माती व पाणी : निविष्टांचे मूल्यांकन

प्रास्ताविकः
जगाच्या इतिहासात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ज्या ज्या प्रदेशात कृषि-उत्पादकता उत्तम होती, त्या ठिकाणी संपन्नता आली. त्याबरोबरच मानवी संस्कृतीचा विकास झाला. माया संस्कृती, मोहिंजोदारो (सिंधु), ईजिप्त, ग्रीस या भूतकाळात मानवी संस्कृती विकसित झाल्या याचे एक कारण म्हणजे तेथे कृषि-उत्पादन उत्तम होते. कृषि-उत्पादनात दोन महत्त्वाचे नैसर्गिक घटक आहेत माती आणि पाणी. त्यांची उपलब्धी, प्रकार, गुणवत्ता, आकारमान यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातीचा ह्रास म्हणजे संस्कृतीचा विनाश हा धडा आपणास गतइतिहास सांगतो व शिकवतो. पण आपण काय धडे गिरविले आहेत ते पाहू. पाण्याची चणचण, दुर्भिक्ष्य किंवा अतिवापर ; दोन्हींमुळे उत्पादनात घट झाल्याचे अनेक ठिकाणी भूतकाळात व वर्तमानकाळातदेखील दिसते. पण यात काही अनुकूल बदल केले का ? त्यांच्या नैसर्गिक स्थितीवरील परिणामांचे मूल्यांकन झाले का? हे दोन घटक म्हणजे शेती उत्पादनातील महत्त्वाच्या निविष्टा आहेत. या निविष्टांचे मूल्यमापन करणे अगत्याचे झाले आहे. संपन्नता आल्याची उदाहरणे आपल्याकडे अनेक आहेत. जल-प्रकल्प तयार केले. पाण्याचा भरमसाट वापर झाला. माती मात्र क्षारयुक्त झाली. त्यामुळे ऊस उत्पादन सरासरी ११० टन दर हेक्टरी होते ते ८० टनावर आले. काही ठिकाणी तर ते ७० टन आहे. माती या घटकाचा आपला अभ्यास किती? प्रत्येक माणूस मी या मातीचा पुत्र आहे असे समजतो, पण ज्या काळ्या मातीत चालतो, तिचा काळा रंग का, याचे अचूक उत्तर किती लोकांना माहीत आहे? शेतीविषयी शेतकरी, मजूर, व्यापारी, अर्थशासक, राजकारणी व अभियंते सर्वच बोलताना दिसतात, पण मातीची अचूक माहिती नाही, जाण नाही व तिचे संवर्धन झाले पाहिजे असे अनेकांना वाटत नाही, ही मानवी समाजाच्या समृद्ध भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.

पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. पाण्याची पिकाला आवश्यकता असते. पाण्याशिवाय बी उगवत नाही, मोठे होत नाही. वाढ खुंटते. उत्तम उत्पादनासाठी पाणी व त्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाण्याचा ताण आला तरी झाडे सुकतात व पाणी जास्त झाले तरी मरतात. त्यामुळे पाण्याची मात्रा योग्य पद्धतीने देणे आवश्यक आहे. पिकास लागणारे पाणी मोजून देता येते. आता याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पण पाणी-साठवण, परिवहन व पाणी परिचलन यांची सांगड अद्याप पाहिजे तेवढी, योग्य वेळेस, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी नेमक्या प्रमाणात देता येईल अशी बसली नाही. आपली सिंचनव्यवस्था पिकांसाठी लागणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अर्धे शतक मागे आहे, अविकसित आहे. वैज्ञानिक आधार घेऊन पिकाला पाणी देणे आवश्यक आहे. या सर्व बदलासाठी हवे आर्थिक नियोजन व अनुकूल धोरण. जलव्यवस्थापकांच्या मतीत व धोरणात बदल करणे आवश्यक आहे. तेव्हा पाणी हा घटक खतांच्या मात्रांप्रमाणे देण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल. उदाहरण द्यावयाचे झाले तर ठिंबक, तुषार, पाझर सिंचन पद्धती आणि जलाशयातील पाणी यांचा अनुकूल मेळ घालावा लागणार आहे. फक्त विभागाचे नाव पाटबंधारे ऐवजी जलसंपदा केल्याने काही साध्य होणार नाही. आधुनिक पद्धती व पाणी परिवहनाचे स्वयंचलीकरण, नियमित व अपेक्षित विसर्ग, आधुनिक सिंचन पद्धती एकत्रित आणणे व त्यांचे नियोजन हे सारे एकहाती असावे, याचा महाराष्ट्रात अद्याप जलसंपदा विभागाला गंधदेखील नाही. पाणी साठविणे म्हणजे पीक उत्पादन झाले, ही संकल्पना कालबाह्य झाली आहे ही गोष्ट अभियंत्याच्या गळी उतरत नाही. लवकर उतरणारही नाही कारण बरीच मंडळी झोपेचे सोंग घेतलेली आहेत.

