आपल्या अस्तित्वाचे गूढ (The mystery of our being – Max Plank )

विज्ञानाचे एक यश म्हणजे चमत्कारांविषयी मानवी श्रद्धेला मर्यादा निर्माण होणे, असे आपण सहजच गृहीत धरतो. पण असे काही घडल्याचे दिसत नाही. गूढ शक्तींच्या क्षमतेवर विश्वास असणे हे आजच्या काळातही आहेच. गूढविद्या आणि अध्यात्माच्या अनेकानेक प्रकारांची लोकप्रियता पाहिली की हे दिसून येते. विज्ञानातून निघणारे निष्कर्ष अगदी कुतूहलशून्य असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या नजरेतूनही सुटणे अशक्य आहे. तरीही शिक्षित व अशिक्षित माणसे, अनेकदा, त्यांच्या जीवनातल्या सामान्य प्रश्नावर प्रकाश पडावा म्हणून गूढ व धूसर प्रदेशात शिरतात. एखादा म्हणेल, की अशा प्रश्नासाठी मी तरी विज्ञानाचाच आधार घेईन. हे साधारणपणे खरे असावे, की पूर्वीच्या काळी आजच्या माने कमी लोकांनी विज्ञानाच्या बाजूने कौल दिला असता व हे कौल देणारे लोक, विज्ञान या विषयाकडे जास्त कल असलेलेच असणार. तरीही, विवेकशून्य (irrational) मार्गांचे आकर्षण हे पूर्वीइतकेच घट्ट व सर्वत्र पसरलेले आहे ; जास्त नसेल कदाचित, पण ते पूर्वीइतके नक्कीच आहे.
या वैशिष्ट्यपूर्ण वस्तुस्थितीचे खुलासेवार समाधान कसे करावयाचे ? अगदी चमत्कारिक, तर्कदुष्ट बाह्यरूप दर्शविणाऱ्या गोष्टींबद्दलचे आपले आकर्षण आणि विश्वास, त्यांच्या-आपल्या अंतरातच असणाऱ्या एखाद्या बळकट पायावर तर आधारलेले नाही ? मानवी अस्तित्वाच्या मुळाशी, त्याच्या गाभ्यातच, विज्ञानाला अस्पर्श असणारे एखादे विश्व तर अस्तित्वात नसेल? मानवी कृतींच्या उगमाकडे आपण जसे जाऊ लागतो तसे, विज्ञानाचे उत्तर अंतिम असत नाही असे तर आपले मत नाही? किंवा जास्त नेमकेपणाने बोलायचे तर, कारण/कार्य विचाराचे कार्य ज्या एका ठराविक बिंदूशी संपते व ज्याच्या पलीकडे ते सरकतच नाही, असा एखादा बिंदू तर अस्तित्वात असत नाही ?
हे विवेचन, मुक्त इच्छाशक्तीच्या मुळाशी आपल्याला पोचविते. मी वर विचारलेले प्रश्नच आपोआप याचे उत्तर आपल्याला सुचवतील.

वस्तुस्थिती अशी आहे की, मन आणि भौतिक जगाच्या या अमर्याद पसाऱ्यात विज्ञानाची कसोटी व म्हणूनच एकूणच कार्यकारण भावातून निर्मित संशोधन लागू पडत नाही असा एक बिंदू असतोच. हे व्यावहारिक पातळीवरच नव्हे तर तार्किक पातळीवरही खरेच आहे व ते तसेच राहील. हा बिंदू म्हणजे स्वतःची ‘मी’पणाची जाणीव. ही जाणीव एकूण जगाच्या अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर नगण्यच. पण जाणिवेच्या स्वतःच्या विश्वात मात्र ते एक स्वतंत्र जगच असते, ज्यात आपल्या भावनांचे जग, आपल्या इच्छा-आकांक्षा आणि आपले विचारविश्व अस्तित्वात असते. हे आपले जे ‘मी’पण आहे, ते एकाच वेळी आपल्या जीवघेण्या तीव्र दुःखाना व वेदनांना जन्म देते तसेच आपल्या उच्चतम सुखांनाही. या ‘मी’पणाच्या विश्वावर, बाह्य जगाच्या शक्तींचा काहीच अधिकार चालत नाही. आपला स्वतःवरील ताबा व त्याचे उत्तरदायित्व, जीवनाच्या विसर्जनाबरोबरच आपण सोडत असतो.
