समृद्ध सेंद्रिय किफायतशीर शेतीची एक नवी वाट

सुलतानी व अस्मानी जुलुमातून सोडवणूक शक्य?
अतिशय दाहक आणि धक्कादायक स्थितीमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कुपोषणाचे बालमृत्यू हे वर्तमानपत्रात ठळकपणे आले. न आलेले पण तेवढेच दाहक आणखी एक सत्य लपलेले आहे पन्नास कोटींपेक्षा अधिक स्त्रिया या देशात अनीमिया या जीवघेण्या स्थितीत अर्धमेल्या जगताहेत मरायच्या शिल्लक आहेत म्हणून.

सुलतानी व अस्मानी जुलुमाच्या दुहेरी कात्रीत सापडलेला, शेतीप्रधान राष्ट्रातला शेतकरी स्वतःची सोडवणूक कशी करणार?

या ज्वलंत आणि होरपळणाऱ्या परिस्थितीतून शेतीची सोडवणूक करणारी वाट काढणे काळाची निकड आहे. ही वाट शोधताना काही महत्त्वाच्या अटींची मर्यादा घालून पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात बहुसंख्य शेतकऱ्यांकडे असलेल्या अडचणी व मर्यादांचे पालन करून वाट काढणारे प्रयोग व संशोधन केल्यानंतर उभे राहिलेले नमुना-प्रात्यक्षिक आज तयार आहे, आणि वर्धा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी अनुकरण करणे सुरू केले आहे.

खालील महत्त्वाच्या अटींचे तंतोतंत पालन यात केलेले आहेः
१. संपूर्ण कोरडवाहू (जिरायत), म्हणजे ओलिताच्या पाण्याचा एकही थेंब न वापरणे. २. सर्वसाधारण मध्यम प्रकारची जमीन : कुंपण नसलेली, केवळ एक हेक्टर (अडीच एकर). एवढ्या थोड्या जमिनीवरच करणे, म्हणजे छोट्या शेतकऱ्यालाही शक्य असावे. ३. साधारण गरीब शेतकऱ्यांकडे असलेल्या साधनसामुग्री, श्रम, ज्ञान व कौशल्य, भांडवल यांच्या मर्यादेतच नवी पद्धत विकसित करणे.

संशोधनातून उभा राहिलेला हा सिद्ध नमुना व नंतर बऱ्याच शेतकऱ्यांनीही अंगीकारून सिद्ध केलेली ही नमुनेदार मार्गदर्शक वाट वरील कारणांमुळे आगळीवेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि बहुसंख्य शेतकऱ्यांना हा नमुना अनुकरणीय आहे जसाच्या तसाच, किंवा परिस्थिती वेगळी असल्यास या पद्धतीतील मौलिक तत्त्वे अंगीकारून, केवळ तपशिलाचे काही फेरफार करून. सुख, समृद्धी, पोषण, स्वावलंबन, मनःस्वास्थ्य व स्वाभिमानाकडे नेणारी किफायतशीर पर्यायी शेती :
बाजारात शेतीमाल विकताना लूट आणि कुटुंबासाठी व शेतीसाठी लागणाऱ्या गरजा (inputs) खरेदी करतानाही लूट; अशा दुहेरी लुटीपासून सोडवणूक करण्याकरिता स्वावलंबनाच्या शेतीकडे वाटचाल हा महत्त्वाचा उपाय ठरतो. म्हणजे शेतीपद्धती स्वावलंबनाची असावी, अर्थात बाजारातून विकत घ्यावयाच्या शेतीच्या गरजा (बियाणे, खते, औषधे, औजारे, पॅकिंग, यंत्र, ऊर्जा) या खर्चांना शक्यतो फाटा देऊन शक्य असलेली शेतीपद्धती अंगीकारावी; आणि दुसरीकडे, कुटुंबाच्या खाद्यगरजा शक्यतोवर शेतीतूनच भागू शकाव्यात असे शेतीतून उत्पन्न घ्यावे. थोडक्यात, ‘स्वावलंबी शेती व शेतीतून स्वावलंबन’ अशी वाट धरावी हे महत्त्वाचे ठरते. यामुळे शेती किफायतशीर व निव्वळ नफ्याची होईल. आजच्या व्यापारी आधुनिक शेतीत शेतीचे ‘उत्पादन’ वाढले पण शेतकऱ्याला मिळणारे निव्वळ ‘उत्पन्न’ घटले किंवा उणे झाले. त्यामुळे, यापुढे आधुनिक शेतीकडून अत्याधुनिक शेतीकडे जायचे आहे.

