मेंदूतील ‘देव’

देव ही एक संकल्पना आहे, धर्म ही एक संकल्पना आहे, असे असेल तर मग ‘देव भेटला’ असे संत का सांगतात ? प्रत्येक धर्माचा देव आहेच. आजकाल ‘देवाचा अवतार’ म्हणवून घेणारे ‘महाराज’ अवतरले आहेत. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता’ असे म्हणत धार्मिक अनुभव घेणाऱ्या लाखो भक्तांचा हा अनुभव म्हणजे नेमके काय असावे ? ते मानणारे भ्रमात असतात काय?

देव डोक्यात असतो असे समजले जायचे. पण मग मेंदूत त्याचे अस्तित्व सापडावयास हवे. किमान अनुभवांची मेंदूत काही क्रिया होत असेल तर ती दिसावयास हवी. तसे काही असेल का यासाठी नसविज्ञान(न्यूरोसायन्स) आणि मानसविज्ञान (सायकॉलॉजी) या क्षेत्रातील वैज्ञानिकांनी संशोधन चालू ठेवले आहे. आणि ‘देवाचा अनुभव’ निर्माण होणारी केंद्रे आता मेंदूत दिसून येऊ लागली आहेत. याचा अभ्यास करणारी आता नसधर्मशास्त्र (न्यूरोथिऑलॉजी) नावाची शाखा विकसित होत आहे.
देव जगाचा निर्माता आहे की मेंदू देवाचा निर्माता आहे याची सखोल तपासणी करण्यासाठी आपणांस मायकेल पर्सिंगर यांच्या प्रयोगात डोकवावे लागेल. हे कॅनेडियन नसमानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी दाखवून दिले आहे की, मेंदूच्या कुंभखंडाना विद्युत-चुंबकीय उत्तेजना दिली की, व्यक्तीस देवाधर्माचा अनुभव येतो. याला आधार काय ?

मेंदूचा कुंभखंड हा दोन्ही कानाच्या वरती असतो. या कुंभखंडात दोष निर्माण झाला की फेफरे येतात. वैद्यकीय भाषेत याला कुंभखंडीय फेफरे (टेम्पारेल लोब एपिलेप्सी) म्हणतात. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना कुंभखंडीय फेफरे हा विकार होता. त्यापैकी बहुसंख्या व्यक्तींना जेव्हा फेफरे येत त्यापूर्वी ‘अतीन्द्रिय अनुभव’ यायचा. या बाबतीत एक उदाहरण आहे एलेन व्हाईटचे. नऊ वर्षांची असताना तिच्या मेंदूस इजा झाली. त्यानंतर तिचे व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलले. तिला धार्मिक अतीन्द्रिय अनुभव येऊ लागले आणि ‘सेव्हन्थ डे अॅडव्हेंटिस्ट’ या धर्मचळवळीची ती एक संस्थापक झाली! याचा अर्थ कुंभखंडीय भाग जर अतिसंवेदनशील असेल तर अद्भुत गूढ अनुभव, अतीन्द्रिय अनुभव, देवाशी संपर्क, देवात विलीन झाल्याचा अनुभव आणि कट्टर धार्मिक झाल्याचे अनुभव येतात.

सर्वप्रथम हे निदर्शनास आले डॉ.वाईल्डर पेनफिल्ड यांना. ते कॅनडातील नसवैज्ञानिक आहेत. फेफऱ्याच्या रुग्णांच्या कुंभखंडातील ‘रोगी’ भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ते करीत असत. त्यासाठी मेंदूतील फक्त तो भागच बधिर करीत. त्यामुळे पेशंटचा उरलेला मेंदू ‘जागाच’ असे. अशा वेळी डॉ. पेनफिल्ड रुग्णाशी गप्पा मारत. १९३४ साली अशाच पद्धतीने एका स्त्रीवर शस्त्रक्रिया करीत असताना ती म्हणू लागली की, ती पूर्वीचे सर्व अनुभव आता पुन्हा अनुभवू लागली आहे. उदा. ती आपल्या मुलास जन्म देते आहे हे तिने पुन्हा पाहिले व अनुभवले ! डॉ. पेनफिल्डना याचे महत्त्व लक्षात आले. या स्मृती जाग्या होण्यास कुंभखंडाच्या बाह्यकाचे विद्युत उद्दीपन कारणीभूत ठरले असावे हे त्यांनी ताडले. जोवर उद्दीपन आहे तोवर या स्मृतींचा ‘प्रवाह’ चालूच असतो.