भारतातील ‘खराब’ जमीनः क्षेत्र व वर्गीकरण

राज्य

क्षारयुक्त वायुधूपित जलधूपित जंगलातील

एकूण
ह्रासयुक्त दशलक्ष हे.

आंध्रप्रदेश ०.२४० ७.४४२ ३.७३४ ११.४१६
आसाम ०.९३५ ०.७९५ १.७३०
बिहार ०.००४ ३.८९२ १.५६२ ५.४५८
गुजरात १.२१४ ०.७०४ ५.२३५ ०.६८३ ७.८३६
हरियाणा ०.५२६ १.५९९ ०.२७६ ०.०७४ २.४७८
हिमाचल प्रदेश १.४२४ ०.५३४ १.९५८
जम्मू आणि काश्मीर ०.५३१ १.०३४ १.५६५
कर्नाटक ०.४०४ ६.७१८ २.०४३ ९.१६५
केरळ ०.०१६ १.०३७ ०.२२६ १.२७९
मध्यप्रदेश ०.२४२ १२.७०५ ७.१२५ २०.१४२
महाराष्ट्र ०.५३४ ११.०२६ २.८४१ १४.४०१
मणिपूर ०.०१४ १.४२५ १.४३८
मेघालय ०.८१५ १.१०३ १.९१५
नागालँड ०.५०४ ०.८७८ १.३८६
ओरिसा ०.४०४ २.७५३ ३.२२७ ६.३८४
पंजाब ०.६८८ ०.४६३ ०.०७९ १.२३०
राजस्थान ०.७२८ १०.६२३ ६.६५९ १.९३३ १९.९३४
सिक्कीम ०.१३१ ०.१५० ०.२८१
तामिळनाडू ०.००४ ३.३८८ १.००९ ४.४०१
त्रिपुरा ०.१०८ ०.८६५ ०.९७३
उत्तरप्रदेश १.२२९५ ५.३४० १.४२६ ८.०६१
पश्चिम बंगाल ०.८५० १.३२७ ०.३५९ २.५३६
केंद्रीय प्रदेश ०.०१६ ०.८७३ २.७१५ ३.६०४
एकूण ७.१६५ १२.९२६ ७३.६०० ३५.८८९ १२९.५८०

२. मातीची धूपः
उपलब्ध मातीचा प्रकार, खोली, तिची अन्नद्रव्य-साठवण-क्षमता,ओलावा-धारकता, जलवहन-क्षमता, हवा नियंत्रण करण्याची पातळी, असे गुणधर्म मातीशी निगडित आहेत. विषुववृत्तीय भूप्रदेशात साधारण ३ सें.मी. खोलीच्या मातीनिर्मितीस २५०-४०० वर्षे लागतात. उपलब्ध खडक, तेथील हवामान, पाऊस, वनस्पती, उतार, भूभागाची रचना, खडक व त्याचे प्रकार हे सर्व घटक माती निर्मितीत सहभागी असतात. मातीची सारखी धूप होते. भारतात ४ ते ८० टन माती दर हेक्टरी दरवर्षी वाहून जाते. शिवालिकमध्ये जवळजवळ ८० टन दर हेक्टरी माती वाहून जाते. सध्या मातीचा ह्रास अनेक प्रकारे होतो. भारतात व महाराष्ट्रात काय स्थिती आहे. ती तक्ता क्रमांक १ मध्ये दिली आहे. भारताचे भौगोलिक क्षेत्र ३२८.७३ द.ल.हे. असून त्यांपैकी सर्व राज्ये मिळून १२९.५८ दशलक्ष हेक्टर जमिनीचा ह्रास झाला आहे. महाराष्ट्रात ३०.७७ द.ल.हे. एकूण क्षेत्रापैकी १४.४०१ द.ल.हे. बाधित आहे. मातीची धूप म्हणजे काय, तर ते मानवी शरीराची कातडी काढणे होय. शरीरावरील त्वचा जर पूर्णत्वाने सोलली तर काय होते? कोठे तरी त्वचा जळाली वा खरचटले तर किती वेदना होतात ? मधुमेहींच्या तर जखमा वाढतात आणि चिघळतात. माती ही भूपृष्ठाची त्वचा आहे. ती त्वचा खडक उघडे पडेपर्यंत खरडली जात आहे. जर शेतीचा नाश थांबवावयाचा असेल तर मातीचा ह्रास रोखला पाहिजे. यानेच संस्कृतीचा विनाश थांबवता येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे मानवी संस्कृतीच्या नाशाची सुरुवात आहे. याचे बीज हे खरे तर मातीच्या रूपातील त्वचा सोलण्यात आहे.
माती जिवंत आहे. अभियंत्यांना माती पायाभरणी, बांधकामे, विटा तयार करणे यांसाठी उपयुक्त साधन सामुग्री आहे, तर वनस्पतींसाठी ते जीवन प्रदान करणारे माध्यम आहे. मातीत अनेक सूक्ष्म जीवाणू आहेत, जे पीकवाढीस उपयुक्त आहेत, मानवी जीवनास उपकारक आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या चवथ्या दशकात मृदा-सूक्ष्मजीवाणूंचा अभ्यास करणाऱ्या वाक्समन याला स्ट्रेप्टोमायसीन सापडले तर फ्लेमिंगला पेनिसिलिन मिळाले. स्ट्रेप्टोमायसीनने क्षयरोग नियंत्रणात आणला. पेनिसिलीन औषध मोठ्या प्रमाणात वापरले गेले, आणि जैवतंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला.

