असंख्य माणसे रोज अगदी नियमितपणे ईश्वराची प्रार्थना करीत असतात. मात्र अशा माणसांना ईश्वराची प्रार्थना का करावीशी वाटते, याची अनेक कारणे संभवतात. कोणी भाविक माणसे म्हणतील, की आम्ही अमुक एका धर्माचे प्रामाणिक अनुयायी असल्यामुळे, आमच्या ईश्वराची प्रार्थना करणे, हे आमचे पवित्र कर्तव्यच आहे. दुसरी कोणी माणसे म्हणतील, की आमच्या मनातील अनेक कामना ईश्वराची आराधना करून यथावकाश सफळसंपन्न होतील, अशी आमची श्रद्धा असल्यामुळे, आम्ही त्याची प्रार्थना करतो. तर अन्य कोणी माणसे असे म्हणतील, की आम्हाला या आयुष्यात पुण्यसंचय करून, इहलोकीची यात्रा संपल्यावर स्वर्गप्राप्ती करून घ्यावयाची आहे, म्हणून आम्ही निरतिशय प्रेमाने ईश्वराची प्रार्थना करीत करीत, या भूलोकीचा मार्ग आक्रमित असतो. आणि न जाणो कोणी माणसे असेही म्हणतील, की आमच्या कुलपरंपरेचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी, आम्ही ईश्वराची मनःपूर्वक प्रार्थना करीत असतो.
परंतु काही माणसे ईश्वराची प्रार्थना एका वेगळ्याच कारणासाठी करतात. त्यांचे म्हणणे असे, की ईश्वराची प्राथना करून, ऐहिक जीवनात कोणतेही फायदे पदरात पाडून घेण्याची आमची बिलकुल इच्छा नाही, अथवा परलोकातील आमची जागा राखून ठेवण्यासाठीही आम्ही ईश्वराला आळवीत नसतो. परंतु आम्ही अगदी प्रातःकाळी ईश्वराची प्रार्थना करतो याचे कारण असे, की तसे केल्यामळे आम्हाला मानसिक शांती लाभते : आम्ही दिवसभर प्रसन्नचित्त राहतो: आणि आम्हाला दैनंदिन जीवनातील लहानमोठ्या असंख्य समस्यांना सामोरे जाण्यासाठी, एक प्रकारचे मानसिक सामर्थ्य प्राप्त होते.
ईश्वराची प्रार्थना करून, माणसाच्या मनातील वरीलसारख्या इच्छा-आकांक्षा खरोखरच सुफलित होतात का, या प्रश्नाची शहानिशा वेगवेगळ्या प्रकारे करता येणे शक्य आहे. आणि तशी शहानिशा करताना, मुळात अगोदर ईश्वर अस्तित्वात आहे का, असल्यास तो आपल्या भक्तांच्या मनांतील कामना पूर्ण करतो का, स्वर्ग व नरक या संकल्पनांना वस्तुस्थितीचा काही आधार आहे का, असे अगदी मूलभूत तात्त्विक प्रश्न उपस्थित करता येतील. परंतु अशा प्रकारच्या प्रश्नांची चर्चा करणे, हे प्रस्तुत लेखाचे उद्दिष्ट नाही.
