विवेकवादी मनुष्याला रडूही येते!

एकोणीसशे ऐंशी-ब्याऐंशीच्या सुमाराला मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर विभागाने अंधश्रद्धा, देवभोळेपणा वगैरे विषयांशी संबंधित एक परिसंवाद भरवला. त्या काळचे धनवटे रंग मंदिर पूर्ण भरले होते. सहभागी वक्त्यांमध्ये अनेक ख्यातनाम माणसे होती. सर्वात प्रभावी भाषण झाले ते मात्र अतिशय सौम्य शैलीतले आणि अगदी साध्या दिसणाऱ्या माणसाचे. हे होते प्राध्यापक दि.य. देशपांडे विदर्भात ‘दिय’, ‘डीवाय’ किंवा क्वचित् ‘नाना’ म्हणून उल्लेखले जाणारे तत्त्वज्ञ. दिय आणि त्यांच्या पत्नी मनूताई नातू यांच्या कहाण्या विदर्भात, विशेषतः अमरावतीत, प्रेमादराने सांगितल्या जात आजही कधीकधी अशा कहाण्यांच्या ‘फटाक्यांची माळ’ एखाद्या संध्याकाळच्या गप्पासत्राला उजळवून जाते.
दियंच्या भाषणात आवेश-अभिनिवेशाचा मागमूस नव्हता. हातवारे, आवाजातले चढउतार, अशा क्लुप्त्या-युक्त्या नव्हत्या, श्रोत्यांना ‘मंत्रमुग्ध’ करून टाकण्याचा सुप्त आढ्यताखोरपणा नव्हता. अलंकारिक भाषेची मांडणीला धूसर करणारी कलाकुसर नव्हती. आल्डस हक्स्लेने सल्ला दिला आहे की, की चांगल्या वक्त्यापासून सांभाळून राहावे, कारण तो न पटण्याजोग्या गोष्टी आडवाटेने गळी उतरवू शकतो! असली सावधगिरी बाळगण्याची दियंचे भाषण ऐकताना गरज नव्हती. बहुधा यामुळेच दियंच्या भाषणाला इतरांच्या भाषणांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.
दियंचे भाषण ही तशी दुर्मिळ घटना होती. खरे तर मला त्यांचे इतर एखादे जाहीर भाषण ऐकल्याचेच आठवत नाही. पण मूठभर लोकांशी बोलताना, अगदी एकाशी एक बोलतानाही दिय ज्या पद्धतीने बोलत, तसेच ते धनवटे रंग मंदिरातल्या आठनऊशे माणसांशी बोलले होते. भारतात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक, तोही निवृत्त, तोही विवेकवादी ; हा कस्तुरचंद पार्क किंवा शिवाजी पार्कावर भाषणे देत नाही. पण जर ती वेळ आली असती तरी दियंच्या भाषणाच्या शैलीत बदल झाला नसता. माणसे शहाणी असतात असे मानून एकाने आपले म्हणणे दुसऱ्यापर्यंत टप्प्याटप्प्याने, उदाहरणे देत, ‘प्रमाणे’ ठरवत, तर्कशुद्धपणे पोचवावे, या विचारांवर बेतलेली ती शैली होती. त्यात श्रोत्यांची संख्या महत्त्वाची कशी असणार!
दियंची भाषणाची शैलीच त्यांच्या लिखाणात दिसते पण काही बदल केलेलेही जाणवतात. वरवर पाहता ‘मेणाहूनि मऊ’ शैली आहे. तिच्या वापराने मांडले जाणारे मुद्दे मात्र हिऱ्यांसारखे कठीण आहेत. कठीणपणा हा हिऱ्याचा एकुलता एक गुण नाही. हिरा हा पदार्थ प्रकाशाच्या किरणांचे तीव्र वक्रीभवन करतो इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा जास्त. यामुळे हियात शिरलेले प्रकाशकिरण सहज बाहेर पडू शकत नाहीत. ते आतून एखाद्या पृष्ठभागाला पोचले की परावर्तित होऊन आतच टोलवले जातात. या प्रकाराला ‘टोटल इंटर्नल रिफ्लेक्शन’ म्हणतात. आणि पैलूदार हिऱ्याची भूमिती अशी असते की हे वारवार होऊन लहानसाही प्रकाशकिरण हिऱ्याचं संपूर्ण अंतरंग उजळवून टाकून मगच बाहेर पडतो. हिऱ्याचा ‘लखलखाट’ हा या वारंवार होणाऱ्या ‘संपूर्ण अंतर्गत परावर्तना’मुळे उद्भवतो. चांगला योग असा की ‘रिफ्लेक्शन’च्या मराठी अर्थांमध्ये विचार करणे, मनन करणेही आहे. दियंच्या विचारांमध्ये प्रत्येक संकल्पनेचे अगदी टोकाचे उपार्थ शोधणे, त्यांचा अनेक पैलूंनी तपास करणे, त्यांना पूर्णपणे आत्मसात करणे, सखोल मनन हे सारे हियांचे गुण दिसतात. रेखीव पैलूदारपणा. भावनांना ‘हात घालणे’ नाही. उगीच विनोद आणि त्याला ‘कारुण्याची झालर’ लावणे नाही, शब्दबंबाळ अलंकरण नाही. नाट्यमय शैलीने विचारांची पोकळी झाकणे नाही. प्रत्येक शब्द वापरताना त्याची शक्य तितकी काटेकोर व्याख्या करावी, शब्द नसल्यास घडवावे, तरीही व्याख्या देता न आल्यास तसे कबूल करावे. अगदी ‘ज्ञान’ ह्या संकल्पनेचीही नेमकी व्याख्या देता येत नाही, हे दिय सहजपणे मान्य करीत. इतक्या व्यासंगी तयारीनंतर काटेकोर तर्कशुद्ध रीतीने आपले म्हणणे समजावून देणे त्यांना सोपे जाई. पण मराठीत, बहुधा इतर भाषांमध्येही वाचकांना येवढा काटेकोरपणा काहीसा अपरिचित असतो.
विद्यार्थ्यांनी, विशेषतः तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन आणि अभ्यास केलाच पाहिजे, हा त्यांचा आग्रह असे. विद्यार्थी आला आणि त्याने ढीलाढाला प्रश्न केला ; दियंनी अर्धाएक डझन पुस्तके अभ्यासायला सांगितले आणि विद्यार्थी परत फिरकलाच नाही, या रूपरेषेच्या कहाण्या भरपूर आहेत. दियंचे स्वतःचे वाचन, त्यासाठी गोळा केलेला स्वतःचा ग्रंथसंग्रह, हेही बहुतांश महाविद्यालये आणि काही विद्यापीठांनाही ओशाळे करेल. पण याबाबत प्रौढी मिरवणे किंवा दिपवून टाकणे नसे.