कापसातील बोंडअळी नियंत्रण करणारा बीटाजीनदेखील मातीतूनच मिळाला. अशा कितीतरी उपयुक्त जीवाणूंचा ह्रास मृदास्थलांतरामुळे होतो. वरच्या स्तरातील मातीला शेतकरी ‘फूल’ असे म्हणतात. हा सुपीक मातीचा थर असतो. यात पिकांस आवश्यक अन्नद्रव्ये असतात. नत्र, कर्ब, स्फुरद, पालाश, जस्त, लोखंड, कॅल्शियम, तांबे इत्यादींचे माती कोठार आहे. यात अनेक सूक्ष्म जीवाणू असतात, जे अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण करतात जसे रायझोबियम, अॅल्टोबॅक्टर, अल्गी. नैट्रोसोप्रोनास, नैट्रोसोकॉकम हे त्यातील प्रथिनांचे नैट्रेटमध्ये रूपांतर करतात. यांचेच शोषण मुळे करतात, व झाडांना अन्न व जल मिळते. माती वाहून गेली, धूप झाली म्हणजे या सर्व जीवाणूंचा ह्रास होतो. गाळ कोठेतरी उपयुक्त असला तरी ज्यांच्या शेतामधून तो गेला तेथील मातीची खोली हळूहळू कमी होते. प्रत्यक्षात काय होते ते पाहू.

२.१. गाळाची मोजणीः
अनेक पाणलोट-क्षेत्रात माती अपधावेमुळे (ठीप-षष मुळे) शेतांतून वाहते. नदी-खोरे पद्धतीतील पाणलोट क्षेत्रात गाळाची मात्रा मोजली गेली आहे. पाणलोट-विकासाचा उपचार करण्यापूर्वी व तो केल्यानंतर गाळ मोजला जातो. त्यातील प्रत्यक्ष आकडेवारी खाली दिली आहे. दमणगंगेच्या खोऱ्यात, पेठ तालुक्यात ही मोजणी केली. त्या ठिकाणी गावागणिक अपधाव मोजण्याची यंत्रणा उभी केली होती. पोचमपाड प्रकल्प व नागार्जुन सागर प्रकल्प श्रवणक्षेत्रात जमिनीची धूप मोजली. काही पाणलोट क्षेत्रांत उपचार केल्यानंतर मोजली. त्यामध्ये दर हेक्टरी वाहणारा गाळ ४ ते ११ मेट्रीक टन दर हेक्टरी एवढा मिळाला. याचा अर्थ दर हेक्टर क्षेत्रांमधून सर्वसाधारणपणे १.५, ८ व ५० किलो नत्र स्फुरद व पालाश अनुक्रमे स्थलांतरित झाले. एका वर्षात नत्र, स्फुरद व पालाश यांची आर्थिक किंमत मोजल्यास रु. १००० चे नुकसान झाले. यांत सूक्ष्म अन्नद्रव्यांची किंमत धरली तर नुकसान फार मोठ्या प्रमाणात वाढेल. या धुपेचे व्यवस्थापन व नियोजन केले नाही तर ५० वर्षांत हजारो रुपयांची वजावट केली पाहिजे. म्हणजे आर्थिक नफा-तोटा याचे गणित मांडले तर माती वाहिल्यामुळे जमिनीचा मगदूर नाहीसा झाला व उत्पादन कमी झाले. हेच नेमके विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे १९०१ ते १९५० पर्यंत झाले होते. जवळजवळ ५० कोटी लोकसंख्या भारतात होती. दरडोई जमिनीचे क्षेत्र आजच्या दुप्पट होते. तरी अन्नधान्य भूक भागवू शकत नव्हते. मातीची सुपीकता कमी झाली. ती भरून काढण्याचे कृत्रिम उपाय करावे लागले म्हणजे रासायनिक खतांद्वारे पिकांसाठी अन्नद्रव्य-पुरवठा केला. त्याची किंमत देशाने व समाजाने मोजली. सन १९५१ ५२ मध्ये अन्नधान्योत्पादन ५.२ कोटी टन होते ते २००० मध्ये २०.१ कोटी टन झाले, पण त्यासाठी रासायनिक खत-उत्पादन कारखाने काढावे लागले. एकूण २१ कारखाने (२००३-२००४) नत्र व स्फुरद खते निर्माण करीत होते. या उद्योगांमुळे रोजंदारी मिळाली पण पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. काही नद्या व नाले दूषित झाले. त्याबरोबर मातीची जडणघडण बिघडली. हा मातीमध्ये झालेला बदल अव्यक्त आहे. तो फारसा मोजला गेलेला नाही.

