दि. य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका(एक रूपरेषा)

कशी बरे सुरुवात करावी? गेले काही दिवस हाच प्रश्न सतावत आहे. सुनीती देव यांचा ‘दि.य. देशपांडे यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ या विषयावर लेख लिहून पंधरा दिवसांत हवा आहे असा फोन आला आणि मनावर एक प्रकारचे दडपण आले. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या तत्त्वज्ञानावर लिहिणे अतिशय अवघड काम आहे याची मला जाणीव आहे. तरीपण त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे धाडस करीत आहे.
स्वतः दि. य. आपल्या तत्त्वज्ञानात्मक भूमिकेबद्दल काय म्हणतात हे प्रारंभीच लक्षात घेणे इष्ट ठरेल आणि चुका होण्याची शक्यता कमी राहील. ते म्हणतात “ती प्रामुख्याने धादांतवादी आहे. अतिभौतिकी (metaphysics) (म्हणजे दृश्य जगताच्या पलीकडचे जग जाणण्याचा प्रयत्न) अशक्य आहे हे ह्यूमचे मत मला बरोबर वाटते. तसेच मी नास्तिक आहे. म्हणजे ईश्वराने हे जग निर्माण केले आहे किंवा तो त्याचे नियमन करतो, तसेच मानवाच्या प्रार्थनांना तो पावतो, इत्यादी गोष्टी पूर्ण निराधार आहेत असे माझे मत आहे. आत्मा नावाचे शरीराहून वेगळे असे काही अस्तित्व आहे हे मला मान्य नाही. या बाबतीत स्ट्रॉसनचे मत मला निर्णायक वाटते. काही शरीरे अशी असतात की ज्यांना शारीर आणि मानस अशी दोन्ही प्रकारची विधेये लागू पडतात. माझ्या ठिकाणी आस्तिक्य भावनेचा लवलेशही मला दिसत नाही. धर्म मला कल्पनेचा खेळ वाटतो. नीती धर्माहून वेगळी आहे. आणि धर्माहून स्वतंत्र आहे. नीतिशास्त्रात माझी भूमिका स्थूल मानाने उपयोगितावादी आहे. स्थूल मानाने’ असे म्हणण्याचे कारण उपयोगितावाद काही बाबतींत अपुरा आहे. न्यायाच्या तत्त्वाकडे त्याचे दुर्लक्ष होते. म्हणून न्यायाच्या तत्त्वाची त्याला जोड द्यावी लागेल.’१ अगदी मोजक्या शब्दांत दि.य. देशपांडे यांनी आपली तत्त्वज्ञानात्मक भूमिका या ठिकाणी सुस्पष्टपणे मांडली आहे. १९९३ साली व्यक्त केलेल्या या भूमिकेत पुढे काही बदल झालेला आढळत नाही. त्यामुळे ह्या अवतरणात व्यक्त झालेले त्यांचे मत आपण काहीशा विस्ताराने पाहणार आहोत. हा विस्तार आपण त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पुस्तकांच्या व लेखांच्या आधारे करणार आहोत. (त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाची सूची आजच्या सुधारक च्या मागील अंकात जोडलेली आहे.)
जवळजवळ ६४ वर्षे (शिक्षणाची २३ वर्षे वगळता) त्यांनी तत्त्वज्ञानाचे अध्ययन, अध्यापन, स्वतंत्र चिंतन व लेखन यांत घालविली. विविध चर्चांमधून आणि लेखनामधून तत्त्वचिंतनाची प्रेरणा ते नव्या पिढीस देत राहिले. सतत वाचन आणि लेखन हे जणू त्यांचे व्रतच होते. एखाद्या तपस्व्याच्या डोळ्यांत दिसावेत तसे शांत, स्निग्ध व निर्मल भाव त्यांच्या डोळ्यात दिसत. एक कायम जिज्ञासा व निरागसता त्यांच्या ठिकाणी होती. आपण जे वाचले, जे लिहिले ते स्वतःच्या आनंदासाठी, त्यात प्रशंसनीय असे काहीच नाही असे त्यांना मनापासून वाटत असे. ते अत्यंत विनम्र व प्रसिद्धिविमुख होते. आपल्या हातून ज्याला खऱ्या अर्थाने तत्त्वचिंतन असे त्यांना वाटत नाही. त्यामुळेच ते म्हणतात, “तत्त्वज्ञान या विषयाचा अभ्यास करताना विविध समस्यांचा जो विचार मी केला तो मी काही निबंधांत मांडला आहे. हा विचार थोर विचारवंतांच्या लिखाणांतून स्फुरलेला आणि त्यांवरच पोसलेला आहे. त्यामुळे तो माझा तत्त्वविचार आहे असे म्हणणे बरोबर होणार नाही. त्यात मधून मधून एखादी मला सुचलेली स्वतंत्र कल्पना असेलही पण सामान्यपणे बोलायचे तर माझे असे तत्त्वज्ञान नाही, हे मी आरंभीच प्रामाणिकपणे कबूल करतो.’२ ही कबुली मान्य करूनही हे नाकारता येत नाही की त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक लेखनाची अशी काही वैशिष्ट्ये आहेत जी केवळ त्यांची आहेत. प्रा. शि. स. अंतरकर यांनी या संदर्भात पुढील विधान केले आहे. “प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लिखाणात वैचारिक स्पष्टता, भाषिक निःसंदिग्धता आणि कडवी बांधिलकी हे तीन गुण प्रकर्षाने आढळतात.’३ तत्त्वज्ञानाचे प्रश्न मुळातच सोडवणे कठीण. त्यातून आपले विचार जर स्पष्ट नसतील व मांडणी जर तर्कशुद्ध नसेल तर आपण आणखी वैचारिक गोंधळ निर्माण करूअसे होऊ नये म्हणून आधी आपले विचार तपासून पाहणे, त्यांतील धूसरता दूर करणे व भाषेत त्यांची अभिव्यक्ती करताना अलंकारिक व व्यर्थी शब्दप्रयोग टाळणे ही पथ्ये पाळावी लागतात असे दि.य. देशपांडे यांचे मत आहे. ते स्वतः याबाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगतात. वापरत असलेल्या शब्दांचे नेमके अर्थ निश्चित करूनच ते आपले विचार मांडतात व ही मांडणी अत्यंत तर्ककर्कश भूमिका दर्शविणारी आहे. या भूमिकेला विवेकवादी भूमिका म्हणता येईल. प्रा. अंतरकर यांच्या शब्दांत ‘प्रा. देशपांडे विवेकवादी भूमिकेला बांधील आहेत. या विवेकवादाची मांडणी त्यांनी आजचा सुधारक या मासिकातून वीस लेखांद्वारे केली आहे.’४ त्यांच्या निबंधात व ग्रंथांत ही बांधिलकी ठिकठिकाणी डोकावते. परंतु आपल्या दर्शनाची मांडणी करणारा सलग ग्रंथ त्यांनी लिहिला म्हण नाही हे तितकेच खरे आहे. ते विवेकवादाचे कट्टे व कडवे पुरस्कर्ते आहेत ही गोष्ट निर्विवाद असल्यामुळे त्यांचे विचार या चौकटीत समजावून घेणे गैर ठरणार नाही.
विवेकवादी तत्त्वज्ञानाची मांडणीः
तत्त्वज्ञान म्हणजे कायः विवेकवादी तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यापूर्वी तत्त्वज्ञान म्हणजे काय हे थोडक्यात पाहणे आवश्यक आहे; परंतु ते तितकेच अवघडही आहे. कारण तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाबद्दल खुद्द तत्त्वज्ञांचे एकमत नाही. ढोबळमानाने असे म्हणता येईल की विश्वाची उत्त्पत्ती, त्याचा विस्तार, त्याचा निर्माता, त्या निर्मात्याचे स्वरूप मनुष्यजीवनाचे प्रयोजन, मनुष्याचे विश्वातील स्थान व मनुष्याचे कर्तव्य यासंबंधीचे प्रश्न जगातील सर्व देशांतील प्राचीन तत्त्वज्ञानात विचारलेले आढळतात. परंतु यांतील बहुतेक प्रश्न इंद्रियानुभवाच्या पलीकडे जाणारे असल्यामुळे इंद्रियानुभवाच्या साह्याने त्यांची उत्तरे देणे अशक्य आहे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तत्त्वज्ञानाचा प्रवास सामान्यपणे दोन दिशांनी झालेला दिसतो. १) तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडविण्यासाठी इंद्रियानुभवाहून वेगळा ज्ञानाचा स्रोत मानून त्याद्वारे हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न अनेक तत्त्वज्ञ करतात. या मांडणीला श्रद्धावादी तत्त्वज्ञान म्हणता येईल. शब्दप्रमाणावर भिस्त ठेवून किंवा साक्षात्कारासारखा ज्ञानप्रकार मानून तत्त्वज्ञानाची मांडणी केली जाते. संशय घेणे, तर्कवितर्क करणे, चिकित्सा करणे या गोष्टींना इथे वाव कमीच. २) याउलट इंद्रियानुभवातून प्राप्त होणारे ज्ञानच फक्त मानवाजवळ आहे. म्हणून इंद्रियानुभव व तर्क यांच्या साह्याने तत्त्वज्ञानाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या दृष्टीने अनुभववादी मांडणी अनेक थोर तत्त्वज्ञांनी केली आहे. तत्त्वज्ञानातील संपूर्ण विचारप्रवाहांचे या दोन प्रकारांत विभाजन करणे अर्थातच पूर्णपणे बरोबर नाही. परंतु अत्यंत स्थूलमानाने हे दोन प्रवाह दिसतात. त्यांपैकी प्रा. दि. य. देशपांडे हे दुसऱ्या प्रकारच्या मांडणीचा स्वीकार करणारे तत्त्वज्ञ आहेत.
