रानवस्ती

मी अनिल दामले. पांढरपेशा शहरी. जन्म मुंबईतला. पुण्यात वाढलो. शिकलो. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीच्या दामल्यांचा मी नातू. सिने सृष्टीच्या आणि शहराच्या झगमगाटांत वावरलो. त्याचबरोबर रानोमाळ हिंडायचो. दऱ्याखोऱ्या, गड, किल्ले, वने पाहिली. शेतीवाडीवर राहिलो. झाडझाडोरा, नदी, तळी, ऊन, वारा, पावसाचे शिंतोडे, पक्ष्यांचे बोल. ह्या सगळ्या निसर्गरूपांवर भाळलो. निसर्गसान्निध्यात राहावे, मनसोक्त, मनमुराद आयुष्य जगावे. शहरी चाकोरी रुळलेली वाट सोडून काहीतरी नवलाईचा मार्ग पत्करावा असे वाटत होते. घरच्यांचे पाठबळ होते. शेती करायची ऊर्मी होती, ध्यास होता. १९७६ साली खामगाव तलावाकाठी एक पडीक रान शेलारवाडीच्या ‘हडवळ्यांत’ विकत घेतले. पुणे-सोलापूर हमरस्त्यापासून पाच किलोमीटर आत. धड रस्ता नाही, वीज नाही, फोन नाही, आजूबाजूला सोबत नाही. अशा आडरानात तेरा वर्षे ‘रानवस्ती’ करून राहिलो. जमतील ते सर्व कष्ट उपसले. घाम गाळला. पडीक रान फुलवले. ‘अनमोल बाग’ वाढवली. निसर्गाशी जवळीक शिकलो. त्या दरम्यान मला नाना प्रकारची माणसे भेटली. रानवस्तीचे सोपस्कार अंगीकारले. निसर्गाची विविध रूपे पाहिली.

शहरी पुस्तकी ज्ञानाची पदवी घेऊन मी शेतावर पोहोचलो. पदवीधर म्हणजे आपण कोणीतरी वेगळे आहोत ! शेतकरी समाज अशिक्षित आहे. शेती काय, सहज करू शकू. उडी तर टाकली. तेरा वर्षे भले बुरे, अनुभव आले. काही पिके साधली. पैका मिळाला. काही फसली. त्या सर्व खटाटोपातून मला जे काही थोडे निसर्गशास्त्र, शेतीशास्त्र, मनुष्यस्वभावशास्त्र उमगले त्याचे हे कथन. माझ्या शहरी चष्म्यातून दिसले ते असे…. मनुष्यस्वभाव एक मानसशास्त्र औताचा नारळ फोडला. रान काकरायला सुरुवात केली. औताचे ५-६ वेढे झाले. तेवढ्यात एक बाई छाती बडवत, भेसूर आवाजात रडत, भेकत औताला आडवी आली. “माझ्या मालकाचं वावर ह्या बामणानं फसवून बळकावलं. रानाच्या बाहीर व्हा.” मी तेवीस वर्षांचा. घरादारापासून दूर. एकटाच आडरानात होतो. मदतीस कोण असणार ? ७-८ बध्ये माझी फजिती पाहायला जमले होते. प्रभातच्या दामल्यांना ओळखणारा एकही जण नव्हता! मी घाबरलो. हबकलो. पायातले त्राण गेले. औतावाल्यास जायला सांगितले. काय करावे सुचत नव्हते. स्कूटर घेऊन परत निघालो. खामगाव फाट्यावर पोहोचलो. एकदमच मनाच्या आतून जाणवले, घरी जाऊन काय होणार ? क्षणभर थांबून डाव्या हातास वळलो. यवतचे औट पोस्ट गाठले. पोतीस हवालदारास घटना सांगितली. “साहेब हीच ती गावगुंडी.” रीतसर तक्रार केली. पुण्याला परतलो. तीनचार दिवसांनी शेतावर गेलो. पोलीसी खाक्याने काम केले. रानातील अडवाअडवी थांबली. औताचा श्रीगणेशा झाला. पहिली लढाई पार पडली. आजूबाजूचे बध्ये “काय काका ?” म्हणत चहा तंबाखूला जमू लागले. हा शहरी बामणाचा कोवळा पोर काय करतोय त्याकडे नजर होती.

मी आणि माझा धाकटा भाऊ विवेक शेतावर मुक्कामास होतो. एका रात्री पाटकरी भाऊसाहेबाने रात्रीचे पाणी घ्यायला सांगितले. अजून माझ्याकडे शेतावर कायमचा गडी नव्हता. शेताला पाणी तर घ्यायलाच पाहिजे. आता काय करायचे? मी आणि विवेकने विचार करून आपण स्वतःच पाणी धरायचे ठरवले. लेकव्ह्यूला कुलूप ठोकलं. बूट घातले. टॉर्च, काठी आणि फावडे घेऊन नळावर गेलो. नळ म्हणजे कॅनॉलचा फाटा. खडकवासल्याच्या कॅनॉलला कासुर्डी गावाजवळ जो फाटा काढला आहे तो अठरा फाटा ! या अठरा फाट्याची चारी माझ्या शेताच्या पूर्व भागातून शेलारवाडी हद्दीतील शेतजमिनीला पाणी पुरवायची. चारी माझ्या शेतातून काढल्यामुळे पलीकडे पूर्वेला एक एकर शेतजमीन राहायची. शेताच्या पूर्व टोकाच्या बांधावर बाभळीचे झाड होते. लांबवरून या झाडाची खूण म्हणजे शेताचा पूर्वेकडचा बांध असे मी सर्वांना दाखवायचो. झाडाच्या पश्चिमेस एक एकर शेत. मग ही चारी. त्या पुढे तीन एकरांचे शेत. नंतर लेकह्यू. त्यानंतर साधारण तीन-सव्वातीन एकराचे रान. त्यातूनच शेलारवाडीचा रस्ता गेलेला. त्या पलीकडे माझे दहा गुंठे रान. दहा गुंठ्यापलीकडे एक मोठी पडीक जमीन आणि त्याला लागून खामगाव तळ्याचा पसारा. तळ्याचा एक कोपरा अगदी थेट माझ्या रानाच्या बांधाला भिडलेला.