इच्छास्वातंत्र्याचा प्रश्न इथेच निर्माण होतो व हे स्वातंत्र्य विरोधकांचा हक्क अबाधित ठेवून स्वतःची स्थापना करू पाहते. या गुलामगिरीतून एकदा सुटका झाली (आपली इच्छा स्वतंत्र झाली) की, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या अंतर्विश्वात कुठलीही चमत्कृतिपूर्ण पार्श्वभूमी, परिस्थिती आपण निर्माण करू शकतो व त्याच वेळी आपण जगातले अगदी कठोर, काटेकोर शास्त्रज्ञही असू शकतो व कार्यकारणाच्या तत्त्वाचे खंदे समर्थकही. ‘मी’ भावाच्या या अंतिम, केवळ अधिकारापोटी चमत्कारावरील विश्वास निर्माण होतो. सर्वत्र दूर पसरलेली जीवनाविषयीची विवेकहीन भाष्ये व कार्यकारणाचे तत्त्व या विश्वासामुळेच ‘मी’ भावाच्या पलीकडे जाऊच शकत नाहीत. इतक्या प्रकारे वैज्ञानिक प्रगती होऊनही चमत्कारावरील मानवी विश्वास मी उल्लेखिल्याप्रमाणे हेच दर्शवितो. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, हरक्षणी, ‘मी’ भावास असलेले कार्यकारण- तत्त्वापासूनचे मुक्त स्वातंत्र्य हे मानवी जाणिवेमधून आपोआप, सहजच निर्माण होते.

आपल्यासाठी चालू क्षणात असलेले सत्य हे आपल्या आजच्या क्षणाइतकेच आपल्या वर्तमानात व भावी काळातीलही सत्य राहणार आहे. कारण आजचे आपले ‘मी’पण भावी काळावर परिणाम करणार आहे. भविष्यकाळाची वाटचाल वर्तमानातूनच तर सुरू होते. आमच्या ‘मी’ भावाचा भविष्यकाळातील प्रवेश, हरक्षणी चालूच असतो. आणि याच कारणापायी एक व्यक्ती स्वतःच्या भवितव्याविषयीचा विचार करताना तो पूर्णपणे आणि शुद्ध कार्यकारणभावानुसार करूच शकत नाही. याचमुळे चमत्कृती भविष्याच्या रचनेत नेहमीच आपले पाय रोवते. या महत्त्वपूर्ण वस्तुस्थितीची पटलेली खात्रीच त्यांना हस्तसामुद्रिक आणि ‘तिसरा डोळा’ व अतींद्रिय शक्ती असणाऱ्या लोकांकडे जाऊन, स्वतःच्या भविष्याबद्दलचे कुतूहल शमविण्यास उद्युक्त करते. वस्तुस्थितीतून स्वप्ने निर्माण होतात, आदर्श ठरतात आणि यातच, मानवास अत्यंत समृद्ध स्फूर्तिस्थानेही गवसतात.

विज्ञान (आणि कार्यकारणभाव) आपल्याला कुठल्याही परिस्थितीच्या उंबरठ्याशी, प्रवेशद्वारी आणून सोडते आणि नंतर आपल्या-आपणावर सोडून देते. दुसऱ्या हाती सोपवून आपला निरोप घेते. आपल्या आयुष्याच्या वाटचालीत कार्यकारण विचाराचा फार उपयोग होतो अशातलाही भाग नाही. तर्कशुद्धतेच्या पोलादी चौकटीमधील सातत्य, आपल्याला आपल्या आयुष्याची कार्यकारणभावाच्या मार्गाने पायाभरणी करण्यात अडथळे निर्माण करते व आपले भवितव्य आपल्या वर्तमानातूनच निष्पन्न होणार आहे याची जाणीव कमी करते.

