सुधारक दि. य. देशपांडे

मोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे.
प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली हानी खरीखुरी आहे. ते एकोणनव्वदाव्या वर्षी वारले, (३१ डिसेंबर २००५) त्याआधी सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांचे तर्कशास्त्रावरचे एक पुस्तक प्रकाशित झाले. तर्कशास्त्रावरील एका अभिजात ग्रंथाचे ते भाषांतर आहे. गेली काही वर्षे ते या पुस्तकाचे काम करीत होते. अंथरुणाला खिळलेले, तरी कासवांच्या गतीने, चिकाटीने, शांतपणे. ‘मरणा न भीत तुज मी’ असे जणू म्हणत, शेवटपर्यंत धीमे धीमे त्यांचे काम चालूच होते.
प्रा.दि.य. देशपांडे यांच्या निधनाने तत्त्वज्ञानाची झालेली हानी खरीखुरी आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. ते एकटे राहात. धाकटा भाऊ बाळ आणि भावजय डॉ. सुनीती देव यांनी त्वरेने धाव घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार आणि काटेकोर शुश्रूषा यांनी ते खडखडीत बरे झाले. पक्षाघाताचे कुठलेही चिह्न उरले नाही. मात्र बाळ-सुनीती या दाम्पत्याने नंतर त्यांना एकटे राहू दिले नाही. आपल्याजवळ आणले. दि.यं.चे काम पूर्ववत सुरू झाले. आजचा सुधारक या मासिक पत्रिकेच्या संपादनाशिवाय, अर्वाचीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, प्रज्ञावाद, अनुभववाद, कांट आणि विवेकवाद ही पाच पुस्तके त्यांनी या दहा वर्षांत प्रकाशित केली. तर्कशास्त्रावरील अभिजात ग्रंथ म्हणून वर जे म्हटले ते सहावे. प्रा.दि.य. देशपांडे यांच्या निधनाने तत्त्वज्ञानाची झालेली हानी खरीखुरी आहे.
युरोपमध्ये ज्ञानाचे पुनरुज्जीवन झाल्यावरचा कालखंड. त्यातील, एका वैयाकरणाची अंत्ययात्रा ऋीराारीळरपी पिशीरश्र नावाची ब्राऊनिंगची कविता प्रसिद्ध आहे..
कमरेपासून खाली अंग लुळे झाले तरी, अङ्गं गलितं पलितं मुंडम् असा तो विद्वान् व्याकरणातली जटिल कूटे एकामागून एक निकालात काढतो. या वैयाकरणाची आठवण यावी असे हे काम होते दि.यं.चे.
He settled Hotis business – let it be! Properly based oun Gave us the doctrine of the enclitic De Dead from the waist down एकूणच तत्त्वज्ञानाचा प्रपंच अलोकसामान्य. अनुपयोजित ज्ञानाचा. त्यातून पाश्चात्त्य तर्ककर्कश तत्त्वज्ञान. दि.यं.ना पर्वा नव्हती. आपण पुढच्या ५० वर्षांनी येणाऱ्या पिढीसाठी लिहितो असे त्यांचे समाधान. ‘उत्पत्स्यते मम कोऽपि समानधर्मा!’ ही उमेद.
प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे त्यांना एका बाबतीत भारी कौतुक. अध्ययन अन् अध्यापन हा “निष्करणो धर्मः’ म्हणणारी ही विचारधारा त्यांना आदर्श होती. तत्त्वज्ञानाच्या प्रांताबाहेर त्यांची ओळख आजचा सुधारक मुळे होती. आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर तिला साजेसे स्मारक म्हणून १९९० मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे काम त्यांनी उभे केले होते. थोडे आधी आगरकर-वाययाचे तीन खंड या दाम्पत्याने संपादित केलेले, महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले होते. आगरकरांच्या साप्ताहिक सुधारकचे आपले मासिक आजचा सुधारक हे नवे रूप आहे. आपले काम नवे नाही अशी त्यांची नम्र धारणा होती.
जुनी गोष्ट. मी डी. वाय. देशपांडे हे नाव पुष्कळ दिवस ऐकून होतो. मला फिलॉसॉफीत एम. ए. करायचे होते. खासगी विद्यार्थी म्हणून. नागपूर विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. मुकर्जी यांच्याकडे मी बसलो होतो. मदत-मार्गदर्शन घेण्यासाठी. त्यांच्या पत्नी राजमोहिनी मुकर्जी आदल्याच वर्षी खासगी रीतीनेच तत्त्वज्ञानात एम.ए. झाल्या. बोलता-बोलता गीतेचा विषय निघाला. तशा त्या म्हणाल्या, D. Y. doesn’t hold high opinion about the Geeta. राजमोहिनी या लग्नाआधीच्या पंजाबी ख्रिश्चन. इंग्लिश मातृभाषेसारख्या सफाईदार बोलत. त्या पुढे म्हणाल्या, “He says, there is not much of ethics in it either. मी जरासा चमकलोच. तशा त्या डोळे मिचकावत काहीशा मिश्किलपणे पुढे म्हणाल्या, “You know what he said further? He said, “not that I have read it thoroughly”..
माझे आश्चर्य कमी न होता वाढले. मला हे नवे होते. टिळकांनी गीतारहस्याच्या आरंभी ग्रंथाला कर्मयोगशास्त्र The Hindu Philosophy of Life, Ethics and Religion म्हटलेले मला माहीत होते.
दि. यं.चा सहकारी म्हणून मी काम करू लागल्यावर पुढे कालांतराने किर्लोस्कर मासिकाचे १९४५ च्या आसपासचे दोन जुने अंक त्यांनी मला दिले. त्यांत त्यांचे ते लेख होते. त्यांनी म्हटले होते, ‘गीतेला पाहिजे तर अध्यात्मशास्त्र म्हणा, योगविद्या म्हणा किंवा मोक्षविद्या म्हणा. पण ज्याला नीतिशास्त्र म्हणतात ते गीतेत मुळीच नाही.