प्रा. प्रदीप गोखले यांनी या संदर्भात दि.यं.ची भूमिका नेमक्या शब्दांत व्यक्त केली आहे. ‘भारतीय तत्त्वज्ञानातील श्रद्धावादी परंपरेतील सिद्धान्तांची चिकित्सा दि.यं.नी केली. ईश्वरवाद, मायावाद, ब्रह्मवाद, कर्मसिद्धान्त, गीतेतील तथाकथित नीतिविचार हे सारे त्यांच्या चिकित्सेचे लक्ष्य होते. दुसऱ्या बाजूने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक, विश्लेषणवादी परंपरेत ते जिवंतपणे व जोमदारपणे सामील झाले व ही परंपरा पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्ञानाचे व विधानांचे तार्किक वर्गीकरण, संशयवाद व धादांतवाद, कालसंकल्पना, नैतिक आदेशाचे स्वरूप, नीतिविषयक वाद, सौंदर्यविधान यांसारख्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ऐरणीवर असलेल्या प्रश्नांवर त्यांनी चिकित्सक विचार मांडले.”५ भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील विविध प्रश्नांची चिकित्सा करताना अर्थातच त्यांची भूमिका अनुभववादी राहिलेली आहे. अधिक समर्पक वर्णन करावयाचे झाल्यास ही भूमिका विवेकवादी राहिलेली आहे. तेव्हा आता आपण विवेकवाद म्हणजे काय हे पाहू. विवेकवाद म्हणजे काय ?:
दि.य. देशपांडे यांच्या शब्दांत, विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचकशक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. ‘विवेकवाद’ हा शब्दप्रयोग दि.यं.नी नेमक्या कोणत्या अर्थाने केला आहे यासंबंधीचा खुलासा करताना प्रा. शि. स. अंतरकर म्हणतात, “तत्त्वज्ञानाच्या परिभाषेच्या दृष्टीने त्याला विवेकवादापेक्षा अनुभववाद हे नाव अधिक योग्य होईल असे वाटते. याचे कारण या मतानुसार ऐन्द्रिय अनुभवाहून स्वतंत्र अशी ‘विवेक’ नावाची ज्ञानग्रहण करणारी शक्ती नाही.”६ आम्ही श्रद्धेने कोणतेही तत्त्व स्वीकारणार नाही, ऐन्द्रिय अनुभव व सुसंगत तर्क या प्रमाणांवर जे सत्य ठरेल तेच आम्ही स्वीकारू, अशी ही भूमिका आहे. या मतानुसार आप्तवाक्य, अंतःप्रज्ञा, अनुभवपूर्व तर्क यांच्या साह्याने वस्तुस्थितिविषयक सत्य स्वीकारणे अचिकित्सकपणाचे आहे. या संदर्भात थोर विचारवंत व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. मे.पुं. रेगे म्हणतात, “या तत्त्वज्ञानानुसार ज्ञान म्हणजे वैज्ञानिक ज्ञान. जे ज्ञान म्हणून आतापर्यंत चालत आले आहे ते जर वैज्ञानिक ज्ञानाशी सुसंगत असेल तर ते त्याचा भाग बनू शकते. नसेल तर मग ते ज्ञान नव्हे.”७ ही विवेकवादी भूमिका दि.य. देशपांडे यांच्या ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा व सत्ताशास्त्रविषयक लिखाणांत कशी प्रतिबिंबित होते हे आपण संक्षेपाने जाणून घेऊ. ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा आणि सद्वस्तुमीमांसा (सत्ताशास्त्र) हे तत्त्वज्ञानाचे प्रमुख विषय आहेत. ह्यांपैकी ज्ञानमीमांसेचा विचार प्रथम करणे इष्ट ठरते. कारण जगासंबंधीच्या व मानवजीवनासंबंधीच्या अंतिम प्रश्नांचा ऊहापोह हा व्यक्ती ज्ञानप्राप्तीची किती व कोणती साधने स्वीकारते यांवर अवलंबून असतो. म्हणून आपण प्रा. दि. य. देशपांडे यांची ज्ञानमीमांसा प्रथम जाणून घेऊ.
विवेकवादी ज्ञानमीमांसाः
विवेकवाद किंवा rationalism या शब्दाने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात दोन भिन्न अर्थांचा निर्देश होतो. १) reason किंवा विवेक इंद्रियानुभवाहून स्वतंत्र व श्रेष्ठ अशी ज्ञानशक्ती आहे असे मत. या अर्थाने विवेक या शक्तीचा विरोध अनुभवाशी आहे. २) दुसरा अर्थ १८ व्या शतकापासून मान्य व्हावयाला लागला. या अर्थाने या शक्तीचा विरोध धार्मिक श्रद्धेशी आहे. ऐन्द्रिय अनुभव आणि सुसंगत तर्क या प्रमाणांनी जे सत्य ठरेल तेच स्वीकरणीय आहे असे हे मत प्रतिपादते. प्रा. देशपांडे यांचे विवेचन या दुसऱ्या अर्थाला अनुसरून आहे. या विवेकवादानुसार आपण सत्य काय, असत्य काय हे ठरविताना त्याचा साधक पुरावा पुरेसा आहे की नाही हे पाहिले पाहिजे. “ज्ञानाच्या क्षेत्रात सत्याचा निकष कोणता या प्रश्नाचा निर्णय विज्ञानाने पूर्णावस्थेस नेला आहे. विज्ञानाचे कार्य निसर्गातील नियम किंवा सत्य विधाने शोधून काढणे हे आहे हे सर्वज्ञात आहे.”८ विज्ञानात उपलब्ध असलेले ज्ञान हजारो वैज्ञानिकांनी कित्येक शतकांच्या सहकार्याने प्राप्त केलेले असते व लक्षावधी वेळा त्याची वैज्ञानिकांकडून खातरजमा झालेली असते. त्यामुळे संशयातीत ज्ञान मानवाला विज्ञानात मिळू शकते असे प्रा. देशपांडे यांचे ठाम मत आहे. ते पुढे म्हणतात की जेथे स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवाने एखाद्या विधानाची शहानिशा करणे शक्य नसते, तेथे आपण तज्ज्ञांचे मत स्वीकारावे. ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे त्या क्षेत्रातील वैज्ञानिक. ह्याप्रमाणे सृष्टिव्यापार जाणून घेताना, जगाविषयीच्या प्रश्नांची गुंतागुंत सोडवताना आपल्याला विज्ञानाचीच कास धरावी लागते. दुसरा पर्याय उपलब्ध नाही, असे स्पष्ट मत दि.य. देशपांडे यांनी व्यक्त केले. अर्थातच जे विज्ञानाला अज्ञेय ते कोणालाही ज्ञेय असू शकत नाही. केवळ श्रद्धेने आप्तवचन स्वीकारणे विवेकवादाला मान्य नाही.
विवेकवादी नीतिमीमांसाः
विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी ज्ञानक्षेत्र व कर्मक्षेत्र प्रमुख आहेत. जर्मन तत्त्वज्ञ कांट ज्ञानक्षेत्रातील विवेकाला हिशीशींळलरश्र शिरीप व कर्मक्षेत्रातील विवेकाला practical reason असे नाव देतो. प्रा. दि.य. देशपांडे कांटचे मत अनुसरताना दिसतात. योग्य काय, अयोग्य काय, चांगले कशाला म्हणावयाचे, वाईट कशाला म्हणावयाचे ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे विवेकशक्ती देत असते. ह्यावरून हे स्पष्ट आहे की विवेकाचे कार्य फक्त सत्य ज्ञानाचा शोध घेण्यापुरते मर्यादित नाही. कर्माची चिकित्सा करणे, त्याचे नैतिक मूल्य निश्चित करणे, नियमन आणि मार्गदर्शन करणे ही कार्ये विवेकशक्तीचीच आहेत. आचरणाच्या किंवा कर्माच्या क्षेत्रात विवेकवाद दोन गोष्टींवर भर देतो. १) साधनविवेक व २) साध्यविवेक. कर्म करत असताना आपण विवेकाची कास धरली पाहिजे म्हणजे साधनविवेक व साध्यविवेक केला पाहिजे. हे मत थोड्या विस्ताराने समजावून घेऊ, कारण दि.य. देशपांडे यांचा नीतिमीमांसा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता व त्यांचे बरेचसे लिखाण नैतिक प्रश्नांची चर्चा व चिकित्सा करते.
साधनविवेकः
मनुष्याला सामान्यपणे कोणतीही इष्ट (हवी असलेली) गोष्ट प्राप्त करण्यासाठी कर्म करावे लागते. इष्ट गोष्टीला ‘साध्य’ व कर्माला त्याचे ‘साधन’ म्हणता येईल. साधनाचा विवेक करावयाचा म्हणजे ज्या साधनाचा आपण अवलंब करीत आहोत ते आपले इष्ट मिळवून देण्यास समर्थ आहे की नाही हे पाहावयाचे. जर आपण आपले इष्ट प्राप्त करून घेण्यासाठी अनुरूप साधनाचा वापर केला नाही तर त्याने इष्ट न साधल्यामुळे तसे वागणे इष्टविघातक, अविवेकीपणाचे होईल. एखाद्या साध्याचा विवेकी स्वीकार म्हणजे त्याच्या पर्याप्त साधनाचाही स्वीकार करणे होय. परंतु या नियमाचा यशस्वी उपयोग करण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या अनेक नियमांचे बिनचूक ज्ञान हवे. दि.य. देशपांडे म्हणतात की अमुक कर्माचे अमुक परिणाम होतात असे कार्यकारणात्मक ज्ञान कोणत्याही सफल कर्माकरिता आवश्यक असते. आपण निरोगी राहावे अशी इच्छा असणारा मनुष्य जर व्यसनाधीन होत असेल तर त्याचे वागणे अविवेकीपणाचे होईल. हा अविवेकीपणा दोन प्रकारचा असू शकेल. एकतर त्याला निरोगी राहण्याची साधने माहीत नसतील किंवा साधने माहीत असूनही तो ती वापरण्याचे दुबळेपणामुळे, मनाच्या कमकुवतपणामुळे टाळत असेल. या दोन्ही प्रकरणी त्याचे कर्म अविवेकीपणाचे होईल. याचाच अर्थ असा की साधनविवेक करताना विविध निसर्गनियमांचे ज्ञान व मनाचा निर्धार या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.
