समूहाची बुद्धिमत्ता

कॉमनसेन्स हा व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा सहसा आढळत नाही, हा नेहमीचा अनुभव असताना समूहामध्ये त्याचा शोध घेणे हास्यास्पद ठरेल असे वाटण्याची शक्यता आहे. एखादी गर्दी उपयुक्त विचाराला जन्म देऊ शकते हे कधीच अपेक्षित नाही. गर्दीतील बहुमत व अविचारीपणा अनेक वेळा एकट्यादुकट्याला तोंडघशी पाडतात. जातीपंचायतीतील निर्णयाविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी आयुष्यातून उठावे लागते. श्रेष्ठींचा दबाव व दहशत, ही तर शाळाकॉलेजमधील तरुण-तरुणींना कायमचीच भेडसावणारी समस्या असते.
परंतु समूहाला शहाणपणाचा विचार अजिबात करता येत नाही अशी परिस्थिती नक्कीच नसावी. नोकरशाहीचा पाया सर्व छोट्या-मोठ्या समूहांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीवर व त्यास अनुसरून घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे. उत्पादनाचे विक्रीमूल्य ठरवताना वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या ज्ञानाचा व त्यावरून घेतलेल्या निर्णयाचाच पगडा असतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात समूहाच्या बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणे सहज सापडतील. सामाजिक व्यवहारातील सर्व क्षेत्रांत वापरात असलेले संगणकतंत्रज्ञान किंवा मोबाइल हे एकाच व्यक्तीने विकसित केलेले तंत्रज्ञान नसून अनेकांनी त्याच्यात भर घातलेली आहे. लिनक्स (Linux) ही संगणकप्रणाली तर हजारो संगणकसाक्षरांच्या योगदानाचे फलित आहे. अजूनही त्यात भर पडत आहे व ती विकसित होत आहे. गूगल, ई-बे सारख्या संगणकप्रणाली मूठभर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विकसित झालेल्या नसून त्यांचा वापर करणाऱ्यांनीच वेळोवेळी त्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. वापरणाऱ्यांचा फीडबॅक, त्यांच्या सूचना-सल्ला यावरून त्यात सातत्याने बदल करत त्या आजच्या प्रगत अवस्थेत पोचल्या आहेत. एनसायक्लोपिडियासदृश इंटरनेटवरील विकीपीडिया हा ज्ञानकोशसुद्धा वाचकांच्या प्रतिसादानुसार संकलित होत आहे. एकदाच लिहून तयार झालेल्या, शिळी माहिती असलेल्या इतर ज्ञानकोशातील सर्व उणिवा-दोष दूर केल्यामुळे विकीपीडिया हा नेहमीच अद्ययावत् माहिती देणारा ज्ञानकोश ठरत असून इंटरनेटचा तो संदर्भग्रंथ आहे.