मी आणि विवेकने बारे मोडून पाणी घेतले. नांगरटीचे रान, संथपणे पाणी पीत भिजत होते. चांदण्याच्या मंद प्रकाशात रानात पसरत चाललेले पाणी चमकताना दिसत होते. नांगरटीचे रान चांगले रापलेले, तापलेले. त्यात पाणी शिरल्यावर येणारा रानमातीचा मंद सुगंध सुखद-चैतन्यकारक वाटला. जागरणाचा, कष्टाचा थकवा सहज विसरायला लावेल असा पहिला आविष्कार आम्ही अनुभवला. पायात बूट असल्याने भिजलेल्या रानाच्या कडेने पाणी धरत होतो. काही वेळानंतर आम्ही पाण्याने वेढलो गेलो. खोलवर नांगरट केलेल्या रानात चांगला गुडघाभर चिखल झाला. बूट घालून चालणे अशक्य झाले. तशीच वेळ मारून नेली. अर्धेअधिक रान ओलावून झाले. पायावर काळ्या मातीचा चिखल वाळून लेप तयार झाला. रात्री लेक व्ह्यूवर जाऊन बूट काढून पाय धुवायला गेलो, तर काळ्या मातीचा चिखल पायावर चिवटपणे चिकटलेला. पाय धुताना व्हायचे तेच झाले. विवेकच्या आणि माझ्या पायांवर दोन तीन ठिकाणी ‘केसतूट’ झाली. पायावर या पहिल्या पाण्याच्या निशाण्या पुढे आम्ही बरेच दिवस मिरवल्या. माणूस अनुभवांतून शिकतो तेच खरे शिक्षण. मग मात्र आम्ही कधीही पाणी धरायचा प्रसंग आला की, चिखलातून बाहेर आल्याबरोबर चिखल ओला असताना धुवायला शिकलो. चिखल वाळू दिला की, पुढचा त्रास चुकत नाही!

१९७८ चा जून महिना आला. बघता बघता शेती घेऊन दोन वर्ष झाली. माझे मला कळत नव्हते की, गेल्या दोन वर्षांत मी काय मिळवले अन् काय घालवले. त-हेत-हेचे बरे-वाईट अनुभव मिळाले. चांगल्या-वाईट वृत्तीची माणसे भेटली. रानात एकट्याने कसे राहायचे, स्वयंपाक कसा करायचा ते शिकायला मिळाले. व्यवहार मात्र शून्य ! गेल्या दोन वर्षांत शेतीच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप पैसे खर्च झाले होते; पण खर्चाच्या मानाने उत्पन्न काहीच नव्हते. नफा काहीच नव्हता. गहू, भूईमुग, कलिंगडाचे पीक चांगले निघाले, तरी खर्चाची अन् उत्पन्नाची साधी तोंडमिळवणी होत नव्हती. तशी माझ्यावर इतर काहीच जबाबदारी नव्हती. माझे वडील माझ्या मागे भक्कम उभे होते. त्याशिवाय घरचे सर्व जण होतेच. मला शेती व्यावहारिकदृष्ट्या सांभाळणे अजून अवघड दिसत होते. पैशाची खरी किंमत या कालखंडात मला कळली. शेतकऱ्याकडे खेळता पैसा नसतो असे ऐकले होते. आता मात्र स्वतः अनुभवले. माझा मी विचार करायचो, दोन वर्षे शेतीत मनोभावे कष्ट उपसले. अनुभव नसल्याने चुका झाल्या. सरळ मार्गाने, निर्मळ आणि प्रसन्न मनाने सर्व उद्योग केले; पण व्यवहारी जगाच्या हिशेबी विचाराने पाहिले तर हातात काहीच नव्हते. घरचे पाठबळ असल्याने काळजी करण्यासारखी स्थिती नव्हती एवढेच! नाहीतर पिढीजात हाडाचा शेतकरी पाहा, त्याला असे कुठले आले पाठबळ ? पहिले पीक कसे का येवो, फायदा होवो नाहीतर तोटा होवो, तो परत नवीन जोमाने कामाला लागतो. येणाऱ्या भविष्याकडे नजर लावून बसतो. त्याचा स्वभाव आशावादी असतो. दोन वर्षांमध्ये शेतीत सुधारणा झाली; पण व्यवहार ‘निगेटिव्ह’ वजावटीचा झाला होता. माझे मला स्वतःचे स्थैर्य आलेले नव्हते. अशात लग्नासाठी मुली सांगून येत होत्या; पण मी शेती करतो कळल्यावर नकार आलेला पाहून मला धक्काच बसला. शेती हा काही हलका व्यवसाय आहे का ? का वाईट व्यवसाय आहे ? सरळ मार्गाने शेती केली तर त्याच्याइतका प्रसन्न, आनंददायक आणि शुद्ध असा कोणताच धंदा नाही. काळ्याशार जमिनीत प्रथम सरी काढतात. त्या सरी, पाट, वाफे, शेले, माले हे सर्व लांबून पाहिले की, अगदी आखीव-रेखीव दिसतात. शेतकऱ्याच्या नजरेला असे आखीव-रेखीव रान पाहून लगेचच त्या रानाचा पोत समजतो. शेतकऱ्यांनी रानावर किती मनापासून, जीव ओतून मेहनत घेतली आहे, त्याचा रानावर किती जीव आहे, हे नुसते एका नजरेने कळते. अशा रानात कालांतराने जोमदार वाढणारे डौलदार उसाचे पीक डोळ्यांसमोर नाचते.

काळ्याशार जमिनीच्या खोल सरीतून गढूळ पाणी धावते. सरीच्या माथ्यावर अंथरलेले उसाचे बेणे पाहिले की, एकादी पंगत बसल्यासारखी दिसते. खोलवर नांगरून सरी काढलेल्या रानात पाणी फिरते. सरीच्या माथ्यावर मांडलेले उसाचे बेणे दाबले जाते. मग आठपंधरा दिवस रान वेडेवाकडे दिसते. उसाचे जोमदार कोंब येतात. हिरवागार ऊस बघता बघता वाढतो. उसाच्या फडात शिरले तर उसाचे धारदार पाते करवतीसारखे ओरबाडून काढते. उसाची बांधणी होते. आता ऊस घट्ट वाढतो, दाट वाढतो. ठराविक कटावरचा ऊस रेलला जातो. (कट रेलला म्हणतात.) मग फडातून जायला एवढाच काय तो रस्ता उरतो. उसाच्या फडांत इतरत्र हिंडणे आता शक्य नसते. या तजेलदार हिरव्यागार उसात कोल्ह्यांची, सशांची आणि मुंगसांचीच काय ती ये-जा असते. बघता बघता उसाचे पीक पाणी पिऊन तयार होते. गोडी उतरते. दिवस भरतात. उसाला तुरा फुटतो. वेळेत ऊस तुटला नाही तर तुरे उमलतात. म्हाताऱ्या माणसाच्या पांढऱ्या केसासारखे उसाचे तुरे पांढरट भुरभुरत डोलतात. इतके दिवस हे जोमदार पीक पाहून छाती फुगवून उसाचे पीक डौलात पाहत फडातून हिंडणारा शेतकरी उसाचे वय भरलेले पाहून, त्याचे तुरे पाहून काळजीत पडतो. ऊस तोडायला उशीर होतो आहे, वजन घटणार, साखर घटणार अशी काळजी वाटू लागते. ऊस तोडणाऱ्या टोळ्या कारखान्याच्या ठराविक वेळापत्रकानुसार येतात. पहाटे ६ ते रात्री ७ वाजेपर्यंत ऊस तोडणाऱ्या टोळ्या फडातून वावरत असतात. ऐन थंडीच्या कडाक्यात फडात आल्याआल्या मंडळी पाचाट पेटवून शेकोटी लावतात. थंडीत बोटे वळत नसतात. हाताचे तळवे हुळहुळे झालेले असतात. अशा कडाक्यात शेकून पानतंबाखूचा तोबरा भरल्यावर गड्यांचे हात मशीनसारखे सपासप चालू लागतात. उसाचे वाफे भराभर तुटत जातात. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रकमधून ऊस कारखान्याकडे जातो. बघता बघता हिरव्यागार उसाचा फड संपलेला असतो. टनावारी ऊस शेतकऱ्याच्या नावे कारखान्यात जमा झालेला असतो.