साध्यविवेकः
केवळ साधनच नव्हे तर साध्यही विवेकी असावयाला पाहिजे. साध्यविवेक ही गोष्ट साधनविवेकाहून अधिक कठीण आहे. पण ती टाळता मात्र येत नाही. कारण साध्य जर अविवेकी असेल तर त्याचे साधन विवेकाने निवडल्याने ते अविवेकी साध्य प्राप्त होईल. तसे होऊ नये म्हणून साध्यविवेक करावा लागतो. आपली साध्ये इष्ट असावीत, वाईट असू नयेत हे म्हणणे समंजसपणाचे म्हणून स्वीकारले तरी साध्य चांगले की वाईट हे ठरवायचे कसे हा प्रश्न शिल्लक राहतोच. एखाद्या माणसाचे इच्छित किंवा इच्छाविषय काय आहे हे अवलोकनाने कळू शकते पण ‘इष्ट’ याचा दुसरा अर्थ ‘जे इच्छिणे योग्य आहे ते, जे आपण इच्छावे ते’ असाही होतो. काय इच्छिणे योग्य आहे हा मूल्याविषयीचा प्रश्न आहे आणि मूल्याविषयीचे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. कोणत्या ध्येयाची पूर्ती कोणत्या साधनाने होऊ शकते हे समजण्यासाठी विज्ञानाचे मोलाचे सहकार्य होत असले तरी आपण स्वीकारलेले साध्य उचित आहे की नाही हे विज्ञान सांगू शकत नाही. त्याची मीमांसा नीतिशास्त्रात केली जाते.
दि.य. देशपांडे म्हणतात की मूल्याविषयीचे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत येत नसले तरी बुद्धीच्या किंवा विवेकाच्या कक्षेत मात्र येतात. इष्ट/अनिष्ट, युक्त/अयुक्त, कर्तव्य/अकर्तव्य हा भेद बुद्धीच्या साह्यानेच केला जाऊ शकतो हा विवेक (कांट म्हणतो त्याप्रमाणे) practical reason करीत असते. मानवी जीवनाचे साध्य काय असावे या संबंधीचा विचार प्राचीन काळापासून अनेक विद्वानांनी केला आहे. त्यांपैकी काहींनी मोक्ष, ईश्वरसाक्षात्कार यांसारखी साध्ये इष्ट म्हणून स्वीकारली आहेत. ही साध्ये अर्थातच विवेकवाद्याला पटण्यासारखी नाहीत. कारण माणसाच्या वर्तनाचे नियमन करणारी तत्त्वे विवेकावर आधारलेली असली पाहिजेत. केवळ श्रद्धेने स्वीकारलेली नसावीत, तसेच इहलोकात मानवी प्रयत्नांच्या साह्याने प्राप्त करता येण्यासारखी ही साध्ये असावीत असे विवेकाचे सांगणे आहे. साध्याची इष्टानिष्टता ठरविताना विवेक कोणत्या गोष्टी लक्षात घेतो हे सांगणे कठीण असले तरी स्थूल मानाने त्याचे उत्तर देता येऊ शकते. त्यासाठी प्रथम काही संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक ठरते. दि.य. देशपांडे म्हणतात, ‘साध्य इष्ट आहे की नाही हा प्रश्न आणि ते स्वतोमूल्यवान आहे की नाही हा प्रश्न एकच आहेत’ पण हे समजावून घेण्यासाठी आपल्याला ‘मूल्य’ आणि ‘स्वतोमूल्य’ या शब्दांचे अर्थ पाहावे लागतील.
मूल्यः
‘मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूंबद्दल आपल्याला वाटणारे महत्त्व. काही वस्तू आपल्याला महत्त्वाच्या वाटतात व त्या मिळाव्यात म्हणून आपण किंमत द्यायला तयार असतो.’९ आपल्याला इष्ट वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मूल्य असते. (मूल्यांचा विचार ब्रिटनमध्ये सेव चा विचार ह्या नावाने केला जातो तर युरोपात आणि अमेरिकेत रिश्रीश ह्या शब्दाचा वापर होतो.) एकच वस्तू अनेक अर्थांनी चांगली (सेव) असू शकते तसेच ती एका अर्थाने चांगली व दुसऱ्या अर्थाने वाईट असू शकते. ‘चांगले’ या शब्दाचे काही अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येतील. (१) एखाद्या काठीकडे बोट दाखवून कोणी म्हणू शकेल की तिची चांगली तरफ (श्रशींशी) होऊ शकेल. या ठिकाणी ‘चांगली’ म्हणजे प्रयोजनाला उपयुक्त असा अर्थ आहे. ते प्रयोजन चांगले आहे की नाही याचा विचार केलेला नाही.(२) एखाद्या चांगल्या ध्येयाचे अवश्य साधन (instrumentally सेव) या अर्थाने ‘दंतवैद्याकडे जाणे’ चांगले असे म्हणता येईल.(३) काही वस्तूंचे चांगुलपण अंगभूत (inherent) असते. कलावस्तू आणि नैसर्गिक सुंदर वस्तू चांगल्या आहेत असे म्हणताना त्यांचा जो आस्वाद घेईल त्याला चांगला अनुभव मिळेल असा अर्थ असतो. (४) काही वस्तू अथवा स्वरूपतः चांगल्या (good in themselves) आहेत असेही म्हटले जाते. त्यांना स्वतोमूल्य आहे असे मानले जाते. स्वतोमूल्याची कल्पना कोणती साध्ये इष्ट (चांगली) आहेत हे जाणण्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे तिचे अधिक विवेचन करणे आवश्यक आहे.
स्वतोमूल्यः
औषधाला जे मूल्य प्राप्त होते ते आजार दूर करण्याचे साधन म्हणून. औषध कोणी औषधाकरिता घेत नाही. आजार बरा व्हावा या इष्टपूर्तीसाठी ते घेतले जाते. म्हणून त्याचे मूल्य परतोमूल्य आहे असे म्हणतात. परंतु सर्वच गोष्टींचे मूल्य असे परतोमूल्य असू शकत नाही. काही वस्तू तरी अशा असल्या पाहिजेत की ज्यांचे मूल्य स्वतोमूल्य (intrinsic value) किंवा साध्यमूल्य (value as an end) असते. हे मूल्य त्यांना त्या अन्य कशाचे तरी साधन म्हणून प्राप्त झालेले नसते तर त्या स्वार्थ (स्वतःकरिताच) म्हणून हव्या असतात. अशा स्वार्थ साध्यांमुळेच साधनांना साधनमूल्य प्राप्त होते. अशा वस्तू नसल्या तर कोणत्याही साधनाला साधनमूल्य प्राप्त होणार नाही. स्वार्थसाध्य (ends in themselves) वस्तू अनेक आहेत. उदा. सुख, ज्ञान, आरोग्य इ. यांची इच्छा स्वार्थसाध्य म्हणून केली जाते. सुख स्वयमेव चांगले म्हणून इच्छिले जाते. आरोग्य आरोग्यासाठी हवे असते. तसेच ज्ञान हे केवळ साधन नसून स्वतोमूल्यवान आहे असे अनेकांचे मत आहे. मूल्यांचे विभाजन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. मूल्यांचे सत्य, शिव आणि सुंदर या त्रयींच्या आधारे दिलेले विभाजन एक उत्तम विभाजन म्हणता येईल. जी. ई. मूर या विचारवंताने सुख, सौंदर्य, आभिरौचिक अनुभव (aesthetic experiences) ज्ञान आणि व्यक्तींचा स्नेह या गोष्टींवर भर दिला आहे. याप्रमाणे मानवी जीवनात अनेक गोष्टींचा स्वीकार स्वार्थ साध्य म्हणून केला जात असतो. या वस्तू प्राप्त व्हाव्यात म्हणून माणसे सतत प्रयत्नशील असतात. कोणत्याही इंद्रियाने स्वतोमूल्य कळत नाही. सुख अथवा ज्ञान स्वतोमूल्यवान आहे की नाही हे युक्तिवादानेही ठरत नाही. तर मग ते कळते कसे? जी. ई. मूर, डब्ल्यू. डी. रॉस इ. विचारवंतांनी अनैन्द्रियप्रत्यक्ष नावाची एक शक्ती मानली आहे. या non sensuous intuition द्वारे आपल्याला ऐन्द्रिय वस्तूंच्या ठिकाणी असणाऱ्या अनैन्द्रिय गुणांचे ज्ञान होते. उदा. सुख या ऐन्द्रिय (मनाने ज्ञात होणाऱ्या) वस्तूच्या ठिकाणी स्वतोमूल्य नावाचा अनैन्द्रिय गुण आहे हे कळते, म्हणजे असे प्रतिभान अथवा प्रत्यक्ष होते. हे एकप्रकारचे विमर्शक परीक्षण असते. एखाद्या वस्तूची इतर सर्व वस्तूंपासून वियुक्त (isolated) तसेच तिच्या परिणामांपासून वियुक्त अशा अवस्थेत कल्पना केल्या आहे तर तिला स्वतोमूल्य आहे असे समजावे.