मानसशास्त्रीय चिकित्सा
माणूस ईश्वराची जी प्रार्थना करतो, तिच्या तात्त्विक आणि धार्मिक बाजूंची चिकित्सा करणे, हा या लेखाचा हेतू नाही; त्या प्रार्थनेची मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून चिकित्सा करणे, हा या लेखाचा हेतू आहे. साहजिकच कित्येक लोक, ईश्वराची प्रार्थना ज्या नाना हेतूंनी प्रेरित होऊन करतात, ते सर्व हेतू येथे विचारात घेण्याचे प्रयोजनच नाही. या लेखात फक्त मानसिक शांती, प्रसन्नता व सामर्थ्यासाठी प्रार्थना करणे कितपत हितकारक असते, हा विषय विचारात घेण्याचे योजिले आहे. आणि या प्रश्नाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून ऊहापोह करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
अमेरिकेतील ‘फ्री इन्क्वाइअरी’ (Free Inquiry) नावाच्या नियतकालिकाच्या १९९७ सालच्या वासंतिक अंकात, डॉ. अल्बर्ट एलिस यांनी प्रार्थना (prayer) या विषयावर एक टिपण प्रकाशित केले आहे. डॉ. एलिस विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे जनक तर आहेतच, पण ते निरीश्वरवादाचे व धर्मनिरपेक्ष मानवतावादाचे पुरस्कर्तेही आहेत. मात्र असे असूनही श्रद्धाळू माणसाला त्याची धार्मिकता स्वतःच्या मनाची शांती व संतुलन जोपासण्यास हातभार लावते, हे मान्य करण्यास ते अजिबात खळखळ करीत नाहीत. याचा एक उत्तम पुरावा म्हणजे, त्यांनी अन्य एका लेखात असे म्हटले आहे, की झाडून सर्वच्या सर्व मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने जितक्या लोकांमध्ये सुधारणा झाली असेल, त्यांहून कितीतरी अधिक लोकांनी, बायबलच्या साहाय्याने स्वतःमध्ये स्पृहणीय परिवर्तन घडवून आणले असेल. आणि या विधानाची कास धरून, कोणी असेही म्हणू शकेल, की गीता किंवा इतर धर्मग्रंथांच्या अध्ययनाने, लक्षावधी माणसांनी मानसिक शांती व संतुलन प्राप्त करून घेतले असेल. तेव्हा प्रार्थनेविषयी डॉ. एलिस काय म्हणतात, ते समजावून घेणे उद्बोधक होईल असे वाटल्यामुळे, या लेखाचा प्रपंच केला आहे. प्रार्थना उपयुक्त का?
डॉ. एलिस मान्य करतात, की ईश्वराची प्रार्थना करणे माणसाला उपयुक्त किंवा तारक अवश्य होऊ शकते. परंतु तसे करणे उपयुक्त का होऊ शकते, हे समजावून घेण्यास भाविक माणसे सहसा राजी नसतात. वस्तुतः एखादा माणूस कोणत्याही गोष्टीवर भक्तिभावाने पूर्ण विश्वास ठेवून तिची प्रार्थना करील, तर त्याला मानसिक शांती लाभू शकते. समजा एखाद्या माणसाची सैतानाच्या अस्तित्वाविषयी बालंबाल खात्री आहे. त्याची अशीही प्रामाणिक समजूत आहे, की आपले इष्ट दैवत (म्हणजे सैतान) सदैव आपले रक्षण करीत आहे. इतकेच नव्हे, तर आपले ते दैवत आपल्यावर कृपादृष्टी ठेवून, आपल्याला समृद्ध व सुखी करण्यासाठी सतत झटत आहे. तेव्हा आपण त्या सैतानरूपी दैवताची प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे. अशा माणसाला, सैतानाची प्रार्थना करणे निदान काही काळ तरी उपयुक्त किंवा तारक ठरू शकेल. आणि समजा या सैतानभक्ताचा जन्मजात कल, स्वतःला नेहेमी विषण्ण किंवा विमनस्क करण्याकडे आहे; अथवा स्वतःला विषण्ण किंवा विमनस्क करून घेण्याची त्याला सवयच आहे. तर मग त्याला सैतानाची पूजाअर्चा करून निदान काही प्रमाणात मानसिक स्वास्थ्य लाभू शकेल. तसेच जीवनातील असंख्य लहान-मोठ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी, एक प्रकारचे सामर्थ्य प्राप्त झाल्याचा प्रत्ययही त्याला येऊ शकेल.
अशा रीतीने माणूस सैतानावरच नव्हे, तर कोणत्याही गोष्टीवर शंभर टक्के विश्वास ठेवून, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याचे संगोपन करू शकेल. उदाहरणार्थ, काही लोक ज्वलंत राष्ट्रवादाचा, किंवा हिटलरप्रणीत नात्झीवादाचा, अथवा अशाच त-हेच्या कोणत्याही एकांगी विचारधारेचा सश्रद्ध मनाने स्वीकार करून, ताणतणावरहित आनंदात राहू शकत असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. परंतु एखाद्या विचारधारेवर अथवा तत्त्वप्रणालीवर निष्ठापूर्वक विश्वास ठेवल्यामुळे माणसाला काही फायदे मिळतात, म्हणून ती तत्त्वप्रणाली योग्य आहे, असे म्हणता येईल का ?