पांढऱ्याशुभ्र गोड खरपूस साखरेमागे किती कष्ट असतात त्याची कल्पना १६ रुपये किलो दराने साखर घेणाऱ्यास कुठे असते ? त्याला ही साखर महागच वाटते. या गोड्या चवीमागची कडू कहाणी, थंडीवाऱ्यात, उन्हातान्हात राबलेला शेतकरी, उसाच्या फडात ऐन दुपारच्या चटक्यात ऊस बांधणारा मजूर त्याला माहीत नसतो. उन्हाळ्यात पाटाचे पाणी कधी कधी वेळेत मिळत नाही. नेमके तेव्हा विहिरीचे पाणी कमी पडते. विजेचा भरवसा नसतो. स्वतःचा घाम गाळून हे जिवंत पीक करपताना पाहून शेतकऱ्याचे मन करपते. ऊस तोडणारे मजूर अनवाणी पायांनी चरचरीत पाचाटातून ऊस तोडतात. रात्री-अपरात्री, थंडी-वाऱ्यात, डिझेल, ऑईलच्या टेंभ्यांच्या उजेडात ट्रॉल्या भरतात. हे कशाला सर्वांना माहीत असते?

शुष्क पाचाटाची चेतवून काळीशार राख मागे राहते. याच जळकटीतून परत पाणी पळायला लागते. गढूळ पाण्यावर राखेचा तवंग तरंगत पाण्याबरोबर पळताना सरी वाफ्यातून गोल गोल घुटमळतो. माझे मन तिथेच घुटमळत राहते. आठच दिवसांनी या जळकटातून तरारून उसाचे कोंब फुटतात. परत एकदा नव्या जीवनचक्राची सुरुवात होत असते. तरारलेले कोंब पाहून मनावरचे जळकट सावट दूर होते! टोमॅटोच्या हंगामात मनुष्यस्वभावाचा एक पैलू पाहायला मिळाला. माझ्या टोमॅटोबरोबर गाडीवान धोंडिबाचा टोमॅटो असायचा. आमचे दोघांचे दलाल निराळे. मी शेतावर आलो की, माझ्या स्वभावानुसार-अप्पा रोहिदासाला सांगायचो, कालच्या खोक्याचे वजन इतके भरले आणि इतकी पट्टी आली. धोंडिबाने ते ऐकले, तो म्हणाला, “अण्णा, तुमचा दलाल बेकार आहे. माझ्या खोक्याचे वजन ६५ किलो भरले. भाव १८ रु. १० किलोस मिळाला.” त्याच्या खोक्याचे वजन माझ्यापेक्षा १५/१८ किलोने जास्त आणि भाव ४ रु. १० किलोस जास्त! मी भांबावून जायचो. मला वाटायचे मी फसलो तर नाही ना जात ? मी स्वतः खोकी वजन करून भरली. अगदी व्यवस्थित काटेकोरपणे खोके भरले तर कसाबसा ५० किलो टोमॅटो भरायचा. ६५ किलो टोमॅटो भरणे शक्य नव्हते. मी आपला गप्प राहून धोंडिबाची बडबड ऐकत राहायचो. काही दिवसांनी धोंडिबाने मला त्याची पट्टी आणि पैसे घेऊन येण्यास सांगितले. पुण्याला त्याच्या दलालाकडे जाऊन पट्टी घेतली. पाहतो तर त्याच्या खोक्याचे वजन ४० ते ४४ किलो आणि भाव १२ ते १४ रु. १० किलो. माझी पट्टी पाहिली तर माझी खोकी ४३ ते ४८ किलो आणि भाव १४ रु. १० किलोस एकठोक. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. शेंडी लावायचा प्रकार! मी मात्र धोंडिबाला पट्टी देताना म्हटले, ”खरंच बुवा तुझा टोमॅटो माझ्यापेक्षा सरस, तुझा दलाल सरस, माझ्यापेक्षा तुझ्या टोमॅटोचं वजन आणि भाव जास्त आहे.’ धोंडिबाच्या एवढेही लक्षात आले नाही की, पूर्वी खोकी ६०/६५ किलो भरायची अन् मी पट्टी आणलेली खोकी ४० किलोच्या आत-बाहेर भरलेली. अशा प्रकारचे अनेक नमुने मला पुढे भेटले.
माझ्या शेताच्या बांधावर ‘म्हसोबा’ देवाचे जागृत स्थान असल्याचा बोलबाला होता. देव म्हणजे अक्षरशः दगडगोटे. त्याला शेंदूर फासलेला; पण अशा स्थानाबद्दल एकदा का लोकांची श्रद्धा निर्माण झाली की, त्याला मोठे महत्त्व प्राप्त होते. तसाच या देवाच्या स्थानाचा प्रकार होता. शेतकऱ्याचे जीवन सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असते. निसर्गशक्ती म्हणजे नेमके काय असावे त्याला उमगत नसते. ज्या अनाकलनीय शक्तीवर शेतकरी अवलंबून असतो त्या शक्तीला प्रसन्न कसे ठेवावे या विवंचनेत तो असतो. मग एखादे पूजनीय स्थान त्याला गवसले की, त्या स्थानाला महत्त्व प्राप्त होते. आजूबाजूचे शेतकरी मला सुरुवातीपासून सांगत, “काका, तुमच्या वावरात जागृत म्हसोबाचा वास आहे. तो रात्रीचा घोंगडी घेऊन वावरावावरातून फिरत असतो. त्याचा सांभाळ करून त्याला प्रसन्न ठेवणं अवघड. तुम्ही त्याची पूजाबिजा नीट करा बरं!’ या स्थानाचा आजूबाजूला दबदबा होता. आषाढात कुणी कुणी या देवाला कोंबड्याचा, बकऱ्याचा बळी देत. सुरुवातीला मी ही प्रथा जपली. आषाढात कोंबडे कापायचो. त्या विधीसाठी मुल्ला (मुसलमान) लागायचा. मी दोन-तीन वेळा पुण्याच्या घरासमोर राहणाऱ्या नहीमला घेऊन गेलो. पुढे एक-दोन वेळा रोहिदास किंवा अप्पानेच कोंबडे कापले. तेव्हा मात्र अप्पा मला म्हणाला, “अण्णा, या विधीला मुसलमानाचा मान असतो. तो दिला नाही तर ‘म्हसोबा’ प्रसन्न होणार नाही. आपण शेती घेतल्यापासून यश आपल्यापासून लांब पळतं आहे. आपल्याकडून देवाची कसर होता कामा नये.” असले वक्तव्य ऐकून माझी चलबिचल व्हायची. नास्तिक असणे किंवा आस्तिक असणे या प्रश्नाला समर्पक उत्तर मला माहीत नव्हते आणि अजनही नाही. रानातील वास्तव्यात एक अनाहत शक्ती मी वारंवार अनुभवली, जिचे रूप नेमके ठरवता येणार नाही. या शक्तीला वंदन करण्यात मला काहीच वावगे वाटले नाही. ज्याचे नेमके रूप माहीत नाही. वर्णन करता येत नाही. सांगताही येत नाही अशा निसर्गशक्तीला वंदन करावे वाटले तर कुणाला वंदन करावे ? त्याचे उत्तर बहुधा या दगडगोट्यांचे श्रद्धास्थान निर्माण होण्यात मिळते. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या गीतेतील पंक्तीचा पुरा बोध झाला. १३ वर्षांच्या शेती-व्यवसायात मी कोण आहे, मी काय करू शकतो, माझ्या हातात काय आहे आणि काय नाही हे कळले. अनेक अनुभवांची शिदोरी साठत राहिली. तेव्हा कळून चुकले, शुद्ध मनाने, सरळ मार्गाने सतत प्रयत्न करत राहायचे.त्याचे फळ मिळणार का नाही त्याचा विचार करत बसायचे नाही. त्याप्रमाणे प्रयत्न करण्यात मी कधीच कुचराई केली नाही.