डी.वाय. चा हा दृष्टिकोण अखेरपर्यंत कायम होता! पुढे त्यांचा सहकारी झाल्यावर कितीतरी वर्षांनी, त्यांच्या इच्छेवरूनच, मी त्यांना गीता भेट दिली होती. भाषांतराची त्यांना गरज नव्हती. त्यांना संस्कृत उत्तम समजत असे. गीतारहस्य मी पूर्वीच त्यांना भेट दिले होते. या पुनर्वाचनानेही त्यांचे मत बदलले नाही. गीताच काय, अवघे भारतीय तत्त्वज्ञान त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या कसोटीला उतरत नव्हते. कार्य काय, अकार्य काय याचे प्रमाण शेवटी शास्त्र ‘तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते, कार्याकार्य व्यवस्थितौ।’ असे म्हणणारी गीता त्यांच्या मते स्वतःच ते शास्त्र, नीतिशास्त्र सांगत नव्हती. मोक्ष, आप्तवचन, शब्दप्रामाण्य हे भारतीय तत्त्वज्ञानात परवलीचे शब्द. सत्याचे ज्ञान वस्तुस्थिती काय आहे यावरून ठरते, कोणी काय म्हटले यावर अवलंबून नसते. इन्द्रियांना येणारा अनुभव आणि त्या अनुभवावर विसंबित तर्क हे दोनच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात स्वीकारलेले ज्ञानप्राप्तीचे मार्ग त्यांना मान्य होते. व्यक्तिमाहात्म्य त्यांना अमान्य होते. भारतीय तत्त्वज्ञानात त्यांच्या मते हे फार होते.
तसा मी विद्यार्थी दशेपासून डी.वाय. हे नाव ऐकून होतो. माझा मित्र रघू धनागरे अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात (विमवि) त्यांचा विद्यार्थी होता. मी अकोल्याला प्रा. मुरकुट्यांचा विद्यार्थी. सुट्यांमध्ये आम्ही भेटलो की तो फार तारीफ करायचा. आम्ही बी.ए.ला ईश्वरकृष्णाची सांख्यकारिका शिकत असू. प्रत्येक कारिका, शब्दन् शब्द त्यांना पाठ होती अन् ते इतके समरसून शिकवत असत की तत्त्वज्ञानाचा वर्ग चांदण्यात न्हाऊन निघे असे रघू सांगे. रघू माझ्यासारखाच संस्कृतचाही विद्यार्थी! म्हणजे त्यांना संस्कृतचे किंवा भारतीय तत्त्वज्ञानाचे मुळात वावडे होते असे नाही.
डी. वाय. शी माझा प्रत्यक्ष संबंध आला तो फार पुढे. मी त्यांच्या जर्नलचा एक वर्गणीदार होतो. Indian Philosophical Association या संस्थेचे ते संस्थापक सचिव होते. त्यांचे त्रैमासिक (Journal) निघे. संस्थेच्या १९६३ च्या वार्षिक अधिवेशनाला मी हजर होतो. सगळे मिळून वीसेक लोक असतील. नागपूर महाविद्यालय (ना.म.वि. जुने मॉरिस कॉलेज) यजमान होते. त्यावेळी मी त्यांना पाहिले. मी निरीक्षक विद्यार्थी होतो. त्यांनी माझी दखल घ्यावी असा कोणी नव्हतो. पुढे मला त्यांच्या कॉलेजात, वि.म.वि. मध्ये त्यांचा सहकारी म्हणून जायचा योग आला. पब्लिक सर्व्हिस कमिशनने माझी निवड करून वि.म.वि.त नेमणूक दिली. पण माझ्या पहिल्या कॉलेजचे प्राचार्य सोडत नव्हते. तीन महिन्यांची नोटीस मागत होते. मी पक्का झालेला होतो. मी डी.वाय.ना भेटायला गेलो, मला कामावर रुजू व्हायला मुदत हवी होती. वि.म.वि.च्या कॉमनरूममध्ये त्यांची वाट पाहात बसलो होतो. तेवढ्यात एक छोटीशी ऑस्टीन की मॉरिस कार सुळकन् कुठून तरी येऊन समोरच्या पोर्चमध्ये उभी राहिली. तिच्यातून एक जोडपे उतरले. महिला पन्नाशीच्या, उंची बेताची, शुभ्र गोऱ्या, किंचित स्थूल, चेहेरा प्रसन्न हसतमुख, डोळ्यांना जाड चष्मा. कडक स्टार्च केलेली लख्ख पांढरी साडी सावरत हळूहळू एक एक करत त्या पायऱ्या चढल्या. धीमी पावले टाकत कॉमनरूमकडे आल्या. पंधरावीस पावलांवर कॉमनरूमचे दालन होते. डी.वाय.डाव्या हातात त्यांचे स्वतःचे वॉलेट अन् उजव्या हातात बाईंची वॉटरबॅग सांभाळत चिकटून चालत होते. वेळ पडली तर पटकन् आधार देता येईल असे. या बाई म्हणजे नातूबाई. मराठीच्या प्राध्यापिका मनूताई नातू. डी.वाय.च्या पत्नी झाल्यावरही त्या आपले माहेरचे नाव लावीत. आगरकरांच्या कट्टर अनुयायी अन स्त्री-पुरुष समानतेच्या कैवारी होत्या.
कॉमनरूममध्ये मी डी.वाय.ना माझी ओळख दिली. थोडे बोलायचे आहे म्हटले. सभोवताल गर्दी उसळली होती. दोन तासांमधली आवक-जावक सुरू होती. जरा बाहेरच बोलू, म्हणून ते उठले. पुढे ते अन् मागे मी असे व्हरांड्यात आलो. मी माझी अडचण सांगितली. ते शांतपणे ऐकत होते. शेवटी एकच म्हणाले. Take your time, young man ! मला हायसे वाटले. त्यांचा साधेपणा मनावर ठसा उमटवून गेला. कॉमनरूम समोरील त्या व्हरांड्यात, एका कोपऱ्यात आम्ही जेमतेम पाच मिनिटे उभे होतो. डी.वाय. अंगयष्टीने उंच, गौरवर्णाचे, मजबूत बांधा, रुंद खांदे, पीळदार बाहू, लांब केस उलटे फिरवलेले, डोळ्याला चष्मा, छातीशी हात बांधून उभे होते. अंगात फिकट भुऱ्या, करड्या रंगाचा जरा आखूडच मनिला, त्यातून उघडे बाहू दिसत होते. तोंडात तांबूलाचा अवशेष असावा, तो हळूच चघळत सहज बोलत होते.
