मी कृतज्ञ आहे

प्रा. दि. य. देशपांडे (यांचा उल्लेख ह्यापुढे ‘नाना’ असा करू) यांची माझी ओळख कशी आणि कधी झाली हे आठवत नाही. १९८५ च्या सुमारास माझ्या कुटुंबात आलेल्या एका संकटामुळे मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो. त्यावेळी मनुताई आणि नाना ह्या दोघांनी मला भक्कम पाठिंबा दिला आणि सर्वतोपरी साहाय्य केले. साहजिकच माझे त्यांच्याकडे जाणेयेणे वाढले. मी केलेले काही लेखन त्या अवधीत मी त्यांना दाखवले आणि मनुताई गेल्यानंतर दोन वर्षांनी ‘नवा सुधारक’ काढण्याच्या वेळी त्यांनी मला बोलावले. त्या अंकांच्या मुद्रणामध्ये मी त्यांना मदत करू लागलो. ‘नवा सुधारक’च्या पहिल्याच अंकात मी लिहिलेले एक पत्र त्यांनी प्रकाशित केले आणि मला माझ्या मनातल्या विषयांवर लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. माझे आरंभीचे सर्व लिखाण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेल्या उत्तेजनामुळे झाले. कधीकधी माझ्या लेखामधला एकएक शब्द घेऊन ते त्यावर चर्चा करीत आणि त्याऐवजी दुसरा शब्द कसा योग्य होईल तेही मला सांगत. या मासिकाच्या संपादकीय धोरणाविषयी ते माझ्याजवळ मनमोकळेपणाने बोलत आणि तो भाग मला लिहून काढायला सांगत. याप्रमाणे त्यांच्या संपादकीय लेखांचा काही अंश त्यांनी माझ्याकडून लिहवून घेतला आहे.

धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्या विषयावर विशेषांक काढावयाचा असे ठरवल्यानंतर मी सहज त्यांच्याजवळ म्हटले की त्यासाठी केलेल्या रूपरेषेच्या बाहेरचे काही मुद्दे माझ्या मनात घोळत आहेत. तेव्हा त्यांनी मला ते सारे लिहून काढण्याची आज्ञाच केली. कधी माझा लेख पूर्ण होण्याला विलंब झाल्यास ते टुमणे लावीत आणि माझ्याकडून तो वेळेत पूर्ण करवून घेत. त्यांच्या आज्ञेवरूनच मी काही पुस्तकपरीक्षणेही केली.

लवकरच माझे नाव त्यांनी सल्लागार मंडळात सामील करून घेतले आणि माझा बहुमान केला. मी व्यवसायाने एक मुद्रक. माझी भाषा कच्ची, तर्कशुद्ध मांडणीने परिपूर्ण असे लेख लिहिण्याची मला सवय नव्हती. बाकीचे सारे सल्लागार हे नामवंत प्राध्यापक होते. त्यांच्या पंक्तीत त्यांनी मला नेऊन बसवले. आठवड्यातून ३-४ दिवस संध्याकाळी मी त्यांच्याकडे जाऊन बसत असे आणि ते माझ्याशी गप्पा मारत, निरनिराळ्या विषयांवर चर्चा करीत.

माझ्या पहिल्या पत्राच्या निमित्ताने त्यांच्याकडे एक अत्यंत हीन अभिरुचीत लिहिलेले पत्र आले. ते प्रसिद्धीसाठी नव्हते. धमकीवजा होते. तरीही त्यांनी संपादक या नात्याने ते प्रसिद्ध केले आणि माझ्याकडून त्याला उत्तर लिहवून घेतले. ते उत्तर, त्यात कानामात्रेचा फरक न करता, जसेच्या तसे त्यांनी छापले. इतकेच नव्हे तर माझ्या पत्राला आरंभी संपादकीय टिपण लिहून माझ्या लिखाणाला पाठिंबा दिला. त्यातला काही भाग उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाही. “पुढे दिलेले पत्र आम्ही छापणार नव्हतो, त्यातील भाषा असभ्य आणि अभिरुची हीन आहे याची जाणीव आम्हाला आहे………… मनुष्य सात्त्विक संतापाचा बुरखा पांघरून कोणत्या पातळीवर उतरू शकतो हे आम्हाला वाचकांना दाखवायचे होते एवढेच नव्हे तर दृष्ट हेतूने डिवचले गेल्यानंतरही त्याला किती सभ्य आणि संयमी भाषेत उत्तर देता येते ह्याचे प्रात्यक्षिकही लेखकाला दाखवायचे होते.” इत्यादी.
आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात आणखी एक घटना घडली. तिच्यामुळे रूपा कुळकर्णी सल्लागार मंडळातून बाहेर पडल्या. त्यावेळीही नानांनी संपादकीयाचा मसुदा मला करावयाला लावला. आपले कोणतेही भांडण व्यक्तीशी नको, विचारांशी पाहिजे, व्यक्तिगत उखाळ्यापाखाळ्यांपासून संपादकीय धोरण दूर ठेवले पाहिजे ह्याचा वस्तुपाठ त्यांनी मला तेव्हा दिला. नानांनी मला उपसंपादकाची कामे करावयाला लावून मला घडविले.