उत्पादन तंत्रज्ञानात रोज काहीना काही नवीन भर पडत असल्यामुळे आधुनिक औद्योगिक व्यवहारात उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादनाला उठाव नसल्यास प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. मुळातच उत्पादनात काही उणिवा असल्यास ते ग्राहकांच्या पसंतीस पडत नाही व खप होत नाही. माल गोदामात पडून राहतो. एके काळी ग्राहकांची पसंती काय आहे, उत्पादनाचा दर्जा कसा सुधारता येईल, हेच उत्पादकांना कळत नसे. त्याचा शोध घेण्यासाठी फार मोठे भांडवल लागत असे. आज मात्र कम्युनिकेशन तंत्रज्ञानातील सोई-सुविधांमुळे ग्राहकांशी सतत संपर्क ठेवणे शक्य होत आहे. आधुनिक उद्योगव्यवहारात कम्युनिकेशनला सर्वांत जास्त महत्त्व आहे. किंबहुना कम्युनिकेशन हा उद्योग व्यवहाराचा कणा ठरत आहे. कम्युनिकेशन तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीमुळे उद्योग व्यवसायांना उधाण आले आहे. ई-मेल, न्यूज मेल, एसएमएस (SMS), एमएमएस (MMS), ब्लॉगर्स (bloggers) इत्यादी संपर्कसुविधा व्यवसायाचे स्वरूप बदलून टाकत आहेत. [bloggers, web-loggers या वृत्तीच्या लोकांसाठी वापरला जाणारा शब्द] या सुविधांमधून मिळत असलेल्या वास्तव व व्यवहारी फीडबॅकमुळे खरेदी-विक्री, उत्पादनाचा दर्जा, साधनसामग्रीचे वाटप, संशोधन-सुधारणा, पर्यावरण रक्षण, सुरक्षितता इत्यादी गोष्टीत फार मोठ्या प्रमाणात बदल घडवता येतात हे लक्षात येऊ लागले आहे. एकेकाळी या गोष्टी व्यवसाय व्यवस्थेची अंतर्गत बाब समजल्या जात होत्या. मूठभर तज्ज्ञांच्या बुद्धिमत्तेच्या भरवशावर निर्णय लादले जात होते. आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ग्राहकसमूहांकडून आलेल्या सूचना, सल्ले, फीडबॅक, तक्रारी, यांची दखल घेणे गरजेचे भासत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जात आहे. तंत्रज्ञानामुळे होत असेलली माहितीची जलद देवाण-घेवाण, तिचे विश्लेषण, त्यावरून काढलेले निष्कर्ष व्यवसायाला कलाटणी देऊ शकतात. समूहाच्या विचार करण्याच्या क्षमतेचेच हे फळ आहे, हे निश्चित. इंटरनेटवर टीकाटिप्पणी करणाऱ्या ब्लॉगर्सचेही या व्यवहारात फार मोठे योगदान आहे. त्यांचा फीडबॅक एक प्रकारे समूहाचीच बुद्धिमत्ता असते. ग्राहकांचे फीडबॅक, ब्लॉगर्सची उत्पादन/सेवा यांबद्दलची (तिखट!) प्रतिक्रिया व तंत्रज्ञान इत्यादींमुळे उत्पादनाशी निगडित सर्वांना माहितीची देवाणघेवाण करणे सहज शक्य होत आहे. कदाचित व्यवसायाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत असावे. विक्रीचा अंदाज, विक्रीपश्चात सेवा, सेवेचा कालावधी, सुरक्षित वापर, अपेक्षित बदल इत्यादीसंबंधी निर्णय घेऊन लागू करणे शक्य होत आहे. सर्जनशीलता, लवचीकता जपत उत्पादनांत सुधारणा शक्य आहे. उत्पादनाच्या निर्णयप्रक्रियेत ग्राहकसमूह अप्रत्यक्षरीत्या भाग घेत आहेत. समूहाची बुद्धिमत्ता व्यवस्थापनांना मार्ग दाखवत आहे. यातून केवळ उत्पादन वा सेवाव्यवसायच नव्हे तर टीव्ही-नियतकालिकांसारख्या प्रसारमाध्यमांनासुद्धा आपल्यात सुधारणा करून घेणे शक्य होत आहे. समूहाची बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील सोई-सुविधा वापरून माहितीचे वितरण करण्यातील मक्तेदारी मोडून टाकत आहे. समूहातील अनेकजण निष्णात वार्ताहरासारखी परखड मते देऊ शकतात. त्यांच्याकडे सूक्ष्म निरीक्षणशक्ती असते. त्यांच्याकडे प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान असल्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले मत कधीच टाकावू ठरत नाही.
नेटवर्किंग तंत्रज्ञानातील या सुविधा अनेक एकाधिकारी शासनांना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे आवडो न आवडो, आपले प्रशासन लोकाभिमुख आहे हे पटवण्यासाठी काही पावले उचलावी लागत आहेत. लोकशाहीचा मुखवटा चढवावा लागत आहे. काही प्रशासनांना अशा निर्भीड मतप्रदर्शनाची सतत भीती वाटत असते. त्यामुळे अनेक वेळा या सुविधा वापरण्यावर निर्बंध घातले जातात.
