फायनल ड्राफ्ट

मी मांसकांची ग्रंथतात्पर्यनिर्णयपद्धती वर्गात शिकवली नि त्याच दिवशी फायनल ड्राफ्ट नाटक पाहिले. कदाचित त्यामुळे मीमांसकांनी दिलेल्या सात कसोट्यांच्या आधारे नाटकाचे मूल्यमापन करण्याचा मोह झाला. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती व फल ह्या सात कसोट्या ग्रंथांचे तात्पर्य ठरविण्यासाठी वापरता येतात. ग्रंथांप्रमाणेच एखाद्या नाटकाचे तात्पर्य ठरविण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल. सुरूवात (उपक्रम) व शेवट (उपसंहार) यांचा येथे प्राधान्याने विचार करावयास हवा.
फायनल ड्राफ्ट च्या सुरुवातीलाच जाणवतो, तो प्रचंड ताण. तब्बल एक तास निव्वळ वाट पाहण्यात गेला नि आता पुण्याला जाणे बोंबलले म्हणून अस्वस्थतेने धुमसणारे सर नि, एकंदरीतच, हबकून गेलेली विद्यार्थिनी. वर्गात शिकवलेले ओ का ठो कळत नाही, म्हणून सरांनी तिला घरी बोलावले. ती आत न येता तासभर बाहेर उभी राहिली, विचार करीत, तीही कमालीची अस्वस्थ. संपर्ण नाटकात पात्रे फक्त दोन. दोघांचीही मनःस्थिती बिघडलेली.
टेलिव्हिजन अॅकॅडमीचे सर आणि स्क्रिप्ट राइटिंगचे तंत्र शिकू पाहणारी विद्यार्थिनी. ‘मुलांना कळले नाही, तर तो त्यांचा प्रश्न..’ म्हणणाऱ्या शिक्षकांप्रमाणे हे सर नाहीत. तो शिक्षकाचा पराभव मानून एक आह्वान म्हणून ते तिला शिकवू पाहतात. त्यासाठी स्वतःचा कितीही वेळ खर्च करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यावेळी अर्जुनाप्रमाणे त्यांचे एकच लक्ष्य असते, तिला घडविण्याचे; परंतु दोघांमध्ये सुसंवाद होणे फार दूर; साधा संवादही होत नाही. समज-गैरसमज, राग-चीड, आरडाओरड, आरोप-प्रत्यारोप ह्या सगळ्याच्या फैरी झडत असताना मुळाशी असते वैफल्य नि असमाधान, अंगभूत गुणांची कदर न झाल्याने अपयशाचे धनी झाल्याचे दुःख, श्रेय हरपल्याचे, ईप्सित साध्य न झाल्याचे दुःख, जीवन सार्थकी न लागल्याची खंत, परिस्थितीला शरण जावे लागत असल्याने तडफडाट, दुरावलेले, तुटलेले नातेसंबंध नि म्हणून अपरिहार्यपणे येणारे एकाकीपण.
सरांची पत्नी व मुलगी पुण्याला असतात. पत्नीशी बोलणे कायमच चढ्या, तापलेल्या आवाजात, चिडचिडीचे. मुलीशी त्यामानाने बरे. बारावीला नापास झाल्याची बातमी कळल्यावर तिच्याशी बोलणे होते, जाणीवपूर्वक, संयमी; मात्र मनातून तिच्याविषयीही रागच. “साधं दहावी-बारावी पास होता येत नाही, मग करता काय तुम्ही ह्या वयात दिवसभर…’ असे हक्काने नि मनमोकळेपणाने विद्यार्थिनीजवळ बोलून जातात पण मुलगी लांब आहे म्हणून की काय, तिच्याशी जेवढ्यास तेवढे बोलतात. मुळात यथावकाश येणारा मोकळेपणा, अनौपचारिकपणा, अकृत्रिमता, सच्चेपणा हा ह्या दोघांमधील नात्याचा लोभस भाग आहे; जमेची बाजू आहे. कसलाही आडपडदा न ठेवता दोघेही हळूहळू सावकाश आपापले वैयक्तिक आयुष्यातील तपशील उलगडत जातात. स्वतःच्याही नकळत. वास्तविक दोघांच्याही मनातील सीमारेषा ठळक आहेत. खाजगी व व्यावसायिक आयुष्यातील ढवळाढवळ दोघांनाही मान्य नाही. दोघेही मर्यादांवर ठाम आहेत, तरीही एकमेकांमधील त्यांची भावनिक गुंतवणूक विलक्षण असल्याचे दिसते. रुसव्याफुगव्याची आवर्तने, क्षमायाचना, केअरिंग-शेअरिंग अशी सगळी रूपे येथे पाहायला मिळतात.
