To Sir, With Love

नाना म्हणजे माझे लॉजिकचे प्रोफेसर डी.वाय.देशपांडे उर्फ डी. वाय. ते गेल्याचा ३१ डिसें. २००५ च्या सकाळी सुनीतीचा फोन आला अन् मला रडूच कोसळले. सारा दिवसभर नानांच्या विविध आठवणी मनात दाटून येत होत्या आणि कोणत्याही विवेकाला (विवेकवादाला ?) न जुमानता डोळे भरून, भरून येत होते. १०/१२ दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेले असतांना त्यांची भेट घेतली होती. तेव्हा ते प्रसन्नपणे, मोकळेपणाने बोलले होते. जवळजवळ चार वर्षांनी आम्ही भेटलो होतो. पण नव्वदी गाठत आलेल्या नानांची स्मृती तल्लख होती, विनोदबुद्धी शाबूत होती आणि आपल्या परंपरागत (खास ब्रिटिश धाटणीच्या) तत्त्वज्ञानावरचा प्रगाढ विश्वासपण तसाच कायम होता. त्यांनी ‘वर्य’ मानलेल्या विचारसरणीतील जॅक्स दरिदा हा माझा आवडता. आणि त्यावर बोलायला मी आले आहे असे म्हटल्यावर; ‘त्यांना आम्ही वर्ण्य मानले आहे’, असे त्यांनी मला ठणकावून सांगितले. मी म्हटले, ‘आम्ही त्यांना मानले आहे.’ त्या शाब्दिक कोटीला त्यांनी दाद दिली. विविध गप्पा झाल्या. त्यांच्या खोलीत लावलेल्या, शुष्कपर्णपुष्पांतून बनवलेल्या मांजरीच्या चित्रावर, ‘हीच ती फिलॉसफीमधली प्रसिद्ध मांजर काय?’ असे मी विचारले, अन् नाना त्यावर खूष होऊन अगदी मनापासून हसले. एकूणच वातावरणात दिलखुलास प्रसन्नता जाणवत होती. मधूनच ‘माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय, मी अगदी तयार होऊन बसलोय, पण कुणाला ते दिसत नाहीत’ अशी अपराधभावना, दिलगिरी परतपरत डोकावून जात होती. (मी मनात म्हटले, ‘नाना, तुमच्या विश्वपरिप्रेक्ष्यात असा ‘कुणी’ दखल घ्यायला बसलेला आहे का ?’) खरे तर काही अंशी परावलंबी झालेल्या इतर सर्व वृद्धांना जी खंत वाटत असते ती नानांना वाटणे स्वाभाविक होते. पण नानांनी स्वतः कितीजणांकरता असा त्रास, अशी रुग्णसेवेची बांधिलकी स्वीकारली होती हे काय आम्हाला माहीत नव्हते का ? वृद्ध आई-वडील, नाजुक रुग्णसमीप अवस्थेतील पत्नी नातूबाई अशा तीन जणांच्या हाकेला तत्त्परतेने प्रतिसाद देण्याची त्यांची लगबग मी पाहिली होती. अमरावतीला विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील त्या भल्या मोठ्या बंगल्यातील कोणत्याशा खोलीतून कण्हण्याचा आवाज यावा, बेल वाजावी, नानांनी ताबडतोब काय ते करावे आणि पुन्हा आपल्या वाचनात ज्ञानसाधनेत मग्न व्हावे. एखाद्या स्थितप्रज्ञाच्या अचल निष्ठेतून वर्षानुवर्षे हे चालू होते. ही जवळजवळ अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही प्रत्यक्ष पाहिली आहे म्हणून खरी मानायची.