श्रद्धेची अमर्याद तृष्णा
ज्या माणसांच्या मनांत अशी पक्की समजूत रूजलेली असते, की आपल्या आराध्य दैवताची प्रार्थना करणे उपयुक्त व तारक असते, त्यांना त्या दैवताची प्रार्थना करणे फलदायी होऊ शकेल. शिवाय, काही माणसांची जन्मजात प्रवृत्तीच मुळी कशाना कशावरतरी गाढ श्रद्धा ठेवण्याकडे असते. नव्हे तसे केल्याखेरीज, त्यांना जणु काही गत्यंतरच नसते, मग त्यांच्या श्रद्धेचे लक्ष्य कितीही निरर्थक असो! परंतु कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या या प्रवृत्तीमुळे, अनेक त-हेच्या मानसोपचाराच्या पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे आढळून येते! कारण ज्या लोकांच्या मनात असा विश्वास दृढमूल झालेला असतो, की अमुक एक मानसोपचारतज्ज्ञ अत्यंत निष्णात व विश्वसनीय आहे; आणि तो मानसोपचाराची जी पद्धत अवलंबितो ती सर्वोत्कृष्ट पद्धत आहे, त्या लोकांना त्याच मनपसंत मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन, मानसिक शांती व सुख प्राप्त करून घेता येते. किंबहुना या कारणामुळेच अनेक त-हेच्या मानसोपचारपद्धती, केवळ अशास्त्रीय नव्हे तर तद्दन आचरटपणाच्या असूनही, सर्वत्र लोकप्रिय होत असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. अशा प्रकारच्या अशास्त्रीय मानसोपचारपद्धतीचे एक नमुनेदार उदाहरण म्हणजे, विलोम राइक (Wilhelm Reich) यांची मनोविश्लेषणपद्धती. जन्माने ऑस्ट्रियन असलेले हे मनोविश्लेषणतज्ज्ञ, आपला व्यवसाय अमेरिकेत करीत असत. त्यांचा प्रमुख सिद्धान्त असा, की ऑरगॉन (Orgone) नावाची एक अलौकिक ऊर्जा सर्व विश्वात अस्तित्वात आहे. आणि अशी ही विश्वव्यापी ऊर्जा साठवूनही ठेवता येते. ती साठविण्यासाठी, या मनोविश्लेषणतज्ज्ञाने एक विशिष्ट पेटी तयार केली होती. आपल्याकडे आलेल्या मनोरुग्णाला त्या पेटीच्या मध्यभागी बसण्यास सांगत असत. त्या पेटीतील आतील बाजूंमध्ये लाकडाचे व काही धातूंचे थर होते. मनोरुग्ण त्या पेटीच्या मध्यभागी बसला, की त्याच्या शरीरातील ऑरगॉन (Orgone) नावाची ऊर्जा बाहेर पडून, पेटीच्या आतील पृष्ठभागांवर जाऊन आदळते व नंतर त्या मनोरुग्णाच्या शरीरात परत जाते. परिणामी त्या मनोरुग्णाला बरे वाटू लागते. आणि काही लोकांना या उपचारपद्धतीमुळे, स्वतःमध्ये चांगला बदल झाल्याचे प्रत्ययास येत असे. खरोखर माणसाच्या मनातील, कशावर तरी गाढ श्रद्धा ठेवण्याच्या अमर्याद तृष्णेचा हा मोठा विजयच म्हणावा लागेल ! मात्र कोणाला, हा सर्व प्रकार म्हणजे चेटूकविद्या, जादूगिरी, भोंदूगिरी अथवा तत्सम काहीतरी वाटले, तर त्यात चूक काय, असा प्रश्न पडतो. परंतु सुदैवाने अमेरिकेत कायद्यानेच ही मानसोपचारपद्धती निकालात काढली!
प्रार्थना मारक का?