मी व्यक्तिरेखांच्या मानसिकतेचा वेध आधिक्याने घेत आहे, असा आरोप संभवतो. भावनांपेक्षा तर्काला, विवेकाला अधिक महत्त्व असल्याने ह्या व्यक्तिरेखांचा तर्कतः विचार करणे अधिक उचित, हे तर खरेच; परंतु मुळात दोघांमधील नाते तर्काच्या, विवेकाच्या पलिकडील आहे, असे मला वाटते. रूढ, चाकोरीबद्ध, नातेसंबंधापलिकडील बंध-अनुबंध चित्रित करणे हेच प्रस्तुत नाटकाचे उद्दिष्ट असावे, असे वाटते. ह्यातच नाटकाची अपूर्वता सामावली आहे.
उपक्रमानंतर उपसंहाराचा विचार न करता ‘अपूर्वता’ ह्या मीमांसकांच्या कसोटीचा विचार केला, तर असे म्हणता येईल की दोन जिवांमधील अपूर्व नातेसंबंधांचा घेतलेला हा वेधही अपूर्वच आहे. ते रूढार्थाने प्रेमिक नाहीत. शारीरिक जवळिकीचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. सरांचे बोलणे तिला क्वचित सूचक वाटले, तरी त्यापलिकडे जाणारा त्यांच्यातील जिव्हाळा. त्या दोघांची नावे महत्त्वाची नाहीत, हे अधोरेखित करण्यासाठी की काय, तो तपशील येत नाही, एवढे मात्र खरे. एकंदरीत, नात्यांचे इतर संदर्भ अर्थवादात्मक मानून त्यांची बोळवण करता येईल; पण शेवटी राहते ती आत्मीयता. परस्परांविषयीचा कळवळा. “ऐशी कळवळ्याची जाती। करी लाभावीण प्रीती’ची आठवण करून देणारा. इतर व्यक्तिरेखा रंगमंचावर न येता ही फक्त दोघांची कहाणी आहे, हे महत्त्वाचे. अर्थात काहींशी फोनवर संभाषण होते, परंतु ते केवळ त्या पार्श्वभूमीवर ह्या दोघांमधील आपलेपणा गडदपणे व्यक्त करण्यासाठीच असावे.
मीमांसकांची यापुढील कसोटी म्हणजे ‘अभ्यास’ होय. संहितेत पुनःपुन्हा अधोरेखित केलेला मुद्दा म्हणजे ‘अभ्यास’ होय. मानवी मनाचे कंगोरे उलगडून दाखविणे व यशापयशाचे भोवरे स्पष्ट करणे ह्या मध्यवर्ती सूत्रांभोवती नाटक फिरते, म्हणून त्यांना ‘अभ्यास’ म्हणता येईल. “सोडलं तर पळतं नि धरलं तर चावतं’ अशा अवस्थेतील दोहोंमधील भावबंध टिपण्याचा प्रयत्न वारंवार दिसतो. वास्तविक कोणत्याही नात्याचे बंधन नसूनही परस्परांविषयी अपार उत्सुकता, ओढ, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांची चाललेली धडपड सातत्याने व्यक्त होते. मानवी मनाचा गुंता सहजासहजी सुटत नाही. म्हणून तर (पंधरा वर्षांपूर्वीच्या) लिखाणातून व्यक्त होणाऱ्या सरांची आता समोर असणाऱ्या सरांशी सांगड घालताना तिची अक्षरशः फरफट होते. तिच्या मनातील सरांची प्रतिमा आणि वास्तवातील सर ह्यांतील महदंतर तिला वारंवार जाणवते, आणि ती कमालीची अस्वस्थ होते. शेवटी ती ते बोलूनही दाखवते. ती त्यांचे मूल्यमापन करत असतानाच तेही तिच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत असतात.