स्वतोमूल्य व नैतिक मूल्यः
एखादी वस्तू स्वतोमूल्यवान आहे एवढ्यावरून ती नैतिक दृष्टीनेही चांगली आहे असे सिद्ध होत नाही. ज्ञान, सुख, आरोग्य, व्यक्तींचे स्नेहसंबंध या गोष्टी स्वार्थसाध्य असल्या तरी त्यांच्यात नैतिक मूल्य आहे असे म्हणता येत नाही. स्वतोमूल्य व नैतिक मूल्य यांतील फरक समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. जर्मन तत्त्वज्ञ कांट याने हा भेद प्रथम अतिशय स्पष्टपणे मांडला आहे व प्रा. देशपांडे यांना तो मान्य आहे. कांट म्हणतो की सुख ही गोष्ट अत्यंत मूल्यवान आहे यात शंका नाही. पण माणूस सुखी झाला म्हणजे तो नीतिमान झाला असे आपण समजत नाही. तसेच एखादा मनुष्य ज्ञानी आहे, कलाकार आहे एवढ्यावरून तो नीतिमान आहे असे आपण म्हणत नाही. कांटच्या मतानुसार नैतिक मूल्य फक्त सदीहेतच (good will) असते. Good will ही एकच गोष्ट सर्वदा, सर्वत्र निरपवादपणे (unconditionally) चांगली असते. म्हणजे ती कोणत्याही परिस्थितीत मूल्यवानच राहते. सुख, आरोग्य, ज्ञान, सामर्थ्य या स्वतोमूल्यवान वस्तूंचे तसे नाही. त्या अपमूल्याचे (disvalue) कारण होऊ शकतात. असाधु (bad) ईहेची जोड मिळताच त्या गोष्टी अतिशय वाईट होतात. उदा. जर सुखी मनुष्य दुष्ट असला म्हणजे दुष्ट ईहेची जोड जर सुखाला मिळाली तर ते सुख स्वयमेव जरी मूल्यवान असले तरी एकंदरीने अतिशय वाईट असू शकेल. एखाद्या माणसाजवळ खूप ज्ञान आहे पण तो जर दुष्ट ईहेपासून मुक्त नसेल तर आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करू शकेल. हीच गोष्ट आरोग्य, संपत्ती, सौंदर्य यांना लागू होते. ही सर्व मूल्ये स्वतः नैतिकही नाहीत. ती न-नैतिक (non-moral) मूल्ये आहेत. जेव्हा त्यांना साधु ईहेची (good will) जोड मिळते तेव्हा त्यांना नैतिक मूल्य प्राप्त होते. या ठिकाणी साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ‘साधुईहा’ म्हणजे काय?
साधु ईहा (good will):
कांटने प्रथम ईहा किंवा संकल्प (will) म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. ‘आपण कसे वागावे’ असे विचारण्याचे, आपल्या वागण्याच्या नियमांची निवड बुद्ध्या करण्याचे आणि त्या नियमांप्रमाणे वागण्याचे सामर्थ्य म्हणजे ईहा. ‘ही ईहा फक्त मानवातच असते. ग्रहांची भ्रमणे नियमबद्ध असतात, तसेच पशूचे व्यवहारही नियमबद्ध असतात पण ते नियम पाळतात असे आपण म्हणत नाही’. नियम पाळण्यासाठी नियमांची कल्पना करण्याचे व त्यानुसार कर्म करण्याचे सामर्थ्य असावे लागते. मनुष्यात ते सामर्थ्य आहे. त्यालाच तो ईहा म्हणतो. साधुईहा म्हणजे एखादे कर्म ते कर्तव्य आहे म्हणूनच केवळ करण्याचा संकल्प करणारी ईहा. एखादे कर्म सुखद आहे किंवा ते आपल्याला आवडते किंवा त्याने आपला फायदा होणार आहे म्हणून करणे यात ईहा आहे परंतु सदीहा (good will) असणार नाही. जेव्हा मनुष्य कर्तव्यासाठी कर्म करतो तेव्हाच फक्त सदीहा हजर असते. एखादे कर्म कर्तव्य (करायला पाहिजे असे) आहे पण ते जर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या हेतूने प्रेरित होऊन करीत असतील तर त्याचे मूल्य वेगवेगळे राहील. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. अशा विचाराने प्रामाणिक व्यवहार करणारा दुकानदार व प्रामाणिकपणाने वागणे आपले कर्तव्य आहे म्हणून प्रामाणिक व्यवहार करणारा दुकानदार नैतिकदृष्ट्या सारख्याच मूल्याचे कर्म करीत नसतात. कर्म जर नैसर्गिक कलाने प्रेरित होऊन अथवा स्वार्थ साधण्यासाठी केले असेल तर त्याला नैतिक मूल्य नसते. कर्तव्यबुद्धीने केलेल्या कर्मातच नैतिकमूल्य आढळते. कर्तव्यबुद्धीने कर्म करावे हे जसे मान्य केले तरी कर्तव्यकर्म कोणते हे ठरवावे लागणारच. ते कसे ठरवायचे याचेही उत्तर कांटने दिले आहे. कर्तव्यकर्म कोणते?
या प्रश्नाचे उत्तर देताना कांटने निरुपाधिक आदेशाची (categorical imperative) संकल्पना मांडली आहे. कांटचे तत्त्वज्ञानात्मक लिखाण समजावून घेणे बरेच अवघड आहे. त्यामुळे अधिक खोलात न शिरता त्याची नैतिक भूमिका सोप्या भाषेत समजावून घेणे हाच पर्याय आहे. प्रथम आपण imperative या शब्दाचा अर्थ पाहू.
निदेश (Imperative):
आदेश अथवा निदेश कशाला म्हणायचे हे स्पष्ट करताना कांट म्हणतो की मनुष्याजवळ प्रज्ञा (reason) किंवा विवेक नसता तर मनुष्य आणि पशु एकाच पातळीवर आले असते आणि मग नीति-अनीतिचा प्रश्न निर्माणच झाला नसता. तसेच जर त्याच्या ठिकाणी प्राणिसुलभ वासना किंवा विकार नसते तर तो देवतुल्य झाला असता आणि त्याच्या ईहेला (संकल्पाला) विकारांना तोंड न द्यावे लागल्यामुळे प्रज्ञेचे नियम तिने स्वाभाविकपणेच पाळले असते. अशा ईहेला मग good will न म्हणता holy will (दैवी ईहा) म्हणता आले असते. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. मनुष्याच्या प्रज्ञेला विकारांना तोंड द्यावे लागते. त्याचे विकार त्याला एक कर्म करण्यास आवाहन करतात, तर त्याची प्रज्ञा त्याला दुसरेच कर्म करायला सांगते असे असल्यामुळे नीतीचे नियम बंधनकारक आहेत, ते पाळले पाहिजेत हे त्याला जाणवते. पूर्णपणे विवेकी नसलेल्या मनुष्याला आचरणाचा जो वस्तुनिष्ठ नियम (जो सर्व प्रज्ञावान जीवांवर सारखाच बंधनकारक असतो) बंधनकारक म्हणून जाणवतो त्याला कांट निदेश (imperative) म्हणतो. दैवी ईहेला निदेश नसतात. कारण ती स्वभावतःच वस्तुनिष्ठ नियमानुसार वागत असते. तिने तसे वागावे हे म्हणण्याची गरज नसते.
निरुपाधिक निदेशः
नैतिक निदेश (कर्तव्यकर्म कोणते हे ठरविणारे निदेश) निरुपाधिक असतात, सोपाधिक (hypothetical) नव्हे. उदा. जर तुला बरे व्हायचे असेल तर तू अमुक एक औषध घेतले पाहिजे. हा सोपाधिक आदेश आहे. या ठिकाणी एखादे कर्म आपण संकल्पिलेल्या अन्य कोणत्या तरी साध्याचे साधन म्हणून आवश्यक असते. नीतीचे आदेश असे नसतात. ते निरुपाधिक असतात. म्हणजे ‘अमुक एक कर्म स्वार्थ अवश्य आहे’ असे त्याचे प्रतिपादन असते. उदा. ‘खरे बोलावे’, ‘दिलेली वचने पाळावीत’ हे निदेश निरुपाधिक आहेत. खरे बोलून आपल्याला काही साधायचे आहे म्हणून नव्हे तर खरे बोलण्यासाठीच खरे बोलले पाहिजे असे या निदेशाचे सांगणे आहे. नैतिक निदेश या प्रकारे सार्विक, निरुपाधिक असल्यामुळे तो सर्वांना बंधनकारक होत असतो. “एखादे कर्म मी केले असता यक्त होईल. पण इतरांनी मात्र ते करू नये किंवा इतरांनी एखादा नियम पाळावा, पण आपण मात्र त्याला अपवाद असावे असे म्हणणे नीतिविरोधी आहे.’ जर एखादे कर्म एखाद्या विशिष्ट परिस्थितीत करणे अ चे कर्तव्य असेल तर ते त्या परिस्थितीत प्रत्येक मनुष्याचेही कर्तव्य असावे लागेल. याप्रमाणे कांट एका सूत्राद्वारे नैतिक निदेशाची मांडणी करतो. ‘तुम्ही फक्त अशाच व्यक्तिगत विधीच्या अनुसार वागा की जो विधी सार्विक नियम व्हावा असे ईहन तुम्ही करू शकता.’ ‘मी अडचणीत असलो तर त्यातून सुटण्यासाठी मी खोटी वचने देईन.’ हा एक व्यक्तिगत नियम (maxim) होऊ शकतो. पण तो वस्तुनिष्ठ (objective) नियम होऊ शकणार नाही म्हणजे त्याचे साविकीकरण करता येणार नाही. कारण सर्वच जर अशाप्रकारे वचनभंग करावयाला लागले तर कोणी वचने स्वीकारणारच नाही व वचन नावाचा व्यवहार नष्ट होईल. या नियमाचे सार्विकीकरण आत्मघातकी ठरते असे कांट म्हणतो. असा विधी कर्तव्यकर्म सांगणारा होणार नाही, नैतिक होणार नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास निरुपाधिक अथवा नैतिक आदेशाचे पालन कर्तव्यबुद्धीने करणे यांतच सदीहा (good will) व्यक्त होते आणि ती कर्माच्या ठिकाणी नैतिक मूल्य निर्माण करते.