बहुसंख्य शेतकरी लहान भूधारक आहेत. सर्वसामान्य पाच माणसांचे एक लहान शेतकरी कुटुंब (ज्याच्याकडे जनावरे नाहीत) शेतीमध्ये कमीतकमी खर्चात किती टक्के स्वावलंबी होऊ शकते, हा प्रश्न आहे. त्याकरिता टप्प्या-टप्प्याने जाण्यासाठी खालीलप्रमाणे संशोधन योजना तयार केली व त्याचप्रमाणे शेतीपद्धत विकसित केलीः
१) बजेटः पाच माणसांच्या लहान शेतकरी कुटंबाच्या सरासरी वार्षिक किमान गरजा व लागणाऱ्या खर्चाचा अंदाज काढला. यासाठी सुरुवातीलाच (१९९९ साली) १० गावांच्या प्रातिनिधिक कुटुंबांचा अभ्यास केला. मध्यम स्थितीत गावात आजच्या जगण्याच्या पद्धतीच्या हिशोबाने एका वर्षाचा सरासरी एकूण खर्च २४,१९६ रु. येतो. म्हणजे ढोबळ मानाने २५,००० रुपये आपण धरू शकतो. त्यांपैकी ११,७४६ रु. खाद्यपदार्थांवर (धान्य, डाळी, मसाले, तेल इत्यादी) व नगदी १२,४५० रु. अन्य गरजांवर (कपडे, शिक्षण, औषधी, पादत्राणे, प्रवास इत्यादी) खर्च होतो.
२) पिकांची यादीः वर्षभर लागणाऱ्या विविध सर्व खाद्यपदार्थांच्या गरजा लक्षात घेऊन कोरडवाहू शेतीत पिके कोणती घ्यायची याची यादी बनविली.
३) बियाणे कोणते?: बाजारातील अवलंबन कमी करण्यासाठी निवडक जातींचे बियाणे वापरले. जे बियाणे शेतकऱ्यांना शेतीतून काढता येईल व घरी साठवता येईल तेच बियाणे निवडले. बियाण्यांच्या अशा जाती निवडल्या की ज्यांची रोग-कीडप्रतिकारकता चांगली व उत्पन्न साधारणपणे मध्यम किंवा चांगल्या प्रतीचे. ह्या दृष्टीने आपल्या काही गावरानी जाती व किंवा सुधारित निवड जाती चांगल्या ठरतात, ते शक्य तेवढे घेतले व उरलेले बाजारातून खरेदी केले.
४) खतेः सातत्याने सेंद्रिय खते उदा. शेणखत, वापरावीत व रासायनिक खते टाळावीत, हा विश्वास असल्यामुळे गावात मिळू शकते, ते शेणखतच वापरायचे ठरविले. पण ते किती? अडीच एकरांचा साधारण शेतकरी आज रासायनिक शेतीत खतासाठी जेवढा खर्च करतो तेवढ्याच किंमतीचे शेणखत वापरणे. म्हणजे जर कापसासाठी एकरी २ बॅग (१०० किलो) रासायनिक खत टाकतात, (५० कि. यूरिया रु. २४० चे आणि ५० कि. सुफला रु. ४२० चे) तर तेवढ्याच किंमतीचे शेणखत वापरावे. म्हणजे अडीच एकरासाठी रु. १६५०/- चे शेणखत टाकावे. स्थानिक भावाप्रमाणे वर्ध्यात ढोबळमानाने १२ बैलगाड्या शेणखत (उकिरडा खत) १,५००/- रुपयांचे होते.