मी नागपूरहून त्यांच्या भेटीसाठी मुद्दाम गेलो होतो त्याला तसेच कारण होते. आदल्या वर्षी नागपूर विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या निवडणुकी झाल्या होत्या. तत्त्वज्ञान विषयाची अध्यक्षपदाची निवडणूक माझ्या कॉलेजचे प्राचार्य जिंकले होते. डी.वाय. हरले होते. मी एक मतदार होतो. आम्ही निवडलेले प्रतिनिधी अध्यक्षाची निवड करीत. डी.वाय.चे जुने सहकारी नागपूरला होते. ते त्यांच्याविरुद्ध उठले होते. मला वि.म.वि.त नेमणूक मिळाली तेव्हा अनेकांनी भीती दाखविली की, डी.वाय. काही तुम्हाला जॉईन करून घेणार नाहीत. अडचणी आणतील. विभागप्रमुखांनी अडचणी कश्या आणल्या याचे किस्से ऐकिवात होते.
मला अनुभव उलटा आला होता! वि.म.वि.त मी पाच वर्षे त्यांचा सहकारी होतो. त्यांच्या घरचा एक होऊन गेलो होतो. त्यांना घरी आणि बाहेरचे आमच्यासारखे निकटवर्तीय नाना म्हणत. नाना-नातूबाई एक आदर्शप्रिय दाम्पत्य होते; आदर्श दाम्पत्य होते. स्वभाव भिन्न पण साधर्म्य जे होते ते फार दृढ, उत्कट आणि सर्व वैषम्यावर मात करणारे होते. स्त्रीपुरुष-समताविचार त्यांना एकत्र आणणारा, घट्ट बांधून ठेवणारा मुख्य दुवा. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, इहवाद, न्याय नास्तिकता एकूणच विवेकवाद ठरींळेपरश्रळीी हे उभयतांचे जीवनादर्श होते. बाई स्वभावाने भावनाप्रधान, बडबड्या. संभाषणातसुद्धा ऐकणाराला जागी खिळवून ठेवत. सभेत अमोघ वक्तृत्व. रागलोभ तीव्र. प्रेम उत्कट करीत. लहान मुलासारखे थोडे खुट्ट झाले मनाविरुद्ध काही गेले की नाराज होत. नाना याच्या उलट शांत. भावना काबूत ठेवणारे. अबोल खरे म्हणजे मितभाषी सत्त्वगुणप्रधान. दोघांचे आदर्श मात्र एकसारखे!
मनुताईंचे आरोग्य असावे तसे नव्हते. त्यांना नाना चोवीस तास डोळ्यांसमोर लागत. अमरावती तेव्हा नागपूर विद्यापीठाशी संलग्न होते. विद्यापीठाच्या सभा, समित्या यांच्या कामासाठी नाना नागपूरला आले की झटपट काम संपवून परत जायची घाई करत. मनुताई वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांना दिसत. विद्यापीठातल्या सभा बैठकी ही ज्येष्ठ प्राध्यापकांना परस्पर हितगुज करण्याची जागा. डी.वाय. तेथे रमणार नाहीत. कामापुरते बोलणार. काम झाले की पळणार. ते इतरांत मिसळत नाहीत, अहंमन्य आहेत या समजाला बळकटी मिळे. लोकशाहीत जनसंपर्क महत्त्वाचा. लोकाराधना महत्त्वाची. तिच्याकडे दुर्लक्ष झाले की निवडणुकीत परिणाम दिसतो.
डी.वाय. स्वतः अन् नातूबाई, दोघेही क्लासवन् प्रोफेसर. नोकरी सरकारी. इतरांच्या मानाने दुप्पट पगार. मूलबाळ नाही. पैशाचा ताठा, ज्ञानाचा गर्व, तो नसता तर आमच्याशी बोलले असते, मोकळे वागले असते असा साधा जनापवाद!
मनुताईंना व्याधी जास्त की आधी जास्त हे सांगणे कठीण होते. लग्नाआधीपासूनच डोळे इतके अधू की वाचणे पराधीन. हाताची बोटे इतकी नाजूक की चार ओळी लिहिणे जड. लिहायला लेखनिक, वाचायला प्रवाचक लागे. मराठी सारखा विषय सतत वाचन लेखन करावे लागे. आपल्या विषयात, आवडीच्या शाखेत आपले ज्ञान अद्ययावत् असावे हा मनी ध्यास होता. त्यांना कमरेचे काही दुखणे होते. त्यामुळे चालणे दहापाच पावलांपुढे नकोसे होई. आधारावाचून तेही अवघड. बुद्धी मात्र तल्लख, स्मरणशक्ती फोटोग्राफिक तरी मनुताई नानांच्या सुरक्षाकवच होत्या. नानांचे बलस्थान होत्या.
नाना बाईंचा अन् बाई नानांचा अक्षरशः प्रतिपाळ करीत. कोणाला नानांचा किती वेळ घेऊ द्यायचा, किती जवळीक करू द्यायची, मैत्री ठेवायची की न ठेवायची हे त्या ठरवत. मी आणि (प्रा.) विवेक गोखले, दोघे बरोबरच वि.म.वि.त नानांच्या विभागात आलो. विवेक बाईंचा मानलेला भाचाच होता. आमचे कॉलेजचे तास संपले की दोघेही नानांच्या बंगल्यावर जात असू. बंगला कॉलेजच्या आवारातच. खूप प्रशस्त. तेथे चहा फराळ झाला की, आमचे वाचन सुरू होई. ते निदान तासभर चाले. थोडे थोडेच काम रोज, सातत्याने करत राहिले तर कालांतराने ते डोळ्यांत भरण्याइतके मोठे होते असे नाना म्हणत. स्वतः तसे करत. नाना तत्त्वज्ञानातले मूलभूत प्रश्न, त्यांची आधुनिक मांडणी, हॉस्पर्सच्या ग्रंथातून वाचत, समजावून देत. व्हिट्गेष्टाइनचे इन्व्हेस्टिगेशन्स (Investigations) आम्ही असेच वाचले. थोडे वाचन, बरेच स्पष्टीकरण, चर्चा असे काही दिवस गेल्यावर पुढे ते ग्रंथ आम्हालाच स्वतंत्रपणे याच पद्धतीने वाचायचे होते. नाना दीक्षा देत होते. मी बाईंच्या अग्निपरीक्षेला उतरल्यामुळेच नानांच्या जवळ जाऊ शकलो हे त्याच गमतीने पुढे मला सांगत.