नानांचा धीरोदात्तपणा, ज्ञानसाधना, ज्ञानमग्नता, विचारातील व वाणीतील पारदर्शकता, (इंग्रजी वा मराठी दोन्ही सारख्याच लीलेने हाताळणाऱ्या दर्मिळ लोकांपैकी ते एक. त्यांच्यापासन इंग्रजीच्या प्राध्यापकांनी उच्चार शिकायला हरकत नव्हती.) तर असे हे असामान्य विद्वानाचे गुण एका बाजूला आणि दुसरीकडे संसारातील विविध आपत्तींशी सतत सामना, स्वतःच्या संसारात अपरिहार्यपणे आलेली एक पोकळी…. सारे, सारे नाना एखाद्या शोकांतिकेच्या नायकासारखे पेलून धरत. प्रकाण्ड पांडित्य असूनही, मला वाटते
नानांजवळ आजच्या युगात लागणारी सेल्समनशिप नव्हती; थोडीशी सवंग लोकप्रियता Currency मिळविण्याकरिता लागणारी स्वभावाची लवचिकता नव्हती; स्वतःची प्रौढी मिळवण्याची तर सवयच नव्हती. ते अगदी सॉक्रेटिसइतकेच एकांडे शिलेदार होते आपल्या प्लेटो, क्रीटो, फिडो अशा निवडक शिष्यगणांसह आपल्या विचारधारेचा आग्रही आणि अविरत पाठपुरावा करीत राहणारे.
१९५५ ते १९५७ या काळात त्यांनी मला ‘लॉजिक’ हा विषय इंटरआर्टस्च्या परीक्षेकरिता शिकवला. पुढे बी. ए. ला मी तत्त्वज्ञान घेतले नाही म्हणून ते थोडेसे नाराजही झाले होते. (मला आजही, पद्धतशीरपणे मी तत्त्वज्ञानाचा अभ्यास न केल्याचा पश्चात्ताप अधूनमधून होत असतो. . . . . पण मग कदाचित् मीही दरिदाकडे वळलेच नसते, त्याच्या वाटेला गेले नसते . . . . . की तरीही गेले असते?) नानांचा तास शनिवार सोडल्यास रोजच असे.. ; चांगला ४०/४५ मुलांचा, भरलेला वर्ग होता तो. टंगळमंगळ अजिबात चालायची नाही. ओळीने प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात येईल. चूक, बरोबर काहीतरी उत्तर देणे भाग होते,नाही तर वर्ग सोडून जाण्याची शिक्षा होती. या वर्गाला लॉजिकमधील उद्गमन, निगमनाच्या मूलभूत मांडण्या शिकवणे ही गोष्ट सोपी मुळीच नव्हती. किती सहजपणे, किती हसतखेळत, सतत मिस्किल विनोदाची पेरणी करीत, तत्त्वज्ञानाच्या परिसरातील विविध तत्त्ववेत्त्यांच्या मजेशीर आख्यायिका सांगत (उदा. लाइनित्स व जिच्या प्रेमात तो पडला ती स्त्री) नाना आपला विषय शिकवीत असत. ते अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. शिक्षक म्हणून नाना अद्वितीय होते, शिस्तप्रिय होते पण तितकेच लोकप्रियही होते. त्यांची लेक्चर्स म्हणजे मेजवानी असे. ते तास मी जेवढे एन्जॉय केले तेवढे दुसऱ्या कोणत्याही विषयाचे केले आहेत असे मला वाटत नाही. शिकवायचे कसे याचे ते मूर्तिमंत वस्तुपाठ होते. माझ्या करिअरमध्ये जर शिक्षक म्हणून मी काही थोडेफार यश मिळवले असेल तर त्याचे खूपसे श्रेय नानांना जाते. आणि शाळेतील इंग्रजीच्या इंदु खरे बाईंना. बहुधा खरेबाईंचा प्रभाव अधिक ठरून मी इंग्रजीकडे वळले. आणि अर्थात शिक्षक आईवडील. घरात माझ्या वडलांच्या तर्कशुद्ध, संयमी वागण्याचे धडे सतत डोळ्यांसमोर होते आणि घराबाहेर कळू लागल्यानंतरच्या वयात कॉलेजच्या काळात नानांचे. या दोघांनी बुद्धिवादाच्या रणरणत्या अथांग वाळवंटाच्या वाटेवर, अलगद बोट धरून मला उतरवले आणि कितीही रखरखाट असला तरी bad faithMo भाकड आश्रय घ्यायचे नाहीत हे तर ठरूनच गेले. अर्थात् bad faith ही संज्ञा डी.वाय.ना पसंत पडलीच नसती. कारण सार्च हाही अव्वल काय, दुय्यम दर्जाचासुद्धा तत्त्वज्ञ मानला गेलेला नाहीच आहे. “एक bad faith आणि दुसरा काय, good faith?’ असं विचारून त्यांनी त्यातली हवाच काढून घेतली असती.