५) जमीनः मध्यम दर्जाची व हलकी मिळून सर्वसामान्य जमीन असलेले एक हेक्टरचे (अडीच एकराचे) कोरडवाहू (जिरायत) शेत, कुंपण नसलेले. १९९६ अगोदरच्या १० वर्षांत पूर्वीच्या शेतकऱ्याने निव्वळ रासायनिक खत टाकून कापूस हे पीक घेतले, अडीच एकरांत सरासरी ८ क्विंटल कापूस मिळत असे.
६) मिश्र पिके व मित्र पिकेः उत्तम दर्जाचे प्रतिकारक बियाणे वापरूनसुद्धा निसर्गात काही ना काही रोग व कीड राहणारच. त्यांच्यावर मात करण्यासाठी उत्तम दर्जाचे बियाणे व मित्रपिके घेतली. कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजेची विविध पिके, आपल्या जमिनीची प्रत, जमिनीचा उतार, योग्य सूर्यप्रकाशाची उपलब्धता हे सर्व मुद्दे विचारात घेऊन पिकांचे नियोजन केले गेले. त्यांत वेगवेगळी ३५ पिके बसविली गेली. एकल-दुकल पिकांऐवजी अशा मित्र-पिकांचा परस्पर पोषक सहकारी शास्त्रशुद्ध समुदाय शेतावर उभा केला.
७) पीकनियोजन : एकूण ३५ ते ४० पिके
नगदी पिके : कापूस, सोयाबीन, तूर.
खाद्य पिके धान्य : ज्वारी, धान, राजगिरा, बाजरी, मका
कडधान्ये (डाळी) : तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, हरभरा, धुडिंग (राईस बीन)
भाजीपाला: काकडी, दोडके, दुधी, कोहळे (लाल भोपळा), कारले, भेंडी, गवार, चवळी शेंगा, सुरणकंद, टमाटे, मिरच्या, वांगी, वाल (२ जाती)
तेलबिया : सोयाबीन इतर पूरक खाद्य : भुईमूग, जवस, तीळ, अंबाडी, देवअंबाडी.
मसाला पिके: हळद, ओवा, (बडीशेप), धणे, मिर्ची (तिखटासाठी), मोहरी.
इतर पिके : बोरू (ताग), चारा म्हणून दीनानाथ व भोस गवत, झेंडू
पिकांची एकूण संख्या व यादी पाहून हबकून जायचे कारण नाही. सर्व पिकांची पेरणी व लागवड १ ते २ दिवसांत पूर्ण करता येते अशी पद्धत विकसित केलेली आहे. काही रोपांची लावण गरज पडल्यास मागाहून पुढे सवडीने करता येते.
८) पाणी व माती व्यवस्थापन : पूर्ण शेतात ओलावा सर्वत्र समान, सातत्याने व दीर्घकाळ टिकावा आणि माती व खताची धूप होऊ नये याकरिता शेतात पाणलोट-विकास-कामे केली. त्यांत किंचित उताराचे बांध (ग्रेडेड बंड) व समपातळी बांध (कंटूर बंड) मिळून एकूण ४ बांध आहेत. (हे सर्व काम सामान्य शेतकरीही करू शकेल असे बिनखर्चिक, सोपे तंत्र व साधने विकसित केली व अनेक गावांत हजारो एकर जमिनीवर ते तंत्र वापरले.) दीर्घकाळ पावसाची उघाड पडली (एकदा जास्तीत जास्त ३५ दिवसांपर्यंत) तरीही शेतात पिके चांगली तग धरू शकली.
९) मानवी श्रमः कुटुंबानेच स्वतः काम करणारे १ माणूस व १ बाई, आणि प्रसंगी गावातलेच मजूर.
१०) बैलजोडीः गरजेप्रमाणे गावातून भाड्याने घेतलेली.