आमचे वाचन, अध्ययन, चर्चा काहीही चाललेले असो, बाईंच्या खोलीतील विजेची घंटा वाजली की नाना तातडीने उठून जात. मनूताईंना काय हवे नको ते पाहात. पुन्हा येऊन गाडी सुरू होई. आमचे वाचन बैठकीच्या दालनात, त्याला लागून पश्चिमेकडे मनूताईंचा कक्ष. तेथे कायम बिछाना असे. पलंगाला हाताशी विजेची बेल फिट ला स्त्री सहायक, सेविकाही असत. उशाशी छोट्या टेबलावर पाण्याचा तांब्याभांडे असे. पेल्यावर चमच्याचा आवाज करूनही नोकर आला नसला, जवळ नसला की त्या विजेच्या बेलचा उपयोग करीत. त्यांचा शब्द कधीही खाली पडत नसे म्हटले तर मनूताईंचा राजेशाही थाट असे. नाना तो मनापासून जपत.
मात्र नानांचा मोठेपणा बाईंइतका कोणी ओळखला नसेल. त्यांच्या खालोखाल त्या पाटणकरांचा (रा.भा.) अन् माझा नंबर लावीत. नानांची तारीफ करताना त्या कधी दमत नसत. कंटाळत नसत. एका अर्थी नाना त्यांचे जीवन होते. सर्वस्व होते.
डी. वाय. च्या त्या जुन्या जमान्यातील सरकारी बंगल्यात बैठकीच्या हॉलच्या पूर्वेकडे आणखी एक दालन होते. तेथे त्यांचे वृद्ध आई-वडील असत. आई अर्धांगवायूने पांगळी झालेली, वाचा गेलेली. देहधर्म स्वाधीन न राहिलेली. त्यांना लहानमुलासारखे भरवावे लागे. ते काम बरेचदा नाना करताना दिसत. आईचे कपडे बदलणे स्त्री-सेविकांना साधत नसे. नानांचा धाकटा भाऊ तरुण होता. माझ्या सोबतच एम.ए. झाला होता. पण तो शांतिनिकेतनला विश्वभारतीत रिसर्च फेलो होता. आईवडिलांच्या सेवेखातर त्याला घरी बसवणे शक्य नव्हते.
जुन्या कुटुंबांमध्ये सर्वांत मोठे अपत्य अन् त्याचे सर्वांत धाकटे भावंड यांत कधी कधी खूप अंतर असे. डी.वाय. चा हा भाऊ बाळ, त्यांच्यापेक्षा बावीस वर्षांनी लहान होता. वडील कधीच निवृत्त झालेले. कुटुंब मोठे चार मुली, तीन मुलगे. धाकट्या दोन भावांचे उच्च शिक्षण नानांनी केले. गावी वडिलांना अर्थसाहाय्य केले. प्रोफेसर्स कॉमनरूममधल्या लेटरबोर्डवर दरमहा दोन मनिऑर्डरच्या पावत्या, वर्षानुवर्षे लागत. एक डी.वाय.ची अन् दुसरी आपली असे प्रोफेसर लोथे सांगत. लोथ्यांचे वृद्ध वडील गावी भिक्षुकी करत.
डी. वाय. अन् नातूबाई दोघे क्लासवन प्रोफेसर. दुप्पट पगार. मूलबाळ नाही. पैसाच पैसा. हे दुरून दिसणारे साजरे डोंगर !
डी. वाय. ची पत्नीसेवा हा चर्चेचा चविष्ट विषय असे. कॉलेजात तसाच शहरातही. डी.वाय. स्वतःबद्दल बोलत नसत. कौटुंबिक अडचणींचा कधी विषय काढत नसत. त्यांच्या आईची किती सेवा, आणि कशा प्रकारची सेवा त्यांना करावी लागते हे आम्ही खुद्द पाहिले तेव्हा आम्हाला कळले.
त्यांच्या घरी, वाचनाच्या निमित्ताने मी, गोखले बसत असू तेव्हा स्त्रीपुरुष – समानता हा विषय कधी निघे. आपल्याकडे पतिव्रता हा शब्दप्रयोग आहे तसा ‘पत्नीव्रती’ असा शब्द नाही, यात नवलही नाही. एखादा पुरुष बौद्धिक किंवा तशीच पात्रता असलेला पण अपंग, पराधीन असता तर पत्नीने त्याची सेवा करणे किती स्वाभाविक मानले असते आपण ? ती कुठे कमी पडली तर पत्नी कर्तव्यात चुकली असे म्हटले असते आणि क्वचित तिच्या समर्पणाची दखलही घेतली गेली नसती. इतकी ही गोष्ट आपण स्वाभाविक समजतो. अशी त्यांची समतावादी भूमिका.
आमच्या चर्चेत असे विषय निघत. श्रीमंताच्या मुलीसुना, वरिष्ठ नोकरदारांच्या पत्नी, उच्च पदव्या घेतात हे ठीक आहे. पण नोकऱ्या मिळवून सामान्यांच्या, गरजूंच्या जागा बळकावतात हे ठीक आहे का ? असे आक्षेप त्यांना क्षणभरही पटत नसत. आपण स्त्रीपुरुष समानता जर स्वीकारली असेल तर ही भाषा करू नये हे त्यांचे म्हणणे!
आरक्षणाच्या बाबतीतही तेच. उपेक्षित दलित जातींना आरक्षण सरसकट नको, त्यांच्यातले लाभधारी, सस्थित झालेले लोक आता वगळले पाहिजेत. (त्यावेळी क्रीमी लेअर ही तरतूद आली नव्हती.) हेही म्हणणे त्यांच्यापुढे टिकत नसे. एकतर असे लोक थोडे. नगण्य आणि सामाजिक न्याय तत्त्व म्हणून मान्य केल्यावर तपशिलाबद्दल भांडण्यात अर्थ नाही हा त्याचा पक्ष. समता, स्वातत्र्य, न्याय आणि इहवाद हा विवेकवाद त्यांनी अन् मनुताईंनी आतून, मनोभावे स्वीकारलेला. नाना-मनूताई हे दोन विवेकवाद्यांचे सर्वार्थाने झालेले मीलन होते.