नानांचे मुद्रितशोधनही आदर्श असे. शुद्ध मुद्रणाबद्दल ते अतिशय आग्रही असत. पहिल्या अंकाच्या वेळी बरेच मुद्रणदोष राहून गेले; कारण ज्यांनी ते काम केले त्यांना काटेकोर काम करण्याची सवय नव्हती. नानांनी अंकासोबत दिलगिरीची चिठ्ठी जोडण्याची सूचना मला केली. ती मी अमलात आणली. आपण केलेली चूक खिलाडूपणे मान्य करावयाला मी नानांकडून शिकलो. नानांच्या लेखनात विरामचिह्नांचा जो वापर होता त्यापासूनही मी बरेच काही शिकलो. त्यांच्या भाषेला अभिजात मराठीचे वळण होते. नवा सुधारकच्या पहिल्या अंकापासून बाण्ड रसेलच्या Marriage & Morals या ग्रंथाचा मनुताईंनी आणि नानांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध होऊ लागला. तो वाचून माझ्या स्त्रीमुक्तीविषयीच्या कल्पना आणखी स्पष्ट झाल्या. त्याच सुमारास वसंतराव कानेटकर ह्यांच्या एका पत्राला मी उत्तर तयार केले ते नानांनी प्रकाशित केल्यामुळे माझी त्याबाबतची मते प्रकटपणे मांडण्याचे धैर्य मला आले. पुढे मी त्या विषयावर खरी स्त्रीमुक्ति कशात आहे ह्या नावाची एक लेखमालाच लिहिली. पुढे तर संपादकत्वाची सगळी सूत्रेच त्यांनी माझ्या स्वाधीन केली. मी संपादक असताना अमेरिकेहून एक लेख आला. त्यामध्ये नानांवर जहाल टीका होती. (ती अनाठायी आणि निष्कारण होती हे मला दिसत होते.) तो लेख मी अर्थातच सगळ्या संपादक मंडळाला दाखविला. बहुतेक सगळ्यांनी तो प्रकाशित करू नये असे सांगितले पण नानांनी तो प्रसिद्ध करावयास संमती दिली. ती त्यांच्या खिलाडूपणाची कसोटीच होती आणि त्या कसोटीला ते बावन्नकशी उतरले. ह्या साऱ्या घटनांपासून मी पुष्कळ काही शिकलो.

नानांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची शब्दांची निवड. इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे करताना ते पुष्कळ नवीन शब्द वापरीत. योग्य संस्कृत शब्दांचा चपखल वापर कसा करावा ते त्यांच्याकडून शिकावे. Hypothesis साठी ते उपन्यास हा शब्द वापरीत. उपन्यास ह्याचा अर्थ नजीक ठेवणे. A Priori साठी बाकीचे लोक अनुभवपूर्व हा शब्द वापरीत तर नाना त्यास प्रागनुभविक म्हणत. असे कितीतरी शब्द सांगता येतील. इंग्लिश शब्दाच्या अर्थाची नेमकी छटा कशी व्यक्त करता येईल ह्याचे चिंतन त्यांच्या मनात सतत चालत असे. Oxford Concise Dictionary आणि वामन शिवराम आपटे ह्यांची The Student’s English Sanskrit Dictionary नेहमी त्यांच्या हाताशी असे.
त्यांनी बरदँड रसेलच्या A Free Man’s Worship ह्या निबंधाचा केलेला अनुवाद मराठी गद्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तो आ.स.च्या दुसऱ्या वर्षाच्या प्रारंभीच्या अंकामध्ये आहे. त्या अनुवादामध्ये त्यांची इंग्लिश आणि मराठीवरील पकड शब्दांशब्दांतून जाणवते. नानांची इंग्रजी पुस्तके मी वाचली नाहीत. त्यांचे मराठी लेखनच आणि तेही अलिकडचेच मी वाचले आहे. पण तेवढ्या वाचनामुळे शब्दांचा विचार करण्याचा मला नाद लागला. मलाही काही नवे शब्द सुचू लागले. मला नानांचा सहवास घडला नसता तर मी आजच्यापेक्षाही जास्त उणा राहिलो असतो. नानांचे माझ्यावर मी कधीही फेडू शकणार नाही असे ऋण आहे. मी त्यांचा सर्वतोपरी कृतज्ञ आहे.

मोहनी भवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर ४४० ०१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.