डॉ. पेनफिल्डनी एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेवेळी मेंदूच्या उजव्या कुंभखंडाच्या वरच्या थराचे उद्दीपन केले. त्या रुग्णास विशिष्ट संगीत ऐकू येण्याचा अनुभव येत राहिला. त्याला संगीताचा आवाज इतका स्पष्ट ऐकू येत होता की, त्याला वाटले ऑपरेशन थिएटरमध्येच बहुधा ते संगीत लावले असावे. एल.जी. नावाच्या एका रुग्णाच्या त्या भागास उद्दीपीत केल्यावर त्याला एक माणूस आपल्याशी भांडतो आहे असे दिसले. हे सारे स्मृतींचे संवेदनाभ्रम होते. या वेळीच त्यांना ‘एकत्वात विलीन’ झाल्याचा अनुभव आल्याचेही सांगितले. याला डॉ. पेनफिल्ड यांनी मानसिक संवेदनाभ्रम म्हटले. जे अनुभव भावनेने ओथंबलेले होते ते सामान्य अनुभवांपेक्षा लवकर प्रगट होत होते. मेंदूच्या कुंभखंडाच्या या भागातून फेफरे निर्माण होत. या फेफऱ्यांना ‘अर्थवाही झपाटणी’ असे म्हटले गेले. या अर्थवाही झपाटणीतूनच भीती, शरीरातून आत्मा बाहेर पडल्याचा आभास, शरीराचे भास आणि स्थिती यांचे भ्रम निर्माण होत होते. एक रुग्ण म्हणाला, ‘बापरे मी शरीरातून बाहेर पडू लागलो आहे.’
या आधारे डॉ. पर्सिंगर यांनी विविध प्रयोग केले. कुंभखंडाच्या बाह्यक आणि मेंदूतील बदामाकार केंद्र व अश्वमीन गंड या भागांच्या एकत्रित कार्यातून आपली ‘स्वप्रतिमा’ निर्माण होते असे त्यांना दिसून आले. या भागातूनच आनंद, भीती, काळजी या भावना निर्माण होतात. या भागांना तीव्र उद्दीपन दिले तर टोकाचे अनुभव निर्माण होतात. जसे धर्मश्रद्धेवरील दृढविश्वास, शरीराबाहेर आपण आहोत असे वाटणे इत्यादी मेंदूतील चेताक्षेपक (Thalamus) आणि डोक्यावरील मेंदूचा अग्रखंड या भागांच्या उद्दीपनाने त्या वेळेच्या पुढचे आणि मागचे सारे विस्कळीत झाल्याचा भास होतो. क्षणार्धात संपूर्ण विश्व पाहिल्याचा भास होतो.