सुरुवातीला ते तिला वेडी ठरवून मोकळे होतात! मग ती त्यांना मूर्ख, अडाणी नि मठ्ठ वाटते. त्यानंतर धूर्त, बेरकी, चलाख, फाजील आत्मविश्वास बाळगणारी, ओव्हरस्मार्ट, बाईक उडविणारी उच्छंखल, बेपर्वा, बेदरकार वाटू लागते. अखेरीस मात्र त्यांना जाणवतो तो एक धडपडणारा, उद्दिष्ट गाठू पाहणारा, निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारा नि त्यावर मात करून पुन्हा पाय रोवू पाहणारा त्याला मदतीचा हात देणे सरांचे कर्तव्यच. आपल्या विद्यार्थ्यांचा पराभव पाहणे सरांच्या खाक्यात न बसणारे.. त्यामुळे तिला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी सरांनी अक्षरशः प्रयत्नांची शर्थ केलेली असते; पण भावनिक गुंते वाढत जातात, वातावरण तापत जाते आणि शेवटी तोडल्याखेरीज पर्याय राहत नाही. सरांचे सांगणे, शिकवणे तिच्यापर्यंत पोहोचत नसल्याने स्वतंत्रपणे बळ कमावून ती पंख पसरवते आणि अखेरीस आपली फिल्म-स्टोरी स्वीकारली गेल्याची बातमी सरांना सांगावयास येते नि सरही आपल्या नवीन पुस्तकाच्या आगमनाची सवार्ता तिला देतात. नाटकाचा उपसंहार होतो तो असा.
स्क्रिप्ट राइटिंगचे प्राथमिक धडे देताना सरांनी तिला शेवट गोड करण्याचा मूलमंत्र दिलेला असतो. शिणल्या मनाला उभारी देणारे, संघर्षासाठी ताकद पुरविणारे, जीवनकलहासाठी ऊर्जा देणारे नाटक सुखान्तच हवे. सुरुवातीला तिला सायकिअॅट्रिस्टकडे जाण्याचा सल्ला देणारे सर अखेरीस तिला तिचे वेडेपण जपण्याचा सल्ला/आशीर्वाद देतात नि एक प्रांजळ कबुलीही. वास्तविक पुस्तक तिला समर्पित करावयाचे मनात असूनही व्यवहाराचा विचार करून ते तिच्याऐवजी पत्नीला समर्पित करतात; ही झाली एक तडजोड. व्यवहारात यशस्वी होण्याकरता अशा अनेक तडजोडी कराव्या लागतात. आदर्श कवटाळून बसले, तर यशाची शाश्वती नाही म्हणून काहीतरी लटपटी करतच यशस्वी होण्याचा मार्ग चोखाळावा लागतो. मूल्यांची आच असलेल्या सरांचे मन मग ‘ठीक’, ‘चांगलंय’, ‘छान’ अशी दाद देत राहते; पण हे यश ‘शायनिंग इंडिया’ सारखे फसवे, वरवरचे, दिखाऊ, बेगडी आहे, असे त्यांना वाटत असावे.
फिल्म-स्क्रिप्ट राइटिंग ज्या पद्धतीने शिकवले जाते, जसे स्वीकारले जाते व जसे मुळात साकारले जाते, त्यावर केलेली मल्लीनाथी म्हणजे फायनल ड्राफ्ट असेही म्हणता येईल. वास्तविक विविध दृष्टींनी नाटकाचा विचार करता येणे शक्य आहे आणि अशा शक्यता निर्माण करण्याची ताकद संहितेत पुरेपूर आहे. म्हणूनच अशा प्रशंसनीय नाट्यप्रयोगांची दखल घेणे भाग आहे. गिरीश जोशी व मुक्ता बर्वे यांच्या अभिनयाला दाद द्यावी तितकी थोडीच आहे शिवाय लेखन-दिग्दर्शनाचे श्रेयही जोशींचेच आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनिसंचलनही अप्रतिम आहे.
ह्या नाटकाची फलश्रुती नेमकी कोणती, ह्याचा विचार करताना मला सॉक्रेटिसची आठवण झाली. गोचीड जशी आपल्याला दंश करून अस्वस्थ करून सोडते, त्याचप्रमाणे सॉक्रेटिस आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. अंतर्मुख करून प्रश्नांची उत्तरे शोधण्यास आपणास भाग पडते, ते सॉक्रेटिसच्या मर्मभेदक प्रश्नांमुळे. नाटक जरी मूलभूत स्वरूपाचे प्रश्न उपस्थित करत नसले, तरी प्रखर वास्तवाचे दाहक चित्रण करून अस्वस्थतेचा अनुभव देते आणि तेथेच प्रेक्षकांना सोडून न देता सुखाचा शेवट दाखवून आशा पल्लवित करते व विलक्षण नाट्यानुभव देते, हेच ह्या नाटकाचे फलित होय. सुरुवातीचे धुमसते वातावरण संपून शेवटी उरतात ते प्रखर वास्तवाचा स्वीकार करून शांतपणे, समजूतदारपणे, संयमाने संवाद साधणारे व विवेकाचे मार्ग काढणारे दोन जीव.
सी-२, ५०१, लोकमीलन, चांदिवली, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०७२.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.