अमरावतीचे वि.म.वि.मधील दिवस हा माझ्या आयुष्यातील अमोल ठेवा आहे. आपल्या पॅरीसमधील वास्तव्याबद्दल वर्डस्वर्थ कृतकृत्य भावाने म्हणतो तेव्हा तेथे असणे हेच मुळात भाग्य अन् त्यातूनही तरुण असणे स्वर्गसुख होते. तसे मला म्हणावेसे वाटते. वि.म.वि.त तेव्हा असणे पूर्वसुकृताचे देणे होते आणि तत्त्वज्ञान विभागात डी.वाय.च्या निकट राहायला मिळणे हे अहोभाग्य होते.
मनूताई एवढ्या नवमतवादी, सुधारक पण स्त्री-पुरुष लैंगिक संबंधाबाबत फार सोवळ्या मताच्या होत्या. रसेल किंवा र.धों.कर्वे यांचे वेश्याव्यवसायाचे समाजशास्त्रीय समर्थन त्यांना पटणारे नव्हते. प्रमाथी कामविकाराचा प्रताप त्यांना अनाकलनीय होता. मनुताईंच्या निधनानंतर दोन वर्षांनी आजचा सुधारक हे जे मासिक त्यांचे स्मारक म्हणून दि.यं.नी काढले त्यात सुरुवातीला वर्ष दीडवर्ष रसेलच्या मॅरेज अँड मॉरल्स चे मराठी रूपान्तर ते देत. तेव्हा मी त्यांना विचारले की, तुम्ही रसेलची ही भूमिका कधी बाईंशी चर्चिली होती का? वर्षानुवर्षे काही मौलिक इंग्रजी साहित्य झोपायला जाण्यापूर्वी बाईंना वाचून दाखवण्याचा त्यांचा परिपाठ होता. तो मला माहीत होता. माझ्या प्रश्नावर नाना म्हणाले, ‘हो, ही मते किंबहुना ही विचारसरणी सुरुवातीला त्यांना मुळीच पटत नसे. म. गांधींची मते, विनोबाजींचे ब्रह्मचारी जीवन यांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यामुळे लैंगिक स्वातंत्र्याचा त्या निकराने विरोध करीत. पण पुढे पुढे त्यांना त्यात तथ्यांश दिसू लागला. हळूहळू त्यांचे मतपरिवर्तन होत होते.
मी पाहिले होते, अनुभवले होते की एकेकाळी साध्या वादातदेखील मतभेद बाईंना खपत नसे. लगेच त्या रुसून बसत. स्त्रीचा आपल्या देहावरचा पूर्ण अधिकार, पुरुषाशी पतीचे नाते न जोडता, मित्र म्हणून आचरण, सहजीवन, एकल पालकत्व, योनि-शुचित्वाची उपेक्षा ही मते आजचा सुधारक मधून श्री दिवाकर मोहनी, एक संपादक, एक संचालक-लेखक म्हणून नेहमी मांडत.
अशा वेळी डी.वाय.ना तुम्हाला हे चालते का, पसंत आहे का, असे प्रश्न विचारले जात. तेव्हा, ‘होय, मोहनी मला जे म्हणायचे तेच सांगत आहेत’ अशी हमी त्यांनी भरलेली आहे.
विवेकवादी नीतीसंबंधी अनेक गैरसमज आहेत. लैंगिक संबंधात मोकळेपणा असावा म्हणणारा माणूस स्वैराचारी असेल असा उतावळा निष्कर्ष काढला जातो. दारुबंदी नसावी असे म्हणणारा दारुडाच असला पाहिजे असे म्हणण्यासारखे हे आहे.
‘सत्यापरता नाहीं धर्म, सत्य हेंचि परब्रह्म!’ हे जर खरे असेल तर नाना धार्मिक होते. परब्रह्मोपासक होते. सत्यव्रत म्हणा की सत्यसाधना म्हणा केवढे मोठे तपाचरण आहे हे स्वतः करून पाहिले म्हणजे समजेल. नानांनी ते केले आहे.
दया धरम का मूल है,
पाप मूल अभिमान।
हे जर खरे असेल तर निरभिमानी नाना धर्म जगत होते. दयाबुद्धीने वागत होते याचा मी साक्षी आहे.
अठरा पुराणांचे सार तरी हेच ना की,
परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम् ।
परपीडाच काय परनिंदाही कटाक्षाने टाळून, होईल तेवढा परोपकार, प्रसंगी स्वतः ऋण काढून दुसऱ्यांची नड भागवत आलेले दि. य. मला माहीत आहेत. दि. यं. ना मी गेली चाळीस वर्षे जवळून पाहिले आहे. हे सारे सांगण्याचे कारण, टीकाकार त्यांना धर्मनिंदक म्हणत आले आहेत. त्यांनी धर्मनिंदा केली, ती स्वार्थी धर्माची. धार्मिकांच्या वाणिज्यवृत्तीची. नवस-सायास, स्तोत्रे-प्रार्थना, उपास तापास, तीर्थ-यात्रा, बुवा-बाबा, होम-हवन, गुरु-सेवा, पाद्यपूजा यांनाच धर्म समजणारे, आणि तोच आचरणारे लोक आत्मवंचना करतात. ‘भाळी टिळे माळा, पोटीं क्रोधाचा उमाळा’ ही धर्म-साधना नाही प्रतारणा आहे, असे ते म्हणत आले आहेत. लिहीत आले आहेत. भक्ती हे जीवनमूल्यच नव्हे अर्थात नीतिमूल्यही नव्हे असे ते जे कंठरवाने सांगत ते लोकरुचीला कडू वाटे. परोपकारः पुण्याय . . . हे जर खरे असेल, परोपकार जर नीती असेल तर स्वार्थी मोक्ष नीतीचा कसा ? असे त्यांचे म्हणणे असे.
नैतिक शिक्षण हे शालेय पाठ्यपुस्तकात धडे घालून किंवा कॉलेज अभ्यास-क्रमात एक विषय म्हणून ठेवून साधेल असे मानणे भाबडेपणा आहे. सॉक्रेटिसचा कोटिक्रम जितका महत्त्वाचा तितकेच त्याचे बलिदान महत्त्वाचे. न्यायदेवतेचा कौल पाळा असे प्रवचन महत्त्वाचेच पण त्याहून स्वतः घालून दिलेले उदाहरण जास्त प्रभावी ठरते. सॉक्रेटीसासारखे डी. वाय. नीतिधर्माचे कडक पालन करीत.
हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन हे एक छोटेखानी पुस्तक. मे. पुं. रेगे यांनी नवभारत मासिकाचे संपादकीय म्हणून लिहिलेल्या काही लेखांचे संकलन दि.यं. नी ते आ.सु. साठी समीक्षणाकरिता मला दिले. मी समीक्षण लिहून दिले. नंतर चार आठ दिवसांनी त्यांनी मला ते परत केले. मी म्हटले, का ? तर ते म्हणाले ‘आपल्याला हा लेख छापता येणार नाही. तुम्ही त्याचे (पुस्तकाचे) समर्थन केले आहे.’ मी म्हटले, ‘आपले मासिक मुक्त व्यासपीठ आहे ना ? प्रतिकूल मताचा आपण परिहार करू शकतो.’ यावर त्याचा प्रतिवाद करायला आपल्याकडे कोणी नाही.’ असे ते म्हणाले.
मी म्हटले, ‘तुम्ही करा.’ ते मला नको आहे असे म्हणून त्यांनी विषय संपवला. रेग्यांशी जाहीर वादविवाद त्यांना नको होता का?
आजचा सुधारक चे संपादक म्हणून त्यांच्याशी झालेल्या मतभेदाचा आणखी एक प्रसंग.
त्यां च्या पक्षाघाताच्या आजारपणात मोहनींसोबत एका अंकाचे संपादन, त्यांच्या मदतीशिवाय आम्हाला करायचे होते. मी पुण्याहून नुकताच परतलो होतो. नागपूरच्या एका गाजलेल्या पुनर्जन्माच्या कहाणीवर परामानसशास्त्राचे पुण्याचे अभ्यासक-संशोधक प्रा. व.वि. अकोलकर यांचा संशोधनपर निबंध संक्षेप करून आम्ही प्रसिद्ध केला. अकोलकरांना नागपूरची ही केस पूर्णतः समर्थनीय वाटली होती. मोहनींना व मला त्यांचा हा लेख आक्षेपार्ह वाटला नाही. परंतु तो प्रसिद्ध झाल्यावर एका पत्रलेखकाने आजचा सुधारक मध्ये असा लेख कसा येऊ शकतो म्हणून जोरदार हरकत घेतली. नानांनी मला ते पत्र दाखवले. मी उत्तरादाखल काही लिहिणार होतो ते त्यांनी नको म्हटले. मला हे खटकले. मी ताबडतोब आजचा सुधारक च्या संपादकमंडळाचा राजीनामा त्यांच्या सुपूर्द केला. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. नंतर अकोलकरांच्या शोधनिबंधातील त्रुटी दाखवणारे डॉ. प्रसन्न दाभोलकरांचे लेख मागोमागच्या दोन अंकांत आले. त्यांनी त्यांचे समाधान झाले असावे.
या प्रसंगाच्या थोडे आगेमागे असेल. नागपूरला एका महाविद्यालयाच्या वतीने प्रा. मे.पुं. रेगे यांची दोन व्याख्याने झाली. एक होते. “पुरुषार्थ’ या विषयावर आणि दुसरे होते ‘विवेकवादाच्या मर्यादा’ या विषयावर. यांतील दुसऱ्या व्याख्यानाच्या टेपवरून ते शब्दशः उतरवून घेऊन सिद्ध झालेला लेख त्यांनी अगत्याने स्वीकारला. पहिल्या विषयाचे प्रतिपादन मात्र त्यांना नको वाटले.
विवेकवादी जीवनपद्धती ही एकमात्र आदर्श जीवनप्रणाली तुम्ही समजता का, की इतरही जीवनशैली योग्य असू शकतील असे तुम्हाला वाटते, असा मी एकदा त्यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले की विवेकवाद ही एकमात्र उचित विचारसरणी आहे असे मी समजतो. धर्म, श्रद्धा, भूतदया इत्यादींमुळे घडलेले सदाचरण, परोपकाराचे कृत्य कृत्य म्हणून ठीक असेल पण तत्त्व म्हणून त्यात उणीव आहे. कर्माचा हेतू जोवर बुद्धिप्रामाण्य हा असत नाही, तोवर तो विवेकवादात बसत नाही. म्हणून धार्मिक, आध्यात्मिक किंवा अन्य उदात्त भावनांवर अधिष्ठित विचारप्रणाली आपण आदर्श म्हणून ग्राह्य समजू शकत नाही. गीतेमध्ये, भक्ति-ज्ञान-कर्म अशा कोणत्याही मार्गाने गेले तरी अंती मोक्षप्राप्ती होईल असे जे आश्वासन आहे तसे आपण म्हणू शकत नाही. आपल्यापाशी साधनानाम् अनेकता नाही. विवेकाशिवाय अन्य पंथ विद्यमान नाही, हे म्हणणे असहिष्णु नाही का या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, जिथे विवेकाला गौणत्व आहे ते काहीही आपल्याला मान्य नाही. विवेकाला अविवेकाचे वावडे आहे.
भक्ती हे मूल्य जीवनमूल्य म्हणून त्यांनी नाकारले होते. मग देशभक्ती, मातृभक्ती, मातृभाषाभिमान यांना नैतिक मूल्य देता येणार नाही हे त्यांना कबूल होते. सर्व भावनांवर, मग त्या कितीही चांगल्या असोत, अंकुश विवेकाचाच असला पाहिजे हे विवेकवादाचे मूलसूत्र आहे असे त्यांचे म्हणणे.
प्रोफेसर रेग्यांच्या लिखाणावरून आमची पुष्कळ चर्चा होई. धर्म हे एक सामाजिक वास्तव आहे. अख्खा समाज धर्म नाकारणारा असू शकत नाही, मग तो सुसंस्कृत नागर असो की वनवासी अनागर असो. धर्म जर असा अटळ आहे तर तो मुळात नाकारण्यापेक्षा त्यात सुधारणा कराव्यात, बदल सुचवावेत असे रेगे मत. धर्मकोशाचे जे कार्य वाई येथे स्वामी केवलानंदांच्या प्रेरणेने सुरू आहे त्या धर्मकोशात, धर्म कसकसा बदलत आला हे दाखविले आहे या प्रा. रेग्यांच्या प्रतिपादनाचा दि.यं.वर काही प्रभाव पडला नाही. त्यांना धर्मातीत समाज हवा होता. हा त्यांचा आदर्श अप्राप्य, असाध्य असेलही पण त्यांना अव्यवहार्य वाटत नव्हता. आदर्शाच्या उज्ज्वल स्वरूपात केलेली कोणतीही तडजोड त्यांना मान्य नव्हती.