या साऱ्या भ्रमांना त्यांनी विविध नावे दिली आहेत. उदाहरणार्थ शरीरातून बाहेर पडणे (मानसिक डिप्लोपिया), काळ विश्वापलीकडचे अनुभव (कर्णकोषीय संवेदना), देवाचा आवाज, आत्म्याचे आदेश किंवा अद्भुत शक्तींचे संदेश (ऑडिटरी अनुभव) इ. कुंभखंडाचे उद्दीपन दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर केले असता दोन्ही पातळ्यांवर वेगवेगळे अनुभव निदर्शनास आले. सातत्याने तीव्र उद्दीपन केले असता दैवी आशीर्वादाचा अनुभव, तीव्र धार्मिक भावना, आत्मकेंद्रित संवेदन दिसून आले. यात लैंगिक भावनांचा अभाव तीव्रतेने दिसून येतो. (यास गेश्चविंड सिंड्रोम असे म्हटले जायचे.) कुंभखंडांचे उद्दीपन केल्यावर ‘देजा-वू’ सारखा अनुभव येतो. देजा-वू म्हणजेच आत्ता आपण जे अनुभवले साधारण तेच पूर्वीही अनुभवले आहे असा भास होणे. त्याचबरोबर झोपण्यापूर्वी कंपने निर्माण होत असल्याचा आभास होणे, ऊर्जेच्या लाटा शरीरातून जाताहेत असा भास होणे, सातत्याने स्वप्ने पडणे, असाधारण किंवा अनपेक्षित गोष्टींबद्दल वाचन केले तर त्यात काही तरी गंभीर अर्थ’ आहे असे वाटणे, अवास्तव जगात वावरणे, कुणीतरी आपल्या बाजूस आहे असे भासणे, टेलीपॅथीचे किंवा पूर्वज्ञान होण्याचे अनुभव येणे, असे वर्तन आढळते.

असे हे देवाचे धार्मिक अनुभव येण्यामागील कारणेही डॉ. पर्सिंगर यांनी शोधली. काही हातभार लावणारी (पूर्वप्रवर्तक) कारणे त्यांना आढळून आली. साधारण तरुण वयानंतर, संवेदनशील असलेल्या कुंभखंडामुळे व्यक्तींना वरील भास होतात. मेंदूची परिवर्त्यता वाढविणारे घटक उदा. सांस्कृतिक समारंभ, सांस्कृतिक देवाणघेवाण, हे असे भास निर्माण होण्यास हातभार लावतात. पण काही थेट कारणे (प्रवर्तक)ही आहेत. ‘ऐहिक’ उद्दीपने, पहाटेची वेळ, थकवा, ढोल बडविल्याचा आवाज, नाच, उदबत्त्यांचे वास, ही कुंभखंडाच्या थेट उद्दीपनाची कारणे होत. उपवास आणि उंच पर्वतावर राहिल्याने निर्माण होणारी प्राणवायू न्यूनता यामुळेही हे आभास निर्माण होतात. योगाच्या काही पद्धतीने अभिवाही नसांचे उद्दीपन होणे, काही मादक द्रव्ये व औषधे (उदा. एल.एस.डी., सिलोसायबीन, इबोगेन इ.) कारणीभूत ठरतात. या औषधांना इथिओजेन असे म्हटले जाते. इथिओजेन याचा अर्थ आहे देव आपल्यातच आहे.

कुंभखंडीय प्रतिक्रियांवर परिणाम करणारे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतःच्या मृत्यूची जाणीव होणे. वय जसे वाढेल तशी ही जाणीव जैवरासायनिक बदल घडविते. मृत्यूची तीव्र जाणीव होऊ लागली की, देवाचे आवाज ऐकू येऊ लागतात. अगदी जवळची व्यक्ती मृत्यू पावली तर संवेदनिक भ्रम निर्माण होतात. उदा. मृत व्यक्तीचा आत्मा दिसणे. अती ताण, आर्थिक नुकसान, अपघात ही कारणेही यामागे आहेत.