लोकशाहीतील निवडणूकप्रक्रियेचा चेहरामोहराही या सुविधा बदलत आहेत. उमेदवारांना इंटरनेटवर, तात्पुरते का होईना, एक संकेतस्थळ उघडावे लागत आहे. या संकेतस्थळावर (खरी-खोटी!) माहिती उपलब्ध असल्यामुळे सुजाण मतदार प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो व समूहातील इतरांना सावध करू शकतो. मोठमोठ्या प्रचारसभा, होर्डिंग्ज, पत्रके, प्रत्यक्ष भेटीगाठी याऐवजी (किंवा याबरोबर !) इंटरनेटवरील आह्वान जागृत मतदारांपर्यंत नेमकेपणाने पोचते.
ब्लॉगिंग, एमएमएस इत्यादींमधील विधाने, फार प्रामाणिक व उच्च प्रतीची आहेत, असा गैरसमज करून घेण्यातही अर्थ नाही. या सोई-सुविधांचा दुहेरी हत्याराप्रमाणे चांगल्या व वाईट या दोन्ही गोष्टीसाठी वापर होऊ शकतो. येथेही फार मोठ्या प्रमाणात लबाडी होऊ शकते. आपल्या येथेही एसएमएस-सर्वेक्षणाचे लोण पोचले आहे. कुठल्याही प्रश्नावर एसएमएस करा, असे आवाहन वृत्तपत्र व टीव्हीच्या माध्यमातून केले जाते. निष्कर्षांना प्रसिद्धी दिली जाते. एसएमएसवरील सर्वेक्षण वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग बनत आहे, ह्यामुळे त्यातही मतलबी व वाईट प्रवृत्तीचे लोक शिरून गोंधळ घालत आहेत. चांगला गायक होण्यासाठी चांगला गळा, गायनाबद्दलची जाण, परिश्रम एवढेच पुरेसे नसून आपल्या बाजूने एसएमएसवरून मत पाठवणाऱ्या मोठ्या समूहाची गरज आहे. आपल्या राज्याचा, भाषेचा, किंवा जाती-धर्माचा म्हणून एसएमएसचा मारा केला जात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सौंदर्यस्पर्धांचे निष्कर्ष एसएमएसच्या चाचणीवरून ठरत आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या उत्पन्नात खोट आणण्यासाठी टोकाची मते पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समूहाच्या बुद्धिमत्तेचा नियोजनपूर्वक उपयोग करून घेतल्यास त्यातील उणीवा व किचकटपणा दूर करणे शक्य आहे. समूहाच्या सकारात्मक गुणविशेषांना-मतामतांतील वैविध्य, मत मांडण्याचे स्वातंत्र्य व धारिष्ट्य, विकेंद्रीकरण इत्यादींना उत्तेजन देत राहिल्यास समूहाने घेतलेला निर्णय तज्ज्ञांच्या निर्णयापेक्षा वरचढ ठरू शकेल. समस्यांचे वैशिष्ट्य, व्याप्ती व समूहाचा आकार यांचाही निर्णयावर परिणाम होऊ शकतो.
समूहाची निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या समांतर प्रक्रिया (पॅरलल प्रोसेसिंग) करणाऱ्या संगणकांच्या नेटवर्कसारखी असते. जटिल व गुंतागुंतीच्या समस्यांनासुद्धा समूहाची निर्णयप्रक्रिया समाधानकारक उत्तरे शोधू शकते, पण त्यातील सातत्य टिकवण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही. या सोई-सुविधा समाजाच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम करत आहेत, व समाजव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून टाकत आहेत.
८, लिली अपार्टमेंट, वरदायिनी सोसायटी, सूस रोड, पुणे ४११ ०२१.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.