पण दि.य. गुणग्राहक होते. रेग्यांचे चाहते होते. रेगे सत्तर वर्षांचे झाले त्या निमित्त त्यांच्या नकळत त्यांच्याबद्दल गौरवपर लेख लिहायचे ठरले. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर येथील आघाडीच्या पत्रांमध्ये आम्ही मंडळींनी ते लिहिले. दि.यं.नी आजचा सुधारक करिता मला वेगळा लेख लिहायला लावला. स्वतः लिहिलेल्या लेखात त्यांनी रेग्यांचे कार्य, त्यांचा व्यासंग आणि योग्यता मनमोकळेपणाने नावाजून त्यांच्यासमोर आपल्याला खुजे असल्यासारखे वाटते असे विनयाने लिहिले होते.
मतभेद होते. पण ते दोघे परस्परांची थोरवी जाणून होते. दि.यं. कडे पाहून “What a quality of scholarship!” असे रेगे नेहमी म्हणत. व्हिट्गेष्टाइन मुळातून समजावा यासाठी दि.य. जर्मन, स्वबळावर शिकले होते. रेगे कांटचे फाकडे जाणकार होते. दोघांचे तात्त्विक मतभेद होते पण विद्वानच विद्वानांचे परिश्रम जाणतात!
रेग्यांना भारतीय ज्ञान-परंपरेचे पुनरुज्जीवन हवे होते. सर्व पाश्चात्त्य तात्त्विक संकल्पना आपल्याकडे चर्चिल्या गेल्या आहेत. त्यांना वाटे, आपण, आधुनिक अभ्यासकांनी, आपल्या विद्या जिवंत ठेवल्या पाहिजेत. आमच्या पंडितांना अन् आचार्यांना पाश्चात्त्यांची प्रगती आपण अवगत करून दिली पाहिजे. हे कार्य रेग्यांनी पंडित फिलॉसॉफर प्रॉजेक्ट (झझझ) मार्फत सुरू केले होते. १० ते १५ दिवसांची अनेक अखिल भारतीय निवडक अभ्यासकांची शिबिरे घेतली होती. दि.य. नागपूर पुणे, गोवा, धर्मशाला (हिमाचल प्रदेश) येथील प्रशालेत सामील झाले होते. रेग्यांचे पाश्चात्त्य तर्कशास्त्रातले प्रावीण्य आणि भारतीय न्यायशास्त्रातील नैपुण्य त्यांना वादातीत वाटे. पण त्यांचा आशावाद विवाद्य वाटे. इकडे रेग्यांना धर्मावर सरसकट हल्ला नको होता. धर्मसुधारणा हवी होती. त्या माध्यमातून समाजसुधारणा होईल असे वाटत आले होते. ते आगरकरांपेक्षा न्या.मू. रानड्यांचा मार्ग पसंत करत होते. हिंदूधर्म बदलत आला , आजवर आला तसा पढेही बदलेल. म्हणन धर्म मळातच निद नका असे त्याचे म्हणणे. नानांचे मित्र रेगे कधीतरी मनुताईंच्या रोषाचे बळी झाले होते पण नानांनी त्यांची मैत्री तोडली नाही.
रा.भा. पाटणकर सौंदर्यशास्त्रावरील लिखाणामुळे इंग्लिश या विषयाबाहेरच्या अभ्यासकांना ओळखीचे झाले. ते मुंबईला विद्यापीठाच्या नोकरीत जाण्यापूर्वी अमरावतीला वि.म.वि.त होते. आपल्याला संशोधन-निबंध कसा लिहावा हे डी.वाय. नी शिकवले असे त्यांनी प्रसंगी लिहिले आहे. सौंदर्य-शास्त्रावरील आपला प्रसिद्ध ग्रंथ सिद्ध होत असताना त्यांची हस्तलिखित प्रकरणे त्यांनी डी.वाय.च्या अभिमतासाठी अमरावतीला पाठवावीत. तेथे प्राचार्य डॉ. सितांशु मुकर्जीच्या पुढाकाराने ‘इन परस्यूट ऑफ एक्सलन्स’ नावाचे एक व्यासपीठ काही दिवस तयार झाले होते. तेथे ही काही प्रकरणे वाचली गेली ती मी ऐकली आहेत.
वि.म.वि.त विभागप्रमुख म्हणून आम्हाला नानांचा फार आधार असे. त्यांना काही विचारताना कधी संकोच होत नसे. आपल्या अज्ञानाला हे हसतील अशी भीती नसे कोणाला हसणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. आम्ही तर त्यांचेच होतो. माझ्याबद्दल, तुम्ही त्यांच्याशी फार मोकळीक घेता, आम्ही विचारू धजत नाही ते तुम्ही खुशाल विचारता असे मनूताई मला म्हणत. एकदा मी त्यांना विचारले ‘नाना, तुम्ही फिलॉसॉफीत का आलात?’ त्याकाळी इंग्लिश, संस्कृत इ. विषयांना फार प्रतिष्ठा होती लोकमान्यता होती. त्यावर ते म्हणाले, मी उ.ए.च. गेरव चे Guide to Philosophy हे पुस्तक वाचले. त्याने मी इतका प्रभावित झालो की बी.ए. झाल्यावर तत्त्वज्ञानाचा अभ्यास हे आपोआप माझे ध्येय झाले.