शेतकऱ्याच्या वाट्याला शहरी सुखसोयी, सुविधा फारश्या येत नाहीत. शुद्ध हवा, शांत निरागस परिसर आणि मनस्वी जीवन जगण्याची मुभा मात्र मिळते. त्यांच्या उत्तम तब्येतीचे हेच रहस्य असावे. निसर्गाशी हातमिळवणी करून त्यांचे साधेसुधे जिणे ते सुखकर करतात. मला बरेच जण विचारत, दूधधंदा कसा आहे ? परवडतो का ? माझा अभ्यास चार वर्षांचाच! तरी हा अनुभव अभ्यासता माझ्यापुरते गणित मी सांगू शकतो. दर आठवड्याला घरी येणारे १०-१५ लिटर दूध, शेतावर वापरलेले दूध, वर्षाला ५-६ ट्रक उत्तम शेणखत एवढाच काय तो मला फायदा व्हायचा. इतर लहान शेतकरी, मोलमजुरी करणारे गडी, स्वतःच्या हाताने गाई सांभाळणारे यांच्याबाबत मात्र गणित निराळे असते. मजुरी करणारी मंडळी दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात तेव्हा बरोबर गाय आणतात. तिथेच बांधावर चारतात. खुरपणीत निघालेला हिरवा चारा गायीला खाऊ घालतात. आंबोण, कडबा, गवत इ. विकत घेत बसत नाहीत. मग त्यांना दिवसाला दूध मिळते ३-४ लिटर, म्हणजे १२ रुपयांचे. त्यासाठी आमच्याइतका खर्च येत नाही. त्यांना विकतचे काही आणावे लागत नाही. शिवाय घरी चहापुरते दूध मिळते. दिवसाला १०-१२ रुपये नकद सुटतात. महिन्याला ३००-३२५ रुपये मिळाले तर त्यांना ही रक्कम खूप असते. तेवढ्यात त्यांचा महिन्याचा मीठ, मिरची, तेलाचा खर्च सहज निघतो. अशा पद्धतीने गाई पाळणाऱ्याला होणाऱ्या फायद्याचे प्रमाण आमच्या खर्चाच्या प्रमाणात पाहिले तर थोडे जास्तच असते. शेवटी जगातील अनेक व्यवहार तुलनात्मक असतात. राबणाऱ्या गड्याला मिळणारी वरकड ३०० रु. ची रक्कम म्हणजे बख्खळ फायदा वाटतो.

रानवस्तीला निरोपः
१७ एप्रिल १९८९ रोजच्यासारखाच उगवला. नेहमीच्याच गतीने दिवस पुढे सरकत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास माऊलींची जीप धडधडली. भाऊ, त्यांची बायको आणि यादववाडीचे श्री. कुंल घरी आले. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा दिवस, एखादी वेळ अशी येते की, तेव्हा त्याचं आयुष्य एका वळणावर आलेले असते. आयुष्याच्या वळणावर उभ्या असणाऱ्या एखाद्याला किंबहुना मलाही त्या दिवशी माहीत नव्हते की, मी अशाच एका वळणावर उभा आहे. भाऊ जिना चढून आले. नेहमीसारखे स्वागत झाले. चहापाणी झाले की भाऊ म्हणायचे, “चला सायेब, लईच दिसांनी मनासारख्या गप्पा झाल्या. आता लेट होतोय. लई लांब जायचं हाये. बरं आहे.” इ. इ.; पण आज भाऊ घोटाळत होते. आम्हीसुद्धा चुळबुळू लागलो. गप्पांचे विषय संपल्यावर एक प्रकारची अनाहूत शांतता पसरली. एवढ्यात भाऊ म्हणाले, “साहेब, वाईच खाली चला. तुमच्याशी काम हाये.” मी थोडा पेचात पडलो. भाऊंचं नेमकं काय काम असावं त्याचा अंदाज बांधत खाली उतरलो. मला अडचणीत टाकतील असं काही काम नसावं असा विचार करत आम्ही उतरलो. भाऊ पैसे तर मागणार नाहीत ना? आणि मागितले तर नाही म्हणणं जिवावर येणार. भाऊंनी खाली कट्ट्यावर मांडी ठोकली. बैठक जमवली. बिडी शिलगावली. मग मला म्हणाले, “सायेब, एक इचारू का ? राग मानू नका. माझे एक नातेवाईक हायेत. त्यांच्यासाठी आम्ही जमिनीच्या शोधात आहोत. त्यांच्याकडं एकरकमी पैका तयार आहे. माझ्या पाव्हण्यानं नुकतीच यवतची जमीन वोपली आहे. बख्खळ पैका संगती आहे. तुमची जमीन त्यांना पसंत आहे. तुम्ही म्हणत असाल तर चांगला भाव मिळेल जमिनीला.’ असं म्हणत भाऊंनी किंमतीचा अंदाज सांगितला. प्रथमदर्शनी सांगितलेली किंमत भरपूर वाटली. असा काही प्रस्ताव भाऊ मांडतील अशी पुसटशी कल्पनाही मला नव्हती. धक्काच बसला मला. मन सैरभर झालं. मती गुंग झाली. अनपेक्षित प्रकार घडत होता. मी भाऊंना म्हटलं, “भाऊ, खरं सांगू का, मी ‘अनमोल बाग’ विकायची असा कधी विचारही केला नाही; पण तुम्ही सांगताय त्या प्रस्तावावर विचार करून २-३ दिवसांत सांगतो. मी रानात येणार आहे तेव्हा तुम्हाला भेटतो.” झालं, भाऊ परतले. मी जिना चढून घरात आलो. रंजना चहापाण्याचा पसारा आवरून नुकतीच सोफ्यावर बसली होती. मी संथपणे येऊन बसलो. विषयाची सुरुवात कशी करावी याची जुळवाजुळव मनात चालू होती. माझ्या चेहऱ्यावरचा भाव पाहून रंजना म्हणाली, ‘माऊली कशाला आले होते रे? मला माझी अंतःप्रेरणा सांगते आहे की, त्यांनी शेतासंबंधी तुला काही तरी विचारलं आहे ! होय ना?” “होय, भाऊ तेच विचारत होते की चांगली किंमत येत असेल तर तुम्ही जमीन विकायला तयार आहात का?” भाऊंचा विचार करता करता दोन-तीन वर्षांपूर्वी शेतावर घडलेला प्रसंग मला आठवला. माझ्या शेजारची दोन एकर शेतजमीन विकाऊ होती. ती जमीन माझ्या परिचितांना विकत देण्यासाठी मी खटपट करत होतो. ते पाहून भाऊ म्हणाले होते, “सायेब, तुम्हीच का घेत नाही ही जमीन ? फायदा हाये त्यात.’ तेव्हाच्या चर्चेत मी भाऊंना म्हटले होते. “खरं सांगू का भाऊ, गेली १०-१२ वर्षं मी नाना प्रकारांनी शेतीत प्रयोग केले. अपार कष्ट उपसले. जीवघेणी धावपळ केली. या सर्व गोष्टी मी आनंदानं केल्या; पण हे सगळं करूनही व्यवहारी जगात मी कुठं आहे पाहा ना! अजूनही मी माझ्या पायांवर पूर्ण उभा नाही. ही नवीन जमीन विकत घेण्यापेक्षा समजा माझ्या जमिनीला तीन लाख रुपये आले, तर मी वर्षाला ३०-३२ हजार व्याज मिळवीन. त्यासाठी काही खटाटोप नको, जीवघेणी धावपळ नको. मनावर ताण नको. बांध-भावांची भांडणं नकोत. हे परावलंबित्व नको. असा विचार केला, तर तुम्हीच सांगा मी नवीन जमीन घेण्यात काही मजा आहे का ?” त्यावर भाऊ म्हणाले, “सायेब खरं आहे तुमचं. तुम्ही हाडाचे शेतकरी नव्हे. तुम्ही समदी कामं दुसऱ्याकडून करून घेणार. तुमचा खर्च लई. अवघड आहे शेतीत परतळ बसणं.” चाणाक्ष भाऊंनी नेमका हाच धागा पकडून आजचा प्रस्ताव मांडला होता. मी रंजनाला त्यांचा प्रस्ताव ऐकविला. प्रथमदर्शनी सांगितलेली किंमत धरून आजपर्यंतचा हिशेब मांडला. नुकसानीचा आकडा फुगलेला होता. त्यात माझा प्रापंचिक खर्च वाढला होता. दोन मुले, नव्याने बांधलेले घर माझे मला चालवायचे होते. गेल्या तीन वर्षांपासून चालू केलेला फर्निचरचा व्यवसाय वाढत होता. माझा पुण्याचा खर्च भागू शकेल अशी आवक होती. शेतीचा खर्च रेटण्याइतका पैसा माझ्याकडे नव्हता. गेल्या वर्षी बँकेने २५,००० रुपयाचे ‘कॅश क्रेडिट’ मंजूर केले होते. त्यातूनच गेले वर्ष तसे निर्विघ्न पार पडले होते. घरून नव्याने पैसा घालावा लागला नव्हता. गेल्या बारा वर्षांच्या अनुभवातून शिकलेल्या गणितानुसार पिकांचा आडाखा बांधला होता. दीड एकर आडसाली-नोव्हेंबर महिन्यात आणि एप्रिल-मे मध्ये तयार होईल अशा खोडवा उसाची मुख्य आखणी केली होती. राहिलेल्या दीड एकरात मे महिन्यात लावलेला उन्हाळी भुईमूग ऑगस्ट मध्यात निघेल, त्यानंतर गहू एप्रिलमध्ये निघाला की, परत उन्हाळी भुईमूग आणि त्यानंतर आडसाली उसाची लागण, असा आराखडा तयार केला होता. त्यामुळे पिकांत बदल (रोटेशन) होणार होता. दर २-३ महिन्यांनी उत्पन्न मिळणार होते. राहिलेल्या जमिनीत थोडाफार भाजीपाला, गायींसाठी चारा निघणार होता. एकंदर सर्व गणित कागदावर गोजिरवाणे दिसत होते. या आराखड्यानुसार ३-४ वर्ष जर तग धरली असती तर शेती विकायच्या कोणत्याच प्रस्तावाचा मी विचार केला नसता; पण या आखणीचा प्रयोग चालू करून फक्त वर्षच झाले होते. मन कसे असते पाहा! एकदा का एक विचार मनात रुजला की, तो दुसऱ्या विचारावर कुरघोडी करत जातो. इतके दिवस मी जिद्दीने लढत होतो. शेतीचा नकारात्मक विचार अजून शिवला नव्हता; पण आजचे गणित वेगळे होते. एकरकमी मुद्दल दिसत होते. त्याचे विनासायास येणारे व्याज मनाला सुखावत होते. माझ्या आराखड्यानुसार जरी शेतीच्या सर्व गोष्टी झाल्या तरी वर्षाकाठी होणारा निव्वळ फायदा येणाऱ्या व्याजाइतका नक्कीच नव्हता. दादांकडून आजपर्यंत घेतलेले पैसे फेडायचे म्हटले, तर या फायद्यातून फेडणे शक्य नव्हते. आजपर्यंत कुणी माझ्या शेतीच्या उद्योगावर आक्षेप घेतला नव्हता, तरी सर्वांनाच तो एक प्रकारचा बोजा वाटू लागला होता. दादांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यांनी असे कधीच बोलून दाखवले नव्हते की, मला जाणवू दिले नव्हते, तरीसुद्धा माझ्या कानात, माझ्या मावसकाकांनी (श्री बाळासाहेब थोरात, इचलकरंजी) एकदा काढलेले उद्गार घुमायचे. “अनिलसारखी शेती करायला ‘सिनेमा थिएटर’चा जोडधंदा असला पाहिजे. वडील त्याच्या शेतीला नेहमीच पैसे पुरवत आले आहेत. त्याचे इतर दोघे भाऊ काही म्हणत नाहीत म्हणून ठीक. नाहीतर तीन मुलांमधील एकाच मुलाला वडिलांनी धंद्यासाठी पैसा पुरवला तरी इतर दोघं त्याचा अजून जाब विचारत नाहीत म्हणून ठीक आहे.” त्यांचे शब्द ‘अजून जाब विचारत नाहीत’ माझ्या मनात घर करून राहिले होते. अजून जाब विचारत नाहीत, हे जरी खरे असले तरी ‘हे अजून’ कदाचित बदलू शकेल. कलह होऊ शकेल. मग घरातील सर्वांचा पाठिंबा असला तरी आज ना उद्या मने बिथरली तर ? अशी भीती मला वाटत होती. कितीही म्हटले तरी आम्ही लग्नानंतर आजपर्यंत एका दडपणाखाली राहत होतो. इतके दिवस जवळचे वाटणारे शेत आज एकदम परके वाटू लागले. पुण्याहून येणाऱ्या मंडळींना शेतीचा परिसर खूप आवडायचा; प्रत्येकाला वाटायचे, मेन रोडपासून तीन मैल कच्चा रस्ता. अशा एकाकी आडरानात येऊन शेती करणे अवघड. नव्याने शेती विकत घेणारा शहरी मित्र भेटला तर सांगायचा, “माझं शेत ना अस्सं मेन रोडला लागून आहे की गाडीतून, बसमधून उतरलं की लगेच रानात जायचं. पायाला चिखलही लागत नाही.’ माझ्या मनात विचार यायचा, कधी काळी शेती विकली तर या आडरानातील नंदनवनाला शहरी गि-हाईक मिळणे अवघड. आज मात्र आपणहून गि-हाईक चालत आले आहे. किंमत चांगली मिळेल. काय करावे ? कसे करावे ? काही सुचेना. आम्ही दोघे सुन्न होऊन बसलो होतो. इतक्यात दादा नेहमीसारखे डोकवायला आले. आम्हाला विचारात पडलेले पाहून म्हणाले. “काय रे, काय झालं आहे ? असं का बसला आहात?” दादांना माऊलींचा प्रस्ताव सविस्तर सांगितला. शांतपणे ऐकून ते म्हणाले, “तुला वाटतंय ना की शेती विकण्यात फायदा आहे. तुझा त्रास कमी होईल ना? तुझ्यावरचं दडपण कमी होईल ना? मग मला वाटतचं की तू यातून मोकळा हो. आपणहून संधी चालून आली आहे. पुढं कधी शेती विकायची ठरवलंस तर तू तेव्हा गरजवंत असशील. मग गरजवंताला पडतं घ्यावं लागतं.” अजितला (माझा धाकटा भाऊ, सी.ए.) बोलावून आणले. परत सर्व गोष्टींची उजळणी झाली. ‘सी.ए.’ माणसाने रोखठोक व्यवहारी निर्णय सांगायला काऽकूऽ केली नाही, “उत्तम किंमत येत असेल तर शेती विकून टाक. तुझ्याकडं आता थोडी का होईना, भूगावची शेती आहे. मला वाटतं, केला तेवढा अट्टहास, हाल आता पुरेत!”