२.२. मातीची जडण-घडणः
मातीमध्ये छिद्रे असतात. त्यांचे दोन प्रकार असतात. मोठी व केशाकर्षक. केषाकर्षक छिद्रांत पाणी साठविले जाते तर मोठ्या छिद्रांमधून वायुवहन होते. मुळांभोवती वायुवहन फार महत्त्वाचे कार्य करते. मुळांना लागणारा प्राणवायू ही छिद्रे पुरवितात. या छिद्रांचे प्रमाण रासायनिक खते वापरामुळे कमी होते, कारण सेंद्रिय कर्ब कमी झाला म्हणजे मातीची जडण-घडण प्रतिकूलपणे बदलते. जलवाहकता कमी होते म्हणून निचरा होत नाही. निचरा योग्य प्रमाणात नसला म्हणजे वाफसा लवकर होत नाही, म्हणजेच प्राणवायू उपलब्ध होत नाही. यामुळे पीक पिवळे पडते व उत्पादनात घट होते. जेव्हा घोडदळ होते तेव्हा एक वाक्प्रचार होता. खिळा गेला तर नाल गेला. नाल गेला तर घोडा गेला. घोडा गेला तर स्वार गेला. आणि स्वार गेला तर लढाईत हार झाली. एवढा अनर्थ खिळ्याने केला. मातीची धूप या खिळ्यासारखी काम करते. मातीच्या ह्रासामुळे काय होऊ शकते त्याचे ताजेच उदाहरण आहे. कृष्णाकाठ, गोदाकाठ, इत्यादींना पुराने वेढले. माती वाहून गेली. टणक खडक खाली राहिले. त्यामुळे शेती पेरणीयोग्य राहिली नाही. एकाच वर्षी फार मोठी धूप झाली, त्याचा हा दृश्य परिणाम आहे मग अनेक वर्ष हा मातीचा थर वाहतो व एकूण स्तराची खोली कमी होते. ‘ह्या’चा दुष्परिणाम अव्यक्त असतो.

मातीचे वस्तुमान (काळ्या-भारी मातीत) १.२ ते १.४ ग्रॅम दर घन सेंटिमिटरला असते पण ते घटत जाते व काही ठिकाणी ते १.६ ते १.८ ग्रॅम दर घन सें.मी. होते. यामुळे वायुवहन व जलवाहकता यामध्ये फार मोठा बदल होतो. पाणीवाहकता १० पटीने कमी होते. प्राणवायुवाहकतेतदेखील लक्षणीय घट होते. त्याचबरोबर मुळांच्या वाढीची रोधकता फार मोठ्या प्रमाणात वाढते. मुळे जर वाढली नाही तर रोपटे तरारत नाही. पाणी व अन्नद्रव्ये शोषली जात नाहीत. यामुळे उत्पादकता घटते. वनस्पती खुरट्या होतात. कुरणे असतील तर चारा गवत वाढत नाही. एवढेच नाही तर ह्या गवताची गुणवत्ता कमी होते. त्यात प्रथिने व खनिजे कमी होतात. काही ठराविक मातीतील कुरणांमुळे दुभती जनावरे फळतात, फुलतात व जास्त दूध देतात. म्हणून मातीचा ह्रास दुग्धउत्पादनासाठीदेखील प्रतिकूल ठरतो. ही साखळी आहे. अन्नधान्य-चारा-पशु-मानव या साखळीतील प्रथम कडी माती आहे. ती निखळली म्हणजे अनुकूलतेचे स्थित्यंतर मानवी जीवनाला प्रतिकूलतेत होते.