पण दैनंदिन जीवनासाठी मानवास काही मूलभूत सिद्धान्तांची गरज असते आणि ही गरज वैज्ञानिक ज्ञानाविषयीच्या आपल्या भुकेपेक्षा जास्त तातडीची असते. एखादी कृतीही, मानवाच्या दृष्टीने जगाच्या एकत्र केलेल्या सर्व शहाणपणापेक्षा महत्त्वाची असण्याची शक्यता अनेक वेळा असते व म्हणूनच निव्वळ, फक्त एकमेव बुद्धिवादापेक्षा आणखी एखादा मार्गदर्शक स्रोत अस्तित्वात असलाच पाहिजे असे वाटल्याशिवाय रहात नाही. कार्यकारणभाव हा विज्ञानाचा मूलमंत्र आहे. मात्र कर्तव्याची जाणीव हा निश्चित, अटळ व जीवनाचा मार्गदर्शक नियम आहे. येथे बुद्धीची जागा, व्यक्तिमत्त्वास देणे भाग आहे. आणि वैज्ञानिक ज्ञानास ही जागा आध्यात्मिक श्रद्धांना द्यावी लागेल. आध्यात्मिक श्रद्धा हा शब्द येथे मी, त्याच्या मूळ अर्थाच्या दृष्टीने वापरत आहे. या शब्दाच्या वापरामुळे खूप चर्चा झालेला विज्ञान व अध्यात्म यांच्यातील संबंध याकडे आपण पोचतो. या प्रश्नाची चर्चा करण्याची ही जागा नव्हे. माझा तो अधिकारही नाही. अध्यात्माचे क्षेत्र कार्यकारणभावाच्या पलीकडचे असल्याने विज्ञानास त्याचे दरवाजे बंद आहेत. शास्त्रज्ञाने शास्त्रज्ञ म्हणून, अध्यात्मास अध्यात्म म्हणून मान्यता दिलीच पाहिजे. मग ते कुठल्याही प्रकारचे का असेना. फक्त विज्ञानाचा बाह्य विश्वाचा सर्वशोध, ज्या कारण-कार्याच्या क्रमशीलतेत असतो, त्याच्या विरुद्ध, अशा अध्यात्माने स्वतःच्या प्रतिपादनात सातत्य राखून कार्यकारणभावास विरोध करता कामा नये. तो वैज्ञानिक आधारासारखाच अढळ असला पाहिजे. अध्यात्म, धर्म व विज्ञान या प्रश्नांचा विचार करताना असेही म्हणण्यास हरकत नाही की जीवनालाच नाकारणारे अध्यात्म, वैज्ञानिक दृष्टिकोन व त्यातील तत्त्वांचे दृष्टीने विजातीय आहे. जीवनाच्या स्वतोमूल्यास दिलेला नकारासाठी नकार, हा मानवी विचारविश्वास दिलेला नकारच म्हणावा लागेल.

म्हणूनच, हा नकार हा विज्ञानाच्या मूलाधारांनाच नव्हे तर सरतेशेवटी धर्म व अध्यात्म ह्यांनाही दिलेला नकारच होय. बरेचसे शास्त्रज्ञ या गोष्टीशी सहमत होतील असे वाटते. आध्यात्मिक नकारवाद हा विज्ञानालाच मारक असल्याचे त्यांना बहुधा मान्य होईल.