सहासात वर्षांपूर्वी एका वाचकाने धाडफाड संदर्भ देत “हे तुम्ही वाचले तरी आहे का ?” असा उर्मट प्रश्न विचारला. दियंनी उत्तर दिले नाही, पण त्यांना ते बहुतेक संदर्भ माहीत होते. त्यांनी ते अभ्यासून बाजूला सारले होते. अमुक एका पंथाच्या तत्त्वज्ञांबद्दल “माझे मत फारसे अनुकूल नाही’, येवढ्याच उत्तरावर ते प्रकरण दियंनी हातावेगळे केले. तो वाचक मात्र उथळ पाण्याच्या स्वभावानुसार काही वर्षे ‘खळखळाट’ करत राहिला! एकूणच न पटणाऱ्या मांडण्यांबद्दल दियंच्या प्रतिक्रिया सौम्य असत. “मत अनुकूल नाही”, ”गद्यात सांगता आले तर’, अशा प्रतिक्रिया ते देत. “मला समजत नाही आहे” ही पुढची पायरी आणि “ह्याला काय म्हणावे ?’ ही टीकेची सर्वांत कठोर पायरी! पण पर्यायी मांडणी आग्रहाने मांडली जात असे. समोरच्याचे म्हणणे कधीही ‘उडवून लावले’ जात नसे. आम्हा नंतरच्या आजच्या सुधारक च्या संपादकांना हे अडचणीचे ठरले आहे, कारण दियंचा संयम आम्हाला पुरेसा गाठता आलेला नाही.
पण हा संयत, आग्रही काटेकोर प्रकार अनेकांना ज्यादाच तर्ककर्कश आणि भावनाशून्य वाटे. यामुळे गमतीदार प्रकार घडत. सुनीती देव एका ‘विचारवंतांच्या विनोदाला हसल्यावर त्यांनी खवट प्रश्न टाकला, “अरे वा! विवेकवाद्यांना हसताही येतं, होय ?’ ही कहाणी ऐकल्यावर आम्ही दियंच्या मागे लागलो की त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे. असल्या वादात शिरायची त्यांची इच्छा नव्हती, पण आम्हाला मात्र चोख जवाब देऊन हवा होता, अखेर बऱ्याच आढ्यावेढ्यानंतर दियंनी लेख लिहिला. ऑगस्ट २००३ (अंक १४.५) मधला “विवेकवादी मनुष्याला कधी हसू येते काय ?” हा माझा अत्यंत आवडता लेख या अंकात पुनःप्रकाशित करीत आहोत. भावना आणि विवेक यांची मानवी जीवनातील स्थाने आणि त्यांचा परस्परसंबंध यांचे विवेचन मराठीत इतक्या साधेपणाने आणि नेमकेपणाने केले गेले नसावे. पण मी दियंचा (सध्याच्या भाषेत) ‘चमचा’ आहे लेख वाचूनच माझ्या मताचा खरेखोटेपणा ठरवावा.
पण आठवणीत राहील असा हा एकच लेख नाही. “मी आस्तिक का नाही” (५.१०) आणि “विवेकवादावरील आव्हानांस उत्तर” (१२.३) हे लेखही आठवत राहतात. हे दोन्ही लेख मे.पुं. रेगे यांच्या लेखांस उत्तर म्हणून लिहिलेले आहेत. श्रद्धा, ईश्वर, विवेकवाद, मूल्ये, या संकल्पनांबाबत दिय आणि रेगे यांच्या भूमिका पार वेगवेगळ्या होत्या. दोघेही दुसऱ्याच्या भूमिका आदराने समजून घेत, पण त्यांना त्या पटत नसत. सोबतच ‘माणूस’ म्हणून दोघांनाही दुसऱ्याबद्दल इतके प्रेम आणि इतका आदर होता, की मतांमधला भेद त्या प्रेमादराला धक्का लावू शकत नसे. रेगे जास्त मोकळेपणाने हा प्रेमादर व्यक्त करीत. दियंना पक्षाघाताचा झटका आला तेव्हा रेगे आवर्जून भेटायला येऊन गेले. रेग्यांच्या समग्र तत्त्वज्ञानाबाबतचे पुस्तकही त्यांनी दियंना अर्पण केले आहे. या तुलनेत दियंना रेग्यांबद्दल असणारे प्रेम आणि असणारा आदर सहज व्यक्त होत नसे. एकदा “कांट हा रेग्यांचा आवडता तत्त्वज्ञ का ?” असे विचारले तेव्हा दियंनी अंगठा आणि तर्जनी जोडून ‘सुंदर!’ असे सुचवत म्हटले, “आणि त्यांनाच तो खरा समजलाही होता He was the master about Kant!” दोघे भेटत तेव्हा होणाऱ्या गप्पा इतरांना सहज न समजतील अशा अनेक अंतःप्रवाहांनी क्लिष्ट झाल्यासारख्या वाटत. नील्स बोर आणि अल्बर्ट आईन्स्टाईन शेजारशेजारच्या खुर्त्यांत बसून, शून्यात नजर रोखून विचार करीत आहेत, असे एक छायाचित्र आहे. दोघेही एकमेकांकडे पाहत नसूनही संवाद करीत आहेत असे जाणवते. दिय रेगे संवाद या गहन पातळीकडे जाणारे असत. काटेकोरपणा, नेमकेपणा, ही दियंच्या लिखाणातली मूल्ये असत. गोळाबेरीज म्हणणे समजून पुढे जावे, असले ‘शॉर्टकट्स’ त्यांना मान्य नसत. वयामुळे बौद्धिक ऊर्जा व उत्साह कमी झाल्याने ते अनुवादांकडे वळले, असे मात्र नाही. तारुण्यातही आवडलेल्या किंवा महत्त्वाच्या वाटलेल्या लेखांचे अनुवाद करून ते विचारधन मराठीत आणण्याचा त्यांना हव्यास होता. हे ‘भावानुवाद’ नसत, तर शब्दशः केलेले, मूळ मांडणीच्या सर्व छटा आणि बारकावे जसेच्या तसे मराठीत आणण्याची धडपड असलेले ते लिखाण असे. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आल्फ्रेड टास्र्की या तर्कशास्त्र्याचे एक पुस्तक दियंनी अनुवादासाठी हाती घेतले. काहींच्या मते टास्र्कीची ‘सोपी’ पुस्तके न घेता दियंनी सर्वांत जड पण काटेकोर पुस्तक निवडले. अनुवाद पूर्ण झाला, पण त्याचे पुस्तक घडवण्यात आजचा सुधारक ची यंत्रणा (म्हणजे आम्ही!) खूप कमी पडली. दियंचे हस्तलिखित, पण मूळ इंग्रजी पुस्तकातली समीकरणे, तीही सांकेतिक तर्कशास्त्रातील चिह्न वापरणारी; अशा घटकांमुळे जुळणी आणि मुद्रितशोधन अत्यंत अवघड झाले. त्यातूनही पुस्तक पूर्ण होताना दियंना “हे कोण वाचणार ?” असा प्रश्न छळू लागला. आज काटेकोर, सघन, मूलभूत, ‘वजनदार’ पुस्तकांना मराठीत वाचक असलाच तर तो एखादेवेळी मूळ टास्र्कीकडे जाण्याच्या क्षमतेचा असेल! पण ‘मरणासन्न मराठी भाषा’ यावर गळा काढणाऱ्यांपेक्षा भाषेला समृद्ध करण्याचा हा प्रयत्न निश्चितच जास्त मोलाचा आहे.