२.३. सेंद्रिय शेतीः
अनेकदा मातीची गरज नाकारून वनस्पतींचे-उत्पादन सेंद्रिय पदार्थ व रासायनिक द्रावणे यांच्या साह्याने मातीशिवाय घेतले जाते. पण २० ते २५ कोटी टन अन्नधान्य या पद्धतीने घेण्यासाठी या झाडांना स्थिर करण्यासाठी लागणारा आधार (मेकॅनिकल सपोर्ट) कसा देणार ? त्याची किंमत किती, आणि त्यामध्ये असणारे खाचखळगे किती?

सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक आहे, पण सेंद्रिय शेतीमध्ये माती व त्यातील घटक याची बेरीज-वजाबाकी फार महत्त्वाची आहे. प्रत्येक पिकासाठी अनुकूल असे कर्ब: नत्राचे वेगवेगळे गुणोत्तर आहे. ते ठरविणे आवश्यक आहे. हे गुणोत्तर १२ : १ हुन ६ : १ वा ४ : १ असे मातीला झाले म्हणजे काय होते ? जेव्हा कर्ब नत्र ६:१ होते त्या वेळेस लिचीला फळे येईनाशी होतात. सेंद्रिय शेतीतून ह्युमस वाढते, म्हणून लिचीची झाडे झुपकेदार वाढतात, तजेला मावत नसतो, पण फुले-फळे काही येत नाहीत. उत्पादक बेचैन होतो. त्याला उत्तर सापडत नाही. देशातील अनेकांचा तांत्रिक सल्ला कुचकामी ठरतो, कारण मूठभर माती कोणीही हातात घेत नाही. कर्ब-नत्र प्रमाणाचा अंदाज घेणे शक्य आहे. मातीचे परीक्षण महत्त्वाचे ठरते. याच शेतात, अशाच स्थितीत चिकूला उत्तम फळे येत होती. मातीपरीक्षण अहवाल बघता वरच्या स्तरात कर्ब नत्र गुणोत्तर ६:१ असे होते. या स्थितीत नत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामळे पानांची वाढ होते पण फुले येत नाहीत. अशी अनेक उदाहरणे आहेत. नत्र कर्ब मोठ्या प्रमाणात असताना मातीमध्ये मका उत्तम व भरघोस येतो, तर खरीप ज्वारीला रोगाचा प्रादुर्भाव होतो. काही पिकांना हुमणीची बाधा होते. नांदेड जिल्ह्यात हा अनुभव १९७५-७६ मध्ये आम्ही घेतला आहे. ह्युमस जास्त झाले तर जमीन भुसभुशीत होते, काही पिकांची मुळे खोल जात नाहीत कारण अन्नद्रव्ये वरच्या थरात असतात. परिणामी वाऱ्यामुळे पिके लोळण घेतात. पीक खाली पडते. वादळात अशा पिकांचे नुकसान होते. अशा जमिनीत जर मूग पेरला तर पीक माजावर जाते. शेंगा कमी लागतात व उत्पादन घटते. प्रत्येक पिकास अनुकूल असे जडण घडण व अन्नधान्य-प्रमाण असते. ही माणसापरत्वे आहार बदलतो तशी क्रिया आहे. साधारणपणे प्रत्येकी २०० ग्रॅम अन्न दर दिवशी लागते. ही सरासरी आहे पण प्रत्येकाच्या आहारात फरक असतो. तेव्हा सेंद्रिय शेतीमध्ये पीक, त्याचे वाण व त्यासाठी अनुकूल प्रतिकूल मातीची जडण-घडण व भुसभुशीतपणा, हे ठरविणे आवश्यक आहे. ती कोण ठरविणार ? मातीतील प्राणवायूचे वहन किती ठिकाणी मोजले आहे ? ते कसे मोजतात हेदेखील अद्याप माहिती नाही. त्याचे तंत्र उपलब्ध आहे, पण मातीपरीक्षणात त्याचा उपयोग केला जात नाही. अन्नद्रव्यांची पिकाला उपलब्धता प्राणवायूवर अवलंबून आहे. त्याचे मुळाद्वारे शोषण हे प्राणवायूशी निगडित आहे, तेव्हा त्याचे मोजमाप झाले पाहिजे.