अध्यात्म आणि विज्ञान यात खरा परस्परविरोध असणे अशक्य आहे. प्रत्येक प्रौढ व गंभीर व्यक्तीला ही जाणीव असतेच की, त्याच्या स्वतःतील आध्यात्मिक बीज त्याने जाणले पाहिजे. त्याला खतपाणी घातल्याशिवाय, मानवी आत्म्याकडे असणाऱ्या अनेकानेक शक्ती, एकरूपतेने आणि संतुलित स्वरूपात वापरणे त्याला शक्य होणार नाही. अगदी खरे सांगायचे तर सर्व काळातले थोर आणि मोठे विचारवंत हे गंभीर आध्यात्मिक व्यक्ती व आत्मे होते, ही काही अपघाताने घडलेली गोष्ट नव्हती. त्यांनी जरी या गोष्टींचे प्रदर्शन केले नसले तरी ही वस्तुस्थितीच होती. इच्छाशक्ती आणि समज यांच्या सहकार्यातूनच नीतिशास्त्राचे उत्तम फळ तत्त्वज्ञानाच्या वेलीवर आले आहे. जीवनाचे नीतिमूल्य विज्ञान वाढवते कारण विज्ञानातून सत्याबद्दल प्रेम निर्माण होते आणि आदरही. प्रेम अशासाठी की, निरंतर शोधांमुळे आपल्या मनातील विश्व व आपल्या सभोवतालचे भौतिक विश्व यांचेविषयीच्या निश्चित ज्ञानाचा पाठपुरावा केला जातो आणि आदर अशासाठी की, ज्ञानाच्या मार्गावरील प्रगत वाटचाल, आपल्या अस्तित्वाच्या गूढाशी आपली समोरासमोर व थेट गाठ घालून देते. “शुद्ध तर्कवाद्यास येथे थारा नाही” (प्लँक व मर्फी यांच्यातला संवाद/चर्चा) प्लँक : अनेक व्यक्ती शोधत असलेला आध्यात्मिक आधार पुरविण्यात चर्च अयशस्वी होत असल्याचे आपल्याला जाणवते. परिणामी लोक वेगळ्या दिशांना पाहू लागतात. सुसंघटित धर्म लोकांना योग्य ते आवाहन करण्यात, स्फूर्ति देण्यात कमी पडतो. यातली अडचण अशी असावी की हे आवाहन, ज्याला श्रद्धा म्हणतात त्या विश्वास ठेवण्याच्या तयारीला असते. सर्वत्र पसरलेल्या विश्वासाच्या वातावरणात या आवाहनास मिळणारा प्रतिसाद स्वाभाविकपणेच शबल असतो. परिणाम म्हणजे खूपसे सुचविणारे अनेक गुरू निर्माण होतात. मी : या आधाराच्या शोधात, विज्ञान धर्मास पर्याय होऊ शकेल ? प्लँक : संशयी मनाच्या व स्वभावाच्या व्यक्तीस नाही. कारण विज्ञानातसुद्धा विश्वासाची तयारी ही असावीच लागते. गंभीररीत्या वैज्ञानिक कामात पडणाऱ्या व्यक्तीस जाणवते की, विज्ञान-मंदिराच्या प्रवेशद्वारावर “तू श्रद्धावान असला पाहिजेस’ असे शब्द कोरलेले असतात. हा गुणधर्म शास्त्रज्ञ सोडूच शकत नाहीत.
जो मनुष्य अनेकानेक प्रयोगातून काढलेल्या अनेक निष्कर्षांचा वापर करीत असतो, ज्या नियमांचा पाठपुरावा करीत असतो, त्या नियमाचे कल्पनाचित्र त्याच्यासमोर असावेच लागते. त्याच्यापासून एक अभ्युपगम तयार झाला पाहिजे. निव्वळ कार्यकारणभाव त्याचे एक पाऊलही पुढे सरकू देणार नाही. कारण त्याग (elimination) व निवड यांच्याशिवाय व मनात रचनात्मक बुद्धी असल्याशिवाय अनेकानेक निष्कर्षांच्या गोंधळातून एखादी व्यवस्था, रचना निर्माण होऊ शकणारच नाही. आपल्या संकल्पचित्रातून अपेक्षित रचना निर्माण करण्याच्या प्रयत्नात, त्यांचा टाकाऊपणा पाहून, अनेक वेळा प्रयत्न सोडून, पुन्हा नवी नवी संकल्पचित्रे तयार करावी लागतात आणि तपासावी लागतात. ही दर्शनक्षमता व अंतिम यशावरील श्रद्धा, प्रत्येक संशोधकास अटळच असते. तर