टार्कीच्या तुलनेत दियंना नंतर स्वतःसाठी सुचलेले काम ‘सोपे’ होते ह्यूम ! पण ह्यूम सुचेपर्यंत वय आणिकच वाढले होते. एकाग्रता, शारीरिक क्षमता आणिकच कमी झाल्या होत्या. २००६ हे वर्ष आगरकरांच्या दीडशेव्या जयंतीचे आणि जॉन स्टुअर्ट मिल्च्या दोनशेव्या जयंतीचे आहे. दियंनी त्यानिमित्त पूर्वी अनुवादित केलेला मिल्चा उपयोगितावादावरचा दीर्घ निबंध शोधून काढला. त्याच्या मुद्रितशोधनात आम्हाला दियंचे मार्गदर्शन लाभणार नाही, आणि त्रुटी व चुकांची संख्या वाढेल. त्याबद्दल आगाऊ माफी मागण्याखेरीज इतर पर्याय आमच्यापाशी नाही.
काटेकोरपणावरच्या आग्रहामुळे दियंचे लिहिणे कधीकधी रुक्ष, कर्कश वाटे, हे नाकारण्यात अर्थ नाही. तुलनेने रेग्यांचे लेखन सहजसुंदर असे. पण हे शैलीबद्दल झाले. लिखाणातून मांडले जाणारे विचार तपासले तर दिय कधीही, कुणालाही समजावे असेच विचार मांडत असत, हे लक्षात येते. इथे अडचण जरा वेगळी आहे. विशेषतः आजचा सुधारक च्या वाचकांबद्दल एक गैरसमज आढळतो की ते निरपवादपणे तत्त्वज्ञान शिकलेले आहेत. अनुभव असा की आजचा सुधारक चे वाचक चौकस, विचारी, विवेकीही असतात; पण त्यांचा अभ्यासविषय तत्त्वज्ञान नसतो. त्यांचा जीवनानुभव अकादमीय नसतो. खरे तर वरील दोन्ही वाक्यांत ‘नसतो’ ऐवजी ‘असतोच असे नाही’ असे म्हणायला हवे. हा काटेकोरपणा दिय दाखवत!
अशा वाचकांसाठी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातले मूलभूत प्रश्न आणि शोधली गेलेली उत्तरे काटेकोरपणे दिय मांडत. बरेचदा हे एका प्रौढाने हुषार, पण वेगळ्या प्रकारचे ज्ञान असलेल्या तरुणाशी किंवा बालकाशी संवाद साधण्यासारखे असे, आणि अशी ‘शिंगे मोडून वासरांत शिरण्याची’ कला दियंपाशी नव्हती! खुद्द तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी लिहिताना दियंचा काटेकोरपणा कोणत्या पातळीला जाई, त्याचे हे उदाहरण पहा।
तत्त्वज्ञानात उचित असणारा, किंबहुना तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य असणारा युक्तिवाद प्रकार महणजे “वैपरीत्यं प्रतिनयन” किंवा विपरीतानुमिती (reductio ad absurdum) होय. या प्रकारात एखाद्या विधानावरून त्याच्या व्याघाताचे किंवा तार्किकीय द्वंद्वाचे निष्पादन करून त्या विधानातील दोष दाखविले जातात.
‘वैपरीत्यं प्रतिनयन’ या प्रकारच्या युक्तिवादाच्या दोन तव्हा आहेत (१) प्रबल (strong) आणि (२) निर्बल (weak). या दुसऱ्या प्रकारचे युक्तिवाद युक्लिडीय निष्पादनात वापरले जातात आणि त्यात एखाद्या प्रमेयाच्या व्याघाती विधानावरून असे निष्कर्ष निष्पादले जातात की जे त्या व्यवस्थेची प्रमाणके किंवा तिची इतर प्रमेये यांची व्याघाती असतात. या विपरीतानुमितीने एवढेच सिद्ध होते की जर त्या व्यवस्थेची प्रमाणके खरी असतील तर प्रकृत प्रमेय खोटे असू शकत नाही. प्रबल विपरीतानमितीत एखाद्या विधानावरून परस्परविरुद्ध निष्कर्षांचे किंवा मूळ विधानाच्या व्याघाती विधानाचे निष्पादन केले जाते आणि असे दाखविले जाते की, प्रकृत विधान अवैध (illegitimate) आहे. कारण त्यावरून विपरीत निष्कर्ष निष्पन्न होतात. म्हणजे प्रकृत विधान नुसतेच असत्य नव्हे, तर अर्थहीन (nonsensical) आहे असे दाखविले जाते. ( परामर्श, खंड २६, अंक १)
आता अशी मांडणी सहजी करणारी, समजणारी, तिचे उपयोजन करणारी व्यक्ती साध्या माणसांसाठी साध्या भाषेत, पण संक्षेपात लिहिताना गाठून गाठून किती ‘वाचनीय साधेपणा’ गाठणार! पण आजचा सुधारक च्या वाचकांसाठी दिय तसा प्रयत्न करीत. नीतितत्त्वे दोन वेगवेगळे मार्ग सचवत असतील. तर त्यांच्यात निवड कशी करावी? मांसाहार वर्ण्य का करावा ? लग्नामुंजीचे समारंभ कसे करावे ? इतर लोक वेगळ्या प्रकाराने समारंभ साजरे करत असतील, तर आपण सहभागी व्हावे की होऊ नये ? तत्त्वज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर कसा करता येतो, हे दाखवणारे दियंचे लेख ‘शुद्ध’ तत्त्वज्ञानाबाबतच्या लेखांपेक्षा जास्त वाचनीय आहेत, कारण ते लिहिताना लेखक-वाचक यांच्यातले अंतर आपोआपच कमी झालेले आहे.