३.०. माती आणि ओलावाः
मातीची प्रत, खोली व स्वरूप यावरून मातीची जलधारणक्षमता ठरते. मातीची खोली जसजशी कमी होते (म्हणजे उथळ होते) तसतशी ओलावा धारणक्षमता कमी होते. पोयटा, काळीमाती, लालमाती, असे प्रकार महाराष्ट्रात स्थळपरत्वे दिसतात. त्याचे वर्गीकरण व नकाशे उपलब्ध आहेत पण ते जिल्हानिहाय आहेत, त्याचा फारसा उपयोग नाही, कारण गावाच्या शिवारात अनेक प्रकारची माती आढळते. त्यामुळे गावातील पीकनियोजनाला या नकाशांचा उपयोग नाही. एक हेक्टर क्षेत्रात १ मीटर खोल जमिनीत पिकांस उपलब्ध ओलावा हा ३०००, २०००, १००० घनमीटर एवढा अनुक्रमे पोयटा, काळी माती व लाल मातीमध्ये असतो. जर खोली १०० सें.मी. हुन कमी ५० सें.मी. एवढी झाली तर उपलब्ध पाणी निम्मे होते व ती खोली जर २५ सें.मी. झाली तर फक्त २५ टक्के पाणी-धारणक्षमता उरते. याचा अर्थ असा की जर पिकाला दर दिवशी ५ मि.मी. पाणी लागत असेल तर हलक्या, उथळ मातीत पाण्याचा ताण हा ५-६ दिवसांत जाणवतो. खोल जमिनीत तो ताण २०-२२ दिवसांनी दिसतो. मातीची धूप हळूहळू होते, मध्यम व खोल जमिनी हळूहळू उथळ होतात व त्यामुळे जलधारणक्षमता कमी होते. रांजणाचा आकार लहान होतो. पिकांना ताण लवकर येतो. या ताणामुळे उत्पादनांत लक्षणीय घट होते. रासायनिक खतांचा वापर फारसा अनुकूल होत नाही. या उथळ झालेल्या मातीचे व्यवस्थापन ही वेगळी समस्या निर्माण होते.

३.१. धुपेमुळे उथळ माती व्यवस्थापनः एक समस्याः
माती एक मीटर खोलीहून २५ सें.मी. झाली तर पावसाळ्यातील चार आवर्तनामुळे जवळजवळ ४५०० ते ५००० घनमीटर साठवणक्षमता कमी होते. या मातीत उत्पादन घ्यावयाचे झाल्यास दर हेक्टरी एवढ्या साठवणक्षमतेसाठी १.५ लाख भांडवली गुंतवणूक लागेल. जमिनीच्या ह्रासामुळे ही वजावट आहे. यांसाठी अनेक प्रकारचे उपचार करावे लागतात. पाणी-साठवण, वितरण, परिचलन या सर्वांचा दरवर्षीचा रु. १००० खर्च वेगळा. नवीन तंत्रज्ञान वापरायचे असल्यास खर्च अधिक होणार! पाण्याच्या पाळ्या वाढतात त्यामुळे ठिंबक किंवा तुषार सिंचन केले तर हेक्टरी रु. ४०००० ते रु. ७०००० भांडवलाची गुंतवणूक लागते. त्याशिवाय ऊर्जा लागते, वीज वापरावी लागते. तो खर्च व विजेच्या उत्पादनाचा भांडवली खर्च हे सर्व मातीच्या गैरव्यवस्थापनातून निर्माण होणारे प्रश्न आहेत. म्हणून मातीचा ह्रास व त्या अनुषंगाने येणारी पाणी ही निविष्टा याची चर्चा केली आहे. अजून खोल विचार केला तर मातीची सृजनशीलता कमी करणे, हा मुद्दा पुढे येतो.

४.०. माती व सृजनः
माती बहुसंख्यक सजीवांना ऊर्जा पुरविते. भरणपोषण करते. समुद्रातील सजीवांना वगळले तरी मोठ्या प्रमाणात माती सजीवांस मदत करते.मोठ्या प्रमाणात वनस्पती मातीत वाढतात. त्यांची पाने, मुळे, फळे, फुले या सर्वांचा वापर सजीव अन्न म्हणून करतात. मांसाहारी प्राणीदेखील शाकाहारी प्राण्यांवर जगतात. माती अन्नसाखळीतील एक महत्त्वाचे माध्यम आहे. अन्न टनांमध्ये मोजता येते. उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारा खर्च किती, याचे गणित मांडणे शक्य आहे. दरडोई प्रत्येक दिवशी २०० ग्रॅम अन्नधान्याची आवश्यकता गृहीत धरली तर महाराष्ट्राला २ कोटी टन पुरवठा लागेल. म्हणून यात सातत्य ठेवायचे झाल्यास मातीची निगा घ्यावी लागणार! याची पूर्तता करण्यासाठी किती खर्च लागणार याचे मोजमाप करता येणे शक्य आहे. या उपचारासाठी दहा वर्षांत साधारण १० हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी लागतील. पण काही बाबींचे मोजमाप करणे शक्य नाही.