ते काहीही असो. ज्यांचा प्रार्थनेवर विश्वास असतो, त्यांनी प्रार्थना केली, तर प्रार्थना केल्यामुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सुधारू शकतो; त्यांना एक प्रकारचे मानसिक सामर्थ्य प्राप्त झाल्यासारखे वाटते, हे नाकारता येत नाही. मात्र एखाद्या माणसाला जर असे वाटत असेल, की ईश्वर माझे रक्षण करीत आहे, तर जीवनातील अगदी कठीण प्रसंगी ईश्वर आपल्या रक्षणासाठी धावून आला नाही असे दिसून आल्यावर, त्या माणसाचा भ्रमनिरासही होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या माणसाला असे वाटत असेल, की सैतान आपले रक्षण करण्यास समर्थ आहे, त्याला जीवनातील ऐन संकटसमयी सैतान आपल्या रक्षणासाठी उभा ठाकला नाही हे पाहून, त्याचाही भ्रमाचा भोपळा फुटेल. परिणामी वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या संकल्पनांना चिकटून राहणारी अशी माणसे, मानसिकदृष्ट्या सुधारण्याऐवजी, अधिकच प्रक्षुब्ध होऊन, स्वतःला नैराश्याच्या गर्तेत लोटून देण्यास प्रवृत्त होऊ शकतील. तेव्हा माणसाच्या मनातील अशा अवास्तव संकल्पना त्याला उपयुक्त व तारक न ठरता, धोकादायक व मारक ठरू शकतील.
चमत्कारांचे आकर्षण का ?
मग प्रश्न असा उद्भवतो, की अगणित लोक आपल्या मनातील अवास्तव श्रद्धांना कवटाळून का बसतात? या प्रश्नाचे एक उत्तर असे, की आपल्या मनातील श्रद्धा जरी अगदी वेडगळ असल्या, तरी काहीतरी चमत्कार घडून येऊन, त्या श्रद्धांमुळे आपली हरएक त-हेची उद्दिष्टे चुटकीसरशी साध्य होतील, अशा भ्रामक आशेवर जगणे त्यांना पसंत पडते. अशी माणसे, कसलातरी चमत्कार घडून येऊन आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त होतील, यावर विश्वासून राहतात; कारण त्यांना कष्ट करून, निढळाच्या घामाने, आपली उद्दिष्टे साध्य करून घेण्याची कल्पनादेखील असह्य वाटते. उलट, एकदा चमत्कारावर विश्वास ठेवला, की आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, सातत्याने परिश्रम वगैरे करीत राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!
असंख्य माणसांना स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, सर्व मनोबळ एकवटून प्रयत्न करणे, कमालीचे तापदायक वाटते. खरे पाहता, त्यांना नेटाने प्रयत्न करून, आपल्या मानसिक अस्वास्थ्यावर व अनिष्ट वर्तनावर मात करणे शक्य असते. परंतु मानसिक शांती आणि उपयुक्त व निरोगी सवयी आत्मसात करून घेण्यासाठी, त्यांना खडतर, कष्टदायक मार्ग नकोसा वाटतो. म्हणूनच तर ती माणसे चमत्कारावर चटकन विश्वास ठेवण्यास उद्युक्त होतात. दुर्दैवाने असे चमत्कार घडून येत नसतात. परंतु तरीही चमत्कार घडवून आणण्यासाठी त्यांची घोडदौड चालूच राहते.
४४डी/११६, मनीषनगर, जयप्रकाश मार्ग, अंधेरी (प.), मुंबई ४०० ०५३.
भूमिकांचा तिढा आणि ‘तिढ्या’चा ‘वेध’ !