मनुष्याची प्रतिष्ठाः
साधुईहेचा आधार असणारे मनुष्यत्व हेही नैतिकदृष्ट्या मूल्यवान आहे असे कांट म्हणतो. सदीहेमुळे मनुष्याला आगळीवेगळी प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणून कांट म्हणतो, ‘मनुष्यत्वाला, मग ते तुमच्यामधले मनुष्यत्व असो किंवा अन्य कोणामधले असो, केवळ साधन म्हणून कधीही वागवू नका, तर नेहमी साध्य म्हणूनही वागवा.’ या वचनाचा अर्थ स्पष्ट करताना दि.य. देशपांडे या मताशी सहमतीही व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘एखाद्या मनुष्याला साधन म्हणून वागविणे म्हणजे त्याच्या इच्छा-आकांक्षा यांचा विचार न करता त्याला आपल्या साध्याचे साधन म्हणून वापरणे. त्याला साध्य म्हणूनही वागविले पाहिजे. या नियमानुसार सर्व प्रकारची गुलामगिरी, वेठबिगार, अपुऱ्या वेतनावर मजुरांकडून काम करवून घेणे, त्यांचे शोषण करणे, त्यांना फसविणे हे सर्व अनैतिक आहे असे निष्पन्न होते. याचा अर्थ प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र प्रतिष्ठा आहे आणि ती आपण राखली पाहिजे. एवढेच नव्हे तर स्वतःच्या मनुष्यत्वाची प्रतिष्ठाही राखली पाहिजे. दुराचरण करणे, मोहाला बळी पडून दुष्कर्मे करणे म्हणजे आपल्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्यत्वाला दुष्ट प्रवृत्तींचा दास बनविणे होय.
साध्यविवेक करताना कांटचे विवेचन मोठ्या प्रमाणावर मदत करू शकते. परंतु हे विवेचन परिपूर्ण नाही. कारण एखादे कर्म कर्तव्य आहे की नाही हे ठरविताना केवळ आवश्यक अट सांगणे पुरेसे नसते. त्याची पर्याप्त अट देता आली पाहिजे. म्हणजे एखाद्या विधीचे सार्विकीकरण करता येत नसेल तर तो विधी नैतिक विधी नाही असे आपण म्हणू शकतो. पण ज्या विधीचे सुसंगत सार्विकीकरण होऊ शकते तो नैतिक विधी आहे असे आपण म्हणू शकत नाही. ‘अंधारात एकटे असल्यास शीळ घाला’, किंवा ‘अंगावर कपडे चढविताना प्रथम डावा हात घाला’ ह्या नियमांचेही सार्विकीकरण होऊ शकते परंतु त्यामुळे ती नैतिक ठरत नाहीत. ‘एखादा विधी नैतिक विधी आहे की न-नैतिक हे ठरविण्यासाठी आणखी कशाची तरी आवश्यकता आहे.”१३ जे कर्तव्य असते ते मानवी जीवनाला उपकारक असते, मानवी हिताशी त्याचा संबंध असतो ही बाब कांटने पुरेशी लक्षात घेतली नाही. मनुष्याला केवळ साधन म्हणून वापरू नये, प्रत्येक मनुष्य स्वतःसाध्य (end in itself) आहे. ही वचने महत्त्वाची असली तरी नैतिकतेचे मर्म दाखविण्यास पुरेशी नाहीत. या संदर्भात प्रा. देशपांडे म्हणतात, “कांटच्या मीमांसेत उपयोगितावादाची भर घातली तर ती एक परिपूर्ण नीतिमीमांसा होऊ शकेल असे म्हणायला हरकत नसावी.’१४ दि. य. देशपांडे यांनी आपले नैतिक मत स्थूलमानाने उपयोगितावादी आहे हे मान्य केलेले असल्यामुळे त्यांचे उपयोगितावादाचे विवेचन आपण संक्षेपाने समजावून घेऊ.
उपयोगितावादः
उपयोगितावाद प्रामुख्याने दोन रूपांत मांडला गेला आहे. १) सुखवादी उपयोगितावाद (hedonistic utiliterianism) आणि २) न-सुखवादी उपयोगितावाद (Non-hedonistic utiliterianism) प्रा. दि.य. देशपांडे यांना स्वीकार्य असलेला उपयोगितावाद यांपैकी दुसऱ्या प्रकारचा आहे. तो जाणून घेण्यासाठी प्रथम आपण दोन्ही प्रकारच्या उपयोगितावादाचा अर्थ पाहू.
सुखवादी उपयोगितावादः
उपयोगितावादाच्या उपपत्ती (theory) मध्ये स्वतोमूल्याची कल्पना केन्द्रस्थानी असते. कर्तव्याची व्याख्या या संदर्भातच दिली जात असते. माणसाला अनेक गोष्टी स्वतोमूल्यवान वाटत असतात. त्यात प्रामुख्याने सुखाचा अंतर्भाव होतो. सुख प्रत्येकाला हवे असते आणि ते केवळ स्वार्थ हवे असते, अन्य कशाचे साधन म्हणून नव्हे. सुख या स्वतोमूल्याला आधारभूत मानून सुखवादी म्हणतो की जास्तीत जास्त लोकांचे सुख ज्यामुळे निर्माण होईल असे कर्म करणे आपले कर्तव्य आहे. सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे असे एकदा मान्य केले की मग सुखनिर्मिती व सुखवृद्धी हे आपले कर्तव्य होऊन बसते. सुखनिर्मिती किंवा सुखवृद्धी जास्तीत जास्त लोकांच्या (जीवांच्या) सुखाची करायची असते असे उपयोगितावाद सांगतो. उपयोगितावादाचे हे वर्णन बेंटम, जॉन स्टुअर्ट मिल आणि सिज्विक यांनी मांडलेल्या उपपत्तींचे आहे. या उपपत्तींना सुखवादी उपयोगितावाद असे नाव देता येईल. विसाव्या शतकात या उपपत्तींमध्ये महत्त्वाची भर जी. ई. मूर यांनी घातली आहे. सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे असे जुन्या उपयोगितावाद्यांचे मत होते. अन्य गोष्टींचे मूल्य हे त्या सुखाचे साधन असल्यामुळे त्यांना प्राप्त झालेले असते असा विचार त्यांनी मांडला होता. मूर मात्र असे म्हणतो की, केवळ सुखच नव्हे तर ज्ञानप्राप्ती, कलास्वाद, मैत्रीचा अनुभव याही गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत. या मतानुसार मानवी कृतींचे नैतिक ध्येय महत्तम सुखवृद्धी नसून महत्तम मूल्यवृद्धी आहे. ह्या मूल्यांत सुखाबरोबरच ज्ञानप्राप्ती, सौंदर्यास्वाद आणि स्नेहानुभव ह्यांचा समावेश होईल व यांची जास्तीत जास्त वृद्धी हे आपले कर्तव्य ठरेल. ह्या मताला न-सुखवादी उपयोगितावाद असे नाव देता येईल.
न्यायाचे तत्त्वः
दि.य. देशपांडे म्हणतात की न्यायाचे तत्त्व उपयोगितेच्या तत्त्वाहून स्वतंत्र आहे आणि हे तत्त्व जर उपयोगितावादाच्या तत्त्वात ग्रथित केले असेल तर ते मत शुद्ध उपयोगितावादी राहणार नाही. स्वतोमूल्यवान गोष्टींची निर्मिती व वृद्धी आपण केली पाहिजे व ती व्यक्तिनिरपेक्षपणे केली पाहिजे असे आपला विवेकच आपल्याला सांगत असतो. मूल्यांची वाटणी शक्य तितकी विस्तृत व्हावी ही नैतिक प्रेरणा ‘न्यायाचे तत्त्व’ म्हणून संबोधली जाते. हे तत्त्व उपयोगितेच्या तत्त्वाहून स्वतंत्र आहे. न्यायाचे तत्त्व सांगते की आपण सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. “समान वागणूक देणे म्हणजे त्यांच्याशी एकाच पद्धतीने वागणे नव्हे; तर त्यांच्या सु-जीवनाला समान उपदान (म्हणजे समान मदत किंवा गरजेनुसार मदत) करणे, किंवा त्यांच्याकडून समान त्यागाची (म्हणजे त्याच्या शक्त्यनुसार त्यागाची) अपेक्षा करणे हा त्याचा अर्थ आहे.
शुभंकरणाचे तत्त्व (Principle of Beneficence):
न्यायाच्या तत्त्वाबरोबरच आणखी एका अधिक मूलभूत तत्त्वाचा उल्लेख दि.य. देशपांडे यांनी केला आहे. जरी आपला आदर्श शुभ निर्माण करणे व अशुभ टाळणे हा असला तरी ते अशक्य आहे. कारण शुभाबरोबर थोडेसे अशुभही निर्माण होतच असते. म्हणून आपले ध्येय शुभाधिक्य निर्माण करणे आहे असे म्हणावे लागते. परंतु यासाठी आपण शुभ करावे व अशुभ टाळावे हे तत्त्व आधारभूत मानावे लागते. या प्राथमिक तत्त्वाला शुभंकरणाचे तत्त्व म्हणतात.
