्यादी विषयांवर अधूनमधून नाना माझ्याशी बोलत. त्यांचे विचार सडेतोड व मांडणी स्पष्ट असायची. ते कुणाचीही भीडभाड ठेवीत नसत. “किर्लोस्कर’च्या त्यावेळच्या संपादकांना त्यांनी लिहिलेले पत्र मला या संदर्भात आठवते. लेखकांना मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याबद्दल ते पत्र होते. स्त्री स्वातंत्र्याबद्दल माझ्या पिढीचे धोरण दुटप्पीच राहिले आहे. शब्दांनी ‘देवता’ म्हणून तिला गौरवायचे आणि व्यवहारात तिची पिळवणूक करावयाची. मिल्टन्, रस्किन्, टेनिसन् या सर्वांची भूमिका दुटप्पी कशी होती हे नाना सांगावयाचे.
नाना जितके गंभीर तितकेच विनोदी आणि खेळकर वृत्तीचे. पी. जी. वोडहाउस्च्या शैलीमध्ये बोलणे व लिहिणे त्यांच्या रक्तातच भिनले होते. वागण्यात पण थोडा तसाच वाह्यातपणा. सायकलीवरून मला डबलसीट घेऊन यावयाचे व गुइवुइल्च्या इमारतीसमोर ३-४ राउंडस् मारायचे आणि मगच मला उतरू द्यावयाचे. Nothing succeeds like excess ही शॉची उक्ती खरी करून दाखविण्याकरिता मुद्दाम एकामागून एक अशा ३-४ सिगरेटी ओढायच्या. सांगलीचे त्यावेळेचे संस्थानी व आजूबाजूचे वातावरण त्यांच्या त्या वोडहाउसच्या आशयाला पोषक असेच होते. छोटेखानी अनेक संस्थाने होती. त्यांत थोरली पाती (Senior) धाकटी पाती (Junior) असे भाग असावयाचे. शिवाय राजेसाहेब, दिवाण, युवराज, युवराज्ञी, अशी मध्ययुगाकडे झुकलेली पात्रे. महाविद्यालयात व बाहेर काही विनोदी पात्रे असावयाची. रामू नावाचा गडी कोणताही प्रश्न विचारला की प्रथम डोके खाजवायचा व मग काही वेळाने उत्तर द्यावयाचा. त्याला नाना Ramu the thinker म्हणायचे. एक प्राध्यापक आमच्या बरोबर टेनिस खेळायचे. चेंडू मारला की ते टेनिस कोर्टावर मोरासारखे नाचायचे. त्यांना Prof. X, the strutter म्हणायचे. संस्कृतचे एक प्राध्यापक ऐन उन्हाळ्यातसुद्धा हिरवा, जाड असा लोकरीचा कोट घालून यावयाचे. त्यांना Prof. Y in Lincoln Green म्हणावयाचे. एकदा तर प्रा. टी. एम. जोशींनी या ‘हिरव्या’ प्राध्यापकांना सरळच विचारले, “How much do they pay you to wear that coat?’ प्राचार्यांच्याकडे दोन नोकर राबत असत. त्यांना एकदा युनिफार्म दिले गेले. ज्येष्ठतेप्रमाणे. नानांनी लगेच एकाला ‘थोरली पाती’ दुसऱ्याला ‘धाकटी पाती’ अशी हाक मारायला सुरुवात केली. एकदा एका प्राध्यापकांनी कुत्सितपणे विचारले, “तुमच्या विद्यापीठात बी.ए. आणि एम्.ए.ला पण लॉजिक शिकवितात म्हणे ?’ नानांनी उत्तर दिले ‘‘बी.ए.ला बी.ए.चे लॉजिक, एम.ए. ला एम.ए. चे लॉजिक शिकवतात, जसे आपण इंग्रजी शिकवतो तसे.’
जेरोम् के. जेरोम, लीकॉक, वोडहाउस हे नानांचे आवडते लेखक. नानांचे पाठांतर जबरदस्त. ते या लेखकांची पानेच्या पाने पाठ म्हणून दाखवीत. रोजच्या व्यवहारात कधी कधी त्यांचीच विनोदी भाषा वापरीत. त्यामुळे अपरिचित माणसे प्रथम गोंधळून जात. पुढे मात्र त्यांना गंमत वाटायची. आपल्या विनोदी शैलीने, स्वच्छ व निःस्वार्थी वागणुकीने, नानांनी एक आगळे वेगळे विश्वच निर्माण केले होते. पुढे एकाच वर्षाने नाना नागपूरला गेले. मी आणखी एक वर्ष टिकलो, पुढे मुंबईला गेलो. प्रा. टी.एम. जोशी पेन्सिल्वानियाला (अमेरिकेला) गेले आणि ते लख्ख प्रकाशाचे निर्भेळ विश्व संपुष्टात आले. त्याची हळहळ मला अजून जाणवतेय!
मी मुंबईला असताना नानांचा विवाह झाला. मनुताईंची (नातूबाई) पहिली भेट मुंबईलाच त्यांच्या एका नातेवाईकांच्याकडेच झाली. त्या बिछान्यात बसूनच बोलत होत्या. त्यांचा पाय दुखत होता. पण त्या आनंदी, खेळकर वृत्तीच्या वाटल्या. अगदी पहिल्याच भेटीत त्या अत्यंत मोकळेपणाने माझ्याशी बोलल्या. पुढे अमरावती-नागपूरला मी नानांच्याकडे अनेक वेळा गेलो. प्रत्येकवेळी तोच आल्हाददायी अनुभव. पुढे पुढे त्यांचा आजार वाढत गेला. प्रकृतीत गुंतागुंत होऊ लागली. पण त्या रुग्णासारख्या कधी कण्हत बसल्या नाहीत. त्यांना पाहून मला R. L. Stevenson ची आठवण यावयाची. Must we to bed indeed? Well then Let us arise and go like men. And face with an undaunted tread The long dark passage to bed.
मुंबईला व औरंगाबादला आमच्या घरी त्या २-३ वर्षांनी यावयाच्या. पण एखादा दिवसच राहावयाच्या. तो दिवस आनंदाचा असावयाचा. मनमोकळ्या गप्पा व्हावयाच्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळावयाचा. त्या आजारी आहेत असे कधी वाटायचे नाही. नानांचे वैवाहिक जीवन म्हणजे त्यांच्या आचार-विचारांची एक अग्निपरीक्षाच होती. सांगलीला १९४४ मध्ये स्त्री-स्वातंत्र्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले होते त्यांचे प्रात्यक्षिक म्हणजे त्यांचे वैवाहिक जीवन. त्यांनी केलेली पत्नीची सेवा अनन्यसाधारण होय.
नागपूरला मी गेलो की मनूताई मला जवळ बसवून घेत, जेवायचा आग्रह करीत. मी नानांशी बोलावे, परत एकदा ते सांगलीचे दिवस आठवावेत, आम्ही खदखदून हसावे, थट्टामस्करी करावी अशी त्यांची अपेक्षा असे. नाना हसायचे, मी हसायचो. पण सांगलीतले ते खिदळणे कधी जमलेच नाही. ते हरवलेले दिवस गवसलेच नाहीत. आणि आता आम्ही दोघेही पार दूरच्या तीरावर…..
सुप्रिया, २६१, समर्थनगर, औरंगाबाद ४३१ ००१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.