[ दि. १७ एप्रिल २००६ ला लोकसत्ता मध्ये, ‘वृत्तवेध’ या सदरात ‘भूमिकांचा तिढा’ हे टिपण प्रकाशित झाले. ]
भूमिकांचा तिढा
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आमिर खान, संवेदनशील कलावंत अतुल कलकर्णी आणि राहुल बोस व इतर काही कलावंतांनी नवी दिल्ली येथे जाऊन नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यापूर्वी आमिरने भोपाळ वायुग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याबद्दलही जाहीरपणे खेद व्यक्त केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुतांश कलावंत एका वेगळ्याच विश्वात जगत असतात. सामान्य जगाशी त्यांना देणे-घेणे नसते आणि स्वतःपलीकडचे जग त्यांना दिसत नाही असे सर्वसामान्य चित्र आहे. अशा वातावरणात आमिरसारखा लोकप्रिय अभिनेता एखाद्या विषयावर ठामपणे भूमिका घेतो हे चित्र तसे दुर्मिळ आणि त्याची प्रतिमा अधिक उजळ करणारे आहे, परंतु कलावंत जेव्हा एखाद्या आंदोलनात सक्रिय सहभागी होतात तेव्हा सामाजिक बांधिलकीच्या तिढ्यांची गुंतागुंत अधिकच वाढतेसुद्धा. अनेक चित्रपट कलावंत “दिखाऊ’ सामाजिक उपक्रमात सहभागी होताना दिसतात आणि आपल्या या ‘समाजसेवेचे’ भांडवल करतानाही दिसतात. आमिर खान, अतुल कुलकर्णी किंवा राहुल बोस या कुणाच्याच स्वभावात दिखाऊगिरी बसत नाही. आपले चित्रपट, आपल्या भूमिका याविषयी बोलताना किंवा सामाजिक प्रश्नाांची चर्चा करताना या सगळ्यांच्या उत्तरांमध्ये प्रगल्भता जाणवते. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनातील कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हे कलावंत तिथे प्रत्यक्ष गेले आणि काही काळ त्यांच्यात सहभागीही झाले, त्यामुळे एक वेगळा तिढा निर्माण होऊ शकतो. नर्मदा आंदोलनाला मोठा इतिहास आहे आणि हा प्रश्नही खूप चिघळला आहे. नर्मदा धरणाची उंची, त्यामुळे होणारे विस्थापन, या धरणामुळे होऊ घातलेले नुकसान याविषयी आत्यंतिक तळमळीने व मनापासून विरोधी भूमिका घेणारे खूपजण आहेत. त्याचप्रमाणे या धरणाच्या बाजूने बोलणाऱ्यांमध्येही अनेकजण असे आहेत की, ज्यांच्या हेतूविषयी संशय घेण्यास जागा नाही. अशा प्रकारच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन स्वतःची सामाजिक प्रतिमा निर्माण करण्याची धडपड करणारेही अनेकजण आहेत. चंगळवादविरोधाची भाषा करत पंचतारांकित जीवन जगणारी ‘साधी माणसे’ तर सामाजिक आंदोलनाच्या आसपास हमखास वावरताना दिसतात. गरिबीपोटी झोळी घेऊन फिरणाऱ्या विस्थापितांना पाठिंबा दर्शविण्यासाठी ‘रस्त्यावर’ येणारी ही मंडळी स्वतः ‘डिझायनर झोळ्या’ घेऊन वावरत असतात. कलावंत म्हणून आपल्या निष्ठा जपणाऱ्या व्यक्ती अनेकदा एखाद्या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन अशा “दिखाऊ पुरोगाम्यां’च्या गळाला लागण्याची भीती असते. आमिर खानने आंदोलनकर्त्यांसोबत बैठक मारल्यावर साहजिकच त्याच अनुषंगाने त्याच्या शीतपेयाच्या जाहिरातीत काम करण्याचा प्रश्न निर्माण झाला. या शीतपेयाच्या कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध केरळमध्ये मोठे लोकआंदोलन सुरू आहे. ‘उत्पादने आणि त्याची जाहिरात या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.’ असे उत्तर आमिरने त्या प्रश्नाला दिले. याच धर्तीवर ‘धरणाचे बांधकाम आणि विस्थापितांचे पुनर्वसन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.’ असे कुणी म्हटले तर आमिर काय करणार ? आमिर खान अथवा अतुलसारखा एखादा अभिनेता स्वयंप्रेरणेने अथवा संवेदनशीलतेपोटी आंदोलनात ‘पाहुणा आंदोलक’ म्हणून जातो. सामान्य आंदोलनकर्त्यांना कोणीही फार खोलात जाऊन आंदोलनाविषयी प्रश्न विचारत नाहीत. मात्र आमिरसारख्या ‘सेलिब्रिटीज’ना तसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यांची उत्तरे देताना त्यांची भंबेरीही उडू शकते.