तक्ता क्र. १ च्या तळटीपाः
१) मजुरी उत्पन्नः स्वतःच्या शेतात काम नसल्यावर घरच्या माणसाने, बाईने किंवा दोघांनी गावात दुसरीकडे शेतमजुरीवर जाऊन मिळालेली मजुरीची रक्कम.
२) ह्याशिवाय, कडबा, कुटार विकल्यानंतर अंदाजे ३०५ दिवसांचे पेटवण, चार महिन्यांचे इंधन व सरासरी १० किलो ताग मिळाले.
३) स्वतः शेतीत केलेल्या श्रमाच्या नोंदी ठेवलेल्या आहेत.
४) वर्षागणिक या शेतीपद्धतीबाबत व्यवस्थापनकौशल्यात प्रगती होत गेल्यामुळे आणि मोसमी फरकामुळे बाहेरील मजुरीखर्चात, बैलजोडीखर्चात, मजुरीउत्पन्नात फरक पडले आहेत.
५) आकडे व हिशोब ठेवण्यात ५% मानवी चूक-भूल शक्य आहे.

तक्ता क्र. २:
स्वावलंबनाकडे नेणाऱ्या शेतीची मागील तीन वर्षांची सरासरी निष्कर्षात्मक आकडेवारीः

क्र.

खाद्यान्न प्रकार कुटुंबाची वार्षिक गरज एक हेक्टर शेतावर मिळवलेले उत्पन्न (किलो)

साधलेले स्वावलंबन
(४ : ३) (%)

तृणधान्ये (गहू सोडून) ३०२ २४५ ८१
डाळी ८० ३०० ३७४
मसाले २७ ३३
भाजीपाला (साडेतीन महिन्यांचा) ५० ६३ १२७
तेलबिया (५० लि. तेलासाठी) १२० १२० १००
इतर पूरक खाद्यान्न (तीळ, भुईमूग, जवस) १० १८ १८३

टीपः स्तंभ २ मध्ये कुटुंबाची गरज ही आजच्या स्थितीतील सर्वसाधारण शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे व त्यांच्या राहणीमानाप्रमाणे आहे. ती तेवढीच असणे आदर्श आहे असे मत अजिबात नाही.

तक्ता नं. २ मधील आकडेवारीबाबत विश्लेषण व चिकित्सक चर्चाः
१. गुणात्मक स्वावलंबन : कुटुंबाच्या खाद्यान्न पीकप्रकारांच्या गरजांबाबत शेतकऱ्यांसोबत केलेल्या मूळ पाहणीतील २५ पिकांपैकी २० पिके जिरायत शेतीत घेता आली आहेत. (५ पिके-आलू, लसूण, कांदे, गहू व भाजीपाला वर्षभरच्या ओलिताशिवाय होत नाही.) म्हणजे ८०% स्वावलंबन साधले. परंतु इष्ट व शक्य असलेले काही पीकप्रकार वाढवले गेले; यामुळे गुणात्मक स्वावलंबन ८०% पेक्षा बऱ्याच जास्त पातळीचे साधता आले.
२. मात्रात्मक (क्वांटिटेटिव्ह) स्वावलंबनः खाद्यान्न गरजांचे वरीलप्रमाणे ६ प्रकारगट करून मागील ३ वर्षांच्या सरासरीचे सखोल विश्लेषण केल्यास खालील बाबी लक्षात येतातः तृणधान्येः गहू पिकवण्याकरिता ओलिताची गरज पडते. म्हणून जिरायत शेतकरी कुटुंबाला लागणाऱ्या तृणधान्यापैकी गहू बाजारातून विकत घ्यावा लागेल; उरलेल्या तृणधान्याबाबत ८१% स्वावलंबन साधले. गव्हाऐवजी जिरायतमध्येच ज्वारी, बाजरी, मका यांचे प्रमाण वाढवून १००% स्वावलंबन साधता येईल.
डाळी : स्वावलंबन जवळपास चार पटीने साधले व जास्तीचे उत्पन्न विकता आले.
मसाला पिके: स्वावलंबन ३३% साधले, पण ते सहज १००% साधता येईल असा अनुभव आला.
भाजीपाला : जिरायतमध्ये शक्य असलेला भाजीपाला तीन ते साडेतीन महिन्यांच्या गरजेपैकी १२७% स्वावलंबन साधले.
तेलबिया: स्वावलंबन १००%.
इतर पूरक खाद्यान्नेः १८३% स्वावलंबन.
नगदी रकम रोखः वर्षाला रु. १२,२६३. (निव्वळ नफा नव्हे).