नानांच्या तासाला हमखास हजर असणारे ते सर्व काळे कावळे (जरी सर्व कावळे काळे आहेत याची खातरजमा कोणीच करू शकला नसला तरी), ती समस्त मर्त्य माणसे, केवळ माणूस असल्यामुळे मर्त्य ठरलेला तो अमर्त्य सॉक्रेटिस, दिवसासुद्धा हातात कंदील घेऊन, प्रामाणिक माणसाचा शोध घेत सर्वत्र फिरणारा डायोजनीझ् आणि सतत अश्रू ढाळणारा हताशमुख ॲरिस्थनीझ् (दोघेही सिनिक तत्त्ववेत्ते), हे सारे अगदी सहजपणे माझ्या विचारविश्वाचा भाग झाले.
नाना प्राध्यापक म्हणूनच जगले. आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि जाणिवेचा प्रत्येक कण, आपल्या विषयाशी, आपल्या विचारधारेशी, आपल्या व्यवसायाशी, आपल्या ग्रंथांशी, प्रामाणिक राहूनच जगले. सोसाव्या लागलेल्या बऱ्यावाईट प्रसंगांनी अधिकाधिक अंतर्मुख होत गेले असेही वाटते. त्यांना मोजकेच मित्र होते. आता त्यातले एकदोनच उरले आहेत अशी खंतही त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवली. खूप भरभरून बोलण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. थोडेसे रिझर्व्ह म्हणावे असेच त्यांचे व्यक्तित्व होते. त्यातही त्यांनी गाठलेली विद्वत्तेची उंची त्यांना आपसूकच लोकांपासून जरा दूर ठेवीत असे. त्यांचा दबदबा वाटत असे. त्यांच्याकडे पाहिल्यावर, त्यांच्या निम्म्यानेसुद्धा ज्ञाननिष्ठा, निरलसता, आपल्याजवळ नाही ही बोच मनात निर्माण होत असल्याने, आमच्यासारखे लोक, एक आदरयुक्त अंतर ठेवूनच त्यांच्याशी वागू शकत. निवृत्ती हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हता, नातूबाई गेल्यानंतर, आजचा सुधारक सारखे निव्वळ विवेकवादाला वाहिलेले मासिक काढून, त्याची वाचकसंख्या सतत वाढती ठेवून, नानांनी अशा कठीण वाटेवरतीही मासिक नियमितपणे चालवता येते हे दाखवून दिले. प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण केली. मी त्यांना १६ डिसें. ला भेटले तेव्हाही त्यांच्या हातात पुस्तक होते आणि अगदी शेवटच्या क्षणीही प्राध्यापक कसा असावा, त्याने कसे बोलावे, कसे वागावे, कसे राहावे, कसे जगावे, कसे शिकवावे अशी (स्थितप्रज्ञ) प्राध्यापकाची सर्व लक्षणे नानांमध्ये एकवटली होती. माझे नशीब म्हणून ते हयात असताना (१९९८ मध्ये) त्यांच्यावर एक आदर व्यक्त करणारे व्यक्तिचित्रण लिहिण्याची बुद्धी मला झाली. नानांनी बाण्ड रसेलच्या श्रद्धांजली कार्यक्रमात (१९७०) जे शब्द उच्चारले होते त्यांनीच या आदरांजलीचा शेवट करते.
‘‘साधारणतः कोणी मृत झाले की (दिवंगत’ या शब्दालाही आक्षेप होता) त्याच्या आत्म्यास शान्ती मिळो अशी प्रार्थना करण्याचा प्रघात आहे. पण रसेलच्या बाबतीत अशी प्रार्थना करणे शक्य नाही कारण त्याचा ‘आत्मा’ या संकल्पनेवर विश्वासच नव्हता.”
आसावरी उ-४, सहवास सोसायटी, लेन नं.१, नवसह्याद्री, पो. ऑ. कर्वेनगर, पुणे ४११ ०५२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.