यासोबतच तत्त्वज्ञान व इतर क्षेत्रांतल्या अभ्यासकांनाही आजचा सुधारक नवे काहीतरी देऊ शकेल, असा दियंचा विश्वास होता. आपला वाचक ‘आम आदमी’च राहावा, तज्ज्ञ नसावा, हे त्यांना मान्य नव्हते. आठ वर्षे आजचा सुधारक चे संपादन केल्यानंतर जेव्हा त्यांनी संपादक मंडळ आणि त्यात पाळीपाळीने ‘फिरते’ कार्यकारी संपादकपद अशी योजना मांडली, तेव्हा हे स्पष्ट केले. त्यांनी लिहिले (९.१)
“आपले मासिक सामान्य नाही. ते एका हेतूने, एका ध्येयाने प्रेरित झालेले आहे. ते तसेच राहावे. त्यामुळे ते केवळ विद्वानांकरिताच, किंवा विवेकवाद्यांकरिताच आहे अशी टीका कोणी केली तरी हरकत नाही. विद्वानांकरिताही मासिक चालवणे महत्त्वाचे आहे.”
पण या ‘विद्वानांकरिताही’ मधून समाजातील कोणालाही ‘बाहेरचा’ मानण्याचा आढ्यताखोरपणा मात्र दियंनी टाळला. उलट कोणताही कुतूहल, कळकळ असलेला माणूस ज्ञान कमावून विद्वानांमध्ये शिरू शकतो आणि या प्रयत्नांत त्याला मदत करणे हे आजचा सुधारक चे काम आहे, अशी त्यांची धारणा होती. आणि विवेकवादी असण्यासाठी विद्वान असणे आवश्यक नाही.
एखादी ठाम भूमिका असणाऱ्याचे (आणि असणाऱ्यांचे) इतरांशी वाद होणारच. आजचा सुधारक वादांपासून कधीच दूर नव्हता. तशी कोणाची इच्छा असणेही शक्य नाही. नावातच ‘सुधारक’ असण्यातून सध्याच्या समाजजीवनातील काही अंगे अनिष्ट वाटतात हेच स्पष्ट होते. अशा अनिष्टांचा उल्लेख करून, तपास करून, त्यावर उपाय शोधणेही आलेच. या क्रियेचा प्रत्येक टप्पा वादावरच बेतला जाणार. आणि वाद म्हटले की औचित्यभंगाचे, अज्ञानाचे, चुकीच्या विचारांचे आरोपही एकमेकांवर होणारच. अशा आरोपांनी वाद घालणारे व्यथित होणार, डिवचले जाणार, प्रसंगी चिडणार, हेही आलेच. सर्वांनाच कशी रेगे-दिय वादांची वैचारिक शुचिता सांभाळता येणार!
दियंनाही वादांना तोंड द्यावे लागले. त्यांच्या प्रत्येक कृतीत, शब्दात ‘अविवेक’ शोधणारे कमी नाहीत. पण कोणीही दियंशी वाद घालण्याने बुद्धी सुसंस्कृत होते होत असे हे नाकारू शकणार नाही.
दियंची पहिली पुस्तके प्रकाशित झाली, त्यावर्षीचा माझा जन्म. त्यांचे आयुष्य दैनंदिन धबडग्यापासून दूर, शुद्ध अध्ययन अध्यापनात गेलेले. दिय संस्कृत, जर्मन, काही प्रमाणात ग्रीक, आणि अर्थातच इंग्रजी, मराठी व हिंदी जाणणारे. तत्त्वज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये, सर्व कोन्याकोपऱ्यांमध्ये आपल्या व्यासंगातून ‘गती’ कमावलेले दिय. त्यांचे वाचन शिस्तबद्ध आणि केंद्रीभूत, ‘फोकस्ड्’, असे. ते संयम पाळणारे, चुकून कधी उपहास, उपरोध, विनोदाचा आधार घेतलाच तर त्याने स्वतःच खिन्न होणारे; आणि माफीही मागणारे.
वरील कोणत्याही गुणाबाबत माझे दियंशी साम्य शोधून सापडणार नाही. तरीही, खूप उशीरा भेटूनही, आमचा स्नेह जुळला. संपादन, लेखन यातली कोणतीही अडचण मी दियंना विचारल्याशिवाय पुढे जात नसे. जर माझी कृती ‘जहाल’ वाटली, एखाद्या मुद्दयाबाबतचे लिहिणे कठोर वाटले, तर त्यांच्या भुवया उंचावत, चेहेऱ्यावर हसू उमटे, आणि (बहुतेक वेळी !) ते म्हणत, “ठीक आहे ! बंदोबस्त केलात!” मी ही टीका न समजता पाठिंबा समजत असे. अगदी कमी वेळा ते म्हणत “सौम्य करा!” अशा वेळी मी बहुधा माझी पूर्ण नियोजित कृती मागे घेत असे.
इथे आवर्जून नोंदतो की विज्ञानावरचा भर, आर्थिक प्रश्नांवरचा भर, नियोजित विशेषांकांसाठीच्या विषयांची निवड, हे सारे दियंच्या स्पष्ट किंवा मूक संमतीनेच केले जात आहे. “संपादकाला संपादक म्हणून अन्य चार सह-संपादकांपेक्षा जास्त मोकळीक अर्थात् असावी.” हा त्यांचा सल्ला ते स्वतःही कटाक्षाने पाळत. त्या सल्ल्यात तोंडदेखलेपणा नव्हता. पडद्यामागून सूत्रे हलवण्याच्या प्रयत्नाचा लवलेश नव्हता
हे सारे कार्यकारी संपादकांना अत्यंत सुखावह होते. पण एंजिनाला ‘गव्हर्नर’ असतो तशी अतिरेक टाळणारी एक ‘प्रणाली’ म्हणून दिय आजचा सुधारक ला आवश्यक होते. यापुढे ती प्रणाली स्वतःला “हे दियंना रुचले असते का?’ असे विचारत उभारावी लागणार आहे. कठीण जाणार आहे, हे. आणि हो विवेकवादी मनुष्याला हसू येते तसेच रडूही येते आणि त्याने विवेकवादाला बाधा येत नाही.
मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर.

“समाचार”

* One fine Sunday morning two people walked into my house, many years back for the first time, strangers they were!
Though I welcomed them, my impression was that they were some social workers visiting for a cause.
They turned out to be D.Y. and P.B. It was a pleasant surprise. I knew them from 3169 Arah of which I was already a subscriber.
Dr. Baba Adhav a social leader and famous for his एक गाव एक पाणवठा introduced me to Marathi and also to आजचा सुधारक.
347679T EAT and the visit of M/s Deshpande and Kulkarni was a turning point in my life, in my thinking, in my approach to my life and the attitude towards the society. आजचा सुधारक and the articles in the 34/42T YER have been helping me to cross Hytter or to be above any narrow thinking. 37.7. has become an engine for a continuous change.
Prof. Deshpande did not become an icon nor I would say he was my friend, philosopher and a guide. At the same time his contribution through his articles to my life was like a beacon.
Having been excommunicated and the near and dear ones stopped having relationship and my business being paralysed by the staff deserting me and busines associates refusing to have any dealings with me, in this social death, I was born again, stronger and unafraid due to no less significant and important mental support I found in the writing of D.Y.
His death is a loss no doubt and something of me has gone with him. However his memory will ever remain alive, sustaining my spirit of freedom.
ताहेरभाई पूनावाला, ८८३, बुधवार पेठ, पुणे ४११ ००२.
*जून १९४४ ते मार्च १९४५ हा तसा दहा महिन्यांचा काळ. परंतु कालखंडाच्या स्मृतिसुगंधाचा दरवळ माझ्या मनात आजही अनेक कारणांनी भरून राहिला आहे. त्यांपैकी एक कारण म्हणजे दि.य. चा त्या काळात लाभलेला सहवास. दि.य. त्यावेळी तसे प्रसिद्ध होते. किर्लोस्कर मासिकात त्याचे लेख छापून येत व किर्लोस्करवाडीला ‘किर्लोस्कर’ वर्तुळात त्यांचे स्नेहशील आगत-स्वागत असे.
मला तत्त्वज्ञानात रस आहे असे मला आपले वाटले तर दि.यं.नी मला एक पुस्तकांची यादीच करून दिली. रसेलचा आणि माझा परिचयही त्यांनीच करून दिला. माझ्या जीवनात तोही एक जिव्हाळ्याचा भावबंध होता.
दि.य. तसे थोडे हटाग्रही होते (निदान त्या कालखंडात तरी.) युद्ध अजून संपावयाचे होते. Friends of the Soviet Union च्या सांगली शाखेचे माझ्या आठवणीप्रमाणे अध्यक्ष होते. महाविद्यालयांतील प्रमुख हॉलमध्ये लोकशाहीवरच्या परिसंवादात भाग घेताना, “I am a firm democrmat’ हे त्यांनी आवेशाने संपूर्ण सभागृहावर हात फिरवत केलेले विधान एखाद्या व्हिडिओ क्लिपप्रमाणे माझ्या मनात अजूनही साठवले गेले आहे. महाविद्यालयीन समकालीन मित्रांनाही ते आठवत असे व आठवते. त्या कालखंडात माझ्या मित्रांवर (माझ्या समजुतीप्रमाणे) विनोदी limericks वर लिहिली होती.
दि.य. वरचे असे होते. I am a firm democrat And if you ever doubted that Mind your head and mind your hat — This bloodshod man of Kupwad. ज्या खेडेगावच्या क्षेत्रात विलिंग्डन महाविद्यालयाची भव्य वास्तू होती त्या खेडेगावाचे नाव कुपवाड.
त्यानंतरच्या सहा दशकांच्या काळात त्यांच्या स्वस्थ भेटीचा योग कधी आला नाही. परंतु सौहार्द तसेच राहिले आजचा सुधारक मधून काही कडू आंबट गोड चर्चाही झाल्या. मनात एक खंत राहिली. विवेकवादाविषयींच्या त्यांच्या मे. पुं. रेगे यांच्या भूमिकेतील अंतर वैचारिकदृष्ट्या अस्वस्थ करीत राहिले आणि आजही करते. रेगेही सुमारे चार दशके माझे निकट स्नेही व शेवटी दोन दशके तर व्याहीच होते. त्यांच्याकडूनही मला नीट काही कळले नाही. दि.य. आणि मे.पुं. रेगे या दोघांच्याही बद्दल माझ्या मनात अतीव आदर होता. ‘अधृष्यश्चाभिगम्यश्च यादोरत्नैः इवार्णवः । अशी काहीशी माझी मनोभूमिका होती.
आता तर दोघेही नाहीत. हे सहन केले पाहिजे.
देवदत्त दाभोलकर, शांतिनिकेतन, ४३, गुरुकृपा हौ. सोसायटी, शाहूनगर, सातारा ४१५ ००१.

* विवेकवादा’ची पायाभरणी करणारी, स्वतंत्र विचाराचा प्रकाश फैलावणारी एक ज्योत ‘मालवली’ हा विचारच असह्य वाटतो.
श्रीराम गजानन केतकर, ४ वसन्तनगर, भैरवनाथ रोड, मणीनगर, अहमदाबाद ३८० ००८. *”…….. विवेकवादी चळवळीला त्यांनी दिलेले योगदान त्याहून महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय आहे. …. प्रा. चिंतामणी देशमुख यांचे अकाली निधन हा या चळवळीला असाच मोठा झटका बसला आहे.”
डॉ. राजीव जोशी, तत्त्वबोध, हायवे चेकनाका, नेरळ.
*“(आगरकरांच्या) ….. त्याच अमर ज्योतीला तेजःपुंज करून, विवेकवादावर निष्ठा असणाऱ्या आमच्यासारख्या जनसामान्यांना समर्थपणे मार्गदर्शन……’
कि.मो. फडके, ४४/डी/११६ मनीषनगर, अंधरी (प) मुंबई – ५३.
*….“ ते आम्हांस बंधुवत होते.”