याप्रमाणे कांटचे मत आणि उपयोगितावादी मत ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न प्रा. देशपांडे यांनी केला आहे. कर्तव्यकर्म कोणते हे ठरविताना उपयोगितावाद्यांचा अस्तिवाचक निकष वापरावा लागेल. कारण मानवी शुभाशुभाशी ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसलाही संबंध नाही ते कर्म कर्तव्य असू शकत नाही. पण कर्तव्यकर्म कोणते हे ठरल्यानंतर ते कर्तव्यासाठीच केले पाहिजे, नैसर्गिक कल, स्वार्थ या गोष्टी प्रेरक ठरू नयेत हे कांटचे मत लक्षात घ्यावे लागते. कांटचे मत एकान्तिक नैतिक शुचितेला जन्म देते त्यामुळे प्रा. देशपांडे या मताचा स्वीकार पूर्णांशाने करीत नाहीत. केवळ कर्तव्यबुद्धीने घडलेल्या कर्मांतच नैतिकता असते असे मानणे कठीण आहे असे म्हणून ते नैतिकदृष्ट्या चांगल्या असणाऱ्या दोन वृत्तींचा अथवा शीलांगांचा (traits of character) उल्लेख करतात. १) ज्यांना सामान्यपणे नैतिक सद्गुण म्हणतात आणि ज्यांत जे युक्त असेल ते युक्त आहे म्हणून करण्याची इच्छा असते. आणि २) नैसर्गिक दयालुत्व किंवा कृतज्ञता यांसारखी शीलांगे, ही शीलांगे नीतीला पोषक असून कर्तव्याच्या पलीकडे जाणारी कर्मे करण्यासाठीदेखील ती प्रेरित करतात. उदा. मातृस्नेहाने घडणारी कर्मे. आई आपल्या लहान बाळाची काळजी घेते. त्याकरिता तिला कर्तव्यबुद्धीची गरज नसते. तसेच एखादा मनुष्य आपल्या मित्राला संकटकाळी मदत करतो ती मित्रप्रेमामुळे, कर्तव्यबुद्धीने नव्हे. ही कर्मे नैतिकमूल्यविहीन आहेत असे म्हणणे कठीण आहे. म्हणून असे म्हणावे लागते की, “सहज प्रवृत्तिमय कर्मे उत्स्फूर्तपणे केली जायला हरकत नाही. एवढेच नव्हे तर ती उत्स्फूर्तपणेच केली जावीत हेच श्रेयस्कर आहे. पण ती नीतिसंमत आहेत एवढे पाहण्याची सवय आपल्याला लावून घेणे अवश्य आहे. कारण सहजप्रवृत्तीने घडणारी सर्वच कर्मे नीतिसंमत नसतात आणि जी कर्मे नीतिसंमत नसतील ती कितीही उत्स्फूर्तपणे केली तरी ननैतिक होतील, एवढेच नव्हे तर ती क्वचित अनैतिकही होतील.” अमुक करा यापेक्षा अमुक व्हाः
आपल्या नैतिक वर्तनाचे प्रेरक स्तुति-निंदा, बक्षीस किंवा दंड यांची अपेक्षा यांसारखे सर्वथा बाह्य असू नयेत किंवा इतरांबद्दल वाटणारे प्रेम किंवा आस्था यांसारखे केवळ आगन्तुक असू नयेत असे आपल्याला वाटत असेल तर विशिष्ट शीलांगे व सवयी यांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. केवळ नियमानुसार वागणे याने आपले समाधान होत नाही. कारण हे नियमपालन न-नैतिक प्रवृत्तींनी प्रेरित झालेले असू शकेल व परीक्षेच्या क्षणी त्यांच्यावर विसंबून राहता येणार नाही. तसेच परस्परविरोधी नियमांपैकी एखाद्या नियमाची निवड करताना उपयोगी पडतील अशा वृत्तींची जोपासना करणे आवश्य असते. त्यामुळे ‘अमुक करा’ यापेक्षा ‘अमुक व्हा’ यावर लक्ष केन्द्रित केले पाहिजे असे प्रा. देशपांडे यांचे मत आहे. या दृष्टीने शुभंकरत्व आणि न्यायीपणा या शीलांगांचे संवर्धन करणे इष्ट ठरते. यांना प्रधान सद्गुण म्हणता येईल. कृतज्ञता प्रामाणिकपणा ह्यांसारखे सद्गुण जीवनाच्या एका सीमित भागाशी संबंधित असतात. तर नीतिधैर्य, कर्तव्यपरायणता, सचोटी, नैतिक विधींबद्दल आदर हे संबंध नैतिक जीवन व्यापणारे गुण आहेत. प्रस्तुत (relevent) वास्तवे (facts) शोधून काढून त्यांच्याविषयी आदर बाळगण्याची वृत्ती, तसेच स्वच्छ विचार करण्याची वृत्ती हेही महत्त्वाचे गुण आहेत. आणखी एक अतिशय महत्त्वाचा सद्गुण म्हणजे इतरांचे आंतरिक जीवन कल्पनेने व भावनेने जाणून घेण्याचे सामर्थ्य. रॉईस याला रिश्र ळपीळसहीं असे नाव देतो. हा सद्गुण जोपासला गेला नाही तर शुभंकरणाची किंवा न्यायाची प्रवृत्ती सफल होणे कठीण होऊन बसेल.
याप्रमाणे नैतिक ध्येये ‘असण्याच्या’ तन्हा आहेत. विशिष्ट प्रकारचा पुरुष (person) होण्याची इच्छा बाळगणे त्यांत अंतर्भूत आहे. नैतिक शिक्षणास उपयुक्त म्हणून आदर्श पुरुषांचे चित्रण चरित्रे, कादंबऱ्या महाकाव्ये यांद्वारे केले जात असते. सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, महात्मा गांधी या आदर्श व्यक्तींच्या उदाहरणांना नैतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. अर्जुन, नेपोलियन, इंदिरा गांधी हेही आदर्श मानले जाऊ शकतात पण ते नैतिक आदर्श नाहीत. नैतिक ध्येयाबरोबरच न-नैतिक ध्येयही आपण बाळगत असतो. न-नैतिक आदर्श आपल्यासमोर ठेवायला हरकत नाही. पण या दोघांची गल्लत मात्र करता कामा नये. या ठिकाणी प्रा. देशपांडे न-नैतिक सुजीवन (The Good Life) कसे असते व त्याचा नीतीशी काय संबंध असतो याची चर्चा करतात. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडता येईल.
न-नैतिक सुजीवनः
सुजीवन कोणत्या प्रकारचे असते याचा विचार करताना एक गोष्ट निर्विवाद आहे. ती म्हणजे आपण स्वतोमूल्यवान म्हणून ठरविलेले अनुभव आणि व्यापार या सूजीवनात असावे लागतील. मानवी स्वभावात भिन्नता असल्यामुळे (स्वतोमूल्यांच्या यादीतील घटक जरी सर्वांनी मान्य केले तरी) त्यांची क्रमवारी लावण्याच्या अनेक तन्हा असू शकतील. काही लोकांच्या दृष्टीने सुजीवनात शांतता व सरक्षितता यांना वरचे स्थान असेल तर काहींच्या मते साहस आणि नावीन्य यांना अग्रक्रम असेल. काही ज्ञानोपासनेला वरचा दर्जा देतील तर काही कलास्वादाला प्राधान्य देतील. इतर काहींच्या मते समाजसेवा प्रधान ठरेल. याप्रमाणे सुजीवनाची प्रत्येकाची कल्पना थोडीफार भिन्न राहील. मनुष्यांच्या गरजा व सामर्थ्य भिन्न असतात. त्याचप्रमाणे एकाचे सुजीवन दुसऱ्याच्या सुजीवनापेक्षा स्वतोमूल्याच्या दृष्टीने कमी चांगले असू शकेल. उदा. एखाद्याचे बौद्धिक सामर्थ्य बेताचे असेल तर त्याला बौद्धिक आनंद मिळू शकणार नाही व ज्याला तो मिळू शकतो त्याच्यापेक्षा याचे जीवन चांगलेपणात (अर्थात न-नैतिक चांगलेपणात) उणे राहील.
ॲरिस्टॉटलच्या मते सुजीवन हे उत्कृष्ट व्यापारांचे (Life of excellent activities) जीवन आहे व त्यात एकप्रकारचे समाधानही असते.
सुजीवन आणि नीती यांचा संबंधः
याचा विचार करताना दोन गोष्टी प्रा. दि.य. देशपांडे यांनी नमूद केल्या आहेत. १) वरील प्रकारच्या सुजीवनाला नीती पोषक असली पाहिजे. २) नीती केवळ स्वतःच्याच सुजीवनाला पोषक असली पाहिजे असे नाही तर ती इतरांच्या सुजीवनालाही पोषक असली पाहिजे. अशुभापेक्षा शुभाची निर्मिती, तसेच न्यायाच्या तत्त्वानुसार शुभाची वाटणी नीतीला अपेक्षित आहे. या दृष्टीने सुजीवन आणि नीती यांचा मिलाफ असलेले मूल्यवान जीवन जगणे ह्यातच मनुष्यजीवनाची सार्थकता आहे. दि.य. देशपांडे यांनी मांडलेले हे विचार अगदी तरुण वयात त्यांनी लिहिलेल्या Ethics for Every Man या पुस्तकातील विचारांची आठवण करून देतात.
मूर या थोर तत्त्वचिंतकाच्या नैतिक मताचे विवेचन या पुस्तकात त्यांनी केले आहे. हे विवेचन करताना A Note on Civilization या सदराखाली त्यांनी पुढील अत्यंत मोलाचा विचार व्यक्त केला आहे. ते लिहितात, “जेथे विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, स्वातंत्र्य, सुख यांना गौरविले जाते, जेथे स्त्रिया आणि पुरुष ह्यागोष्टींचा स्वार्थ-साध्य म्हणून पाठपुरावा करतात, आणि जेथे यांच्या जपवणुकीसाठी इतर सर्व काही सोडायला ते तयार असतात तेथे सभ्यता नांदते आणि वाढीला लागते आणि या अर्थाने सभ्य जीवन जगणे व असे जीवन अधिकतम माणसांना शक्य करून देणे यातच आपण आपल्या अस्तित्वाचे समर्थन शोधू शकतो.”१७ १९४६ साली वरील पुस्तक लिहिले गेले. १९८७ साली प्रा.देशपांडे यांनी नीतिशास्त्राचे प्रश्न हे पुस्तक लिहिले. पुढे १९९० पासून नवा सुधारक या आपल्या मासिकातून वेळोवेळी त्यांनी आपली नैतिक मते मांडली. या मतांत आढळणारे सारतत्त्व बदललेले नाही हे सहज लक्षात येईल. त्यांच्या चिंतनाची खोली कळण्यासाठी मूल साहित्य वाचणे हाच एक उपाय आहे. या ठिकाणी त्यांच्या नैतिक भूमिकेची फक्त तोंडओळख आपण करून घेतली आहे. त्यामुळे अधिक परिचय करून घेणे सोयीचे व्हावे एवढेच प्रयोजन आहे.