आमिर अथवा अतुल यांची प्रतिमा, जे त्यांना प्रत्यक्ष ओळखतात त्यांना ठाऊक असलेली त्यांच्या स्वभावातील पारदर्शकता यामुळे या दोघांच्या भूमिकेवर दांभिकतेचा आरोप कोणीच करणे शक्य नाही. परंतु जी भूमिका केवळ ‘पाहुणा’ म्हणूनच ते करू शकतात, ती करण्याची त्यांना खरेच गरज आहे काय, असा प्रश्न पडतो. कलावंतांनी राजकीय, सामाजिकदृष्ट्या सजग असले पाहिजे हे खरे आहे. मात्र या ‘वलयांकित’ कलावंतांनी एकदा आंदोलनात ‘सक्रिय सहभागी व्हायचे ठरवले तर अनेक अनपेक्षित प्रश्न पुढे येऊ शकतात. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सामाजिक संवेदना, सामाजिक बांधिलकी, वैचारिक स्पष्टवक्तेपणा दाखविण्याचे प्रत्येकाचे एक क्षेत्र असते. आमिर, अतुल हे जातिवंत कलावंत आहेत, त्यांनी त्याच माध्यमातून आपली बांधिलकी व्यक्त केली तर ते अधिक श्रेयस्कर म्हणता येईल. आमिरने नर्मदा आंदोलनाला पाठिंबा दिल्याबरोबर त्याच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाची पोस्टर्स फाडण्याचे उपद्व्याप करणाऱ्या तसेच या चित्रपटावर बहिष्कार घालणाऱ्या गुजराती चाहत्यांच्या कृतीने या प्रश्नाची राजकीय बाजू लगेचच पुढे आली. अशा अरेरावी पद्धतीने नर्मदा धरणाचा पुरस्कार करणारे गुजराती उच्चभ्रू आणि धनदांडगे याच धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांबद्दल अवाक्षरही बोलायला तयार नाहीत, ही बाबच त्यांच्या संवेदनशीलतेची पातळी अधोरेखित करणारी आहे. मोठी धरणं हवीत असं म्हणून त्यांचा पुरस केला पाठिंबा देणं हे समजण्यासारखं आहे. पण त्यामुळे विस्थापित होणाऱ्यांचं पुनर्वसन करण्याची सरकारी पातळीवरून जी टाळाटाळ होते आहे, त्याबद्दल ते भूमिका का नाही घेऊ शकत? विस्थापित होणाऱ्या तळागाळातल्या लोकांचा आवाज बंद करून किंवा न ऐकल्यासारखं करून विकास होण्यापेक्षा त्यांना नुकसानभरपाई दिली गेली पाहिजे, अशी भूमिका का नाही घेतली जात? निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची, तिच्यावर प्रभाव टाकण्याची या वर्गात जर क्षमता आहे, तर ती ते अशा पद्धतीने थोडी तरी का वापरत नाहीत? आज आमिर खानविरोधात जे उच्चभ्रू गुजराती तावातावाने बोलत आहेत ते एवढ्यात हेही विसरले की याच आमिरने गुजरातमधल्या भूकंपग्रस्तांसाठी २५ लाख रुपये स्वतःच्या खिशातून काढून दिले होते? आमिर खान, अतुल कुलकर्णी आदी कलावंतांनी नर्मदा धरणाबाबत ही भूमिका घेतली, विस्थापितांबाबत सहानुभाव व्यक्त केला याचा अर्थ त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या धरण, पर्यायी विकास या सगळ्यासंदर्भातल्या भूमिकेला पाठिंबा दिला असा लगेचच घेण्याचं काही कारण नाही. उच्चभ्रू गुजरातींनी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांनी मात्र सहानुभूती व्यक्त करण्याची संवेदनशीलता दाखवलेली नाही. मोदी ज्या परंपरेतून आले आहेत, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गोविंदाचार्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा पुनर्वसनाच्या मुद्द्यावर मेधा पाटकर यांना पाठिंबा होता. पण त्यातल्या संवेदनेचा अंश मोदींपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. अन्यथा त्यांनी विस्थापितांच्या पुनर्वसनासंदर्भात बोलण्याऐवजी उपोषण जाहीर करून आपला उद्दामपणा, आपला दर्प जगजाहीर केला नसता. नर्मदा आंदोलकांचे सगळेच मुद्दे कायमच पटतील असं नाही. पण मोदी आणि कंपनी या आंदोलकांचा विस्थापितांच्या पुनर्वसनाचा एक मुद्दाही समजून घेऊ शकत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
[यावर अतुल कुलकर्णी यांचे उत्तर लोकसत्ता च्या पत्रव्यवहारात दि. १८ एप्रिल २००६ ला प्रकाशित झाले.]
‘तिढ्यां’चा ‘वेध’!