विजय कराडे, तासगाव (जि. सांगली)
*मी विदर्भ महाविद्यालयात राज्यशासनाचा अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो तेव्हा अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागाचे ते विभागप्रमुख होते. मला आठवते की मी रुजू झाल्यावर लगेच एकदोन दिवसांनीच त्यांनी मी राज्यशास्त्राचा अधिव्याख्याता असल्याने त्यांच्या संग्रही असलेले वेल्डनचे “Vocabulary of Politics’ हे पुस्तक मला दिले व ते मी वाचावे असे सांगितले. मी ते वाचून पुढे त्यांना परत करायला गेलो तेव्हा ते तुमच्याजवळच असू द्या, तुम्हाला ते उपयोगी पडेल असे म्हणून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करून ते मला दिले. आजही ते पुस्तक माझ्यापाशी आहे व ती त्यांची एक आठवण म्हणून माझ्याजवळ एक मोलाची बाब आहे.
आमच्याच महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिका व विभागप्रमुख मनूताई नातू यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. मनूताई स्वीस्वातंत्र्यवादी, आगरकरवादी व पुरोगामी विचारांच्या होत्या. आचार्य भागवत, मामा क्षीरसागर यांच्या विचारांनी संस्कारित झालेले त्यांचे वैचारिक विश्व होते.
नैतिक जीवनाची अत्याधिक उंची हा त्यांच्या व्यक्तित्वाचा स्थायीभाव होता. वैचारिक दृष्टीने ते इम्यान्युअल कांटच्या जास्त जवळ होते असे मला नेहेमी वाटत आलेले आहे. शब्दांच्या योग्य वापराबाबत त्यांचा फार कटाक्ष असे. “शब्द निवडूनी बोलावा” असे समर्थांनी म्हटले आहे. शब्दांचा योग्य वापर झाला पाहिजे. क्रिटोला उपदेश करताना सॉक्रेटिसानेदेखील नेमके हेच म्हटले आहे. सॉक्रेटिस म्हणतो, “”To use words wrongly, my dear Crito, is not a fault unto itself. It creates evil in the soul.”
प. सि. काणे, सिद्धार्थ, दसरा मैदान रोड, रविनगर, अमरावती ४४४ ६०५.
* My condolences. I and Nana were friends since our college days; he lived and died as a true philosopher. His very first publication of an article in a philosophical journal was in Mind; and when he had shown me the article, I had told him that I believe he has made an important point and had a feeling that it would be accepted by Mind for publication. It actually turned out to be a correct prediction. Under his leadership, and later through your association with that magazine, ‘Ajacha Sudharak’ has made a mark in the cultural life of Maharashtra. I have been a reader of Ajacha Sudharak practically since its inception and have greatly enjoyed going through it every month. I am well aware of how well you had looked after him and the example you have set of a philosopher looking after another philosopher, who also happens to be a relative!
S. V. Bhave, I.A.S. (Retd.), 76/35, Shantishila Society, Chiplunkar Road, Erandawana, Pune 411 004.
*माझ्या पिढीतला एक मोठा तत्त्वज्ञ, विवेकवादी आणि विवेकवाद्यांना प्रेरणा देणारा मोठा माणूस कायमचा नजरेआड गेलेला आहे. हे सर्व करीत असताना त्यांची वैयक्तिक विनोदबुद्धी जराही कमी झालेली नव्हती. मागच्या वेळी तुमच्याकडे आमची भेट झाली तेव्हाही हसणे, खिदळणे, गमतीचे बोलणे झाले. तुम्ही काढलेल्या आमच्या दोघांच्या फोटोतही हे स्पष्ट दिसते.
के. ज. पुरोहित, ५ अभंग, साहित्यसहवास, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१.

* “स्मरणातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व’
पतंजली मदुस्कर, द्वारा, आकाशवाणी, रत्नागिरी
*त्यांची व माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती; पण त्यांनी काही व्याख्याने अनेक वर्षांपूर्वी मुंबईत दिली होती ती ऐकून मी फार प्रभावित झालो होतो जसा मे.पु. रेगे यांचे बोलणे ऐकून होत असे. रेगे तर आधीच गेले आणि त्यांच्या जणू मागोमाग आता दि.य.ही गेले. आपला तर ज्येष्ठ सहकारी व आधार गेला. त्याविषयीच्या आपणां सर्वांच्या दःखात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. रेगे व दि.य. यांच्या जातीचे व तोडीचे तत्त्वचिंतक महाराष्ट्रात आज फार दुर्मिळ झाले आहेत ही बाब मला फार चिंताजनक वाटते. महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनात ह्या दोघांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढणे अशक्य नसले तरी फार कठीण आहे खास. अवकाशातातील पोकळी तशीच कायम कधी राहत नाही; कधी ना कधी, कशाने तरी, ती भरून निघतेच. तशी ती भरून निघत आहे हे आपल्या ताज्या अंकांत, नेहमीप्रमाणेच, प्रत्ययास येते आणि वाचकाला दिलासा वाटतो. अशा नव्या जुन्या तत्त्वचिंतकांना विविध विषयांवरील आपले तात्त्विक विचार व्यक्त करायला आपण व्यासपीठ पुरवता आणि त्या विचारांची तात्त्विक चर्चा घडवता ही गोष्ट अभिनंदनीय आहे. काही महिन्यांपूर्वी श्री. दिवाकर मोहनी भेटले होते आणि त्यांनी, मला वाटते ‘पायवा’ या नावाने, दि.यं.च्या लेखांचा संग्रह प्रसिद्ध करण्याची कल्पना सांगितली होती. त्यावर आम्ही केलेली चर्चा, इतक्या दिवसांनंतर, मला नीटशी आठवत नाही. पण दि.यं.च्या निधनानंतर तर अशा ग्रंथाची गरज अधिकच तीव्रपणे जाणवते. मला वाटते, आपण तिचा पाठपुरावा करावा.

श्री.पु.भागवत, ७४, मातृस्मृती, टी.व्ही.चिदंबरन मार्ग, सायन (पू.), मुंबई-२२
* तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या’ हे त्यांनीच लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक. त्यातील ‘अतिभौतिकी’ या प्रकरणातील काही मुद्द्यांबाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. अनेकांशी बोलूनही नीटसा उलगडा होत नव्हता. शेवटी त्यांच्याशीच बोलून निराकरण करून घ्यावे असे ठरले. समस्या गुंतागुंतीची आणि त्याचे उत्तरही प्रदीर्घ आणि गुंतागुंतीचे होते. माझा प्रश्न नेमक्या शब्दात लिहून त्यांच्यासमोर ठेवला. त्यांनी तत्काळ सुनीतीला त्यांच्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटातील २-३ पुस्तकांची शीर्षके आणि पान नंबर लिहून दिले. हा मजकूर नीट वाचल्यास तुमच्या शंकांचे समाधान होईल, असे म्हटले.