नाना शिकवीत फार सुबोध. पण त्यांचे लेखन दुर्बोध वाटे. याचे कारण त्यांची परिभाषा. काटेकोर पारिभाषिक शब्द बनवण्याचा आणि ते सर्वत्र वापरण्याचा त्यांचा फार कटाक्ष होता. तुमच्या अंगी चिकाटी असेल तर त्यांच्या नेमकेपणाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल असे त्यांचे लिखाण. शैली अल्पाक्षर-रमणीय. संस्कृतचे ज्ञान सखोल. मित व्यय, मिताहार, मितविहार अशी संयमित दिनचर्या त्यांनी अंगी बाणवली होती. या अर्थी पारमिता हे त्यांचे जीवनमूल्य होते. त्यामुळे असेल त्यांनी आपले आरोग्य फार चांगले राखले होते. वयाच्या जवळजवळ ऐंशी वर्षांपर्यंत, गुडघे निकामी होईपर्यंत नियमित फिरायला जाणे कधी चुकले नाही. इतर कुठलाही व्यायाम-योगासने इ. त्यांनी केला नाही. पन्नाशीपर्यंत पान खात. अल्पसा तंबाखू घातलेले चिटुकले पान. पण रक्तदाब उद्भवल्यावर त्यांनी ते क्षणात सोडले. पुढे सुपारीही सोडली. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी एखादे पेपरमिंट चघळत. ग्रीन लेबल चहा त्यांच्या आवडीचा. घरी आलेल्या पाहुण्यांना तो ट्रे, टी-पॉटमधला पातळ चहा देत. एवढा सुगंधी महागडा चहा लोकांना रुचत नाही तर कशाला देता असे बाईंनी म्हटले तर त्यावर त्यांचे उत्तर असे, ‘मला त्यांना एक अन् आपल्याला एक हा भेदभाव वाटतो. मानसन्मान, प्रसिद्धी, पदे, धनदौलत यांनी ते कधी मोहित झाले नाहीत. १९७५ साली त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी, आम्ही चाहत्यांनी नागपूरला विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात त्यांचा भव्य गौरव केला तो बळेबळेच. मुंबईहून रेगे-पाटणकर आले होते. नागपूरचे डॉ. वा.शि.उर्फ दादासाहेब बार्लिंगे मुख्य होते. गणितज्ज्ञ डॉ. भास्कर फडणीस सत्कार समितीचे अध्यक्ष होते. दिल्लीहून डॉ. सुरेन्द्र बार्लिंगे ऐनवेळी अडचण आल्यामुळे येऊ शकले नाहीत. पण ही सत्काराची मूळ प्रेरणा त्यांचीच होती. आयुष्यातला प्रथम जाहीर गौरव, मनुताईंनी भाग पाडले म्हणून त्यांनी स्वीकारला होता. त्यावेळी मिळालेल्या थैलीतून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील जी.ई.मूर (G. E. Moore) च्या तीन प्रसिद्ध निबंधाचा मराठी अनुवाद हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.
नाना-नातूबाई या जोडप्याचे प्रेम आख्यायिका व्हावे या कोटीचे होते. नानांना कित्येक गोष्टी करायच्या होत्या, हव्या होत्या, त्या त्यांनी बाईंसाठी केल्या नाहीत. सोडल्या. उदाहरणच द्यायचे झाले तर एक घर! आपले स्वतःचे घर, सुंदर छोटी फुलबाग त्यांना हवी होती. आपल्यानंतर कोणा विद्यार्थ्यांनी मनावर घेतले तर हे घर ‘प्लेटोची अलरवशा’ व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह मोठा. फार चोखंदळपणे निवडलेले तत्त्वज्ञानातील ग्रंथ आणि नामांकित रिसर्च जर्नल्स यांचा उपयोग करावा असे एक स्वप्न! त्यांच्या हयातीत त्यांच्या घरी भाड्यांच्याच घरी. अॅकेडेमीसारख्या अॅक्टिव्हिटीज आम्ही केल्या. त्यांना ही एक कायमस्वरूपी व्यवस्था झाली तर हवी होती. एरवी नानांनी केल्या नसत्या अशाही काही गोष्टी त्यांनी केवळ बाईंसाठी केल्या. अप्रियता सोसली, अपवाद घेतला. पण बाईंच्या सहजीवनाचा निरतिशय आनंद त्यांना होता, यात वाद नाही. आपल्या आजारी जीवनसाथीची निष्ठेने सेवा करणे, त्याला खरीखुरी साथ देणे हे कर्तव्य भारतीय स्त्री सदैव करत आली आहे. समतावादी पतीनेदेखील पत्नीची ती, तशीच केली पाहिजे हा तर्कशुद्ध युक्तिवाद होता. मनुताईंचे दुखणे केवळ शारीरिक नव्हते हे त्यांना पूर्णपणे ठाऊक होते.
मनुताई वारल्या हा त्यांच्यावर कुठाराघात होता. ह्यातून ते मोठ्या कष्टाने सावरले. कित्येक दिवस-महिने बाईंच्या नुसत्या नामोच्चाराने त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू येत. बाईंच्या इच्छेवरून त्यांचा सुंदर ग्रंथसंग्रह नागपूरच्या विदर्भसाहित्य संघाच्या ग्रंथालयाला भेट देण्यात आला. त्यावेळी श्री. राम शेवाळकर अध्यक्ष होते. ते बाईंचे विद्यार्थी. स्वतः घरी आले. बाईंच्या आठवणी काढल्या नानांना अश्रुपूर अनावर झाला. शेवाळकर कावरेबावरे झाले. मग नानाही सावरले बाईंच्या निधनानंतर महिना पंधरा दिवस ते बाईंच्या बहिणीकडे राहून स्वगृही आले. वाचन लेखनात मन रमवू लागले. त्याचवेळी नवा सुधारक ची कल्पना त्यांच्या मनात घोळू लागली. त्यांना थोडा विसर-विरंगुळा म्हणून दोनेक महिने दुपारी त्यांच्याकडे जाण्याचा प्रघात आम्ही ठेवला. त्यांची भावजय डॉ. सुनीती देव अन् मी, मे-जून मध्ये दुपारी त्यांच्याकडे जात असू. सुनीती त्यांच्यासाठी दुपारचे खाणे सोबत आणीत असे. त्यांचा पुत्रवत् भाऊ बाळ अन् भावजय सुनीती यांनी त्यांना त्या दुःखातून बाहेर काढले तो त्यांचा पुनर्जन्मच म्हटला पाहिजे. दोन वर्षांनी १९९० साली नवा सुधारक चा जन्म झाला.
ब्राऊनिंग डी.वाय.चा आवडता कवी होता. त्याच्या ओळी आहेत
Shall life succeed in that it seems to fail What I aspired to be, And was not, comforts me: A Brute I might have been, But would not sink i’ the scale.
त्यांचा आत्मा! आत्म्याला शांती मिळो हे म्हणणे खोटा उपचार होईल. त्यांचा आत्म्यावर विश्वास नव्हता.
१६, शान्तिविहार, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाईन्स, नागपूर ४४० ००१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.