आमची भूमिका अगदी सोपी आणि नेमकी आहे. नर्मदा आंदोलनविषयीच्या तांत्रिक गुंतागुंतीबद्दल आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्याचा ऊहापोह संबंधित अभ्यासू व्यक्ती (दोन्ही बाजूकडील) करत आहेतच. या घडीला न.ब.आं.चा आणि आमचाही मुद्दा एककलमी आणि मानवतावादी आहे. ज्यांच्या जमिनी आणि घरे काढून घेण्यात आली आहेत, अशा शेतकरी आणि आदिवासींना ‘पीक घेण्यायोग्य जमिनी’ आणि ‘शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा प्राथमिक सुविधा असलेल्या ठिकाणी’ घरे देण्यात यावीत. विस्थापितांचे पुनर्वसन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे झालेले नाही, हे तेथे गेलेल्या सरकारच्या अधिकृत निरीक्षकांनीही मान्य केले आहे. विकास जरूर करावा. तो व्हावाच. परंतु त्यासाठी एकाही नागरिकाची ‘रोजीरोटी’ काढून घेतली जाऊ नये, इतका साधा मुद्दा आहे. काही जणांच्या आयुष्यातील अंधार तसाच ठेवून बहतेकांनी (म्हणजे शहरातील लोकांनी) आपल्या घरातील बटणे दाबन ती उजळवून टाकावीत का, हा मुद्दा आहे. भोपाळच्या बाबतीत शुद्ध पाणी आणि रासायनिक कचरा हटवणे हा मुद्दा आहे. यात कुठलाही ‘तिढा’ नाही आणि या आमच्या भूमिकेविषयी आम्हाला विचारलेल्या प्रश्नांनी आमची ‘भंबेरी’ उडण्याचा प्रश्न नाही. तशी ती उडाली नाही, हे गेले काही दिवस सर्वजण पाहत आहेतच. इतर कुठल्याही तांत्रिक गुंतागुंतीत आम्ही आणि न.ब.आं. चे लोकदेखील या क्षणी पडलेले नाहीत आणि म्हणूनच हा मुद्दाधिष्ठित पाठिंबा.
कोकाकोलाच्या बाबतीत आमिरच्या म्हणण्याचा गोषवारा असा, “जर लोकांना अशा कारखान्यांपासून नुकसान होत असेल, तर ते पूर्ण चुकीचे आहे आणि या बाबतीत मी कोकाकोलाच्या अधिकाऱ्यांशी बोलेन’ असे जाहीर विधान त्याने चौदा तारखेला केले होते आणि लगेच त्या विषयी माहिती गोळा करण्याचे काम त्याने सुरू केले आहे. काल पंधरा तारखेला, “कोकाकोलाशी माझे बोलणे चालू आहे’ असे विधान त्याने केले आहे, हे काय दर्शवते? ‘वृत्तवेध’च्या लेखकाने सुचवलेला बेजबाबदारपणा?
आम्ही ‘पाहुणे आंदोलक’ आहोत आणि त्याची गरज काय, असा प्रश्न लेखकाला पडला आहे. या आंदोलनाची संपूर्ण माहिती, त्यातील परस्परविरोधी, परंतु तितकेच प्रामाणिक दावे, त्यातील तांत्रिक गुंतागुंत, इत्यादी संदर्भात आमच्या सखोलतेच्या मुद्द्यावरून लेखक हे म्हणतो. अत्यंत दुःखद विधान. एकतर वर उल्लेख केल्याप्रमाणे यातील मानवतावादी मुद्दा आणि तोही पुराव्यासकट (अधिकृत) मान्य झाल्यावर आम्ही केवळ तोच मुद्दा या घडीला मांडत आहोत, जो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. कुठलाही सामाजिक प्रश्न घेतला (उदा. हिंदू-मुस्लिम) तरी त्यात खूप गुंतागुंत असायचीच. अनेक परस्परविरोधी पण प्रामाणिक दावे असायचेच. अन्यथा ते प्रश्न इतकी वर्षे चिघळते ना. पण मग सुसंस्कारित मनाला डाचणारे अत्यंत स्पष्ट आणि कुठलीही गुंतागुंत नसलेले मानवतावादी असेही काही मुद्दे असताततच. (उदा. हिंदू-मुस्लिम प्रश्नांमध्ये केल्या जाणाऱ्या हत्त्या) मग अशा मुद्द्यांविषयी सामान्य नागरिकाने भूमिका घ्यायचीच नाही? की शतकानुशतके चालू असलेल्या प्रश्नाविषयी संपूर्ण ‘अभ्यास’ होईतो थंड’ बसायचे. आजची राजकीय पक्षांची संख्या, त्यांच्या विविध प्रश्नांवरील परस्परविरोधी भूमिका, त्यातील अंतर्गत विसंगती, आरोप-प्रत्यारोप, एकूणच गोंधळ आणि गुंतागुंत यांचा विचार करता सामान्य नागरिकाला कुठल्याही पक्षाची संपूर्ण माहिती होणे अशक्य आहे. मग काय त्याने निवडणुकांमध्ये मतदान करायचेच नाही? ‘पाहुणा’ म्हणूनच आपल्या देशात राहायचे? नेमके याचमुळे देशातील ६० टक्के जनता मतदानही करीत नाही. ही वस्तुस्थिती सुधारायचा प्रयत्न वृत्तपत्र लेखकांनी करायचा की ‘पाहुणे आहात. तुम्हाला काय गरज’ असे म्हणून उदासीनता वाढवायला मदत करायची?