विविध संस्कृतीत कुंभखंडीय अस्थिरतेवर अनेक उपायही केले जातात. मंत्र-तंत्र, वारंवार आवाज काढणे, शारीरिक शिथिलन आणि आहारात बदल या उपायांनी दिखाऊ लक्षणे नाहीशी करण्याचा प्रयत्न केला जातो. वरील सर्व वर्तनास पर्सिंगर यांनी कुंभखंडीय अल्पकालीन प्रतिक्रिया (TLT) असे नाव दिले आहे. अशा या कुंभखंडीय अल्पकालीन प्रतिक्रिया निर्माण होणाऱ्या भागातूनच आक्रमक वृत्तीचा उगम होतो. अशा वेळी हे पाहणे महत्त्वाचे ठरते की काही रुग्णांमध्ये अतींद्रिय शक्तींच्या आज्ञेतून दुसऱ्या व्यक्तींना नष्ट करा असा आदेश मिळतो, तो या आक्रमणाच्या वृत्तीचाच विकास नसेल ना? आणि जर असे अनुभव म्हणजे जैविक बदलांचाच भाग असतील तर कृत्रिमरीत्या ते निर्माण करता येऊ शकतील काय?

डॉ. पर्सिंगर म्हणतात, “ज्यांना असे अनुभव येतात ते नव्या धर्मास जन्म देतात. आयुष्यभर या व्यक्ती आपल्या अनुभवांचे अर्थ काढीत राहतात. त्या अनुभवांना ते धार्मिक म्हणतात व विशिष्ट तत्त्वे तयार करतात. त्यांना ईश्वरी-पवित्र संबोधतात.” डॉ. पर्सिंगर यांनी असे अनुभव कृत्रिमरीत्या निर्माण करण्यासाठी एक हेल्मेट तयार केले. या हेल्मेटमधून कुंभखंडीय भागावर तीव्र चुंबकीय क्षेत्र निर्माण केले जाते, व हे कुंभखंड उद्दीपित केले जाते. या प्रयोगात भाग घेतलेल्यांपैकी ८०% व्यक्तींना ‘कोणीतरी’ असल्याची जाणीव झाल्याचा अनुभव आला. या व्यक्तींना हे कोण आहे असे विचारता बहसंख्यांनी ‘देव आहे’ असे सांगितले. रिचर्ड डॉकीन्स हे अज्ञेयवादी आहेत. देव न मानणारे आहेत. त्यांनाही हा ‘कोणीतरीचा’ अनुभव आला, मात्र त्याचे कारण मेंदूतील जैवरासायनिक बदल असावे, असे त्यांनी म्हटले. देवाच्या मेंदूतील जाणीवेबाबतीतला हा पहिलाच प्रयोग म्हणता येईल. अजून खूप काही संशोधन पुढे होईलच. मात्र अलिकडील संशोधनातून हेही दिसून येत आहे की, फक्त मेंदूचा कुंभखंडीय भागच यात भाग घेत नसून अन्य काही भागही यात भाग घेतात.
डॉ. अँड्रयू न्यूबर्ग हे पेनिन सिल्व्हीया येथे क्ष-किरण तज्ज्ञ आहेत. त्यांनी बौद्ध साधूंवर प्रयोग केले आणि त्यांनी मेंदूचा उर्ध्वखंड उद्दीपित होतो हे दाखवून दिले आहे. पर्सिंगर यांच्या या प्रयोगांवर आक्षेपही घेण्यात आले आहेत. उदा. स्वीडनमधील मनोवैज्ञानिक पेहर ग्रानक्विस्ट यांनी पर्सिंगर यांचा प्रयोग सदोष होता असे म्हटले आहे. मात्र ग्रीनक्विस्टनी हाच प्रयोग ज्या रीतीने केला, तिची पूर्ण माहिती दिली नाही असे पर्सिंगर यांनी म्हटले आहे.

प्रयोगाविषयी सुधारणा व पुढील टप्पे कालांतराने होतीलही. मात्र मेंदूतील काही भागांची ही किमया आहे हे मात्र दिसून येत आहे. याचा अर्थ देवाधर्माचे क्षेत्र मेंदूत असेल तर देवधर्म क्षेत्रास काढून टाकण्याचे वा औषधाने कार्य बंद करण्याचे दिवस येतील काय ?

चार्वाक, ६५६४, जुना कुपवाड रोड, हॉटेल लव्हली सर्कलसमोर, सांगली ४१६ ४१६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.