शुद्ध तर्कवाद्यास येथे थाराच नाही. मी : थोर शास्त्रज्ञांच्या चरित्रांत वरील घटनेची पडताळणी कितपत झाली आहे ? उदाहरणार्थ, आपण केप्लर(Kepler)चा विचार करू. त्यांची ३०० वी पुण्यतिथी आपण साजरी केली. आइनस्टाइनने त्या वेळी अॅकॅडेमी ऑफ सायन्समध्ये एक व्याख्यान दिले होते. तुम्हाला आठवत असेलच. त्यांच्या भाषणात केप्लरने लावलेल्या काही शोधांचा उल्लेख होता. केप्लर प्रत्यक्षात मद्याच्या बॅरल्सच्या मोजमापांचा अभ्यास करीत होता. अशासाठी की, कमीतकमी खर्चात ही बॅरल्स व्हावीत म्हणून त्यांचे मोजमाप काय असावे याचा विचार तो करत होता. पण तो कुठलीही विशिष्ट रचनात्मक प्रतिभा वापरत नसताना त्याने लावलेले शोध लागले. प्लँक : असल्या कथा सर्वच प्रसिद्ध व्यक्तींच्या भोवती गुंफल्या जातात, पसरतात. खरे सांगायचे तर केप्लर मी जे म्हणतो त्याचे उच्चतम उदाहरण आहे. त्यांच्याकडे कायमच चणचण असायची. एकामागोमाग एक भ्रमनिरास त्याला सहन करायला लागायचे. एवढेच नाही तर त्याच्या पगाराच्या थकबाकी वसुलीसाठी रेगन्सबर्ग येथे, रिस्टागमध्ये, त्याला भीक मागणे भाग पडायचे. त्याच्या स्वतःच्या आईवर ती चेटूक करते म्हणून झालेल्या खटल्यांत तिची सफाई देण्याची पाळी त्याच्यावर आली. पण त्याच्या चरित्राचा अभ्यास केला की त्याच्यात दिसलेली जोरदार ऊर्जा, कंटाळ्याचा अभाव, यातून निर्माण झालेली त्याची बहुप्रसवता, हे त्याच्या विज्ञानावर असलेल्या श्रद्धेचे फलित होते असे दिसते. गणिती पद्धतीने होऊ शकणारी सिद्धता त्याच्या खगोलविषयक निरीक्षणांची नव्हे, तर सर्व निर्मितीच्या मागे असणाऱ्या निश्चित योजनेच्या अस्तित्वावर असलेली त्याची दृढ श्रद्धा त्याच्या कामामागे होती. त्याचे कारण विश्वातील योजनेवरील त्याचा विश्वास हे होते. आपले श्रम सार्थकी लागताहेत अशी त्याची खात्री होती, त्यामुळे त्याची श्रद्धा कधी डळमळली नाही. त्याच्या कामाने त्याच्या कष्टदायक जीवनास बळ दिले आणि त्याचा मार्ग उजळला.

टायको द ब्राहे (Tycho de Brahe) आणि केप्लरची आपण तुलना करूया. ब्राहेकडे केप्लरकडे असलेली सामुग्रीच होती. त्याला संधी थोड्या ज्यादाच होत्या. पण तो केवळ संशोधकच राहिला. त्याचे कारण म्हणजे, त्याची निर्मितीच्या शाश्वत नियमांवर केप्लरसारखी श्रद्धा नव्हती. परिणामी ब्राहे निव्वळ संशोधकच राहिला, तर केप्लर नवखगोलशास्त्राचा पिता बनला. इथे मला दुसरे एक नाव आठवते. जूलियस रॉबर्ट मेयर (ग. ठ. चशूशी) याचे. त्याचे शोध (दीर्घकाळ) दुर्लक्षितच राहिले. गेल्या (म्हणजे १९व्या) शतकात अस्तित्वात असणाऱ्या अत्यंत व्यापक अशा संशयात्मक वातावरणाचा हा परिणाम. भौतिक नियमांबद्दलचा सुशिक्षित जगातही असणारा संशय, हेच त्याचे कारण. मेयरचे काम चालूच होते. त्याने लावलेले शोध व दिलेल्या सिद्धता हे त्याचे कारण नव्हते, तर त्याचा विश्वास, त्याची श्रद्धा, हे ते कारण होते. जर्मन भौतिक शास्त्रज्ञ व शरीरशास्त्रज्ञांच्या परिषदेस, हेल्महोल्टझ प्रमुख असताना, मेयरच्या कामास मान्यता द्यायला १८६९ साल उजाडावे लागले. मी : तुम्ही खूप वेळा उल्लेख करता की, ज्या क्षणी काही मूलभूत समस्या सोडविण्यात आली आहे, असा विचार कोणाच्या मनात येतो, त्या वेळी एखादे नवे गूढ उकलले जाते व अशा प्रकारे विज्ञानाच्या प्रगतीची वाटचाल होते. प्लँक : हे तर निर्विवाद सत्य आहे. विज्ञान निसर्गातील गूढ अंतिमतः सोडवू शकत नाही. अंतिम विचक्षणेत त्याचे कारण पाहिले म्हणजे आम्हीही त्या निसर्गाचेच अपत्य, एक भाग आहोत म्हणजे त्या गूढाचाच एक भाग आहोत, आणि तेच गूढ सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे असे दिसते. संगीत आणि कला एका मर्यादेपर्यंत या गूढाचा शोध घेतात, अथवा त्यातील गूढाची अभिव्यक्ती करतात. माझ्या भावनेप्रमाणे पाहिले तर दोन्हीपैकी कुठल्याही क्षेत्रांत आपल्या प्रगती झाली, तर आपला व निसर्गाचाच सुसंवाद निर्माण होतो आणि ही विज्ञानाने व्यक्तीस दिलेली महान देणगीच होय. मर्फी : निसर्गाच्या मूलभूत अस्तित्वाविषयींचे ‘आश्चर्य’ ही मानवी मनाची भावना त्याची सर्वोच्च उपलब्धी असेल असे गोएथे एकदा म्हणाला होता. प्लँक : अगदी बरोबर. तर्काशी फारकत झालेल्या परिस्थितीशी आपली सारखीच गाठ पडत असते. तसे नसते, तर श्रद्धाही नसती. शिवाय श्रद्धा जर नसतीच. आणि मानवी तर्काने आपणास पडणारी सर्व कोडी आपण सोडव शकत असतो. तर जीवन म्हणजे एक रटाळ कंटाळवाणे ओझेच झाले असते. मग विज्ञान नाही. संगीत नाही. ना आश्चर्याची भावना. आणि विज्ञान नसणारच. विज्ञानातील अज्ञाताचा शोध हे त्याचे अनुसरण करणाऱ्यांचे मुख्य आकर्षणच इथे नाहीसे झालेले असणार. एवढेच नव्हे तर, विज्ञानाची मूळ आधारशिला, म्हणजे बाह्य विश्वास असणाऱ्या सत्याविषयीचे जाणीवपूर्वक निर्माण केले जाणारे प्रत्यक्ष आकलनही येथे नाहीसे होणार. आइनस्टाइनने म्हटलेच आहे, की बाह्यविश्वाचे अस्तित्व ही वस्तुस्थितीच आहे. पण ही जाणीव कुठल्याही तर्काची परिणती नाही. ही जाणीव प्रत्यक्ष जाणीव असते, आणि त्याचे स्वरूप आपण ज्याला श्रद्धा म्हणतो त्याच्या जवळपास असते. भौतिकीच्या पलिकडील (metaphystroal) हा एक विश्वास असतो. आणि हीच संशयग्रस्तीची धर्माच्या बाबतीतील शंका असते. तशी तर ती विज्ञानाचे संदर्भातही असतेच. असे असले तरी ही एक प्रकारे सैद्धान्तिक भौतिकीच्या पक्षांत असते, हे विज्ञान कार्यात उतरते आणि परिणामी सर्वसाधारण कल्पनाशक्तीस आवाहन करते व गुंगविते. अशा प्रकारे, काही मर्यादेत, आजकाल धर्म ज्या गोष्टींचे समाधान देऊ शकत नाही ते समाधान, मूलभूत ज्ञानाबद्दलची क्षुधाशास्त्र भागवू शकते. पण ही घटना पूर्णपणे धार्मिक प्रतिसादाला अप्रत्यक्षपणे कार्यरत करणारी असली तरीही विज्ञान हे विज्ञान म्हणून धर्माची जागा कधीच घेऊ शकणार नाही.

मॅक्स प्लँक (१८५८-१९४७) यांच्या मूळ Where Science is going, New York: Norton 1932, या पुस्तकातील अंश- Ken Wilber संपादित Quantum Questions – Shambhala Boston, 2001 या पुस्तकातून]
पद्मावती २०, शिरगांवकर सोसायटी, टाकाळा, कोल्हापूर ४१६ ००८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.