श्री. इनामदार यांनी माती आणि पाणी याचे वर्णन असे केले आहे.
“तीर्थस्वरूप पाणी, कनकासमान माती, पाना फुला फळांना ऋतु रंग मागताती”
सोन्यासारख्या मातीचा ह्रास व पाण्याचा नाश झाला तर येणारी पाने, वाढणारी वनस्पती, तिचा आकार, फळे-फुले यांची ऋतुनिहाय रंगत कमी होते. “जीवन गाणे गात होते’, याची किंमत कशी करणार ? सृष्टीचा क्रम आहे. त्यात बाधा आणली तर काय होते ? सदाहरित झाडांची जागा खुरटे व झुडपी जंगल घेते. पानांचा आकार लहान, कर्बवायूचा वापर घटतो व त्यामुळे निर्माण होणारा प्राणवायू कमी होतो. ही साखळी आहे शुद्ध हवा देणारी. त्यात खंड पाडला तर त्याची वजावट कशी करणार ! नयनमनोहारी पानाफुलांनी होणारा आनंद व उन्मनी अवस्था, यांचे मूल्य कसे ठरविणार ? हे सर्व मातीची धूप व ह्रास यांचेशी निगडित आहे. सृष्टिचक्रात अडथळे निर्माण केले तर त्याची किंमत मोजावी लागते काही व्यक्त तर काही अव्यक्त !

सुवर्णासमान असणारी माती प्रत्यक्ष सोन्याचे कण धारण करते, म्हणून बी कवींच्या खालील ओळी निर्माण झाल्या.
“रत्न-सोने मातीत जन्म घेते। राजराजेश्वर निज शिरी धरी ते ।।”
मातीमध्ये अनेक गुण आहेत. कधी ती अतिनील किरण साठविते व असा मातीचा वापर मानवांच्या अनेक व्याधी दूर करतो. उच्च रक्तदाब, सांधेदुखी व इतर अनेक व्याधी कमी होतात. त्या मातीचे स्थित्यंतर कधी फायद्याचे तर कधी भरमसाट नुकसानीचे आहे. माती कृषीतील निविष्टा म्हणून आपण विचार केला. आम्ही आमच्या भावी पिढीला काय, कशी व कोणत्या स्वरूपाची माती देणार आहोत ?

५.०. मृदा-मूल्यांकनाची नवी दिशाः
मातीच्या गुणधर्माची तसेच गुणवत्तेची मोजणी आवश्यक आहे. नवीन उत्पादनतंत्रामध्ये अधिक उत्पादन देणारे वाण, सिंचनाचा वापर, रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, रोगनियंत्रक, रसायनांची फवारणी, यांचा वापर वाढला. त्याचबरोबर अनेक पदार्थ जे मातीचे दूषितीकरण करतात (जसे प्लास्टिक, जड धातू, पारा, कॅडमियम फिनॉल, क्रोमेट) अशा अनेक पदार्थांमुळे माती दूषित झाली आहे. अनेक ठिकाणी या पदार्थांची मर्यादा सुरक्षित पातळीपलीकडे गेली आहे. त्याची जाण असणे आवश्यक आहे. डी.डी.टी.चा वापर चार दशकांपूर्वी फार झाला. मातीत डी.डी.टी. सुरक्षित मर्यादेपलीकडे गेली. अन्नधान्यात, गवतात, चाऱ्यात मुळांमधून ती शोषली गेली. आईच्या दुधापर्यंत ती गेली. त्याचे अपायकारक परिणाम दृश्य झाले. उत्सर्जित पाणी हा माती गुणवत्ता दूषित करणारा एक मोठा घटक आहे. अल्कोहोल, रासायनिक उद्योग, कातडी कमावणारे कारखाने यामुळे कनकासमान माती अनेक ठिकाणी विषमय झाली. हे अदृश्य विष हळूहळू मानवी शरीरांत प्रवेश करते व अनेक रोगांना चेतना देते. या सर्वांचा वापर कमी करणे व मातीच्या गुणवत्तामोजणीमध्ये या सर्व दूषित पदार्थांचा समावेश असणे आवश्यक झाले.

सध्याच्या माती-परीक्षणाच्या निकषांत, विद्युत्वाहकता, नत्र, कर्ब, स्फुरद व पालाश यांचा समावेश आहे. काही सूक्ष्म अन्नद्रव्ये (जसे जस्त, लोखंड, तांबे, मॉलिब्डेनम, सिलिका) आहेत. त्याचबरोबर मातीची जडण-घडण, पृष्ठभागावर पाणी मुरण्याचा वेग, जलवाहकता, प्राणवायू वाहकता, चिकणमातीचे प्रमाण, क्षारांचे प्रमाण, क्षारांचे प्रकार, सूक्ष्म जीवाणू, उपयुक्त वनस्पती, केशाकर्षक झोत, स्मेक्टाईट मिनरलमुळे होणारे प्रसरण व आकुंचन, भेगा आकार, खोली, त्यामुळे होणारे बाष्पीभवन व जलनाश हे गुणधर्म मोजले पाहिजे.