पाश्चात्त्य देशात ज्याप्रमाणे नीतिशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून सॉक्रेटिस, अॅरिस्टॉटल, प्लेटोच्या काळापासून उदयाला आले व पुढे त्याचा विकास झाला त्याप्रमाणे भारतात नीतिशास्त्र म्हणून स्वतंत्र ज्ञानशाखा उदयास आली नाही असा त्यांचा अजून एक लाडका सिद्धान्त होता. भारतात नीतिशास्त्र धर्मशास्त्राच्या अंगानेच विकसित झाले. धर्मशास्त्राचा एक पोटविभाग म्हणजे भारतीय नीतिशास्त्र होय, असे ते म्हणत. ईश्वराचे अस्तित्त्व, आत्म्याचे अमरत्व, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त, मोक्ष यासारख्या भारतीय संकल्पनांचे ते प्रखर टीकाकार होते. भगवद्गीता हा भारतीय नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे हे विधान त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यांचे प्रत्येक विधान ते प्रखर युक्तिवादासह सिद्ध करीत असत विवेकवाद ही त्यांची जीवननिष्ठा होती. तरुण भारत, ५ जाने २०००

डॉ.सौ.उषा गडकरी, २५७, शंकरनगर, नागपूर ४४० ०१०.
*गेल्या अनेक दिवसांपासून फ्रेगं या नामवंत तत्त्वज्ञाच्या सांकेतिक तर्कशास्त्रा-वरील पुस्तकाचे ते मराठीत भाषांतर करीत होते. या प्रकल्पाबद्दल बोलताना ‘एक पान भाषांतरित करायला एक दिवसही लागतो, पण मी ते काम करतो’, हे ते मोठ्या उत्साहाने सांगत होते. मोठ्या चिकाटीने त्यांचे हे कार्य सुरू होते. शक्य तेवढे वाचन, घरी आलेल्या विद्वानांशी संवाद हेही सुरू होते. तत्त्वज्ञानातील कूट प्रश्नांसंबंधी तत्त्वचर्चेची आवड शेवटपर्यंत टिकून होती. विविध संदर्भ उत्तम आठवत होते. आजन्म व्यासंगाचाच हा परिणाम होता. अनेकजणांचा अभ्यास प्राध्यापक होताच थांबतो. मग प्राध्यापक झाल्यावर सारा वेळ हा अभ्यासेतर बाबीत व्यतीत होतो. निवृत्त झाल्यावर तर आपल्या विषयाचे वाचन करणेही अनेकांना नकोसे वाटते. निवृत्तीनंतरचा अनेकांचा वेळ हा तरुणपिढीबद्दल तक्रार करण्यात, आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगण्यात, नाहीतर आपण कसे महान विचारवंत होतो, मोठे थोर अभ्यासक होतो हे सांगण्यात जातो! कोणीच आपली स्तुती करीत नाही हे लक्षात आल्याने तर काही जण आत्मस्तुती करण्यात आणि स्वतःचे खरेखोटे मोठेपण इतरांना पटवून देण्यात धन्यता मानतात. प्रा. देशपांडे मात्र असे वागताना कधीच दिसले नाहीत. प्रा. देशपांडे यांचा व्यासंग निवृत्तीनंतरही सुरूच राहिला. या व्यासंगाबरोबर विनम्रताही होतीच. आत्मस्तुतिपर एकही वाक्य इतक्या वर्षांत त्यांच्या तोंडून कधी ऐकायला मिळाले नाही.
त्यांच्या पत्नीला प्रिय असलेला बुद्धिप्रामाण्यवाद व विवेकवाद यांचाच प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी आयुष्यभर साधे राहून काटकसरीने जमवलेली संपत्ती उपयोगात आणायचे ठरवले. नियतकालिक चालविताना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा बाळगायची नाही, कोणत्याही प्रकारची जाहिरात घ्यायची नाही, असा निर्णय घेतला व तो कटाक्षाने पाळला. विवेकवादाला वाहिलेले नियतकालिक कसे चालेल, याची भल्याभल्यांना शंका होती. परंपरेच्या गुलामीत अडकलेल्या समाजाला जे विचार रुचणार नाहीत, सहजगत्या पटणार नाहीत, आवडणार नाहीत, पण जे समताधिष्ठित समाज घडविण्यास रास्त उपयुक्त व अत्यावश्यक आहेत असे विचार आपण सांगितले पाहिजेत, असा ध्येयवाद हे नियतकालिक सुरू करण्यामागे होता. समाजात न्यायोचित बदल, विषमता निर्मूलन, परंपरानिष्ठतेच्या ऐवजी आधुनिक जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी या उद्देशाने हा उपक्रम त्यांनी सुरू केला. हा उपक्रम त्यांनी मोठ्या निष्ठेने वर्षानुवर्षे चालविला. समाजोपयोगी विविध वादग्रस्त विषयांना आपल्या नियतकालिकात जागा दिली. खुल्या चर्चा घडवून आणल्या. लेखकांना लिहिते केले. विशेषांक काढले. लेखकांचा एक गट संघटित केला. जेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपादन करणे कठीण जाऊ लागले तेव्हा संपादक मंडळाच्या माध्यमातून अंकांचे संपादन नियमितपणे होत राहील याची काळजी घेतली. आज महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे दर्जेदार नियतकालिक म्हणून ते नावारूपाला आले आहे.