विवेकवादी सत्ताशास्त्र किंवा अतिभौतिकी (metaphysics) अध्यात्म म्हणजे काय?:
आपल्या विवेकवाद या ग्रंथात प्रा. दि.य.देशपांडे म्हणतात की अध्यात्म किंवा अतिभौतिकी म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. एक उत्तर असे देता येईल की अध्यात्म हे विज्ञान नाही. ती तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. विश्वाचे ज्ञान ज्याला होते त्या ज्ञात्याचा, आत्म्याचा विचार विज्ञान करीत नाही. पण त्याचाही विचार करावा लागतोच. तो विचार म्हणजे अध्यात्म. परंतु अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान असे जरी असले तरी ते आत्मज्ञान आपल्याला ज्यामधून प्राप्त होते त्यातून किंवा ज्या उपायांनी प्राप्त होते त्या उपायांनी विश्वाविषयीही ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून अध्यात्मशास्त्रात केवळ आत्म्याचे नव्हे तर आत्म्याहून भिन्न अशा जडविश्वाचे व परमात्म्याचेही ज्ञान मिळते असे मानतात. त्यामुळे सबंध विश्व, त्याचा उत्पत्तिकर्ता, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध इत्यादी गोष्टींचीही चर्चा अध्यात्मात होते. असे असले तरी तत्त्वज्ञान (philosophy) व अध्यात्म (metaphysics) समानार्थी नव्हेत. अध्यात्मशास्त्रात प्रमुख स्थान आत्म्याला आहे आणि त्यात प्रामुख्याने आत्म्याच्या स्वरूपाविषयी, त्याच्या परमात्म्याशी असणाऱ्या संबंधाविषयी आणि मानवाच्या विश्वातील स्थानाविषयी विचार असतो. परंतु तत्त्वज्ञानाने असा अर्थ व्यक्त होत नाही. एखादे तत्त्वज्ञान अनात्मवादी असू शकेल. त्याचप्रमाणे ते परमात्मा न मानणारेही असू शकेल. एवढेच नव्हे तर विश्वातील मानवाचे स्थान अतिशय क्षुद्र व उपेक्षणीय आहे असे मानणारेही असू शकेल. अध्यात्मशास्त्रात मात्र या विचारांना थारा मिळणार नाही.
अध्यात्माची प्रेरणाः
‘‘मनुष्य जेव्हा ह्या अफाट, अनंत स्थलकालात विस्तारलेल्या विश्वाकडे पाहतो तेव्हा त्याला आपले दौर्बल्य, क्षुद्रत्व फार प्रकर्षाने जाणवते. आपण किती अल्पजीवी, आपली शक्ती किती तोकडी, आपले ज्ञान किती तुटपुंजे यांचे दर्शन घडल्यावर तो भयभीत होतो. सर्वस्वी प्रतिकूल, आपल्या इच्छा-आकांक्षाविषयी उदासीन असणाऱ्या विश्वात आपण कोठून तरी येतो आणि क्षणमात्र येथे राहून कोठेतरी अज्ञातात निघून जातो, या कल्पनेने मनुष्य अतिशय बेचैन होतो.”१८ त्याचप्रमाणे मोठ्या प्रयासांनी आपण निर्माण केलेले वैभव व प्रत्यक्ष आपले अस्तित्व सारेच क्षणभंगुर आहे, ते केव्हाही नष्ट होऊ शकते ही जाणीव अस्वस्थ करणारी असते. यावर काही उपाय आहे काय याचा तो शोध घेऊ लागतो. विज्ञानाकडून या प्रश्नाला उत्तर ‘नाही’ असेच मिळते. म्हणून मग अध्यात्माचा जन्म होतो. अध्यात्माची प्रेरणा मनुष्याला दिलासा, आश्वासन देण्याची आहे. त्यामुळे मनुष्य त्याकडे ओढला जातो. पण अध्यात्म खरोखर विश्वासंबंधीच्या व मानवासंबंधीच्या अंतिम प्रश्नांची उत्तरे देऊ शकते काय ?
अध्यात्माचे निष्कर्ष निराधारः
वरील प्रश्नाला उत्तर देताना दि.य. देशपांडे म्हणतात की विज्ञानाजवळ नाही असे कोणतेही ज्ञानसाधन अध्यात्माजवळ किंवा तत्त्वज्ञानाजवळ नाही. “मनुष्याला मिळू शकेल असे सर्व ज्ञान प्राप्त करण्याचे उपाय विज्ञानाजवळ आहेत, आणि जो विज्ञानाजवळ नाही असा एकही उपाय अन्य कोणाजवळ नाही.”१९ विज्ञान हे अध्यात्म विचारीत असलेल्या अंतिम प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. कारण विज्ञानाची पद्धत इंद्रियानुभवानुसारी आहे व अध्यात्माचे प्रश्न कोणत्याही संभाव्य अनुभवाच्या पार पलीकडे जाणारे आहेत. त्यामुळे विज्ञान अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. अध्यात्म मात्र आध्यात्मिक ज्ञान मिळविण्याची दोन प्रमुख साधने मानत असते. १) शब्द किंवा आप्तवचन २) साक्षात्कार.
आप्तवचनः
सामान्य लोक आणि बऱ्याच वेळा वैज्ञानिकही शब्दप्रमाण मानतात; कारण त्यातील विधाने अधिकारी वैज्ञानिकांनी वारंवार तपासून ती खरी असल्याची खात्री करून घेतलेली असते. त्यात श्रद्धेला आवाहन नसते. शिवाय त्यांची शहानिशा करण्याला कोणालाही मज्जाव नसतो. अध्यात्मशास्त्रातील शब्दाचे स्वरूप मात्र वेगळेच असते. असे सांगितले जाते की काही शब्द अलौकिक असतात, ते सदैव खरेच असतात, खोटे असू शकत नाहीत. उदा. वेदांतील वचने. ती खरी कशावरून असा प्रश्न विचारणे गैर मानले जाते. ती वचने ईश्वराचे शब्द आहेत व म्हणून त्यांचा स्वीकार श्रद्धापूर्वक केला पाहिजे अशी भूमिका अध्यात्माची असते. धर्मांचे मूलग्रंथ, अवतारांचे आणि प्रेषितांचे शब्द यांच्याविषयी हीच भूमिका घेण्यात येते. ही भूमिका उघडच अविवेकीपणाची आहे. ‘जे आप्तवचन खरे की खोटे हे आपल्याला कळू शकत नसेल तर त्यावर विश्वास ठेवणे कितपत शहाणपणाचे आहे ?’ असा सवाल दि.य. देशपांडे करतात.
साक्षात्कारः
वरील प्रश्नाला उत्तर म्हणून शब्दप्रमाणाला साक्षात्काराची जोड दिली जाते. साक्षात्कार हा अनुभवाचा एक अलौकिक प्रकार समजला जातो. या अनुभवात एखादी अलौकिक गोष्ट उघड होते, तिचे साक्षात् दर्शन घडते. हा साक्षात्कार अलौकिक म्हणजे अतींद्रिय ज्ञान करून देणारा असतो. स्थूल डोळ्यांनी रंग दिसतो तसा साक्षात्कार परमेश्वराचे दर्शन घडवितो. ‘अहं ब्रह्मास्मि’ असा अनुभव येणे हाही साक्षात्काराचाच प्रकार. प्राणायाम, योगासने इत्यादींच्या साह्याने साधना करून असे अतींद्रिय ज्ञान कोणालाही प्राप्त करून घेता येते असे साक्षात्कारवादी म्हणतात. साक्षात्कारासाठी दीर्घ साधना लागते व साधना परिपूर्ण झाल्यास परम सताचा अनुभव येतो. हे दिव्यदर्शन असते व त्यात मानवाचे पूर्ण समाधान होते. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून सर्व संशय दूर होतात. प्रथमदर्शनी हे मत बरोबर वाटत असले तरी त्यात अनेक शंकास्थाने आहेत. साक्षात्कारात एकवाक्यता नसतेः
साक्षात्कारी म्हणतात ते खरे आहे असे म्हणता येण्यासाठी सर्व साक्षात्कार एकाच आशयाचे असावे लागतील. पण तसे दिसत नाही. अद्वैत वेदान्तावर विश्वास ठेवणाऱ्याला एका प्रकारचा साक्षात्कार होतो तर विशिष्टाद्वैती मनुष्याला वेगळ्याच आशयाचा साक्षात्कार होतो. तसेच ख्रिस्ती मनुष्याला येशू आणि मेरी यांचे दर्शन घडते. म्हणजेच साक्षात्कारात एकवाक्यता आढळत नाही. अधिक तपास केल्यास असे आढळते की काही तीव्र भावनांच्या व्यक्तींना आपला पूर्वेतिहास आणि परिस्थिती यांनी तयार झालेल्या अतीन्द्रिय गोष्टींचा साक्षात्कार वाटतो. साक्षात्कार हा अनुभव ज्ञानदायी (Cognitive) नसतोः
साक्षात्कार किंवा समाधी हा अनुभवप्रकार घडून येतो हे मान्य केले तरी त्याचे स्वरूप काय आहे हे निश्चित करावे लागेल. इंद्रियांनी प्राप्त होणारे अनुभव ज्ञानदायी असतात. ते आपल्याला वस्तुस्थितीचे ज्ञान करून देत असतात. आनंद, दुःख इत्यादी अनुभव ज्ञानात्मक नसतात. ते विशिष्ट भावनात्मक स्थिती दर्शवितात. तसेच साक्षात्काराबद्दल म्हणता येईल. भिन्न साक्षात्कारांच्या विषयांत आढळणाऱ्या तफावतीमुळे हा अनुभव ज्ञानात्मक नसावा अशी शंका येणे रास्त आहे. विल्यम जेम्सने (प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ) म्हटले आहे की laughing सरी मुळे साक्षात्कारवादी म्हणतात त्याप्रकारची भावनात्मक स्थिती निर्माण होते. यावरून असे म्हणता येईल की साक्षात्कार हा अनुभवज्ञान देणारा (ईश्वर, आत्मा, परलोक इत्यादींचे) अनुभव आहे ही कल्पना त्याज्य मानली पाहिजे. तीच गोष्ट श्रद्धेची. श्रद्धा कितीही पक्की असली तरी ती खरी आहे की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच. ती जर खरी नसेल तर ती ठेवणे चूक आहे; एवढेच नव्हे तर ती हानिकारकही असू शकेल.