१२५/५, प्रभात नगर, पुणे – ४११ ००४.

पूर्वसूरी काय म्हणतात
(१) लॉर्ड कर्झन (Imperial Agricultural Research Institute, पूसा, जि.दरभंगा, बिहार. आता Indian Agricultural Research Institute च्या स्थापनेच्या वेळी १९०५. या संस्थेसाठी श्री. हेन्री फिप्स, अमेरिका, यांनी ३०,००० पौंडाची देणगी दिली होती.
“शेतीच्या समस्यांचा केवळ अभ्यास करूनच थांबता कामा नये. नवनवीन ज्ञान थेट जमीन कसणाऱ्या ३ पाहिजे. ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले पाहिजे की त्यांनी विचारपूर्वक शेती करावी, निरीक्षण करायला शिकावे, प्रयोग करावेत. मालकांबरोबर पक्का व्यापारी व्यवहार ठेवायला शिकावे. धान्याचा व्यापार जाणून घ्यावा.”
(२) महात्मा फुले – शेतकऱ्यांचा असूड (पान १६,५६-५७,७३,७४,७५,७६)
एकंदर सर्व हिंदुस्थानांत पूर्वी कांहीं परदेशस्थ व यवनी बादशाहा व कित्येक स्वदेशीय राजे या सर्वांजवळ शूद्र शेतकऱ्यांपैकी लक्षावधि सरदार, मानकरी, शिलेदार, बारगीर, पायदल, गोलंदाज, माहूत, उंटवाले व अतिशूद्र शेतकऱ्यांपैकी मोतदार चाकरीस असल्यामुळे, लक्षावधि शूद्रादि अतिशूद्र शेतकरी लोकांचे कुटुंबास शेतसारा देण्याची फारशी अडचण पडत नसे. कारण बहुतेक शेतकऱ्याच्या कुटुंबांतील निदान एखाद्या मनुष्यास तरी लहानमोठी सरकारी चाकरी असावयाचीच. परंतु हल्ली सदरचे बादशहा, राजेरजवाडे वगैरे लयास गेल्यामुळे सुमारे पंचवीस लक्षांचे वर शूद्रादि अतिशूद्र शेतकरी वगैरे लोक बेकार झाल्यामुळे त्या सर्वांचा बोजा शेतकी करणारांवर पडला आहे.
लग्नांतील भोजनसमारंभ रस्त्यावर. हमेशा बसावयाकरितां पडदा अंथरल्या-शिवाय पंगत पडावयाची. देवकार्याचे दिवशी सर्वांनी आपआपल्या घरून पितळ्या घेऊ आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगऱ्याबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्ये दर एकाच्या पितळीत एकदां चार अथवा पांच आंतडीबरगड्याचे रवे पडले म्हणजे जेवणारांचे भाग्य. कारण एकंदर सर्व बकऱ्यांची मागची पुढची टिंगरें दोनदोन तीनतीन दिवस पुढे घरांतील वहाडांसहित मुलांबाळांस तयार करून घालण्याकरितां घरांत एका बाजूला टांगून ठेवितात. गांवजेवणांत वाळल्याचिळल्या इस्ताऱ्यांवर थोड्याशा भातांत उभे केलेल्या द्रोणांतील गुळवण्यांत, तेलांत तळलेल्या तेलच्या कुसकरून खातां खातां, गाजरें अथवा बटाट्याची तोंडी लावून अखेरीस हुंदाड्याबरोबर शेवटचा भात खाऊन वरती तांब्याभर पाणी पिऊन डरदिशी ढेकर दिले की, शेतकऱ्याचे जेवण संपले. त्या सर्व जेवणामध्ये हजार मनुष्यांमागें दमडीचे सुद्धां तूप मिळवायचे नाही. अशा थाटाची शेतकऱ्यांत लग्ने होत असून येथील एकंदर सर्व गैरमाहीत शहाणे ब्राह्मणांतील विद्वान, आपल्या सभांनी लटक्या-मुटक्या कंड्या उठवून कारभारीस सुचवितात की, शेतकरी आपले मुलाबाळांचे लग्नांत निरर्थक पैसा खर्च करितात. यामुळे ते कर्जबाजारी झाले आहेत.