विवेकवादी दृष्टिकोनातून देशातील विविध प्रश्नांचा उत्तमरीत्या कसा वेध घेता येऊ शकतो हे या नियतकालिकातून दिसून आले आहे. परिवर्तनवादी चळवळीला पोषक असे काही हजार पृष्ठांचे साहित्य आज उपलब्ध झाले आहे. त्यासाठी प्रा. देशपांडे यांनी घेतलेले परिश्रम चिरकाल स्मरणात राहील. विवेकवादाप्रमाणेच उपयुक्ततावाद आणि जॉन स्टुअर्ट मिलप्रणीत स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाचे त्यांनी नेहमीच समर्थन केले. भारतीय समाजात विविध पातळ्यांवर होणारा स्वातंत्र्याचा संकोच किंवा स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार या दोन्ही बाबी त्यांना आक्षेपार्ह वाटत असत. आपण बाबावाक्यंप्रमाणं असे मानत चिकित्सा न करता जुन्या कालबाह्य गोष्टींचे समर्थन करीत जातो हे त्यांना अत्यंत आक्षेपार्ह वाटत होते व म्हणूनच त्यांनी ‘आजचा सुधारक’च्या माध्यमातून सुधारणेचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. तरुण भारत, ५ जाने २०००

डॉ. किशोर महाबळ, निर्मल अपार्टमेंटस्, हितवाद प्रेसच्या मागे, चितळे मार्ग, धनतोली, नागपूर ४४० ०१२
*नाना अबोल होते. तास झाल्यावर बाईंच्या भोवती अनेक प्राध्यापक जमत, हास्यविनोद, थट्टा, गप्पा आणि वादविवाद झडत, दुपारी ३ च्या सुमारास हात धरून नाना बाईंना कारमध्ये बसवीत आणि दोघे घरी जात. त्यांच्या सहजीवनाविषयी माझ्या असंख्य आठवणी आहेत. हळूहळू मी त्यांच्या घरचीच एक झाले होते. डी.वाय. तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान शिकवीत आणि ते अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. घरी त्यांचे अखंड वाचन चाले. एका टेबलावरच्या टेबल लॅम्पजवळ बसून एक तर ते वाचताना दिसत किंवा त्यांचे टायपिंग सुरू असे.
या कामाच्या दरम्यान बाईंची बेल वाजली की तत्परतेने ते हातचे काम बाजूला सारून त्यांच्याकडे येत. बाईंचे आणि नानांचे सहजीवन विलक्षण कोटीतलेच होते. एखाद्या लहान मुलीचे करावे तसेच नाना बाईंचे करी. त्यांना चिडलेले, रागावलेले, कंटाळलेले मी कधी पाहिले नाही. बाईंवर नानांचे अद्भुत प्रेम होते.
नाना म्हणजे प्रकांड पंडित. साहित्य कला यांच्यात विलक्षण रस त्यांना होता. कोणत्या कंपनीचे पेन उत्तम असते किंवा ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ला इतकी ऑस्कर्स मिळाली आहेत, तर तो जरूर पाहू या असे त्यांचे चौफेर ज्ञान होते. फुले त्यांना अतिशय आवडत. अंगणात उन्हाळ्यात पाणी शिंपडून कॉटस् टाकणे, गाद्या, मच्छरदाण्या लावणे, चहा करणे आणि इतरही अशी दैनंदिन कामे करण्यात त्यांचा वेळ जाई.
या साऱ्यांपलीकडे एक ‘डी.वाय. देशपांडे’ नावाचे व्यक्तिमत्त्व होते. १९५० पर्यंत त्यांचे एक पूर्वायुष्य होते, ज्यात एक रसिक, बुद्धिमान, जीवनाचा आनंद घेणारी एक व्यक्ती होती. टेनिस खेळणे, विनोद करून हसणे आणि हसविणे, पंकज मलिक, जगमोहन यांची गीते गाणे, मित्रमंडळींशी पत्रव्यवहार ठेवणे असे सारे ते करीत. पण पुढे हे सारे त्यांनी सहज बाजूला सारले. डी.वाय. देशपांडे यांनी १९४९ साली इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनची स्थापना केली. त्यांनी या संस्थेचे जर्नल कित्येक वर्षे एकहाती चालवले. तत्त्वज्ञानाच्या आणि एकूणच वैचारिक क्षेत्रात डी.वाय. देशपांडे यांच्याबद्दल प्रगाढ आदर व्यक्त होत असे. रा.भा.पाटणकर, मे.पुं.रेगे, य.दि. फडके, ग.प्र.प्रधान, अशोक केळकर ही मंडळी डी.वाय.देशपांड्यांना मानून असत. बाईंच्या निधनानंतर नानांनी विवेकवादाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट बाळगणारे, आजचा सुधारक हे वैचारिक नियतकालिक सुरू केले. श्रद्धा, अंधश्रद्धा, ईश्वर, धर्म, पापपुण्य, आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त अशा विविध विषयांची चर्चा करणारे खुले व्यासपीठ म्हणजे आजचा सुधारक त्यातून नानांनी १९९० पासून ‘विवेकवाद’ या विषयावर प्रदीर्घ लेखमाला लिहिली. इतरही विषयांवर लेखन केले, लोकांचे वैचारिक गोंधळ दूर करणारी किंवा दाखवून देणारी टिपणे लिहिली. तर्कशुद्ध, परखड, स्पष्ट आणि स्वच्छ-सुबोध असे हे लेखन वैचारिक पाया मजबूत करणारे आणि जगण्याची नवी दृष्टी देणारे आहे.
इतरांबद्दल तुच्छता दाखवणे, दुसऱ्याला कमी लेखणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. स्वतःच्या ज्ञानाचा, विद्वत्तेचा दर्प, आढ्यता, शेखी मिरवणे त्यांच्यात नव्हते. त्यांच्या व्रती जीवनसरणीबद्दल मला खूप आदर वाटे पण मला त्यांचा एक प्रकारचा दरारा वाटत असे. नंतर लक्षात आले की हा नैतिक दरारा आहे. मूल्यनिष्ठ, सद्वर्तनी, सदाचरणी माणसांबद्दल वाटावा आणि वाटत असतो असा त्यांचा दरारा मला वाटणे स्वाभाविकच होते. त्यामुळे त्यांच्याशी माझे बोलणे जेवढ्यास तेवढे असे. त्यांच्या प्रज्ञेचा, बुद्धिमत्तेचाही मला धाक वाटे पण तरीही त्यांच्याविषयीच्या गाढ आदराने माझे मन कायम भरलेले राहिले. ऐहिक जीवनावर आणि केवळ इहवादीच असण्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवणारा हा विचारवंत माणूस ऐहिक जीवनाच्या या कोलाहलात एखाद्या कमलपत्राप्रमाणे स्वच्छ राहिला. नाना खरोखरच तत्त्वनिष्ठ कर्मयोग्याप्रमाणे निरासक्तपणे जगले. कोणतीही, कशाचीही अपेक्षा न ठेवता ज्ञानाच्या निरामय आनंदात ते सतत राहिले. ज्या तत्त्वांचा, मूल्यांचा, विवेकशीलतेचा त्यांनी सतत उच्चार केला, ती त्यांनी त्वचेसारखी मानली आणि स्वतःपासून कधी सुटू दिली नाहीत. [ लोकमत ]

अभिप्राय 1

  • दि य यांच्यावरचा लेख आणि त्या अनुषंगाने आलेल्या प्रतिक्रिया देखील अतिशय बोधक, प्रेरक वाटल्या.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.