इतर शेतकऱ्यांच्या शेतावरील अनुभवांची भरः
वर्धा जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हे प्रयोग करण्याची सुरुवात मागील तीन वर्षांपासून केलेली आहे. त्यांनी ह्या नमुन्यासारखी (किंवा स्थानिक परिस्थितीनुसार थोडेफार योग्य बदल करून) शेती केली. त्यांचे निष्कर्ष खालीलप्रमाणे:
१. हे सर्व शेतकरी लहान शेतकरी असून, यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे शेणखत (उकिरडा खत) टाकले आहे किंवा अजिबात टाकू शकले नाहीत.
२. सर्वांनी पहिल्या वर्षापासूनच ६ ते २५ पिके लावून बघितली आहेत.
३. सर्वांना पहिल्या वर्षांपासून निव्वळ नफा मिळू लागला आहे. ह्या नफ्याचे प्रमाण दरवर्षाला वाढत आहे. खर्चाचे घटते प्रमाण व कर्जाची गरज नसल्यामुळे आत्महत्येची पाळी टळली.
४. जमिनीचा पोत व कस सुधारत चालला आहे व भौतिक स्वरूपामध्येही फार सुधारणा आहे.
५. पिकांना रासायनिक खते, औषधे किंवा वनस्पतिजन्य औषधेसुद्धा देण्याची गरज पडली नाही.
६. जंगलाच्या शेजारील गावांत जंगली जनावरांपासून राखण हमखास करावी लागते.
७. नगदी उत्पन्नाच्या पिकांशिवाय बऱ्याच वस्तू घरच्या घरी खायला मिळतात. शेतकऱ्यांना पावसाळ्यात बाजारात जाण्याचे काम व त्रास पडलाच नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी बऱ्याच डाळी किंवा खाद्यपदार्थ असे खाल्ले आहेत, जे महाग असल्यामुळे वर्षानुवर्षे बाजारातून आणता येत नव्हते.
८. चेतना-विकास संस्थेवरील प्रयोगांपेक्षा स्वतः शेतकऱ्यांच्या खर्चाचे आकडे बरेच कमी आहेत.
ह्या सर्व शेतकऱ्यांचे मागील ३ वर्षांच्या खर्च-उत्पन्नाच्या नोंदी व हिशोब सर्वांना बघण्यासाठी व अनुभव ऐकण्यासाठी खुले आहेत.