५.१. पाणथळ व क्षारयुक्त जमिनीः
सिंचनाच्या सुविधांमुळे प्रथम पीक उत्पादनात भरघोस वाढ होते पण शेतातील माती क्षारपड होते. त्याच्या दुरुस्तीची किंमत मूळ दर हेक्टरी किंमतीपेक्षा जास्त होते. मातीत सुधारणा करण्यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये लागतात. त्यांतही मात्रा वेगवेगळ्या आहेत. प्रकल्पातील क्षारपड मृदा सुधारणे ही क्षेत्रीय व सामाजिक समस्या आहे. पूर्ण पीडित क्षेत्रातील क्षारक्षालन हे एका व्यक्तीचे काम नाही. सर्वांनी एकत्रितपणे नियोजन करून निरनिराळे उपचार राबविणे जरूर असते. हे होत नाही म्हणून साऱ्या भारतात जवळजवळ ७२ लाख हेक्टर क्षेत्र क्षारपड झाले आहे. सागरामुळे खारट होणाऱ्या मातीचे प्रश्न वेगळेच आहेत. ते सोडविण्यासाठी उपाय निराळेच आहेत. काही ठिकाणी तर रसायनशास्त्राचा वापर त्या मातीच्या गुणधर्माशी निगडित करावा लागतो. खारट पाण्याने जमीन क्षारयुक्त होते व मातीची जलवहनक्षमता कमी होते. पण ठराविक क्षारांच्या पातळीनंतर निचरा वाढतो. इलेक्ट्रीकल पोटेशियलचा वापर करावा लागतो या संकल्पना अद्याप मोजल्या नाहीत.

६.०. माती व दारिद्रयः
ज्या खेड्यांमध्ये वा प्रदेशात खोल उत्तम पोयटा आहे ती गावे वा प्रदेश समृद्ध आहेत. नद्यांकाठी असलेली खेडी समृद्ध आहेत. पंजाब समृद्ध आहे कारण त्या ठिकाणची समृद्धी बऱ्याच अंशी मातीच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. दर हेक्टरी उत्पादन वाढविण्याला कारणीभूत असणाऱ्या अनेक घटकांत मातीचा मोठा वाटा आहे. काही प्रदेशात जंगलदेखील चांगले वाढत नाही. खोल मातीमध्ये जंगलाची वाढ उत्तम होते, पण उथळ मातीमध्ये झाडे खुरटी होतात. एकूणच उथळ, हलक्या जमिनी व दारिद्र्य एकमेकांशी निगडित आहे. महाराष्ट्रातील एकूण १५०४ पाणलोट क्षेत्रांपैकी ७७८ पाणलोट क्षेत्रे ही प्राथमिकतेने बघितले तर उत्पादकतेच्या दृष्टीने समस्यायुक्त आहेत. त्यांची उत्पादकता, उपयुक्तता, सुपीकता या निकषावर समस्या आहेत. म्हणून अनेक खेड्यात दारिद्र्य अद्यापदेखील भरपूर दिसते. भारतातील ग्रामीण व नागरी दारिद्रयाची स्थिती अशी आहे.

टक्केवारी

सन

भारत ग्रामीण

नागरी

१९७३-७४ ५४.९ ५६.४ ४९.०
१९८३ ४४.५ ४५.७ ४०.०
१९९३-९४ ३६० ३७.३ ३२.३
१९९९-२००० २६.० २७.० २३.६

एकूणच ग्रामीण भाग दरिद्री आहे. त्यातदेखील काही ग्रामीण भाग समृद्ध आहे तर काही भाग अत्यंत दरिद्री आहे. लोकांचे उत्पादन दरडोई दररोज ४० रु.पेक्षा कमी आहे. दोन वेळेला लागणारे अन्न ते विकत घेऊ शकत नाहीत. या मागचे एक महत्त्वाचे कारण मातीचा ह्रास आहे. म्हणून मातीचे संवर्धन आवश्यक आहे. जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती मुळातच मातीशी निगडित आहे. याची थोडक्यात चर्चा केली. त्याचबरोबर मोजता येणाऱ्या व न मोजमाप करता येणाऱ्या घटकांची कल्पना मांडली. समाज सदोदित प्रफुल्लित ठेवण्यासाठी मातीची निगा ठेवणे आवश्यक आहे.

[निवृत्त सहसंचालक, वाल्मी(Water & Land Managment Institute), औरंगाबाद.] २, हिराखान हाऊसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन मार्ग, औरंगाबाद ४३१ ००५.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.