असो. आतां आपल्या सरकारास अक्षरशून्य अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांचे निकस झालेल्या शेतांची सुधारणा करण्याविषयी उपाय सुचवितों ते आमच्या दयाळू सरकारने एकंदर सर्व शेतकऱ्यांस युरोपियन शेतकऱ्यांसारखें विद्याज्ञान देऊन, त्यास त्यासारखी यंत्राद्वारे शेतीकामें करण्यापुरती समज येईपावेतों एकंदर सर्व गोऱ्या लोकांसह मुसलमान वगैरे लोकांनी हिंदुस्तानांतील तूर्त गायाबैलांसह त्यांची वासरें कापून खाण्याचे ऐवजी, त्यांनी येथील शेळ्याबकरी मारून खावीत; अथवा परमुलखांतील गायीबैल वगैरे खरेदी करून येथे आणून मारून खावे, म्हणून कायदा करून अमलात आणल्याशिवाय, येथील शूद्र शेतकऱ्यांजवळ बैलांचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेतांची मशागत भरपूर करता येणार नाही व त्याजवळ शेणखताचा पुरवठा होऊन त्यांचा व सरकारचा फायदा होणें नाहीं. एकंदर डोंगरपर्वतावरील गवताझाडाच्या पानफुलांचा, व मेलेल्या कीटक श्वापदांचें, मांसहाडांचे कुजलेलें सत्त्व, वळवाच्या पावसाने धुपून पाण्याच्या पुराबरोबर वाहून ओढ्याखोड्यांत वाया जाऊ नये, म्हणून आमच्या उद्योगी सरकारने सोयीसोयीने काळ्यागोऱ्या लष्करासह पोलीसखात्यांतील फालतू शिपायांकडून जागोजाग तालीवजा बंधारे अशा रितीने बांधावे की, वळवांचे पाणी शेतातून मुरून नंतर नदीनाल्यास मिळावें. असे केल्याने शेतें फार सुपीक होऊन सर्व लष्करी शिपायांस हवाशीर जाग्यांत उद्योग करण्याची संवय लागल्याबरोबर त्यास रोगराईची बाधा न होतां बळकट होतील. त्यांनी दररोज एक आणा किंमतीचे जरी इमानेइतबारे काम केले, तरी सालदरसाल पंचवीस लक्षांचे वर सरकारच्या स्थावरमत्तेत भर पडणार आहे. कारण हल्ली आमचे खबरदार सरकारजवळ पोलीस खात्यासह पलटणी शिपाई सुमारे दोन लक्ष आहेत. त्याचप्रमाणे आमच्या दयाळू सरकारने एकंदर सर्व डोंगरटेकड्यांमधील दऱ्याखोऱ्यांनी तलावतळी, जितकी होती तितकी सोयीसोयीने बांधून काढावीत. म्हणजे त्यांच्या खालच्या प्रदेशात ओढ्याखोड्यांनी भर उन्हाळ्यात पाणी असल्यामुळे जागोजाग लहानमोठी धरणे चालून सर्व विहिरींस पाण्याचा पुरवठा होऊन, त्यांजपासून सर्व ठिकाणी बागाईती होऊन शेतकऱ्यांसहित सरकारचा फायदा होणार आहे. शेतें धुपून त्यामध्ये खोंगळ्या पडूं नयेत, म्हणून सरकारने शेतकऱ्यांपासून पाणलोटाच्या बाजूने शेतांच्या बांधांने वरचेवर ताली दुरुस्त ठेवाव्यात. आमचे दयाळू सरकारने आपल्या राज्यांतील सर्व शेतांच्या पहाण्या, पाणाड्यांकडून करवून ज्या ज्या ठिकाणी दोनग्या मोटांचे वर पाण्याचे झरे सापडतील, असा अदमास निघेल, सर्व जाग्यांच्या खुणा त्या त्या गांवच्या नकाशांनी नमूद करून केवळ सरकारच्या मदतीशिवाय पाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या पाणाड्यासह विहिरी खोदून, बांधून काढणाऱ्या शूद्र शेतकऱ्यांस लहानमोठी बक्षिसें सरकारांतून देण्याची वहिवाट घालावी व सर्व नदीनाले व तलावांतील साचलेला गाळ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांस फुकट नेऊं द्यावा व ज्या ज्या गांवची गावराने आमचे सरकारने आपल्या “फॉरेस्टांत” सामील केली असतील, ती सर्व त्या त्या गांवांस परत करून फक्त सरकारी हद्दीतील सरपण शेतास राब खेरीज करून, विकण्याकरितां इमारती लाकडे मात्र तोडूं न देण्याविषयीं सक्त कायदा करून, जुलमी फारेस्टखात्याची होळी करावी. खुद्द आमचे खासे सरकारने परीक्षण करून आपल्या खजिन्यांतून थोडेसे पैसे खर्ची खालून, इतर देशांतील नाना प्रकारच्या उत्तम उत्तम शेळ्यामेंढरांची बेणी खरेदी करून या देशांत आणून त्यांची येथे अवलाद उत्पन्न केल्याबरोबर येथील एकंदर सर्व शेतांस त्यांच्या लेंड्यामुतापासून झालेल्या खतांचा महामूर पुरवठा होऊन शेतें सुपीक होतील, व त्यांच्या लोकरीपासून शूद्र शेतकऱ्यांस फायदा होईल. आमच्या सरकारी जंगलांतील रानटी जनावरांपासून शूद्र शेतकऱ्यांच्या शेतांचा बचाव करण्यापुरत्या गावठी तोड्याच्या कां होईनात, जुन्या डामीस बंदुका, शूद्र शेतकऱ्यांजवळ ठेऊ देण्याची जर आमचे सरकारची छाती होत नाही, तर सरकारने तें काम आपल्या निर्मळ काळ्या पोलीस खात्याकडे सोपवून, त्या उपर शेतकऱ्यांच्या शेताचे रानडुकरें वगैरे जनावरांनी खाऊन नुकसान केल्यास ते सर्व नुकसान पोलीसखात्याकडील वरिष्ठ अंमलदारांच्या पगारांतून कापून अथवा सरकारी खजिन्यांतून शेतकऱ्यांस भरून देण्याविषयी कायदा केल्याशिवाय, शेतकऱ्यांस रात्री पोटभर झोपा मिळून त्यांस दिवसा आपल्या शेतातील भरपूर उद्योग करण्याची सवड होणे नाही. याचेच नांव “मला होईना आणि तुझें साहिना!’ आमचे दयाळू सरकारचे मनांतून जर खरोखर अज्ञान शूद्र शेतकऱ्यांचे बरे करून आपलें उत्पन्न वाढविणे आहे, तर त्यांनी सालदरसाल श्रावणमासी प्रदर्शने करून आश्विनमासी शेतपिकांच्या व औतें हाकण्याच्या परीक्षा घेऊन उत्तम शेतकऱ्यांस बक्षिसे देण्याची वहिवाट घालून, दर तीन वर्षांच्या अंदाजावरून उत्तम शेतकऱ्यांस पदव्या द्याव्यात व शेतकऱ्यांच्या विद्वान मुलांनी आपली शेतें उत्तम प्रकारची वजवून, थोड्याथोड्या लोहारी, सुतारी कामांत परीक्षा दिल्यास, त्यांस सरकारी खर्चानें विलायतेंतील शेतकीच्या शाळा पाहण्याकरितां पाठवीत गेल्याने इकडील शेतकरी ताबडतोब आपल्या शेतकीची सुधारणा करून सुखी होतील. आमचे नीतिमान सरकारने जोगतिणी, आराधिणी, मुरळ्या, कोल्हाटिणी व कसबिणींवर बारीक नजर ठेवून, त्यांच्याकरिता तालुकानिहाय लॉक इस्पितळे ठेवून, मुरळ्या, कोल्हाटिणी, कसबिणी, तमासगीर, नाटकाकार, कथाडे वगैरे लोकांनी कुनीतिपर गाणी गाऊं नयेत, म्हणून त्यांजवर सक्त देखरेख ठेवून त्याजला वरचेवर शिक्षा केल्यावांचून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांच्या नीतीसह शरीरप्रकृतींमध्ये पालट होणे नाही. एकंदर सर्व इलाख्यांतील लष्करी पोलीसखात्यांनी शूद्रादि अतिशूद्र शेतकऱ्यांचा मोठा भरणा असून ते ‘इजिप्त’ व ‘काबुलांतील’ हिरवट लोकांबरोबर सामना करितांना गोऱ्या शिपायांच्या पायांवर पाय देऊन मोठ्या शौर्याने, टकरा देऊ लागतात. एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्र शेतकरी आपल्या मुलांमाणसांसह रात्रंदिवस ऊर पिकेतों शेती कष्ट करून, सरकारास कर, पट्ट्या, फंड वगैरे जगातीद्वारे सालदरसाल कोट्यावधी रुपयांचा भरणा करीत आहेत. तथापि शूद्र शेतकऱ्यांना वाचण्यापुरतें ज्ञान आमच्या धर्मशील सरकारच्याने देववत नाही. व शेतकऱ्यांपैकी लक्षावधी कुटुंबास वेळच्या वेळी पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळण्याची मारामार पडली असून, त्यांच्या सुखसंरक्षणाच्या निमित्याने मात्र आमचे न्यायशील सरकार लष्करी, पोलीस, न्याय, जमाबंदी वगैरे खात्यांनी चाकरीस ठेविलेल्या कामगारांस मोठमोठाले जाडे पगार व पेन्शनी देऊन अतोनात द्रव्य उधळते, याला म्हणावें तरी काय!!’ कित्येक आमचे सरकारने नाकाचे बाल, काळे गोरे सरकारी कामगारांनी, हजारों रुपये दरमहा पगार खाऊन तीसपस्तीस वर्षे सरकारी हुद्दे चालविले की, त्यास आमचे सरकार दरमहाचे दरमहा शेंकडों रुपये पेन्शनें देते. बहुतेक काळे वगैरे सरकारी कामगार, सरकारी कचेऱ्यांनी कामें करण्यापुरतें अशक्त, आंधळे बनून खंगल्याची सोंगे आणून भल्या भल्या युरोपियन डाक्टर लोकांच्या डोळ्यांत माती टाकून पेन्शनी उपटून, गोरे पेन्शनर विलायतेस पोबारा करितात व काळे पेन्शनरांपैकी कित्येक, जसे काय आताच येशू ख्रिस्त योगी महाराजांनी मेलेल्यामधून उठविल्यासारखे तरुण पढे बनून, मिशांवर कलपाची काळी जिल्हई देऊन म्युनिसिपल व व्यापाऱ्यांच्या कचेऱ्यांनी मोठमोठ्या पगारांच्या चाकऱ्या पत्करून हजारों रुपयांच्या कमाया करून आपल्या तुंबड्या भरीत आहेत. आमचे खबरदार सरकारने एकंदर सर्व सरकारी खात्यांतील काळे गोरे शिपायांसहित लष्करी डोलीवाले, बांधकामाकडील लोहार, सुतार, बिगारी वगैरे हलके पगारी चाकरांच्या पगारांत काडीमात्र फेरफार न करिता बाकी सर्व मोठमोठ्या काळ्या व गोऱ्या कामगारांचे वाजवीपेक्षा जास्ती केलेले पगार व पेन्शनी देण्याचे हळूहळू कमी करावें. सदरी लिहिलेल्या गोष्टीचा विचार केल्याविना आमचे सरकारचे राज्याचा पाया या देशांत मुस्तकीम होऊन, अक्षरशून्य शेतकऱ्यांच्या कपाळच्या लंगोट्या जाऊन त्यांचे हल्लीचे उपास काढण्याचे दिवस कधीच जाणें नाहींत.
(४) डॉ. आंबेडकर
ही गोष्ट खरीच आहे की अनेक चढउतार आणि संकटे यांतून ही खेडी तगून राहिली आहेत. पण नुसत्या तगून राहण्याला काय अर्थ आहे ? प्रश्न असा आहे की कोणत्या पातळीवर ही खेडी जगत होतीं? अगदी खालच्या निकृष्ट पातळीवरचे स्वार्थी जिणें होतें तें. माझें असें मत आहे की भारताची ही तथाकथित प्रजासत्ताक (Republicans) त्याच्या नाशाला कारण आहेत. ही खेडी म्हणजे फालतू स्थानिक अभिनिवेशांचे अड्डे असत. प्रचंड अज्ञान, संकुचित वृत्ति आणि जातीयवादाचा नुसता बुजबुजाट आहे.”
(५) पं. जवाहरलाल नेहरू “सगळ्या गोष्टी बाजूला ठेवता येतील, शेती नाही. (Everything can wait, not agriculture.)”
(६) डॉ. अप्पासाहेब पवार असे मी मानतो !
“एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आज आपण पदार्पण करीत असलो, तरी ग्रामीण भागातील जीवनमान विशेषतः शेती आणि शेतकरी यांच्यामध्ये फारसे आमूलाग्र बदल झालेले नाहीत. इंटरनेट, वेबसाईट, ऑडिओव्हिजिबल सीडी ते संगणकाच्या जमान्यातही सर्वसामान्य शेतकरी आहे तिथेच आहे. संपूर्ण देशात अशी कोट्यवधी माणसे शतकानुशतके दारिद्र्यातच खितपत पडलेली आहेत. या दारिद्र्यातून बाहेर पडावें, इतरांसारखें सुखवस्तू जीवन जगावें, अशी विलक्षण ओढ या शेतकरी वर्गालादेखील आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली, तरी आपण जिथल्या तिथेच आहोत. या जाणिवेनें ही शेतकरी माणसें अत्यंत अस्वस्थ झाली आहेत. आता ती थांबायला तयार नाहीत. ऊठसूठ आम्हाला शेतीचे प्रशिक्षण द्या. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, शासनाच्या अखत्यारीत जमिनीसुद्धा द्या. आम्हाला मोफत वीज हवी. पाणी, खत फुकटात द्या, आम्ही जे काही शेतीमाल उत्पादित करतो आहोत, त्याला चांगली किंमत द्या. सबसिड्यांची (सवलत) खैरात तर पहिल्यांदा आमच्यासाठीच झाली पाहिजे. शिवाय निर्यातीसाठी आपोआप आम्हालादेखील दरवाजे खुले करून हवेत. अशा कितीतरी मागण्या आजच्या बागायतींमधून आळशी झालेले शेतकरी शासनकर्त्यांकडे करू लागले आहे आणि त्यासाठी धरणे धरून बसणे, घेराव घालणे, रस्ता रोको करणे, बेमुदत उपोषणास बसणे, एवढेच नाही तर आत्महत्या करणे हे प्रकार म्हणजे नव्या सहस्रकातली ती एक प्रकारची आक्रमक आह्वानेच आहेत; नव्हे ती आपल्या कृषिप्रधान देशाची हार आहे असे मी मानतो!

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.