जमेचे लक्षणीय मुद्देः
आता ह्यांतील जमेचे मुद्दे समजून घेऊ.
१. उत्पादनपातळी व निव्वळ उत्पन्न : हे दोन्हीही सातत्याने वाढते आहेत. ज्या एक हेक्टर शेताची क्षमता पूर्वी एकूण ७-८ क्विंटल कापूस देण्याची होती. तेही, शेतीत (रासायनिक शेतीत ४०० कि. रासायनिक खते व १०-१२ औषधी फवारणी केल्यानंतर हे सरासरी उत्पन्न येत असे), अशा मूळ शेतीपद्धतीऐवजी आज या पद्धतीने वाटचाल केल्यामुळे वरील उत्पन्न आलेले आहे. आणि हे उत्पन्न दरवर्षी ४-५ पिके बुडाल्यानंतरसुद्धा मिळत आलेले आहे. कधी कधी कापूस, तुरीसारखे नगदी पीक कमी आले तरीही निव्वळ उत्पन्न व निव्वळ नफा मिळाला.
२. खाद्यहमी व पोषणहमीः कुटुंबाच्या विविध प्रकारच्या खाद्यान्नगरजा पुरवणारी ३५-४० पीकप्रकारांची संख्या ८०% पर्यंत सातत्याने गाठता येते. म्हणजेच केवळ मात्रात्मक पोषण (क्वांटिटेटिव्ह) नव्हे परंतु गुणात्मक पोषणहमीसुद्धा साधते. ही पोषणसंपन्नताहमी शेतकऱ्याच्या दारीच मिळते, हमखास दरवर्षी मिळते व परवडण्याजोगी मिळते; अशी तिहेरी वैशिष्ट्ये आहेत.
३. उत्पादनहमी : सर्वच वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे ४-५ पिके बुडाली, तरी पण इतर मित्रपिकांनी भरपाई करून पुष्कळ पिके हाती आली आणि ज्या पिकांना पाऊस मानवला त्यांचे जास्तीचे उत्पादनसुद्धा हाती आले.
४. कीड-रोगनियंत्रणाची हमी : प्रतिकारक जातींचे स्थानिक बियाणे व मित्र-मिश्रपीक पद्धतीमुळे इतर शेतकऱ्यांपेक्षा कीड व रोग कमी आढळले, आणि नियंत्रणासाठी फारसे काही वेगळे करावेच लागले नाही. निव्वळ नफा खात्रीने दरवर्षी मिळाला.
५. ‘सन हारवेस्टिंग : पिकांना सूर्यप्रकाश वापरण्याच्या दृष्टीने पूर्ण जमिनीचा (पूर्ण क्षेत्रफळाचा) बराच जास्त वापर (ढोबळ मानाने ७५ टक्के) होऊ शकला. मित्रपीक व मिश्रपीक पद्धती, योग्य नियोजन, सुयोग्य पेरणीपद्धत, उचित प्लँट पॉप्युलेशन आणि हिरवळी खत-पिकांचा समावेश यामुळे हे शक्य झाले.
६. टी.व्ही.वर येणारे उपग्रह मानचित्र व वेळोवेळी हवामानाचा योग्य अंदाज यांचा अर्थ लावून व अर्थ समजून बरीच कामे वेळेवर साधता आली: म्हणजे काही लवकर आटोपता आली व काही टाळता आली. सामान्य शेतकऱ्याला हे शिकणे सहज शक्य आहे.
७. या पद्धतीमुळे जमिनीत हळूहळू व सतत सुधारणा होत आहे. जमिनीचा पोत, कस, भुसभुशीतपणा, इत्यादींमध्ये नजरेत भरणारा फरक झालेला आहे. तिसऱ्या वर्षापासून आपोआप खूप गांडुळे निर्माण झालेली दिसून येत आहेत. जमीन नरम राहते, भेगा पडत नाहीत, टणक ढेकळे निघत नाहीत. कीड व रोग फारसे नाहीत. पाण्याचे व ओलाव्याचे समान व संतुलित वाटप शेतभर होते व टिकून राहते. पाणी साचणे किंवा वाहून जाणे टळते. माती आणि खत यांची धूप थांबते.
८. शेतीकामांची व श्रमाची निकड एकाच ठराविक वेळी न येता वेगवेगळ्या वेळी ती वाटली जाते. उत्पन्न व आवकसुद्धा विभागून दीर्घकाळ मिळते. हंगामाचा ताण कमी होतो.

पुढील वाटचालीचे मुद्देः
अडचणी सोडवणे, संशोधन व प्रयोग
१. एका सामान्य कुटुंबाच्या किमान गरजा लक्षात घेता नगदीसह सर्व पिकांचे उत्पन्न वाढवणे, व पुरेशा समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी उत्पन्नपातळी आणखी वाढवणे.
२. अडीच एकरांच्या शेतीत शेतकरी आज खतावर जेवढा खर्च करू शकतो, ते शेणखत पुरेसे नाही. म्हणून हिरवळीची खते, संजीवक पाणी यांसारखी पूरक खते देण्याची व्यावहारिक पद्धती विकसित करणे.
३. सेंद्रिय पदार्थ व शेतातील कचऱ्याच्या पुनर्वापरचक्रासाठी आणखी जास्तीच्या उत्तम पद्धतींचा शोध घेणे.
४. प्रतिकारक व काटक अशा चांगल्या, अधिक उत्पादक जातींचा शोध घेऊन त्यांचा समावेश करणे.