लेखकाचे आणखी एक धक्कादायक विधान असे की, आम्ही कलावंत आहोत आणि केवळ त्याच माध्यमातून आम्ही आमची बांधीलकी व्यक्त करणे श्रेयस्कर! वा!
अशा पद्धतीच्या दर्जेदार संहिता आल्या तर ती सुवर्णसंधी आम्ही नक्कीच सोडणार नाही, सोडत नाही. पण तोवर आम्ही नटांनी करायचे काय ? लेखक/दिग्दर्शक कधी आमच्या दारी वृत्तवेध लेखकाला अपेक्षित असलेली संहिता लिहून आणतो. याची वाट पाहत बसायचे ? रोजच्या रोज २० पाने आणि लाखो शब्द वापरायला मिळणाऱ्या माध्यमांमध्ये आम्ही नाही. किंबहुना देशातील ९९ टक्के जनता अशा माध्यमांमध्ये नसेलच. व्यापार, नोकरी, इतर असंख्य व्यवसाय, मोलमजुरी करणाऱ्यांनी केवळ आपल्याच माध्यमातून बांधीलकी व्यक्त करणे शक्य आहे काय? आणि मुळात तशी गरज आहे का ? की उपजीविकेचे साधन, आणि व्यक्त होण्याचे माध्यम एकच असणाऱ्या भाग्यवान लेखकाला इतर माध्यमांकडे लक्ष देण्यास आणि त्यांच्या मर्यादा जाणून घेण्यास वेळ नाही?
अर्थात (!) लेखकाने लेखात ‘आम्ही न.ब.आं.च्या सर्वच भूमिकांना पाठिंबा दिला आहे, असे मानण्याचे कारण नाही.’ अशी विधानेही केली आहेत. लेखामध्ये आमच्याविषयीच्या प्रेम, आदर, सहानुभूती इत्यादी भावनादेखील अत्यंत कळकळीने आणि वारंवार येतात हे खरेच, पण (!) मला काही मुद्दयांचे स्पष्टीकरण वाचकांपर्यंत पोहोचवावेसे वाटते हेही तितकेच खरे. या निमित्ताने मनापासून सांगावेसे वाटते की, नागरिक मग तो सर्वसामान्य असो की लोकप्रिय, त्याला अथवा तिला कुठल्याही सामाजिक, राजकीय विषयांबद्दल काही तीव्रतेने वाटले तर आपली उपजीविकेची साधने सांभाळून; तो किंवा ती जे काही करू शकेल ते उदासीनता आणि आळस सोडून जरूर करावे. सगळ्याच प्रश्नांबद्दल मत असू शकते, पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाविषयी ते व्यक्त होणे गरजेचे आहे, असे नाही. आपली व्यस्तता, रस असणारा विषय वगैरे गोष्टींचा विचार करून जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा सक्रिय प्रतिक्रिया द्यावी, ही कळकळीची विनंती. सर्वांना. कारण सरतेशेवटी संख्येला खूप महत्त्व आहे.
[मला कुलकर्णीची भूमिका पटते पण ‘वृत्तवेध’कारानेही जबाबदारीनेच बहुतांश लेख लिहिला आहे, हे जाणवते. सूर मात्र पुनर्वसनाचा मुद्दा ठसवणारा नाही सं.]