याप्रमाणे अलौकिक शब्द, साक्षात्कार, श्रद्धा यांचा विवेकवादाने विरोध केला आहे. कोणतेही ज्ञान मिळविण्याची एकच रीत आहे, ती म्हणजे विज्ञानाची इंद्रियानुभव व त्यावर आधारलेला तर्क यांची असे त्याचे प्रतिपादन आहे. डॉ. अंतरकरांनी यावर आक्षेप घेतला आहे. तो असा की धार्मिक भाषा ( ईश्वर, आत्मा, परलोक वगैरे संबंधीची) वैज्ञानिक भाषेहून अत्यंत भिन्न आहे. ‘ईश्वर आहे’ हे विवेकवादानुसार एक वैज्ञानिक विधान, अभ्युपगम आहे. परंतु या वाक्याचे कार्य वैज्ञानिक विधान व्यक्त करण्याहून भिन्न असेल तर त्याची चिकित्सा वैज्ञानिक विधान म्हणून करणे चूक ठरेल. व्हिट्गेन्श्टाइनने अगदी अलीकडे हे मत मांडले आहे. प्रा. दि. य. देशपांडे या आक्षेपाला उत्तर देताना म्हणतात की ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, दयाळू आहे, प्रार्थनांना पावणारा आहे, इत्यादी वाक्ये सामान्य धार्मिक लोक सामान्य अर्थाने, अक्षरशः वाच्यार्थाने घेत असतात. तेव्हा “विवेकवादी जेव्हा या सर्व गोष्टी निराधार आणि अनिर्णय मानतो तेव्हा तो वाऱ्याशी भांडतो आहे असे म्हणता येणार नाही.’२० ईश्वर, आत्मा, अमरत्व यांविषयीचे प्रश्न मानवापुढे उपस्थित होणे नैसर्गिक आणि अपरिहार्यही आहे. परंतु त्यांची उत्तरे देण्यास आपली बुद्धी समर्थ नाही हे आपण मान्य करावे अशी भूमिका दि.य.देशपांडे यांची आहे.
विवेकवादः एक महत्त्वाचे उपकरण
याप्रमाणे दि.य.देशपांडे यांनी आपल्या विवेकवादी भूमिकेला अनुसरून केलेल्या नीतिविषयक व अतिभौतिकीविषयक मांडणीची रूपरेषा आपण पाहिली. व विवेकवादी ज्ञानमीमांसेचाही थोडक्यात उल्लेख केला. कारण ज्ञानमीमांसा अंतिम प्रश्न सोडविण्यासंबंधीची व्यक्तीची भूमिका दिग्दर्शित करते. मानवाला पडत असलेल्या अंतिम प्रश्नांची उत्तरे कशी व कोठे सापडतील हे आपण ज्ञानप्राप्तीची कोणती साधने प्रमाण मानतो याने ठरत असते. दि.य. देशपांडे यांनी या संदर्भात ज्या विवेकवादाचा स्वीकार केला आहे त्याची समीक्षा करण्याचा माझा हेतू नाही व अधिकारही नाही. एवढे मात्र खरे की ही मांडणी विविध तत्त्वज्ञानविषयक समस्या हाताळण्यासाठी एक महत्त्वाचे उपकरण उपलब्ध करून देते. या उपकरणाचा वापर करून स्वतः दि.य. यांनी कर्मसिद्धान्त, पूर्वजन्म आमि पुनर्जन्म, विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध, अध्यात्म आणि विज्ञान, नियति, दैव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म, श्रद्धा हे प्रमाण आहे काय, भक्ती हे मूल्य आहे काय, गीतेतील नीतिशास्त्र इत्यादी विषयांची चिकित्सा केली आहे. ही चिकित्सा आपल्या मान्यतांना धक्का देणारी असली तरी अत्यंत मोलाची आहे हे नाकारता येत नाही. वानगीदाखल त्यांनी केलेली आत्म्याच्या स्वरूपाविषयीची चिकित्सा घेता येईल. आत्म्याचे स्वरूपः ‘‘शरीरपातानंतर आत्मा राहतो म्हणतात. पण ते कसे शक्य आहे हे मला कळत नाही. मला हा शब्दप्रयोग निरर्थक वाटतो. अशरीरी आत्मा आजपर्यंत कोणी पाहिला आहे काय ? त्याची खात्रीलायक माहिती आहे काय ? या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत.’२१ आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात की आत्मा हा शब्द मी ‘अहं’ या अर्थाने वापरतो. कारण मला दुसरा कुठलाही अर्थ माहीत नाही. मला आत्मा आहे, म्हणजे मी आहे, मला माझा अनुभव आहे. हा माझा स्वतःविषयीचा अनुभव बाह्य आणि आंतरवेदने, भावना आणि प्रवृत्ती इत्यादिकांचा बनलेला आहे. तो शारीर आणि मानस दोन्ही आहे. कारण शुद्ध मानस असा अनुभव नाही. तो इंद्रियसापेक्ष असल्यामुळे मला जर एकही इंद्रिय नसेल तर माझी संपूर्ण जाणीवच नष्ट होईल. ते म्हणतात की मला जर इंद्रिये नसती तर मला संज्ञाच असणे अशक्य होते. आपण जिला स्वतःची जाणीव म्हणतो ती कोणत्याही क्षणी आपल्याला जो बाह्य आणि आंतरवेदनात्मक, भावनात्मक, प्रवर्तनात्मक अनुभव येत असतो त्याची बनलेली असते.” २२ हिच्याखेरीज आत्म्याची अन्य जाणीव आपल्याला नाही. आता हा आत्मानुभव उघडच अशरीरी नाही.
ज्याला आपण मी म्हणतो तो खरोखर मानस आणि शारीर अशा विविध गुणांनी युक्त पदार्थ आहे. शारीर (वर्ण, उंची इत्यादी) तसेच मानस (वाचणे, चर्चा करणे इत्यादी) ही दोन्ही प्रकारची विशेषणे आपण एकाच पदार्थाला लागू करतो म्हणजे आपल्या आत्म्याची किंवा पुरुषाची (person) कल्पना शरीरी पुरुषाची आहे, अशरीरी पुरुषाची नाही.
याप्रमाणे दि.य. देशपांडे यांनी आत्म्याविषयीचा प्रश्न हाताळला आहे. तो प्रश्न सुटला आहे असे मात्र नाही.
कोणत्याही एखाद्या पद्धतीने तत्त्वज्ञानाचे प्रश्न सुटतील असे नाही. खरे म्हणजे जे प्रश्न सुटत नाहीत तेच प्रश्न तत्त्वज्ञानाचे असतात. त्यामुळे विवेकवाद अंतिम प्रश्नांची सर्वमान्य उत्तरे देईल ही अपेक्षा ठेवणेच चूक आहे. एका विशिष्ट भूमिकेशी एकनिष्ठ राहून तत्त्वज्ञानाच्या प्रश्नाकडे पाहण्याची एक दृष्टी दि.य. देशपांडे यांनी दिलेली आहे. त्यांच्यासमान विचार करणाऱ्यांना ही दृष्टी भावते. तसेच वेगळी मनोवृत्ती असणाऱ्यांना ती आवडत नाही. इतकेच नव्हे तर अतिरेकी स्वरूपाची वाटते. आजचा सुधारक या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकातून वेळोवेळी आक्षेपकांच्या आक्षेपांना त्यांनी उत्तरेही दिली आहेत. तीसुद्धा अर्थात आपली मूळ चौकट स्वीकारूनच. शेवटी एवढेच म्हणता येईल की चिंतनाचा प्रवास व प्रत्येकाने स्वतः करायचा असतो. मळवाटेवरून चालणे सुरक्षित व सोपे असले तरी समाधानकारक असेलच असे नाही. स्वतःचा मार्ग शोधताना, नवी वाट चोखाळताना फार मोठी हिम्मत लागते. ती हिम्मत, ते सामर्थ्य दि.य. देशपांडे यांच्यात होते हे मान्य करावेच लागेल. स्वसामर्थ्याने त्यांनी जी मूल्ये शोधली व जोपासली ती कोणत्याही अर्थाने उणी नाहीत.
त्यांच्या ऋषितुल्य जगण्याला माझे विनम्र अभिवादन !
१. माझ्या तत्त्वचिंतनाचा प्रवास: दि.य.देशपांडे परामर्श, खंड १५, पृ. ३७,
मे १९९३, पुणे विद्यापीठ प्रकाशन. २. परामर्श : खंड १५, अंक २ ऑगस्ट १९९३ पृष्ठ १५६ . ३. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ ८१. ४. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ ८१. ५. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ १, २ (संपादकीय). ६. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ ८६.
आजचा सुधारक: वर्ष २, अक १ एप्रिल १९९१ पृ. २३. ८. विवेकवाद : दि.य. देशपांडे, ग्रंथाली प्रकाशन, १९९९ पृ. ३. ९. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ १९ १०. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ३६-३७ ११. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ४१ १२. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, मार्च ९१, पृष्ठ ११ १३. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ४४ १४. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, एप्रिल ९२, पृष्ठ ८ १५. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ६७ १६. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, एप्रिल ९२, पृष्ठ १० १७. दि.य. देशपांडे : एींहळली षी शीशी रप, पृष्ठ ४५ १८. दि.य. देशपांडे : विवेकवाद , पृ. ४९. १९. दि.य. देशपांडे : विवेकवाद , पृ. ४२. २०. दि.य. देशपांडे : परामर्श : खंड १५, अंक २ ऑगस्ट १९९३ पृष्ठ १७२. २१. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, फेब्रु. ९१, पृष्ठ ६ २२. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, फेब्रु. ९१, पृष्ठ ६
४९, चिखली सह. गृह. संस्था, काचीमेट, अमरावती रोड, नागपूर ४४० ०३३.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.