महत्त्वाचे निष्कर्षः
आम्ही सहा वर्षे हे संशोधन केले. मागील ३ वर्षांत काही शेतकऱ्यांनीही हे प्रयोग सातत्याने केले. या सर्वांतून निघालेल्या या पद्धतीच्या नमुना प्रात्याक्षिकाबाबत ह्या सहा वर्षांच्या अनुभवाने आम्ही हमखास म्हणू शकतो की :
१. खऱ्या समृद्धीकडे व स्वावलंबनाकडे वाटचाल करणारी अशी ही शेतीपद्धत आहे. एका लहान शेतकऱ्यालाही आजच्या राहणीमान पद्धतीनुसार विविध सर्व पस्तीस ते चाळीस प्रकारच्या खाद्यान्न पीकसंख्ये पैकी जवळपास ८०% किंवा त्यापेक्षाही जास्त पीकसंख्या शेतीत स्वतः पिकविता येते. पैशांत हिशोब काढला व बाहेर केलेल्या कामाची मजुरी धरली तर त्यातही एकूण गरजेच्या ८०% उत्पन्न या एक हेक्टर शेतीवर घेता येते. अडीच एकराऐवजी शेतजमीन थोडी जास्त (जवळपास साडेतीन एकर) असल्यास या पद्धतीने १००% उत्पन्नहमी व जगण्याची हमी साधता येते. जास्त खते (शेणखत व इतर सेंद्रिय) टाकल्यास हे उत्पन्न पुढे वाढण्याची खात्रीही आहे. लहान शेतकऱ्यांशिवाय मोठे शेतकरीही या पद्धतीचा अवलंब सहज करू शकतात.
२. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र व मिश्र पीकपद्धती असल्यामुळे जोखमीची भीती राहत नाही. कारण दुसरी बरीच पिके हाती येतात. म्हणून सर्वांनी अशा भीतिमुक्त व चिंतामुक्त शेतीकडे जायला सुरुवात करण्याची व वाटचाल करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्याच हाती राहणारा हा विमा आहे.
३. शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात फार मोठ्या प्रमाणात बचत होते, कर्जबाजारीपणापासून मुक्ती मिळते व कर्जाच्या डोंगराखाली होणाऱ्या आत्महत्यांपासून सोडवणूक होते. कंपन्यांच्या खर्चिक उत्पादनांवर शेती अवलंबनाऐवजी नैसर्गिक मित्रघटकांना व कारागिरांना समजून त्यांना आपल्या शेतात स्वस्थळीच जोपासण्याची पद्धत व कामाला लावण्याची रचना हा पर्याय महत्त्वाचा
आहे. तो विकसित करून वापरल्यामुळे नवी पहाट दाखवणारी नवी वाट यातून मिळते.
४. शेतमालाला योग्य भाव आणि भीक-नको-घामाला-दाम मिळणे हे फार महत्त्वाचे व निकडीचे आहेच. पूर्ण विचारांती व अनुभवाधारे आमचे मत बनले आहे की ‘जोवर घामाला नाही दाम, तोवर बाजाराचे कमी काम’ अशी वाटचाल करण्यासाठी स्वावलंबनाकडे जाणारी शेती करणे आपद्धर्म म्हणून तारणारा ठरतोच, शिवाय नेहमीकरिता उद्धारकही. राजकारणी, नोकरशहा, भांडवलदार, संशोधक, नियोजनकर्ते या सर्वांनीच शेतकरीविरोधी व ग्रामीण-विरोधी धोरणे बदलणे, हे सर्व अतिशय महत्त्वाचे आहेच. हे घडल्यास ही शेतीपद्धती अधिक उपयोगाची ठरेल.

[चेतना-विकास ही संस्था अत्यंत काटेकोर व व्यवहारी शेतीविषयक संशोधनासाठी ख्यातनाम आहे.]
संपर्क: श्रीमती निरंजना व श्री अशोक बंग.
चेतना-विकास, पर्यायी शेती संशोधन केंद्र, पो. गोपुरी, वर्धा ४४२ ००१. फोन : (०७१५२) २४०००४, २४१९३१, २४०८०६
E-mail: chetana_wda@sancharnet.in

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.